पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची

विशाखा राऊत's picture
विशाखा राऊत in लेखमाला
19 Jan 2017 - 7:50 am

*/

स्वप्नपूर्ती : पृथ्वी थिएटर

राम राम मंडळी! काय, सर्व मजेत ना :). आपल्या लाडक्या मिपाचा दशकपूर्ती सोहळा सुरू आहे. सगळे जण त्यासाठी गोष्टींचा खजिना घेऊन येत आहेत. तर मग चला, आजच्या गोष्टीला सुरुवात करू.

थिएटर हा शब्द खरे तर आला ग्रीक शब्दापासून θέατρον, (théatron - 'a place for viewing'), म्हणजेच दुसरा ग्रीक शब्द θεάομαι (theáomai - 'to see', 'to watch', 'to observe'). थिएटर, जिथे विविध नाट्याविष्कार/कलाविष्कार सादर केले जातात. अभिनय, संवाद, संगीत, गाणी आणि नृत्य ह्याआधारे एक कथानक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येते. रंगभूमी, थिएटर हे शब्द सगळ्याच रंगकर्मींना वेड लावतात. पृथ्वी थिएटरची संकल्पना घडली अशाच एका रंगकर्मीकडून. हिंदी रंगभूमीबद्दल नितांत प्रेम असलेल्या पृथ्वीराज कपूर ह्यांचे स्वप्न, ज्याची पूर्तता 'पृथ्वी थिएटर'च्या रूपाने झाली. पृथ्वीराज कपूर ह्यांच्या रेपर्टोरी थिएटरला स्वतःची एक ओळख असावी, ह्या ध्यासाला रूप मिळाले ते 'पृथ्वी थिएटर'मुळे. खर्‍या अर्थाने आधुनिक, प्रायोगिक रंगभूमीला संगीत नाटक स्वरूपात लोकांसमोर आणण्यात आले. रेपर्टोरी थिएटर खरे तर पाश्चिमात्य रंगभूमीचा नमुना. ह्यासाठी उत्तम उदाहरण देता येईल 'ऑपेरा'. संगीत नाटकांच्या साहाय्याने रहिवासी नाटक कंपनी - खरे तर कलापथक म्हणू आपण - विविध नाट्याविष्कार सादर करतात.

a

हिंदी सिनेमामध्ये यशाचे शिखर गाठत असतानाच, पृथ्वीराज कपूर यांना रंगभूमीचे वेड काही शांत बसू देईना. ह्या ध्यासातूनच १९४४मध्ये मुंबईमध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना झाली. संस्थेसाठी खास पहिले लिहिण्यात आलेले नाटक होते कालिदास रचित 'शाकुंतल'. जवळपास १५० कलाकारांकडून तत्कालीन परिस्थितीवर आधारित अनेक विषयांवरील नाटके संस्थेकडून भारतभर सादर करण्यात आली. संस्थेकडून ११२ शहरांमध्ये ५,९८२ दिवसांमध्ये २,६६२ प्रयोग सादर करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने 'दीवार' (१६४६), 'पठाण' (१९४७), 'गद्दार' (१९४८), 'आहुती' (१९४९), 'कलाकार' (१९५१), 'पैसा' (१९५३) आणि 'किसान' (१९५६) ह्या नाटकांचा समावेश होता. ह्या सर्व नाटकांमध्ये पृथ्वीराज कपूर ह्यांनी प्रमुख अभिनय केला. हा सगळा प्रवास खरे तर खूपच खडतर होता.

प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या पृथ्वीराज कपूर यांना प्रथम श्रेणी हवाई प्रवासाची मुभा असूनही, ह्या सगळ्या नाटकांच्या प्रयोगासाठी सगळ्या नाट्यसमूहासोबत त्यांनी नेहमीच तृतीय श्रेणीने प्रवास केला. संस्थेसाठी गरजेचे असणारे अर्थसाहाय्य हे केवळ पृथ्वीराज कपूर ह्यांना भारतीय सिनेसृष्टीमधून मिळालेल्या मानधनातून केले गेले. रंगमंच सुविधा उपलब्ध असतानाही, केवळ स्वस्त पर्याय म्हणून नाटकांचे प्रयोग नेहमीच सिनेमा हॉलमध्ये करण्यात आले. संस्थेकडून निर्मिलेल्या ८ नाटकांपैकी सगळ्यात गाजलेले नाटक होते 'पठाण'. ह्या नाटकाने पठाण म्हणजे पहारेकरी किंवा सावकार हा लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा, त्याचसोबत हिंदू-मुस्लीम नातेसंबंधातील सुसंवाद दाखवण्याचा प्रयत्न केला. हे नाटक तब्बल ५५८ रात्री चालले.

