पहिल्या यशस्वी फेरी नंतर दुसरी थोडी लांब फेरी मारायचा विचार चालु केला. त्या दृष्टीने जवळपासची जाण्यायोग्य ठिकाणांची चाचपणी सुरु केली. थोडीफार शोधाशोध करुन 'खरोसा लेणी' हे ठिकाण निश्चीत केले. लातूर पासुन ४० किमी खरोसा व तिथुन २.५ किमी डोंगरावर लेणी असे जाऊन येऊन एकुण ८५ किमी अंतर भरत होते. माझ्या अनुभवाच्या मानाने हे जरा जास्तच होत होते पण, "जे होईल ते होईल आपण करुच" असा विचार केला. फक्त कधी जायचे ते ठरवले नव्हते.
दरम्यान सराव चालूच होता. रोज १५ किमी फेरी नियमीतपणे चालू ठेवली. सायकलच्या सीटची उंची वाढवून घेतली. माझ्या उंचीनुसार करुन घेण्यासाठी जवळपास ३ इंच उंच करावी लागली. जुने टायर्स खराब झाले होते म्हणुन दोन्ही टायर्स बदलुन नविन टाकले. तयारी करुन ठेवली. अशातच व्हॉट्सअप वर 'सायकल सायकल' समूहामध्ये किरण ने (मोदकदादा सोबत तापोळा सहली मध्ये असलेले) १ जाने. ला ३ दिवसाच्या सायकल दौऱ्याची घोषणा केली. माझ्या पण मनात विचार चमकला, ते तिकडे चालले आहेत तर आपण इकडे जाऊ. वर्षाची जोरदार सुरुवात होईल. १ जानेवारी तारीख निश्चित झाली. सरावासाठी आधीचे २ दिवस २०-२० किमीच्या फेऱ्या मारल्या. त्रास टाळण्यासाठी ३१ च्या कुठल्याही पार्टीचे आमंत्रण स्विकारले नाही.
१ तारखेला सकाळी ६ वाजता निघू असे ठरवुन ५ वा. चा गजर लावला. परंतु काही केल्या रात्री झोपच येईना. जवळपास १:३० वाजेपर्यंत टक्क जागा होतो. व्हॉअ, फेबु, मिपा वगैरे टाईमपास करत बसलो. त्यानंतर कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आली तेंव्हा ६ वाजून गेले होते. गजर पण होऊन गेला होता, ऐकूच आला नाही. आता आवरण्याची घाई झाली. पटपट उरकून सुद्धा ७:३० वाजले. दूध पोळी असा नाश्ता करुन खाली आलो. सायकल पुसून निघेपर्यंत ७:४५ वाजले आणि एकदाचा निघालो. आज सोबत बॅकपॅक मध्ये पाण्याची बाटली, वाटेत खायला खुराक आणि एका छोट्या बाटलीत दूध घेतले होते.
तसे खरोसा गाव व लेण्या या अगदी महामार्गाला खेटून आहेत. महामार्गाने सरळ सरळ जाता येते. परंतु लातूर ते औसा हा २० किमीचा भाग गेली कित्येक वर्षे सरकारी अनास्थेमुळे नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. भरीस भर या मार्गावर वाहतुक पण इतकी बेशिस्तीची आहे की, वर्षाकाठी २०-२२ जणांवर "जय गोपाळ" म्हणायची वेळ येते. त्यामुळे मी मधल्या मार्गे जाण्याचे ठरवले. घरातून निघून सकाळी सकाळी जुन्या लातूर मधल्या गल्ली-बोळा ओलांडत, बालाजी मंदीर, खडक हनुमान, रत्नापूर चौक, हत्ते चौक, आंबेडकर चौक मार्गे विवेकानंद चौकात आलो. चौकातून उजवीकडे वळलो आणि बाभळगाव मार्गाला लागलो. मोठा उतार उतरून नाका ओलांडला. लगेच पुढे मोठा चढ. आर.टी.ओ. ऑफीस मागे टाकून लातूर संपवले. लगेच पोलिस प्रशिक्षण केंद्र ओलांडत बाभळगाव मध्ये प्रवेश.
