मराठी भाषा दिन २०१७: पुणेरी कसे बनाल? (पुणेरी)

सपे-पुणे-३०'s picture
सपे-पुणे-३० in लेखमाला
22 Feb 2017 - 6:16 am

1
पुणेरी कसे बनाल?
पुणेरी मराठी भाषा, पुणेरी माणसांचे स्वभाव, पुण्याचे रस्ते, पुण्याची रहदारी, पुण्यातील दुचाकी आणि दुचाकी चालक, पुणेरी दुकानदार आणि गिर्‍हाइक अशा अनेक विषयांवर मिटक्या मारत, कुत्सितपणे चर्चा केली जाते. पुण्याला, पुणेरी माणसांना आणि तत्सम पुणेरी गोष्टींना नावं ठेवायचं काम पुण्याबाहेरील मंडळीच करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे - न्यूनगंड! स्वतःला 'पुणेरी' बनता न आल्याने निर्माण झालेली कमीपणाची भावना! म्हणतात ना - कोल्ह्याला द्राक्षं आंबट, तसंच काहीसं. अर्थात यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. 'पुणेरी' कसं व्हायचं, याविषयी ना कसला मार्गदर्शन वर्ग, ना कसले पुस्तक. गुरुवर्य पु.ल.नी पन्नास वर्षांपूर्वी ह्या विषयावर मार्गदर्शनपर काही लिखाण केलं. पण कालौघात ते सगळे नियम तंतोतंत लागू होत नाहीत. म्हणूनच आम्ही हे बनवायचं काम मनावर घेऊन एक नवीन पुस्तक लिहिलं आहे- 'पुणेरी कसे बनाल?' आता पुणेरी होण्याची सगळी काळजी झटकून टाका. आम्ही आपल्याला बनवू. मराठी दिनाच्या निमित्ताने ह्या पुस्तकातील काही मजकूर आम्ही प्रकाशनपूर्व येथे देत आहोत. त्यावरून वाचकांना ह्या पुस्तकाचा आवाका लक्षात येण्यास मदत होईल.

पुणेरी होण्यासाठी अंगी कोणत्याही गोष्टीबद्दल 'जाज्वल्य अभिमान' असावा लागतो. पण हा जुना नियम झाला. आजकालच्या काळात जाज्वल्य अभिमानाबरॊबरच अंगी 'माज' असावा लागतो. माज नुसता असून चालत नाही, तर जिथे संधी मिळेल तिथे तो दाखवत राहणं अत्यावश्यक आहे. 'माज' आणि 'जाज्वल्य अभिमान' यांतील सीमारेषा अतिशय पुसट असते. हा अतिसूक्ष्म फरक लक्षात येण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू-

1

पुणेरी पाटी ही पुणेकरांसाठी जाज्वल्य अभिमानाची बाब आहे. आता वरील पाटीवरील मजकुरातील शेवटच्या दोन ओळी लक्षात घेऊ. टेनिस शूजची व्याख्या ठरविण्याचा अधिकार क्रीडा समितीने राखून ठेवला आहे ह्या ओळीत जे प्रतीत होते, त्याला 'माज' म्हणतात.

पुणेरी बनण्यासाठी आणखी एक महत्त्वाची पायरी म्हणजे पुणेरी रहदारीत अतिशय आत्मविश्वासाने वाहन - विशेषतः दुचाकी चालवणं. ह्या पुण्यभूमीचं हे वैशिष्ट्यच आहे. उगीच नाही मावळे सैन्यातून वाट काढत सहज निशाणापर्यंत पोहोचत असत. आपलं ध्येय कितीही अवघड असो, अडचणींमधून मार्ग काढत ते कसं गाठायचं ह्याचं शिक्षण पुण्याच्या रहदारीतून दररोज मिळतं. त्यासाठी साधे सरळ सोपे नियम आहेत.

१) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतुकीचे नियम, लेनची शिस्त वगैरे सगळं थोतांड आहे व हे सगळं केवळ वाहन परवाना देताना सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी काम केल्यासारखं वाटावं म्हणून निर्माण केलं गेलेलं आहे, हे मनावर बिंबवून घेणं.

