'पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकून देऊन
पावसात जाऊन भिजायचं!'
महाराष्ट्रात भटकंती करणाऱ्या प्रत्येकाला हि कविता शोभते, कारण आपला सखा सह्याद्री त्याला साद घालत असतो. मग आपल्या शहरातल्या रस्त्यावर पावसात किंवा घराच्या गच्चीत जाऊन भिजायचं कि सरळ सह्याद्रीला जाऊन भिडायचं?? हा प्रश्न आपल्या सर्वांना उद्भवतो आणि अर्थातच त्याच होकारार्थी उत्तर हि आपलं तयारच असतं. मग आपल्या सारखे डोंगर भटके, निसर्गप्रेमी किंवा नुकताच फोटोग्राफी चा छंद बाळगणाऱ्या मित्रांची यादी समोर येते अन फोनाफोनी सुरु! कुणाच्या तरी आईला पटवून सांगावं लागतं तर कुणाच्या मोठ्या भावाला कटवून जावं लागतं. असाच एक दुर्ग भटकंती चा बेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात ठरला- सरसगड, सुधागड आणि अवचितगड! (अर्थात नेहमी फिरणाऱ्या पट्टीच्या ट्रेकर ला हा प्रश्न पडणं साहजिक आहे कि सुरगड जो सुधागड सोबत केला जातो तो वगळून अवचितगड कसं काय बरं?) तर होतं असं कधीतरी!! सांगेन नंतर कुठेतरी!!!
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे शनिवार ते सोमवार असा प्लॅन बनला. यंदा (म्हणजे २०१६) पावसाने जुलै महिन्यापासून च दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे ट्रेक करताना प्रचंड उत्साह होता. पावसाळ्यात सह्याद्रीला इतक्या जवळून पाहायचं जे होतं!
सांगली हुन ३५० किलोमीटर च्या प्रवासाला आम्हाला शनिवारी संध्याकाळी ६ ला निघून पाली ला भक्त निवास येथे रात्री १२ पर्यंत पोचून मुक्काम करायचा होता.. मी, आणि माझे सोबती मकरंद गडकरी, सिद्धार्थ पेंडुरकर, अमोल माळी, विनायक कुष्टे, प्रशांत साळुंखे आणि सिद्धार्थ वाटवे हे सांगलीतून निघालो.. निघायलाच वाजले कि ८! वाटेत साताऱ्याला जेऊन पुण्याहून सांगलीच्याच दीपक झेले या मित्राला पिक केले.. दीपक इथून पुढे गाडी चालवणार म्हणून त्याला कमी जेव बाबा असं सांगितलं होतं आणि आम्ही मात्र साताऱ्यात वड कि वड केलं.. खोपोली ला पोहोचायला रात्रीचे २ वाजले! कधी एकदा पाली येतं आणि पहुडतो असं झालं होतं सर्वांच. गाडीत सगळेजण अधून मधून सारख्या डुलक्या मारू लागलो होतो ( दीपक नव्हे हं!) आणि मुसळधार पावसात रस्ता चुकलो! पाली ऐवजी पेन ला पाचलो. इथून आता नागोठाणे मार्गे म्हणजे मुंबई गोवा मार्गे पालीत शिरावं लागणार होतं. रस्ता इतका खराब, इतका खराब कि नागोठाणे फाट्या पर्यंत २० किमी पेक्षा फास्ट गाडी पळवता च आली नाही. ज्या पावसाचा मनमुराद आनंद लुटायला आलो होतो तो प्रवासाच्या पहिल्या दिवशीच नकोसा झाला होता. (रात्री ३.३० चे विचार). नागोठाणे फाट्या जवळ एक चहा ची टपरी उघडी दिसली आणि मी आणि दीपक चहा प्यायला उतरलो. सहज तिथल्या काकांना विचारलं इतकं उशीर पर्यंत चालू ठेवता का हॉटेल तर त्यांचं उत्तर आलं आत्ता उघडलंय! घड्याळ बघितलं तर ४.३० वाजून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला उठून दिवसभरात दोन किल्ले सर करायचे होते. अखेरीस पाली ला पोचून भक्त निवासात झोपलो एकदाचं! पहाटेचे ५.१५!
