शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
15 Oct 2015 - 8:30 pm

शेवयांचा उपमा मी पूर्वी एकदा दिला होता.
आता हा शेवयांचा तिखटमीठाचा शिरा-
साहित्य-
२ वाट्या शेवया,
१ लहान कांदा,१ लहान टोमॅटो,
२ हिरव्या मिरच्या, ४-५ कढिलिंबाची पाने,
१ मूठभर शेंगदाणे,
मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर,
फोडणीचे साहित्य, एक पळी तेल
ओले खोबरे, कोथिंबिर,
२ वाट्या गरम पाणी

कृती-
शेवया कोरड्याच तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा.
जर भाजलेल्या शेवया असतील तर किंचित भाजून घ्या.
फोडणी करून त्यात कांदा व टोमॅटो घाला व परता. झाकण ठेवून शिजू द्या.
भाजलेल्या शेवया घाला. मीठ व साखर घाला आणि सगळे एकत्र करून परता.
त्यात आधण पाणी ओतून ढवळा व चांगली वाफ येऊ द्या.
ओले खोबरे व कोथिंबिर घाला.
(फोटोमधील शिर्‍यात खोबरे कोथिंबिर घातलेले नाहीये. तेवढ्याकरता मला मेन स्टेशन पर्यंत पावसात जावे लागले असते. ते मी टाळले आहे.)

.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

15 Oct 2015 - 8:37 pm | कविता१९७८

वाह

नूतन सावंत's picture

15 Oct 2015 - 9:00 pm | नूतन सावंत

सुरेख दिसतेय डिश.

मस्त रंग आलाय. पाकृ आवडली. उपमा व शिर्‍याच्या पाकृमधील फरक शोधत बसले होते. ;)
स्वातीताई, एवढ्यात शेजवान बटाटे व शेवयांच्या शिर्‍याचे फोटू पाहून तुझी फार फार आठवण येतिये.
आता बोलवच आम्हाला! ;)

आम्ही यात मुगाची डाळ घालून करतो. अधिक छान होते. पौष्टिक ही आहे

मुगाची डाळ नेहमीसारखी फोडणीत घालायची का?

स्वाती ताई , अगं काय नेमक्या वेळी दिलीस रेसिपी !! मी हा प्रकार अनेक ठिकाणी खाल्ला आहे पण घरी केला तेंव्हा मनासारखा जमला नाही , म्हणजे फसला नाही पण माझ्या मना त होती तशी चव पण नाही आली. तुझी स्टेप बाय स्टेप रेसिपी पावली गं बाई. या वीकांताला करेन नक्की.

किसन शिंदे's picture

15 Oct 2015 - 10:02 pm | किसन शिंदे

एक नंबर!

फारच टेंप्टिंग. मस्तं पाककृती. तुझा शेवयांचा उपमा सुद्धा सही आहे.

शेवयांच्या उपम्यात व शिर्‍यात काय फरक आहे?

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 1:03 am | मधुरा देशपांडे

मस्त. आम्ही यालाच उपमा म्हणतो. आणि प्रज्ञाताई म्हणाल्या तसे मुगाची डाळ घालतो, थोडा वेळ भिजवुन मग फोडणीत. शिवाय घरात असतील त्या सगळ्या भाज्या. आणि वरुन साजुक तुप...आहाहा. बरेच दिवसात केला नाहीये, आता करायलाच हवा.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 3:13 am | सानिकास्वप्निल

शिरा की उपमा गं ? आम्ही पण यालाच उपमा म्हणतो :)

पाककृती खूप मस्तं आहे आणि फोटो तोंपासू. मला शेवयांचा गोडाचा शिरा आणि उपमा असे दोन्ही आवडतात, खासकरुन सौधिंडियन पद्धतीचा उपमा. त्यात तांदळाच्या शेवया पास्त्यासारख्या शिजवून, निथळून घ्यायच्या, साजूक तुपात बारीक चिरलेला कढिपत्ता, हि.मिरची, उडदाची डाळ, मोहरी, हिंग, चिरलेले आले, कांदा घालून परतायचे. शिजवलेल्या शेवया, ओले खोबरे, मीठ व साखर घालून एक वाफ काढली की पांढराशुभ्र उपमा तयार !!

भारतात ड्रॅगनच्या शेवया मिळतात खास या उपम्यासाठी, मस्तं लागतात.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 11:21 am | स्वाती दिनेश

आमच्याकडे= उपमा म्हणजे जिरं मोहरी उडदाची डाळ वाली फोडणी.. (पांढरा)
शेवयांचा उपमामी दिला आहे ग बर्‍याच दिवसांपूर्वी..
शिरा म्हणजे गोडाचा शिरा किवा तिखटमीठाचा शिरा- हळद,हिंग अशी नेहमीची फोडणी (पिवळा)
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2015 - 7:57 pm | प्रभाकर पेठकर