२) वाहन चालवताना आपण व्हिडिओ गेम खेळत असल्याची समजूत करून घेऊन त्या प्रकारेच वाहन चालवणं.

३) वाहनाचे बाजूचे आरसे मागचं दिसेल अशा तऱ्हेने कधीही लावायचे नसतात. जी व्यक्ती आरसे नीट लावून वाहन चालवते, तिला भ्याड समजलं जातं.

४) वाहन चालवताना, 'ओ काका चला', 'काय घरात हिंडताय काय?', 'बागेत फिरताय काय?', 'अहो हा रस्ता आहे बाग नाही', 'ए चल चल', 'माकड कुठला', अशा प्रकारे मोठमोठ्याने टिप्पणी करावी.

५) सिग्नलच्या वेळेच्या प्रणालीत काही तरी गडबड आहे असं गृहीत धरून सिग्नल संपायला ५-६ सेकंद असतानाच गाडी सुसाट वेगाने दामटवावी.

'पाण्यात पडल्यावर पोहता येतं', तसंच गाडी घेऊन एकदा का रस्त्यावर आलं की आपोआप वरील नियम अंगवळणी पडतात. कुणीतरी म्हटलेलंच आहे की एकदा का पुण्यात गाडी चालवली की माणूस जगात कुठेही गाडी चालवू शकतो.

1

'पत्ता सांगणं' ही क्रियाही पुणेरी होण्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सर्वसामान्यपणे जेव्हा पत्ता माहीत नसतो किंवा सापडत नसतो तेव्हाच विचारला जातो, हे लक्षात घेऊन शक्यतो सोप्या भाषेत सांगणं अपेक्षित असतं. पण पुणेरी पद्धत जरा वेगळी आहे. पत्ता सांगताना, 'डावीकडे', 'उजवीकडे' ह्या सर्वमान्य संकेतांना इथे काहीच अर्थ नसतो. पुण्यात पत्ता सांगताना दोन मुख्य दिशांचा उपयोग केला जातो, 'वर' आणि 'खाली'. ह्या दोहोंच्या खालोखाल, 'आग्नेय','नैऋत्य'... ह्या उपदिशांचा उपयोग होतो आणि सर्वांत शेवटी, पूर्व, पश्चिम,.... ह्या आपल्या चार मुख्य दिशा. तसंच पत्ता सांगताना कोणालाही सहज माहीत असलेली रस्त्यांची नावं किंवा ठिकाणं न सांगता सहसा माहीत नसलेली नावं सांगणं. त्यातून पत्ता जर पेठांमधील असेल, तर मग सोन्याहून पिवळं! नमुन्यादाखल एक उदाहरण पाहू या - समजा आपल्या उत्तर भारतीय शेजाऱ्याला बायकोसाठी सिल्कची साडी विकत घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला कोठून घ्यावी असं विचारलंय. आपण त्याला सांगावं की जर उत्तम प्रतीचं सिल्क हवं असेल, तर 'पल्लोड'सारखं दुकान नाही. वास्तविक ह्या दुकानात १५ हजाराखाली साडी येत नाही याची आपल्याला कल्पना आहे, तसंच शेजाऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचीही कल्पना आहे. पल्लोडचा पत्ता सांगताना 'रंगोली' हॉटेलवरून सरळ खाली जा असं सांगावं. हे रंगोली हॉटेल कधीचंच बंद झालंय. मग साहजिकच तो शेजारी फुकटची खेप घालून परत येऊन विचारेल. मग आपण म्हणावं की बजेटमध्ये हवी असेल, तर रविवारातच जावं. आता रविवारात जाण्यासाठी रस्ता सांगताना पुण्यातील तमाम गल्ल्या, पासोड्या, भांग्या वगैरे नावं धारण करणाऱ्या देवांची देवळं, अशा विविध स्थळांचं दर्शन शेजाऱ्याला घडेल असं पाहावं. म्हणजे, "मोदी गणपतीपासून सरळ वर जा. तेथून पत्र्या मारुतीवरून पुढे ईशान्येला जाऊन वर जा आणि रामचंद्र बुचडे पथवरून सरळ खाली जा, तिथे समोरच अचानक तरुण मंडळ दिसेल, तिथून वायव्येला सरळ वर जा" अशा प्रकारे दिशा सांगाव्यात. शगुन, नटराज सिनेमा, चित्रशाळा अशा सध्या अस्तित्वात नसलेल्या स्थळांची नावं आवर्जून सांगावीत. म्हणजे समोरचा पुरता गांगरून जातो.

