शेन्डा ना बुडुख (मावळी) (मराठी भाषा दिन २०१६)

भीडस्त's picture
भीडस्त in लेखमाला
23 Feb 2016 - 6:32 am

सान्गाया पायशेल आसं वाटलं म्हनुनसनि : माननिय सासंजी यान्नि माघला म्हैना सम्पाय्च्या वख्ती बोलीभासा सप्त्याचि दौंडि फिरावलि. तव्हा तिथंशिक आम्च्या इकाल्ल्या मप्ल्या तुप्ल्या टायिप भासंचा कोन्ह्यातरि उल्लेख क्येल्ता... त्ये वाचिस्तंव्हर आमच्या अॅल्मिना तायी डाक्टर अजयाबायिन्नि व्यनिमधी "त्या खाल्लाकल्या साईटीवं दोन सालामाघं तुम्ह्याच काह्यतरि लिव्हलं व्हतं का?" आसं पुसलं सुधील. तायिन्ना हा म्हनंस्तंव्हर साहित्यसम्पादक्बी लिव्हायचं आवातनं दिउनसनी ग्येले. (आवळीजावळीच दिसत्याय दोन्हि. याला सान्गातलं का त्येला बि माह्यित पडातंय)

तव्हा यावढं समदं झाल्याकार्नि हा समदा उद्देग क्येलेला आस्तोय. ह्ये समदं लिखान आप्लं निर्‍हं वाचाय्चं. आवाल्ड्ं तं चान्गल्ंच ह्ये. नाय आवाल्डं तं आझुकच चान्गलं..
ह्या समद्या आपल्या मव्ह्या मनाच्या ष्टोर्‍या ह्येत. त्ये म्हनत्याय कनि "नाय शेन्डा का नाय बुडुख".. तश्या टायपातल्या. निस्त्या आपल्या उसाच्या चुट्ट्या. चाव चाव चावाय्च्या आन चोथा राह्यला का थुकुन टाखायच्या.

शेन्डा ना बुडुख १
येळ्भर समदी कामं उरकुनसनि गविराज सवसान्चं घराला पोहचलं व्ह्त्ं. आक्खा दी कामाचा मस तान व्हत र्‍हातो,पर गविराज म्हयी कदमच शांतिला धरुन आस्त्याय.कव्हा कुन्हावं डाफारनं नाय का क्वान्ह्लला वायीट्वन्गाळ बॉलनं नाय.
घरि आल्यासरशि जरा त्वान्ड बिन्ड खन्गाळुन चाहापानि करुन्सनि मिपावं बसावं आसा न्येम.म्हयी कसं आस्तंय वले त्या मिपावं जव्हा पघावा तव्हा धिण्गुडशा चालु र्‍हातोय.तव्हा समदया मिपा नेम्बरना थापटुन गप करायचं, क्व्वान्चि सम्जुत घालायचि.. क्वान्हला कुढं काय शन्काबिन्का आस्तिन तं त्या निरसुन द्येयाच्या. ह्ये गविराजाण्च्ं आवडिचं काम. तं खुडशी मोर्‍ह्ं वढुन त्यान्नी बैठक जमावली सुदिल. आता ल्यापटाप खोलुन काम सुरु करायचिच खोटि व्हति. गविराज काम सुरु कर्‍न्हार तं आबगिच चि. गविसान सामनि आले. गविसान व्हता आठ दहा वर्सान्चाच पर त्योय बि बापासार्खाच हुशार व्हता. त्याच्या मनात कदमच काह्यी ना काह्यी प्रेष्न येत आसंत.मंग तो आप्ला बाबाला यिउन्सनी इचरायचा. बाबाबि बराबर उत्तरं माहित करुन घिउन त्याच्या शण्का निर्शित आसंत. लेकराच्या तोन्डावर्ल्हं समाधानाचं हासु पघुन गविराजबि खुश व्हउन जायाचं. गविसान ह्ये आठ नऊ वर्सांचंच पर तो सुदिल बापासार्खाच हुश्यार डोक्याचा व्हता, त्येबि बापाला कदम प्रश्ण इचरित आसाय्चं. त्याच्ये प्रश्णयबि भारिच आसाय्चे. गविराज एवढे हुश्यार पर कव्हा कव्हा उत्तरं द्येता द्येता त्याण्च्ं डॉकं पार आवुट व्हउन जायाचं... पर ल्याकरंबाळं वाढवायची म्हये ह्ये समदं कर्न्ंच ह्ये कनि. आप्ल्या प्रश्नांचि उत्तरं बाबाकुन आइकतानि गविसान्चा च्येर्‍हा निस्ता फुलुन येयाचा.

