मराठी दिनः बोलीभाषा सप्ताह समारोप

पैसा's picture
पैसा in लेखमाला
27 Feb 2016 - 7:00 am

नमस्कार करत्ये हो सर्वांना. आज मराठी भाषा दिन आहे ना, आपल्या कुसुमाग्रजांचा १०४ वा जन्मदिवस. त्या निमित्तान बोलीभाषा सप्ताह साजरा करूया अशी सूचना येताच सगळे साहित्य संपादक खुशीन कामास लागले. सप्ताहाचा धागा विणला तेवां मिपाकरांस ही कल्पना इतकी आवडेल आणि त्यांस इतका उदंड प्रतिसाद मिळेल असें वाटले न्हवते हो! पण हौसेनी असं कायतरी सुरू केलंनी तर मिपाकर कुणाला ऐकायचे नैत.

मिपाकरांनी अगदी भरभरून लेख, कथा, कविता आपाअपल्या बोलीभाषांतल्या लिहिलेनी, मग दर दिवशी दोन दोन प्रकाशित करूया असा विचार साहित्य संपादक मंडळीनी केलंनी. पुढे तं काय, मिपाकर कुठचे ऐकायला! आपणहून जास्त जास्तच लेख पाठवलेनी. म्हटले बेस झालें. बघता बघता, झाडी, वर्‍हाडी, मावळी, मालवणी, कोल्लापुरी, बाणकोटी, चित्पावनी, पद्ये, घिसाडी, शेष वंशी क्षत्रिय भंडारी, नगरी, खान्देशी, पुणेरी शहरी, पुणेरी ग्रामीण इतक्या सगळ्या बोलीभाषातले लिखाण आम्हास घरबसल्या वाचायस मिळालेंं. त्यासाठी सर्व लेखक वाचक मिपाकरांस पुष्कळ धन्यवाद!

पैकी चित्पावनी, पद्ये, घिसाडी या बोली आहेत हेच बहुतकरून कोणास ठाऊक नसेल. त्यांची कुठे फार नोंदही नसेल. हा बोलीभाषा सप्ताह म्हंजे भाषांच्या अभ्यासकांना पर्वणीच म्हटली पायजे. इतक्या विविध बोली एकाच जागी वाचायस मिळणे म्हंजे अहो भाग्य! त्यातच कोंकणीची शिखवणी म्हंजे दुधात साखरच हो! हो, तो मधल्या आळीतला झंप्या जोशी मेला बोललाच, "कशास हवीत ही खुळं? दुसर्‍या बोली नाय शिखलो तर कोणाचें काय बिघडेल का?" त्यांस म्हटले, अण्णा पटवर्धनाकडे पूजा सांगायास तू हाप प्यांट घालून गेलास तर काय बिघडेल का? प्रतेक गोष्टीचे आपापले म्हत्व आपापल्या जागी अस्तेंच. द्रिष्ट लागू ने, म्हणून गालबोट लावलंन, दुसरं काय!

बोली भाषा वेगळाल्या अस्तात हे अगदी ल्हान होत्यें तेवांच कळ्ळं. आम्ही रत्नांग्रीकर. मधल्या आळीतले नसलो तरी वरच्या आळीतले. जाज्ज्वल्य का काय तें पुणेकरांस आम्ही शिखवलेले. पण माझी आजी, मावशी वगैरे मंडळी आमच्या चुका काढत हो! "काय तुम्ही रत्नांग्रीकर, बसायचं, करायचं असं लांऽब कशाला म्हणता? बसाच्चं, कराच्चं असं बोलावं." आम्ही कुठले ऐकायला? मग तुम्ही रायगड जिल्ह्यातली लोकं "खाच्चं, जाच्चं असं का बोलत नाईत?" म्हटले की पुढे कोण कसला उत्तर देतोय! असा प्रतेकाला आपल्या बोलीचा अभिमान असतोच ना! रत्नांग्रीत तिथल्या तिथे वेगळाल्या जातीच्या आणि दाल्दी, खारवी अशा कित्तेक बोली ऐकल्यायत. त्यांचा पुढे दुसर्‍या भाषा मुळापस्नं शिखताना उपेग झालाच झाला.

