प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 8:38 pm

.
.
गेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच.

“अरे, मला तुझी रिअॅक्शन बघायचीय. कधी सुरू होणार नेट?" तो वैतागला. आता मला धीर निघेना. “अरे, मी तुला अॅक्शन रिप्ले करून दाखवेन आपण भेटल्यानंतर, पण काय ते आताच सांग मला.” तो सांगायला तयार नाही अन् मी त्याच्यामागे लकडा लावलाय की, "सांग ना, सांग ना." अशी पाच मिनिटे गेली. पण तोही अर्थातच ही बातमी सांगायला तितकाच उत्सुक होता. (कारण त्याचेही जवळजवळ २० वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार होते.) अर्थात हे कारण मला नंतरच समजले.

”ठीक आहे, काका कुठे आहेत? त्यांनापण बोलव आणि फोन स्पीकरवर टाक.” एकदाचा तो तयार झाला. सुधीरला मी बोलावले. तो येतायेता बोलला, ”काय रे, पोरगी पाहिलीस की काय?”

“काय काकापण भंकस करतायत? आत्या, फोन स्पीकरवर टाकलास का?” मीही अधीरतेने उत्तर दिले, ”हो, हो. तू सांग ना लवकर.”

“ओ.के. अब दिल थामके सुनो.” वर्धन उत्सुकता वाढवू लागला. “बाबा, सांग ना आता लवकर, की पाया पडू आता..” माझीही अधीरता वाढलेलीच. ”आपण भारत-पाकिस्तान मॅच बघणार आहोत एकत्र स्टेडियममध्ये बसून. तीही वर्ल्ड कपमधली.” माझी आरोळी छत भेदून गेली. नवराही आश्चर्यचकित झालेला. ”काय सांगतोस?” मी जोरात ओरडूनच विचारले. माझाही आनंद ओसंडून चाललेला. ”हो गं, तसं बुकिंग नोव्हेंबरमध्येच झालं होतं, पण तिकिटं आताच हातात आलीयेत. लगेच तुला फोन केला. भारत-पाकिस्तान आणि भारत-साऊथ आफ्रिका अशा दोन मॅचेस आपण पाहणार आहोत आणि फिरणारही आहोत. ११ फेब्रुवारी ते ३ मार्च असा प्रोग्रॅम आहे.” थोडया वेळाने फोन करते असे सांगून मी फोन ठेवला.

मी नि:श्वास टाकला. मला माझे ध्येय मिळाले होते. आता तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. वर्धन हा माझा भाचा, माझ्या लहान भावाचा मुलगा. पण तो जन्मल्यापासून त्याला माझी न् मला त्याची ओढ. (मी लेबर रूममध्येच होते त्याच्या आईसोबत. त्याच्या आईअगोदर तो माझ्या हातात आलेला.) मला स्वत:ला मुले होऊ शकली नाहीत, पण माझ्या नणंदा, जावा, वहिन्या यांच्या मुलांशी, माझ्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांशी आणि दर वर्षी एक असे करून दत्तक घेतलेल्या माझ्या अकरा मुलींशी माझे भावबंध अतिशय सुरेख आहेत. अर्थात त्यात वर्धन नेहमीच पहिला राहिला आहे. तो सहा वर्षांचा असताना माझा भाऊ गेला. त्या वेळी वहिनी सहा महिन्यांची गरोदर होती. तिला झालेली मुलगी वेदांगीही माझ्या नवर्‍याशी मुलीसारखी जोडलेली आहे.

वर्धन माझ्या मागेच असायचा. त्याचा अभ्यासही मीच घेत असे. ओपन डेला शाळेतही जात असे. दहावीला तो शाळेत पहिला आला होता. तसे पहिले येण्याची परंपरा खूप आधीच सुरू झाली होती. तिसरी-चौथीत असताना एकदा त्याला घरी यायला उशीर झाला, म्हणून मी त्याला शोधायला निघाले. शाळेत गेल्यावर पाहिले, तर तिथेही नव्हता. कुठे रस्त्यात आहे का बघू या, म्हणून इकडेतिकडे पाहत चालले असता गल्लीत एक/दोन घरे सोडून खाली वाकून काहीतरी पाहत असलेला दिसला. मी जाऊन पहिले, तर एका मोठ्ठया टबमध्ये ठेवलेले जिवंत खेकडे तो पाहत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तर “आत्या, सी, हाऊ बिग क्रॅब्स.”

मी वर पहिले. तिथे पाटी होती ‘FRESH CATCH’. मी दार ढकलले. आत घरगुती पद्धतीची एक खानावळ दिसत होती. आपण गोव्यात असण्याचा फील देणारी. आम्ही आत गेलो. इनमीन चार टेबले. एका बाजूला काउंटर, त्याच्या मागे जिना. काउंटर आणि टेबल यांच्या मध्ये एका दरवाजा. काउंटरच्या समोरच्या भितींवर हाताने काढलेली निसर्गचित्रे आणि काउंटरच्या मागे मालकाचे काही फोटो. एकात मालक हातात ताजे मासे घेतलेला आणि दुसर्‍यात सचिन तेंडुलकरसोबत. खुर्चीत बसता बसता वर्धन उसळला आणि जवळ जाऊन फोटो पाहू लागला.

