सैली - १३ सप्टेंबर (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in लेखमाला
25 Apr 2016 - 8:56 am

Header

मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची फार मोठी परंपरा आहे. व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', जयवंत दळवींचं 'सारे प्रवासी घडीचे', ग्रेस, सुरेश भटांसारख्यांचं वेधक वित्रण असणारं मधुकर केच्यांचं 'विदर्भातली माणसं', अनेकांचं खुल्लमखुला वस्त्रहरण करणारं दुर्गाबाईंचं 'जसे आठवते तसे' ही चटकन आठवणारी नावं! व्यक्तिचित्रणांचा कळसाध्याय म्हणजे अर्थातच पुलंचं 'व्यक्ती आणि वल्ली!' व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तिरेखा विनोदाच्या वाटेने जात असल्या तरी त्यातील जवळपास प्रत्येकाला कारुण्याची झालर आहे. नंदा प्रधान आणि त्यापेक्षाही 'तो' मध्ये हा कारुण्यरस प्रकर्षाने जाणवतो. ही सगळी व्यक्तीचित्रं हा अर्थात पुलंच्या अद्वितीय प्रतिभेचा अविष्कार असला तरी ती कमालीची अस्सल वाटतात. पुलंना प्रत्यक्षात भेटलेल्या आणि त्यांच्याच लेखणीतून उतरलेल्या 'गणगोत' पेक्षाही काकणभर सरस!

अर्थात वर उल्लेखलेल्या पुस्तकांमधली व्यक्तिचित्रं काय, किंवा व्यक्ती आणि वल्ली काय, बहुतांशी ही सगळी व्यक्तिमत्वं आपल्या आजूबाजूला वावरणारी, अनेकदा रोजच्या पाहण्यातली असतात. लौकीकार्थाने पापपुण्याच्या - निती-अनितीच्या बंधनांत, परंपरा आणि रुढींमध्ये अडकलेली आणि एका ठरावीक सामाजिक चाकोरीतूनच जाणारी अशी ही व्यक्तिचित्रं आढळून येतात. मुख्यं म्हणजे बहुतकरून पांढरपेशा समाजातली आणि मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय वर्गातल्या व्यक्तिरेखाच सहसा या पुस्तकांमधून आढळून येतात. अपवादच करायचा झाला तर माडगूळकरांच्या माणदेशी माणसांचा आणि बबडू आणि काही प्रमाणात भय्या नागपूरकर - नंदा प्रधान यांचाच! परंतु ऋढ संकेतांच्या बाहेर ही माणसंही फारशी जाताना आढळत नाहीत.

श्रीकांत सिनकर हे नाव आजच्या तरुण वाचकांच्या फारसं परिचयाचं नसलं (आणि एकूणच बर्‍याचजणांच्या विस्मृतीत गेलेलं असलं) तरी एक काळ त्याने गाजवलेला आहे. गुन्हेगारीवरील आणि विशेषतः गाजलेल्या गुन्ह्यांच्या पोलिसांनी केलेल्या तपासावरील कथा हा सिनकरांचा हातखंडा. मराठी भाषेत पोलिस तपासावर आधारीत कथा रुजवण्याचं बरंचसं श्रेयं हे सिनकरांचं आहे. दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या 'एक शून्य शून्य' आणि 'शोध' या पहिल्यावहिल्या डिटेक्टीव्ह मालिकांना आधार होता तो सिनकरांच्या तपासकथांचाच! या तपासकथा लिहीण्यापूर्वी सिनकरांनी वेगवेगळ्या पोलिस अधिकार्‍यांशी आणि अनेकदा त्यांची परवानगी घेऊन अट्ट्ल गुन्हेगारांशीही संवाद साधून त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नव्हे तर पोलिसांचं काम कसं चालतं हे जवळून पाहण्यासाठी एका खून प्रकरणात तपासकामातही भाग घेतला, कारण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याविना तो शब्दांत उतरवणं सिनकरांना नामंजूर होतं!

अर्थात पोलिस तपासकथा लिहीण्यापर्यंतच सिनकरांची लेखणी मर्यादीत नव्हती. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कादंबर्‍या त्यांच्या लेखणीतून उतरल्या. केवळ मराठीच नाही तर हिंदीतूनही त्यानी लिहीलेल्या पोलिस तपासकथा प्रदर्शित झाल्या आणि गाजल्याही! यात खासकरुन जाणवणारी एक गोष्टं म्हणजे या कथांमधली किंवा कादंबर्‍यांमधली पात्रं ही कायम ठराविक सामाजिक चौकटी झुगारणारी आणि पाप-पुण्याच्या कल्पना बासनात गुंडाळून ठेवून स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणारी मनस्वी माणसं होती...

.... कारण खुद्दं श्रीकांत सिनकर हा माणूसही तसाच होता!

या मनस्वी, बेदरकार पण स्वतःशी कमालीचा प्रामाणिक असलेल्या माणसाच्या आयुष्यात आलेल्या चार महत्वाच्या व्यक्ती, ज्यांच्याशी त्याचं गोत्रं जुळलं, अत्यंत दृढ संबंध निर्माण झाले आणि काही कारणामुळे ताटातूट झाली त्यांचं आणि त्यांच्या अवतीभवतीच्या परिस्थितीचं कमालीचं प्रामाणिक आणि तितकंच जळजळीत चित्रण म्हणजे - सैली - १३ सप्टेंबर!

परंतु 'सैली - १३ सप्टेंबर' हे केवळ व्यक्तिचित्रण नाही, तर त्यात असलेल्या जगन, दत्तू, सैली आणि जीन या चार माणसांबरोबर असलेले श्रीकांतचे संबंध आणि त्या अनुषंगाने उलगडत जाणारं त्याचं स्वत:ंच आयुष्य याचा तो आकृतीबंध आहे. १९५५ मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी झालेल्या जगनच्या भेटीपासून ते १९७९ मध्ये जीनबरोबरचे संबंध संपुष्टात येईपर्यंत वेगवेगळ्या वेळी या चौघांशीही त्याचे संबंध आले. या चोवीस वर्षांच्या कालावधीतलं या चौघांच्या बरोबरीने उलगडत जाणारं श्रीकांतचं आयुष्य म्हणजे हे पुस्तंक! त्या दृष्टीने विचार केला तर हे आत्मचरित्रं म्हणावं लागेल.