1

गुरुवर्य सांगूनच गेले आहेत की 'खाजगी पुणेरी' आणि 'सार्वजनिक पुणेरी' हे पुणेरी होण्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. पण पन्नास वर्षांनंतर हे टप्पे पार करण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते. काळाचा महिमा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची किमया! पूर्वी सार्वजनिक पुणेरी होण्यासाठी वेगवेगळ्या चर्चासत्रांना, व्याख्यानमालांना हजेरी लावणं गरजेचं होतं. तसंच वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहावं लागायचं. पण सध्याच्या काळात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या मराठी संस्थळांनी ह्या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळे 'बाजरीवरील कीड'च काय, त्यापेक्षाही फालतू विषयावर आपले मत आपण ठणकावून लिहू शकतो. शिवाय इथे टोपणनावाचीसुद्धा सोय असते. सगळाच 'आभासी' मामला! एकाच वेळी दोन-तीन टोपणनावं घेऊन ठेवावीत, म्हणजे एकाच विषयावर आपण वेगवेगळी मतं व्यक्त करू शकतो. ह्या संस्थळांवर लिहिताना, कोणत्याही विषयावरची मतं आणि विचार हे व्यक्तिसापेक्ष असतात हा नियम विसरून जायचं असतं. आपले विचार आणि मतं समोरचा मान्य करेपर्यंत वाद घालत राहायचं, अगदी हमरीतुमरी झाली तरी चालेल.

आपल्याला जर वाद घालायचा नसेल तर दुसरा कोणी वाद घालताना किमान, 'व्यक्तिगत टीका टाळा', 'मुद्द्याला धरून लिहा', असा उपदेश करण्याचा आव आणून आगीत तेल ओतात राहायचं. समोरच्याशी वाद घालायला मुद्दा सापडत नसेल, तर 'अभ्यास वाढवा' असा शेरा मारावा किंवा समोरच्याच्या सदस्यकाळावरून त्याची मापं काढावीत. दुसऱ्यांच्या लेखांवर प्रतिसाद देताना, आपण ज्येष्ठ समीक्षक असल्याचा आव आणून नेहमी टीकात्मकच प्रतिसाद द्यावा. एखाद्या लेखावर कोणताच प्रतिसाद सुचत नसेल, तर 'पॉपकॉर्न घेऊन बसलोय' किंवा 'अच्चं झालं तर' अशी नाहक हिणकस शेरेबाजी करावी. नवीन लिहायला विषय सुचत नसेल, तर बायकांचा कजागपणा, विवाहोत्सुक मुलांकडून विवाहोत्सुक मुलींच्या अवास्तव अपेक्षा, भ्रष्टाचार, भारतात हिंदूंवर, मुसलमानांवर की सगळ्यांवर अन्याय होतोय, अशा सदाहरित विषयांवर लिखाण करून खुशाल काथ्या कुटावा. मात्र सुरुवातीला संस्थळांवर जाऊन नुसतं निरीक्षण करावं आणि संस्थळांची विशिष्ट भाषा शिकून घ्यावी. 'व्यनि', 'खफ', 'चेपू', 'रच्याकने' यासारखे शब्द शिकून घ्यावे. ही भाषाशैली भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणून मान्यताप्राप्त आहे. अशा प्रकारे मराठी संस्थळांवर वावरल्याने एकाच वेळी आपण 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' पुणेरी बनतो.