त्या वेळी तोही शिवाजी पार्कमध्ये श्री. पद्माकर शिवलकर यांचे धाकटे भाऊ श्री. दास शिवलकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेत असे. नंतर दोन वेळा नाकावर बॉल बसून नाकाला जखम होऊन नाकाचे हाड मोडून झाल्यावर ते बंद झाले, हे अलाहिदा. पण क्रिकेटची आवड तशीच होती. मॅचेस आवडीने पाहत असे. परीक्षेच्या वेळी मॅच असली, तर मॅच पाहून झाल्यावर कितीही उशिरापर्यंत जागून दिलेला अभ्यास पूर्ण करत असे. सगळ्यात मजा यायची ते भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळी. सगळेच जोशात असायचे. दुसरीत असताना वर्धनने एक दिवस भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळी जाहीर केले, ”आत्या, ऐक. तू आणि मी भारत-पाकिस्तानची एकतरी मॅच स्टेडियममध्ये बसून बघायची हं..” मीही हसून म्हटले, ”का नाही? पण तू दाखवायची हं मला मॅच.” त्यालाही त्याने रुकार दिला. ते तेवढ्यावरच थांबले. नंतर मी विसरूनही गेले होते हा प्रसंग. काही वर्षांतच बाळासाहेबांनी आक्षेप घेतल्याने पाकिस्तानबरोबरच्या आपल्या देशात होणार्‍या मॅचेस बंदच पडल्या. त्यामुळे पुढे प्रश्नच उद्भवला नाही. असो.

“आत्या, बघ ना, सचिनही येतो इथे जेवायला.” जेवणाची ऑर्डर दिली. जेवण तर अप्रतिमच होते आणि असते इथले. आम्ही जेवल्यावर इतका वेळ वेटरला मदत करणारा मालक येऊन काउंटरमागे असलेल्या खुर्चीवर बसला. बिल आल्यावर मात्र आपण गोव्यात नसून मुंबईत आहोत याची जाणीव झाली. बिल देतादेता मी विचारले. ”सचिन अजून येतो का हो इथे?”

“नाय ओ, आता कुठे येणार? पण घरी ऑर्डर मात्र नेमीच असते.” मालकाने हसत सांगितले. वर्धनला जेवण फार आवडले होते. ”आत्या, आपण नेहमी यायचं न इथे?” ”नेहमी इथे यायचं तर काही सेलिब्रेशनसाठी यावं लागेल, कारण ही विशेष जागा आहे.“ मी बिलाकडे पाहत उत्तर दिले. "आज तू हरवलेलास, तुला शोधता शोधता किती वेळ गेला, आता घरी जाऊन जेवण्यापेक्षा तू सापडलास या आनंदात इथे जेवलो. यानंतर तू जेव्हा जेव्हा पहिला नंबर काढशील, तेव्हा तेव्हा आपण इथे येत जाऊ.” मी पर्सचा अंदाज घेत उत्तर दिले.

त्यानंतर वर्षातून चार वेळा प्रत्येक सेमिस्टरला आम्ही तिथे जेवून घरी येत असू. क्वचितच तीन वेळा. नंतर वेदांगी त्यात सामील झाल्यावर तर तिथे जाण्याचे प्रमाण दुप्पट झाले. सातवीत किंवा आठवीत असताना त्याने जाहीर केले, "मी जेव्हा परदेशात शिकायला जाणार आणि नोकरी करणार, तेव्हा पहिल्यांदा आत्याला तिकीट पाठवणार." त्याची आईही म्हणत असे, ”हो. बरोबर आहे. आज आत्या पाया पक्का करून घेतेय, म्हणूनच तू जाऊ शकशील. तर आत्याचा मान पहिलाच असणार.” यथावकाश एम.कॉम. करून फायनान्समध्ये एम.बी.ए. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून तो वायकातो युनिव्हर्सिटी, न्यूझीलंड येथे गेला. दहावीला जसा शाळेत पहिला आला, तसाच बारावीला नॅशनल कॉलेजमधून बी.कॉम.ला आणि एम.कॉम.ला विल्सन कॉलेजमधून पहिला आला होता. तिथला तीन वर्षांचा कोर्स दीड वर्षांत पूर्ण करून तिथेही पहिला आला. तिथेच नोकरीलाही लागला.

