देशोदेशीची वाद्येः रोमानिया

विजय पुरोहित's picture
विजय पुरोहित in जनातलं, मनातलं
3 Apr 2016 - 6:12 pm

यापूर्वी ‘काही अपरिचित वाद्ये’ या छोटेखानी लेखातून नेटवर भेटलेल्या काही अपरिचित तरीही नादमधुर संगीत वाद्यांचा अल्पस्वल्प परिचय करुन दिलेला होता. अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे नमूद केले. तसेच मिपावरील काही दिग्गज, जुन्याजाणत्या आयडींनी देखील लेख आवडल्याचे नमूद केले. त्यातूनच पुढे माझ्या मनात असा विचार आला की स्वतंत्र देशनिहाय किंवा विभागनिहाय जर असा संगीतवाद्यांचा आढावा घेतला तर ते जास्त उपयुक्त आणि कल्पक ठरेल.

तर त्याप्रमाणे आज सुरुवात करीत आहे ट्रान्सिल्व्हानिया या प्रदेशापासून. ड्रॅक्युला आणि वेयरवूल्फ तसेच रहस्यमयतेच्या धुक्यात लपेटलेले जिप्सी लोक यांच्यामुळे या प्रदेशाबद्दल प्रथमपासूनच आकर्षण होते. त्यामुळे कुठल्या प्रदेशापासून सुरुवात करावी म्हटले तर हाच प्रदेश एकदम सुचला.

रोमानिया हा एक युरोपियन प्रदेश असून येथे 90 टक्के रोमानियन वंशीय तर अन्य जर्मन, हंगेरीयन व जिप्सी वंशीय लोकसंख्या आहे. रोमानियाविषयी अधिक भौगोलिक, सांस्कृतिक माहिती विकीच्या या पेजवर मिळेलः

(https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...)

त्या त्या वाद्याशी संबंधित विकीपीडियावरील माहिती थोड्याफार प्रमाणात सोबत देत आहे. ते ते वाद्य कसे दिसते हे संबंधित यूट्यूब व्हीडीओत दिसेलच, त्यामुळे स्वतंत्र वर्णन करत बसण्याची गरज नाही. तसेच वाद्याचे मूळ इंग्रजी स्पेलींग मुद्दाम दिलेले आहे जेणेकरुन तुम्हाला तो कीवर्ड वापरून यूट्यूबवरील इतर व्हीडीओदेखील पाहता येतील. ऐकताना हेडफोन वापरले तर जास्त चांगले!आपल्याला काही अधिक माहिती असेल तर ती पण ऍड करा.

1) Fluier – आपल्याकडील बासरीसारखे लाकडी पण खालील बाजुला निमुळते होत गेलेले वाद्य. खालील व्हीडीओ पाहात पाहात गाणे ऐका. त्या बासरीच्या सुरांबरोबर तुम्हीदेखील त्या निसर्गरम्य प्रदेशात गेल्याचा भास होईल तुम्हाला. निसर्गाचा वरदहस्त आहे अगदी त्या प्रदेशावर. या व्हीडीओत वाद्य दिसत नाहीये. पण ऐकलेल्या सर्व व्हीडीओत हाच उत्तम वाटला. असो.

2) Caval – एक लांबलचक लाकडी बासरी, सॉफ्ट आणि गहन गंभीर ध्वनी असलेली. याच बासरीपासून अरेबिक कव्वाल (संगीतकार) हा शब्द आला असे मानले जाते. रोमानियाच्या ग्रामीण भागातील गुराखी / मेंढपाळ गुरे चारता चारता अशा बास-या वाजवून आपली करमणूक करतात. हे वाद्य मूळचे तुर्कांनी या प्रदेशात आणलेले आहे असाही एक मतप्रवाह आहे. खालील व्हीडीओ नीट पाहिला तर लक्षात येईल की बासरी आपल्याकडील अलगुजसारखी फुंकण्यास सोपी नाही. खालील व्हीडीओ ऐका. अगदी मस्त वाजवलंय. एका गंभीर वातावरणात तुम्ही हरवून जाल.