तं गविसान त्यान्ठनि आला. त्येन्ह्या बाबाकं पघात्लं आन त्ये परासतं झालं "ये बाबा मि यिथं कुढुन आल्येलो ह्ये रे?' गविराज जराश्येक चमाक्लेच. गविसान्ला आज काय झालंय आसंच त्यान्हा आधुगर वाटलं. पर त्ये झट्क्यात सावार्ले.

आज नाह्यंतं उंद्याच्याला गविसानकुन हा प्रश्ण यण्हार ह्ये त्यान्न्हा पुरं ठावकि. त्ये तयारित व्हतंच.. गविराजान्नि डोळ्यावर्‍हला च्यश्मा काढुनसनि दोहि डोळ्याण्च्या मेरा पुसल्या, घसाबि खाकारल्यावानि क्येला. लेकराला सामनी बसवून घ्येतला. आन ते गविसान्ला म्हंगालं "ये रं मप्ल्या बबड्या. आसा उलसाक सामनि नदरंम्होर्‍हं बस" म्होरला आर्धा तास गविराजान्नि गविसान्ला नालेजचं ढोसच्या ढोस पाज्लं. 'बायि काय आस्तिय बाप्या काय आस्तोय. ल्हान्पनि कसं आस्तंय, मोठ्यापनि कसं आस्तंय. लग्नं कसकशि व्हत्यांय, मंग बायाकान्ना ल्याकरं कशि व्हत्यात.' आशि समदी माहिती येवस्तिशिर गविसान्ला सान्गुन ठुलि.

पर ह्ये समदं आयकुन गविसान मातर पारच बावचाळल्यावानि गविराजांकं पघत व्हते. गविराजान्नि बबड्याला इचारलं " समाजलं नं आता तुला तु कुढुन आल्येला ह्येस त्ये?. गविसान आझूकच चिन्भिन झाल्यागत दिसाय लागलं व्हतं. गविराजान्नि त्याला एकवार उजुक पुसलं " त्वा आज ह्ये इचाराय्चं आबगिच कस्काय डोक्यात घ्यातलं रं बाळा?"
तसं ते लेकरु काय म्हन्तंय "म्हयी आसं झालं पघ बाबा. माव्ह्या वर्गात कनि आज येक नईनच प्वार आलंय. गुर्जिन्नि त्याला नाव इचारलं. त्येन्ह्या त्याचं नाव सान्गातलं. मंग गुर्जि त्याला म्हंगाले तु यिथं कुढुन आलास.तव्हा त्यो म्हन्गाला का मि खपोलिउन यिथं आल्येलो ह्ये म्हुननसनि. तव्हा म्या बि म्हटलं का आपन्सुदिल माहित करुन घ्यावा तुपल्याकुन का म्या यिथं कुढुन आल्येलो ह्ये त्ये"

