कोल्लापुरी जोमात न इंग्लीस कोमात (मराठी भाषा दिन २०१६ -कोल्हापुरी )

सस्नेह's picture
सस्नेह in लेखमाला
22 Feb 2016 - 9:52 pm

सकाळचं आट वाजलं तसं कौशीनं च्याचं आदान ग्यासवर चढीवलं . मारत्या रातपाळी करून याची वेळ झाल्याली. आदनात च्या-साकर घालताना, मारत्या आल्यावर मनातला ब्येत तेच्या डोस्कीत कसा उतरवायचा हेचा ती इचार कराय लागली. आंगुळीचं पानी न्हाणीत ठेवायला ती आत गेली तवर मारत्या कवा डूटीवरनं यून हातरुनात गडप झाला त्ये तिला समजलंच न्हाई. सज नजर भिताडाकडं ग्येली तर मोळ्याला प्यांट आडिकल्याली. बघतीया तर मारत्या खालवर कांबळं घ्यून घोराय लागलाता.
मौ कवळा आवाज काडून कौशीनं हाळी दिली,
'आवं..'
'घुर्रर्र..!'
'आईकतासा न्हवं... '
'घुर्रर्र..ठिस्स !'
'आत्ता ! माज्या जीवाला हितं घोर लागलाय आन तुमी घोरायलायसा ? उटा उटा !' कौशी चं डोस्कं फिरलं.
'खुर्र फटाक ..!' मारत्या निस्ता ह्या अंगावरचा त्या अंगावर.
'आरं मुडद्या. आता उटतोस का घालू साळुता डोस्क्यात ?'
हे आईकल्यावर मातर मारत्याची झोप, पाठीत साळुता बसलेल्या चिचुंद्रीगत पळाली. डोळे चोळत आन जांभया देत त्यो उठून बसला.
'आयला, काय बायकू हैस का भिताड ? मायला आत्ता रातपाळी करून आलोय न्हवं ? जरा लवंडलो तवर काय तुझं तिरकाट ?'
'झोप दोडा तू रातदिस ! आन नशीबबी झोपू दे माजं !'कौशी खरंच कावलीया हे मारत्याच्या धेनात आलं.
'आता काय झालं तुज्या नशिबाला ? घटकाभर थंड बसायला काय हुतंय तेला, म्हनतो मी ?'
'आवं, त्या गोंद्यानं निस्तं दिसभर काम करून ग्याल्याक्षी घेतला नवीन ! आन तुमी बसलाय मोकळंच, रातपाळी करून !'
'आगं, तेची कमळीबी जाती न्हवं कामाला बेकरीत ! डब्बल इंजिन हाय तेचं !'
'आन मग तुमचं काय हाप इंजिन हाय व्हय ? मीबी जाते कि कामाला कुटंतरी !' आता कौशीला प्वाइंट बरोब्बर सापडला !
'कुटं ? त्या बाबूरावाच्या बेकरीत ? नको बा ! त्ये बाब्या सुक्काळीचं लई भिकारचोट अवलादीचं हाय ! तरण्या तरण्या बायका बघून भट्टीफुडं पाव भाजायला रातपाळीला बलीवतोय. तू अजाबात जायचं न्हाईस तितं, सांगून ठेवतो.'
'आवं, बेकरीत न्हाई, पन पलीकडच्या गल्लीत शिदनाळ्याच्या खानावळीत कामाला येक बाई पायजे आसं रावजी शिदनाळ्या सांगत हुता काल...'
'ये कौशे, तू हाटेलात वाढप्याच्या कामाला गेलीस तर तंगडं तोडून गळ्यात बांधीन तुज्या, धेनात ठेव ! तेज्यायला सगळी पिंडकीच आसत्यात रातच्याला खानावळीत जेवायला. मागनं कायतर लडतर नको !' मारत्या तरबत्तर झाला.
'आवं, वाढप्याचं न्हवं, म्याणेजरचं काम हाय !'
'म्याणेजरचं ? म्हंजे ?'
'निस्तं आरडर घ्याची आन भटारखान्यात सांगायची आनि गिराईकाचा हिशेब करून बिलं वाढप्या पोराच्या हातात दयाची, येवडंच काम ! रोज चं चार तास काम आन आटवड्याला चारशे रुपय पगार ! म्हंजे म्हैना सोळाशे श्यालरी !'
कौशी पाचवी शिकल्याली आसल्यामुळं तिला आदनं मदनं इंग्लीस बोलायची हौस यायची.