बाभळगाव म्हणजे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांचे गाव. याची साक्ष इथल्या रस्त्यावरुन येते. रुंद रस्ता, दुभाजक आणि दोन्ही बाजुला पदपथ. इतका गुळगुळीत रस्ता लातूर,. मध्ये सुद्धा नाही. असो. आतापर्यंत जवळपास ९ किमी झाले होते. सकाळची प्रसन्न वेळ, थंड हवा यामुळे थकवा अजिबात नव्हता. वाहतुक जास्त नसल्यामुळे वेग पण चांगला होता. १ जानेवारी असल्यामुळे शुभेच्छांचे पण फोन येत होते. सगळं कसं छान छान. वाटेत भुसणी हे छोटे गाव लागले. गाव नुकतेच जागे झाल्यासारखे दिसत होते. रस्त्यावर फक्त विद्यार्थी. गावाबाहेर काही जण अजूनही दिवसाचे स्वागतच करत होते. मी आपला आपल्याच नादात वातावरणाचा आनंद घेत जात होतो. छोट्या छोट्या चढ उतारांचे काही वाटत नव्हते. लोदगा हळूहळू जवळ येत होते. या मार्गावरचे हे एक बऱ्यापैकी मोठे गाव. गावात प्रवेश केल्या केल्या पेट्रोल पंपासमोर छोट्या हॉटेलमध्ये थांबलो.
आतापर्यंत १९ किमी, १ तास. कारभारी नावाचे हॉटेल मालक होते. चहा पिता पिता चौकश्या सुरु. सायकलवर खरोसा म्हटल्यावर त्यांना जरा आश्चर्य वाटले. त्यांच्याशी गप्पा मारत २०-२५ मिनीटे विश्रांती घेतली. पुन्हा टांग मारुन निघालो. बऱ्याच वर्षांनी या भागात आल्यामुळे सगळे नविन वाटत होते. लोदग्यामध्ये चहाचे हॉटेल्स कमी आणि परमिट रुम जास्त. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला जबाबदार एक घटक. थोडे पुढे गाव संपता संपता एक 'लोकनाट्य कला केंद्र'. इथली रोषणाई उतरवण्याचे काम चालू होते. बहुतेक काल जोरदार व्यवसाय झालाय.
लोदगा ओलांडून पुढे आलो. आता वाहतुक वाढली होती. साधारण ३ किमी वर पानचिंचोली फाट्यावरुन मला मधे वळुन येळी गावाकडे जायचे होते. इथे येळीच्या नावाचे बोर्ड कुठेच नव्हते. फाट्यावर चौकशी केली तेंव्हा वेगळीच माहिती मिळाली. इथून येळीकडे जाणारा रस्ता साखर कारखान्याच्या व खडी केंद्राच्या ट्रक्सच्या सतत वाहतुकीमुळे प्रचंड खराब झाला आहे. त्यामुळे लोकांनी मला तिकडून न जाण्याचा सल्ला दिला. पुढचा रस्ता इथून पुन्हा २.५ किमी वर कवठा पाटीवरुन. हरकत नाही म्हणुन कवठापाटी कडे प्रयाण.
कवठा पाटी वर उजवीकडे वळलो. आता छोटा रस्ता, पण चांगला होता. इथून वेगळाच घोळ सुरु झाला. रस्त्यावर दिशादर्शक फलकच नाहीत. पाटीपासून जेमतेम १ किमी आलो असेन, पुन्हा एक फाटा. आता? तसाच थांबलो. लांबून एक मोटरसायकल स्वार येताना दिसला. जवळ आल्यावर त्याला हात करुन विचारले. त्याच्या सांगण्यावरुन उजवीकडचा रस्ता पकडून देवांग्राच्या दिशेने निघालो. वाटेत पायी जाणारी मुले भेटली, त्यांना विचारून खात्री करून घेतली. आता बऱ्यापैकी उन्हे जाणवू लागली होती. हलके चढ होतेच जोडीला. परिसर