'पुणेरीपणा' एखाद्या स्थळापुरता मर्यादित नसून हा मानवी स्वभाववैशिष्ट्यं आणि वृत्ती यांचा अजब मिलाफ आहे. त्यामुळेच कोणत्याही पुणेकराव्यतिरिक्त मुंबईकर, नागपूरकर किंवा आणखी कोणीही 'पुणेरी' बनू शकतो. अतिशय कष्टाचं काम असलं, तरीही एकदा का साध्य झालं की मग त्याचा काही वेगळाच कैफ असतो.

'पुणेरी कसे बनाल?' ह्या आमच्या आगामी मार्गदर्शक पुस्तकातील हे काही उतारे. मौजमजा प्रकाशन हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित करत आहे. सुज्ञ मिपा वाचकांच्या अभिप्रायांसाठी आम्ही हे उतारे प्रकाशनपूर्व येथे दिले आहेत. 'पुणेरी' होण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना हे पुस्तक वाट दाखवण्याचे काम करेल, यात शंकाच नाही. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
------------------------------------------------
(चित्रे आंतरजालावरून साभार)

1

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

22 Feb 2017 - 6:47 am | प्रीत-मोहर

=)) =))
,मस्त हाणलेंत हो शालजोडीतले

रुपी's picture

22 Feb 2017 - 7:30 am | रुपी

हा हा.. भारीच.

बाकी ते परराज्यांतून आलेल्यांबद्दल आणि आय.टी.वाल्यांबद्दल पुस्तकात वाचायला मिळेल ना? ;)

अजया's picture

22 Feb 2017 - 8:38 am | अजया

अगागागा
=))))))
लेख आणि लेखातली पाटी सगळेच पुणेरी आहे पहिल्या धारेचे अगदी ;)

पैसा's picture

22 Feb 2017 - 8:42 am | पैसा

=)))) तुफान! सपे-पुणे ३० साक्षात लिहिणार, मग अजून काय पाहिजे! येऊ दे पुस्तकातील पुढची प्रकरणे तब्बेतीत!

अभिजीत अवलिया's picture

22 Feb 2017 - 8:54 am | अभिजीत अवलिया

मोगॅम्बो खूश हुआ.

सुबोध खरे's picture

22 Feb 2017 - 9:59 am | सुबोध खरे

उत्तम पुणेरी होण्यासाठी आपण सोडून या पृथ्वीतला वरील यच्चयवत जीव क्षुद्र आहेत असे मानायचे असते आणि तसे त्यांना जाणवून द्यायचे असते.
उदा. ज्ञानेश्वरीवर टिप्पणी करताना एका पुणेकरांचे मत -- वयाच्या मानाने "बरं" लिहिलंय.

एस's picture

22 Feb 2017 - 10:26 am | एस

हम्म्म. ठीssssक लिहिलंय. जरा तो पहिला फोटो वगळता इतर फोटो पुण्यासंबंधीचे असते तर लेख थोडासा पुणेरी दिसला असता असे वाटले. बाकी कितीही पुस्तके घोटली आणि कितीही व्याख्यानमाला ऐकल्या तरी अ-पुणेंकर कधीही पुणेंकर बनू शकत नाहीत. तस्मात मौजमजावाल्यांना असल्या भानगडीत पडू नका असा सल्ला चकटफू देण्यात येत आहे.

- (खालल्या अंगाच्या हबक्या गणपतीच्या ईशान्य भिंतीच्या कट्ट्यावर जमून न्यूरेंबेर्गच्या महापौर निवडणुकीतली आव्हाने या विषयावर व्याख्यान देणारा) एस. ;-)

(ह. घ्या.)

अ-पुणेंकर कधीही पुणेंकर बनू शकत नाहीत.

अगदी अगदी!

मुळात पुणे म्हणजे कुठले हे आधी नक्की करायला हवे. आमच्या मते 'बाजीराव, केळकर आणि टिळक रस्त्यांचा आतले' तेच खरे पुणे!

