डिंकेल्सब्युल

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 9:17 pm

.
.
आम्ही पुन्हा रोथेनबुर्गला चाललो आहोत, हे ऐकून त्सेंटाआजी जरा वैतागलीच. "अगं, रोथेनबुर्ग सुंदरच आहे, पण सारखं काय तिथेच जाता? अजून थोडंसं, ५० कि.मी. पुढे जा की डिंकेल्सब्युलला. कितीदा सांगायचं? तेही किती सुरेख आहे. आमच्या वालरष्टाईनच्या शाळेतून तिथे सहल न्यायचे. आम्ही मित्रमंडळी दंगा करत जायचो, खूप मजा यायची." एव्हाना त्सेंटाआजीच्या जागी मला फ्रॉकातली, दोन सोनेरी वेण्या उडवत जाणारी शाळकरी पोर दिसू लागली होती. तिचं मन मोडवेना, मग मात्र आम्ही पुढच्या मोठ्या विकांताला रोथेनबुर्गच्या पुढे साधारण ५० कि.मी.वर असलेल्या रोमँटिक रोडवरच्या डिंकेल्स्ब्युलला जायचा बेत पक्का केला आणि आमच्यापेक्षा त्सेंटाआजीलाच जास्त आनंद झाला. रोथेनबुर्गचं अगदी चुलत भावंड म्हणता येईल असं, गावाला वेस असलेलं, मध्ययुगातल्या घरांनी आजही तसंच नटलंसजलेलं फ्रांकोनिया प्रांतातले वॉर्निट्झ नदीवर वसलेलं हे गाव, गाव नव्हे तर पवित्र रोमन साम्राज्यातलं एक संस्थानच!

.

अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेलं हे गाव! उत्तर आणि दक्षिण जर्मनीला पार इटलीपर्यंत आणि र्‍हाइनमार्गे पूर्व युरोपला जोडणारं हे गाव फार जुना इतिहास बाळगून आहे. अगदी आठव्या, नवव्या शतकापासून डिंकेल्स्ब्युलचा उल्लेख आढळतो. मात्र त्याला स्वतंत्र संस्थानाचं स्वरूप तेराव्या शतकात आलं. ह्याच काळात गावाला मजबूत दगडी वेस बांधली गेली. विणकाम आणि कापडाचं उत्पादन ह्यामुळे शहर संपन्न होत गेलं. त्यामुळे व्यापारी संघटनांच्या हातात मोठीच सत्ता आली होती. प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक गटांमध्ये अनेकदा कुरबुरी होत असत. प्रोटेस्टंटाची संख्या जरी येथे जास्त असली, तरी १७व्या शतकात दोघा गटात झालेल्या तहानुसार दोन्ही समुदायांना सारखेच हक्क प्रदान करण्यात आले.

इस. १६१८ ते १६४८मध्ये चाललेल्या तीस वर्षाच्या युद्धात जर्मनीचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला होता. पण डिंकेल्सब्युल मात्र त्यातून सहीसलामत बचावलं आणि ह्याचं श्रेय जातं तेथल्या लेकराबाळांच्या वानरसेनेला. स्वीडिश सेनापती कर्नल स्पेरुखने गाव बेचिराख करण्याची धमकी दिली. सैन्य वेशीपाशी येऊन धडकलं होतंच. हे संकट कसं परतून लावायचं ह्यावर नगरपरिषद विचारविनिमय करू लागली. एका पहारेकर्‍याच्या लोरा नावाच्या मुलीने आपल्या मित्रमंडळींना गोळा केलं आणि कर्नलपुढे अपिल करण्याची कल्पना मांडली. नगरपरिषदेने त्यांना परवानगी दिली. विध्वंसाच्या उद्देशाने जेव्हा स्वीडिश ट्रूप वेशीच्या आत शिरला, तेव्हा लोरा तिच्या बँडसह दयेची याचना कमांडरपुढे गाऊ लागली. आणि काय आश्चर्य! दगडाला पाझर फुटला. सेनापतीचं मन द्रवलं आणि त्याने चढाईचा निर्णय मागे घेतला. तो लोकांना म्हणाला, "लक्षात ठेवा, आज ह्या मुलांमुळे तुमचं गाव वाचलं आहे. तुम्ही त्यांच्या कायम ऋणात राहा."

