विज्ञान लेखमाला : ०४ : 'फ्रेंडली नेबरहुड स्पायडरगोट'

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in लेखमाला
29 Jan 2016 - 12:07 am

a

कोळीबकरी

स्पायडरमॅन. कुठल्याही भिंतींवर कोळ्यासारखा झपाझप चढत जातो. त्याचे स्पायडर सेन्सेस वापरून खलनायक कुठे आहे हे समजून घेऊ शकतो. टारझन जसा एका झाडावरून दुसर्‍या झाडांवर पारंब्यांवर लोंबकळत वेगाने जातो, तसा स्पायडरमॅन न्यूयॉर्कच्या सिमेंट-कॉंक्रीटच्या जंगलात आपल्या हातातून तंतू बाहेर काढून त्यांना लोंबकळत कुठच्याही कारपेक्षा वेगाने जातो. दुष्ट माणसं सापडली की त्यांच्यावर शक्तीनिशी हल्ला करतो. आणि आपलं तंतूंचं जाळं विणून त्यांना त्यात बांधून टाकतो.

तो असतो लहानसा, टीनेजर मुलगा. ज्या काळात या काल्पनिक हीरोचा जन्म झाला, त्या काळात टीनेजर सुपरहीरो हे मुख्य सुपरहीरोचे साथीदार, आयत्या वेळी मदत करणारे, संकटात सापडणारे अशा दुय्यम भूमिकेत असत. स्पायडरमॅन हा पहिला कॉलेजकुमार सुपरहीरो. फक्त सोळा वर्षांचा. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे सगळे टीनेजरी प्रश्न आणि गंड बाळगणारा. आईबाप नसलेला, घरी काकूशी भांडणारा. 'विथ ग्रेट पॉवर, कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी' (महान शक्तीबरोबरच महान जबाबदारीही येते) हे धडपडत शिकणारा. किंबहुना या त्याच्या कमतरतांमुळेच तो तरुण पिढीला प्रचंड आवडला.

पण आत्ता मी जी गोष्ट सांगणार आहे, ती साय-फाय किंवा कपोलकल्पित विज्ञानकथा नसून खरीखुरी घडलेली, विज्ञानाची कथा आहे. आणि ती स्पायडरमॅनची नसून स्पायडरगोटची - कोळीबकरीची आहे. तिचं नाव फ्रेकल्स.
फ्रेकल्स

a

दिसायला ती कुठच्याही गोड कोकरासारखीच आहे. आपल्या बहीण-भावंडांबरोबर इतर बकर्‍यांप्रमाणेच तीही दंगा करते. गवत खाते. बकर्‍या करतात ते सगळं करते. मात्र तिच्या दुधातून कोळ्याच्या जाळ्यासाठी वापरले जाणारे तंतू मिळतात. स्पायडरमॅनला जसे हातातून हवे तसे तंतू बाहेर काढता येतात, तसे.

हे आक्रित कसं घडलं? 'देवाची करणी आणि नारळात पाणी' असं इतर वेळी म्हणता येतं. मात्र या बाबतीत ते खरं नाही. कारण ही पूर्णपणे मानवाची करणी आहे. कोळी आणि बकरी यांचा संकर करून तयार केलेला हा प्राणी आहे. कोळी आणि बकरी यांचा संकर? भलतीसलती चित्रं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू नका. कारण नैसर्गिकरित्या हे शक्य नाही.