संस्थेकडून करण्यात आलेल्या नाटकांमध्ये नैसर्गिकता असावी - मग तो अभिनय असो अथवा नाटकाचे नेपथ्य, ह्यावर कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते. सर्वच नाटकांमध्ये होणारा अभिनय हा त्या काळी सुप्रसिद्ध असलेल्या अतिशयोक्तीपूर्ण व्यावसायिक अभिनयापेक्षा निश्चितच वेगळा असेल, ह्यावर पृथ्वीराज कपूर ह्यांनी विशेष मेहनत घेतली होती. अभिनयासाठी सूक्ष्म निरीक्षण आणि नियोजित प्रशिक्षण ह्यावर भर देण्यात आला. मेहनतीचे यश म्हणू आपण, कारण ही नाटके बघताना प्रेक्षकांना संवाद, अभिनय ह्यामध्ये तोचतोचपणा किंवा पाठांतर करून आलेला रटाळपणा न वाटता, एक वेगळीच उस्फूर्त भावना, मार्मिक अभिनयक्षमता खूपच भावली. खूप विचारपूर्वक अभिनयाचे सादरीकरण हा तत्कालीन प्रेक्षकांसाठी खूपच नावीन्यपूर्ण अनुभव होता. हेच होते पृथ्वीचे वेगळेपण, जिथे आजही दशकानुदशके नैसर्गिक अभिनय जोपासला जात आहे. ह्या दशकात पृथ्वी थिएटर करून अनेक नवोदितांना ओळख निर्माण करण्यात खूप मोलाची मदत झाली. दिग्दर्शक रामानंद सागर, गीतकार शंकर-जयकिशन आणि संगीतकार राम गांगुली ह्यांचा ह्यामध्ये समावेश आहे.

सलग १६ वर्षे अखंड भारतभर हिंदी रंगभूमीसाठी योगदान देऊन १९६० साली, पृथ्वीराज कपूर ह्यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे पृथ्वी थिएटर बंद करण्यात आले. संस्था बंद झाली, तरीही पृथ्वीराज कपूर ह्यांच्याकडून रंगभूमीसाठी लागणाऱ्या कुठल्याही योगदानामध्ये अजिबात खंड पडला नाही.

थिएटर बंद असले, तरी आता नाट्यवेड्या रंगकर्मीना आता नवीन ध्यास लागला होता - आपल्या ह्या थिएटरला स्वतः:ची जागा असावी, स्वतःचे घर असावे. अर्थात स्वतःच्या मालकीची जागा घेणे तसे अवघड होते म्हणा. १९६२ साली पृथ्वीराज कपूर ह्यांनी मुंबईमधील जुहू येथे दोन प्लॉट्स भाड्याने घेतले. ह्यापैकी एका प्लॉटवर त्यांनी स्वतःसाठी घर बांधले आणि दुसरे घर निर्माण केले ते अत्यंत लाडक्या पृथ्वी थिएटरसाठी. ह्याच दरम्यान पृथ्वीराज कपूर ह्यांची प्रकृती खालावली आणि दुर्दैवाने थिएटरचे निर्माण होत असतानाच पृथ्वी थिएटर बंद पडले. भारतातील हिंदी रंगभूमीला स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असताना, थिएटर बंद पडल्याने हिंदी रंगभूमीच्या एका महान युगाचा अस्त झाला.