तेव्हापासून दर वर्षी जुलै महिन्यात येथे 'किंडरझेकं' साजरा केला जातो. मोठ्ठी मिरवणूक निघते. सारे जण मनाने १७व्या शतकात पोहोचतात. त्या काळच्या सैनिकांसारखे कपडे करतात. त्या मिरवणुकीत मुलांचे बँड गाणी गात जातात. त्यांना चॉकलेटं, खाऊ, खेळणी देऊन त्यांचे लाड केले जातात. दर वर्षी ३०,०००पेक्षा जास्त लोक हा उत्सवी सोहळा पाहायला गर्दी करतात. ह्या वर्षीचा सोहळा हुकला, पण कधीतरी त्यात सहभागी व्हायला जायचा विचार आहे.

.

.

.

नेहमीप्रमाणेच गावातली गजबज टाळून निवांत असं एखादं हॉटेल किवा फार्म हाउस मिळतं का ते शोधलं आणि गावाच्या अगदी एका टोकाला एका फार्म हाउसमध्ये बुकिंग केलं. दोन-अडीच तासाचाच रस्ता असल्याने दुपारी निवांत बाहेर पडलो. ऑटोबानला फार रहदारी नसल्याने अगदी वेळेआधीच डिंकेल्सब्युलच्या जवळ आल्याची वर्दी जुन्या बांधणीच्या घरांनी, चर्चेसनी दिली. गावाला वळसा घालून त्या फार्म हाउसवर पोहोचलो, तर इथेही एका आजीनेच आमचं स्वागत केलं. अशा ठिकाणी बरेचदा साठीच्या पुढच्या तरुण आज्याच भेटल्यात आम्हाला जिकडेतिकडे! टुमदार घर, घरापुढे लहानसं अंगण आणि बाल्कनीतून पाहिलं तर हिरव्या शेतातून दूरवर जाणारी पायवाट! ती पायवाट आम्हाला खुणावत होतीच. आजीकडून जुजबी माहिती, नकाशा घेऊन आम्ही त्या वाटेवरून चालू लागलो. सूर्य बुडायला अवकाश होता, पण उन्हं कलली होती. अशा संध्याकाळी एका बाजूला मोठा रस्ता आणि त्याला समांतर ही पायवाट, दोबाजूला शेतं, कुरणं, कुरणात चरणार्‍या शेळ्या, अंगणात बागडणार्‍या कोंबड्या, बदकं पाहत, रेंगाळत आम्ही निवांत एक फेरफटका मारून तेथेच कोपर्‍यावर असलेल्या एका इतालियन रेस्तराँमध्ये जेवलो.

.

.

दुसर्‍या दिवशी त्सेंटाआजीच्या ह्या लाडक्या डिंकेल्स्ब्युलला नीट भेटायचं ठरवून झोपलो. सकाळी नव्हे, पहाटेच पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि गाईंच्या हंबरण्याने जाग आली. खिडक्या, बाल्कनीचं दार उघडलं, तर तांबडं फुटत होतं नुकतंच. पण इतकं प्रसन्न वातावरण होतं की उठलोच लगेच आम्ही. आवरून, नाश्ता करून गाव पाहायला निघणार, तेवढ्यात ह्या आजीने सांगितलं, "गाडी नेऊ नका गावात. पार्किंग नाही चटकन मिळत. तुम्ही ह्या पायवाटेने चालत का नाही जात? जास्त नाही, फार तर २ कि.मी. असेल. खूप छान रस्ता आहे." रस्ता छानच होता ते तर आम्ही कालच पाहिलं होतं. गाडी तिथेच ठेवून मग त्याच पायवाटेने गावाच्या मुख्य भागात निघालो. ही दूरवर जाणारी वाट आम्हाला स्वप्नामधील गावात नेत होती. एव्हाना गाईगुरं कुरणात चरताना दिसू लागली होती. पक्ष्यांची किलबिल मध्येच ऐकू येत होती. मेपल्स दोबाजूंना चवर्‍या ढाळत, सावली धरत होते. बाजूच्या मोठ्या रस्त्याने एखाददुसरी गाडी पळताना दिसत होती. आम्ही रमतगमत वेशीपर्यंत पोहोचलो.

.

.

रोमँटिक रोडवरच्या ह्या जवळपास ३५० कि.मी.च्या पट्ट्यात सगळी अशीच कौलारू, लाकडी घरं, दगडी बांधीव रस्ते, गावाच्या टोकाला असलेली दाट बनं, वळणावळणाचे अटकर रस्ते, गावातले चर्च, मार्केटप्लेस, असा सगळा नजारा असतोच. पण तरीही प्रत्येक गावाचं वेगळेपण उठून दिसणारं काहीतरी सापडतंच. ह्या गावाला पूर्ण वेस आहे, पण रोथेनबुर्ग किवा नॉर्ड्लिंगनसारखे भिंतीवर/बुरुजावर चढून चालता येत नाही. गावाभोवती मजबूत उंच दगडी भिंत आहे. त्या भिंतीच्या आतून किवा बाहेरून गावाला प्रदक्षिणा घालता येते. वेशीला १८ मजबूत मिनार आहेत. पूर्वीच्या काळी त्यामध्ये चौक्या असत, जेथून टेहाळणीचे सैनिक गावाचं रक्षण करीत असत आणि चारी दिशांना चार मजबूत प्रवेशद्वारं आहेत. रोथेनबुर्गर टोअर, नॉर्डलिंगर टोअर, वॉर्निट्झ टोअर आणि त्सेगरिंगर टोअर! त्यातल्या रोथेनबुर्गर टोअरमधून आम्ही आत शिरलो.

