सो ने

मितान's picture
मितान in काथ्याकूट
17 Aug 2015 - 9:57 am
गाभा: 

सोशल नेटवर्किंग साइट्स ! यातही प्रामुख्याने फेबु न कसंकाय !!!

खरोखर उबग आलाय !

मी किती ग्रेट , माझीच एकट्याची अक्कल महान म्हणणारे लोक.. श्रावण असूनही आम्ही किती खाण्यापिण्याची मज्जा करतो असं सांगत श्रावण पाळणार्‍यांच्या भावनांची नकळत टिंगल करणारे बिन्डोक्...( श्रावण हे उदाहरण फक्त !)स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर लिहिणारांना उमाळे वगेरे म्हणणारे आणि दुसरीकडे फाशीच्या विडिओला लाईक केले नाही तर देशद्रोही ठरवून मोकळे होणारे निष्क्रीय वाचाळ, दिवसभर शिंकण्या-ढेकरण्या-जांभया-पादण्या न कशाकशाचे स्टेट्स देणारे लोक, बायका म्हणजे कित्ती मूर्ख न कजाग आणि पुरूष किती शहाणे न सहनशील असल्या बिनडोक आशयाचे विनोद करून दात दाखवणारे लोक, अमक्या भाजीचा रस, तमक्या फळाची साल टैपचे अविवेकी वैद्यकीय सल्ले पुढे ढकलणारे नाटकी काळजीवाहू, कोणत्याही प्रकारचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न सोशल फोरम्स वर मांडून स्वतःचं हसं करून घेणारे लोक, आंतरजालीय ओळखीचा सामाजिक्,आर्थिक्,भावनिक आणि शारीरिकही फायदा करून घेण्यासाठी नेम धरून बसलेले लोक, व्यक्तिस्वतंत्र्याच्या नावाखाली इतरांच्या श्रद्धास्थानांची, विश्वासांची क्रूर टिंगल करणारे लोक, धार्मिकतेच्या नावाखाली मजा मारत त्याला सांस्कृतिक बुद्धिवादी मुलामा देत माज दाखवणारे स्यूडो लोक,नास्तिकतेचे कर्मकांड आस्तिक लोकांपेक्षाही भडक पणे न सवंगपणे दाखवत राहणारे उथळबुद्धी, पोर्न,बालात्कार वा देशद्रोह्याला फाशीसारख्या अती संवेदनशील विषयावर दोन टोकाची विधाने करत दिवे पाजळणारे लोक, ज्यांचा चेहरा आठवायला अजिबात आवडणार नाही असे पहाटे ५ वाजेपासून गुडमॉर्निंग मेसेज पाठवत दिवसाची काशी घालणारे लोक, लांबच्या लांब लेखन स्वतः अजिबात न वाचता (यात कविता ही आल्या ) नुसतं तुमच्याकडे ढकलून त्यावर मत काय विचारणारे लोक, स्टिरियोटैप्स ना भरपूर तेल घालणारे लोक, सतत कोणीतरी मेलंय्,अपघात झालाय, आजारी पडलंय आणि जीव जाणारंय असं आणि असंच लिहिणारे लोक, बाकी लोकांचा जन्मात कधी संबंध येणार नाही अशा दूरदूरच्या नातेवाईकांचे न मित्रमैत्रिणिंचे सत्कारसोहळे आपल्या ग्रुपवर फुकट करवून घेणारे लोक, या न त्या कारणाने सतत नकारात्मकच वातावरण तयार करत राहणे हे जन्मजात कर्तव्य बजावणारे लोक, स्मायलींशिवाय नुसत्या शब्दात भावना अजिबात न कळणारे संवेदनापंगुत्व आलेले लोक, स्वतः कोणत्याही बाबतीत कोणतेही मत न देणारे वा चकार शब्द न काढला लपुन कसंकाय वरचे इतरांचे शो बघणारे लोक, सतत खोटी सहानुभूती-प्रेम्-काळजी अत्यंत भडकपणे दाखवत राहणारे पण मनातून त्या दु:खद गोष्टींची चवीचवीने मजा घेणारे लोक, मी किती जग पाहिलंय न किती सोसलंय न किती समाजसेवा केलीय, न किती त्याग केलाय हे सतत बोलत सेल्फ पिटी चं अ‍ॅडिक्शन झालेले लोक, आपली राजकीय मते स्पष्ट नसताना समोर आला त्याच्या समोर पचापच थुंकणारे लोक,सिनेमापासून गल्लीतल्या नाटकापर्यंत कशाचीही समीक्षा करत आत्मतुष्टीच्या ग्लानीत राहणारे लोक, स्वतःला कोणत्याच विषयात कोणतेच मत मांडता येत नाही म्हणून चतुरपणे शब्दांच्या ऐवजी स्मायल्या टाकत नरो वा कुंजरो वा हा एकच एक मंत्र जपणारे लोक...