आता सगळ्या मिपाकरांना हात जोडून विनंती करत्ये, बोलीभाषा सप्ताह संपला, मराठी दिनही साजरा झाला, मात्र बोलीभाषांत लिहणे थांबवू नका. नकळे कधी कोणाला कसला अभ्यास करताना यातला एखादा लेख म्हत्त्वाचासा वाटेल. आपल्याच मुलाबाळांना, नातवंडांना बोलीभाषा म्ह़ंजे काय हे शिखावयस लागले तर हा सगळा अमूल्य ठेवा आहे. बोलीभाषा म्हणजे नुस्ती बोलाची कढी आणि बोलाचा भात अशातली गत होता नये, लिहायची भाषा जरी प्रमाणाभाषा मराठी असली तरी आपली संस्कृती जपायची आणि मुलाबाळापर्यंत न्हेयची असेल (हा हा, अजिबात बुडवायची नाय्ये. मी बघत्याय हां) तर बोलीभाषा जिवंत ठेवा. त्याकरता ती शक्य तितकी लिहून ठेवा, इतके सांगत्ये आणि माझे भाषण संपवत्ये. माझं मेलीचं भाषण शांतपणांनी ऐकून घेतलंत आणि सगळ्या लेखकांचंही पुष्कळ कवतिक केलंत त्याबद्दल तुम्हा सर्व वाचक, प्रतिसादकांना पुनश्च धन्यवाद म्हणत्यें. असाच कृपालोभ असूंदेत!

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

29 Feb 2016 - 11:08 am | अनुप ढेरे

उपक्रम खूप आवडला!

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 11:14 am | नीलमोहर

सुरेख आणि प्रभावी समारोप हे लिहायचे राहिलेच :)

'जाज्ज्वल्य का काय तें पुणेकरांस आम्ही शिखवलेले'
- ही ही, गैरसमज ;)

पिलीयन रायडर's picture

29 Feb 2016 - 4:45 pm | पिलीयन रायडर

लिहायची भाषा जरी प्रमाणाभाषा मराठी असली तरी आपली संस्कृती जपायची आणि मुलाबाळापर्यंत न्हेयची असेल (हा हा, अजिबात बुडवायची नाय्ये. मी बघत्याय हां)

माहितीये आम्हाला..!

एक ओळही ह्या उपक्रमात लिहीलेली नसताना उगाच अभिमानाने ऊर भरुन वगैरे आलाय!! मिपा म्हणजे फारच काही तरी स्पेशल झालंय आयुष्यात!

एका खत्रा उपक्रमाची खत्रा सांगता!!

पिशी अबोली's picture

29 Feb 2016 - 4:52 pm | पिशी अबोली

या उपक्रमातील सगळे लेख चवीचवीने वाचतेय. खूप मजा येतेय. स्वतःच्या बोलीभाषेत लिहिताना किती प्रामाणिकपणे लिखाण येतं हे सगळ्या लेखांमधे दिसतंय.

आपल्याच अंगणात कोणतीही अप्रतिष्ठितपणाची लेबले न लावता बागडण्याची संधी दिल्याबद्दल मिपा सासंचे आभार आणि अभिनंदन!

आपल्याच अंगणात कोणतीही अप्रतिष्ठितपणाची लेबले न लावता बागडण्याची संधी दिल्याबद्दल मिपा सासंचे आभार आणि अभिनंदन!

+१

इशा१२३'s picture

29 Feb 2016 - 9:48 pm | इशा१२३

सगळे लेख अजुन वाचुन झाले नाहियेत.आस्वाद घेत वाचेन.
अत्यंत सुंदर उपक्रम झालाय.मिपाचा अभिमान वाटतोय!

अन्नू's picture

1 Mar 2016 - 2:48 am | अन्नू

मिपावर बोलीभाषा सप्ताह(?) आणि तोही चांगला जोरात झालेला दिसतोय. शॅ! नेमके आंम्हीच त्यावेळी बेड पकडून असल्याने आंम्हाला कळलेच नाही!
पण हरकत नाही. आता सगळे लेख एक-एक करुन वाचेन. :)

राही's picture

1 Mar 2016 - 10:24 am | राही

ह्या लेखमालेची संकल्पना ही अतिशय नावीन्यपूर्ण होती (मला इनोवेटिव म्हणायचे आहे) आणि ती अपेक्षेपलीकडे यशस्वी झाली आहे. या पूर्वी मी मराठीवर अहिराणी किंवा जळगावी/खान्देशीवर लेख आणि चर्चा झाली होती, शिकवणी लेखमालासुद्धा होती. मायबोलीवर तर काही बोलीतून लिहिणार्‍यांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत.
पण मिसळपावची ही लेखमाला अधिक व्यापक होती आणि त्या त्या बोलीव्यतिरिक्त इतर बोलीभाषकांनाही त्याचा आनंद लुटता आला.
अभिनंदन.

सविता००१'s picture

1 Mar 2016 - 11:06 am | सविता००१

काय सुरेख समारोप केलास गं..

शान्तिप्रिय's picture

1 Mar 2016 - 11:09 am | शान्तिप्रिय

उपक्रम अतिशय आवडला.
सर्व लेख उत्तम.

सुमीत भातखंडे's picture

1 Mar 2016 - 8:41 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम उपक्रमाची तितकीच सुयोग्य अशी सांगता.
परत-परत वाचावी अश्या लेखमालांपैकी एक होती ही लेखमाला.
सगळ्या लेखकांचे आणि संमंचे आभार!