परंतु आत्मचरित्रं वगैरे प्रकार स्वतः श्रीकांतलाच नामंजूर होते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी त्याने माधव मनोहरांची गाठ घेतली (तेव्हा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो भरपूर दारु प्यायलेला होता!) त्यावेळी त्याने मनोहरांना सांगितलं, "जन्मनोंदीसारख्या क्षुद्र गोष्टीत मला काडीचाही रस नाही. माझ्या आयुष्यात जे काही मला आठवावेसे वाटते, तेच तेवढे महत्वाचे. आठवावेसे वाटते ते हे!"

माधव मनोहरांनाही श्रीकांतचा हाच रोकठोक पण प्रामाणिक भाव पटला. त्याबरोबरच श्रीकांतच्या या कथा या कथा नसून स्वानुभवावर आधारीत स्वभावचित्रं आहेत आणि त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे हे त्यांच्यातल्या चाणाक्ष समिक्षकाने जाणलं आणि म्हणूनच त्यांनी 'सैली - १३ सप्टेंबर' या कथनाला प्रस्तावना लिहीण्याचं मान्यं केलं! पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसांच्या शेंडीला झिणझिण्या येतील असं बेबंद आणि बेधडक आयुष्यं जगणारा श्रीकांत त्याच आयुष्याचं कोणताही आडपडदा न ठेवता आणि स्वतःशी कमालिचा प्रामाणिक राहून जे वर्णन करतो ते माधव मनोहरांसारख्यालाही आकर्षून घेतं यातंच सारं आलं! जयवंत दळवींनी ही व्यक्तिचित्रणं वाचून श्रीकांतला 'आत्मचरित्राऐवजी' असं अत्यंत समर्पक नाव सुचवलं होतं जे मनोहरांनाही आवडलं होतं, पण मनाने कायमच सैलीत गुंतलेल्या श्रीकांतला तिचं नाव आणि तिचा जन्मदिवस असलेली १३ सप्टेंबर ही तारीख आपल्या या अनुभवकथनाला योग्य वाटली आणि त्याने ती कायम ठेवली!

श्रीकांतच्या या कहाणीत सर्वात प्रथम येतो तो १९५५ मध्ये त्याला भेटलेला जगन!

शिवाजी पार्कच्या नाक्यावर श्रीकांतशी गाठ पडलेला हा जगन म्हणजे त्याकाळी मुंबईत जोमात चालत असलेल्या 'न्यूयॉर्क कॉटन' या मटक्याचा बुकी असलेल्या वाण्याचा एक मदतनीस! स्वतः श्रीकांत पंधराव्या वर्षी मटका खेळायला ज्या वाण्याकडे जातो त्या वाण्याकडे त्याची या जगनशी गाठ पडते! दोघांना एकत्रं आणणारं सूत्रं म्हणजे न्यूयॉर्क कॉटन आणि दोघांची मैत्री टिकवून ठेवणारी गोष्टं म्हणजे त्यांची गरिबी! या गरिबीला कंटाळूनच श्रीकांत मटक्याकडे वळला आहे आणि जगनसारखा चाणाक्षं मित्रं मिळाल्यावर मटका खेळत असेपर्यंत त्याला पुढे कधीही पैशाची ददात पडलेली नाही!

या जगनच्या कृपेमुळेच पंधराव्या वर्षी श्रीकांतच्या हाती आयुष्यात प्रथमच शंभराची नोट आली! १९५५-५६ च्या काळाचा विचार केला तर पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती शंभराची नोट येणं याचा अन्वयार्थ लक्षात येऊ शकेल. पुढे जगन बुकींगचा नंबर आणि रक्कम लिहून घेणारा रायटर झाल्यावर तर दोघांच्या करामतींना आणखीनच बहर आला! दोघांच्याही हातात पैसा खेळत असल्याने नवीन कपडे वापरणं, नाक्यावर प्रसंगी उगाच नवीन कपड्यांची मिजास मारणं, अफाट पिक्चर पाहणं, आख्ख्या मुंबईभर भटकणं आणि कधीकधी हातभट्टीची दारु पिणं अशी दोघांची मैत्री बहरत गेली! सोळा-सतराव्या वर्षी अर्ध्या चड्डीतही कामाठीपुरा, फोरास रोड, फॉकलंड रोड अशा वेश्यावस्तीत हे दोघं भटकत, पण प्रत्यक्षं माडी चढून वेश्येकडे जाण्याचा अनुभव दोघांनी घेण्यास १९६० साल उजाडलं!

या जगनने श्रीकांतपुढे मटक्याचं जग खुलं केलंच, पण त्यातल्या खाचाखोचाही त्याला बारकाईने समजावून दिल्या! इतक्या, १९६० मध्ये श्रीकांत मुंबई सोडून पुण्याला गेल्यानंतर १९६१ मध्ये पानशेतच्या पुरामुळे त्याला मुंबई गाठावी लागली नसती तर पुढेमागे पुण्यात स्वतःचा मटक्याचा धंदा सुरु करण्याचा त्याने विचार केला होता. परंतु श्रीकांत पुण्याला जाण्यापूर्वीच जगनने वाण्यापासून फारकत घेऊन स्वतःचा धंदा सुरु केला होताच! वाण्याच्या कंप्लेंटवरुन पोलिसांनी उचलल्यावर जगनच्या नातेवाईकाच्या मदतीने श्रीकांतनेच त्याला जामिनावर सोडवून आणला!

याच पोलीस अधिकार्‍यांना लेखक श्रीकांत सिनकर १९७० मध्ये भेटला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तर त्यात नवल ते काय?

१९६४ च्या सुमाराला श्रीकांतची लेखक म्हणून कारकीर्द सुरु झाली होती, परंतु त्यापूर्वी त्याचा मटक्यातला रस कमी झाला होता तो कायमचा कारण लेखनामधून त्याला आर्थिक प्राप्ती होण्यास सुरवात झाली होती. एव्हाना न्यूयॉर्क कॉटनची जागा कल्याण मटक्याने आणि कालांतराने रतन खत्रीने घेतली असली तरी जगनची गाठ घेऊन श्रीकांतने त्याच्याकडून याची संपूर्ण माहिती करुन घेतली होतीच!

१९६४-६५ नंतर पंधरा वर्षांनी श्रीकांतची पुन्हा एकदा आपल्या या जुन्या मित्राबरोबर अनपेक्षीतपणे गाठ पडते तेव्हा तो एका लहानशा हॉटेलचा मालक झालेला आहे. अर्थात हा दाखवण्याचा धंदा आहे, खरा धंदा आहे तो मटक्याचा आणि एव्हाना नाक्यावरचा जगन हा जगनशेठ झाला आहे!