माझ्या खात्याशी जोडलेल्या १०-१२ ग्रुप्स आणि सुमारे ७५० लोकांच्या गदारोळात खरंच वैतागलेय.
या गर्दीत चांगले, बुद्धीचे पोषण करणारे वाचन कमी झाले. लेखन करण्यासाठीची शक्ती या लोकांना अटेंड करताना संपून गेलेली असते त्यामुळे नीट लेखन होत नाही. तोंड बंद असले तरी मनात असंख्य अनावश्यक असणार्‍या विषयांची-चित्रांची नि आवाजांची रहदारी फक्त प्रदूषणच पसरवते.या माध्यमांची अती सवय झाल्याने बंदही करवत नाही. दिवसभरात सगळ्या ग्रुप वरच्या मिळून किमान २००० पोस्ट्स वाचताना हातात कन्स्ट्रक्टिव काही सापडेल याची अजिबात खात्री नाही.
इथला सगळाच कारभार पोकळ, काल्पनिक आणि हे कळूनही ओढवून घेतलेला... !!!

आज सकाळी आधी अशा बर्‍याच ग्रुप्स मधून बाहेर पडले. ज्या ग्रुप वर आहे त्या ३-४ ग्रुप्स वर माझं योगदान किती असेल याची स्ट्रॅटेजी आखली. किती वेळ 'कनेक्टेड' रहायचंय हे ठरवून उपयोग नाही. म्हणून किती वेळ याशिवाय इतर गोष्टी दिवसभरात अनिवार्य म्हणून करायच्यात ते ठरवले.(प्रत्यक्ष भेटणे, प्रत्यक्ष बोलणे, वाचन्,व्यायाम इ)

अजून खूप गोष्टी शिकाव्या लागणारेत.एकीकडे 'वेळ नाही' च्या आरोळ्या ठोकत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारण्यात कै मज्जा नाही असं वाटतंय ! हा वैताग न फुकटचे मनस्ताप वेळीच आवरता आले नाही तर यापासून दूर पळणे !

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

17 Aug 2015 - 10:03 am | मदनबाण

बरं झालं... मी फेसबुक वापरत नाही ते ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD
PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?

किसन शिंदे's picture

17 Aug 2015 - 10:13 am | किसन शिंदे

नेमक्या याच सगळ्या गोष्टींचा उबग आल्याने वर्षभरापूर्वी फेसबूक अकाऊंट बंद केले.

श्रीरंग_जोशी's picture

17 Aug 2015 - 10:36 am | श्रीरंग_जोशी

भावना पोचल्या.

फेसबुकवर कधी कधी मलाही असाच अनुभव येतो. सतत पिंका टाकत राहणार्‍या, उथळ विचारांचा प्रसार करत राहणार्‍या व्यक्तिंना मित्र असले तरी मी अनफॉलो करतो. (हेच काम मिपावरही काही प्रमाणात या प्रकारच्या लेख व प्रतिक्रियांवर दुर्लक्ष करून करतोच.)

(बादवे माझ्या फेसबुकवरील वर्तनाबद्द्ल इतरांचेही असेच मत असू शकते ;-) .)

बंद करुन टाक की फेबु अकाउंट. शिंपल हाय. हाकानाका.
किंवा डिअ‍ॅक्टीव्हेट करुन ठेव. कोणतेही माध्यम कसे आणि किती वापरायचे, काय वाचायचे, काय नाही, कुठे उत्तर द्यायचे, कुठे नाही हे सारे आपल्या हाती आहे.आपण स्वतःच ठरवू शकतो. इतरांनी कसे आणि किती वापरायचे, काय लिहा बोलायचे हे आपण ना ठरवू शकत, ना सांगू शकत. तसे केल्यास आपणही त्यांच्याच पंक्तीत की! :)