१९७२ साली पृथ्वीराज कपूर ह्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने जुहू येथे घेतलेल्या जमीनचा भाडे करार संपला आणि जमीन कपूर कुटुंबाला विकत घेणे शक्य झाले. आता हेच नाट्यभूमीचे बाळकडू मिळालेल्या शशी कपूर ह्यांनी वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतला. ह्या प्रवासात शशी कपूर ह्यांना मोलाची साथ मिळाली पत्नी जेनिफरची. शशी कपूर आणि जेनिफर ह्यांना जोडणारा दुवा होता रंगभूमीची प्रचंड आवड. जेनिफर कपूर ह्या मूळच्या इंग्लंडच्या आणि लग्नापूर्वीच्या जेनिफर केंडल (Jennifer Kendal). इंग्लंडमध्ये साऊथपोर्ट इथे २८ फेब्रुवारी १९३३ रोजी ह्यांचा जन्म झाला. वडील जेफ्री केंडल (Geoffrey Kendal) आणि आई लॉरा लीडेल (Laura Lidell) ह्यांच्याकडून अभिनयाचा वारसा त्यांना जन्मापासूनच लाभला. १९४०मध्ये ENSA ह्या नाटक कंपनीच्या कलाकारांसोबत, जेफ्री आणि लॉरा अभिनय करायला पहिल्यांदा भारतात आले. भारतासोबत जोडलेले ह्यांचे हे नाते मात्र त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवले. दुसर्‍या महायुद्धानंतर जेफ्री यांनी स्वतःची 'शेक्सपिअरेना' (Shakespeareana) ही फिरती माहिती नाट्यसंस्था (touring repertory theatre company) स्थापन केली. व्यवस्थापक आणि स्वतः अभिनेते असलेल्या जेफ्री ह्यांनी पत्नी लॉरासोबत भारतभर विविध नाटके सादर केली. ह्यात शेक्सपिअर (Shakespeare), शॉ (Shaw) तसेच समकालीन इंग्लिश रंगभूमीचे विविध नाट्याविष्कार समाविष्ट होते. १९८०पर्यंत भारतातील विविध राजवाडे, शाळा ते अगदी सिनेमा थिएटर सगळीकडेच ह्या विविध नाटकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. साधारण १९५०मध्ये त्यांच्या दोन मुलींनी, जेनिफर केंडल (Jennifer Kendal) आणि फेलीसिटी केंडल (Felicity Kendal) यांनी शेक्सपिअरेनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. शेक्सपिअरेना संस्था आणि पृथ्वी थिएटर यांची ओळख झाली कलकत्ता येथे, जेव्हा पृथ्वीराज कपूर ह्यांनी आपल्या एका नाटकाचा प्रयोग बघण्याचे आमंत्रण संस्थेला दिले. ह्याच प्रयोगादरम्यान पृथ्वीराज कपूर ह्यांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव शशी कपूर ह्यांनी पडद्याआडून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जेनिफरला पहिल्यांदा पाहिले. शशी कपूर आणि जेनिफर ह्यांची भेट हा दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ होता. शशी कपूर ह्यांनी काही काळाकरिता शेक्सपिअरेनामध्ये काम केले. जेनिफर केंडल ह्या शेक्सपिअरेनामध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. जुलै १९५८मध्ये लग्न झाल्यावर मात्र ह्या दोघांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनय केला. दोन कलाप्रेमींनी आपल्या परंपरांना जोपासत, सुंदर मिलाफ घडवून पृथ्वी थिएटरची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निश्चय केला.

वडिल्यांच्या मृत्यूनंतर भारतातील त्या वेळच्या रंगभूमीच्या परिस्थितीचा आढावा घेता, कलाकार आणि प्रेक्षक ह्यांचे नातेसंबंध दृढ करणारी अशी रंगभूमीची स्वत:ची वेगळी ओळख असावी ह्याची गरज शशी कपूर ह्यांच्या लक्षात आली. त्यासाठीच पृथ्वीराज कपूर ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी रंगभूमीला आणि कलाविष्कारला नवचैतन्य आणण्यासाठी पृथ्वी थिएटर परत सज्ज करण्याचा निश्चय करण्यात आला. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शशी कपूर आणि जेनिफर ह्यांनी 'श्री पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्ट आणि रिसर्च फाउंडेशन' ही विश्वस्त संस्था स्थापना केली. पृथ्वी थिएटरच्या उभारणीसाठी व्हेड सेगन (Ved Segan) ह्या तरुण वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आली. नाट्यगृहांचा, नाट्यप्रयोगासाठी होणारा नाट्यगृहांचा वापर अभ्यास करण्यासाठी व्हेड यांना इंग्लंड आणि युरोप येथे पाठवण्यात आले. जेनिफर कपूर यांच्या देखरेखीखाली व्हेड ह्यांनी उत्कृष्ट ध्वनिविज्ञानाने उपयुक्त, व्यापक आणि सर्वसमावेशक अशी सुंदर पृथ्वी थिएटरची वास्तू निर्माण केली. पृथ्वी थिएटरची निर्मिती करताना केवळ नाटकाचे प्रयोग हा उद्देश ना ठेवता तालीम, चर्चा आणि बैठका ह्या सगळ्यासाठीच उपयुक्त जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. व्यावसायिक रंगभूमीला स्फूर्तिदायक असेही थिएटर आकाराला आले होते. ह्यामध्ये व्यासपीठाच्या तीन बाजूंनी प्रेक्षक बसू शकतील अशी खोलाकार रचना करण्यात आली. व्यासपीठाच्या मागील एका बाजूला लहान मोकळे व्यासपीठ तयार करण्यात आले, ज्याचा उद्देश पार्श्वभूमीसाठी आणि रंगभूमी प्रवेश करण्यासाठीच होता. खरे तर ही वास्तुरचना संगीतप्रधान नाटकांसाठी खूपच अनुकूल होती. पारंपरिक संगीत नाटकांमध्ये कायमच वापरण्यात आली आहे. प्रेक्षकांची अगदी शेवटची रांगसुद्धा मुख्य व्यासपीठापासून २५ फुटांपेक्षा जास्त लांब नसेल अशी रचना करण्यात आली. ह्यामुळेच नाटक सुरू असताना कुठल्याही प्रकारची कृत्रिम विस्ताराची किंवा विशदीकरणाची गरज भासत नाही. जुन्या पारंपरिक संगीत प्रयोगांची मजा प्रेक्षकांना परत अनुभवता येऊ लागली.