खुद्दं श्रीकांतला मात्रं जगनचा जगनशेठ हा अवतार फारसा रुचलेला नाही. शिवाजी पार्कच्या नाक्यावरचा 'ओपाSSन डेली' ची आरोळी ठोकणारा आणि बलराज साहनी - मीनाकुमारीचा 'सट्टाबाजार' पाहण्यासाठी 'कोहीनूर' सिनेमाच्या चकरा मारणारा आणि "जगामंदी आपल्याला कोणी बी नाय आहे हे ध्यानामंदी घेऊनच राहीला पायजे. म्हणजे मग काय वाट्टेल ते झाला तरी फरक पडणार नाय!" हे साधं तत्वज्ञान ऐकवणारा जगनच त्याला प्रिय आहे!

१९६१ मध्ये पानशेतच्या पुरानंतर पुण्याहून परतल्यावर तीन-चार महिने बेकारीत काढल्यावर श्रीकांतने विक्रोळीच्या रतनशा कंपनीत नोकरी धरली आणि इथल्या मित्रांच्या कृपेने त्याची गाठ पडली ती दत्तूशी. दत्तू बॉयलर!

१९६१-६२ सालच्या विक्रोळीचं जे वर्णन श्रीकांतच्या लेखणीतून येतं ते मुळातच वाचण्यासारखं आहे. त्यावेळी कांजूरमार्ग आणि विद्याविहार ही स्टेशन्सही बांधली गेली नव्हती आणि विक्रोळी स्टेशन ते जुना आग्रा रोड (आताचा एलबीएस मार्ग) याच्यादरम्यान तर जंगलच होतं. पुढे मंगतराम पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दौलतरामचा हातभट्टीचा अड्डा होता आणि त्या अड्ड्याचा दारु गाळणारा आणि भट्टी पेटवणारा प्रमुख कलाकार म्हणजेच हा दत्तू! भट्टी पेटवतो म्हणून त्याचं नाव दत्तू बॉयलर!

या दत्तूमुळे आणखीन एका अफलातून दुनियेत श्रीकांतचा प्रवेश झाला ती म्हणजे गावठी दारु... हातभट्टी!

विक्रोळीच्या कंपनीत काम करताना पगार घेणं तर दूरच, वर कँटीनचा खर्च म्हणून पदरचे तीस-चाळीस रुपये कंपनीत भरणारा, कधी स्कूटर तर कधी कारने कंपनीत जाणारा श्रीकांत आणि हातभट्टी गाळणारा दत्तू ही खरंतर अजब जोडी, परंतु ती जमली होती खरी! अर्थात श्रीकांतला खर्च परवडत होता तो मटक्याच्या जोरावर आणि दत्तूचं आकर्षण होतं ते त्याच्या निरागसपणामुळे आणि हातभट्टीमुळे! दत्तूला मात्रं श्रीकांत करत असलेली पैशाची उधळपट्टी फारशी पसंत नसे आणि त्यावरुन प्रसंगी तो श्रीकांतला सुनावतोही, पण त्यांच्या मैत्रीत मात्रं त्यामुळे बाधा येत नाही. उलट त्यांचे ऋणानुबंध इतके जुळतात की स्वतःच्या धाकट्या भावाच्या मुंजीचं श्रीकांत दत्तूला आमंत्रण देतो, त्याचं अगत्याने आदरातिथ्यंही करतो आणि दुसर्‍या दिवशी खास मुंजीचे लाडू त्याला नेऊन देतो!

या दत्तूच्या कृपेमुळेच श्रीकांतला हातभट्टी कशी बनवतात याची संपूर्ण प्रक्रिया जवळून पाहता आली. आपण जी दारु पितो ती कशी तयार केली जाते याचं त्याला कुतूहल होतंच! 'हात मारणं', 'शिट्टी', 'वॉश', 'बॉयलर', 'पाणी मारणं', 'पुडी', 'मांड बांधणं', 'पहिली धार', 'भट्टी ओकणं'... अवघ्या बावीसाव्या वर्षी हे सगळं ज्ञान श्रीकांतने दत्तूकडून मिळवलंच, पण त्यावरच समाधान न मानता दत्तूच्याच मदतीने स्वतः भट्टी लावून दारू तयारही करुन पाहिली! आपल्या या उद्योगाबद्दल स्वतः श्रीकांतच म्हणतो,

"मला जर कोणी विचारलं तुम्हाला काय काय बनवता येतं, तर मी सांगतो चहा, बैदा ऑम्लेट आणि दारु! त्यापैकी दारु बनवणं मी बंद केलं आहे! आता प्रयत्न करुनही ती बनवणं शक्यं नाही!"

१९६३ मध्ये मॅनेजरपासून सर्वजण नको म्हणत असतानाही काही विघ्नसंतोषी मंडळींना बरं वाटावं म्हणून श्रीकांतने नोकरी सोडली आणि दत्तूचा संबंध संपला. परंतु पुढे सोळा-सतरा वर्षांनी जगनप्रमाणेच अनपेक्षितपणे दत्तूची गाठ पडते तेव्हा श्रीकांत आनंदीतही होतो आणि एकदाच जिच्या हातचं साधंच शेंगांचं पिठलं खाल्लं त्या दत्तूच्या पत्नीच्या निधनाची बातमी कळल्यावर विमनस्कही होतो. आणि नेहमी करत असलेला उपाय अंमलात आणतो...

भाऊच्या धक्क्यावर बसून एकट्यानेच दारु पिणं!

जगन आणि दत्तू.. एक मटकावाला तर एक हातभट्टीवाला! सामान्यं माणसांच्या रोजच्या पाहण्यातली ही माणसं नाहीत, परंतु त्या विशिष्टं कालखंडात ते श्रीकांतच्या आयुष्याचा अविभाज्यं भाग बनले आहेत आणि श्रीकांत त्यांच्या!

१९६० मध्ये जगनच्या जोडीने 'केनेडी ब्रिज' आणि 'जमना मेन्शन' इथल्या वेश्यागृहाला भेट देऊन श्रीकांतने एक नवीन अनुभव गाठीशी बांधला होता! त्याच सुमाराला अवघ्या विशीच्या असलेल्या या माणसाच्या पोरींच्या भानगडी सुरु झाल्या होत्या! रंगरुपाने सामान्य असूनही पोरी पटवण्याची कला श्रीकांतला साधलेली होती! भाड्याने स्कूटर घेऊन त्यावरुन पोरींना फिरवणं हा त्याचा त्याकाळातला लाडका उद्योग! अर्थात तरीही वेश्यागृहाला भेट चुकत नव्हतीच! इतकंच काय पण १९६१ मध्ये पुण्याला गेल्यावर तिथे आणि विक्रोळीच्या कंपनीत काम करत असतानाही त्याचे हे उद्योग सुरुच होते. अर्थात वेश्यांकडे जाऊन शरीरसुख घेणं आणि पटवलेल्या पोरीबरोबर झोपणं, दोन्हीत केवळ वासनापूर्ती करणं हाच त्याचा स्वच्छं हेतू होता!