.

उंच मिनाराने सजलेल्या ह्या प्रवेशद्वाराचा मजबूतपणा अजूनही शाबूत आहे. बाजूलाच एक सुंदर बगिचा आहे. तेथील बाकावर बसून नदीत तरंगणारे हंस, बदकं पाहण्यात वेळ कसा जातो ते समजत नाही. बाजूला असलेल्या पायवाटेने चालत गेलं की ओपन थिएटर दिसतं. दाट झाडांच्या सावलीत एका बाजूला उभा केलेला खुला रंगमंच आणि त्याच्या समोर मांडून ठेवलेल्या खुर्च्या! त्या मंचावर जाऊन काहीतरी सादर करावंसं वाटू लागलं. न राहवून तिथे गेलेच आणि 'श्रावणमासी' म्हणू लागले. आजूबाजूने जाणारे लोक थबकलेत असं वाटल्यावर ओशाळून खाली उतरले. लोकांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. त्यांना भाषा समजली नाही, तरी 'श्रावणमासी..चा भाव' समजला असावा.

.

.

.

आत शिरताच दिसतात ते बांधीव दगडी रस्ते आणि त्यांच्या दोबाजूला असलेली टुमदार लाकडी कौलारू घरं! थोडं पुढे गेलं की गावची चहेलपहेल सुरू होतेच. कोपर्‍यावरच्या बेकरीतून खमंग वास येऊ लागतात आणि बाजारातली ताजी फळं, फुलं, भाज्या तितक्याच टवटवीत आज्या विकायला बसलेल्या दिसतात. तेथून पुढे गेलं की १५व्या शतकातले सेंट जॉर्ज आणि त्याहून पुरातन असणारा चर्चचा टॉवर ह्यांना भेट द्यायलाच हवी. परत चर्च? काय बघणार सारखं त्या चर्चमध्ये? असा विचार मनात आला तरी आत जाऊन पाहू या तरी.. अशा विचाराने आत गेलो. एवढ्याशा नखाएवढ्या गावातलं हे गॉथिक आर्किटेक्चरने सजलेलं भव्य आणि प्रभावी चर्च पाहताना खरंच मोहून जायला होतं. आतमधलं लाकडी कोरीवकाम, उंच छत, त्यावरची चित्रकारी आणि वेदीपासून ऑर्गनपर्यंतची सजावट - सारंच देखणं आहे. दर शुक्रवारी दुपारी २.३० वाजता येथे फ्री ऑर्गन कॉन्सर्ट असते. तेथल्या टॉवरवर चढून जाऊन तेथून गावाचं विहंगम दर्शन फार सुखद वाटतं.

........

टूरिस्ट इन्फो.च्या ऑफिसातून गावचा नकाशा घेऊन चर्चपासून चालायला सुरुवात केली, तर वेशीच्या बाजूने दगडी आणि कधी मातीच्या कच्च्या रस्त्यावरून चालत गाव समजून घेता येतं. गावाचा असा फेरफटका करायला मजा येते. जुन्या लाकडी टुमदार घरांच्या अंगणातल्या झोपाळ्यावर बसलेले आजी-आजोबा आपल्या चेहर्‍यावरचा टूरिस्ट स्टँप वाचत स्मितहास्य करत हात हलवतात. घरासमोर असलेल्या अंगणातली फुलझाडंसुद्धा 'माझा फोटो काढा की' असं खुणावत असतात. वेशीच्या बाजूने चालताना अध्येमध्ये दिसणार्‍या टेहळणीच्या मनोर्‍यातून आत्ता 'होश्शियार'चा आवाज येईल आणि त्यामागोमाग खाड खाड बूट वाजवत चौकीवरचा सैनिक गस्त घालायला येईल असं वाटतं.

........