a

प्रेक्षक आणि अभिनेते ह्यामध्ये असलेले जिव्हाळ्याचे नाते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पृथ्वी थिएटरची संपूर्ण इमारत वातानुकूलित आहे, अगदी ड्रेसिंग रूमसुद्धा. पृथ्वी थिएटरला परत जोमाने उभारण्यात जेफ्री आणि लॉरा केंडल याचे मोलाचे योगदान लाभले. अथक मेहनतीने उभारलेल्या पृथ्वी थिएटरचे ५ नोव्हेंबर १९७८ रोजी मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आले. शुभारंभासाठी गोविंद पुरुषोत्तम देशपांडे लिखित 'उद्ध्वस्त धर्मशाळा' ह्या नाटकाचा प्रयोग नासिरुद्दीन शहा, ओम पुरी आणि बेंजामिन गिलानी यांनी सादर केला. ह्यानंतर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन निर्मित राजकीय उपहासात्मक नाटक 'बकरी' सादर करण्यात आले.

तत्कालीन मुंबईमधील रंगभूमी ही प्रामुख्याने दक्षिण मुंबईमधील हौशी इंग्लिश रंगभूमी, विनोदी गुजराथी रंगभूमी आणि मराठी रंगभूमी ह्यामध्ये विभागली गेली होती. ह्या सगळ्यामध्ये हिंदी रंगभूमीला स्वत:ची ओळख फारच कमी होती, हे लक्षात घेऊन पृथ्वी थिएटरने हिंदी रंगभूमीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण केले, जिथे नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला गेला. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि नवीन विचारांना समजून घेणारे प्रेक्षक ह्या सगळ्यांनाच मुक्त प्रवेश देण्यात आला. 'नाटक करायचे तर तुमचे स्वागत आहे' ह्या बोधवाक्याने सर्वांनाच आपलेसे करायला सुरुवात केली. अर्थात ह्या अभिनव प्रयोगाविषयी प्रचंड कुतूहल असले, तरीही सुरुवातीच्या काही काळात प्रेक्षकांना आकर्षित करणे कठीण जात होते. अगदी नाटक सादर करणार्‍या कलाकारांनी स्वतःच ट्रॅफिक सिग्नल्सवर आणि बस स्टॉपवर जाऊन तिकीटविक्री केली. तिकिटाच्या मागे पृथ्वीकडे येण्याचा रस्ता छापून देण्यात आला. जेनिफर कपूर ह्यांनी पृथ्वी थिएटर हे सगळ्यांना खुले असावे ह्यावर कटाक्षाने लक्ष दिले. त्याचप्रमाणे थिटरमध्ये सादर होणारे प्रत्येक नाटक आवर्जून बघितले. कौतुक केले, तशीच टीकासुद्धा केली. पण उत्तम सादरीकरणांवर भर दिला. साधारण १९८०च्या सुमारास मात्र प्रेक्षकांनी पृथ्वीला मनापासून आपले म्हटले. मात्र याच दरम्यान पृथ्वी थिएटरला जोमाने उभारणार्‍या जेनीफर कपूर यांचा १९८४मध्ये मृत्यू झाला.

a

शिस्तप्रियता ही पृथ्वी थिएटरसाठी खूप महत्त्वाची होती आणि आजही आहे. तिसरी घंटा ही नेहमीच नाटकाच्या सुरुवातीची नांदी असते. पृथ्वीसाठी हीच तिसरी घंटा थिएटरमध्ये कोणालाही प्रवेशबंदीकरिता असते. एकदा तिसरी घंटा झाली की कोणालाही थिएटरमध्ये प्रवेश दिला जात नाही. कोणीही कितीही मोठी व्यक्ती असली तरीही - अगदी स्वत: शशी कपूर असले, तरीही त्यांना थिएटरमध्ये प्रवेश नसतो. खरेच, आज सगळ्याच रंगभूमीने अशी शिस्त अंगी बाणवणे गरजेचे आहे.

