बेख्डेल चाचणी

यशोधरा's picture
यशोधरा in लेखमाला
24 Jan 2017 - 7:10 pm

*/

तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण सिनेमाप्रेमी आहेत. आपल्यापैकी अनेक जण पहिल्या दिवशीचा पहिला शो न चुकवणारेही असतील. हल्ली तर पहिला शो बघून आल्यावर अनेक जण आपले फेसबुक स्टेटसही तसे अपडेट करतात! फॅशनच आहे ना तशी! किती तरी जण तर अगदी दावा करू शकतील की 'दे कॅन टॉक सिनेमा, दे कॅन वॉक सिनेमा, दे कॅन लाफ सिनेमा..' मान्य, अगदी मान्य. पण बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होणार्‍या सिनेमांची नावे सांगू शकतील का ते? आँ? टेल, टेल!

नै? बरं, आम्ही सांगतो. अगदी बैजवार सांगतो, निदान प्रयत्न करतो.

तर, पेश आहे चित्रपट रसिकांहो, ही एक छोटीशी गोष्ट.

कोणे एके काळी, म्हणजे १९८३ ते २००८ ह्या कालावधीमध्ये अ‍ॅलिसन बेख्डेल ही अमेरिकन व्यंगचित्रकार, फनी टाइम्स आणि गे आणि लेस्बियन समूहांसाठी चालवल्या गेलेल्या इतरही काही वर्तमानपत्रांमधून Dykes to Watch Out For ही हास्यचित्र कथामाला वा सदर चालवत असे. त्या काळी आंतर्जालावरही ह्या सदराचे पुन:प्रकाशन होत असे. अ‍ॅलिसन ह्या सदरामधून साधारणतः अमेरिकेतील एखाद्या सर्वसाधारण शहरामधून वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये राहणार्‍या समाजाच्या रोजच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांचे राग-लोभ, त्यांना रोजच्या आयुष्यात येणार्‍या अडचणी, पडणारे प्रश्न ह्याचे चित्रीकरण आणि वार्तांकन करत असे. सहसा ह्या कथामालेमध्ये लेस्बियन व्यक्तिमत्त्वे चितारलेली असत.

a

त्या काळी आजूबाजूला घडणार्‍या राजकीय राजकीय घटना, झालेच तर गे प्राईड परेड्स, विरोधी मोर्चे, लेस्बियन जगातील घडामोडी ह्यांविषयी ही पात्रे आपली मते व्यक्त करत. त्या काळी, एक हटके हास्यचित्र कथामाला म्हणून ह्या सदराला भरपूर लोकप्रियता प्राप्त झाली, आणि ह्याच हास्यचित्र कथामालेस अनुसरून पुढे, 'बेख्डेल-वॉलेस टेस्ट' ह्या चाचणीचा उदय झाला. अ‍ॅलिसनच्या नावावरून ह्या चाचणीचे नाव 'बेख्डेल टेस्ट' ठेवले गेले. अर्थात, आपली मैत्रीण लिझ वॉलेस आणि व्हर्जिनिया वूल्फ यांच्या लिखाणालाही अ‍ॅलिसन ह्या कल्पनेचे श्रेय देती झाली.

a

फोटो क्रेडीट - एलेना सीबर्ट

किंचित अवांतर म्हणून व्हर्जिनियाने काय लिहिले होते, हेही थोडक्यात बघू या.

'अ रूम ऑफ वन्स ओन' हे व्हर्जिनियाचे न्यनहम आणि गर्टन ह्या केंब्रिज विद्यापीठांतर्गत येणार्‍या मुलींच्या विद्यालयांमधून १९२८मध्ये दिलेल्या व्याख्यानमालेवर आधारित असे लिखाण, २४ ऑक्टोबर १९२९ रोजी प्रथम प्रकाशित झाले. स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून लिखाण करण्याची आवश्यकता व्हर्जिनियाने प्रतिपादली होती. असे लिखाण करण्यासाठी स्त्रियांपाशी पुरेसे आर्थिक बळ असायला हवे, तेव्हाच त्यांना लिखाणाचे स्वातंत्र्यही मिळू शकेल असे तिचे मत होते.

व्हर्जिनियाचे स्वतःचे वडील पुराणमतवादी होते. फक्त घरातील मुलांनीच शाळेत जावे, मुलींना औपचारिक शिक्षणाची गरज नाही, ह्या मताचे असल्याने, व्हर्जिनिया शा़ळेत पूर्ण वेळ औपचारिक शिक्षण घेऊ शकली नव्हती. मात्र ग्रीक व जर्मन भाषेचे शिक्षण तिला मिळाले.* (* अलीकडील काळात लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील दस्तावेज तपासले असता, व्हर्जिनिया व तिची बहीण वनेसा ह्यांनी ह्या कॉलेजातील स्त्रियांसाठी असलेल्या विभागातून ग्रीक आणि जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते, हे समजते.)