श्रीकांत म्हणतो,
"शरीराची भूक भागवणं जरुरीचं असतं, शरीरसंबंधात मौज असते वगैरे गोष्टी तेव्हा - जेव्हा मी चोविस वर्षांचा होतो तेव्हाही - कळत नव्हत्या आणि आजही कळत नाहीत! त्या काळात आम्ही काही मित्रं दिवसभर खूप काम करायचो, रात्री ग्रँट रोडला बैदा गल्लीतील फेमस आंटीकडे प्यायचो आणि आपोआप फॉकलंड रोडला यायचो. कोणालाच शारिरीक भूक लागलेली नसायची, पण 'जावूया जरा! टाईमपास!' हाच हेतू असायचा!"

याच चाकोरीतून फॉकलंड रोडला आलेला असताना १९६४ च्या सुरवातीला श्रीकांतची गाठ पडली ती सैलीशी!

सैली ही एक नेपाळी वेश्या. श्रीकांतशी तिची गाठ पडली तेव्हा ती नुकतीच नेपाळहून आली होती. पहिल्या भेटीतच आणि ती वेश्या आहे हे माहीत असूनही तिला पाहिल्यावर तिच्या शरीरापेक्षाही त्याच्या मनात भरला तो तिचा चेहरा आणि नजर.

श्रीकांत म्हणतो,
"त्या दिवसापासून अगदी शेवटपर्यंत एक वेश्या असूनही मला ती कधी तशी दिसली नाही. किंवा कदाचित मीच ठरवलं असेल की त्या दृष्टीकोनातून तिच्याकडे पाहायचं नाही आणि अखेरपर्यंत नाहीच पाहिलं. आणि पुढेही पाहणार नाही..."

सुरवातीच्या काळात दोघांचेही संबंध अगदी रोकठोक होते. एक वेश्या आणि गिर्‍हाईक यांच्यातला पैशच्या मोबदल्यात घडणारा शारिरीक पातळीवरचा व्यवहार! परंतु हळूहळू कोरड्या व्यवहाराची जागा आपुलकीने घेतली. अक्षरशत्रू सैली आणि एव्हाना लेखक म्हणून बर्‍यापैकी बस्तान बसलेला श्रीकांत यांच्यात वैचारीक देवाणघेवाण होणं सर्वथैवं अशक्यंच होतं, परंतु केवळ एक माणूस म्हणून तिचा सहवास त्याला आवडत होता. इतका की दोघांनी अनेक रात्री केवळ गप्पा मारण्यात घालवल्या. तिचं शरीर त्याने उपभोगलं, पण त्याहीपेक्षा उपभोगला तो तिच्या सहवासाचा आनंद!

त्यातूनच श्रीकांत पुण्याला गेलेला असताना सैलीच्या घरवालीने अचानक जागा बदलल्यावर तो वेडापिसा होतो. वेळोवेळी तिच्याघरी नेलेल्या इतर मित्रांच्या मदतीने तिला शोधण्याचा प्रयत्न करतो! अर्थात या सगळ्यामागे केवळ सेक्स हा हेतू नाही. त्याला केवळ आस आहे ती सैलीची आणी तित्या सहवासाची!

श्रीकांत म्हणतो,
"आता प्रश्न आला पुन्हा तो सेक्सचा! मी तळमळत होतो तो कशासाठी? पेटलो होतो म्हणून? अजिबात पेटलो वगैरे नव्हतो. कुलाब्यापासून ते जुहूपर्यंतची एकूणेक ब्रॉथेल्स मला माहीत होते. उघडे बाजार तर तोंडपाठ आहेत. पेटलोच असतो तर कुठेही जाऊन क्षणार्थात थंड झालो असतो. पण मला भूकच नव्हती! एकच आस होती ती सैलीला लवकरात लवकर पाहण्याची! तिच्याबरोबर झोपण्याची तर नव्हेच नव्हे!"

सैलीची गाठ पडल्यावरही त्याला जास्त आनंद होतो तो तिच्याबरोबर झोपायला मिळण्यापेक्षाही पुन्हा तिचा सहवास मिळणार आहे याचाच! सैलीप्रमाणेच तिच्या ब्रॉथेलमधल्या इतर मुलींशीही त्याचे आपुलकीचे संबंध आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणाबरोबरही तो झोपलेला नाही आणि तो तिथे हजर असताना ती देखील दुसरं गिर्‍हाईक घेत नाही! त्याच्याकडून तिला पैशाचीही अपेक्षा नाही. उलट एका प्रसंगीतर ती त्याला आर्थिक मदत देऊ करते. त्याच्या पैशापेक्षाही तिलाही त्याच्या सहवासाचीच ओढ जास्तं आहे!

सैलीच्या सहवासात आकंठ बुडालेला श्रीकांत अखेर तिला लग्नाची मागणी घालतो. अर्थात तिच्याशी लग्न करण्यामागे वेश्याव्यवसायातून तिला बाहेर काढणं हा त्याचा हेतू असला तरी तो समाजसुधारकाचा आव वगैरे अजिबात आणत नाही!

"सैली वेश्या आहे म्हणून मला तिचा उद्धार करायचा नव्हता. उद्धार वगैरे गोष्टी मला कधी समजल्याच नाहीत. मला एक आणि एकच कळत होतं, सैली हीच माझ्या जीवनातील यशस्वी जोडीदारीण होऊ शकते! सेक्सचा काही प्रश्नच नव्हता! सेक्सपेक्षा जास्त जमल्या होत्या त्या एलिमेंट्स गेल्या सहा वर्षात!"

सैलीबद्दल श्रीकांतची ही भावना इतकी प्रांजळ आहे की एकेकाली त्याच्याबरोबर शय्यासोबत केलेल्या मुलीने तिची वेश्या म्हणून हेटाळनी केल्यावर तो तिला सुनावतो,

"तुझ्यात आणि हिच्यात फक्त दोन गोष्टींमध्ये फरक आहे. तुला टॅक्सी लागते, पिक्चर्स लागतात, फॅमिली रुम लागते, काळोखा समुद्र लागतो. पॉश हॉटेलं झोपायला लागतात. तू पूर्वी किती जणांबरोबर झोपली होतीस आणि आजही झोपते आहेस हे मला माहीत नाही, पण माझ्याबरोबर तू किमान चार वेळा झोपली आहेस. तुझ्यात आणि हिच्यात फरक इतकाच की हिचा मोबदला रोख आहे आणि तुझा चैनीत आहे. आणखीन एक फरक म्हणजे तू एम.ए. करतेयस आणि ती बिल्कूल अनपढ आहे. फारतर असं म्हणू की तू सुशिक्षीत वेश्या आहेस आणि ती अशिक्षीत वेश्या! एवढाच फरक!"