“आत्या, आता मी तुला आणि काकांना विमानाचं तिकीट पाठवणार आहे. थोड्या दिवसांनी तिकीट पाठवणार. तू आणि काका कसे आम्हाला हात धरून फिरवायचात, तसा आता मी तुम्हाला फिरवणार आहे.” एक दिवस त्याने मला फोनवर सांगितले. ”बाळा, लहानपणी ठीक होतं, तू असं म्हणायचास ते. तू मला आधी तिकीट पाठवणार तर मलाही आनंदच होईल, पण आधी आईला बोलाव बरं.” असे मीही सांगत असे. पण त्याच्या आईचीही याला मंजुरी होती आणि सुरुवातीला सांगितलेला तो ऐतिहासिक फोन आला.

मधले वर्ष तयारीत जाऊन आम्ही ११ फेब्रुवारीला सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात चढलो. १२च्या सकाळी पोहोचलो. या विमानात पेप्सी कंपनीने त्याच्या भारतातल्या ५० वितरकांना मॅच पाहण्यासाठी नेले होते. त्यातल्या काहींशी आमची सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर ओळख झाली होती. ते नागपूरहून आले होते. आम्ही इथून आणि वर्धन तिथून साधारण एकाच वेळी अॅडलेडला पोहोचलो. वर्धनने भेटायला सांगितलेल्या जागी त्याला शोधायला हे निघून गेले आणि मी सामान घेऊन एक आसन पकडून बसले. वर्धनबरोबर त्याचा एक मित्र अरुल रेड्डी हाही त्याची पत्नी नमितासोबत येणार होता. या दोघांशीही कधी भेट झाली नव्हती.

मी जिथे वर्धनची वाट पाहत बसले होते, तिथेच हे पेप्सी प्रायोजित लोक त्यांना न्यायला येणार्‍या माणसांची वाट पाहत होते. यात गुजरात, राजस्थान इथूनच्या गावातून आलेलेही लोक होते. ते पहिल्यांदाच परदेशात आले होते. अॅडलेड विमानतळावर तरुण स्त्रीपुरुषांच्या गळा भरून घेतलेल्या गाठीभेटी पाहून त्यांच्यात चलबिचल सुरू झाली. एकमेकांना कोपरे मारत, खुणावत ते ती दृश्ये पाहू लागले, त्यावर शेरे देऊ लागले.

इतक्यात आमच्या अगदी जवळच एक पाठमोरी तरुणी उभी राहिली. उंच बांधा, गोरीपान, बांधेसूद पाय, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधल्या काजोल टाईप, एलाईन फ्रॉक आणि त्यातून डोकावणारी मांडीपर्यंतची पँटी दिसतेय, असा पोशाख होता. 'किती सुरेख पाय आहेत ना या मुलीचे, किती बांधेसूद आहे?' असा विचार मनात येतो न् येतो तोच या लोकांची तिच्याकडे पाहून खुणवाखुणवी चालू झाली. एकमेकांना टाळ्या देत त्यांनी शेरेबाजी सुरू केली. आता त्या मुलीला भाषा समाजात नसली, तरी हे लोक आपल्याबद्दल बोलताहेत हे त्यांच्या नजरांवरून तिला कळले आणि तिने यांच्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकत पूर्णपणे पाठ केली. तिला जरी हिंदी किंवा गुजराती येत नसले, तरी मला येत होते ना!

“ए, क्या कर रहे हो? तुम लोगोंको इसलिये लाया गया है यहाँपे? अपने देशका नाम खराब करनेके लिये आपका ऐसा बर्ताव काफी है, चूप रहो सबके सब.” असे जरा वरच्या आवाजातच मी सांगितले. एव्हाना काल ओळख झालेले, कोणालातरी शोधायला गेलेले नागपूरकर तिथे आले आणि म्हणाले, ”काय झालं काकू? तुमच्या ओळखीची आहे का ती मुलगी?”
“ती कशाला माझ्या ओळखीची असेल? पण तुम्ही तर माझ्या ओळखीचे आहात ना, माझे देशवासी? तुमच्यातल्या काहींच्या वागण्यामुळे जर माझ्या देशाबद्दल गैरसमज होत असेल, तर एक भारतवासी म्हणून तुम्हाला त्याची जाणीव देणं हे माझं काम आहे. त्या लोकांसाठी ही दृश्ये नवीन असली, तरी त्यांनी स्वतःला सांभाळायला हवं. आतापर्यंत दूरच्या लोकांबद्दल चाललेलं होतं, तिथपर्यंत ठीक होतं. पण त्या मुलीच्या लक्षात येईल आणि तिचा आपल्या देशाबद्दल गैरसमज होईल अशी शेरेबाजी करायला माझा विरोध आहे.”
“सॉरी काकू, त्यांच्या वतीने मी माफी मागतो आणि त्यांनाही समजावतो.” नागपूरकर म्हणाले आणि त्यांना समजावून तिथून घेऊन गेले.