पाली हे अष्टविनायकांपैकी एक देवस्थान असल्याने इथे २ भक्त निवास आहेत जिथे राहण्याची उत्तम आणि स्वस्त सोय होते. काही दिवसांपूर्वीच मी अष्टविनायक केले होते म्हणून मला हे माहित होतच. इथल्या भक्त निवास २ मधल्या डॉरमेंटरी मध्ये फक्त २० रु. प्रत्येकी आम्हाला राहता आलं. रूम घेतली तर साधारण ४०० रु. घेतात. एरव्ही किल्ल्यांची भटकंती करणाऱ्या प्रत्येक जणाला एखादं मंदिर किंवा पायथ्याच्या गावची एखादी शाळा च फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा कमी भासत नसते.
सकाळी ७.३० ला उठून आम्ही सर्वांनी अष्टविनायक बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्याने खूपच प्रसन्न आणि कालच्या कमी झालेल्या झोपेचा थोडाफार ताण पण निघून गेला. मंदिराबाहेरच गरमा गरम मिसळ पाव, इडली चा नाष्टा करून आम्ही सरसगडासाठी मार्गस्थ झालो. जुलै महिन्याच्या अखेरीस ज्या पावसाचा जोर थोडा कमी झाला होता त्याने नेमका कालपासून हल्लाबोल करायला सुरवात केली होती. एकावर एक मोठ्या सारी कोसळू लागल्या होत्या, एखादी सर येऊन गेली कि त्या पुढची सर त्याहून भारी, जणू त्यांच्यात एखादी स्पर्धा च लागली होती. सरसगडाचा मार्ग मंदिर मागील पाण्याच्या कुंडाजवळून च जातो. सकाळी ९ च्या दरम्यान आम्ही गडाच्या पायवाटेला लागलो. धो धो कोसळणारा पाऊस आणि ढगांच्या प्रचंड माऱ्याला सामोरे जावे लागणार हे सुरवातीलाच कळाले होते. वरून वाहत येणाऱ्या पाण्याने बूट आणि मोजे आधीच चक्क भिजले होते आणि त्यातून घसरडी वाट, एकूणच चढाई करायला वेगळीच मजा येत होती. सुरवातीपासूनच ढग दाटून होते त्यामुळे गड किंवा इतरत्र कोणतेही रम्य दृश्य अजून नाजरेआडच होते, पण हा निसर्ग आणि सखा सह्याद्री कधी निराश करतो का? ढगांनी अन पावसाने उघडीप दिली आणि समोर दिसला तो सरसगड चा कातळ कडा! अचाट, अद्भुत आणि बुलंद! अंगावर काटा आल्याखेरीज राहत नाही. ज्या व्यक्तीला 'दुरून डोंगर साजरे' हि म्हण सुचली त्याने बहुदा हा सरसगड च पाहिला असावा. पायथ्यापासून साधारण तासा दीड तासात आम्ही गडाच्या दोन कातळ कड्यांचा घळीत पोचलो. येथून गडावर आपल्याला घेऊन जातात त्या ९६ पायऱ्या. कातळात खोदून बांधलेल्या पायऱ्या गडाच्या अती प्राचीन निर्माणाची कल्पना देतात. प्रत्येक पायरी जवळ जवळ एक ते दीड फुटाची. पायऱ्यां निसरड्या असतात त्यामुळे वर जाताना जपून जावे लागते. जिथे पायऱ्या संपतात तिथे पुन्हा एकदा कातळात च कोरलेला महादरवाजा लागतो. बांधकाम अतिशय सुरेख असंच आहे आणि दरवाज्या मागे पहारेकर्यांच्या राहण्यासाठी लेणीस्वरूप देवड्या आहेत. इथून आपण गडाला संपूर्ण प्रदक्षिणा घालून गड पहावा. या फेरीत आपल्याला गुहा, पाण्याचे हौद आणि टाकं बघायला मिळतात. गडाच्या उत्तरेला वर येणारी गडाची एक वाट आणि दरवाजा पण दिसतो. पावसाळ्यात कदाचित या वाटेने येऊ शकत नाही असं दिसतं. येथून पुढे छोट्या पायऱ्या आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जातात. इथे महादेवाचं मंदिर आणि त्यासमोर एक तलाव आहे. आम्ही सर्वांनी या मंदिराच्या जागेवरच थोडी विश्रांती घेतली, वातावरण ढगाळ असल्याने गडाच्या पूर्वेला असलेले सुधागड, तैलबैला व घनगड दिसले नाहीत. पण पश्चिमेला पाली गाव आणि शेजारून जाणारी अंबा नदी च दृश्य डोळ्याचं पारडं फेडणारच होतं.