अस्सल पुणेकराच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय, जसे नाटक, संगीत, भाषा, खाणे, इथले शिक्षण, एकूणच मूळची पुण्याची संस्क्रुती- किमान या प्रकरणात तरी आलेलेच नाहीत.
अत्ता परवाचीच गोष्ट- 'गीर आणि देवणी जातीच्या जनावरांमधील लाळ्या खुरकुत्या रोगाच्या उपचारांचा तौलनिक अभ्यास' अश्या(अर्थातच मोफत)भाषणाला टिस्मा मंदिरात गेलेल्या आमच्या 'सपे' मित्राने वक्त्याशी असा प्रतिवाद केला, की लिमयेवाडीत त्याचा गोठाच आहे असा त्या वक्त्याचा समज झाला. तुम्हाला इतकी माहिती कशी? असा प्रश्न वक्त्याने करताच त्याच्याकडे तुच्छतेने पहात हा मित्र म्हणाला, '' अभ्यास! अभ्यास असतो आमचा!''

"पुणेरी कसे बनेल" असं वाचलं.

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 12:14 pm | सस्नेह

फारसा फरक नाही ! =))

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 12:16 pm | सस्नेह

'बरा जमलाय हो लेख ! मुळा-मुठेचं पाणी चाखलं असं वाटताय हो !'
जमतोय ना 'पुणेरीपणा ' ? =))

यशोधरा's picture

22 Feb 2017 - 1:07 pm | यशोधरा

नाही. =))

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 4:00 pm | सस्नेह

अस्सल कोल्लापुरी मान्साला कसा जमायचा पुणेरीपणा म्हणा !

यशोधरा's picture

22 Feb 2017 - 7:33 pm | यशोधरा

ह्याला अनुमोदनार्थी एक ओवीसदृश म्हण आम्हांला येते, पण ती इथे लिहिली की तुम्ही कोल्हापूरहून पुण्याला येउन माराल!
तरी आम्ही चहा देऊ, तो पिऊनसुद्धा आम्हांला नावं ठेवाल, म्हणून तुम्हांला सोडून देण्यात येत आहे!!!

=)))

'पुणेरी माज' 'माज' म्हणतात तो हाच वाट्टे ;)

यशोधरा's picture

23 Feb 2017 - 3:38 pm | यशोधरा

नाही, तुम्हांला अजून माज माहित नाहीये. :)

कौतुक केलंत तिथेच संपलं पुणेरीपण!! 'शिंचं ह्याच्यापेक्षा आमच्या अमक्यातमक्याचा तमका तमका बरा लिहील हों!!' हे अगदीच नाही पण त्यातल्या त्यात पुणेरी म्हणून खपू शकेल.

संजय पाटिल's picture

22 Feb 2017 - 12:59 pm | संजय पाटिल

पुणेरी फटाका...

पहिल्याच पुस्तकाच्या मानानें ठीक जमलंय तसं, पण अभ्यास कमी पडलाय. तितका वाढवा म्हणजे झालं!

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 1:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या आगामी पुस्तकाची अशी झैरात करणे मिपाच्या धोरणात बसते काय, असा प्रश्न मी येथे उपस्थित करत आहे ?

मिपाचा असा दुरुपयोग करणार्‍यांचा आणि ते सहन करणार्‍या (काय ते आपल्या... तश्या) प्रशासनाचा जाहीर निषेध, निषेध, निषेध !

पूर्वीचे मिपा राहीले नाही, हेच खरे !

=)) =)) =))

सपे-पुणे-३०'s picture

23 Feb 2017 - 11:15 am | सपे-पुणे-३०

छे !छे ! जाहिरात करायचा प्रश्नच येत नाही, कारण तशी गरजच नाही.
आमचं असं निरीक्षण आहे की पुणेरीपणा अंगी न भिनवता आल्याने अनेक मिपा वाचक बिचकत-बाचकत आपली हळहळ व्यक्त करतात. अशांना मार्गदर्शन करून त्यांच्यात इतका आत्मविश्वास जागवायचा की त्यांनी, 'एकच बाणा.... पुणेरीपणा' सारखा लेख लिहिला पाहिजे इतकच.