यावर मारत्या आणि कौशीचं जरा चंगूमंगू होऊन अखेरीस न्हेमीपरमाणे कौशीची सरशी झाली आन शिदनाळ्याच्या खानावळीतली तिची म्याणेजरकी फायनल झाली.
दुसऱ्या दिवसापास्नं कौशी शिदनाळ्याच्या खानावळीतल्या म्याणेजरच्या खुर्चीत बसून आपल्या, होम थेटरसारक्या खणखणीत आवाजात 'आरडरी' घ्यू आन द्यू लागली.
'सात नंबरला तीन मटनताटं...'
'चार नंबरला दोन पिलेट खिमा-पाव'
'बारा नंबर, चार कडक भाकरी '
आरडरी आन बिलाची झकाझकी मिटली म्हनून रावजी शिदनाळ्या निवांत गल्ल्यावर बसून डुलू लागला.
ताटात भाजीबरुबर रोजचं खानावळीतलं येखादं अंडं नायतर मुंडी रस्सा , कधी माशाचा तुकडा आसं कायबाय पडू लागलं आनी मारत्या गडी खुशालला. पन पंधरा दिवस गेल्यावर राती झोपेतबी कौशी 'पाच नंबर, दोन अंडा मसाला' आसं जाबडायला लागली तसा त्यो लई कावला.
'आयला, ताटात वाढती मटणाची नळी खरं, झोप माजी हराम झाली ! xxxx ये कौशे, बास झालं, दुसरीकडं डूटी बघू म्हनं !'
पन कौशीची गाडी जोरात सुटल्याली. ती काय ऐकती व्हय ?
चार पैसे हातात पडाय लागल्यावर तिचं इंग्लीसबी उड्या माराय लागलं. एक दिवशी खानावळीत सफारीवालं व्हीआयपी गिराईक आलं. त्यास्नी मटन-भाकरी खायाची लै हौस. कौशी सायबापशी येऊन आरडर घ्याय लागली.
'येक मटन ताट, मुंडी रस्सा, पांढरा रस्सा , आनी भाकरी'
'भाकरी मौ का कडक, सायेब ?'
'मिडीयम कडक.' सफारीवाला डुलत बोलला.
कौशी म्याणेजरच्या खुर्चीत येऊन बसली आन भटारखान्याकडं तोंड करून खच्चून वरडली,
'दोन नंबरला सायबास्नी मटन मुंडी रस्सा पांडरा रस्सा आन येक म्याडम कडक !'
'म्याडम कडक ' आयकून सायबाची निम्मी उतरली आनी शिदनाळ्याला फेफरं आलं !
सायेब जेवून गेल्यावर रावज्यानं कौशीचा धुरळा काढला , तसं कौशीचं डोस्कं फिरलं. तिनं खानावळीला रामराम ठोकला. मारत्या जरा खुल्लाट झाला.
पन कौशीची ग्याल्याक्षीची हौस अजून भागली न्हवती.
चार दिवस मोकळं गेल्यावर तिला नायकुड्याच्या हास्पिटलात शिस्टरची नोकरी लागली. हास्पिटलात जाऊन जाऊन कौशीचं इंग्लीसबी टाॅनीक पिल्यागत बाळसं धराय लागलं . आटच दिवसांत मारत्याला येता जाता 'ओपीडी', 'आडमिट', 'येनिमा' आनी 'आयव्ही'ची इंजेक्शनं फुकटात मिळाय लागली.
एक दिवशी नायकुडीणबाई कौशीला म्हणल्या,
'कौशी, डॉक्टरसायबांना म्हणावं, सात नंबरच्या सुभानरावांचं अर्जंट ग्यांग्रीनचं ऑपरेशन करायचंय, ताबडतोब ऑपरेशन रूममध्ये या म्हणून सांग.'
'जी म्याडम'
अर्जंट ऑपरेशन म्हटल्यावर कौशी पळतच वॉर्डात गेली. नायकुडे डॉक्टरसाहेब पेशंट तपासत हुते.
'डॉक्टरसायेब, म्याडमनी आरजंट बलीवलंय...'
'काय झालं ?'
'सात नंबरच्या सुभानरावाचं आरजंट सिझरीन करायचं हाय !'
डॉक्टरसाहेब टाणकन उडाले आनी आजूबाजूचे पेशंटबी इवळायचं इसरून खो खो हसाय लागले , तरी कौशीला इंग्लीसची मिष्टेक काय कळंना !
'सिझरीन' झाल्याला सुभानराव डिस्चार्ज घ्यून घरला गेल्यावर सुन्द्रा शिस्टरनं कौशीला येका बाजूला घेतलं आनी म्हनली, 'शानी का खुळी तू, आगं, , सिझरीन फक्त बायकांचंच हुतं !'