लेखनाच्या दुनियेत वावरत असलेल्या श्रीकांतला वेश्येशी लग्न करण्याच्या निर्णयावरुन पांढरपेशी समाजात किती हलकल्लोळ होऊ शकेल याची पूर्ण कल्पना होती! स्वतःच्या घरी सैलीचा फोटो त्याने फ्रेम करुन लावला होता. घरी येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला तिचा फोटो दाखवून आपण तिच्याशी लग्नं करणार आहोत हे तो उघडपणे सांगत असे! त्याच्या परिने त्याला ओळखणार्‍या लोकांना अनपेक्षित धक्का बरू नये म्हणून केलेला तो उपाय होता!

खुद्दं सैली मात्रं त्याच्याशी लग्नं करण्यास नकार देते! स्वतःच्या मर्यादांची आणि वस्तुस्थितीची तिला पूर्ण जाणीव आहे. नेपाळमध्ये असलेल्या तिच्या कुटुंबियांना पैसे पाठवण्याची श्रीकांतने तयारी दर्शवल्यावरही तिचा नकार कायम आहे. १९६४ पासून १९७१ च्या सुरवातीपर्यंत आपण लेखक आहोत हे श्रीकांतने तिच्यापासून लपवून ठेवलं आहे, पण तिला ते कळल्यावर स्वतः अशिक्षीत असूनही हट्टाने त्याची सर्व पुस्तकं आणि मासिकं ती मागून घेते. तो लेखक आहे हे कळल्यावर तर तिचा नकार अधिकच पक्का होतो. आपल्यात गुंतून पडल्यामुळे एक लेखक म्हणून त्याची प्रगती होणार नाही अशी तिची भावना आहे.

१९७१ च्या अखेरीस श्रीकांतच्या दारुच्या अतिरेकात घडलेल्या प्रसंगामुळे दोघांचे संबंध कायमचे संपुष्टात आले. अतिशय प्यायलेल्या अवस्थेत त्याच्याबरोबर बाहेर जाण्यास तिने नकार दिल्यावर तो म्हणतो,

"तू क्या तेरा बाप भी आएगा! देखता कैसी नही आती!"

नेपाळमधल्या आपल्या आई-बापाला पैसे पाठवण्यासाठी दिवसभर आल्या-गेल्या गिर्‍हाईकासमोर शरीर उघडं करणार्‍या सैलीलाही बापाचा उद्धर सहन झाला नाही आणि तिने श्रीकांतचा जाहीर उद्धार केला. त्या तिरीमिरीतच आणि त्यापेक्षाही स्वतःचा इगो हर्ट झालेल्या श्रीकांतने तिच्याविरुद्ध पोलीसांत तक्रार नोंदवली आणि हवालदारासह पोलिसांची व्हॅन तिला नेण्यासाठी हजर झाली. परंतु परिस्थितीतही काहीतरी चुकतं आहे इतकीच अर्धवट जाणि त्याला होत होती. पोलिस व्हॅनमधून जाता त्या परिथितीतही श्रीकांत तिला म्हणतो,

"सैली, तू बिल्कूल चिंता मत कर! मै तुझे वापस लाकर छोडूंगा!"

पुढे पोलिस स्टेशनवर एकमेकांविरुद्ध अदखलपात्रं गुन्हा नोंदवण्यापर्यंत मजल गेली आणि त्या क्षणी आठ वर्षांचे दोघांचेशी संबंध संपुष्टात आले ते कायमचे!

सैलीशी संबंध संपुष्टात आल्यावर श्रीकांत विलक्षण सैरभैर झाला. लेखक आणि प्रकाशक म्हणून त्याचा उत्कर्ष होत गेला, परंतु यामागे सैलीशी ताटातूट झाल्याची खंत कायमच राहिली. काळाच्या ओघात रोज तिची आठवण येत नसली तरी तो तिला कधीच विसरू शकला नाही आणि ती देखील त्याला विसरली नाही! मात्रं श्रीकांतची रदबदली करण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रांच्या प्रयत्नांना मात्रं तिने दाद दिली नाही. त्याच्या आयुष्यापासून तिने स्वतःला कटाक्षाने कायमचं दूर ठेवलं!

१९७१ च्या अखेरीस सैलीशी संबंध संपुष्टात आल्यावर श्रीकांतने स्वतःला सेक्स या प्रकारापासून कटाक्षाने दूर ठेवलं होतं. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्या प्रसंगात सैलीच्या आठवणीने तो अधिकच उदास होत होता! सेक्सबरोबरच जिच्या केवळ सहवासात आनंद मिळू शकेल अशी स्त्री त्याला भेटली नव्हती!

ही परीस्थिती बदलली ती १९७५ मध्ये जेव्हा श्रीकांतला भेटली जीन!

जगन, दत्तू आणि सैली हे तिघं अडाणी आणि अशिक्षीत तर जीन उच्चशिक्षीत! जीन हे सुधा श्रीकांतनेच तिला दिलेलं नाव! मुळ नाव अरुंधती. सोफीया आणि झेवियरसारख्या कॉलेजमधून एम ए झालेली. दिसायला सुंदर. श्रीकांतच्याच शब्दांत सांगायचं तर मदनिका! नोकरी करत असल्याने आणि मुळातच सधन कुटुंबातली असल्याने आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी! उत्तमोत्तम कपडे आणि इतर आवडी-निवडी यातून तिची अभिरुची उच्च आहे हे देखील कळतं.

त्याचबरोबर बसस्टॉपवर उभी असताना कोणाही अनोळखी कारवाल्याकडे लिफ्ट मागण्याचा बिनधास्तपणा तिच्यात मुरलेला आहे! अवघ्या काही मिनीटांत पुरुषांना जोखण्यात ती माहीर आहे. श्रीकांतच्या टॅक्सीतून लिफ्ट घेताना पहिल्या भेटीतच आपण स्वीमर आहोत आणि दादरच्या स्विमींगपूलवर स्विमींगला जातो हे ती मोकळेपणाने श्रीकांतला सांगते. अर्थात त्यामागे श्रीकांत स्विमीगपूलवर येणार याची तिला अपेक्षा आहे, खरंतर खात्रीच आहे आणि त्याप्रमाणे तो जातोही!