संकरित बियाणं तयार करण्यासाठी एकाच प्रजातीत दिसणार्‍या दोन जवळच्या जातींमधले दोन वेगवेगळे गुणधर्म एकत्र केले जातात. गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिकासाठी भरपूर पीक देणार्‍या उंच जाती होत्या. पण तेवढ्या उंचीला इतक्या भरलेल्या लोंब्या पेलवत नसत. त्यामुळे अनेक वेळा त्या लोंब्या मान टाकून, सुकून जात. त्यासाठी या जातीत दिसणार्‍या भरपूर पीक देण्याच्या क्षमतेला इतर जातीतल्या बुटके आणि जाडपणाची जोड द्यायची गरज होती. मग दोन जातींचा संकर करून कुठच्या वंशजांमध्ये हे दोन्ही गुण दिसतात ते तपासायचं. त्यातले निवडक घेऊन पुन्हा संकर करायचा. असं करत करत अनेक पिढ्या, अनेक वर्षं घालवून योग्य त्या गुणधर्मांचा संगम असलेलं बियाणं हाती लागतं. पण अर्थातच हे होण्यासाठी नैसर्गिकरित्या संकर होऊ शकेल अशाच जाती निवडाव्या लागतात. गव्हाचा आणि तांदळाचा संकर करून दोन्हीचे गुणधर्म असलेलं बियाणं तयार करता येत नाही. किंवा जिराफ आणि हत्ती यांचा संकर करून लांब मान असलेला हत्ती तयार करता येत नाही. मग कोळी आणि बकरी यांचा संकर कसा केला गेला? आणि मुळात का?

a

कोळ्याच्या जाळ्याचे तंतू (कोळ्याचं जाळं निर्माण करणार्‍या ग्रंथी. शेकडो पटीने मोठ्या करून दाखवलेल्या आहेत.)
कोळ्याचं जाळं आपण नेहमीच बघितलेलं आहे. किंबहुना कोळिष्टकं काढून टाकणं ही आपल्याला कटकट वाटते. पण आपल्या लक्षात येत नाही की आपण जे कचर्‍यात फेकून देतो, त्यात काय काय गुण आहेत. कोळ्याच्या जाळ्याचा धागा हा त्याच जाडीच्या पोलादाच्या धाग्यापेक्षा अधिक मजबूत, पाचपट अधिक हलका असतो. इतकंच नाही, तर त्यात तन्यता म्हणजे ताणलं जाण्याचा गुणधर्मही असतो. मानवनिर्मित कुठच्याही धाग्यात एकाच वेळी शक्ती आणि तन्यता यांची सांगड घालता येत नाही. एक वाढवायचं झालं तर दुसरं कमी करावं लागतं. सध्या मानवजात बनवत असलेला सर्वात शक्तिमान तंतू म्हणजे केव्हलार - बुलेटप्रूफ जाकिटं बनवण्यासाठी तो वापरला जातो. पण तो अत्यंत महाग असतो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून कोळ्याच्या धाग्यासाठी तयार होणारं प्रथिन हे कमीत कमी वजनात जास्तीत जास्त शक्तिवान जाळं तयार होण्यासाठी सुधारत सुधारत जात कोट्यवधी वर्षांनी या पातळीला पोहोचलेलं आहे. मग तेच का वापरू नये? पण दुर्दैवाने कोळी अत्यंत कमी प्रमाणात धागे तयार करतात. सर्वसामान्य वापराच्या एखाद्या कपड्यासाठी जितका धागा लागेल, तितका बनवण्यासाठी लाखो कोळी लागतात. म्हणून ही क्षमता एखाद्या मोठ्या प्राण्यात निर्माण करायला हवी, हे उघड आहे. पण पुन्हा तोच प्रश्न - कोळ्याची ही क्षमता दुसर्‍या प्राण्यात कशी न्यायची?

त्याचं उत्तर आहे जेनेटिक इंजीनियरिंग किंवा जनुकीय अभियांत्रिकीमध्ये. आणि ही अभियांत्रिकी शक्य आहे, कारण जनुकीय पातळीवर सर्व प्राणिमात्र एकच भाषा बोलतात - डीएनएची भाषा.