किती पाहू आणि किती नाही? असं वाटत असतं. यादीत पाहण्याच्या टॉप लिस्टमध्ये नसलं, तरी प्रोटेस्टटांचं १९व्या शतकातलं कार्मेलाइट्स मॉनेस्टरीच्या जागेवरील सेंट पॉल चर्च पाहण्यासाठी आपण आत शिरतोच. जुन्या काळी कापडाच्या व्यापारात अग्रणी असलेल्या ह्या गावात नैसर्गिक रंग उत्पादन आणि कापड डायिंग करण्याचा उद्योग भरात होता. आता बंद पण एकेकाळी प्रसिद्ध अशी जुनी डायिंग मशिन्स पाहताना त्या काळचं तंत्र कसं असेल ह्याची कल्पना येते.

.

.

नॉर्डलिंगन टोअर, वॉर्निट्झर टोअर, त्सेगरिंगर टोअर पार करून परत रोथेनबुर्गर टोअरपर्यंत येईपर्यंत सहज दोन-तीन तासाच्यांवर झालेले असतात. पाय बोलायला लागलेले असतात आणि पोटातल्या कावळ्यांचं समूहगान चालू झालेलं असतं. तेथे असलेल्याच एका जर्मन रेस्तराँमध्ये केझ स्पेट्झलं, माउल्ट ताशं आणि डुंकेल बिअरचा आस्वाद घेत आता फियाकातून म्हणजे घोडागाडीतून गावातून फेरफटका मारण्याचा बेत आखला जातो. उमद्या घोड्यांच्या त्या बग्गीतून फिरताना मिस्कील किस्से सांगत गाडीवान आपल्याला १७च्या, १८व्या शतकात नेतो. बग्गीत नाही, तर अगदी टाइम मशीनमध्ये बसून आपण त्या काळातच पोहोचतो जणू. त्या गोष्टी ऐकताना थकवा पळून जातो. बग्गी फेरी पूर्ण करून परत सेंट जॉर्ज चर्चपाशी येते आणि मग मात्र कोपर्‍यावरचा गिलेटोरिया खुणावू लागतो.

........

.

प्रसन्नतेने भरलेलं आणि मंतरलेल्या डिंकेल्स्ब्युलमुळे भारलेलं मन घेऊन तशाच भारल्या अवस्थेत मग परतीचा प्रवास चालू होतो.
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 9:46 am | नूतन सावंत

वा!स्वाती, दिवाळी रंगीन झाली हं त्सेंटाआजीच्या डिंकेल्स्ब्युलमुळे.

सुरेख वर्णन.किती छान ठिकाण आहे.

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 3:30 pm | मधुरा देशपांडे

खूप छान वर्णन.

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 4:31 pm | कविता१९७८

नेहमीप्रमाणे खूप छान वर्णन

पैसा's picture

11 Nov 2015 - 1:38 pm | पैसा

कस्लं सुंदर आहे! तिथे श्रावणमासी हर्षमानसी!! मस्तच!!

वाह! फारच छान ओळख एका सुरेख गावाची!

विशाखा पाटील's picture

12 Nov 2015 - 8:49 am | विशाखा पाटील

सुंदर गावाची सुंदर शैलीत ओळख!

मितान's picture

12 Nov 2015 - 9:05 am | मितान

किती सुंदर लिहिलंयस ताई ! तुझे असे सगळे लेख एकत्र करून त्याचं पुस्तक काढलंच पाहिजे आता.
मला पुन्हा एकदा यायचंय युरोपात...

मस्तं वेगळ्याच ठिकाणाची सुंदर ओळख.
श्रावणमासी चा किस्सा तर खूप आवडला.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2015 - 5:36 pm | मुक्त विहारि

आता पुढचे गांव कुठले?

थोडक्यात, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2015 - 5:46 pm | मुक्त विहारि

आता पुढचे गांव कुठले?

थोडक्यात, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2015 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनवट गावाची चित्रसफर आवडली !

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2015 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

स्वातीतैचा धागा उघडला की एकतर जगभ्रमंती तरी घडते किंवा खाद्यभ्रमंती तरी __/\__
आणि जे काही असेल ते आम्हाला श्रीमंती देऊन जातेच.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 8:29 pm | सानिकास्वप्निल

सुंदर गावाची सुरेख ओळख.
फोटो ही आवडले.

जव्हेरगंज's picture

15 Nov 2015 - 11:15 am | जव्हेरगंज

aha!!

वा अतिशय सुंदर , स्वप्नातला गाव शोभावा ऐसा :)

नाखु's picture

25 Nov 2015 - 2:28 pm | नाखु

आणि एक्दम अपरिचित ठिकाणाची ओऴख आवडली..

बॅटमॅन's picture

25 Nov 2015 - 2:57 pm | बॅटमॅन

एक नंबर!!!!!!