अजया's picture

17 Aug 2015 - 10:45 am | अजया

फेसबूक परवडलं असा वात व्हाॅट्स अॅपने आणलाय! ती एक प्रकारची ocd झालीये.टिंग वाजलं पाहिला फोन.वाचला मेसेज.मग कधी त्याला फालतुपणा डोक्यात जातो आणि उगाचच स्वतःशी चिडचिड.तेवढयात परत वाजतंय आणि फोन परत चेक केल्या जातो!
लेखातल्या आशयाशी अती सहमत आहे.सोनेने जसे लोक जवळ आणले तसे स्वभावाही जवळून दिसायला लागले.अहंकारी,स्वमतांध दांभिक! आक्रस्ताळे, अती भावनिक, अती धार्मिक सगळेच एका ग्रुपात नांदायला लागले.अशा अनेकविध लोक असणार्या वेगवेगळ्या ग्रुप्समुळे रोजचा डोक्याचा निष्कारण चिवडा करुन घ्यायला मी हे विकतचे दुखणे स्वतःला लावून घेतलेय.सध्या वाचनमात्र राहाण्याचा प्रयत्न करु पाहातेय.पण लवकरच सोडचिठ्ठी देणार हे दिसतंय.जमवावं लागेलच!!

गॅरी ट्रुमन's picture

17 Aug 2015 - 11:23 am | गॅरी ट्रुमन

व्हॉट्सअ‍ॅपचा उपद्रव जास्त आहे हे मान्य. विशेषतः व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे बेमालूमपणे अफवा फिरवण्याचे माध्यम झाले आहे. रामदास स्वामींनी दासबोध लिहायला शिवथरघळ हे ठिकाण का निवडले? कारण शिवथरघळ जी.पी.एस उपग्रह पकडू शकत नाहीत आणि त्यामुळे बुध्दी विचलित होत नाही.भारताला इंडिया असे इंग्लिशमध्ये का म्हणतात?कारण INDIA म्हणजे Independent Nation Declared In August अशा स्वरूपाचे ज्ञानामृत व्हॉट्सअ‍ॅपवरूनच फिरत असते.एम.आय.टी आणि हावर्ड ही दोन्ही विद्यापीठे बॉस्टनजवळ आहेत आणि ती ठिकाणे जी.पी.एस उपग्रह व्यवस्थित पकडू शकतात तरी तिथल्या प्राध्यापकांची बुध्दी विचलित कशी झालेली नाही आणि तिथून मोठ्या प्रमाणावर नोबेल पारितोषिक विजेते कसे निघतात, ईस्ट इंडिया कंपनी ही भारताला ऑगस्टमध्ये स्वतंत्र देश म्हणून जाहिर करायच्या ३४७ वर्षे आधी स्थापन झाली होती आणि त्या पूर्वी ८९ वर्षे लयालाही गेली तेव्हा इंडिया म्हणजे Independent Nation Declared In August असू शकत नाही आणि समजा भारताला स्वातंत्र ऑगस्टऐवजी मार्चमध्ये मिळाले असते तर भारताला इंडिम म्हटले असते का वगैरे प्रश्न असे ज्ञानामृत बेमालूमपणे फॉरवर्ड करणार्‍यांना कधीच पडत नाहीत.

फेसबुक काय किंवा व्हॉट्सअ‍ॅप काय दोन्हींचा थोडा तरी उपयोग आहेच.तेव्हा त्यासाठी मी दोन्हींवरही आहे.फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरील सगळे ग्रुप एका वर्षासाठी म्युट केले आहेत (आणि पुढच्या वर्षी आणखी एका वर्षासाठी म्युट करणार आहे) :) . असल्या गोष्टींचा योग्य तो उपयोग करून घेतला आणि आपण फार वाहवून जाणार नाही याची काळजी घेतली की झाले.

सहमत!!! ग्रुप्स म्युट केले की एवढा त्रास होत नाही. या साधनांचा चांगल्या गोष्टींसाठी फायदा करुन घेणे आपल्याच हातात आहे.