परतीच्या वाटेवर पाय जागो जागी घसरत असल्याने आमची चांगलीच कसरत झाली. उतरताना गडबड न करता सावध राहून उतरत गेलो आणि गावात पोचलो. साधारण १ वाजले होते आणि सर्वांना प्रचंड भूक लागली होती, पाऊस अखंड कोसळत होताच पण ओल्या कपड्यांमध्येच बल्लाळेश्वराच्या अन्नछत्रा मध्ये गरमागरम जेवण करायला बसलो. २ चपाती, भोपळ्याची भाजी आणि भात आमटी, चपाती एकदाच मिळते म्हणून भात तीन चार वेळेला घेतला, हे सगळं फक्त १० रुपयात!
दुपारचं जेवण उरकून, कोरडे कपडे घालून पुन्हा एकदा ते ओले चिंब करायला, भिजायला आम्ही गाडी वळवली सुधागड च्या वाटेला. खरंतर पिर्वनियोजन सुधागड मुक्कामी करणं होतं, पण मुसळधार पावसाने सर्वांना एकमताने मुक्काम पुन्हा एकदा पाली च्या भक्त निवासातच करायचे ठरवण्यास भाग पाडले होते. सुधागड पालीहून १२ किमी च्या अंतरावर आहे. धोंडसे आणि पाच्छापूर या दोन पायथ्याच्या गावातून सुधागड करता येतो. आम्ही पाच्छापूर हुन सर करायचे ठरवले. पाच्छापूर या सुंदरश्या गावातच छ. संभाजी महाराज आणि मोगल सम्राट औरंगजेब चा पुत्र अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती हा या गावचा इतिहास. येथून आम्ही आमचा ट्रेक चालू केला, साधारण २ च्या सुमारास! यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस हा आम्ही निवडलेल्या तारखेलाच पडत होता. थांबायची कोणतीही लक्षणं नव्हती. पुन्हा एकदा भिजत दमत आम्ही गाड सर करू लागलो.
गावातून एक छोटीशी पण चांगलीच मळलेली वाट सुधागडकडे जाते. ढगांनी थोडी विश्रांती घेतली तेव्हा सुधागडाच्या कड्यांवरून तसेच आजूबाजूच्या डोंगररांगेतून प्रचंड उंचावरून कोसळणारे धबधबे मोहून टाकणारे होते. साधारण अर्धा तास तंगडतोड केल्यानंतर या मार्गावर बसवलेल्या मजबूत लोखंडी शिड्या आपणांस दिसतात. नवरात्रीत सुधागडावर उत्सव असतो तेव्हा अजूबाजूच्या गावातील मंडळी गडावर जातात त्यांना सोयीचे व्हावे या साठी या शिड्या बसवल्या असाव्यात. एके ठिकाणी नवीन शिडीच्या बाजूस जुनी पण एकदम खडी शिडी सुद्धा आहे, पण नेहमीच्या ट्रेकर्स व्यतिरिक्त ती कोणी चढू शकत नाही कारण हि शिडी कड्याजवळ आहे. इथून पुढे गर्द झाडाच्या मार्गातून पुढे जावे लागते, इथे लहान मोठे अशे धबधबे आपल्याला आंघोळ घालतात. पाण्याच्या प्रवाहातून पिचिक पिचिक करत आपण काही वेळात पोचतो ते म्हणजे पाच्छापूर दरवाज्याजवळ. दरवाजा देखणा आणि दोन्ही बाजूस बुलंद अशा बुरुजांनी संरक्षित आहे. इथे दगडी पायऱ्या आपणांस वर घेऊन जातात. काही ठिकाणी आम्हाला या पायऱ्यांवरून वाहत येणारे पाणी थोडे का होईना पण गरम जाणवले. दरवाजा चढून वर गेल्यावर