मात्र ह्या अनुभवांमुळे स्त्रियांनाही पूर्ण शिक्षण मिळायला हवे, त्यांच्या विचार क्षमतेचा विकास होण्यासाठी स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी ते आवश्यक आहे, आणि आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्य असल्याशिवाय त्या उत्तम लेखन करू शकणार नाहीत हे मत तिने ह्या लिखाणाद्वारे मांडले. शिक्षण व आर्थिक स्वातंत्र्य असल्यास स्त्रियाही समकालीन पुरुष लेखकांसारखे लेखन करू शकतील का, ह्याचा ऊहापोहही ह्या लिखाणात आहे.

तर, ह्या बेख्डेल चाचणीवर २०००च्या सुमारास व्यापक प्रमाणात चर्चा-प्रतिचर्चा घडत गेल्या आणि त्यातून ह्या चाचणीची आणखी एक variant अस्तित्वात आला.

ही बेख्डेल चाचणी आहे तरी काय? मो मूव्ही मेझर ह्या नावानेही ओळखली जाणारी ही चाचणी तीन साध्या सोप्या निकषांवर आधारलेली आहे -

१. (चित्रपटामध्ये) दोन तरी स्त्री व्यक्तिरेखा हव्यात.
२. त्या व्यक्तिरेखांमध्ये आपापसात सशक्त संवाद असायला हवा.
३. 'पुरुष वा त्याच्याशी संबंधित वा त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती फिरणारा' हा त्या संवादाचा विषय नसावा.

'द रूल' नावाच्या आपल्या एका हास्य चित्रकथेत, मो आणि जिंजर ह्या दोन स्त्रियांमध्ये जो संवाद अ‍ॅलिसनने चितारलेला आहे, तो संवाद म्हणजेच ह्या चाचणीचे नियम.

पण ह्या बेख्डेल चाचणीची गरज तरी काय?

हे मान्यच आहे की, सगळे चित्रपट तर काही ह्या चाचणीसाठी पात्र ठरू शकत नाहीत, त्याला चित्रपटाची पटकथा, थीम, मांडणी, विषयाची गरज अशी अनेक कारणे असू शकतात. पण हेही तितकेच रोचक आहे की बरेचसे चित्रपट ह्या चाचणीच्या मूलभूत नियमाचीही पूर्तता करत नाहीत वा पटकथेमध्ये वाव असतानाही करू शकत नाहीत वा कदाचित करू इच्छित नाहीत आणि ती म्हणजे चित्रपटात दोन तरी (सशक्त) स्त्री व्यक्तिरेखा असण्याची. बरे, तशा व्यक्तिरेखा असल्याच, तरीही चित्रपटाचा सहसा सर्वेसर्वा 'नायक' ह्याच्या संबंधित वा अनुषंगानेच ह्या स्त्री व्यक्तिरेखांचे संवाद वा वावर मर्यादित असतो, अशा व्यक्तिरेखांना स्वतःचे असे काही अस्तित्वच नसते.

आठवा - होनहार बेटेको गाजर का हलवा बनाके खिलानेवाली आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आणि दुसरे काहीच काम नसलेली अतिप्रेमळ आई! नायक दिसताच डोळे पिटपिटत आणि लाजून वगैरे चूर होत त्याच्या वाटेवर नजरे बिछाये वगैरे बसलेली आणि अर्थात दुसरे काहीच काम नसलेली नायिका, राखी के बंधन को जनम जनम वगैरे निभावणारी आणि भावाच्या प्रेमाने सतत गदगदणारी प्यारी बहना किंवा अगदी आख्ख्या जगाला दुष्टपणाचे डोस देऊ शकणारी, इतरांना मनीसारखे ओरखडे काढणारी पण नायकासमोर म्यांव माऊ होणारी खलनायिका! कालपरत्वे आई, बहीण आणि नायिका, खलनायिका जुना मोड त्यागून चकचकीत झालेल्या असल्या, तरी सहसा त्यांच्या भूमिकांची व्याप्ती तितकीच राहिलेली आहे. भूमिका जरा इतके तिकडे आधुनिक झाल्यात इतकेच.

विनोदाचा भाग सोडला, तरी असे का व्हावे बरे?

सहसा वा बर्‍याचदा, अजूनही,

१. चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा 'मुख्य' भूमिका साकारत नाहीत, तर साहाय्यक भूमिकांमधून दिसतात. थोडक्यात, चित्रपट स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरत नाही. असे चित्रपट मोजकेच असतात.

२. जरी दोन वा अधिक स्त्री व्यक्तिरेखा असल्या, तरीही त्यांचे संवाद, त्यांच्या भूमिका, त्यांचा वावर हा चित्रपटातील पुरुषाच्या - नायकाच्या/ खलनायकाच्या भूमिकांच्या आधाराने आणि अनुषंगाने ठरवला जातो/ बेतलेला असतो. ह्या अर्थाने पाहिलं असता, चित्रपटातील नायिकाही खरे पाहिले असता साहायक भूमिकेमध्येच असते.

चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा स्वतंत्र वृत्तीच्या, स्वतः काही विचार करू शकणार्‍या आणि ते मांडू शकणार्‍या, स्वतःच्या भल्या-बुर्‍याचा विचार करू शकणार्‍या, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकणार्‍या, चुका करणार्‍या आणि त्या सुधारणार्‍या आणि 'पुरुष' हा विषय वगळता आपापसात इतर काही संवाद साधणार्‍या असू शकत नाहीत का? मग तशा व्यक्तिरेखा दाखवण्यात काय अडचण असते, वा तशा का दाखवल्या जात नाहीत, हा एक अभ्यासाचा विषय ठरू शकतो.

आजही चित्रपटांमधून स्त्री कलाकारांना सहसा सशक्त व्यक्तिरेखा रंगवायला मिळत नाहीत किंवा अशा व्यक्तिरेखा चित्रपटांमधून सहसा दाखवल्या जात नाहीत, ह्या एका कटू सत्यावर बेख्डेल चाचणी नेमके बोट ठेवते. मोजके चित्रपट बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होतात.

अशी ही एक साधी सोपी चाचणी. कोणत्याही चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा कितपत सशक्तरीत्या बेतल्या आहेत, ह्याचा प्राथमिक ऊहापोह ह्या चाचणीद्वारे होऊ शकतो. हॉलीवूडमधील चित्रपटांसाठी ही चाचणी प्रथम तयार केली गेली.

ह्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊ शकतील अशा काही भारतीय चित्रपटांची यादी आम्ही देतोय.

कुंकू
- मनाविरुद्ध म्हातार्‍याशी लग्न करून दिलेली निर्मला (शांता आपटे). जरी आपल्या खाष्ट सासू आणि नवर्‍याबद्दल मनात चीड आणि राग असला, तरी त्याच नवर्‍याच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या मुलीवर तो राग न काढण्याइतकी ती समंजस आहे. त्या मुलीलाही आपल्या आजीचा दुष्टपणा आवडत नाही. आपल्या परीने ती निर्मलेला आनंद देऊ पाहते आणि दोघींमध्ये त्यांचा स्वतःचा असा एक मैत्रीचा धागा फुलतो आहे, त्याची ही कथा.

मिर्चमसाला - इंग्रजांच्या काळातील १९४०च्या सुमारातील एक कथा. गर्विष्ठ, स्त्रीलोलुप अशा सुभेदाराची (नासिरुद्दीन शाह) नजर सोनबाईवर (स्मिता पाटील) पडली आहे आणि त्याच्या लाळघोटेपणाची चीड येऊन, सोनबाईने त्याला कानफटीत ठेवून दिली आहे. त्याचा सूड म्हणून सुभेदाराने आख्खे गाव वेठीला धरले आहे आणि गाववाल्यांनीही सोयीस्करपणे सोनबाईलाच दोषी ठरवले आहे. सोनबाईचा शेवटचा आधार आहे स्त्रियांनी चालवलेल्या मिरची कारखान्याची जागा - जिथे ती सुभेदाराच्या शिपायांपासून जीव वाचवून पळाली होती. सोनबाईला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या सुभेदाराला आडव्या येतात त्या कारखान्यातील स्त्रिया. सोनबाईचा आणि त्यांचा एकमेकींशी बंध जुळला आहे. एकमेकींची साथ देण्यातला अर्थ त्यांना उमगला आहे. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी, त्यांच्यासारख्याच एकीसाठी त्या लढा देतात.

उंबरठा - सुलभा महाजन (स्मिता पाटील). समाजातील परित्यक्ता स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी मनात बाळगून कामाला हात घातलेली स्त्री. आश्रमातील स्त्रियांमध्ये आयुष्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांच्यासाठी आंतरिक ऊर्मीने काही भले करू पाहणारी, त्यांना सोबत घेऊन चालू पाहणारी, त्यांच्याशी माणुसकीचे नाते जोडू पाहणारी संवेदनाशील स्त्री आणि तिचे झगडे आणि इतर स्त्रियांसोबतचे भावबंध पडद्यावर आणणारी गोष्ट.

डोर - मीरा (आयेशा टकिया) आणि झीनत (गुल पनांग) ह्यां दोन अतिशय वेगळ्या सामाजिक स्तरांवरल्या स्रियांची, त्यांच्या परिस्थितीची आणि मैत्रीची गोष्ट. उत्तरा बावकर ह्यांनी साकारलेली मीराच्या आजेसासूची भूमिकाही अत्यंत सुरेख. आयुष्याचे अनेक अनुभव घेऊन आजेसासू शहाणी झाली आहे. मीराची मैत्रीण आणि तिचा आधार. कुठेही भडक न होता अतिशय संयतपणे ह्या बायकांमधील नाती उलगडतो.

गुलाब गँग - राजो (माधुरी दीक्षित) आणि तिची गँग आणि सुमित्रा देवी (जुही चावला) ह्यांच्यातील डावपेचांची आणि कुरघोडींची कहाणी.

अँग्री इंडियन गॉडेसेस - फ्रेडा (सारा - जेन डायस) एक फॅशन फोटोग्राफर आहे आणि तिच्या लग्नाची बातमी देण्यासाठी आपल्या मैत्रिणींना घरी बोलावले आहे. त्यानंतर घडत जाणार्‍या घटना आणि त्यातून उलगडणारे आणि पुढे सरकणारी त्यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण उलगडणारी कथा

तुम्हीही देऊ शकाल काही उदाहरणॅ?