या पोस्ट्ला माझे शंभर लाईक्स!
दोन दिवस झाले फेबू उघडलं नाही. खूप शांत वाटतंय. :)

मी तर गेले कित्येक दिवस फे बु वर गेलेच नाहीये , त्यामुळे तिक्डे काय चालतय काय घेण नाय.
राहता रहीला वस्स्प चा प्रशन मोजुन ३ ग्रुप , बाकीच्याना नम्बरच दीलेला नै त्यामुळे सध्या तरी एन्जोय !बॉर
झाल की करु इचार, वास्स्प वर नविनच आलएय त्यामुळे कदाचीत अजुन पकले नाही मी :)

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 10:57 am | उगा काहितरीच

प्रचंड सहमत! याशिवाय एकच मेसेज तिनतिनदा सगळ्या गृपवर फिरतो तेव्हा प्रचंड मनस्ताप होतो. आणि नागपंचमीपासून स्वातंत्र्य दिनापर्यंत काहीही लहानमोठा सण असो शुभेच्छा मेसेजेस वात आणतात . याशिवाय याची शपथ त्याची शपथ पण आहेच !

सस्नेह's picture

17 Aug 2015 - 11:05 am | सस्नेह

अगं, चिखलराडीत शिरलं की अंगावर घाण उडणारच ! कशाला शिरलीस त्या चेपू अन कस्कायच्या जंजाळात ?
गाव तिथे उकिरडा म्हणतात तसं मुक्त अभिव्यक्ती तिथे हे सगळे येणारच ! तरी लवकर शहाणी झालीस अन बाहेर पडलीस ! +)
...मी कस्कायच्या मोजून तीन तेही कामाच्या ग्रुपमध्ये सहभागी आहे. आणि चेपुवर तर फिरकतच नाही !
अवांतर : मला चेपु खाते डिलीट करायची प्रोसिजर कुणी सांगेल काय ?

मानवी स्वभाव हा निसर्गतः पाण्यासारखा असतो. नेहमी उताराकडे वाहणार. तद्वत रचनात्मक आणि आव्हानात्मक काही, ज्यात स्वतःच्या क्षमता पणाला लागतील, कष्ट घ्यावे लागतील अशा गोष्टी शक्यतो टाळण्याकडे बहुसंख्यांचा कल असतो. आयतेच जर काही मिळत असेल तर तिकडेच मन धावते. यालाच कुणी इंग्रजीमध्ये 'डंबिन्ग डाउन' असे म्हटलेय. सामाजिक अभिसरणाच्या माध्यमांची खरी दु:शक्ती ही मनाच्या ह्याच पैलूला जास्तीत जास्त मोकळीक देण्याच्या त्यांच्या क्षमतेत असते. मुद्रित माध्यमांमध्ये इलेक्ट्रिक माध्यमांच्या आगमनापूर्वी असलेली शिस्त, अभिव्यक्तीतील नेमकेपणा आणि अर्थवाही स्वरूप हे सर्व बिट्स आणि बाइट्सच्या महाजालात वाहून गेले आहे. इथे केवळ सोशल नेटवर्कींग माध्यमेच नाहीत, तर माझा रोख सर्वच माध्यमांकडे आहे.

मग याचे तोटे काय? तर उथळपणा आणि बेजबाबदारपणा समाजमनात वाढीस लागणे हा होय. आणि तो केवळ अभिव्यक्तीपुरताच नव्हे तर आपल्या वागण्याबोलण्यात आणि कृतीमध्येही उतरलाय, वाढत चाललाय. झुंडशाही, भडक आक्रस्ताळेपणाचा वापर अशा अनेक मार्गांनी समाजातील विवेक कसा नष्ट होईल हे ज्यांच्या हातात आर्थिक वा सामाजिक सत्ता कुठल्याही प्रकारे असली तरी त्यांचे एक ध्येय्य ठरते.

फेसबुक वा व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या आर्थिक उद्दिष्ट प्रमुख आणि कदाचित एकमेव हेतू असणार्‍या उद्योगांना फारसा दोष देता येणार नाही. दोष आपल्यासारख्यांचा आहे ज्यांनी ह्या माध्यमांना आधी सोय, आणि मग गरज बनवून ठेवलेय.

यशोधरा's picture

17 Aug 2015 - 11:31 am | यशोधरा

फेसबुक वा व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या आर्थिक उद्दिष्ट प्रमुख आणि कदाचित एकमेव हेतू असणार्‍या उद्योगांना फारसा दोष देता येणार नाही. दोष आपल्यासारख्यांचा आहे ज्यांनी ह्या माध्यमांना आधी सोय, आणि मग गरज बनवून ठेवलेय.