'आत्ता ! आन मग म्याडम मला आसं का म्हनल्या ?'
म्हैनाभर हास्पिटलात पेशंटांची उसाभर करून झाल्यावर आनी इंग्लीसचा बुकना पाडून झाल्यावर कौशीच्या कमरंचा काटा ढिल्ला झाला.
आशात येक दिवस आपिंडिसचा पेशंट म्हनून नारबातात्या आडमिट झाला. आता नारबातात्या म्हंजे कौशीच्या चुलत्याच्या सुनंच्या मावळनीचा इवाई म्हंजे आगदी जवळचाच सोयरा की !
तर नारबातात्या कौशीला म्हणला,
'आगं ये कौशे, हितं दवाखान्यात काय म्हनून डबरं पाडत बसलीयास ? उगं आपलं आंग खरवडून बुक्का किती पाडायचा म्हनतो मी !'
'मग काय करू, तात्या ? तेवडाच आपला परपंचाला हातभार, रे.'
'आन मग आमच्या लांडे-पाटलाच्या कॉलिजात का येत न्हाईस, शिपाई म्हनून ?'
'कालिजात ?'
'हां. माप चार जागा हाईत मोकळ्या. निस्तं धा ते चार काम आनी शनवार आईतवार सुट्टी !'
'आनी पगार रे किती ?'
'पगार चार हजार म्हैना !'
'आरं, चल की मग ! येवडी शिप्ट सपली की येतो बग तुज्याकड, जाऊ आपुन '
आनी हास्पिटलाला फाट्याव मारून कौशी लांडे पाटलाच्या कॉलिजात शिपाई म्हनून हजर झाली.
कॉलिजात जाऊन कौशीच्या इंग्लीसला आनीच जरा धार चढली. मारत्याला सांज-सकाळ फुकट इंग्लीसचा रतीब सुरु झाला. लेकचर काय, रजिष्टर काय, ल्याबररी काय आनी मष्टर काय, काय इचारू नका.
आसं म्हैनाभर बरं चाललं . आन मग येका सोमवारी कौशीच्या इंग्लीसचा बार उडाला !
झालं काय, की येचोडी हळदीकर म्याडम कौशीला म्हणाल्या,
'कौशे, आगलावे सरांकडं जा, आणि त्यांच्या क्लासची एटीकेटीची लिस्ट घेऊन ये.'
कौशी लगालगा स्टाफरुमात गेली. आगलावे सर पेपर तपासत बसले हुते.
'सर, सर हळदीकर म्याडमनी तुमची लिष्ट मागितलीया.'
'कसली लिस्ट, कौसाबाई ?'
'आवो सर , तुमच्या पेटीकोटची लिष्ट !'
आगलावे सरांनी दचकून आजूबाजूला बगितलं. नशिबानं सगळे सर आनी म्याडम तासावर गेले हुते.
'कौशे, काय गांजा बिन्जा वडतीस का काय ? '
'मी ? आन गांजा ? कोण फुकनीचा म्हनीतो मी गांजा वडते म्हनून ?'
आसा दोगांचा झिम्मा सुरु झाला तवर पलीकडल्या ल्याबररीतनं नारबा तात्या तिथं आला आनी सगळं आईकल्यावर त्यो म्हनाला,
'आवं सर, तुमी म्याडमास्नीच इचारा की कसली लिष्ट पायजे ते !'
मग आगलावे सरांनी इंटरकॉम उचलून हळदीकर म्याडमकडून खुलासा करून घेतल्यावर सगळ्यांची डोस्की जाग्यावर आली !
दिसभर कॉलिजात काम करून घरात आल्यावर जेवान करायचं, पानी भरायचं, गावाच्या चवकशा करायच्या आनी गल्लीतल्या साळकाया माळकाया गोळा करून कॉलिजातल्या मज्जा सांगायच्या, ह्या कौशीच्या उद्येगात मारत्याच्या पोटात येळेला च्या-पानी जेवन पडंना झालं, आनी एक दिवस त्येच्या चक्कीत लैच जाळ झाला.
'ये कौशे, ह्यो तुज्या कॉलिजचा गुळमाट च्या झेपत नाय मला ! सोड बगू ती शिपाईगिरी. उगं आपलं कोंबडं म्हनून कुत्र्याची पिसं उपडायची म्हंजी काय ? सगळ्या परपंचाचा इस्कुट बाजार निस्ता ! गपगुमान बाराच्या टायमाला घरात ऱ्हाउन मला जेवाय वाडाय याला पायजे, असली नोकरी बग म्हनं !'