१९८३ साली थिएटरच्या पाचव्या वर्धापनदिनी 'पृथ्वी थिएटर फेस्टिवल' आयोजित करण्यात आला. ह्यामध्ये थिएटरच्या सर्वोत्तम कलाकृती प्रेक्षक-समीक्षकांसमोर यशस्वीरित्या सादर करण्यात आल्या. मुंबईमध्ये आजसुद्धा प्रत्येक वर्षी हा फेस्टिवल आयोजित करण्यात येतो. ह्या फेस्टिव्हलसाठी काही अपवाद वगळता एकमेव संकल्पना न ठरवता, विविध कलाविष्कार सादर करण्यावर भर दिला जातो. स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पारंपरिक, नवीन प्रकार/रचना अशा नानाविध कलारचना सादर करण्याची मुभा असते. २००६ साली पृथ्वीराज कपूर ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कला देश की सेवा में' हे पृथ्वी थिएटरचे बोधवाक्य हा फेस्टिवलचा विषय होता. २००७ साली मुंबईमधील वेगवेगळ्या संगीत गटांनी सादर केला 'मुंबई म्युझिकल्स'.

जेनिफर यांच्या मृत्यूनंतर पृथ्वीचा कार्यभार जोमाने सांभाळला मुलगी संजना कपूर आणि मुलगा कुणाल कपूर ह्यांनी. संजना कपूर ह्यांनी आपल्या पृथ्वीमध्ये नवनवीन उपक्रम सुरू केले. पृथ्वीराज कपूर ह्यांचे नाट्यसृष्टीमधील योगदान लक्षात घेऊन भारत सरकारनेदेखील १९९५ साली पृथ्वीराज कपूर ह्यांच्या स्मरणार्थ स्टॅम्प प्रकाशित केला.

a

पृथ्वी थिएटरसोबत असलेला 'पृथ्वी कॅफे'सुद्धा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला. मोकळ्या जागेत भरपूर झाडे, बांबू ह्यांनी नटलेला कॅफे कलाकारांचे आणि कलाप्रेमींचे लाडके ठिकाण झाले. आयरिश कॉफी, कटिंग चहा आणि ब्राउनीज हे तर पृथ्वी कॅफेचे वैशिष्ट्य आहे. इथे कधी चक्कर माराल तर तुम्हाला कोणी मस्त गप्पा मारताना दिसेल, तर कोणी नाटकाचे स्क्रिप्ट वाचताना. एक से एक चवीचे पदार्थ, अतिशय प्रसन्न नैसर्गिक सजावट ह्यांनी समृद्ध असलेला पृथ्वी कॅफे सगळ्यांचेच लाडाचे ठिकाण आहे.

आजही ना नफा तत्त्वावर पृथ्वी थिएटर कलाकारांना अविरत प्रोत्साहन देत आहे. प्रत्येक आठवड्यात मंगळवार ते रविवार इथे विविध भाषांतील कलाविष्कार सादर करण्यात येतात. देखभाल आणि तांत्रिक गोष्टींसाठी दर सोमवारी थिएटर बंद असते. वर्षाभरात जवळपास ६४३पेक्षा अधिक नाट्याविष्कार इथे सादर करण्यात येतात आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद (जवळपास ७७% उपस्थिती) मिळत असतो.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पृथ्वीमध्ये राज्य असते ते बालगोपाळांचे. पूर्ण उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी (वय ३ वर्ष ते १०० वर्षे :)) विविध उपक्रम आखले जातात. रोज सकाळी ११ वाजता आणि दुपारी ३ वाजता खास मुलांसाठी नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येतात. पृथ्वी थिएटरसाठी भावी पिढी तयार करणे हा साधारण १९९१पासून सुरू केलेल्या ह्या परंपरेचा मूळ उद्देश आहे.

पृथ्वीराज कपूर ह्यांच्या कलेच्या साधनेला शशी कपूर आणि जेनिफर कपूर ह्यानी अखंड मेहनत घेऊन दिलेले मूर्त रूप म्हणजे 'पृथ्वी थिएटर'. काळाच्या ओघात अनेक कलाकारांना घडविण्यात अमूल्य योगदान दिलेले पृथ्वी थिएटर नाट्यकर्मींकरिता आजही अविरत कार्यरत आहे. चला तर मग, एकदा चक्कर मारू जुहूला.. समुद्रासोबत पृथ्वी थिएटरसुद्धा पाहून येऊ!

****** सगळे फोटो आंतरजालावरुन साभार ******

प्रतिक्रिया

पृथ्वी थिएटर म्हणजे रसिक प्रेक्षकांनाही स्वप्नवतच. सगळे फोटो अन लेख खूप आवडला!
आताचा काळ अनुकूल असल्याने, म्हणजे पालकांचा मुलांना कलेमधे करियर करायला पाठिंबा असल्याने पृथ्वी थिएटरसाठी भावी पिढी नक्कीच अधिकाधिक चांगली तयार होईल.