किसन शिंदे's picture

22 Feb 2017 - 2:45 pm | किसन शिंदे

पहिली पाटी मी आजवर पाहीलेल्या पाट्यांमध्ये उजवी आहे. बाकी लेख यथातथाच. =))

तिमा's picture

22 Feb 2017 - 3:02 pm | तिमा

वरील सर्व (अव्)गुण आणि लेखांत नसलेल्या कित्येक क्लुप्त्या आम्ही पुण्यात न रहाताच शिकलो आहोत. त्यामुळे पुण्यात वावरताना, आम्ही परके आहोत वा स्थलांतरित आहोत, असा कुणाला संशय देखील येत नाही.

वेल्लाभट's picture

22 Feb 2017 - 3:18 pm | वेल्लाभट

अफलातून !
नोंद घेतो आहे

पुण्यामध्ये वाडेश्वर जास्त चांगले का वैशाली ? असा प्रश्न खुपदा पडतो .

सपे-पुणे-३०'s picture

23 Feb 2017 - 11:27 am | सपे-पुणे-३०

आपण कधीही स्वतःला प्रश्न पाडून घ्यायचे नसतात. नेहमी दुसऱ्यांना कोड्यात टाकायचं.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

१) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतुकीचे नियम, लेनची शिस्त वगैरे सगळं थोतांड आहे व हे सगळं केवळ वाहन परवाना देताना सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी काम केल्यासारखं वाटावं म्हणून निर्माण केलं गेलेलं आहे, हे मनावर बिंबवून घेणं. २) वाहन चालवताना आपण व्हिडिओ गेम खेळत असल्याची समजूत करून घेऊन त्या प्रकारेच वाहन चालवणं.

>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif दुत्त दुत्त न्रिक्षन! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif

सानझरी's picture

22 Feb 2017 - 5:36 pm | सानझरी

हाहा... मस्त लिहीलाय लेख..
पुणेरी रॅप पण ऐकून घ्या आता..

हा लेख वाचून अभिमान वाटला. क्या बात है!
ते सिल्कच्या साडीचं उदाहरण जरा अस्थानी वाटलं ........पण ते तसं मलाच वाटलय. सध्या अस्तित्वात नसलेल्या स्थळांचे उल्लेख करून पत्ते सांगण्यात आमच्या घरच्यांचाच हातखंडा आहे. अमका मारूती, तमका विठोबा म्हटलं की की देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. बरं, चिमण्या गणपती नक्की कुठाय? असं बघायला जावं तर एक चिमण्या आकाराचं देऊन असतं किंवा हे देऊळ नाही असं म्हटल्यास देवाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल म्हणून गप्प बसावं लागण्याइतपत असतं. माती गणपती, हत्ती गणपती वगैरे ऐकले की काय म्हणावे कळत नाही. मोदी निवडून येणार हे गणपतीबाप्पाला आधीच माहित होते म्हणून मोदी गणपती असे आधीच मिरवून घेतलेला एकमेव बाप्पा.
चला, आज पुण्यात चक्कर मारून झाली. ;)

जबरी, खट , केवळ , खलास अशी विशेषणे पण कधी अन कुठे वापरायची हे कळले पाहीजे :-)

सूड's picture

22 Feb 2017 - 7:16 pm | सूड

अशक्य, वाढीव, पडीक

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 1:13 am | स्रुजा

आवरा , निघा , जबरा..

एखाद्या पीजे ला हटकुन येणारा कॉमेंट " यापेक्षा बरा असता तर त्याला मी "वाईट" म्हणलं असतं" ;)

लेख ठिकठाक पण पुण्याची सफर झाली.

उत्तरा's picture

22 Feb 2017 - 7:25 pm | उत्तरा

:) :) मस्त लिहिलंय.

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 9:11 pm | पिलीयन रायडर

"अचानक तरुण मंडळ"?!! =))

पत्ता सांगण्याचा भाग सर्वात जास्त आवडला!

बाकी, भारी.. आवरा... डोक्याची मंडई.. वाढीव.. वगैरे शब्द पुणेरी भाषेत येतात का?!