'आरं वाद्या, तुज्या जेवनापायी माजा ग्याल्याक्षी सोडू व्हय ?'
'आगं ग्याल्याक्षी सोड कुटं म्हन्तोय मी ? हाय ही नोकरी सोड आनी दुसरी हुडीक !'
'आता ती काय उंडारल्याली कोंबडी हाय व्हय, हुडकायला ? '
तवर कबाड्याचं किशा मारत्याला आढळायला आलं. दोगांचा दंगा आयकून त्यो म्हणला,
'ये मारत्या, आसाच ऊट आन आन्ना कित्तुऱ्याकडं जा !'
'ते कशाला ?'
'आरं, त्यो नगर्शेवक हाय न्हवं ? मुन्शीपाल्टीच्या सफाई खात्यात मुकादम भरती चाललीया. आन्नाच्या वशिल्यानं चाटदिशी मुन्शीपाल्टीत चिकटंल कौसावैनी ! काय न्हाय, निस्तं सकाळी सातला जायाचं आन धाला परत. पुन्ना सांजच्याला चारला हाजरी द्याची आन याचं . खल्लास !'
'आनी पगार रे ?'
'आरे साव्वा वेतन आयोग हाय मुन्शीपाल्टीत, हैस कुटं ?'
'म्हंजे ?'
'पगार म्हैन्याला धा हजार !'
कौशी आनी मारत्याचं डोळंच फिरलं !
'आयला खरं सांगतुईस का आंबं पाडतुईस ?'
'तुज्या गळयाशप्पत ! '
'लेका, आदीच बोल्ला आसतास तर इदुळनं कौशीच्या हातात ग्याल्याक्षी खेळला असता की !'
झालं ! कौशीनं कॉलिजाचापन काडीमोड घेतला आनी आन्नाच्या किरपेनं ती मुन्शीपाल्टीत चिकटली. मुकादमगिरी तिला चांगलीच मानवली. झाडूवाल्या माम्या आनी मावश्या तिचं इंग्लीस-विंगलीस सांज-सकाळ कवतिकानं आयकू लागल्या. मारत्याच्या ताटात येळेला भाकरी भाजी पडाय लागली आनी चार म्हैन्यात कौशीच्या कमरंला शामसंग ग्याल्याक्षी लटकाय लागला.
सा म्हैनं झालं आनी कित्तुरे आन्नाच्या मर्जीनं कौशी पर्मनंटबी झाली.
मग येक दिवशी किशा येरवाळीच आला आन मारत्याला म्हणला,
'काय कळळं न्हाय बा !'
'कशाचं काय कळळं न्हाय ?' मारत्याला काय कळंना.
'म्हंजे वैनी परमणण्ट झाल्या म्हनं, खरं आमाला काय कळळं न्हाय !'
'नीट बोलतोस का द्यू झटका, भाड्या ?'
'आरं, वैनी मुन्शीपाल्टीत परमणण्ट झाल्या , कुणाच्या किरपेनं ?'
'कुणाच्या म्हंजे ? आन्नासायबाच्या !'
'आन मग पार्टी कोण द्याची त्यास्नी ?'
'आस्स म्हन्तोस व्हय ?' आत्ता मारत्याची टूबलाईट पेटली.
'आरं द्यू की, हाय काय आन नाय काय ? येत्या शुक्क्कीरवारी जंगी पारटी करू.'
आन्ना कित्तुऱ्या , किशा आनी मुन्शीपाल्टीतली तेंची बगलबच्ची सगळ्यांना शुक्कीरवारी रातच्या जेवनाचं आवतन गेलं. पालव्याचं सुक्कं , खेकड्याचा रस्सा, आनी अंड्याचा गब्रा झालं तर कोंबडीची बीरयानी असा खत्रा बेत केला कौशीनं . सायेब मंडळी रंगा खुश झाली, आगदी सगळं जेवान सुपडा साफ !
जेवान आवरलं, पान-बिन खाऊन मंडळी निवांत भायेर पडाय लागली. जाता जाता येका बगलबच्च्यानं कौशीला गमतीत इचारलं,
'येवडी जंक्शान पारटी कशापाई वो केलासा कौसाबाय ?'
'कशापाई म्हंजे ? तुमच्या आन्ना मालकांनी मला प्रेगनंट केलं न्हवं का, मुन्शीपाल्टीत ?'
'काय म्हनताय काय ?' त्याचं डोळं पांढरं झालं !
आनी दुसरे दिवशी कित्तुरणीला कौशीचं इंग्लीस विंगलीस समजून देता देता कबाड्याच्या किशाची केसं पांढरी झाली !!