पृथ्वी थिएटरची माहिती देणारा लेख आवडला.

फारच छान लेख. मकरंद देशपांडे यांचेही पृथ्वी थिएटरमध्ये सध्या योगदान आहे. पृथ्वी थिएटरचे स्वप्न पाहणारे पृथ्वीराज कपूर, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे शशी व जेनिफर कपूर, त्यांची मुले व इतर सर्वांना मनःपूर्वक सलाम!

पैसा's picture

19 Jan 2017 - 11:55 am | पैसा

चांगला लेख

पद्मावति's picture

19 Jan 2017 - 12:09 pm | पद्मावति

वाह, सुरेख लेख.

सिरुसेरि's picture

19 Jan 2017 - 12:43 pm | सिरुसेरि

छान माहिती

संदीप डांगे's picture

19 Jan 2017 - 1:25 pm | संदीप डांगे

पृथ्वी थिएटर!!! व्वा! अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. थिएटरच्या जन्मापासून आतापर्यंतची जडणघडण खूप छान सांगितलीत... माझ्याही काही हॄदयस्थ आठवणींच्या तारा ह्यानिमिताने छेडल्या गेल्यात.

२००४ च्या पॄथ्वी फेस्टीवलच्या वॉलेण्टीयर टीममधे मी सामील होतो. ते दहा बारा दिवस अक्षरशः मंतरलेले होते. कहर म्हणजे ते दहाबारा दिवस मी तिथेच राहायला-खायला-झोपायला होतो. मला सेलीब्रेटी लोकांबद्दल फार काही खास आकर्षण नसल्याने कोणाचा ऑटोग्राफ घे, फोटो काढ असे प्रकार केले नाहीत...

केके मेननला रामूच्या 'सरकार व ब्लॅकफ्रायडे' ह्या चित्रपटांतून फेमस होण्याच्या आधी प्रत्यक्ष स्टेजवर परफॉर्म करतांना इथेच बघितलं. त्याआधी तो टीवीवाला कलाकार म्हणून मला माहित होता, पण त्यादिवशीचा त्याचा परफॉर्मन्स बघून असं वाटलेलं का हा इतका गुणी कलाकार टीवीत (तेही दूरदर्शनछाप) अडकून पडलाय. त्याची पत्नी निवेदिता (हीदेखील फेमस टीवी-अ‍ॅक्ट्रेस) आणि तो दोघांनाही थेट भेटण्याची संधी मिळाली. काय आवाज, काय इमोशन्स, जबरदस्त माणूस!!

सोनाली कुलकर्णी आणि मकरंद देशपांडे यांनी बरंच योगदान दिलंय. मकरंद देशपांडेने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाची रहर्सल बघायला मी आणि माझा एक मित्र दोघेच प्रेक्षकात बसलेलो. नाटकाची कास्ट म्हणजे दिग्गज लोक्स! एरवी आपण टीवी-मालिकांमधे या लोकांना अभिनय करतांना पाहतो तेव्हा त्यांच्याबद्दल काही खास वाटत नाही. "काय ते टीवी अ‍ॅक्टर्स.." असं वाटतं. पण जेव्हा जीवंत अभिनय तेही जबरदस्त विषयांवर, इन्टेन्स प्रसंगांमधे यांच्याकडून घडतो तेव्हा दिव्यत्वाची प्रचिती येते. त्या दहा बारा दिवसात मला कळले की सिनेमा-सिरियलमधे काम करणारे, एरवी चिल्लर म्हणून गणले जाणारे, चरित्र-अभिनेते किती ताकदीचे व अभिनयसंपन्न कलाकार असतात. _/\_

तर मकरंद देशपांडेंच्या त्या नाटकाची तालीम रात्री उशीरापर्यंत चालली, मग आम्ही दोघे मित्र, मकरंद, त्याचे दोन सोबती कलाकार-सहाय्यक असे बसून बीअर पीत बसलेलो, मकरंदने आम्हाला नाटकाबद्दल आमचे मत विचारले, कुठे चांगलं वाटलं, काय खटकलं हे आस्थेने विचारले, विचारपूर्वक तो लक्ष देऊन ऐकत होता. स्वदेश चित्रपटाची कथा त्यानेच तिथे आम्हाला सांगितली.. (आता थोडा कॉन्ट्रावर्सीचा भाग असा की म्हणे ही स्वदेश-कथा संकल्पना त्याचीच, त्याने आशुतोष गोवारीकरला सांगितलेली वगैरे, असो.) ही पण एक आठवण मस्त...