इतक्यात वर्धनला घेऊन माझा नवरा आला आणि माझ्यासाठी सरप्राईझ असलेली माझी भावी भाचेसून मला पाहायला मिळाली. जिच्यासाठी मी माझ्या देशवासीयांना समजावले होते, तीच ती. आमची रास लगेचच जुळली. नमिता आणि अरुलचीही ओळख झाली. ती आणि तो दोघे मुंबईकरच, त्यामुळे त्यांची रास जुळायलाही वेळ लागला नाही.. तिथे फिरण्यासाठी बुक केलेली गाडी ताब्यात घेऊन आम्ही हेनली बीचकडे निघालो.

होम स्टे असल्याने हेनली बीचवरचे घर ताब्यात आले. (होम स्टे हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.) फ्रेश होऊन तिथल्या बीचवर एक फेरी मारली. इतका सुंदर समुद्र.. गॅलरीत उभे राहिल्यावरही दिसत असे. बाजूने जॉगिंग ट्रॅक, त्याची एका बाजूला समुद्रकिनारा नि दुसर्‍या बाजूला समुद्राभिमुख घरे, जी जास्तकरून भाड्याने पर्यटकांसाठी दिली जातात. दोन सुरेख जेट्टी, त्यापैकी एक फक्त हौशी मासेमारीसाठी. शनिवारी संध्याकाळी इथे लोक कौटुंबिक सहलीसाठी येतात, बादल्या, थर्मोकोल बॉक्स, गळ घेऊन मासेमारी करून रविवारच्या जेवणाची सोय करतात.

.
.
.

.

.
.
.
.
.
.
.
पुन्हा पुन्हा इथे यायचे ठरवून सुप्रसिद्ध रुंडल मॉलमध्ये जेवायला गेलो. खानपान विभागात जगभरचे खाणे मिळत होते. तिथे बसून मी नि नवरा मॉलचे निरीक्षण करत होतो.

.
वर्धन म्हणाला, ”आत्या, तो बघ रोहित शर्मा चाललाय.”
”अरे, पकड ना त्याला.”
“चल गं. इथे फोटो काढायला बंदी आहे. फोटो नाही काढता येणार.” वर्धन आळसावूनच तंगड्या पसरत म्हणाला.
“अरे, फोटो नसला तर नसला, आपण तर भेटू.”
मी उठून भराभर चालत, अखेरीला पळतच तो नजरेच्या टप्प्यात आल्यावर, ”रोहित, रोहित” अशा हाका मारायला सुरुवात केली. रोहित थांबला. न थांबून करेल काय बिच्चारा? माझ्या मागे नवरा, नून्ग, आणि काहीतरी खरेदी करणारे नमिता, अरुल आत्या का धावतेय ते न समजल्याने धावत आले.

“हॅलो, रोहित. परवाची मॅच पाहायला आम्ही खास मुंबईहून आलोय. धोनीला माझा एक निरोप दे. त्याला म्हणावं, वर्ल्ड कप जिंकायला खेळू नकोस, प्रत्येक मॅच जिंकायला खेळा, म्हणजे वर्ल्ड कप आपलाच आहे. आणि परवाची मॅच तर जिंकायलाच खेळा.” या माझ्या निरोपावर रोहित हसून म्हणाला, ”खास मुंबईकरांचा दमदार निरोप हं. आणि परवाची मॅच हरणं शक्यच नाही.” मग मॉलचा नियम धुडकावून आम्ही फोटो काढले. हे समजल्यावर वर्धन इतका हळहळला की सांगता सोय नाही.

.
मॅचच्या दिवशी नून्ग आम्हाला सोडायला आल्यामुळे स्टेडियमच्या अगदी जवळ उतरता आले. एक रस्ता आणि एक पूल पार करून स्टेडियममध्ये जाता आले. रस्ते, ट्रॅम्स, भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांच्या जल्लोशाने भरून गेले होते. तिरंगा हातात घेऊन, तिरंगी फुगे हातात घेऊन, तिरंगी विग घालून, भारतीय खेळाडूंची जर्सी घालून; I N D I A लिहिलेले जर्सी घालून लोक घोळक्याने जल्लोश करत चालले होते. 'भारतमाता की जय', 'इंडिया इंडिया' या जयघोषाने वातावरण भरून गेले होते. वाटेत पाकिस्तानी खेळाडूंची जर्सी घातलेले पाकिस्तानी नागरिक दिसले की या गजराला उधाण येत होते. आम्हीही त्यात सामील झालो.
.

गमतीजमती करत स्टेडियमपाशी पोहोचलो. इथे तर ढोल, ताशे, पिपाण्या, शिट्ट्या यांचे संमेलनच भरले होते.

.