अगदी निर्मनुष्य. त्यामुळे भकासपणा जाणवत होता. रस्ता कटत नव्हता. त्यात भरीस भर माझ्या सायकलचे मधले स्प्रिंग सतत कांईंकुंईं कांईंकुंईं असा आवाज करत होते. डोक्यात जात होता तो आवाज. १५-२० मिनिटात देवांग्रा पोहोचलो. न थांबता सरळ निघालो. २ किमी आलो असेन पुन्हा एक बिन पाटीचा फाटा. २ मिनिटे थांबलो. एक मामा शेळ्या घेऊन येताना दिसले. त्यांनी दाखवलेला डावीकडचा रस्ता धरून निघालो. ५ मिनिटात येळी आले एकदाचे. लक्ष्य जरा जवळ आल्यासारखे वाटले. इथे आता शेडोळच्या रस्त्याची चौकशी. एका तरुणानी एका अरुंद बोळीकडे हात दाखवला, "इकडनं जावा, गाडीरस्ता लागंल. तसंच पुढं टाररोड लागंल." गाडीरस्ता म्हणल्यावर मला थोडे टेन्शन आले. सायकल पंक्चर व्हायची भिती. परंतु माझ्यासमोर दोन मोटरसायकलवाले गेले आणि मला थोडा धीर आला. मी पण गाडीरस्त्याने निघालो आणि थोडे पुढे आल्यावर त्या तरुणाला मनापासून धन्यवाद दिले. दोन्ही बाजूला झाडी असलेला, गर्द सावलीचा रस्ता. मी तिथेच सायकल लावून बाजूला बसकण मारली. थंडगार सावलीत फार छान वाटत होते. १० मिनीटे तिथे थांबलो, पाणी प्यायलो, दूध प्यायलो आणि ताजातवाना होऊन पुढे निघालो.
साधारण १ किमी चा तो रस्ता पार करुन 'टाररोड'ला आलो परंतु पुन्हा एक फाटा. जवळच्याच शेतात काम करणारी माणसे दिसली. त्यांना विचारून डावीकडचा रस्ता पकडून निघालो. समोरच गाव दिसत होते, पण पोहोचायला बराच वेळ लागला. रस्ता अगदी हलक्या चढाचा असल्यामुळे हळूहळू जावे लागले. जवळपास १०:३० वाजले होते. आतापर्यंत माझी मानसिकता थोडी विचित्र झाली होती. अजून किती सायकल चालवायची? कधी येणार खरोसा? खरेतर फक्त ६-७ किमीच राहीले होते, पण अजून खरोश्याचं ख सुद्धा दिसत नव्हते. शेडोळ मध्ये पोहोचलो. मी आधी चहाचे हॉटेल शोधले. खरोसा रस्त्याच्या कडेला एका बोळात सापडले. तिथे बसलेले सगळे टक लावून बघत होते. चहा पिता पिता प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पार पडला. १० मिनिटे थांबून निघालो. इथून आता छोट्या छोट्या चढांचा रस्ता चालू झाला. सायकल चालवायला जड चालले होते. एका छोट्या टेमकाडावर ( टेमकाड - उंचवटा ) मला उतरावेच लागले. चालत चालत वर आलो आणि हुश्श झाले. लांबवरचा लेण्यांचा डोंगर दिसला एकदाचा. पहिल्यांदाच लक्ष्य टप्प्यात आल्याची जाणीव झाली. फार हायसे वाटले. आता सायकलला थोडा वेग आला.
खरोसा गावात पोहोचल्या पोहोचल्या हॉटेल शोध सुरु केला. पोटात कावळे ओरडत होते. हॉटेलसाठी थेट महामार्गावरच यावे लागले. समोरच 'जय मल्हार हॉटेल' दिसले, तिथे थांबलो. थंड पाण्याने हात, तोंड धुतले आणि उत्तप्पाची ऑर्डर दिली. ११:३० वाजले होते, रस्ता बदलावा लागल्यामुळे मी जवळपास ४५ किमी आलो होतो.