दसर्‍याला खुद्द शशीकपूर साहेबांना शुभेच्छा देतांना मस्त वाटलं.... संजना कपूर यांच्यासोबत तर प्रत्यक्ष काम चालू होतंच, कुणाल कपूर यांचीही भेट झाली. इतर कलाकारांमधे बरेच गाजलेले, गाजणारे सहकलाकार भेटले, मैत्री झाली. मजा आली. इथल्या रंगमंचावर, विंगांमधे, ग्रीनरूमधे फिरतांना याठिकाणी कितीतरी दिग्गज कलाकार येऊन गेले असतील ह्या विचाराने हृदयात फुलपाखरे नाचायची....

नाटक-सिनेमाबद्दल आकर्षण असणार्‍या लोकांना पृथ्वी थिएटर ही एक जबरदस्त जागा आहे हे तिथे गेल्यावरच लक्षात येईल. तुमच्या आवडीचे कलाकार कदाचित तुमच्या आजूबाजूला बसून कॉफी पित येणार्‍या मालिका-जाहिराती-नाटक-सिनेमांवर चर्चा करत असतील, अनेक होतकरु-स्ट्रगलिंग अभिनेते मोठ्या दिग्दर्शकांच्या नजरेस आपण पडू अशा आशेत डोळे लावून बसलेले असतील. अनेक कथा संकल्पना तिथे आकार घेत असतील. कलाकारांच्या धमन्यांतला अस्वस्थ जीवंतपणा म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पृथ्वी थिएटर.

ह्या लेखाने हृदयाच्या कोपर्‍यात जपून ठेवलेल्या आठवणी जाग्या केल्यात. सुगंधाची कुपी उघडल्यागत झाले... विशाखा ताईंचे खूप खूप आभार्स! :)

संदीप डांगे's picture

19 Jan 2017 - 1:27 pm | संदीप डांगे

दुरुस्ती: .... रामूच्या 'सरकार' व अनुरागच्या 'ब्लॅकफ्रायडे' ....

विशाखा राऊत's picture

20 Jan 2017 - 3:08 pm | विशाखा राऊत

इतकी सुंदर आठवण.. वाह क्या बात है :)
आमच्यासोबत ही आठवण शेअर केल्याबद्दल संदिपसरांचे आभार

शलभ's picture

29 Jan 2017 - 12:41 pm | शलभ

मस्त लेख..
हि आठवण तर खूप खास..

मस्त माहितीपुर्ण लेख विशाखा!

मस्त माहितीपुर्ण लेख विशाखा!

आदूबाळ's picture

19 Jan 2017 - 1:46 pm | आदूबाळ

फार सुंदर लेख आहे. डांगेन्नांचा प्रतिसादही आवडला.

अनुप ढेरे's picture

19 Jan 2017 - 2:25 pm | अनुप ढेरे

लेख मस्तं आहे!

वेल्लाभट's picture

19 Jan 2017 - 2:40 pm | वेल्लाभट

वेड काय चीज असते ते या क्षेत्रातल्या लोकांमधे शोधावं!

सामान्य वाचक's picture

19 Jan 2017 - 3:30 pm | सामान्य वाचक

पृथ्वी थिएटर साठी पुढच्या आणि त्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी पण कष्ट घेतले हे विशेष,

चैत्रबन's picture

19 Jan 2017 - 5:19 pm | चैत्रबन

नक्की भेट देणार :)

यशोधरा's picture

19 Jan 2017 - 5:24 pm | यशोधरा

पुन्हा एकदा पाहून गेले हा धागा. आजवर पृथ्वी थिएटर आणि कॅफेला भेट दिली नाही ह्याचं फारच वैषम्य वाटायला लागलंय! एकदा जायलाच हवं.

मस्त लेखन आहे. पृथ्वी थिएटर हे सर्वांसाठी खुले आहे हे माहीत नव्हते. सर्व फोटू आवडले.

बाजीप्रभू's picture

19 Jan 2017 - 7:28 pm | बाजीप्रभू

लेख आवडला.... कधी जाणं नाही पण लेखाच्या निमित्ताने पृथ्वी प्रक्षिणा घडली. लेखासाठी धन्यवाद.

बादवे,
गोष्ट छोटी उपक्रम आता चांगलाच रंगू लागलाय. शुभेच्छा!!

गामा पैलवान's picture

19 Jan 2017 - 7:56 pm | गामा पैलवान

अवांतर :

पृथ्वीराज कपूर आणि भालजी पेंढारकर यांच्या मैत्रीवर लेख वाचायला आवडेल. पृथ्वीराज यांच्या नाटकवेडामागे भालजींचा काही प्रभाव होता का?

-गा.पै.