हा सगळा जल्लोश पाहून लहानपणी ब्रेबॉर्नवर आणि वानखेडेवर पाहिलेल्या मॅचेसची आठवण येऊन, सुरक्षेच्या कारणावरून आपण किती मोठ्या आनंदाला भारतात मुकलो आहोत, याची जाणीव झाली. फक्त पाण्याची बाटली न्यायला परवानगी नव्हती. सगळीकडे निळ्या आणि पोपटी रंगाचे साम्राज्य पसरले होते. भर दुपारी मॅच असल्याने उन्हाचा त्रास होईल का? अशा विचारात जागेवर येत असताना दुसर्‍या मजल्यावर 'सर डोनाल्ड ब्रॅडमन गॅलरी' दिसली. एखाददुसरा फोटो काढत नाही, तर नवरा या गोंधळात गर्दीत बायको हरवली तर मॅच चुकेल या भीतीने हाताला धरून ओढत पुढे घेऊन गेला.
.

स्थानापन्न झालो. चिअरगर्ल्स तयार होत्या. एका छोट्या स्टेजवर तिथल्या टी.व्ही.च्या लोकांनी बस्तान बसवले होते, तिथे पंजाबी पारंपरिक वेषात ढोलवाले आणि नृत्य करणार्‍या तरुणी होत्या. लाऊड स्पीकरवर 'चक दे इंडिया' चालू होते. मस्त माहौल बनत चालला होता.
आपले आणि पाकिस्तानी खेळाडू सामनापूर्व व्यायाम करत होते. अजून स्टेडियम भरत होते.

.
.
.
.

सचिनचे पाठीराखे आपली त्याच्यावरची निष्ठा अजूनही प्रदर्शित करत होते. त्यांना एकदा सचिनने पडद्यावर दर्शनही दिले. सेलेब्रेटीही दिसत होते.

.
.
इतक्यात एक तरुण आणि दोन तरुणी, लाल आणि पांढर्‍या गणवेशातील शाळकरी मुलांना घेऊन ड्रेसिंग रूमकडे गेले. तितक्यात सौरव गांगुली, वासिम अक्रमसह आणि भारतीय टी.व्ही.ची टीम हजर झाली.

.
.
ऑस्ट्रेलियन टी.व्ही.साठी शेन वॉर्न आणि त्याचे सहकारी उपस्थित झाले. पाठोपाठ वर्ल्ड कप घेऊन दोन सुंदरी एका तरुणासह हजर झाल्या. शाळकरी मुले मैदानाच्या एका बाजूला रांगेत उभी राहिली. मावरी या न्यूझीलंडच्या मूळ रहिवाशाने त्यांच्या पारंपरिक वेषात, त्यांच्या पारंपरिक वाद्याचा गजर करून कार्यक्रमाला सुरुवात केली..
.
आता नाणेफेक करण्यासाठी आपला कर्णधार धोनी आणि पाकिस्तानी कर्णधार मिस्बाह-उल-हक मैदानात आले आणि “जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा” अशी गगनभेदी आरोळी एकमुखाने सार्‍या भारतवासीयांच्या तोंडून निघाली.

.
.
आणि समोरच्या पडद्यावर अक्षरे झळकली, ”INDIA WIN THE TOSS AND ELECTED TO BAT”. मग, ”इंडिया$$ इंडिया"च्या घोषाने स्टेडियम हादरू लागले. आमच्या पुढच्या रांगेत थोडेसे पलीकडे एक पाकिस्तानी कुटुंब बसले होते. नवरा, बायको, दीड वर्षाचा मुलगा आणि सहा-सात वर्षांची मुलगी. तिच्या हातात कागदी पाकिस्तानी झेंडा होता. तीही मोठमोठ्या आवाजात, ’पाकिस्तान पाकिस्तान’ ओरडू लागली. निराश झालेल्या आईवडिलांनी तिला टपली मारून गप्प बसवले. पण हातातला झेंडा उंचावणे काही तिने बंद केले नव्हते.

मग ही सगळी छोटी मुले भारत, पाकिस्तान यांचे झेंडे आठ बाजूंनी धरून आणि आयसीसीचा झेंडा चार बाजूंनी धरून, तसेच दोन्ही टीममधल्या खेळाडूंना हाताला धरून सामन्याचा शिष्टाचार सांभाळत घेऊन आली.
.
.
.

.
मग आपले तसेच पाकिस्तानचे राष्ट्रगीत झाले. काय वर्णावा आपले राष्ट्रगीत म्हणतानाचा तो अभिमानाचा क्षण! पुन्हा एकदा तो क्षण अंगावर रोमांच उठवून गेला. लहानपणी पाहिलेल्या सामन्यांच्या आठवणी जाग्या झाल्या, अर्थात कसोटी सामन्यांच्या. माझ्या बालपणातले माझ्या विस्मरणात गेलेले क्षण पुन्हा आठवून दिल्याबद्दल मी वर्धनशी आजन्म कृतज्ञ राहीन.