डीएनए हा A (अॅडेनाइन), T (थायमिन), G (ग्वानाइन), C (सायटोसाइन) या चार रासायनिक अक्षरांनी बनलेला दुहेरी गोफ - एखाद्या पिळलेल्या शिडीसारखा - असतो. प्रत्येक पेशीच्या केंद्रात तो असतो, आणि पेशीमध्ये कुठची प्रथिनं तयार होतात हे त्या अक्षरांत लिहिलेल्या पाककृतीनुसार ठरतं. आपल्या शरीरात जे जे म्हणून सापडतं, ती सगळी प्रथिनं तरी असतात किंवा प्रथिनांनी बनवलेले पदार्थ तरी असतात. त्यामुळे कुठली प्रथिनं बनतात यावरून शरीराचे गुणधर्म काय असतात हे ठरतं. ही प्रथिनं बनवण्याची भाषा आणि यंत्रणा सर्व सजीवसृष्टीत एकच आहे. ती भाषा तीन तीन अक्षरांच्या 'शब्दां'नी बनलेली आहे. त्यातले काही शब्द हे 'इथे वाक्य सुरू' आणि 'इथे वाक्य संपलं' या अर्थाचेही असतात. त्या दोनमध्ये जे 'वाक्य' असतं, ते म्हणजे एक विशिष्ट प्रथिन बनवण्याची कृती. प्रत्येक शब्दासाठी एकेक ठरलेलं अमिनो अॅसिड असतं. म्हणजे CCC हा शब्द पहिला दिसला की त्याचा अर्थ 'आसपास फिरत असलेल्या अमिनो अॅसिड्सपैकी प्रोलाइन उचला' त्यानंतर जर GCA ही अक्षरं आली तर त्याचा अर्थ 'आता अॅनलाइन हे अमिनो अॅसिड घ्या, आणि आत्तापर्यंत तयार झालेल्या अमिनो अॅसिडच्या मालिकेला जोडा'. असं करत करत वेगवेगळ्या अमिनो अॅसिड्सची साखळी बनते. या अमिनो अॅसिड्सच्या एकमेकांत असलेल्या आकर्षण-प्रतिकर्षणामुळे तयार होणारं प्रथिन हे सरळ रेषेत न बनता एखाद्या झुडपासारखं वेड्यावाकड्या पण निश्चित आकाराचं बनतं. या आकारामुळेच त्या प्रथिनाचे गुणधर्म ठरतात. उदाहरणार्थ, आपल्या रक्तात असलेल्या हिमोग्लोबिनच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारापोटीच त्यात ऑक्सिजनचे रेणू वाहून नेण्याची आणि योग्य ठिकाणी ते देण्याची क्षमता येते.

कोळ्यांना जाळं तयार करण्यासाठी जे प्रथिन लागतं, ते अशाच भाषेत डीएनएवर लिहिलेलं असतं. ही भाषा सर्व प्राण्यांत सारखी असल्यामुळे तो डीएनएचा तुकडा कोळ्याच्या पेशींमध्ये असला काय किंवा बकरीच्या पेशीत असला काय, काहीच फरक पडत नाही. इतकी वर्षं हे जनुकीय ज्ञान असलं, तरी आत्ता आत्ता कुठे आपल्याला डीएनएचा विशिष्ट तुकडा कापून काढून तो नवीन जिवाच्या मूळ पेशीत बसवण्याचं तंत्रज्ञान हाती गवसलं आहे. त्यामुळे फ्रेकल्स नावाच्या बकरीच्या दुधातून या प्रथिनाचे धागे बाहेर येऊ शकतात, आणि येतात. हे संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी असे धागे मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी एक कंपनी काढली. दुर्दैवाने सुरुवातीच्या अपेक्षांइतकं उत्पादन होऊ शकलं नाही. पण म्हणून ही कल्पना बाद ठरत नाही.

एकेकाळी जे केवळ साय-फाय विज्ञानकथांमध्ये पाहिलं होतं, ते तंत्रज्ञान आता आपण वापरतो आहोत. लहानपणी स्टार ट्रेक बघताना कम्युनिकेटर वापरून लांब कोणाशीतरी संवाद साधणं हे आश्चर्यकारक वाटत असे. आता सेलफोन, स्मार्टफोन आपल्या हातात इतके रुळले आहेत की इतकी वर्षं आपण त्यांशिवाय कसे जगलो असाच प्रश्न पडतो. जनुकीय तंत्रज्ञानाने काय साध्य करता येईल याची आपल्याला आज कल्पनाही करता येत नाही, इतक्या शक्यता उपलब्ध आहेत. पोलादापेक्षा कितीतरी पट शक्तिवान आणि रबरासारखे ताणले जाणारे अत्यंत हलके धागे बकरीच्या दुधातून मिळू शकतील, ही कल्पना विज्ञानकथांमध्येही सापडणं कठीण आहे, पण ती प्रत्यक्षात आलेली आहे. आणखी काय करता येईल याच्या मर्यादाही शोधणं शक्य नाही, इतकं मोठं क्षितिज खुलं झालेलं आहे.