शेन्डा ना बुडुख २
केण्धुळ्यबि मिपावं पडिक राहुनसनि आम्च्या नाठाळ कार्टाचं याचि टेर खेच कनि तिचि टेर खेच कनि. कुढं ह्या बाप्याला खरड पाठव कव्हा त्या बायिला खरड पाठव आस्लं उद्देग चालु आसायचं. नाठाळ तं त्ये हायेच ह्ये ,गाबडं जरा बाखाळबि ह्ये. बोलाया चालु झालं का काह्याचा सुमारच र्‍हात नाय बाबाला. गाडी निस्ती ढाळाव्ंच पळत सुटति. थाम्बायचि बातच नच्छं..गाडीला उटि लागनेच नाय. उटि लावु म्हनश्यान तं स्पीड येवढि का उटिचा भुगाच व्हाया पायशेन. न टिकलिच कव्हा उटि तं गाडि ऊराळ व्हनार म्हयी व्हनारच. शिवळा येकिकं तं जुपन्या येकिकं.
ह्या आश्या काहारापायिच कार्भार्‍यानि त्याचि गाडी लाम्ब्च्यालाम्ब फेकाटुन कनि धिलि. धिलि म्हण्जि आशि तशि नाय फेकाटलि. जाळ न धुर सण्गंच. बावखाड कुन्हिकं तं जुकाट कुन्हि़कं. काह्याचा काह्याला तपासच नाय. नाकाचि म्हयि नाठाळ कार्टाचि हालत पार म्हयि पारच वंगाळ झालि. आता येळभर करिन तं काय करिन बान्डा. टायिम्पास व्हयीन तरि कुढं?. उजरतच नव्हतं बाबाला पह्यले चारपाच दि.

आसंच येका दुपार्च्याला वासं न तुळया मोज्ता मोज्ता नाका इचार करित व्हता 'लयिच फुकाट टायमाचि बरबादि व्हाया लागलि वले आसं पडुन पडुन. हा येळ समदा कारनिच लाऊन दायितो. घावत नाय म्हये काय. आशिकशि घावत नाय. गवसुनच दाखितो समद्यान्ना.'

दुसर्‍या दिशि रामाच्या पार्‍हिच कारेक्रम सुरु झाला न क्काय.. पह्यला छूट दाढिडोकी उराकलि. मंग लालि पाऔंडर लाउन्सनि, नयि कापडंचॉपडं घालुन निघाला कनि शिकारिवं बाश्शा. आन का नाय वाघुर लावल्यागत आज बराबर पाह्यशेन ति शिकार गवसावा. ह्ये आशि ड्येरिण्ग करुनसनि माघातलि ना बाश्शानि तिच्यापं लवशीप. आरा रारा झालि कनि फटक्यात बारी. पोर लवशिप द्यायाला कबूल झालि ना. 'आत्याह्यला आज तं फळिफोड बारि झालि बाश्शाचि नं क्काय ह्ये' नाका निस्ता मनातल्या मनात उड्या हानित व्हता. कव्हापुन वाट पघत व्हता बाबा ह्या दिवसाचि.

नव्या नव्या गरमागरमित तीन वार पास झाले. लयिच मजा चाल्लि व्हति. सकाळचं, सवसाण्चं भ्याटनं, फोण,म्येसेज करनं समदं कसं य्येक नम्बरमधि चालु व्हतं. फडफड चाललि व्हती निर्‍हि पाखरान्चि. तं आलाच कनी येव्ढ्यात तो व्ह्यालेन्टायिन ड्ये. बायिनि परासलंच बाबाला ड्ये च्या आधुगर दोन दि "काय द्येशिन रं नाठाळा भेट मला तु? येक्दम भारि गिफ्ट पायशेल बर्का मला.मला कोन्ह्याच कव्हा धिलि नसंन आशि".

तं ह्ये म्हनं " द्येन्हार म्हयि द्येन्हार. येक लम्बर गिफ्ट द्येन्हार तुला मि. पघत र्‍हा निस्ति तु."
नाकानि तं घ्यातलंच व्हतं मनावं. ग्येला ऊन्द्याच्याला दुकानात. इचारच क्येल्ह्ता कनि मानुस ह्ये मोठा खर्शिला नाय तोटा. त्याच्यानि काय करावा त्यान्हि. डायरेक आन्गठिच इकात घ्येतलि न काय ह्ये. बरं घ्येतलि तं घ्येतलि तीय बि हिर्याचि आन्गठि घ्येतलि. ती सुदील पाच हिर्याचि घ्येतलि. खर्चि येक्दाच करित आस्तो कनि मानुस. म्या काय साधा कोन्ड्या ह्ये का क्काय आसंच त्याचं मनात्ल्या मनात चाल्लं व्हतं.