सुधागड ची संपूर्ण एक बाजू आणि कडा तसेच तिथून कोसळणारे धबधबे जवळून दिसतात. इथून पुढे थोडं चालून झाल्यावर एक शेवटची चढाई करावी लागते जी राहिलेला सगळा दम बाहेर काढते. या चढाईनंतर आपण गडाच्या विस्तीर्ण अशा पठारावर पोचतो. इथे ढग, वारा आणि पाऊस आपली ताकद दर्शवताना अनुभवलं. पठारावरून उजव्या हाताला पुढे चालत गेलो कि गडावरील मुक्कामास योग्य अशा पंथ सचिवांच्या वाड्याजवळ पोचतो. इथेच जवळ एका छोट्याश्या झोपडीत एक आज्जी राहतात ज्यांच्याकडे खाण्यापिण्याची सोय करता येते फक्त शिधा खालच्या गावातून घेऊन जावा लागतो. याच आज्जींना चहा बनवायला सांगून आम्ही गडावरील इतर वास्तू बघायला निघालो. वाड्यापासून थोड्याच अंतरावर भोराई देवीच मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला काही स्तूप आणि पडके अवशेष बघायला मिळतात. या मंदिरात देखील १० ते १५ जणांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. मंदिरापासून सरळ चालत काहीश्या ओबड धोबड दगडी पायर्यांची वाट सुधागडाच्या सर्वात मुख्य आणि महत्वाच्या वास्तू जवळ पाचवते, आणि हि वास्तू म्हणजे सुधागडचा महादरवाजा! रायगड ऐवजी सुधागड स्वराज्याची दुसरी राजधानी बनवायचा विचार छ. शिवाजी महाराजांनी केला होता इतका मोठा आणि सुरेख असा हा किल्ला, आणी इथला महादरवाजा हुबेहूब रायगड चीच प्रतिमा. अगदी तसाच्या तसा! धोंडसे हुन येणार्या मार्गावर हा दरवाजा ठाण मांडून उभा असतो. दरवाज्या लगतच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि पाऊस यांचा आवाज संबंध वातावरणात घुमत होता. काही वेळ या महादरवाज्या जवळ थांबून आम्ही पुन्हा गडावर आज्जींकडे चहा प्यायला पोचलो. सोबत आज्जीनी वरकी खायला दिली. दिवसभर पावसात भिजून हातपाय पांढरे पडले होते, त्यात सुधागडावर वारा खूप जोरदार. सगळेजण थंडीने कुडकुडत होतो पण त्या चहाने सर्वांना फ्रेश करून टाकले. या पेक्षा योग्य वेळ चहा पिण्याची असू शकते का?
सायंकाळचे ५ वाजले होते, आणि आम्ही उतरायला सुरवात केली. तासाभरात पाच्छापूर आलं. गाडीजवळ पोचून अंग पुसून कोरडे कपडे अंगावर घातले, खूप बरं वाटलं राव! अंगावर शेवाळ यायचं बाकी होतं इतके सलग भिजलो होतो दिवसभर. पाली ला पुन्हा भक्त निवास आणि थोड्या विश्रांती नंतर गावातच मस्त जेवण! काहींनी अंडा करी तर काहींनी डायरेक्ट मांदेल वर डाव साधला. एकादी शिट शाकाहारी पण होती म्हणा आमच्यात. उद्या सुरगड व अवचितगड करायचा होता पण सुरगड वगळण्यात आला होता मग त्या ऐवजी कोलाड च्या राफ्टिंग ची शक्यता आम्ही आजमावणार होतो. दिवसभराच्या गप्पा टप्पा करत झोप कधी लागली कळालेच नाही.