स्पायडरगोटकडून पुन्हा स्पायडरमॅनकडे वळू. त्याला ही शक्ती प्राप्त झाली ती 'रेडिओअॅक्टिव्ह कोळी चावल्यामुळे'. त्या काळात म्हणजे १९६०च्या आसपास रेडिओअॅक्टिव्ह म्हणजे काहीतरी गौडबंगाल, धोकादायक शक्ती असलेलं होतं. अलीकडच्या काळात जे स्पायडरमॅनचे सिनेमे आले, त्यात 'जेनेटिकली म्यूटंट' कोळी चावल्यामुळे त्याची जनुकंच बदललेली दाखवली आहेत. आजच्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हेच जास्त योग्य वाटतं. मात्र 'विथ ग्रेट पॉवर, कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी' (महान शक्तीबरोबरच महान जबाबदारीही येते) हे स्पायडरमॅनसाठी जसं लागू होतं, तसंच जनुकीय अभियांत्रिकीलाही लागू आहे. अमर्याद क्षितिजाकडे जाताना योग्य मार्ग स्वीकारणं, वाटेतले नैतिक खड्डे टाळणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर 'फ्रेंडली नेबरहुड' तयार करण्यासाठीच व्हावा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Jan 2016 - 11:59 pm | पैसा

थक्क करणारे तंत्रज्ञान! मात्र असे जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा उपयोग काही विध्वंसक कामांसाठी होण्याची शक्यता जास्त वाटते.

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 12:05 am | संदीप डांगे

सहमत! रोचक माहिती, छान लेख. काय काय घडत असतं जगात.

राजेश घासकडवी's picture

29 Jan 2016 - 8:11 am | राजेश घासकडवी

मात्र असे जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा उपयोग काही विध्वंसक कामांसाठी होण्याची शक्यता जास्त वाटते.

मला तरी तशी भीती वाटत नाही. अणुबॉंबमुळे तंत्रज्ञानाच्या विध्वंसक शक्तीबद्दल अनेकांच्या मनात भीती बसली खरी. पण त्या दोन अणुस्फोटांनंतर अणुऊर्जेचा वापर सकारात्मकच झालेला आहे. अणुऊर्जा आणि ही उगवती बायोटेक्नॉलॉजी यांच्या बरोब्बर मध्ये बसणारी इलेक्ट्रॉनिक क्रांती ही तर प्रचंड प्रमाणावर सकारात्मक कार्यासाठी वापरली गेलेली आहे.

कीड पडणार नाहीत अशी पिकं, दुष्काळाला तोंड देऊ शकतील अशी पिकं तयार झाली तर कीटकनाशकांचा वापर कमी होईल, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. ही फक्त काही उदाहरणं झाली. वातावरणातून कार्बनडायॉक्साइड शोषून घेऊन त्याचं ऑक्सिजनमध्ये रूपांतर करणारे, आणि समुद्राच्या पृष्ठभागावर टिकून राहाणारे जीव तयार करता आले तर पर्यावरणाचा प्रश्नही सुटू शकेल.

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 12:22 am | उगा काहितरीच

रोचक लेख! कुठेतरी वाचलं होतं की १९ व शतक हे केमीकल शास्त्रज्ञांच होत. २० व शतक भौतिक शास्त्रज्ञांच होतं आणी २१ शतक हे बायोइंजीनीयरींगच असणार आहे. पाहुया काय होतंय ते .

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 12:22 am | उगा काहितरीच

रोचक लेख! कुठेतरी वाचलं होतं की १९ व शतक हे केमीकल शास्त्रज्ञांच होत. २० व शतक भौतिक शास्त्रज्ञांच होतं आणी २१ शतक हे बायोइंजीनीयरींगच असणार आहे. पाहुया काय होतंय ते .