मंग व्ह्यालेण्टायिन च्या दिशि दोघ्यबि ठरलिल्या हाटिलात भेटाया आलं. आल्यासर्शि खुडश्या वढुन आमनिसामनि बसलं. कुन्हि काय बोलायच्या आघुदरच नाकानि प्याण्डिच्या खिशात्लि पुडि काढुनसनि ट्येबलावं ठुलि. आण्गठि बाह्येर काढुन पोरिच्या हाताच्या पन्ज्यावं ठुलि. सन्गं गुलाबाचं फुल व्हतंच आन्हलिलं. त्ये बि दिउन टाख्लं. आण्गठि पघुन तं पोर पारच हाराकलि नं काय. सुधरनांच झालं ना बायिला.

"आण्गठि: मपल्यासाठि; ती सुधील हिर्याचि. बाबौ. बाबौ." पार आभाळातच पोह्चलि ना पोर. यिक्डं नाकाचि छाति लागलि ना भात्यावानि फुगाया.
''ये नाका, आण्गठितले समदे हिरे खरे ह्येत का रे?"
तसा छाति आझुकच फुगीत त्यो म्ह्न्गाला "खरं ह्येत का म्हयि काय.. खरंच ह्येत हिरे..''
"आन जर का खरं नस्तिन तं लुस्कान व्हयीन ना मपलि. थोडिथिडकि नाय तं शम्भर रुपायचि .'' त्यो मोर्‍हं म्हन्गाला.

शेन्डा ना बुडुख ३
चान्गलंच् गडाद पडाया झाल्तं. दिल्बर सर आज घराला येकलेच व्हते. कन्त्यातरी सोयर्‍याकं लगिन व्हतं म्हनुन घरातलि समदी मन्डळि गावाला गेल्थी. आख्खा दिवस्भर कालिजात लेक्चरं घिउ घिउ सराण्चं पार भुस्काट पल्डं व्हतं. पन परिक्शा तं लयीच तोन्डावं आल्थ्या. आझुक सरान्ना प्रश्नपत्रीका तयार करुन ठ्येवायच्या व्हत्या. आज रिकामा येळ घावल्यासरशि सुरवात तं करावा आसं दिल्बर सरान्ना वाटत व्हतं. माघ्ल्या साली लयिच आबळ झाल्ति सरान्चि प्रश्नपत्रीका काढायच्या कामात. कव्हा यिकडं कट्टा कराया जा का कव्हा तिकडं कुढं दगडी बायाच पघाया जा आश्या पळापळित येळ्च पुरला न्हवता. जोडिदारान्नि सपादुन घ्यातलं म्हनुन्तरि धकलं व्हतं. तव्हा ह्या बारिनि गाफिल राहुन परवाल्डं नस्तं.

येवढ्यात दरुज्याचि घन्टी वाजली. सरान्नि जाऊन्सनि दार उघाड्लं. तं दारात सरान्च्या वर्गात्ल्या दोन पोर्‍हि उम्ब्र्याबाह्येर उभ्या व्हत्या. "यावा का सर आम्ह्या आत्मधि?" एका पोरिनि सरान्ना इचारलं.. "या कनि बयान्नो" सर त्यान्ना घरात घ्येत म्हन्गाले. तशा दोघिबि आत येउनसनि खुडच्यान्वं बस्ल्या. सरसुदील पोरिन्च्या मोर्‍हं बस्ले.