3) Tilinca – साधारण 2 ते 3 फूट लांब, दोन्ही बाजूंनी मोकळी बासरी. या बासरीला finger holes नसतात. हाताच्या बोटांनी बासरीचे टोक उघडे करुन किंवा बंद करुन तोंडाशी विशिष्ट तिरक्या कोनात धरुन ही बासरी वाजवली जाते. उत्तर ट्रान्सिल्व्हानिया मध्ये हा प्रकार जास्त प्रसिद्ध आहे. व्हीडीओ पहा. अगदी ठेका धरायला लावणारे गाणे आहे.

4) Nai / Panpipes – हे वाद्य जगभर आढळून येते. रोमानिया मध्ये ते रोमन काळापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. Nai हे नाव ऑटोमन तुर्कांकडून आले असावे असा कयास आहे. 20 शतकात रोमानियन पॅनपाईपचे अगदी कमी जाणकार उपलब्ध आहेत. खालील व्हीडीओत एक कलाकार स्थानिक विवाहप्रसंगी हे वाद्य वाजवीत आहे. अगदी क्लास वाजवलेय पठ्ठ्याने!

5) Bucium – साधारण 2 ते 3 मीटर लांबीचे उत्तम दर्जाच्या मेपल किंवा हॅझल लाकडापासून बनवलेले आपल्याकडील सनई सारखे एक वाद्य. याला बासरीप्रमाणे फिंगरहोल्स नसतात. जास्त करुन स्त्रियाचे हे वाद्य वाजवतात. अशा वाद्यांवर सप्तक कसे वाजवले जाऊ शकते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. मेंढपाळ समुदायात हे वाद्य प्रामुख्याने मेंढरांना सकाळी बाहेर पडण्याचा तसेच संध्याकाळी घरी येण्याचा इषारा द्यायला जास्त वापरले जाते. अतिशय दुर्गम डोंगराळ भागात गावांच्या दरम्यान संदेश द्यायला देखील हे वाद्य वापरले जाते. आपल्याकडील तुतारीची बहीणच म्हणा. इतके साधे ओबडधोबड वाद्य पण येथे अतिशय कुशलतेने वाजवले आहे.

6) Ocarina – अखाद्या पंख मिटून बसलेल्या फुलपाखरासारखे दिसणारे हे वाद्य पूर्वी मातीपासून बनवत. छोटे असले तरी वाजते तितकेच अप्रतिम. याची सुरुवात 18 व्या शतकात इटालीत झाली. पण पहिल्या महायुद्धानंतर हे रोमानियात फार लोकप्रिय झाले. आणि आता तेथील संगीताचा अविभाज्य भाग बनले आहे.

7) Cimpoi – सर्व युरोपात प्रसिद्ध असलेले बॅगपाईप. रोमानियन दरबारात देखील अगदी प्रसिद्ध असणारे. याचा ध्वनी आपल्या सनईप्रमाणे मंगलकार्याची आठवण करुन देणारा वाटतो. तुर्की प्रभावानंतर या वाद्याच्या महत्तेला ग्रहण लागले. आज फार कमी लोक हे वाद्य वाजवतात.

8) Taragot – 19 व्या शतकात निर्माण झालेले आपल्याकडील सनईसारखे वाद्य. पण ध्वनी येतो मात्र सॅक्सोफोनसारखा. रॉयल हंगेरीयन मिलीटरीत काम करणा-या ल्युतो योव्हितो याने हे वाद्य पहिल्या महायुद्धानंतर रोमानियात लोकप्रिय केले. हा व्हीडीओ ऐका. अगदी छान ठेक्यावर वाजवले आहे. एका हातात रेड वाईनचा ग्लास घेऊन प्रेयसीसोबत नाचणारे तरुण लोक डोळ्यासमोर उभे राहतात.

9) Violine – व्हायोलिनसारखी वाद्ये येथे पूर्वीही अस्तित्वात होती. आधुनिक व्हायोलिनचा येथे प्रवेश तसा उशिराच 18व्या शतकात झाला. व्हायोलिन आपल्या ब-यापैकी परिचयाचे आहे. पण येथे जिप्सी पद्धतीचे व्हायोलिन अतिशय उत्तम वाजवले आहे. अगदी जरुर ऐका. ही स्टाईल युरोपिय व्हायोलिनपेक्षा वेगळी आहे.