उपसंहारः बेख्डेल चाचणीबद्दल लेख लिहायचा ठरवल्यानंतर ह्या चाचणीबद्दल टप्प्याटप्प्याने माहिती वाचत गेले. लेख, मतं, मतांतरं, आणि जे काही मिळेल ते.

अगदी सुरुवातीला जेव्हा ह्या चाचणीबद्दल वाचायला सुरुवात केली, तेव्हा चाचणी जरा स्त्रीप्रधानतेकडे झुकणारी आहे की काय, असंही वाटलं. या चाचणीवर त्यासाठी टीकाही झाली आहे, पण जसजसं अधिकाधिक माहिती वाचत गेले, तसं लक्षात यायला लागलं की स्त्रीप्रधानतेपेक्षाही या चाचणीचा भर आहे तो भूमिका आणि व्यक्तिरेखांच्या आशयघनतेवर आणि अशा आशयघन भूमिका वाट्याला येण्याच्या समान संधींवर.

चित्रपटांच्या उदाहरणांसहित उपलब्ध असणारी माहिती वाचत असता लक्षात आलं की अजूनही जगभरातून पुरुषप्रधान व्यक्तिरेखांभोवती फिरणारे सिनेमा बनतात. भले चित्रपटांमधून सुरुवातीपासून शेवटापर्यंत स्त्री व्यक्तिरेखा हजर असतील, तरीही पुरुष व्यक्तिरेखांना चित्रपटांत व्यक्त होण्यासाठी जितका वाव आणि मुभा असते तशी स्त्री व्यक्तिरेखांना असते का? की पुरुष व्यक्तिरेखांना पूरक म्हणून स्त्री व्यक्तिरेखाच वावर असतो?

चित्रपटांतील ह्या उणीवेवर बेख्डेल चाचणी बोट ठेवते. अर्थात, आता चित्रपटांच्या कथा, विषय बदलत आहेत व प्रेक्षक असे बदल स्वीकारतही आहेत.

बेख्डेल चाचणी हा चित्रपटासंदर्भातील चाचण्यांसंदर्भातील शेवटचा शब्द नक्कीच नव्हे पण चित्रपटांचा दर्जा सुधारण्यासाठी, चित्रपटांच्या कथा, विषय ह्यांमध्ये वैविध्य असावे, स्त्री व्यक्तिरेखांनाही न्याय आणि वाव मिळावा ह्यासाठीचे ह्या चाचणीचे योगदान नाकारता नक्कीच येणार नाही.

संदर्भसूची -

bechdeltest.com/
https://www.quora.com/
www.huffingtonpost.com
https://www.theguardian.com/
https://www.goodreads.com/

प्रतिक्रिया

रातराणी's picture

24 Jan 2017 - 12:19 pm | रातराणी

मस्त! आवडली ही चाचणी :) सहज आठवेल असं वाटलेलं पण एकही आठवला नाही :( आता एकतरी मूवी शोधलाच पाहिजे!

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:34 pm | पैसा

हल्लीच बघितलेला एक मराठी उत्तम सिनेमा आठवला. "कापूसकोंड्याची गोष्ट" असा निखळ स्त्रीप्रधान सिनेमा क्वचित तयार होतो. तीन बहिणींचा अनाथ असताना कोरडवाहू शेती करत, बहिष्कार टाकणार्‍या समाजाशी, नशीबाशी यशस्वी लढा हा विषय केंद्रस्थानी असलेला हा सिनेमा आहे. यात असे अनेक संवाद आहेत.

याशिवाय तानी. रिक्षा चालवणार्‍याची मुलगी आय ए एस होते. तानी, तिची आई अशा अनेक प्रमुख स्त्री व्यक्तिरेख यात आहेत. यातही असे संवाद आहेत.

खरे तर अजून कित्येक आठवत आहेत. पण हल्लीच बघितलेले हे दोन.

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 1:41 pm | यशोधरा

अरे वा! सह्ही आहे. हाच तर उद्देश्य आहे ह्या लेखामागचा. इथेही टाक ना आठवणार्‍या चित्रपटांची नावे.

सतिश गावडे's picture

24 Jan 2017 - 9:56 pm | सतिश गावडे

"कापूसकोंड्याची गोष्ट" नक्की या चाचणीत बसेल.
खुप सुंदर चित्रपट आहे हा.

एक गाणं आहे यात:
आभाळाच्या लेकी आम्ही
माती झाली माय
हातामध्ये विळा देऊ
काळावरती पाय

Story of 2 friends who are caught in a murder investigation of a man.