.
वरचा हा फोटो राष्ट्रगीत सुरू व्हायच्या आधीचा आहे. कारण राष्ट्रगीत म्हणताना फोटो काढणे शक्य नव्हते.
या पीचवर ३०० धावा केल्या तरी पुरतील, अशा प्रकारच्या गप्पा चालू झाल्या. नमिताने मला विचारले, ”आत्या, आपण जिंकणार ना?”
“अर्थातच” या माझ्या ठासून दिलेल्या उत्तरावर ती म्हणाली, ”नक्की ना?”
“अगं, परवा आपल्याला रोहित शर्मा काय म्हणाल होता ते तू विसरलीस का?” गोंधळामुळे जरा ओरडूनच मी तिला उत्तर दिले. ते ऐकून मागच्या बाजूला बसलेल्या दोघींनी आम्हाला त्याबद्दल विचारायला सुरुवात केली. मग त्याच्याबरोबरचा फोटो दाखवल्यावर त्याही शांत झाल्या. ”घरी बसून बघितली तर इतकी धमाल नसते नं? पण आता एवढे इथे आलोय आणि हरलो तर आपल्यालापण हसतील ना लोक?” त्यातली एक म्हणाली.
‘‘चिंता करू नका. सामन्याचा मस्त आस्वाद घ्या. आपण हरणार नाहीच आहोत.” असे मी म्हटल्यावर ती पाकिस्तानी मुलगी माझ्याकडे झेंडा हलवून दाखवत हसू लागली. तिच्याकडे बघत सगळेच हसलो. वातावरण सैल झाले. इतक्यात पाकिस्तानी खेळाडू मैदानात उतरले. प्रेक्षकांनी टाळ्या-घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. प्रत्येक बॉल, प्रत्येक शॉट, प्रत्येक कॅच, प्रत्येक विकेट - इतकेच काय, प्रत्येक हालचाल टिपत, त्यावर टीकाटिप्पणी करत सामना रंगत होता.

बाकीचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे, पण आम्ही जे काही अविस्मरणीय क्षण अनुभवले, त्यात तुम्हालाही सहभागी करून घेण्यासाठी दुपारपासून रात्रीपर्यंत आभाळाचे बदलते रंग दर्शविणारी काही प्रकाशचित्रे. नाहीतर हल्लीच्या 'आँखो देखा हाल'मध्ये आपण षटकांच्या व्यतिरिक्त काही पाहू शकत नाही जाहिरातींशिवाय.

.

.

.
.

.
.

दररोज पाऊस पडणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या मोसमात सामन्याचा थरार वाढवण्यात वातावरणही सहभागी झाले होते.

आमच्या पुढे दोन रांगा सोडून इंग्लंडमधून आलेला एक मोठा पाकिस्तानी ग्रूप आपल्या भारतीय मित्रांसह आला होता. सगळे पंचवीस ते तीस वयोगटातले. त्यांनी बरेच बॅनर बनवले होते, त्यात एक होता 'O U T'. आपली गोलंदाजी सुरू होण्याआधी मी तो मागून घेतला. त्यांनी विचारले, “आप इसका क्या करोगी?”

माझे उत्तर होते, ”अरे भाई, आपने जो इसे बनानेके लिये मेहनत की है ना, उसे अब हम रंग लायेंगे. अब ये सारी दुनिया में ये दस बार दिखेगा.” त्यावर आजूबाजूच्या सार्‍या भारतीयांनी पुन्हा “जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा”च्या घोषणा देऊन आमची विंग दणाणून सोडली.

आम्हीही पोटपूजा केली. गमतीची गोष्ट म्हणजे पाणी दहा डॉलर्सला आणि बिअर पाच डॉलर्सला मिळत होती.

सामना परत सुरू झाला. आमचे पाकिस्तानी सहप्रेक्षक रंगात आले होते. ती झेंडा हातात धरून बसलेली छोटी झेंड्याचा हातही न बदलता झेंडा उंचावत, “पाकिस्तान जीतेगा, पाकिस्तान जीतेगा” असे ओरडत होती. हळूहळू जसजशा विकेट पडू लागल्या, तसतसा उत्साहात फरक पडू लागला. प्रत्येक वेळी तो 'O U T’चा बोर्ड आम्ही उंचावत होतो आणि ज्याने तो लिहिला होता, तो खजील होत होता. भरवशाचा फलंदाज असलेल्या पाकिस्तान संघातला, ’सगळ्यात लहान खेळाडू’ शाहिद आफ्रिदी जेव्हा आउट झाला, तेव्हा बसलेल्या धक्क्याने त्या छोटीचे बाबा उठून उभे राहिले आणि मांडीवर छोटा बाळ झोपलाय हेच विसरले. ते बाळ पुढची रांगेतल्या पायरीवर खुर्चीच्या पोकळीतून घसरून पडले आणि रडू लागले. इतक्या जल्लोशात त्याचा आवाज कोणालाच ऐकू गेला नसता; पण ज्या खुर्चीमागे ते पडले, त्या खुर्चीवर आघात झाल्यामुळे त्यावर बसलेल्या बाईने त्याला बाहेर काढून वडिलांपुढे धरले. एव्हाना ते खालीही बसले होते. पण तरीही ते इतके निराश झालेले की त्यांना आपल्या मांडीवर बाळ होते, आता नाही याची जाणीवच नव्हती. बाळाच्या आईने बाळाला घेतले. सुदैवाने त्याला काहीच लागले नव्हते, कारण ते त्या बाईंच्या भल्यामोठ्या पर्सवर पडले होते.