तिसऱ्या दिवशी भक्त निवास वरच एकजण चहा घेऊन येतो तो पहाटे पित असतानाच वर्तमानपत्र वाचत होतो, आणि कालच्या झालेल्या पावसाची नोंद बघितली. २५० मिमी! इतका पाऊस एका दिवसात अखंड झेलला होता आम्ही. आजचा हा दिवस मात्र प्रसन्न वाटत होता. ढग मागे फिरले होते, सौम्य वाऱ्याची झुळूक आणि पहाटेच्या भजन किर्तनांनी मनावर जादू केली होती. अखेरीस वरुणराजा दमला होता आणि त्याने विश्रांती घेतली होती. हलक्याश्या सूर्यकिरणांनी त्यात भर घातली. सकाळची न्याहारी आटोपून आम्ही पाली च्या बल्लाळेश्वराचा निरोप घेतला, गाडीतून जाताना सरसगड मागेच होता, 'पुन्हा लवकर या' सांगत होता!
पाली हुन अगदी जवळ २/४ किमी वर गरम पाण्याचे कुंड असलेले ठिकाण उन्हेरे, आजची आंघोळ इथेच, गरम पाण्यात! नैसर्गिक चमत्कार म्हणावं किंवा शास्त्राने जोड द्यावी पण गरम पाण्यात उतरलं कि समाधान.. इथली आंघोळ उरकून निघालो रोह्याच्या दिशेने, अवचितगड सर करायला.
रोहा या कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील शहरापासून केवळ ५ किमी अंतरावर गर्द वनराई आणि घनदाट जंगल परिसरात उंच डोंगरावर अवचितगड स्थित आहे. अनेक राजवटींनी या किल्ल्यावर सत्ता उपभोगल्या. शिवाजी महाराजांच्या काळात मोठ्या प्रमाणात महसूल या किल्ल्यावर ठेवला जात असल्याने महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांपैकी एक असा या किल्ल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. पालीहुन जाताना रोहा यायच्या आधी मेढा गाव लागतं जिथून हा किल्ला सर करता येतो. या व्यतिरिक्त इतर दोन वाटा सुदधा आहेत. आज वातावरणाने मोकळीक दिल्याने आम्ही सर्वजण निश्चिन्त होतो. कोकणातल्या रमणीय गावांपैकी एक असं हे मेढा गांव असेल हे नक्की. आजूबाजूला हिरव्यागार डोंगररांगा, गावातून वाहणारे छोटे मोठे ओढे, त्यावर धुणं धूत असताना गावातील माता भगिनी, विहिरी, घराच्या अंगणात रमणारी लहान सहान पोरं, दुरून कणखरपणे फडकताना दिसणारा गडावरचा भगवा ध्वज आणि कोंकण रेल्वे! एकूणच अविस्मरणीय असं हे सगळं.
गावातल्या विहिरीमागून गड चढण्यास आम्ही सुरवात केली. वाट जरी घनदाट जंगलातून असली तरी मळलेली आहे तसेच ठिकठिकाणी काही संस्थांनी वाटेत काही फलक सुद्धा लावले आहेत. सुरवातीपासून गड उजव्या हाताला ठेऊन किल्ला चढावा लागतो, निम्म्या वाटेत गेलो कि एका खिंडीतून डावीकडची वाट सोडून उजवीकडे जावे. साधारण तासाभराच्या चढाईनंतर आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचतो. किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत. दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी 'सप्तकुंड' आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे. गडाच्या पश्चिमेस रोहा आणि कुंडलिका नदी तसेच कोंकण रेल्वेचं दृश्य बघण्यात निश्चितच कमालीचे समाधान आहे. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, घनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.