+१

जिन्क्स's picture

17 Aug 2015 - 11:44 am | जिन्क्स

मी फेसबूक आणि whatsapp दोन्ही अकाऊंट बंद केली आहेत. आभासी जगाचा कंटाळा आला आहे. समोरासमोर, वास्तवीक जे काय असेल तेच आणि तेवढेचं बाकी सर्व आम्हासठी नाहीचं.

अरे त्रास होत असेल तर खाते बंद करा. संपर्क माध्यम म्हणून दुसर्‍या पर्यायांचा विचार करा. अगदीच शक्य नसेल तर मित्रांची यादी मर्यादित ठेवा. फेसबुक ने अनेक प्रायव्हसी पर्याय दिले आहेत, त्यांचा विचार करा. त्रागा करण्यात काही अर्थ नाही.

बोका-ए-आझम's picture

17 Aug 2015 - 1:04 pm | बोका-ए-आझम

ज्या इंटरनेटने आपल्याला मिपा दिलं त्याच इंटरनेटने फेसबुक आणि whatsapp दिलं. भौतिकशास्त्राचे नियम अणुभट्टीही पाळते आणि अणुबाँबही. लोकांना जीवदान देणारे आणि भ्रूणहत्या करणारे डाॅक्टर्स वेगवेगळं वैद्यकशास्त्र शिकत नाहीत. शेवटी वापर करणा-यावरच सगळं अवलंबून असतं.

आणी स्मार्ट फोन जर नसेल तर तुम्ही आदीवासी [किंवा त्याहुन ही मागास] मानले जाता. स्वतःला खरेच गरज असो वा नसो, पण peer pressure / social pressure आणी आपण कसे जमान्याबरोबर चालत आहेत हे सिद्ध करण्याचा आटापिटा यामुळे वरील प्रश्न अजुन गंभीर रूप धारण करतात. शेवटी स्वतःला नियंत्रणात ठेवणे हेच श्रेयस्कर. या गोष्टी अजिबात न वापरणे हे एक टोक झाले आणी कायम वापरणे हे दुसरे !

कविता१९७८'s picture

17 Aug 2015 - 2:35 pm | कविता१९७८

माझ्या मते तरी गृपचे स्वरुप काय आहे त्यावर सारे अवलंबुन आहे, वैचारीक गृप वर वैचारीकच गप्पा मारल्या जाव्या , कवितेच्या गृपवर कविताच वाचल्या जाव्या असा निर्बंध आपण लादु शकतो पण जनरल गृपमधे विविध व्यक्तीमत्वाची भरपुर माणसे असतात , प्रत्येकाचे शिक्षण , करीयर वेगळे त्यामुळे प्रत्येकाचे आचार विचार, वागणे बोलणे समान असु शकत नाही, एखाद्याला सिनेमाची गोडी असेल तर दुसर्‍याला ती असेलच असे नाही, एखाद्याला सतत गमती जमती करण्याची सवय असेल तर एखादा कुठल्या ना कुठल्या दु:खातुन जात असल्याने त्याला दुसर्‍याबद्द्ल चीड वाटु शकते. जनरल गृप असेल तर अशा सर्वच गोष्टी आल्या कारण गृप सर्वांचाच असतो आणि प्रत्येक जण आपल्या भावना त्यातुन व्यक्त करत असतो अगदी आज माझं भांडण झाल्या पासुन ते आज मी हे जेवलो हे केलं इथे गेलो, जसे मी श्रावण पाळ्त नाही म्हणुन एखाद्याने श्रावण पाळल्यावर त्याने तो कसा पाळला कीती कंट्रोल केला याचे रसभरीत वर्णन ऐकुन माझ्या भावना दुखावल्या जात नाहीत तसे मी श्रावण पाळत नाही म्हणुन मी चांगलं चुंगलं खाणार असा आनंद व्यक्त केल्याने जर दुसर्‍यांच्या भावना दुखत असतील तर ते गैर आहे , एखाद्याची आवड दुसर्‍याची नावड असु शकते मग तर दोघांच्या भावना दुखावल्या जातात आणि मुळात तर आज काल लोकांच्या कुठल्याही गोष्टीने भावना दुखावल्या जातात, कुणाकुणाचे ईगो सुखावत बसायचे असे माझे वैयक्तिक मत.