पद्मावति's picture

24 Jan 2017 - 2:08 pm | पद्मावति

लेख खूप खूप आवडला याची ही पोच. विषय अगदी वेगळाच आहे.
चटकन आठवत नाही पण आठवतील तशी उदाहरणे देईनच या धाग्यात. माधुरी दिक्षित, रेखा, मनीषा कोइराला यांचा लज्जा हा सिनेमा याचे उदाहरण होऊ शकेल असे वाटते

सामान्य वाचक's picture

24 Jan 2017 - 3:08 pm | सामान्य वाचक

मराठीमधील आत्मविश्वास हा चित्रपट यात बसेल का?
निलकांती पाटेकर या गृहिणीला मैत्रिणीच्या मदतीने तिचा आत्मविश्वास कसा परत मिळतो, याची गोष्ट

तुम्ही पाहिला आहे का चित्रपट? मी नाही पाहिलाय. चाचणीच्या नियमांची पूर्तता होते का?

आत्मविश्वास निश्चितच ही टेस्ट पास करेल असे वाटते. कारण या चित्रपटातील बहुतांश सर्वच संवाद नायिकेच्या विषयीच आहेत. नायिका केवळ मुख्य व्यक्तिरेखाच नाही तर संपूर्ण मुखत्यार दाखवलीये.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 9:16 am | संदीप डांगे

आत्मविश्वास हा चित्रपट जे बी प्रिस्ले यांच्या द मदर्स डे या गाजलेल्या नाटकाचे मराठी चित्रपट रुपांतर आहे.

अच्छा..जरा चांगलं काही आवडलं कि ते कॉपी निघतं. याचं फार वाईट वाटतं.

>मराठीमधील आत्मविश्वास हा चित्रपट यात बसेल का?

ऑनलाइन मिळेल का हा चित्रपट?

पुंबा's picture

24 Jan 2017 - 3:15 pm | पुंबा

लेख उत्तम आहे. याबद्दल वाचलेलं पण याचं महत्व कळलं नव्हतं.
एक प्रश्नः इंग्लिश विंग्लीश हा चित्रपट ही टेस्ट पास करू शकेल काय?

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 5:15 pm | यशोधरा

मला कधी कधी वाटतं हो. कारण ह्यात नायिकेची सासूबरोबर, बहिणीबरोबर, आपल्या भाचीबरोबर फार सुरेख नातेसंबंध चित्रित केले आहेत. तिची स्वतःशी स्वतःलाच होत गेलेली ओळखही मला फार भावली होती. त्या न्यायाने मला डिअर जिंदगी सुद्धा ही चाचणी उत्तीर्ण करु शकेलसं वाटतं.

इंग्लिश विंग्लेश आणि क्वीन हे मला तंतोतंत समान वाटतात ते याच कथासूत्रामुळे. दोन्हीकडे खूप सटली होणारा अन्याय, शोषण आनंदाने सहन करणार्‍या नायिकांना आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडल्यामुळे स्वतःची ओळख होते. स्वतःवर विश्वास येतो, जगाकडे बघण्याचे नजर अधिक खुली होते. इंग्लिश भाषा येणे किंवा हनीमूनला एकटे जाणे या साध्या वाटणार्‍या गोष्टींमधून ही स्वत्व जागे होण्याची प्रक्रिया फार सुरेख चित्रीत केलीये.

अ‍ॅक्चुअली क्वीनही उतीर्ण होईल, नाही? कंगना आणि लिसा हेडन ह्यांच्यामधली मैत्री ह्या मुद्द्यावर व्हायला हरकत नाही!

अगदी अगदी. क्वीन आणि इंग्लिश विंग्लीश यात भारी कोण अशी चर्चा आम्हा मित्रांत नेहमीच होत असते. कधीच निकाल लागत नाही. शेवटी दोन्ही इक्वली भारी असा निष्कर्ष निघतो. :))

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 5:00 pm | फेदरवेट साहेब

माणसे किती विचार करतात हा विचारच करून इम्प्रेस झालं. खरं पाहता आधी प्रतिक्रिया द्यावी का नाही इतपत घाबरलो होतो. पण हिंमत गोळा करून देतोय प्रतिक्रिया. लेख उत्तम जमला आहे, एका नव्या संकल्पनेशी ओळख करून दिल्याबद्दल आभार मानतो मी तुमचे.

नॉट ओन्ली मिसेस राऊत सिनेमा ह्यात बसेल का? किंवा बिनधास्त?

अरे फेवेसा, तुझा बेरिंग सुटला नी? अशा कशा झाला?
असो, जोक्स अपार्ट, तुम्हांला लेख आवडला हे वाचून आनंद झाला. तुम्ही विचारलेले दोन्ही चित्रपट मी पाहिलेले नाहीत पण बेख्डेलच्या नियमावलींची पूर्तता करतात का ते?

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 5:17 pm | फेदरवेट साहेब

त्याच काय आहे संक्रांतीलाच मी मराठी विषयात पास झालो त्यामुळे ऍक्सेन्टवर संक्रांत आली. =))

आता सिरियसली धागा संबंधी

मला असे वाटते की हे दोन्ही सिनेमे त्यात बसावे. नॉट ओन्ली मिसेस राऊत तर आर्ट फिल्म आहे. बिनधास्त बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला होता त्यात गौतमी गाडगीळ-कपूर हिची व्यक्तिरेखा सुद्धा प्रसिद्ध झाली होती.