खरोसाला येण्यापूर्वी मला लेण्यांबद्द्ल नकारात्मक प्रतिक्रियाच जास्त मिळाल्या होत्या. सुरुवात घरातूनच झाली. थोरल्या बंधूंनी सांगीतले,"एकटा जाऊ नको." त्यामुळे मी इतर मित्रांकडे चौकशी केली. त्यातले एक, सत्यपाल पाटील, त्यांच्या कामानिमीत्ताने सातत्याने या भागाच्या दौऱ्यावर असतात. त्यांना विचारले,"पाटील, खरोसा लेणी जायला काही प्रॉब्लेम तर नाही ना?" त्यांनी उलट विचारले,"मन्नुभाई, आयटम घेऊन चालले का?" मी म्हणालो,"पाटील, एकटाच जाणारय, लेण्याच बघायला." पाटील- "बिनधास्त जावा. काही प्रॉब्लेम नाही." अशा प्रतिक्रियांमुळे मी येतानाच ठरवून आलो होतो की, स्थानीक लोकांकडे चौकशी करूनच लेण्यांकडे वळायचे अन्यथा गावातूनच वापस. त्यामुळे मी हॉटेल चालक गणेश कडे त्याबद्दल चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून हे कळाले की, लेण्यांचा गैरवापर करणारी जोडपी भरपुर येतात. स्थानीक टवाळ पोरे त्यांना निशाणा बनवतात, इतरांना त्रास देत नाहीत. बरेच पर्यटक सहकुटुंब येतात, शाळांच्या सहली पण येतात. त्यांना कोणी त्रास देत नाही. तसेच डोंगरावर वनविभागाने वृक्षारोपण करून ४ राखणदार ठेवले आहेत. गणेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी लेण्यांकडे जाण्याचे ठरवले. आत्तापर्यंत अर्ध्या तासात दोन उत्तप्पे संपवले होते, चहा पण पिऊन झाला होता. १२ वाजले होते, डोक्याला रुमाल बांधून लेण्यांकडे कूच केले.
महामार्गावर खरोसा पासून साधारण २ किमी वर महामार्गाला खेटून लेण्यांचा डोंगर. माझ्या अपेक्षांच्या विरुद्ध डोंगरावर बरीच बांधकामे दिसली. मधे वळल्या वळल्या मोठा चढ. जेमतेम अर्धा चढलो, उरलेला पायी पायी. गुंफांच्या समोर वाहने येऊ नयेत म्हणून काँक्रीटचा कठडा बांधलेला. मी त्यावरून सायकल उचलून नेली. जातानाच मला दोन जोडपी गुंफांमध्ये जाताना दिसली. दुर्लक्ष करून थोडे पुढे येऊन झाडाखाली सायकल लावली. तिथे एक तरुण पोरांचे टोळके फिरतच होते. कुठून आले, अरे बापरे, अरे व्वा वगैरे करून झाले. मी गुंफांकडे वळलो, ते पायऱ्यांवर विसावले.
या लेण्यांबद्दल सविस्तर माहिती कुठेही मिळत नाही. लेणी परिसरात देखील सांगणारे कोणी नाही. आंजा वरून जी मिळते तीच. त्यातही वेगळेपणा आहेच. कोणी हिंदू (ब्राम्हणी) लेणी असा उल्लेख करतात तर कोणी बौद्ध लेणी म्हणतात. साधारण ६ व्या शतकाच्या सुमारास गुप्त राजांच्या काळातल्या या लेण्या आहेत. एकूण १२ गुंफा आहेत. मुळात या लेण्या जांभा प्रकारच्या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. त्याची नैसर्गीक झिज खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यात या लेण्याबद्दल पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन व स्थानिक जनता यांच्यामध्ये असलेली प्रचंड अनास्था. यामुळे या लेण्या प्रचंड झिजलेल्या, जवळ जवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वच लेण्या अपूर्ण अवस्थेत आहेत. बहुधा आर्थिक किंवा अन्य कुठल्या कारणाने कलाकारांनी अर्धवट अवस्थेत काम बंद केल्याचे दिसून येते. प्रवेश केल्या केल्या दिसते ती बौद्ध गुंफा. प्रवेशद्वार भक्कम लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केलेले असल्यामुळे आत जाता येत नाही. बुद्धमूर्तीच्या खाली चौथरा बांधलेला व नित्य पूजाअर्चा चालू असलेली दिसते.
त्याच्या नंतर दोन मजली गुंफा लागतात. या अर्थातच अपुर्ण अवस्थेतल्या. कुठेतरी एखादी मूर्ती अर्धवट अवस्थेत कोरलेली दिसते. आजूबाजूला बऱ्यापैकी घाण. इथेच तळघराप्रमाणे खालच्या बाजूला पण गुंफा खोदलेल्या. अर्थातच तिथे काहीच नाही. मी येतानाच जोडप्यांना वर जाताना बघीतले होते, त्यामुळे मी वर गेलो नाही.