वाढीव तर एरवीच ऐकू येतो हो!! फक्त तो चांगल्या अर्थी कधी आणि कुत्सित कधी वापरायचा हे अजून नीटसं कळलं नाही.

पुणेकर भामटा's picture

23 Feb 2017 - 1:31 am | पुणेकर भामटा

अगदिच कंडम लेख.

फेरफटका's picture

23 Feb 2017 - 2:15 am | फेरफटका

'पुणेरी' शब्दातच हिट-विकेट उडालीये. पु.लं. च्या 'खरा मुंबईकर मुंबई ला मुंबईच म्हणतो' ह्याच धर्तीवर, 'पुणेकर' असतो, पुणेरी नाही. पुणेरी फक्त पगडी असते. पुणेरी भाषा ह्या शब्दप्रयोगाला सुद्धा फारसा अर्थ नाही. हे म्हणजे समस्त परदेशी लोक्स ज्याप्रमाणे भारतीय जेवणाचं सरसकटीकरण एका 'करी'त करतात, तसा प्रकार आहे. पेठी (सदाशिव, नारायण, शनिवार) भाषा वेगळी, नदीपलिकडे आणखीन वेगळी. अस्सल पुणेकर तर भाषेच्या लहेजावरून शाळा सुद्धा ओळखतात.

मितान's picture

23 Feb 2017 - 11:25 am | मितान

मस्त पुणेरी !!!!

अनुप ढेरे's picture

23 Feb 2017 - 11:41 am | अनुप ढेरे

हा आयडी आदुबाळांचा आहे काय?

आदूबाळ's picture

23 Feb 2017 - 12:17 pm | आदूबाळ

नाय हो. मी एकायडीव्रता आहे.

एस's picture

23 Feb 2017 - 3:50 pm | एस

एकायडीव्रत ना?

त्यांचा वेगळा स्त्रीडूआयडी असेल. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 4:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकायडीव्रता की एकायडीव्रती ?! :)

आदूबाळ's picture

23 Feb 2017 - 5:09 pm | आदूबाळ

व्याकरणौरंगजेबांनो**, "एकायडीव्रती" बरोबर आहे! माय ब्याड =))

**"ग्रामर नात्झी"चा मराठी अवतार

तिमा's picture

23 Feb 2017 - 8:05 pm | तिमा

ए काय डीव्रती ? हा प्रश्न आहे.
त्याचे उत्तर 'एक बायडी व्रती' असं आहे.

पूर्वाविवेक's picture

23 Feb 2017 - 12:02 pm | पूर्वाविवेक

फारच छान, एकदम खुसखुशीत लेख.

उल्का's picture

23 Feb 2017 - 7:52 pm | उल्का

'पुणेरी' लेख एकदम मस्त!

औरंगजेब's picture

23 Feb 2017 - 9:59 pm | औरंगजेब

अगदी पुणे-३० लेख आहे.

इडली डोसा's picture

24 Feb 2017 - 12:03 am | इडली डोसा

यापेक्षा , 'पुणेरी माजाचा समर्थपणे सामना कसा कराल?' असे पुस्तक काढावे. जगभरातुन मागणी येईल.

बाकि, पुणेरी माजाच्या मानाने लेख फारच बोथट झाला आहे ;-)

पिशी अबोली's picture

26 Feb 2017 - 8:36 pm | पिशी अबोली

'गावात' जाणे, ७ मिनिटांत पोहोचणे, 'य' वेळा एखादी गोष्ट केलेली असणे, 'ष' चा अनावश्यक उच्चार मुद्दामून करणे, ठासून कुजकटपणा भरलेल्या गोष्टी दिवसातून काही वेळातरी बोलणे, शाळेचा आणि काही विशिष्ट कॉलेजांचा अभिमान असणे, इ. पुणेकरपणाचे महत्वाचे गुणविशेष आहेत असं एक केवळ मुंबईकरांसमोर पुणेकर बनणार्‍या कोंकणी व्यक्तीचं निरीक्षण..