प्रतिक्रिया

भीडस्त's picture

26 Feb 2016 - 3:49 pm | भीडस्त

नाद खुळा नाद खुळा नाद खुळा
नाद खुळा
नाद खुळा नाद खुळा नाद खुळा
नाद खुळा कौशीचा आम्च्या नाद खुळा

असंका's picture

26 Feb 2016 - 6:00 pm | असंका

कंप्लिट धुरळाच!

अनन्न्या's picture

26 Feb 2016 - 6:37 pm | अनन्न्या

वाचता येत नाही पटापट पण भाषेचा गोडवा चान उतरलाय!

मितभाषी's picture

26 Feb 2016 - 6:39 pm | मितभाषी

जाळंधूर संगच.

जव्हेरगंज's picture

26 Feb 2016 - 6:58 pm | जव्हेरगंज

कडक आणि गरमागरम !!!

Maharani's picture

26 Feb 2016 - 6:58 pm | Maharani

Dhamal....dhumshan....

सुमीत भातखंडे's picture

26 Feb 2016 - 7:04 pm | सुमीत भातखंडे

एकदम भारी =))

सटक's picture

26 Feb 2016 - 7:21 pm | सटक

खंग्री!! येकच लंबर!!

वाचमन's picture

26 Feb 2016 - 8:18 pm | वाचमन

नाद खुळा

विवेकपटाईत's picture

26 Feb 2016 - 8:22 pm | विवेकपटाईत

धम्मालच.

विशाखा राऊत's picture

26 Feb 2016 - 8:26 pm | विशाखा राऊत

खतरा...