"बोला काय काम काल्ढं गवळनिन्नो?"
"काय नाय वले सर .जराशिक आडचन ह्ये तव्हा आल्तो आम्हि सर" येक पोर.
"पह्यल्या बोलशान तं खर्‍या. मंग पघु काय कर्ता यातंय त्ये" सर बोल्ले.
"सर आम्हाला का नाय प्येपरात पयकिच्या पयकि मार्क पाडाय्च्येत" दुसरि पोर बोल्लि. कपाळावं आलिलि क्येसान्चि बट माघंमोर्‍हं करीत ती मोर्‍हं म्हन्ति "आन बर्का सर आम्हि का नाय त्येच्याकर्ता काह्यिबी कराया तयार ह्ये"
तशि दुसरि पोर मोर्‍हं काय म्हन्ती " तुम्हि जे म्हन्शान ना सर आम्चि त्या समद्याला तयारि ह्ये मार्कासाठि.
दोघित कोन्हाला ज्येदा लाडंलाडं बोलाया यातंय, आशिच जनु काय शरेत लागलि व्हति.
ह्ये आयकुनसनि दिल्बर सर पारच गरबाड्लं न काय. ज्याकपाट्च लागला नं काय आसं झालं त्यान्न्हा. आशि आफर काय रोच्च्याला नस्ति येत. सर इचार कर्त्याय आज काय सोडित नस्त्याय दिल्बर सर पोर्‍हिन्ना.
"काय्हिबि करशान का तुम्हि मार्क मिळवायासाठि म्हनुन?" सरान्नि इचार्लं.
पोरिन्चा तं न्येम बराबर बस्ला व्हता. "हा सर आम्हि र्‍येडि ह्ये सर."
"इचार करा बर्का बैदवार. उजुक तकराद बिक्राद नाय व्हायाला पायशेन कन्तीच. चार भिताडाच्या बाह्येर कोन्हलासुदिक कळाया नाय पायशेन." सर म्हन्गाले.
"सर आम्हि काय येवढ्या बावळाट वाटतो क्काय तुम्हाला.'' पोरिचा आवाज जराशिक रागातच व्हता.
"माघुन उगं ह्येड्याक नको डोक्याला. हावंय ग्येलि नं धावंय ग्येलि आसं नको व्हाय्ला.'' सरान्नि जराशिक हाल्वुन खुटा टायिट करुन्सनि घ्येतला. ''आनिक आसं पघा. प्येपराला आझुक दोन वार बाकि ह्येत. तं म्या ज्ये काय सान्गनार ह्ये त्ये तव्हंर रोच्च्या रोज कराया लागन. आघुदरच सान्गातलिलं बरं. हाये का तयारि. परत म्हन्शान सरान्नि फसावलं म्हनुन्सनि. निर्‍हं आच्च्याला नं ऊंद्याच्याला करुन काय माव्हं भागायचं नाय. त्यान्हि काय मार्क पडति नाय."
"चालातंय सर, आम्हि कनि पन्ध्रा दि रोच्च्यारोज करु. तुम्हि त्यावढं काय करायचं त्ये सान्गा पाटशिरि."

तसं सर सबागति उठलं न "उठा भवान्याहो, पळा घराला तुम्हापल्या. आन पन्ध्रा दि रोच्च्यारोज घासुघासु आब्भ्यास करा. म्हयि पडतिन पय्किच्या पयकि मार्क." आसं डाफार्लं कनि पोर्‍हिन्च्या आन्गावं. "काह्यिबि कराया तयार ह्येत म्हन्त्याय."

तश्या दोन्हि पोर्‍हि "आगं आयव आगं आयव; बाबव बाबव" करित दर्वाज्याकं भुन्गाट सुटल्या नं काय.

प्रतिक्रिया

अजया's picture

23 Feb 2016 - 7:05 am | अजया

:)
धमाल लिहिलंय!!

शेन्डा ना बुडुख ३, लईच भारी! आत्ताच वाचली!
मास्तर चांगले म्हणायचे स्वभावान!

लै भारी,मजा आली वाचायला..