बाकी मलाही बर्‍याच गोष्टींचा त्रास होतो गृपमधे , सतत बाहुबलीवर चे पीजे, शहाजहाँन च्या ७ बायका होत्या म्हणुन ताजमहल त्याने बांधुन काही ग्रेट केलं नाही, मोठ मोठाले मेसेजेस, शिवाजी महाराजांच्या सुरस कथा , आणि सततचे तेच तेच फालतु रटाळ मेसेजेस मी वाचतच नाही, याला उपाय ही तोच आहे, आपण कुणा वरही बंदी आणु शकत नाही तर अशा गोष्टी वाचुच नये हे माझे मत. शेवटी आपण ते वाचणे न वाचणे आणि त्याला कीती महत्व द्यायचे हे आपल्याच हातात आहे.

तुडतुडी's picture

17 Aug 2015 - 3:35 pm | तुडतुडी

१ नंबर लेख .मी माझ्या चे पु च्या खात्याला कित्येक महिने भेट दिली नाहीये आणि द्यायची इच्छा पण नाही . आत्तापर्यंत ते automatic बंद पण झालं असेल . २ महिन्यापूर्वी मोबाईल चं इंटरनेट बंद केलं . सुरवातीला त्रास झाला पण आता वाटतंय काही बिघडत नाही नसलं मोबाईलला इंटरनेट तर. कुणी आदिवासी म्हणेना कि काही म्हणेना . आपण आपल्या मनाचे राजे

अरे त्रास होत असेल तर खाते बंद करा.>>>
केवळ खाते बंद करायचा प्रश्न नाहीये ह्या लोकांच्या बुद्धीची आणि वागणुकीची कीव येते . दुसरे कामधंदे नसतात तेव्हा ह्या लोकांना हे सगळं करायला सुचतंय

आणी कार्यबाहुल्य यांचे प्रमाण व्यस्त होत चालले आहे की काय असे वाटते अनेकदा!

दुसरे कामधंदे नसतात तेव्हा ह्या लोकांना हे सगळं करायला सुचतंय

यालाच 'वैचारीक बेरोजगारी' असे मी म्हणतो!

भीमराव's picture

17 Aug 2015 - 4:02 pm | भीमराव

वैताग आनलाय राव कस्काय न.
काय तर म्हणे तुमच्या भागात ३००० चोरांचा वावर आहे. पंधरा विस दिवस गावात गस्त घातली. चोर नाय आन काय नाय. नंतर हळुहळु लक्षात आलं कि ही बातमी सातारा सांगली सोलापुर पुणे(ग्रामीण) अशी बरीच फेमस झालीय. ह्या बातमीचा किडा कोणी तयार करुन सोडला आसल त्याला कोपरापासुन नमस्कार.

ऋतुराज चित्रे's picture

17 Aug 2015 - 5:30 pm | ऋतुराज चित्रे

ह्या सो ने च्या कृपेने मागच्या महिन्याच्या पोर्णिमेला आकाशात एकाच वेळी दोन चंद्रांचे दर्शन लाभले होते.

येत्या नोव्हेंबर महिन्यात १५ - ३० तारखेपर्यंत पृथ्वी अंधारात रहाणार आहे. अर्थात हि सो ने ची भविष्यवाणी आहे, वर नासाचा दाखला दिलाय त्यामुळे खरीच असणार.

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 5:51 pm | संदीप डांगे

बहुसंख्य सो ने वापरणार्‍यांचे 'अगं अगं म्हशी मला कुठं नेशी' असं झाल्याचं दिसून येतं...

स्वप्नांची राणी's picture

17 Aug 2015 - 7:19 pm | स्वप्नांची राणी

+१

नाव आडनाव's picture

17 Aug 2015 - 6:01 pm | नाव आडनाव

सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर मी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, गूगल प्लस आणि बाकी पण कश्यावरंच नाही हेच बरं आहे असं वाटायला लागलंय.

अभ्या..'s picture

17 Aug 2015 - 6:09 pm | अभ्या..

बराय ब्वा.
आपले चेपुचे तर नाहीच अकाऊंट. व्हाटसपवरही कुठल्या ग्रुपात नाही थांबत. कुणाशी ऑनलाईन बोलु वाटले की पिंगायचे. त्याला वेळ अन इच्छा असेल तर येईलच प्रत्युत्तर. बाकी रोजच्या हापिसकामात पण व्हाट्सप चा वापर व्हायचा. आता तोही मर्यादित झालाय.
एकूण मज्जेत.