शेवटी आठवी विकेट पडल्यावर इतर पाकिस्तानी प्रेक्षकांसह ते तिथून निघाले. पाकिस्तान हरल्याबद्दल मला त्या छोटीचे फार वाईट वाटले. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिला पाहत होते. ती मागे वळून वळून आम्हाला झेंडा उंचावून दाखवत होती. झेंडा धरलेला तिचा हात काही खाली आला नव्हता.
सामना जिंकल्याच्या आनंदात आम्ही तिथून निघालो. वर्धनच्या चेहर्‍यावर एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होता.

.

त्याच भरात त्याने दुसरे स्वप्न पाहिले आणि मलाही दाखवले - ”आत्या, आपण पुढच्या वर्ल्ड कपला लॉर्डसवर बसून मॅच पाहायची हं”. मीही त्यात सहभागी होत म्हटले, ”तथास्तु!”
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 7:40 am | कविता१९७८

वाह , छान लेख

मस्त लेख.आवडला.फोटोही छान !

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 7:02 pm | मधुरा देशपांडे

अगदी सविस्तर वृत्तांत आवडला.

पद्मावति's picture

10 Nov 2015 - 8:38 pm | पद्मावति

मस्तं, मस्तं, मस्तं लेख.
काय छान वर्णन, उत्साह, धमाल.....मजा आली वाचायला. सुंदर, फ्रेश लेख.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:35 pm | पैसा

भन्नाट लिहिलंय!

प्रीत-मोहर's picture

12 Nov 2015 - 1:50 pm | प्रीत-मोहर

Bhannat. Tumchi sari swapne ashich poorn hovot

झकास वर्णन. भाग्यवान आहात..!! :)

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2015 - 3:12 pm | टवाळ कार्टा

भारीये :)

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 6:41 pm | सानिकास्वप्निल

फार सुरेख वर्णन, सुंदर लिहिले आहे.

२०१३ च्या आयसिसि चँपियन्स ट्रॉफी बघायला गेलो तेव्हाची आठवण आली. अशाच मॅचचे तिकिट माझ्या क्रिकेटवेड्या वडिलांसाठी काढले होते पण त्यांचा व्हिसा लवकर न आल्यामुळे त्यांच्याऐवजी मी ओव्हलला वेस्ट इंडिज-भारत सामना बघायला गेले आणि प्रत्येक्षात खेळाडूंना ग्रांऊडवर बघताना कमीलाचा आनंद झाला होता. वडिलांचा व्हिसा बरोबर दोन दिवसानंतर आला. नवर्‍याने अथक प्रयत्न करुन फायनल मॅचचे तिकिट्स मिळवले, माझे आई-वडिल आदल्या दिवशीच आले होते, प्रवासाचा थकवा, शीण विसरून पप्पा ती मॅच बघण्यासाठी उत्सुक होते, सासरे-जावई एड्जबॅस्टन स्टेडियमला मॅच बघायला गेले. माझे पप्पा क्रिकेटप्रेमी, त्यांना क्रिकेटचे व्यसन आहे, पहिल्या युके वारीत त्यांना लॉर्ड्स दाखवले होते तेव्हा आता युकेत काही फिरलो नाही तरी चालेल, माझे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणाले होते :) त्यांना इथल्या स्टेडियमला मॅच बघायला मिळाल्याच्या आनंदाला तोड नाही :)

सुरन्गीताई लेख मनापासून आवडला __/\__

सुंदर वर्णन. मस्त फोटो .. भारी लिहिलंय ताई ..

एस's picture

13 Nov 2015 - 4:43 pm | एस

सुपर्ब लेख!

(लेखातल्या अवांतर बाबींबद्दल तुमचे अभिनंदन आणि कौतुक!)

जव्हेरगंज's picture

15 Nov 2015 - 11:00 am | जव्हेरगंज

hi

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 6:06 pm | मुक्त विहारि

एक विनंती...

"होम स्टे हा वेगळ्या लेखाचा विषय आहे."

हा पण लेख येवू द्या.

(अज्ञानी बालक) मुवि

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त स्वप्नपूर्ती आणि त्यावरचा रोचक सचित्र लेख !