यांच्या शेजारी जवळपास पूर्ण अवस्थेतली एकमेव गुंफा. मात्र येथे शिवलींग आहे, त्याची स्थापना नंतर केल्यासारखी वाटते. येथेपण नित्य पूजाअर्चा चालते. गंमत म्हणजे आजूबाजूच्या भिंतींवर विष्णुच्या दशावतारातील मूर्त्या कोरलेल्या आहेत. अर्थातच त्या सर्व झिजलेल्या असल्यामुळे डोळे ताणून बघाव्या लागतात.
याच्या नंतरची गुंफेमध्ये विष्णुमूर्तीची स्थापना केलेली दिसते. येथे सुद्धा नित्य पूजाअर्चा चालते. येथे एक अर्धवट कोरलेली मूर्ती आढळते.
'लेण्या' म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येते, तसे काही येथे आढळत नाही. तरीही एक समृद्ध वारसा या दृष्टीकोनातून निश्चितच लेण्यांची जपणूक व्हायला हवी. गैरप्रकार तर आधी थांबायला हवेत. आश्चर्य म्हणजे राखणदारांच्या नजरेसमोर हे सर्व चालते. त्यांनाही त्यातनं काहीतरी मिळतच असेल. असो.
लेण्यांच्या डोंगराच्या माथ्यावरच रेणूका मातेचे मंदीर व एक दर्गा आहे. परंतु लेण्यांकडून वर जाता येत नाही. त्यासाठी खाली उतरून डोंगराला वळसा मारून मागच्या बाजूने वर जावे लागते. त्यामुळे अर्थातच मला परत फिरावे लागले. तो पूर्ण उतार सायकलवर बसून ब्रेक्स दाबत, एका बाजूने पाय घासतच उतरावा लागला. खाली डोंगराच्या मागून जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर आलो व वळसा मारून निघालो. थोडे पुढे आले की लगेच एक कच्चा रस्ता वरच्या दिशेने मंदिराकडे जातो. येथे कोपऱ्यावर साळींदराचे काटे पडलेले दिसले. गाड्यांच्या येण्या जाण्यामुळे बरेच काटे तुटलेले होते. त्यातल्या त्यात चार चांगले काटे मुलीला दाखवण्यासाठी काळजीपूर्वक बॅगमध्ये ठेवले आणि वरच्या दिशेने निघालो. अर्थातच खडा चढ असल्याने सायकल ढकलतच न्यावी लागली. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण झालेले आहे व त्याची देखभालपण केली जाते.
माथ्यावर पोहोचल्यावर फार छान वाटले. सपाटी सुरु होते तिथून पुढे पूर्ण काँक्रीटचा रस्ता थेट मंदीरापर्यंत व दुतर्फा वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची माहिती देणारे फलक. लेण्यांच्या विपरीत हा परिसर मात्र वनखात्याने अतिशय व्यवस्थित ठेवलेला.
मंदिरासमोर दोन प्राचीन डेरेदार वटवृक्ष. त्यांच्या सावलीत १०० माणसे सहज बसतील. तिथे सायकल लावली. मंदिरात मोजून ३-४ जण. प्रशस्त मंदिर. छान दर्शन झाले.
थंडगार हवा असल्याने तिथेच थोडा वेळ बसलो. तिथे बसलेल्या एका स्थानिक तरुणाकडे मंदिराबाबत चौकशी केली, त्याला काहीच माहिती नव्हती. मात्र त्याच्या शेजारच्या मुस्लीम म्हाताऱ्याने जुजबी माहिती पुरवली. मूळ मंदिर शेकडो वर्षांपूर्वी रामराजांच्या काळात बांधलेले. परंतु भूकंपात पडझड झाल्याने सध्या अस्तीत्वात असलेले काँक्रीटचे मंदिर बांधण्यात आले. समोरच्या दीपमाळा सुद्धा लोकवर्गणीतून नविन बांधण्यात आल्या. चारही बाजूंनी मंदिर फिरून बघताना मध्येच घड्याळाकडे लक्ष गेले. सव्वा वाजला होता. डोक्यात घंटा घणघणली. आता निघायलाच हवे नाहीतर लातूर पोहोचेपर्यंत अंधार होणार. ताबडतोब परतीच्या प्रवासाला निघालो. खाली उतरताना सायकल हातात धरूनच आणली. खाली आल्यावर मात्र सायकल वेगाने खरोसाच्या दिशेने पळवली.