विमींगपूलवर टू पीसमधल्या जीनचं निरीक्षण करताना श्रीकांतमधला पुरुष लख्खपणे दिसतो. जीनचं शरीर न्याहाळताना एक दिवस हिच्याबरोबर झोपायचंच या हेतूने तो तिच्याशी ओळख वाढवतो. जीनची त्याला ना नाही कारण ती स्वतःच भ्रमरवृत्तीची आहे. स्वतःला आवडलेल्या पुरुषाबरोबर दारु पिण्यात आणि हॉटेलच्या रुममध्ये त्याच्याबरोबर झोपण्यास तिला अनमान नाही. अर्थात त्याच्या खर्चाने! त्या दृष्टीने विचार केल्यास ती उच्चभ्रू वेश्याच ठरते. फक्तं कोणाबरोबर झोपावं हे तिच्या इच्छेवर अवलंबून आहे! स्वतःच्या सौंदर्याची तिला पूर्ण जाणिव आहे. पुरुषांना खेळवणं हा तिचा आवड्ता खेळ आहे. श्रीकांतलाही ती खेळवतेच आहे आणि श्रीकांत तिला!

सैलीप्रमाणेच जीनच्या शरीरापेक्षाही श्रीकांत जास्तं रमतो ते तिच्या सहवासात! अशिक्षीत सैलीशी अशक्यं असलेला वैचारीक पातळीवरचा संवाद उच्चशिक्षीत जीनशी तो साधू शकतो. परंतु त्यापेक्षाही केवळ तिच्या सहवासाची त्याला नशा आहे. मात्रं एक मैत्रीण म्हणून प्रचंड आवडत असलेल्या जीनचा स्वतःची बायको म्हणून तो विचारही करु शकत नाही! उलट बायको म्हणून ती आपल्या गळ्यात पडेल अशी त्यालाच धास्ती वाटते! आपण तुझ्याशी लग्नं करणार नाही हे तो जितक्या मोकळेपणाने तिला सांगतो तितक्याच मोकळेपणाने मी देखील तुझ्याशी लग्नं करणार नाही हे ती त्याला सांगते! तिचा हाच बेदरकार आणि मोकळा स्वभाव त्याला प्रिय आहे. परंतु हॉटेलच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपून बाहेर पडल्यावर सहजपणे दुसर्‍या कारवाल्या मित्राबरोबर ती निघून जाते तेव्हा श्रीकांतसारख्या माणसालाही ती अस्वस्थं करुन जाते. जीनचं हे वागणं त्याला अनाकलनीय आहे.

आणि तितकीच अनाकलनीय आहे ती म्हणजे तिची गणपतीवरील श्रद्धा!

श्रीकांत म्हणतो,
"जीनच्या शरीरापेक्षा तिच्या सहवासाचा आनंद मला जास्तं होता. तिचा सहवास म्हणजेच नशा होती. खरीखुरी कॉकटेलची नशा! प्रीतमच्या गार्डनमध्ये, धावत्या टॅक्सीत, तरंगत्या विमानात, बिर्ला मातोश्री सभागृहात आणि फोर्ट फौंटनच्या रस्त्यांवरुन चालताना उघड्या वातावरणात जीनच्या सहवासाची जी नशा मी अनुभवली आहे, ज्या नशेमुळे मी बेहोश झालो आहे ती नशा- त्या नशेच्या एक टक्का अनुभवही मला 'ब्ल्यू डायमंड'च्या किंवा 'हेरीटेज'च्या एअर कंडीशण्ड रुममध्ये आला नाही!"

त्यामुळेच १९७९ मध्ये जीनशी संबंध संपुष्टात आल्यानंतर श्रीकांत तिला विसरु शकत नाही. जीन कायमची आपल्याबरोबर राहणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना आहे. जीनचं लग्नं ठरल्यामुळे ती त्याच्याशी सारे संबंध तोडते, पण ध्यानीमनी नसताना ज्या अचानक पद्धतीने ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते आणि मागे वळूनही पाहत नाही त्यामुळे ती त्याला कायमची अस्वस्थं करुन जाते. आपलं नेमकं काय चुकलं याचा तो शेवटपर्यंत विचार करत राहतो आणि त्याचं उत्तर न मिळाल्याने तर त्याला अधिकच हुरहूर लागते.

मात्रं जीनबरोबरच्या शरीरसंबंधातही तो सुखी नाही. नेमक्या त्याच क्षणी तो उदास आहे. तो म्हणतो,
"शरीराचं आणि सहवासाचं एकत्रं सुख जीन मला देऊ शकत नव्हती. देऊ शकलीही नसती आणि माझी नेमकी हीच अडचण होती! जीनला मी कितपत सुख देऊ शकत होतो आणि किती दिले ते मी सांगू शकत नाही! जीन, तुझ्यासारखाच डेस्परेट मी! पण हिंमत होत नाही. कसं सांगू की.. प्रत्येक वेळी शरीर तुझं होतं पण नजरेसमोर एक दुसराच भावूक चेहरा होता..."

हा चेहरा अर्थातच सैलीचा हे वेगळं सांगायला नकोच!

जगन, दत्तू, सैली आणि जीन ही चार संपूर्ण वेगळी व्यक्तिमत्वं आहेत. या प्रत्येकाची दुनिया वेगळी आहे. जगन आणि दत्तू हे मटका आणि हातभट्टी या एका परीने गुन्हेगारी विश्वाशी संबंधीत जगात वावरणारे, सैली वेश्या तर जीनचं जग हे हाय सोसायटी आणि ए ग्रेड हॉटेलचं. श्रीकांतच्य आयुष्यात या प्रत्येकाचं खास स्थान आहे. जगन, दत्तू आणि सैलीलाही तो पुन्हा भेटतो, पण जीनशी मात्रं पुन्हा त्याची कधीच भेट झालेली नाही. वेगवेगळ्या वेळची वेगवेगळ्या कालखंडातली त्याच्या आयुष्यातली ही क्षणचित्रं आहेत आणि त्या क्षणचित्रांचं एकत्रं अस कोलाज म्हणजे श्रीकांतचं हे अनुभवकथन आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरु नये!