आर्ट फिल्म हा निकष नाही ना पण. बिनधास्त ची कथा आत्ता थोडी वाचली. पाहिल्याशिवाय सांगणे कठीण आहे की चाचणी उत्तीर्ण होईल की नाही.

आत्ता एका सिनेमाचे एकदम उदाहरण आठवले म्हणून. मोना लिसा स्माईल. जालावर मिळेल. जरुर पहा. त्यातला शेवटचा सीन आहे - कॉलेजमधे शिकवणारी कॅथरीन (जुलिया रॉबर्ट्स) कॉलेजच्या अटी मान्य नसल्याने कॉलेज सोडून जातेय. तिने आजवर मुलींना आत्मभान द्यायचा प्रयत्न केलाय. शेवटच्या दृश्यात कॉलेज सोडून जाताना सगळ्या विद्यार्थिनी तिच्या टॅक्सीचा प्रेमाने पाठलाग करताहेत..

पाहताना हे दृश्य अंगावर काटा आणते. मोना लिसा स्माईल

दुसरा एक सिनेमा, स्टेपमॉम. आपल्या नवर्‍याच्या आयुष्यातल्या दुसर्‍या बाईचा जॅकीला राग आहेच, पण जेव्हा हळूहळू आपल्या मुलांचे मनही ती जिंकायला बघत आहे म्हटल्यावर तिची अजूनच चिडचिड होते. दोघी एकमेकींचा अग्दी राग करतात पण जॅकीला असाध्य आजारही आहे, ती वाचणारही नाहीये. जिचा आपण राग राग करतो तीच बाई आपल्या मुलांसाठी जीव टाकते हे पाहिल्यावर हळू हळू रागाचे मैत्रीत कसे परावर्तन होते हे पाहणे म्हणजे पडद्यावरचे काव्य आहे!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं माहिती. बाकी सातच्या आत घरात हा चित्रपट ह्यामधे बसायला हरकत नाही.

सवत माझी लाडकी बसेलसा वाटतोय यात.

सई कोडोलीकर's picture

24 Jan 2017 - 5:38 pm | सई कोडोलीकर

खूप छान लिहिलाय. आता ह्या चाचणीत बसणा-या चित्रपटांना शोधणे आणि ह्यापुढे पाहिल्या जाणा-या चित्रपटांना ही चाचणी लावणे हा एक उद्योग मिळाला :-)

शबाना आझमी आणि अरुणा इराणी अभिनीत 'सूर' आठवला.
'इंग्लिश विंग्लिश' ह्या चाचणीत बसला पाहिजे. शशीकला, तिच्या सासूबाई आणि भाची ह्या तीन व्यक्तिरेखा आणि त्यांच्यामधील संवाद पुरुषसंदर्भ नसलेला आहे.
'आत्मविश्वास'मधले नीलकांती आणि दया डोंगरे, नीलकांती आणि वर्षा उसगावकर असे दोन सेट्स आठवले.

आश्चर्य म्हणजे तथाकथीत नायिकाप्रधान डबल रोलवाले चित्रपट ह्या निकषात बसवता येत नाहीयेत.

कहाणी आणि डर्टी पिक्चर यात बसणार नाहीत असे वाटते. दोन्ही चित्रपट दोन स्त्री पात्रे असण्याची अट पार करू शकणार नाहीत.

प्रचेतस's picture

24 Jan 2017 - 7:05 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
ह्या चाचणीबद्दल पहिल्यानेच ऐकतोय.

'दोघी' हा चित्रपट ह्या चाचणीत बसू शकेल.

उत्तम लेख आहे. यावर नंतर अजून थोडे लिहीन.
(अवांतर- मिपावरच्या लेखांना, विशेषतः कथांना ही चाचणी लावली तर असा एक विचार तरळून गेला. त्याहीपुढे जाऊन अभिव्यक्तीच्या सर्वच कलाकृतींना ही चाचणी लावता येईल का असेही वाटले.)

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 8:11 pm | यशोधरा

जरुर लिहा, वाट बघते.

मृत्युन्जय's picture

24 Jan 2017 - 8:08 pm | मृत्युन्जय

खुपच अवघड विषय. लेख उत्तम जमलाय.

दोघी चित्रपट बहुधा या संकल्पनेत बसेल.

छान लेख यशो!पहिल्यांदाच वाचले या चाचणीविषयी. वर उल्लेखलेले बरेचसे चित्रपट पाहिलेत त्यामुळे साधारण समजलय.
स्मिता पाटिलचा 'भुमिका' यात बसेल का?

गामा पैलवान's picture

24 Jan 2017 - 8:51 pm | गामा पैलवान

लोकहो,

बेख्डेल चाचणीवरील टीका इथे आहे : https://en.wikipedia.org/wiki/Bechdel_test#Criticism

यानुसार ही चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी स्त्रीकेंद्रित भूमिका असायची आवश्यकता नाही. कोणत्याही दोन बायकांनी एकमेकींशी पुरुषी संदर्भ नसलेलं किमान एक संभाषण केलं म्हणजे पुरे.