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2016 - 8:18 am | प्रीत-मोहर

मस्तच झालाय तुपला लेख

यशोधरा's picture

23 Feb 2016 - 8:23 am | यशोधरा

१ आणि २ पण वाचल्या! झक्कास!

हाहाहा! आक्शी फळीफोड लिव्हलंयसा!

नाखु's picture

23 Feb 2016 - 8:51 am | नाखु

सरांना नमस्कार आणि नाठाळ कार्टाले शेख्हॅण्ड अणि...........

गविराजांसी दंडवत फकस्त..

खंप्लीट भुस्काट झाल्येला नाखुड्या सराफ

प्रचेतस's picture

23 Feb 2016 - 9:38 am | प्रचेतस

खी खी खी.
लै भारी =))

पैसा's picture

23 Feb 2016 - 10:13 am | पैसा

=))=))=))=))=))=))

नीलमोहर's picture

23 Feb 2016 - 10:24 am | नीलमोहर

गविसान भारी..
ते कार्टं भारी..
दिल्बर मास्तर लईच्च भारी ;)

सस्नेह's picture

23 Feb 2016 - 10:42 am | सस्नेह

आनि डाकतरना काय म्हनून सोडलसा हो भीडस्तभौ ?

अजया's picture

23 Feb 2016 - 4:49 pm | अजया

ही ही =))
एक डाकतर दुस्र्या डाकतरला सोडनारच ;)

पाक धुरळाच पाडायलंय हे भिडस्त.. पिल्यागत पॉष लिहायलंय.. टोपीटावेल देऊन सत्कार ठिवलाय पुलावर यांचा संध्याकाळला, खरं हे तितं येतील न येतील कायकी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2016 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) धमाल मजा आली. लेखाला पाच पैकी साडे तीन गुण देतोय.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

23 Feb 2016 - 12:45 pm | पैसा

मावळी म्हणजे 'एक डाव भुताचा' मधे अशोक सराफ बोलतो ती बोली ना?

बबन ताम्बे's picture

23 Feb 2016 - 12:59 pm | बबन ताम्बे

गावातच कुणाकडून तरी ऐकतोय अशी भन्नाट भाषा. पुणे जिल्ह्यात ग्रामिण भागात असेच बोलतात. त्यांठणी (त्याठिकाणी, ठुलं (ठेवलं)

किसन शिंदे's picture

23 Feb 2016 - 12:59 pm | किसन शिंदे

लई काहार लिवलंय. कुढाल्ले हो तुमी भीडस्तभौ

मितभाषी's picture

23 Feb 2016 - 11:46 pm | मितभाषी

पार येशीत बसून टापा हाणल्यावाणी वाटलं बाॅ.

भुमी's picture

23 Feb 2016 - 1:37 pm | भुमी

३नं. लै भारी;)

नाव आडनाव's picture

23 Feb 2016 - 2:09 pm | नाव आडनाव

आवाळडं. नगरचे हेत काय ?

अन्या दातार's picture

23 Feb 2016 - 5:07 pm | अन्या दातार

जबरी. मजा आली.

मित्रहो's picture

23 Feb 2016 - 5:16 pm | मित्रहो

एकदम जबराट, हसतोय फक्त
ही भाषा पुणे नगर या भागातली आहे का

जव्हेरगंज's picture

23 Feb 2016 - 6:24 pm | जव्हेरगंज

भाषा तंतोतंत उतरली आहे !!
मस्तच!!!

कंजूस's picture

23 Feb 2016 - 7:40 pm | कंजूस

भारी!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 11:35 pm | टवाळ कार्टा

सुस्साट =))

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 9:28 pm | नूतन सावंत

भिडस्तभौ,लय भारी.बाकीचे भागही येउद्यात लौकरलौकर.

मितभाषी's picture

24 Feb 2016 - 10:20 pm | मितभाषी

सरय बी मोकार इस्पिके. बाकी फिंदांड्यान्ला काय म्हणावा.