10) Cobza – तंतुवाद्ये युरोपमध्ये फार उशिरा प्रचलित झाली. रोमानियातील सर्वात प्रसिद्ध तंतुवाद्य cobza हे जिप्सींच्याकडून प्रचलित झाले असावे. याचा ध्वनी सॉफ्ट असतो. Neck अगदी छोटी असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा आहेत आणि आता अल्प प्रमाणातच वापरले जाते. येथे एक व्हीडीओ दिलेला आहे. ध्वनीचा दर्जा फारसा चांगला नाही पण जे संगीत आहे, बासरी, डफ आणि कॉब्जा यांच्या हार्मनीने निर्माण झालेले, ते अनेकवेळा ऐकण्यासारखे नक्कीच आहे. रेकॉर्डिंगच्या दर्जाकडे दुर्लक्ष करुन ऐकाच. हार्मनी अप्रतिम आनंद देणारी आहे.

अजून एक चांगल्या रेकॉर्डींगचा व्हीडीओ देतो, ज्यात या वाद्याच्या timber विषयी स्पष्ट कल्पना येईल. अतिशय झकास वाजवले आहे इथेही.

11) Tambal – आपल्याकडील संतूरसारखे वाद्य. 11 व्या शतकात युरोपात प्रवेश केलेल हे वाद्य अनेक बदलांतून गेलेले आहे. काही भागात या वाद्याला गंमतीने ‘खाटकाचा ठोकळा’ म्हटले जाते, ते हॅमरने वार करुन तारा वाजवल्यामुळे. बराचसा पियानोसारखा आवाज येतो. कदाचित त्याचे कारण संतूरसारख्या नाजुक काड्या वापरण्याऐवजी जाडजूड हॅमर वापरल्यामुळे असेल.
येथे ब-याच शोधाने एक चांगल्यापैकी मिळालेला व्हीडीओ आहे. ऐकायला अगदी पियानोच वाटते. एकतर अगदी सूक्ष्म तारा आणि तो कलाकार इतक्या जलद गतीने वाद्य वाजवत आहे की पाहून आश्चर्य वाटते.

संगीत

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2016 - 7:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा मांत्रिकबुवा. छान माहिती. व्हिडीओ एंबेड करुन टाका राव.

विजय पुरोहित's picture

3 Apr 2016 - 7:11 pm | विजय पुरोहित

दोन वेळा प्रयत्न कला पण एम्बेड झालेच नाहीत. हे असं खराब दिसतंय पण काय करणार?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2016 - 7:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वेळ मिळाला की करुन देतो. आत्ता मोबाईलवर आहे.

विजय पुरोहित's picture

3 Apr 2016 - 7:15 pm | विजय पुरोहित

धन्यवाद कप्तानराव...

बोका-ए-आझम's picture

3 Apr 2016 - 8:03 pm | बोका-ए-आझम

फारच छान!

सुरेख. छान उपक्रम विजयजी.

शुभेच्छा.

DEADPOOL's picture

3 Apr 2016 - 8:16 pm | DEADPOOL

छान लेख विजय सर!

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2016 - 8:46 am | श्रीरंग_जोशी

माहितीपूर्ण लेखन. निवांतपणे ध्वनिफितींचा आस्वाद घेणे अजून बाकी आहे.

शक्य झाल्यास आयरिश वाद्यांवरही लिहावे ही विनंती.

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 8:50 am | यशोधरा

लेख आवडला.

विजय पुरोहित's picture

5 Apr 2016 - 9:24 am | विजय पुरोहित

सर्व प्रतिसादक वाचक धन्यवाद.
रंगाण्णा नक्कीच!

वेल्लाभट's picture

5 Apr 2016 - 10:43 am | वेल्लाभट

क्लास ! जबरदस्त....
जाम म्हणजे जाम आवडलाय धागाविषय. अजून येऊदे.