बाबा योगिराज's picture

15 Nov 2015 - 7:00 pm | बाबा योगिराज

लेख वाचून जीव जळाला.
दुत्त दुत्त....

तुमचा अभिषेक's picture

15 Nov 2015 - 7:09 pm | तुमचा अभिषेक

अब ये सारी दुनिया में ये दस बार दिखेगा.
हाहा :)

जबर्रदस्त अनुभव आहे :)

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 7:39 pm | एक एकटा एकटाच

मस्त लेख
आणि
सुरेख फोटोज

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2015 - 9:40 pm | अभिजीत अवलिया

उत्तम ....

स्वाती दिनेश's picture

15 Nov 2015 - 11:32 pm | स्वाती दिनेश

लेख आणि फोटो दोन्ही मस्त !
स्वाती

नाखु's picture

16 Nov 2015 - 3:37 pm | नाखु

जिसकी आत्या ऐसी (टेढे को सीधा करनेवाली) है उसका भाचा कैसा होगा !!!

जियो, स्व्पनपूर्तीबद्दल विशेष अभिनंदन,आणी लेखाबद्दल धन्यवाद

नूतन सावंत's picture

19 Nov 2015 - 10:26 am | नूतन सावंत

नाखुजी,प्रत्येकवेळी अरे ला कारे नसले तरी याबाबतीत ५०% माझ्यावर गेला आहे,त्यातून बांधा सशक्त नि उंच असल्याने त्याला पाहूनच ५०% काम होते,असा अनुभव आहे.

नाखु's picture

20 Nov 2015 - 11:49 am | नाखु

असल्यानेही विनाकारण अन्याय सहन करण्याची वा कुणावरही (आपल्याकडूनही) अन्याय होण्याची शक्यता अगदी कमी होते.
निर्भीडपणा अर्थात तारतम्याने वापरावा लागतो पण तो असणे गरजेचे आहे.आणि तो तुमच्या भाच्यात नक्की असणार्च!!

अर्धामुर्धा नाखु

इशा१२३'s picture

16 Nov 2015 - 11:07 pm | इशा१२३

मस्त लेख आणि फोटो.
सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा कॉलेजवयातच पुर्ण झाल्यावर असाच अवर्णनीय आनंद अनुभवलाय.त्या प्रसंगाची आठवण झाली.
आसे स्वप्न पुर्ण होण्याचा आनंद वेगळाच.

वाह ! स्वप्नपूर्ति व्हावी ती अशी :)

बॅटमॅन's picture

17 Nov 2015 - 8:07 pm | बॅटमॅन

अप्रतीम!!!!!

मित्रहो's picture

17 Nov 2015 - 9:09 pm | मित्रहो

भारत पाकीस्तान वर्ल्डकपचा सामना प्रत्यक्ष मैदानात बसून बघणे वा क्या बात है. सुंगर अुभव कथन आणि फोटो मस्तच.

रुस्तम's picture

17 Nov 2015 - 9:54 pm | रुस्तम

सुंदर वर्णन. मस्त फोटो .. भारी लिहिलंय ताई ..

मन्जिरि's picture

17 Nov 2015 - 10:50 pm | मन्जिरि

फर छान वर्णन छान फोटो,वाचायला मजा आली

उगा काहितरीच's picture

19 Nov 2015 - 1:57 am | उगा काहितरीच

सुरेख लेख... पण एकही फोटो दिसला नाही :-(

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2015 - 2:33 am | श्रीरंग_जोशी

भारत पाक विश्वचषकातला सामना बघण्याचे अनुभवकथन अन त्यामागची कहाणी दोन्हीही मनापासून आवडले.

मी आजवर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहिला नाही याचे वाइट वाटले. मी सहा वर्षांचा असताना एक रणजी सामना व्हिसिएवर पाहिला होता.

वर्धनला व त्याच्या भावी पत्नीला अनेक शुभेच्छा!!

नूतन सावंत's picture

19 Nov 2015 - 10:19 am | नूतन सावंत

धन्यवाद रंगाभाऊ,त्याचे लग्न १२ डिसेंबरला NYUZEALANDMADHYE आहे,तुमच्या शुभेच्छा मी जरूर त्यांना कळवेन.

मितान's picture

19 Nov 2015 - 7:19 am | मितान

नेहमीप्रमाणेच उत्स्फूर्त आणि रसाळ लेखन !!!!

नूतन सावंत's picture

19 Nov 2015 - 10:22 am | नूतन सावंत

सगळ्यांचे आभार.लेख लिहिताना वाटलं होतं की,शिळ्या कढीला ऊत आणतोय का आपण?पण खात्री एकाच गोष्टीची होती ते म्हणजे वर्ल्ड कप मध्ये भारत-पाकिस्तान सामना.त्य्वारचे काहीही आपल्याला आवडतेच.

वृत्तांत खुप आवडला..झकास एकदम..