छोटासा पण सुंदर असा अवचितगड अनुभवून आम्ही पायथ्याला आलो. रिव्हर राफ्टिंग करायच्या मानसुब्याने आम्ही कोलाड च्या दिशेने निघालो पण कुंडलिका नदी पत्राबाहेर वाहत असल्याने आमची हि इच्छा अपूर्णच राहिली. शेवटी कोलाड लाच दुपारचे जेवण उरकून आम्ही ताम्हिणी मार्गे पुणे व पुढे सांगली करायचे ठरवले. ऐन पावसाळ्यात सर्वात देखणा व तितकाच सुरक्षित (दरड वगैरे कोसळण्याचे प्रकार इतर घाटांपेक्षा कमी) ताम्हिणी बघणं म्हणजे स्वर्गाहून सुंदर!
असा हा ३५० किमी (सांगली हुन पाली फक्त, संपूर्ण ट्रिप चे अंतर जवळपास ९०० किमी) अन २५० मिमी ट्रेक संपवून रात्री १ च्या सुमारास आम्ही घरी पोचलो. ते कातळकडे, ओढे, धबधबे आठवत गाढ झोपलो.
प्रतिक्रिया
31 Aug 2016 - 11:17 am | नेत्रेश
पण फोटु दीसत नाही
31 Aug 2016 - 1:45 pm | चेतन पडियार
प्रकाशित फोटो.. size पुढच्या खेपेला सुधरवतो.. :)
31 Aug 2016 - 11:33 am | प्रचेतस
गणेशा झालाय.
31 Aug 2016 - 11:40 am | किसन शिंदे
फोटो? फोटो?? फोटो???
31 Aug 2016 - 1:46 pm | चेतन पडियार
Size adjustun घ्या.
31 Aug 2016 - 12:21 pm | चेतन पडियार
फोटो का दिसेनात भाऊ?
31 Aug 2016 - 12:33 pm | पैसा
छान लिहिलंय. तुमची फोटो देण्याची पद्धत चुकली आहे. मिपावर थेट लिंक देऊन फोटो टाकता येत नाहीत. http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात दिल्याप्रमाणे पद्धत वापरून फोटो पुन्हा अपलोड करायचा प्रयत्न करा.
हा तुमचा पहिला फोटो. ब्लॉगवरचे आणि फ्लिकरवरचेही इतर फोटो पाहिले. अतिशय सुंदर आहेत. मात्र मिपावर टाकताना 'लिखाण करा' विंडोच्या वरच्या कोपर्यात असलेला insert/edit image (alt+M) हा ऑप्शन वापरून फोटो अपलोड करावा लागेल. फ्लिकरवरच्या फोटोवर राईट क्लिक केल्यावर इमेज अॅड्रेस मिळेल. फोटोची रुंदी साधारण ६०० ठेवल्यावर (उंची आपोआप अॅडजस्ट होते.) योग्य आकारात फोटो इथे दिसतील. उभ्या फोटोसाठी रुंदी कमी ठेवावी लागेल.
31 Aug 2016 - 12:44 pm | चेतन पडियार
31 Aug 2016 - 12:44 pm | चेतन पडियार
आल्यासारखे सोबती असतील तर कार्य सिद्धीस नक्कीच जाईल.
31 Aug 2016 - 1:47 pm | चेतन पडियार
केली नाही ऍडजस्ट. पुढच्या वेळेस :)
थँक्यू
31 Aug 2016 - 12:42 pm | चेतन पडियार
तरी पुन्हा प्रयत्न करतो.
31 Aug 2016 - 1:49 pm | प्रचेतस
आहा....!!!
फोटो छान आलेत. एकदम हिरवंगार, चिंब वातावरण.
सुधागडावर बर्याच सतीशिळा आणि वीरगळ आहेत. स्तूप मात्र नाहीत.
पाच्छापूर हे मूळचं गाव नाही. शहजादा अकबराची छावणी तिथे उभारली होती म्हणून त्या ठिकाणाला पाच्छापूर हे नाव पडलं. छावणी उठल्यावर नंतर तिथं गाव (वाडी) वसलं.
बाकी शरभ हे सातवाहनकालीन नाही. चालुक्यानंतर ही शिल्पं दिसायला सुरुवात होते. दाक्षिणात्य आहेत.