Jack_Bauer's picture

29 Jan 2016 - 2:22 am | Jack_Bauer

मस्त माहिती सांगितलीत. खूप क्लिष्ट विषय आहे हा. आपलाच जीएमओ एक तोंडओळख हा लेख ह्याच विषयावर आहे ना ?

मस्तच ओळख पण थोडक्यात आटोपते घेतले.अजून वाचायला आवडलं असतं!

एस's picture

29 Jan 2016 - 8:22 am | एस

+१

राही's picture

29 Jan 2016 - 11:38 am | राही

आणखी माहिती आवडली असती. विशेषतः व्यापारी उत्पादनाचा प्रयोग का फसला, शिवाय अशा बकर्‍या नैसर्गिक रीत्या भविष्यात कधी जन्माला येऊ शकतील का, की अशा संकरित तंत्रजन्य प्राण्यांचा नैसर्गिक जन्म शक्यच नाही म्हणजे अशी जाती निर्माण होणे/करणे शक्य नाही किंवा कसे हे वाचायला आवडले असते.

जव्हेरगंज's picture

29 Jan 2016 - 11:54 am | जव्हेरगंज

+1

रच्याकने, लेख आवडला!

मारवा's picture

29 Jan 2016 - 9:03 am | मारवा

अप्रतिम युनिक लेख
हा विशयच रोचक आहे.
साल्क इन्स्टीट्युट ने केलेल्या एका रोचक प्रयोगा ची लिंक
http://www.sciencedaily.com/releases/2016/01/160119153508.htm

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 9:30 am | कैलासवासी सोन्याबापु

उत्तम लेख! अगोदर एकदा वाचले होते दुधात जाळी देणाऱ्या बकरी बद्दल पण तुम्ही अतिशय मख्खन वाटावे इतके सुलभ करुन मांडले आहे सगळे, धन्यवाद!

सुनील's picture

29 Jan 2016 - 9:38 am | सुनील

मालिकेतील अजून एक उत्तम लेख.

'आखूड शिंगी, बहुदुधी' हा वाक्प्रचार कालौघात नाहिसा होणार असे दिसतेय!

राही's picture

29 Jan 2016 - 12:20 pm | राही

आखूडशिंगी बहुधागी असा नवा वाक्प्रचार येईल.

अनुप ढेरे's picture

29 Jan 2016 - 10:01 am | अनुप ढेरे

रोचक लेख!

अणुबॉंबमुळे तंत्रज्ञानाच्या विध्वंसक शक्तीबद्दल अनेकांच्या मनात भीती बसली खरी. पण त्या दोन अणुस्फोटांनंतर अणुऊर्जेचा वापर सकारात्मकच झालेला आहे. "--
तरीही फुकुशिमासारखे धोके आहेतच.धाक दाखवून वैमानिकांकरवी टॅावर पाडले तसे अशा वैज्ञानिकांकडूनही भयानक करवून घेता येईल असा एक सिनेमा वीस वर्षांपूर्वी आला होता ( A. T.E.T.) असं काही नाव होतं.शेवटी तो वैज्ञानिक तो रोबोटच मारून टाकतो.