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

24 Jan 2017 - 9:39 pm | धर्मराजमुटके

कहानी २, पिंक, अकिरा, एनएच१० टाका लिस्टमधे !

अवांतर : कोणीतरी नवीन चाचणी सुरु करा रे उदा. "स्त्रीविरहीत जाहिरात" वगैरे ! अमुक जाहिरात स्त्रीचे काय काम आहे वगैरे वगैरे चिरफाड ही करता येईल.

मुटकेसाहेब, ही चाचणी म्हणजे स्त्रीसत्ताक वा पुरुषसत्ताक असा फरक करावयाचा नसून समान संधीचा मुद्दा ही चाचणी अधोरेखित करते आहे, त्यात "पुरुषविरहीत वा स्त्रीविरहीत" ह्याचा काही संबंध नाहीये. कदाचित मुद्दा आपल्यापर्यंत पोचवण्यात माझे लिखाण कमी पडले असावे, त्यासाठी क्षमस्व.

धर्मराजमुटके's picture

25 Jan 2017 - 8:48 am | धर्मराजमुटके

तुम्ही तुमचा मुद्दा व्यवस्थित पोहोचवला आहे. त्याच्या उत्तरादाखल मी समर्पक चित्रपटांची नावे देखील सुचविली आहेत.
स्त्रीविरहित जाहिराती शोधा हा एक अवांतर मुद्दा होता. मीच सुरुवातीला "अवांतर" लिहायला विसरलो.

सतिश गावडे's picture

24 Jan 2017 - 10:04 pm | सतिश गावडे

एका वेगळ्याच विषयाची छान ओळख करुन दिली आहे.

रोटन टोमॅटो माहिती होतं. या चाचणीबद्दल कधी ऐकलं नव्हतं.

माझी चाचणी समजून घेण्यात काही चूक झाली म्हणजे, मला असं वाटलं की संपूर्ण चित्रपट हा स्त्री पात्रांभोवती फिरणारा असला पाहिजे. म्हणजे चित्रपटाच्या खऱ्या नायक या त्यातील स्त्रिया असायला हव्यात. अशी टेस्ट असेल तर चक दे इंडिया हा चित्रपट बसेल असं वाटलं होतं पण त्यातही कोच झालेला कबीर खान, त्याच मेडल मिळवायचं स्वप्न, मॅच हरल्यावर झालेली मानहानी तो कोच बनून कशी भरून काढतो हा कथेचा पाया आहे. चित्रपटातल्या लीड रोल केलेल्या सागरिका घाटगे आणि विद्या शर्मा या मुली एकमेकींच्या प्रतिस्पर्धी दाखवल्या असल्या तरी त्यांच भावनाविश्व अधूनमधून बॉय फ्रेंड आणि नवरा सासरचे लोक यांच्याभोवती फिरताना दाखवले आहेच. मी बहुतेक या चाचणीला जास्तच स्ट्रीक्ट करून टाकलं, पण खरोखर असा एखादा मूवी ज्यामध्ये स्त्रिया लीड करतायत आणि चुकूनही कधी बॉय फ्रेंड, लग्न या गोष्टीत न अडकता किंवा अडकल्या असल्या तरी त्याचा बडेजाव न होता त्या केवळ त्यांचं स्वप्न, त्यांची स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करतायत असा चित्रपट पाहायला आवडेल.

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 7:23 am | यशोधरा

मला असं वाटलं की संपूर्ण चित्रपट हा स्त्री पात्रांभोवती फिरणारा असला पाहिजे. म्हणजे चित्रपटाच्या खऱ्या नायक या त्यातील स्त्रिया असायला हव्यात.

रातराणी, बर्‍याच प्रमाणात योग्य आहे. बेख्डेल चाचणी पुरुष सशक्त व्यक्तीरेखेला वाव नाकारीत नाहीये, तितकाच आणि तसाच वाव स्त्री व्यक्तीरेखेलाही असावा, हे सांगतेय. सिनेमातील संवाद (interaction) हे केवळ पुरुषप्रधानतेला( वा त्याच्याशी संबंधित/त्याच्याभोब्वती फिरणारा) वाव देणारा असू नये असं.

चक दे माझ्या डोक्यात आला होता, पण मुख्यत्वे तीही कहाणी आहे कबीर खानची. मुलींचे आपापसातले एक विश्व आहे खरे पण त्यावरही कबीर खानची छाप आहेच. त्यांना एकत्र आणतो ते कबीर खान, त्यांना खेळाचे/ टीम असण्याचे भान देतो ते कबीर खान वगैरे वगैरे. त्यांची सहायक कोच एक स्त्री आहे, पण तिला फारसा वावच नाही. ती त्यांना भावनिक स्तरावरही मेंटॉर करताना दाखवली नाहीये, संवाद साधताना दाखवली नाहीये. बेख्डेल ही त्रुटी दाखवून देईल.

लाडू's picture

27 Jan 2017 - 12:48 pm | लाडू

१) आँधी
२) चारचौघी नावाचं एक मराठी नाटक आठवलं

लाडू's picture

27 Jan 2017 - 12:48 pm | लाडू

१) आँधी
२) चारचौघी नावाचं एक मराठी नाटक आठवलं

नवीनच माहिती देणारा लेख!