खरोसा स्टँडवर आल्यावर काहीतरी खाऊनच निघायचे ठरवले. एका हॉटेलमध्ये गरमागरम पोहे आणि चहा घेतला. पाण्याची बाटली घेतली. दोन वाजले होते. डोक्याला रुमाल बांधला आणि निघालो. उद्दीष्ट पूर्ण झाल्याच्या उत्साहात छान वेग पकडला होता. ऊन मी म्हणत होते परंतु त्याचे काही वाटत नव्हते. छोटे छोटे चढ नंतर व्यवस्थीत हलका उतार. मधेच कुठेतरी एका छोट्या खड्ड्यात सायकल आदळली आणि मागचे मडगार्ड खळ्ळळ्ळ वाजायला सुरुवात झाली. स्प्रिंगची कांईंकुंईं आणि मडगार्डची खळ्ळखटक अशी वाजतगाजत यात्रा निघाली. १५-२० मिनीटात शेडोळला पोहोचलो. इथे थांबलो. पाणी प्यायलो आणि निघालो. इथे थोडी गडबड झाली. कुठेतरी चुकीचे वळण घेतले अन् गावात पोहोचलो. रस्ता अनोळखी वाटल्याने तिथल्याच मुलींना विचारले, त्यांनी उलट्या दिशेने जायला सांगीतले. आता पार गावातल्या छोट्या गल्ली बोळांमध्ये आलो. विचारत विचारत गावाबाहेर पडलो एकदाचा. तरी शेवटची खात्री करुन घेण्यासाठी एका झाडाखाली पत्ते खेळत बसलेल्या म्हाताऱ्यांच्या टोळक्याकडे विचारपूस केली. "जावा सरळ" असे उत्तर मिळाल्यावर जोरात सायकल मारायला सुरुवात केली. आता रस्ता ओळखीचा दिसायला लागला. पुन्हा संगीतमय प्रवास सुरू. रणरणत्या उन्हात, निर्मनुष्य रस्त्यावर ते तसले आवाज फारच भकासवाणे वाटतात. मजल दरमजल करत त्या गाडीरस्त्यावर आलो. फार बरे वाटले. पुन्हा एकदा सायकल बाजूला लावून बसलो. भरपूर पाणी प्यायलो. १० मिनीटे बसून निघालो. पुढचा रस्ता झटपट कापणे आवश्यक होते. येळी मागे सोडून देवांग्राच्या रस्त्याकडे लागलो. आता फाट्यावर विचारायची गरज पडली नाही. उजवीकडे वळून देवांग्राच्या दिशेने निघालो. आता मात्र वेग कमी झाला होता. जीवावर येऊन सायकल चालवत होतो. १५-२० मिनिटात देवांग्रा मागे सोडले. आता थेट कवठा पाटी आणि मोठा रस्ता. परंतु वेग काही वाढत नव्हता. त्यात हलका चढ सुरू झाला. हा चढ बराच लांब होता. पायांनी बोलायला सुरुवात केली तरी हळूहळू चालवतच होतो. शेवटी पायांनी बगावत केलीच. खाली उतरून पायी चालायला सुरुवात केली. बरंच अंतर पायी चालून चढ संपल्यावर पुन्हा सायकल सुरू. खरेतर थांबायची इच्छा होती पण झाड कुठेच दिसत नव्हते. शेवटी एक छोटे बाभळीचे झाड बघून त्याच्या खाली बघून बसलो. आत्ता मला आठवण झाली की घरून निघताना खुराक घेतला आहे. बोंबला. पटकन बॅग मधली छोटी कॅरीबॅग काढली. थोडे खाल्यावर बरे वाटले. उरले सुरले पाणी संपवले. लोदगा जवळ आले होते, त्यामुळे पाण्याची चिंता नव्हती. पाय अजूनही नको म्हणत होते तरी निघालो. सावकाश कवठा पाटीच्या दिशेने निघालो.