31 Aug 2016 - 1:57 pm | चेतन पडियार
पाच्छापूर ला एका वाडीच नाव आहे, ते विसरलो. आणि शरभ शिल्पांचा ऐतिहासिक संदर्भ पुन्हा वाचेन आणि हवी ती सुधारणा नक्की कारेन. शेवटी योग्य ती माहिती सर्वांना मिळावी.
31 Aug 2016 - 4:37 pm | स्वच्छंदी_मनोज
>>
ठाकूरवाडी नाव आहे त्या वाडीचे. पाच्छापूर वाटेवरचे किल्ल्याच्या जवळचे गाव. घाटावरून कोकणात उतरणारा नाणदांडघाटही ह्याच वाडीत उतरतो.
रच्याकने माझ्या आवडीचा भाग असल्याने ह्या भागात प्रचंड भटकंती केलीय खूप खूप भटकलोय आणी सुधागडावर सर्व ऋतूत राहीलोय :)
31 Aug 2016 - 4:39 pm | प्रचेतस
आणि धोंडश्याजवळचे बहिरामपाडा (बैरामपाडा). सवाष्णी इथे उतरतो ना :)
31 Aug 2016 - 5:01 pm | स्वच्छंदी_मनोज
सवाष्णी घाट बहीरामपाडा इथे उतरतो..हा पण घाट मस्त आहे. तसे सवाष्णीचे अजुन एक किंवा पुर्वीचे नाव घोडेजीनघाट असेपण आहे :)
ह्याच सवाष्णीला अल्मोस्ट समांतर असा भोरप्याचा घाट आहे पण तो थोडा दक्षीणेकडे आणी सुधागडाच्या एकदम पायथ्याला उतरतो (जिथे बाजारपेठ मारूती आहे तिथे). पण हा घाट अवघड आहे कारण जबरी जंगल, भयानक कारवी आणी धबधब्याची/ओढ्याची वाट.
31 Aug 2016 - 5:07 pm | प्रचेतस
ह्याला सवाष्णी असं नाव का दिलंय? सवाष्णी सौम्य आहेत तसा. घोडे उतरण्यासारखा घाट असल्याने घोडेजीनघाट म्हणत असावेत कदाचित. पण जीन हा पर्शियन शब्द आहे. मुसलमानी अंमलात हे नाव पडले असावे.
बाकी तिथून दिसणार्या तैलबैलाच्या सुळक्यांविषयी स्थानिक कावडीची मजेदार गोष्ट सांगतात. :)
31 Aug 2016 - 5:18 pm | स्वच्छंदी_मनोज
blockquote>ह्याला सवाष्णी असं नाव का दिलंय?
>>>
खखो माहीत नाही पण तोतया सदाशीवभाऊची पत्नीचे, हा सुधागडावर कैदेत असताना, त्याला भेटायला येताना ह्याच घाटात मरण आले म्हणून हे नाव अशी वदंता आहे. घोडेजीन नावाच्या इतीहासाबद्दल जास्त माहीती नाही.
सवाष्णी सौम्य आहे हे खरे पण हा घाट खरे तर पायगाडीसाठी. ह्याहून जुना आणी मोठा व्यापारी मार्ग म्हणजे ठाणाळेला वळसा मारून जाणारा वाघजाई घाट. हा दणदणीत मोठा आणी अजूनच सौम्य आहे.
31 Aug 2016 - 5:20 pm | प्रचेतस
ओह्ह. ओके. ह्या कथेबद्दल ऐकले होते.
बाकी ठाणाळ्याला जाण्याकरिता वाघजाई घाटानेच उतरावे लागते का? खालनं यायचं असल्यास कोणता मार्ग आहे?
31 Aug 2016 - 5:55 pm | स्वच्छंदी_मनोज
मुळ धाग्यावर बरेच अवांतर होतेय पण....ठाणाळ्याला जायला पायथ्याच्या ठाणाळे गावातून मस्त वाट आहे. दोन डोंगर वर चढून गेले की डायरे़क्ट लेण्यात प्रवेश.. ह्या लेण्यांचे लोकेशन एवढे जबरी आहे की जवळ जाईपर्यंत लक्ष्यातही येत नाही की अश्या निबीड, अती अंतर्गत जंगलात अश्या काही सुंदर लेण्या असतील.