डोर हा माझा अत्यंत आवडता चित्रपट - त्याचेही उदाहरण आल्याने छान वाटले.

आणखी एक लगेच आठवणार चित्रपट म्हणजे "नितळ"! यात कितीतरी स्त्री-पात्रे आहेत आणि प्रत्येकीचा दृष्टीकोन वेगवेगळा. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्री-पात्रांच्या जोडीत होत असलेले संभाषण त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल बरेच काही सांगून जाते.

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 7:27 am | यशोधरा

नितळ मी खूप वर्षांपूर्वी पाहिला आहे. सुरेख सिनेमा आहे. ह्या चाचणीमध्ये हा सिनेमा उत्तीर्ण होईल की नाही ह्याबद्दल नक्की नाही सांगू शकत.
पण पुन्हा सिनेमा पाहून माझे मत नक्की सांगेन.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 9:16 am | संदीप डांगे

नवीनच माहिती मिळाली...! सुंदर मांडलं आहे. धन्यवाद!

प्रदीप's picture

25 Jan 2017 - 9:42 am | प्रदीप

सुंदर लेख आवडला.

तुषार काळभोर's picture

25 Jan 2017 - 9:57 am | तुषार काळभोर

लेख वाचता वाचता तीन नियम डोक्यात ठेवून एकच चित्रपट समोर आला...
विकी Kill Bill
IMDB Kill Bill

kill bill

kill bill

नेत्रेश's picture

26 Jan 2017 - 2:25 pm | नेत्रेश

कील-बील ही एका पुरुषाने केलेल्या अन्यायाची सुडकथा आहे. चाचणीच्या ३ पैकी २ नियमात बसत नाही

१. (चित्रपटामध्ये) दोन तरी स्त्री व्यक्तिरेखा हव्यात. - ओके
२. त्या व्यक्तिरेखांमध्ये आपापसात सशक्त संवाद असायला हवा. - ??
३. 'पुरुष वा त्याच्याशी संबंधित वा त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती फिरणारा' हा त्या संवादाचा विषय नसावा. - ??

फेदरवेट साहेब's picture

25 Jan 2017 - 10:11 am | फेदरवेट साहेब

.

हि सिनेमाची माहिती

जुलिआ रॉबर्ट्सच्या सुंदर अभिनयाने सजलेला सिनेमा. ३ पोरांना वाढवणारी सिंगल मदर अन तिचा तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या एका अगडबंब अमेरिकन कॉर्पोरेशन सोबतचा लढा. हा एक बायोपिक असून खरोखरच्या एरिन ब्रोकोविच वर आधारित आहे.

नेत्रेश's picture

26 Jan 2017 - 2:28 pm | नेत्रेश

१. (चित्रपटामध्ये) दोन तरी स्त्री व्यक्तिरेखा हव्यात. - १ च मेजर स्त्री रोल आहे.
२. त्या व्यक्तिरेखांमध्ये आपापसात सशक्त संवाद असायला हवा. - ??
३. 'पुरुष वा त्याच्याशी संबंधित वा त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती फिरणारा' हा त्या संवादाचा विषय नसावा.

बेख्डेल चाचणीबद्दल वाचायला मिळालेला एक सुरेख लेख

खाली लेखातील काही भाग पण मूळ लेखही वाचण्यासारखा आहे. जरुर वाचा.

"because so few movies and TV shows include multiple, developed, relevant women characters who have any part in advancing the story. Imagine how hard it would be to avoid a scene in which two named men chat about something other than women. Why do you suppose that is? Because virtually every movie and TV show contains multiple, developed, relevant male characters who have some part in advancing the story. See?

Female characters are traditionally peripheral to male ones. That’s why we don’t want to hear them chatting about anything other than the male characters: because in making them peripheral, the writer has assured the women can’t possibly contribute to the story unless they’re telling us something about the men who drive the plot. That is the problem the test is highlighting. And that’s why shoehorning an awkward scene in which two named female characters discuss the price of tea in South Africa while the male characters are off saving the world will only hang a lantern on how powerfully you’ve sidelined your female characters for no reason other than sexism, conscious or otherwise."

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 11:13 am | संदीप डांगे

दंगल

फेदरवेट साहेब's picture

25 Jan 2017 - 11:24 am | फेदरवेट साहेब

पण बहुदा फिट होणार नाही.

"म्हारी छोरिया छोरो से कम हे के?"

ह्या केंद्रस्थानी असलेल्या वाक्यात एखाद्याला 'एमसीपी अजेंडा' दिसू शकतो. तसंही फेमिनाझी मंडळी असल्या वक्तव्याच्या बाबतीत प्रचंड सेन्सिटिव्ह असते. असो. सिनेमा बद्दल बोलता त्यात कुस्ती हे महावीर फोगट ह्यांचेही एक स्वप्न असतेच. त्यामुळे बेख्डेल टेस्ट मध्ये दंगल किती स्वीकारार्ह असेल ह्यावर शंका वाटते.