जेपी's picture

26 Feb 2016 - 9:18 pm | जेपी

लै भारी =))

राघवेंद्र's picture

26 Feb 2016 - 9:20 pm | राघवेंद्र

लय भारी!!!

पाषाणभेद's picture

26 Feb 2016 - 9:37 pm | पाषाणभेद

एक नंबर
नाद खुळा
काटा किर्‍र्र्र
खटक्याव बोट जाग्याव पल्टी.. घोडे फरार

पाषाणभेद's picture

26 Feb 2016 - 9:39 pm | पाषाणभेद

नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!

संजय पाटिल's picture

28 Feb 2016 - 12:20 pm | संजय पाटिल

हे कुणाला कळ्लं असेल असे वाटत नाही.. त्या साठी कोल्हापुर्करच पहिजेत..
बाकी ..मौ, कवळा आवाज.. भारीये.

पीके's picture

29 Feb 2016 - 12:28 am | पीके

मला कळलं..

अन्या दातार's picture

29 Feb 2016 - 10:33 am | अन्या दातार

नाम्या नव्हे, दाम्या तो.

"दाम्या, बघतोस काय, घाल गोळी" असे ते फेमस वाक्य होते.

पीके's picture

29 Feb 2016 - 6:07 pm | पीके

बरोबर...

राजो's picture

1 Mar 2016 - 7:37 pm | राजो

झेंडे बाई का ??

मुक्त विहारि's picture

26 Feb 2016 - 10:42 pm | मुक्त विहारि

नेहमीप्रमाणे एकदम खूसखूशीत लेख.

मितभाषी's picture

26 Feb 2016 - 11:06 pm | मितभाषी

एका साहेबाच्या निरोप समारंभात त्यान्च्या एक कलिग भाषण करताना म्हणाल्या होत्या ' साहेबांच्या हाताखाली काम करताना दिवस कसे गेले तेच समजले नाही '. ;)

स्वाती दिनेश's picture

27 Feb 2016 - 12:04 am | स्वाती दिनेश

धमाल..
मजा आली वाचताना..
स्वाती

बहुगुणी's picture

27 Feb 2016 - 12:35 am | बहुगुणी

स्नेहांकिताताईंना मिपाच्या विनोद-सम्राज्ञी (humorist ) म्हणून किताब जाहीर केला जावा असं सुचवतो!

भारी लिवलया बर्र का स्णेहातै!

इडली डोसा's picture

27 Feb 2016 - 10:03 am | इडली डोसा

स्नेहातैंची कौशी लैचं वांड हाय =)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2016 - 11:28 am | ज्ञानोबाचे पैजार

हाण तेज्यायला, काय भारी लिवलय.
पैजारबुवा

तुमचं कोल्लापुरी विंग्लिश आमच्या पुणेरी इंग्रजीच्या वरताण हो ... :)
कोल्लापुरी -- लैच भारी .

निशदे's picture

27 Feb 2016 - 11:22 pm | निशदे

प्रचंड हसलोय...... झक्कास एकदम.

भिंगरी's picture

28 Feb 2016 - 10:05 pm | भिंगरी

स्नेहाताई,एकदम झकास!!!

कथेला भरभरून दाद दिल्याबद्दल ! पुष्कळांनी अगदी याच बोलीत प्रतिसादही दिलेत ! कोल्हापुरी बोली इतकी लोकप्रिय असेल असे वाटले नव्हते :)
वर अनन्या ने म्हटलंय की ही बोली गोड लागते. खरं तर कोल्हापुरी ही ‘गोड’ आहे का ही शंकाच आहे. कारण रांगड्या मराठीचा ‘तिकाट’ झटका म्हणजे कोल्हापुरी. तरीही तिने असं म्हटलं हे ग्वाड लागलं :)
बहुगुणी यांनी देऊ केलेल्या किताबासाठी त्यांचे आभार. विनोदाबद्दल बोलायचं, तर काहीतरी टेन्शन देणारे लिहिण्यापेक्षा चार लोकांना हसवून विरंगुळा देणारे काहीतरी लिहिण्याकडे माझा कल असतो, सो असे काही दिसले तर नोंद करून ठेवते आणि संधी मिळेल तेव्हा लिहित असते.
पैसाताईने कथेला चपखल शीर्षक सुचवले, तिचे विशेष आभार !
आणि इथे लिहिण्यासाठी दंबूक दाखवल्याबद्दल अजयाचे पेश्शल आभार ! =))

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 2:52 pm | मुक्त विहारि

अस्सल मिपाकर "बंदूकीला, दंबूक" असे म्हणतो.