लांबून फाटा दिसला की जोर वाढला. फाट्यावरून डावीकडे वळून कवठा पाटीला पोहोचलो फार हायसे वाटले. आता वेळेत लातूरला पोहोचू असा विश्वास वाटू लागला. पाटीवर डावीकडे वळून हमरस्त्यावर आलो. थोडा वेग वाढला. घाम पुसत खाली मान घालून मुकाट्याने रस्ता कापत पानचिंचोली पाटी पार केली. आता लोदगा समोरच. सकाळी झटक्यात पार झालेले अंतर कापायला आता कष्ट पडत होते. मास्तरचा मार खाल्लेल्या मुलासारखा मी खाली मान घालून सायकल चालवतच होतो. लोदगा दिसल्यावर जीवात जीव आला. भरभर लोदगा ओलांडून सकाळच्या कारभारीच्या हॉटेलवर आलो. सायकल लावून मधे जाऊन धप्पकन बाकड्यावर बसलो. फार बरे वाटले. साडेतीन वाजले होते. आता बऱ्यापैकी गर्दी होती. मी श्वास घेतलाही नव्हता की कारभारीनी लगेच घोषणा केली,"साहेब लातूरहून सायकलवर खरोश्याला गेल्ते." कुठल्यातरी कार्यालयातले कर्मचारी, कॉलेजमधली मुले यांच्याकडून चौकशीचा कार्यक्रम पार पडला. कारभारी गरम भजे तळत होते. लगेच ऑर्डर दिली. थंड पाण्याने तोंड धुतले. भरपूर पाणी पिऊन भज्यांचा फडशा पाडला. कारभारीनी पण मोठ्या मनानी ढीगभर भजे दिले होते. त्यावर चहा पिऊन निवांत बसून राहीलो. आता निघायची इच्छा होत नव्हती. जवळपास अर्धा तास बसून होतो. शेवटी भरपूर हिंमत गोळा करून उठलो. पाणी भरून घेतले. खरेतर लातूर अगदी जवळ आले होते. परंतु पायांची कुरकुर चालू होती. तरीही निघालो.
अगदी सावकाश निघालो. छोटे छोटे चढ, एरव्ही लक्षातसुद्धा येत नाहीत, ते सुद्धा परिक्षा बघत होते. त्यात भरीस भर 'सीट'ने सुद्धा कुरकुर करायला चालू केली. (याला 'सॅडल सोर्स' असे म्हणतात, हे मोदकदादाच्या एका लेखामधून समजले ). बेकार त्रास होत होता. दर पाच मिनीटाला सीट थोडे वर उचलायचे पुन्हा बसायचे. वाटेत एका ट्रकवाल्याने थांबवले. त्याचा ट्रक बंद पडला होता आणि फोनमध्ये पैसे नव्हते. त्याला त्याच्या मालकाला फोन लावून दिला. पुढे निघालो. हळूहळू वर उचलत, बसत भुसणी पार केले. बायकोचा फोन "किती वेळ?" "अजून एक तास." लातुर १४ किमी. भुसणी ते बाभळगाव ७ किमी मध्ये २ वेळा थांबलो. २ मिनीट थांबायचे, पाणी प्यायचे, निघायचे. पाचच्या सुमारास बाभळगाव पोहोचलो. २ मिनीट थांबून निघालो. पोलिस प्रशिक्षण केंद्राचा चढ पार करून एकदाचा लातूरमध्ये प्रवेश केला. पुढच्या मोठ्या उताराने दिलासा दिला. परंतु हा दिलासा फारवेळ टिकला नाही. नाका पार करताच विवेकानंद चौकाचा भला मोठा चढ हाताच्या बाह्या वर करून "ये बेट्या तुला दाखवतो" अशा अविर्भावात उभा होता. मुकाट्याने खाली उतरून पायी पार केला. चौकात आल्यावर पुन्हा सायकलवर बसलो. पण खरं सांगतो सायकलवर बसवत नव्हतं. तसंच सकाळच्या गल्ली-बोळा पार करत, दोन वेळा थांबत घरी आलो. घराजवळ पोहोचता पोहोचता बायकोचा फोन "किती वेळ?" मी म्हणालो,"आलोच पाच मिनीटात." बरोबर ६:१० ला बिल्डींगच्या खाली पोहोचलो.