राजेश घासकडवी's picture

29 Jan 2016 - 6:47 pm | राजेश घासकडवी

आयझॅक असिमॉव्हने त्याच्या रोबोंवरच्या कथा लिहिल्या त्याच्या प्रस्तावनेत त्याने लिहिलेलं आहे (मला बरोब्बर शब्द आठवत नाहीत) 'आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा यंत्रमानवांवरती कथा लिहिल्या त्यात एकच एक कंटाळवाणं सूत्र आहे - मानवाने यंत्रमानव बनवले, आणि ते त्याच्याविरुद्धच उभे राहिले, आणि मानवाचा नाश केला. खऱ्या जगात असं नसतं. आपण जेव्हा यंत्र बनवतो तेव्हा त्यात सेफ्टी मेकॅनिझम्स बसवतो. प्रेशर कूकरला व्हॉल्व्ह असते. तेव्हा यंत्रमानव बनवले तरीही त्यांना नियंत्रित करण्याची रचना बनेल. पण मुख्य मुद्दा असा आहे, की यंत्रमानव सामान्य माणसाशी आणि सामान्य परिस्थितीत कसे वागतात यावर आधारित अनेक रंजक कथा लिहिता येतात' त्याने जे यंत्रमानवांविषयी लिहिलं ते एकंदरीतच तंत्रज्ञानाविषयी म्हणता येतं. सामान्य माणसाला काहीतरी नवीन निघतं त्याची सुरूवातीला अनिश्चितता वाटते. तिचा फायदा घेऊन तंत्रज्ञानाविषयी भीती पसरवणारे अनेक लोक असतात. त्यामुळे 'यातून काहीतरी वाईटच निघणार' असं सतत वाटत राहातं. आणि जेव्हा काहीतरी वाईट होतं तेव्हा ताबडतोब त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळते. आता दोन विमानं काही अतिरेक्यांनी आपटवून हजारो लोक मारले खरे. त्याची अर्थातच बातमी झाली. पण अब्जावधी प्रवासी विमानांमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटू शकतात ह्याची बातमी होत नाही. तंत्रज्ञानाला असलेली भीतीची, धोक्याची बाजू हीच समोर दिसत राहाते.

याचा अर्थ या तंत्रज्ञानात काही धोके नाहीतच असं नाही. मात्र संभाव्य फायदे इतके प्रचंड आहेत की निश्चितच काळजीपूर्वकपणे का होईना, या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. काही चुका होतील, काही पावलं वेडीवाकडी पडतील. पण त्यातून शिकून मानवी जीवन अधिक सुंदर करण्याची क्षमता आहे. आणि भीतीपोटी ती संधी गमावू नये इतकंच.

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 7:38 pm | संदीप डांगे

मला वाटतं कंजूसकाकांनी मुद्दा मनुष्याच्या सद्सदविवेकबुद्धीचा मांडला आहे. परत हे उदाहरण चाकूवर येऊन थांबतंय. डॉक्टरच्या हाती चाकू आणि गुंडाच्या हाती चाकू, परिणाम भिन्न. मनुष्य नेहमी स्वार्थाचाच विचार करतो, त्यातून जे निर्माण होतं ते विध्वंसक आहे का सर्जनशील आहे ह्याच्याशी फारसे देणेघेणे नसते.

सामान्य माणसाला काहीतरी नवीन निघतं त्याची सुरूवातीला अनिश्चितता वाटते. तिचा फायदा घेऊन तंत्रज्ञानाविषयी भीती पसरवणारे अनेक लोक असतात. त्यामुळे 'यातून काहीतरी वाईटच निघणार' असं सतत वाटत राहातं. आणि जेव्हा काहीतरी वाईट होतं तेव्हा ताबडतोब त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळते.

>> उगाच जैतापूर आठवलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2016 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे

एका आघाडीच्या पण अत्यंत गुंतागुंतीचा शास्त्रिय विषयावर खूप सोप्या भाषेत लिहिलेला अप्रतिम लेख ! चपखल उदाहरणामुळे तो खुपच रोचक झाला आहे. यावर अजून विस्ताराने वाचायला आवडेल.

लेखमालेत एकाहून एक सरस लेख येत आहेत... एक विषय निवडून त्यावर लेखकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे लेख लेखमालेत गुंफण्याचा प्रयोग भलताच यशस्वी झाला आहे ! साहित्य संपादक आणि त्यांना या कामी सहकार्य करणार्‍या सर्वांचे हार्दीक अभिनंदन व प्रकल्प उत्तरोत्तर यशस्वी होण्यासाठी अनेक शुभेच्छा ! नवनवीन विषयांवरच्या अनेक लेखमाला वाचायची इच्छा आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 12:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

घासकड़वी सर,

आपली सदरहु विषयातली अथॉरिटी पाहता अजुन एक विनंती करतो, ती म्हणजे नॅशनल डेरी रिसर्च इंस्टिट्यूट करनाल ने केलेला जनुकीय बदल केलेल्या म्हशीचा प्रयोग, ह्या प्रयोगात गरीमा, प्रथम वगैरे कालवडीची पैदास झाली होती पण लंग इन्फेक्शन ने वगैरे त्यांचा लवकरच मृत्यु झाला , डेरी इंडस्ट्री मधील जीएम रिसर्च त्याची गरज फायदे तोटे चॅलेंजेस ह्यावर एक लेख लिहाल का प्लीज?