आणी इनफॅक्ट ठाणाळ्याला जायला वाघजाई घाटाने उतरणे जिकीरीचेच आहे. कारण एकतर हा घाट लेण्यांच्या डोक्यावरील कड्यातून आणी डोंगरातून जातो आणी लेण्यावरून वाघजाई घाटाला डायरेक्ट जायची वाट प्रचंड घसार्याची आणी कारवीची आहे. मी एकदा प्रयत्न केला होता पण वाट मोडल्यामुळे अर्ध्यावरून परतावे लागले.
31 Aug 2016 - 6:04 pm | प्रचेतस
अवांतर झालं तरी होपफुली चेतनराव रागावणार नाहीत अशी आशा करुयात. :)
तू सांगतोस तसं लोकेशन म्हटलं की मला राजमाचीवरनं उतरणारी घाटवात आठवते. कोंडाणे पण अगदी तशीच. वरुन उतरताना सापडणे अवघड अर्थात वाटा सोप्या आहेत मात्र पण भरपूर ढोरवाटा फुटत असल्याने नेमकी वाट पटकन सापडत नाही. तिच पायथ्याकडनं आलं की सापडणे फारसे अवघड नाही.
ठाणाळे तुझ्यासोबतच करुया.
31 Aug 2016 - 7:20 pm | चेतन पडियार
राग येऊदे .. चालतं.. :)
1 Sep 2016 - 12:05 pm | स्वच्छंदी_मनोज
>>
नक्कीच जाऊया. कधी ठरवतोस ते बोल. तिथेच जवळपास एक सरीची वाट म्हणून घाटवाट आहे, ती पण मला करायची आहे. या निमीत्ताने तिही होइल.
31 Aug 2016 - 1:57 pm | अजया
छान लिहिलंय.फोटो फारच सुंदर.
31 Aug 2016 - 2:12 pm | चेतन पडियार
तुमच्या प्रतिक्रिया पुढील मोहिमेसाठी प्रोत्साहन देतील.
31 Aug 2016 - 1:59 pm | जगप्रवासी
पुढच्या भटकंतीसाठी / ट्रेकसाठी शुभेच्छा. असेच फिरत राहा आणि आम्हाला ट्रेकची सुंदर मेजवानी देत राहा.
31 Aug 2016 - 2:15 pm | चेतन पडियार
भटकंती होत राहील, तुमच्यासारखे सवंगडी भेटत राहतील. आणखी काय हवं?
31 Aug 2016 - 5:20 pm | कंजूस
फारच छान.फोटो चांगले आहेत.सुधागडची मुख्य वाट दुसरीकडून आहे(धोंडसे गाव)पण वरच्यावर तिकडे थोडे उतरल्यावर महादरवाजा येतो त्याचा फोटो काढण्यापेक्षा व्हिडिओ छान कल्पना देतो.शत्र येऊ लागला की वरून धोंडेसुद्धा टाकता येतात.
31 Aug 2016 - 9:16 pm | चेतन पडियार
पण इथे नाहीतर youtube वर टाकेन आणि लिंक पाठवीन.
31 Aug 2016 - 6:22 pm | नीलमोहर
अफाट फोटो आहेत सगळेच !!
31 Aug 2016 - 6:32 pm | शान्तिप्रिय
जबर्दस्त लेखन आणि सुन्दर फोटो़.
31 Aug 2016 - 7:40 pm | कंजूस
त्या घाटवाटा तैलबैला,सुधागड,ठाणाळे फिरलोय.उंच फार नाही पण वाट चुकल्यास(उतरताना)दुसय्रा दरीत खाली येतो आणि पायपीट वाढते.फोटो नसल्याने लेख टाकला नव्हता.वाहन आणल्याने सांगली/पुणे इथून त्यामुळे सोय झाली परंतू याठिकाणी गैरसोयही आणि मजा कमी होते कारण जिकडे कार ठेवली आहे तिकडेच परत जावे लागते.