आमच्याच आगामी एका लेखातील अप्रकाशीत वाक्य.

सस्नेह's picture

29 Feb 2016 - 2:57 pm | सस्नेह

चुकीबद्दल येकडाव माफी असावी. दुरुस्ती केली आहे :)
रच्याकने, तैंनी बाँबसुद्धा दाखवला होता बर्का !!

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 3:19 pm | मुक्त विहारि

मी असाच गंमतीने म्हणालो...

"आम्ही गंमतीने लिहायला घाबरत नाही."

आतिवास's picture

29 Feb 2016 - 10:53 am | आतिवास

जगात भारी कोल्लापुरी!

अनुप ढेरे's picture

29 Feb 2016 - 10:57 am | अनुप ढेरे

जबरी!

अद्द्या's picture

29 Feb 2016 - 11:02 am | अद्द्या

हसतोय ओ नुसता .

तुफान झालीये कथा ..

=]]]]

इशा१२३'s picture

1 Mar 2016 - 6:11 pm | इशा१२३

दणकाच!प्रचंड हासतेय.
अप्रतिम झालीये कथा!

एक एकटा एकटाच's picture

2 Mar 2016 - 7:10 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

झिकल्लस की र भावा

सविता००१'s picture

3 Mar 2016 - 1:08 pm | सविता००१

धुरळा....
बेस्टच

स्नेहांकिता यांनी व्यनीतून त्यांच्या कथेतील स्वल्पअंश मराठी विकिपीडियातील कोल्हापुरी बोली लेखात उदाहरण म्हणून वापरण्यास अनुमती दिली त्या बद्दल त्यांचा आभारी आहेच. या कथेतील स्वल्पअंश तर लेखात उदाहरण वापरुयाच पण काही नाटक आणि चित्रपटातूनही कोल्हापुरी बोली आलेली असण्याची शक्यता वाटते,तुर्तास तरी आंतरजालावर असे डॉक्युमेंटेशन आढळत नाही. या निमीत्ताने नाटक, टिव्ही सिरिअल, आणि चित्रपटातील कोल्हापुरी बोली नोंद घेण्याच्या दृष्टीने जाणकारांनी माहिती दिल्यास मराठी विकिपीडिया लेखाच्या माध्यमातून ते डॉक्युमेंटेशन सुद्धा कदाचित झाले तर पाहुया.

कोल्हापुरी बोली जाणकारांच्या प्रतिसादांची प्रतिक्षा आहे धन्यवाद.

कोल्हापूरच्या लोकजिवनाची (काल आणि आज) अशा स्वरुपाची माहिती सुद्धा हवी आहे एखाद परिच्छेद जरी उपलब्ध झाला तरीही चालेल.

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2016 - 5:04 pm | श्री गावसेना प्रमुख
श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2016 - 5:05 pm | श्री गावसेना प्रमुख
चांदणे संदीप's picture

3 Mar 2016 - 7:45 pm | चांदणे संदीप

कस्ला खू स खू सी त!

:)

Sandy

नन्दु मुळे's picture

11 Mar 2016 - 3:14 pm | नन्दु मुळे

चक्कीत जाळ शेंडीत धूर.

समीरसूर's picture

11 Mar 2016 - 3:38 pm | समीरसूर

खूप मस्त!!! वाचून मज्जा आली. :-) बऱ्याच दिवसांनी अशी खुसखुशीत कथा वाचायला मिळाली.

एक नंबर!!!