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 12:25 pm | बोका-ए-आझम

मस्तच माहिती! ही लेखमाला तर खूपच रंगतदार होऊन राहिली आहे!

काहीतरी हटके वाचायला मिळत आहे.

बादवे, ह्या लेखामुळे हॅरी पॉटर मधल्या हॅग्रीडची आठवण झाली.

सनईचौघडा's picture

29 Jan 2016 - 12:46 pm | सनईचौघडा

अवघड व गुंतागंतीच्या विषयावर सहज सोप्या भाषेत लिहलेला लेख.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2016 - 12:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जनुकिय बदल घडवुन सुपरह्युमन गोष्टी जमल्या तर बरं होईल. बाकी लेख खुप आवडला.

देवाने दिधले जगत हे आम्हास खेळावया...

आपण फार जबरदस्त माहिती देत आहात. धन्यवाद!

नूतन सावंत's picture

29 Jan 2016 - 1:58 pm | नूतन सावंत

माहितीपूर्ण लेख.

पद्मावति's picture

29 Jan 2016 - 4:04 pm | पद्मावति

अतिशय माहितीपूर्ण आणि रोचक लेख.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jan 2016 - 4:07 pm | कानडाऊ योगेशु

किंवा जिराफ आणि हत्ती यांचा संकर करून लांब मान असलेला हत्ती तयार करता येत नाही

हे पटते.पण मग लायगर (नर लायन व मादी टायगर यांचा संकर करुन) किंवा टिऑन ( नर टायगर + मादी लायन) हे कसे शक्य झाले. का दोन्ही एकाच मार्जार कुळातले असल्याने असे होऊ शकले असेल.
लेख आवडला.

सुहास झेले's picture

29 Jan 2016 - 10:26 pm | सुहास झेले

मस्तच... अजून डिटेलवार वाचायला आवडेल :)

भुमी's picture

30 Jan 2016 - 10:23 pm | भुमी

लेख आवडला.

अभ्या..'s picture

30 Jan 2016 - 11:53 pm | अभ्या..

मस्त. आवडला लेख. अजून मोठा असता तर जास्त आवडला असता. ;)

सुधीर कांदळकर's picture

31 Jan 2016 - 7:25 am | सुधीर कांदळकर

आवडला लेख.

धन्यवाद.

प्रियाजी's picture

31 Jan 2016 - 4:01 pm | प्रियाजी

लेख आवडला.ह्यावर अजून वाचायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2016 - 1:06 pm | मराठी कथालेखक

इतकी वर्षं हे जनुकीय ज्ञान असलं, तरी आत्ता आत्ता कुठे आपल्याला डीएनएचा विशिष्ट तुकडा कापून काढून तो नवीन जिवाच्या मूळ पेशीत बसवण्याचं तंत्रज्ञान हाती गवसलं आहे

पण नवीन जीव (या ठिकाणी बकरी) जन्माला येण्याच्या नक्की कोणत्या टप्प्यात डीएनए तुकडा बदलण्याचं काम केल जात ? ती नेमकी वेळ पुढे मागे झाली तर काय परिणाम होवू शकतात ?
म्हणजे असं की गर्भधारणा झाल्यावर ४८ तास ते ७२ तासातच डीएनए तुकडा बदलावा लागेल असं काही आहे का ? जर त्या आधी वा त्या नंतर बदलले तर काय होवू शकेल याचा अभ्यास झाला आहे का ? गर्भ म्हणजे फक्त एक पेशी असते का ? तसे नसल्यास गर्भाच्या प्रत्येक पेशीत असे बदल करावे लागतात का ?