आमच्याकडे रव्याचा शिरा आणि सांजा असे दोन वेगळे पदार्थ करतात.
शिरा हा गोड असतो. तर सांजा हा तिखटमिठाचा असतो.
उपमा हा दाक्षिण्यात्य प्रकार. त्यात तुप आणि पाण्याचे प्रमाण जास्त असून तो एकजीव असतो. सांज्यासारखा मोकळा नसतो.
शेवयाही दोन्ही प्रकारे करतात. गोड केल्यातर 'शेवयांचा शिरा' आणि तिखटमिठाच्या केल्या की 'शेवयांचा उपमा.'
शेवया प्रकारात 'सांजा' हे नांव नाही. मला वाटतं 'सांजा' हा शब्दप्रयोग ब्राह्मणांमध्ये जास्त असतो. बाकी सर्व 'गोडाचा शिरा' आणि 'तिखटमिठाचा शिरा' असेच म्हणतात. किंवा 'शिरा' आणि 'तिखट शिरा' असा शब्दप्रयोग असतो.

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2015 - 8:02 pm | स्वाती दिनेश

हळदीच्या फोडणीच्या तिखट्मीठाच्या शिर्‍याला आमच्याकडे सांजा म्हणतात किवा मग गुळाचा सांजा आणि साखरेचा असेल तर शिरा..
भाषा दर १२ कोसाला बदलते म्हणतात ते असे..
स्वाती

साधी, सोप्पी आणि टेस्टी ...

मी करते हा उपमा नेहमी.आवडती पाकृ.

मदनबाण's picture

16 Oct 2015 - 9:15 am | मदनबाण

मस्त ! मला आवडतो हा उपमा / शिरा. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नगाड़ा संग ढोल बाजे ढोल बाजे... :- Goliyon Ki Raasleela Ram-leela

pradnya deshpande's picture

16 Oct 2015 - 11:36 am | pradnya deshpande

शेवयाचा उपमा किंवा तिखट मिठाचा शिरा करताना मुगाची डाळ आधी भिजून ठेवावी किंवा उपम्यासाठी पाणी उकळत ठेवल्यावर त्यात टाकली तरी शिजते. कढीपत्ता, हिरवी मिरची, घालून फोडणी द्यावी

अनिता ठाकूर's picture

16 Oct 2015 - 12:38 pm | अनिता ठाकूर

ह्यात शेंगदाणे फोडणीतच टाकायचे न? साधेच की भिजवून?

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 2:12 pm | स्वाती दिनेश

शेंगदाणे कांदा, टोमॅटो बरोबर घालायचे.पोह्यात घालतो तसे. लिहायला विसरले, :)
स्वाती

अनिता ठाकूर's picture

16 Oct 2015 - 12:52 pm | अनिता ठाकूर

सानिका, शेवया 'शिजवून' की 'भिजवून'? मी भिजवून घेते. ड्रॅगनच्या शेवया चांगल्या असतात, पण त्या सगळीकडे मिळत नाहीत. कौंकर्डच्या सगळीकडे मिळतात.

अनिता ठाकूर's picture

16 Oct 2015 - 2:26 pm | अनिता ठाकूर

शेवया भिजवून म्हणजे उकळत्या पाण्यात घालून ५ मिनिटे झाकून ठेवायच्या. मग निथळून घ्यायच्या. सानिका म्हणते त्याप्रमाणे अशाप्रकारे त्या 'शिजवून' निथळायच्या.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 3:56 pm | सानिकास्वप्निल

तेच लिहायला आले होती पण तुम्ही आधीच लिहिले. शेवयांवर उकळते पाणी घालून, झाकून ठेवले तर त्यात त्या शिजतात म्हणून तसे मी वर लिहिले :)

pradnya deshpande's picture

16 Oct 2015 - 2:30 pm | pradnya deshpande

आम्ही खिरीसाठी ज्या शेवया वापरतात त्याच वापरतो. आधी फोडणी करून त्यात पाणी टाकतो.उपम्यासाठी जसे पाणी उकळून मग त्यात भाजलेला रवा टाकला जातो तसेच लालसर भाजलेल्या शेवया टाकतो. वाफ आली झाला शेवयाचा उपमा तयार. रात्रीच्या जेवणात वन डिश मील म्हणून हा उपमा आयडीयल पदार्थ आहे. पोटभरिचा होतो.

पदम's picture

16 Oct 2015 - 3:21 pm | पदम

आता असाही करुन पाहिन.

पैसा's picture

16 Oct 2015 - 8:00 pm | पैसा

भारतीय इन्स्टंट पदार्थ! झकास आहे पाकृ!

विवेकपटाईत's picture

16 Oct 2015 - 8:35 pm | विवेकपटाईत

हा. माझा आवडीचा प्रकार, आमची सौ. पण मस्त करते. कांद्या सोबत पत्ता कोबी, शिमला मिरची टाकली कि शिवाय वर टोमाटो सास, ....

दिपक.कुवेत's picture

18 Oct 2015 - 2:09 pm | दिपक.कुवेत

शीरा म्हणून गोडच एकत आलोय सो फार. तोंपासू दिसत आहे. पण फक्त कांदा आणि टोमॅटो? मिक्स व्हेज घालून अति टेस्टी लागतो असा स्वानूभव आहे. मग भले ओलं खोबरं नसेल तरी बेहत्तर!!