घरात आल्या आल्या शूज काढेपर्यंत बायको गरमागरम चहा पाणी घेऊन हजर. आहाहा !!! राजा महाराजा असल्यासारखे वाटले राव !! मस्त चहा पिऊन, आंघोळ करून अंतरे मोजायला बसलो. तब्बल ९६ किमी !!!!!!! शतकाच्या दारावर टकटक करून वापस आलो. अभिमानाने ऊर भरून आला. बरंच काही शिकलो. आता लांब पल्ले करू शकतो याचा आत्मविश्वास पण वाढला.
प्रतिक्रिया
20 Jan 2016 - 10:24 pm | पैसा
मस्तच लिहिलंत!
20 Jan 2016 - 10:26 pm | पद्मावति
वाह, मन:पूर्वक अभीनंदन.
मस्तं वृत्तांत. खूप छान लिहिलंय.
फक्तं फोटोज फारच लहान दिसताहेत. त्याचा आकार वाढवता आला तर बघा प्लीज़.
20 Jan 2016 - 10:49 pm | एस
क्या बात है!
अभिनंदन!
20 Jan 2016 - 10:54 pm | राघवेंद्र
मस्त झाली सायकल स्वारी!!! लातुरची आठवण आली.
20 Jan 2016 - 10:59 pm | sagarpdy
फार मस्त. चलाते रहो.
20 Jan 2016 - 11:39 pm | मित्रहो
सफर मस्त झाली. ९६ किमी जबरदस्त.
21 Jan 2016 - 7:17 am | प्रचेतस
लिखाण आवडले.
मला ह्या लेण्या वाकाटक राजवटीतील वाटतात. तेव्हा ह्या भागात वाकाटकांचे राज्य होते. वत्सगुल्म ( वाशिम) येथे त्यांची एक शाखा राज्य करत होती. गुप्त आणि वाकाटक ही दोन श्रेष्ठ घराणी वैवाहिक संबंधाने जोडली गेली होती.
21 Jan 2016 - 7:23 am | कंजूस
तिकडचं लेखन हवंय. लिहित रहा.पुण्य मुंबईचं फार होतं.वर्णन आवडलं.फोटो मोठे करून घ्या सासंकडून.
21 Jan 2016 - 12:27 pm | मोदक
झक्कास प्रवासवर्णन.. टाळ्या..!!! __/\__
माझी पहिली लोणावळा राईड आठवली - रणगाड्यावरून केली होती आणि अशीच वाट लागली होती. :)
21 Jan 2016 - 12:34 pm | अरिंजय
सर्वांचे मनापासून आभार.
छायाचित्रांचा आकार कसा वाढवायचा या बाबत कृपया माहितगार मित्रांनी मार्गदर्शन करावे.
21 Jan 2016 - 2:33 pm | तुषार काळभोर
नमस्कार,
मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी साहित्य संपादक असतील. त्याविषयी अधिक माहिती येथे आहे.
21 Jan 2016 - 1:43 pm | जगप्रवासी
मस्त झाली सायकल स्वारी
21 Jan 2016 - 8:25 pm | अरिंजय
धन्यवाद.
21 Jan 2016 - 8:41 pm | मयुरMK
छान लेखन ,पुढील प्रवासा-साठी शुभेच्छा,,
22 Jan 2016 - 7:22 am | अरिंजय
सर्वांचे आभार.
फोटोंचा आकार कोणी वाढवून दिला ते कळाले नाही. मनापासून धन्यवाद.
22 Jan 2016 - 11:57 am | हेमंत लाटकर
छान लेख.
22 Jan 2016 - 12:06 pm | चांदणे संदीप
लिहिता मस्त राव तुम्ही! आवडले लेखन!
तुमच्या पुढील सर्व सायकल स्वार्यानसाठी शुभेच्छा!
Sandy
22 Jan 2016 - 2:35 pm | रातराणी
एकदम गप्पा मारत असल्यासारखं वाटल वाचताना! मस्त!
22 Jan 2016 - 2:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
अभिनंदन!! चलाते रहो! छान ट्रिप मारलीत
22 Jan 2016 - 10:22 pm | अरिंजय
धन्यवाद
2 Feb 2016 - 10:29 am | अल्पिनिस्ते
_/\_
4 Sep 2016 - 10:28 pm | केडी
मस्त.....अजून लिहीत जा....
4 Apr 2017 - 11:41 pm | इरसाल कार्टं
ह्येबी ब्येष्ट