राजेश घासकडवी's picture

1 Feb 2016 - 6:11 pm | राजेश घासकडवी

गर्भाची पहिली पेशी ही अंडपेशी आणि शुक्राणू यांनी बनलेली पेशी असते. याआधी अंडपेशीत निम्मा डीएनए असतो, आणि शुक्रपेशीत उरलेला निम्मा डीएनए असतो. ते डीएनए एकत्र झाल्यावर गर्भाचा डीएनए ठरतो. मग या पेशीचं विभाजन होत होत संपूर्ण अर्भक बनतं. आणि तो डीएनए सर्व पेशींमध्ये पसरतो. त्यामुळे असे डीएनए बदलाचे प्रयोग करायचे झाले तर ते मूळ गर्भपेशीतच करावे लागतात. एकदा पेशींचं द्विभाजन सुरू झालं की ती संख्या इतकी प्रमाणाबाहेर वाढते की विचारता सोय नाही. आपल्या शरीरात पन्नास ट्रिलियन (पन्नास हजार अब्ज) पेशी असतात. बकरीमध्ये कदाचित याच्या एक चतुर्थांश असतील. या सर्वांमधला डीएनए बदलणं शक्यच नाही.

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2016 - 7:05 pm | मराठी कथालेखक

तांत्रिकदृष्ट्या डीएनए बदल नेमका कसा केला जातो हे थोडं विस्ताराने सांगू शकाल काय ?
तसेच आतापर्यंत या बकरीखेरीज अजून काय प्रयोग झाले आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

कदाचित भविष्यात उडणारा वा चित्याप्रमाणे वेगाने पळणारा मानव तयार जन्माला घालणे तत्वतः शक्य आहे का ?

रोचक लेख. नवीन माहिती मिळाली.

माहितीपूर्ण व रोचकही.

नंदन's picture

2 Feb 2016 - 5:23 pm | नंदन

लेख आवडला. वरील काही प्रतिसादांत व्यक्त झालेल्या, 'अधिक विस्ताराने वाचायला आवडलं असतं' - या भावनेशी सहमत.

थोडे अवांतर - जिज्ञासूंनी CRISPR गूगलून पहावे; अथवा न्यू यॉर्करमधला हा लेख.

मारवा's picture

2 Feb 2016 - 6:30 pm | मारवा

अवांतर व दुवा आवडला.
धन्यवाद

यनावाला's picture

10 Feb 2016 - 2:12 pm | यनावाला

श्री.राजेश घासकडवी
"विज्ञान लेखमालेतील "फ्रेंडली नेबरहूड स्पायडरगोट" हा श्री.राजेश लिखित अप्रतिम लेख वाचला. तसेच "विश्वाचे आर्त " मधील लेख वाचले."उत्क्रांतिवाद " हा राजेश यांचा आवडता विषय आहे. त्याविषयीं त्यांचा व्यासंग मोठा आहे. अभ्यास सखोल आहे. क्लिष्ट विषय समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांचे कार्यक्षेत्र माहित नाही. पण कुठे शिकवत असतील तर ते विद्यार्थिप्रिय असणार यांत शंका नाही. या विषयावर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही ठावूक नाही. पण ते उत्क्रांतिवादावर उत्कृष्ट मराठी पुस्तक लिहू शकतील हे निश्चित. त्यांची लेखनशैली उत्तम आहे. मराठीत या विषयावर मोजकीच पुस्तके आहेत. त्यांतील सध्याचे सर्वोत्तम(माझ्या मते) म्हणजे "गोफ जन्मांतरीचे-अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे."(राजहंस प्रकाशन, लेखिका डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर").राजेश यांनी पुस्तक लिहिले तर मराठीत एका मोलाच्या पुस्तकाची भर पडेल. ....

राजाभाउ's picture

10 Feb 2016 - 2:34 pm | राजाभाउ

+१
१०० % सहमत

बॅटमॅन's picture

10 Feb 2016 - 5:46 pm | बॅटमॅन

एक नंबर लेख. अता यापुढील बॅटमॅन फिल्म्समध्ये वेन एंटरप्रायझेस मेषपालन व्यवसायातही उतरतील असे मानायला हरकत नाही. (ब्याटसुटासाठी केव्हलार पाहिजे ना.)