वरुण मोहिते's picture

19 Jan 2017 - 8:08 pm | वरुण मोहिते

मुंबई मधील बघण्यासारखी जागा ..पृथ्वी कॅफे पण तितकाच मस्त . ज्यांना आवड आहे कलाकृतींची त्यांच्यासाठी एक उत्तम जागा . या बद्दल कपूर कुटुंबियांचेही अनेक आभार. मुंबईत आलात तर जरूर भेट द्यावी .एकदा मी स्पेशल के के मेनन च्या इंग्लिश नाटकासाठी गेलेलो आपला आवडता अभिनेता . पण बोलायला काही जमले नाही . डांगे सर लकी यू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2017 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ओळख ! पृथ्वी थिएटरबद्दल केवळ ओझरते ऐकले-वाचले होते. त्याबद्दल तपशीलवार माहिती आवडली !

विशाखा राऊत's picture

20 Jan 2017 - 3:09 pm | विशाखा राऊत

लेखावर अभिप्राय दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद :)

सई कोडोलीकर's picture

21 Jan 2017 - 1:38 pm | सई कोडोलीकर

सुरेख परिचय करून दिलात, खूप आवडला. पृथ्वीबद्दल एक अनामिक आकर्षण आहे. ते ह्या लेखामुळे वाढले आणि तपशीलवार माहितीमुळे बरीचशी उत्सुकता शमली. निवडक फोटोजची भर सुंदर आहे. धन्यवाद. मुंबईभेटीत खास भेट देण्याजोगी स्थळे वाढताहेत.

पियुशा's picture

22 Jan 2017 - 1:34 pm | पियुशा

वा !! मस्त झालाय लेख :)

खूप सुंदर लेख. फार छान ओळख करुन दिलीत पृथ्वी थिएटरची. जेनिफर आणि संजना कपूर यांच्या योगदानाबद्दल आधी वाचलेलं होतं. पण बाकी बरीच नवीन माहिती मिळाली.

संदिप डांगे यांचा प्रतिसादही छान!

पूर्वाविवेक's picture

28 Jan 2017 - 5:51 pm | पूर्वाविवेक

सुरेख लेख. छान माहिती.

नूतन सावंत's picture

2 Feb 2017 - 11:12 am | नूतन सावंत

वाह! विशाखा अभ्यासपूर्ण लेख.
खूप आठवणी जाग्या झाल्या.माझी मैत्रीण अजिता कुलकर्णी ही टीव्ही स्टार आणि मॉडेल असून हिंदी-मराठी सिनेमा आणि हिंदी-मराठी-गुजराती-हिंग्लिश नाटकातूनकरते.तिच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी पृथ्वी थिएटरला बऱ्याच भेटी दिल्या होती.त्यावेळेस संजना कपूर यांच्याशी गप्पा मारता आल्या होत्या.त्यावेळी शशी कपूर आजारी होते. त्याच्या चित्रपटांषयी आम्ही खूप बोललो.त्याचवेळी मकरंद देशपांडे यांच्याशी ओळख झाली होती.
परत एकदा जायला हवं तिथे.

स्रुजा's picture

28 Apr 2017 - 3:28 am | स्रुजा

फारच सुंदर लेख. एक तर विषयाची निवड फार भावली आणि बारीक सारीक तपशीलांनी खास मजा आणली. गुजराथी आणि मराठी रंगभूमीचा बराच दबदबा आहे पण हिंदी नाट्यसृष्टीला चित्रपटसृष्टी झाकोळुन टाकते असं होत असावं. पृथ्वी चा आणि त्यांच्या पठाण नाटकाचा उल्लेख मी पहिल्यांदा मामा तोरडमलांच्या" तिसरी घंटा " मध्ये वाचला होता. तोरडमलांच्या उल्लेखात पठाणचा दिमाखदार प्रयोग वगैरे वाचून पृथ्वी म्हणजे पैसेवाल्याचं काम असंच वाटायचं. शिवाय कपूर फॅमिली निगडीत आहे म्हणल्यावर निर्मितीसाठी फार कष्ट पडत नसतील असा ही एक वर वर काढलेला निष्कर्श होताच मनात. पण त्यांच्या त्या मागच्या एवढ्या कामाबद्दल तुझ्यामुळेच कळलं. खरंच वेडी माणसं ही ! जेनिफर कपूरचं पण विशेष कौतुक वाटलं.

फोटो बघून आता त्याला एक कुल कोशंट आलाय हे दिसतंच आहे, मुंबई ला गेल्यावर नक्की जाऊन यावं तिकडे !

या सुंदर लेखासाठी पुन्हा एकदा मना पासून धन्यवाद. या लेखाआधी तुझी किती धावपळ चालू होती हे मी पाहिलं आहे, त्यामुळे याची किंमत विशेष आहे :)

आणखीन एक म्हणजे, तू फार लिहीत नाहीस पण या निमित्ताने आग्रह आहे की तू मनावर घ्यावंस.