आत्मचरीत्रं हा साहित्यप्रकार वाटतो तितका सोपा नाही. त्या-त्या प्रसंगी मनात आलेले विचार आणि प्रत्यक्षातली आपली वागणूक याचं वर्णन करणं भल्याभल्यांना साधत नाही. अनेकजण दुखावले जाण्याची भीती असतेच आणि हयातभर मिळवलेली खोटी प्रतिष्ठा सांभाळण्याची आणि मिरवण्याची केविलवाणी धडपडही असते. त्यामुळे ठणकावून सत्य सांगणारं आत्मचरित्रं फारच अभावाने आढळतं. बहुतेकदा आत्मचरित्रात्मक लेखनामध्ये समाजाच्या चौकटीत तिरस्कारणीय मानल्या गेलेल्या आणि प्रतिष्ठेला धक्का बसू शकणार्‍या गोष्टी टाळण्यामागेच लेखकाचा कल असतो.

१९८० मध्ये हे पुस्तक प्रकाशीत झालं तेव्हा श्रीकांत सिनकर हे लेखक-प्रकाशक म्हणून मान्यता पावलेलं नाव होतं. साहित्यविश्वात त्याला मान होता. अशा परिस्थितीत स्वतःशी कमालीचं प्रामाणिक राहून इतकं प्रांजळ अनुभवकथन हे आजवर मिळवलेल्या प्रतिष्ठेवर स्वतःच्या हाताने पाणी फिरवण्यासारखं आहे असं इतर कोणाचंही मत झालं असतं. परंतु श्रीकांतला त्याची पर्वा नव्हती. व्यक्तिशः त्याला ओळखणार्‍या कोणापासूनही वेश्यागमनाची सवय लपवण्याची त्याला कधीच गरज वाटली नाही. उलट समाजात मान असलेल्या अनेक प्रतिष्ठीत लोकांना त्याने सैलीच्या आणि इतरही ब्रॉथेल्सची सफर घडवून आणली. मात्रं त्यांच्यापैकी एकाबद्द्लही एकही उणा शब्दं त्याने लिहीलेला आढळत नाही. इतकंच काय पण वेश्या असलेली सैली आणि उच्चभ्रू जीन यांच्यात समान सूत्रं असलेल्या सेक्स या विषयावरही एकही अश्लील शब्दं न वापरता तो नेमकं भाष्यं करुन जातो.

२०१३ मध्ये आलेल्या दुसर्‍या आवृत्तीत मूळ पुस्तकात नसलेल्या पाचव्या व्यक्तिमत्वाचा समावेश आहे. हे पाचवं व्यक्तिमत्वं म्हणजे श्रीकांतची पत्नी! पंचेचाळीशीच्या सुमाराला मूळव्याधीच्या ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट असताना तिथली नर्स श्रीकांतच्या प्रेमात पडली. सर्वांसमोर आपलं आयुष्यं खुलेपणाने उलगडणार्‍या श्रीकांतने तिला सैली - १३ सप्टेंबर हे पुस्तक वाचायला दिलं! श्रीकांतचा आरपार प्रांजळपणा आणि प्रामाणिकपणा पटल्यामुळे तिने तरीही श्रीकांतशीच लग्नाचा आग्रह धरला. 'सुंदर सावली सापडली' या नावाने दुसर्‍या आवृत्तीत श्रीकांतच्या लग्नाची ही जी कहाणी येते ती देखील तितकीच वाचनीय आहे. तसंच एकेकाळी श्रीकांतचा जिवलग मित्रं असलेल्या पण नंतर दुरावलेल्या सतीश तांबे या मित्राची प्रस्तावनाही! सैली आणि श्रीकांतची पत्नी शैला यांच्यातील नामसाधर्म्य हा या कलंदर माणसाच्या आयुष्यातला आणखीन एक योग!

श्रीकांत म्हणतो,
"जे काही चालू आहे, ते आपल्याला समजले पाहीजे ही तर माझी वृत्ती होतीच. आयुष्यभर हेच करीत आलो. माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या शक्य झाल्या त्या त्या सर्व भानगडी केल्या. सर्वच अनुभव घेतले. कोणते जवळ करायचे आणि कोणते दूर करायचे ते माझं मीच ठरवलं. जवळ करण्याच्या सीमा ठरवल्या. जे काही केलं त्याला मीच जबाबदार! मीच भानगडी केल्या, मीच निस्तरल्या. आणि... लाजलज्जा सोडूनच सर्व भानगडी केल्या."

इंग्लिशमध्ये एक वचन आहे.
"It does not take much to be a man in bed, but it takes tuns of guts to man it up!"

मटका खेळणं, हातभट्टीची दारू पिणं, स्वतः हातभट्टी लावणं, अघोरी प्रमाणात सिगारेट ओढणं आणि दारु पिणं, पोरी फिरवणं आणि उपभोगणं, रंडीबाजी करणं यासाठी गट्स लागतातच, पण त्यापेक्षाही आपण हे सर्व केलं याची कोणत्याही सामाजिक चौकटीची तमा न बाळगता छातीठोकपणे सांगणं याला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं गट्स लागतात!

श्रीकांतमध्ये ते होते म्हणून तो श्रीकांत सिनकर होता!

(टीपः श्रीकांत सिनकरांचा आणि माझा कोणताही परिचय नव्हता. वयाच्या दृष्टीने विचार केला तर ते माझ्या वडीलांच्या वयाचे. पण असं असूनही या लेखात मी त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे कारण आदरार्थी उल्लेख केला असता तर मला नेमक्या शब्दांत लिहीता आलं नसतं).
Footer

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Apr 2016 - 8:59 am | पैसा

लेखनामागच्या लेखकाचा आत्मीयतेने करून दिलेला सुंदर परिचय!

लेख आवडला, पुस्तकाची ओळख अगदी व्यवस्थितरित्या करून दिली आहे :)

सानिकास्वप्निल's picture

25 Apr 2016 - 11:05 am | सानिकास्वप्निल

भन्नाट!! या लेखमालेतील सर्वात बेस्ट लेख आहे हा. लिहिण्याची शैली व पुस्तक परिचय सुंदरचं. अनाहितांच्या या लेखमालिकेत, मिपाकर तुम्ही सहभागी होऊन इतका अप्रतिम लेख दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद ___/\__

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 2:30 pm | प्रीत-मोहर

__/\__

खूप मनापासून लिहिलेला लेख !
पुस्तक वाचायला आवडेल कि नाही माहीत नाही पण हा लेख नक्कीच आवडला.
धन्यवाद !

सस्नेह's picture

25 Apr 2016 - 3:42 pm | सस्नेह

सिनकरांची बरीचशी पुस्तके वाचली आहेत पण हे नाही वाचलं. आता मिळवून वाचणार.