पैसा's picture

3 Mar 2016 - 2:36 pm | पैसा

सर्व वाचक, प्रतिसादक आणि लेखकांना धन्यवाद! साहित्य संपादकांनी खास मेहनत घेऊन हा उपक्रम कमालीचा यशस्वी केला आणि दै. लोकमतने त्याची दखल घेतली यासाठी साहित्य संपादक आणि दै. लोकमत यांनाही धन्यवाद!

मराठी जिवंत राहील का नाही वगैरे चर्चा मराठी दिनाच्या निमित्ताने अन्यत्र पाहिल्या. मग मराठीची शाश्वती नसेल तर बोलीभाषांचे काय असे कदाचित कोणाला वाटू शकेल पण दोनशे पाचशे वर्षात काय होईल याची चिंता आपण करू नये. सर्व प्रकारची विविधता आपोआप टिकवली जाते. ती मारायचा प्रयत्न जाणीवपूर्वक होऊ नये. हा उपक्रम सगळ्यांना इतका आवडला असेल तर दर वर्षी मिपावर करत राहू.

१९६१ च्या भारतीय जनगणनेत १६५२ बोलीभाषा नोंदल्या गेल्या. १९९१ ला १५७६ तर २००१ मधे १३६५. बोलीभाषांची संख्या कमी कमी होत आहे हे कटू सत्य आहे. जागतिकीकरणाचा रेटा आणि जवळच्या मोठ्या समुहाची भाषा आपलीशी करणे ही काही कारणे असू शकतात. SIL International च्या सर्व्हेनुसार आताच्या प्रमुख ४६१ भारतीय भाषांपैकी ५४ धोक्यात आणि १३ मृतप्राय म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. १४ भाषा यापूर्वीच मृत झाल्या आहेत. बोली आणि भाषा यात फरक करणे हे फार गुंतागुंतीचे आणि वादाला आमंत्रण देणारे ठरू शकते. पण सर्वसाधारण चित्र हे असे आहे.

सर्व भाषांचा लोप होऊन अंती एक भाषा शिल्लक राहील हे काही हजार वर्षात होणे शक्य आहेच. मात्र शक्य असेल तिथे आपण मराठी प्रमाणभाषा आणि आपाआपल्या बोलीचा उपयोग केला तर आपल्या थोडक्या आयुष्यात मराठीचा विकास झालेला बघायला जरूर मिळेल. माहितगार यांनी चालू ठेवलेला बोलीभाषेतील शब्दांचा विकि प्रकल्प असो, की स्वामी संकेतानंद सारख्या उत्साही तरुणांनी चालवलेले एकेकट्याचे प्रयत्न असोत. गरज आहे ती अजून थोडे हात पुढे येण्याची. निदान आपण फार मोठे काही करू शकलो नाही तर आपण मराठी भाषा आणि तिच्या बोली मरतील अशी कल्पना करून ते अधिक वेगाने होईल असे काही करू नये, इतकेच!

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि जय महाराष्ट्र, जय हिंद!

पद्मावति's picture

3 Mar 2016 - 3:07 pm | पद्मावति

सुंदर उपक्रमाचा तीतकाच छान समारोप.

मिपावर मराठीच्या बोलीभाषांचा महोत्सव झाला या बद्दल मानावे तितके आभार कमीच आहेत बोली भाषांचा र्‍हास होत आहे. एखादे भाषा मृत होणे म्हणजे ती भाषा बोलणारी संस्कृती लयास जाणे.
बडोद्याच्या डॉ गणेश देवीनी या बाबतीत पुढाकार घेवून बोली भाषांचा कोष तयार केला आहे. तेजगढ च्या भाषा अ‍ॅकादमीत त्या बाबतीत संशोधन ही चालू आहे.
एखाद्या भाषेचे महत्व हे ती भाषा बोलणार्‍या वर्गाची आर्थीक सामाजीक राजकीय ताकद किती आहे त्यावर ठरते.
मराठी हिंदी सारख्या भाषा बोलणारा वर्ग मोठ्या प्रमाणात शहरी निमशहरी आहे. बोली भाषा या मुख्य भाषेकडून गिळंकृत केल्या जातात. ( उदा : मारवाडीला, हरयाणवी ला हिंदी भाषाच म्हंटले जाते.)
बोली भाषा प्रामुख्याने आदिवासी ,कमी उत्पन्न गटातील लोक बोलत असतात. आर्थीक सामाजीक अनुकरणातून मुख्य भाषा जास्त बोलली जाते. बोली भाषा मागे पडते.
मिपा वरच्या अशा उपक्रमांमुळे बोली भाषा टिकवायला मदत होईल.
मिपाकरांचे आणि मिपा चे अभिनंदन आणि आभार.