कविता१९७८'s picture

25 Apr 2016 - 3:49 pm | कविता१९७८

मस्त लेख

सविता००१'s picture

25 Apr 2016 - 4:06 pm | सविता००१

खूप पुस्तकं वाचली आहेत. पण हे मात्र नाही वाचलं अजून.
लेखकामागे दडलेला माणूस म्हणून सिनकर कसे होते हे फार छान कळतंय या लेखातून.
फर्मास जमलाय

नूतन सावंत's picture

25 Apr 2016 - 4:45 pm | नूतन सावंत

सिनकरांची सर्व पुस्तके वाचली आहेत,कथाकथन ऐकले आहे.अहोजाहोचे उपचार नावडते असलेल्या लेखक सिनकरांना,माझ्यापेक्षा मोठा असूनही "ए श्रीकांत" असे संबोधलेही आहे.खूप आठवणी जाग्या झाल्या तुझा हा सुरेख लेख वाचून.
माझ्या वडिलांना तो पपाच म्हणे.त्यांच्या वर्तमानपत्राच्या स्टॉलवर येऊन त्याचे लेखन छापून आलेय का ते पहात असे.मग त्याच्या प्रती विकत घेऊन त्या कोणाकोणाला वाटत असे.त्या वेळी त्याचे लेखन नवशक्तीत छापून येत असे.मलाही एक दोन वेळा अशी प्रत मिळाली होती.इतकं भारी वाटायचं ना.माझे पपा त्याला नेहमी लग्न करून सेटल व्हायचा आग्रह करायचे . त्याच्या लग्नालाही पपांना आमंत्रण होते.आता पपाही नाहीत नि श्रीकांतही नाही.
तुझ्या लेखामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला,त्याबद्दल धन्स.

बोका-ए-आझम's picture

25 Apr 2016 - 6:13 pm | बोका-ए-आझम

पोलिसकथा लिहिणारा लेखक म्हणून होता. पण हे वाचून तो कसला कलंदर अवलिया होता ते समजलं. पुस्तक परिचय मस्तच!

छान लिहिलंय. एकापरीने लेखकाची काळी बाजूच.

नरेश माने's picture

26 Apr 2016 - 11:24 am | नरेश माने

सुंदर पुस्तक परिचय. आता हे पुस्तक वाचावेच लागेल.

Mrunalini's picture

26 Apr 2016 - 5:46 pm | Mrunalini

मस्त लिहले आहे.

कलंत्री's picture

26 Apr 2016 - 5:53 pm | कलंत्री

खरेच अतिशय सुंदर असा परिचय,,मी १८ / १९ वर्षाचा असताना हे पुस्तक अतिशय आवडले होते.

यशोधरा's picture

27 Apr 2016 - 3:37 am | यशोधरा

सुरेख लिहिलेय. हे पुस्तक मिळते का अजूनही?

स्पार्टाकस's picture

27 Apr 2016 - 8:27 pm | स्पार्टाकस

सर्वांचे मनापासून आभार!

यशोधरा,
पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि डिजीटल आवृत्ती इथे उपलब्ध आहे
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5593288506368410356?BookNa...

यशोधरा's picture

27 Apr 2016 - 11:05 pm | यशोधरा

धन्यवाद स्पार्टाकस!

इडली डोसा's picture

27 Apr 2016 - 9:13 pm | इडली डोसा

श्रिकांत सिनकर खूप प्रभावीपणे दाखवला आहे तुम्ही लेखात.
त्याच्याबद्दल जाणुन घेण्यासाठी हा गोषवाराचं पुरेसा आहे त्यामुळे पुस्तक वाचण्याची गरज नाही वाटतं.

मोहनराव's picture

27 Apr 2016 - 9:25 pm | मोहनराव

खुपच छान परिचय.

हे सर्व त्यांच्याबाबतीतल माहीत नव्हत.
बर्ट्रांड रसेल च आत्मचरीत्र असच आरपार आहे.
आणि एक आठवले खुप आठवले तुमच्या या वाक्यावरुन

मटका खेळणं, हातभट्टीची दारू पिणं, स्वतः हातभट्टी लावणं, अघोरी प्रमाणात सिगारेट ओढणं आणि दारु पिणं, पोरी फिरवणं आणि उपभोगणं, रंडीबाजी करणं यासाठी गट्स लागतातच, पण त्यापेक्षाही आपण हे सर्व केलं याची कोणत्याही सामाजिक चौकटीची तमा न बाळगता छातीठोकपणे सांगणं याला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं गट्स लागतात!
आपले ना.सी.फडके आठवले त्यांच साहित्यीक कर्तुत्व तर असामान्य आहेच गगनाला गवसणी वगैरे घालणार..... मनात कोवळी पालवी फुलवणारं.....................
मनाला बॅडमिंटन च फुल (शटल नव्हे हो) फुल बनवणार
तर ना.सी. फडके आपल्या एका संबंधाचे विस्तृत वर्णन करतात कुठल्या हॉटेलात मी तिला घेऊन जायचो आम्ही कस एन्जॉय करायचो इ. इ.
नंतर ते एक महावाक्याने शेवट करतात
मी सर्व प्रकारचा षौक केला
मात्र षौका ला साहीत्य रुप दिलं.
टाळ्या टाळ्या
अवघा आसमंंत टाळ्यांच्य कडकडाटाने फाटुन गेला फडक्यांनी आसमंताला फाडुन
साहीत्याची नविन व्याख्या जगाला दिली
षौक करो लेकीन उसे साहीत्य का रुप दो
सिनकरांनी षौक केला त्याला साहीत्यरुप दिल
फडकेंचा साहीत्य वंश रोशन केला.

पिशी अबोली's picture

12 May 2016 - 1:24 pm | पिशी अबोली

लेख आवडला. पुस्तक वाचणार नाही. आत्ता झेपेल असं वाटत नाही. :)

चाणक्य's picture

12 May 2016 - 5:20 pm | चाणक्य

वाचेन मिळवून. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar's picture

27 Apr 2021 - 11:46 am | Nitin Palkar

उत्कृष्ट पुस्तक परिचय/समीक्षण.
_/\_

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Sep 2022 - 10:02 pm | भ ट क्या खे ड वा ला

पोलिस तपास कथा फार छान लिहायचे .
आवडता लेखक.परवा एकाशी बोलताना त्यांचा उल्लेख आला बोलण्यात .
नेटवर पुस्तके पाहताना हा लेख आला समोर .
फार छान लिहिलय तुम्ही .
माझे भाग्य चांगले एकदा भेट झाली होती या अवलियाशी १९८१/८२ मध्ये.

मी देखील त्यांना १९८१ साली भेटलोय.

मुक्त विहारि's picture

1 Oct 2022 - 8:10 am | मुक्त विहारि

जबरदस्त