स्रुजा's picture

17 Aug 2015 - 6:52 pm | स्रुजा

पर्फेक्ट लिहिलयेस मितान. वैतागवाडी झालंय चेपु आजकाल पण आपण वापरु तसं ते मोल्ड होतं. चेपु चा मला कनेक्टेड राहण्यासाठी फार काही फायदा होत नाही. फक्त कुणाचे काही महत्त्वाचे टप्पे असले, की नोकरी लागली, मुल झालं, लग्न झालं वगैरे तर अभिनंदन तरी करता येतं. आपल्या कुणा मित्र- नातेवाईकाच्या आयुष्यातला एवढा मोठा माईलस्टोन आणि आपल्याला कळलं पण नाही, आपण दखल पण घेतली नाही असं निदान होत नाही. मी इतक्या लांब आहे त्यामुळे मला पण कुणाला आवर्जुन कॉल करायला जमत नाही. कसं काय पण वैयक्तिक चाट करायला अगदी छान आहे. आणि ते आपल्या नियंत्रणात राहु शकतं.

चेपु मी मुख्यत्वे वापरते बातम्यांसाठी. लिंक्ड इन वर जसे मी माझ्या कामच्या संदर्भात ग्रूप फॉलो करते, लेख वाचते तसं मी चेपु वर अनेक ग्रूप फॉलो करते. माझ्या इथल्या गावाच्या बातम्या, यांच्या पब्लिच्क ट्रांस्पोर्ट चं पान, यांचं सिटीचं पान, मराठी मंडळाचं पान, कॅनडाच्या बातम्या, काही चेन्स जसं की टिम्स किंवा स्टार बक्स इथे मी नेहमी जाते मग त्यांच्या ऑफर्स; डील्स बर्‍या पडतात, माझ्या बँकेचं पान, इकडच्या इंडियन हाय कमिशन चं पान,आमच्या राज्यातले पार्क्स, ट्रॅव्हल पान,एक ग्रोसरी स्मार्ट पान आहे ते आमच्या भागात कुठे काय स्वस्त आहे त्याचं स्प्रेडशीट पाठवतात, काही न्युज चॅनल्स, पुल>चं पान, भारतातले काही वृत्तपत्रं, रुजुता दिवेकर, माझ्या खास आवडीचे काही विषय आहेत त्यासाठी नॅशनल जीओ, नासा अर्थ ऑभर्वेटरी, सायन्स मॅगेझिन्स वगैरे या सगळ्या जवळ जवळ ११८ पानं मी फॉलो करते. यात काही वैयक्तिक आहेत , मित्राने हॉस्पिटल चालू केलं त्याचं पान वगैरे पण बाकी सगळे अपडेट्स वाचण्याजोगे असतात. मला पेपर घेऊन वाचायला हल्ली वेळ मिळत नाही पण चेपु च्या या अपडेट्स मुळे सगळं अक्षरशः फिंगर टिप्स वर आहे. माझी प्रत्येक आवड या पानांत आहे अगदी हेअर टिप्स, पुण्याचा गणेशोत्सव वगैरे पण. या अपडेट्स च्या गर्दीत बाकीचे अपडेट्स असतात पण मी दुर्लक्क्ष करते आणि जेंव्हा काही काळ तुम्ही एखाद्याच्या पोस्टस वर लाईक वगैरे करत नाही तेंव्हा त्यांचे पुढचे अपडेट्स तुमच्या मुख्य वॉल वरुन गायब होतात, ते उजव्या बाजुच्या स्क्रोलर वर येतात, जे समजत च नाहीत, सो आपला उद्देश सफल. तुम्ही दुर्लक्ष करा, चेपु आपोआप च त्याला फार महत्त्व देत नाही :)

पण एकुण या सगळ्यामुळे मला सतत नवीन काही तरी कळत राहतं. आणि चेपु वर जाऊन वैताग तर नक्कीच येत नाही.

बाकी लोकं विचारायला येतात , फिरत नाही वाटतं कुठे आजकाल चेपु वर फोटो नाही पाहिले, अशांची किव करावीशी वाटते. आम्ही आमच्यासाठी फिरतो तुम्हाला दाखवायला नाही हे मी समजावुन सांगायच्या पण भानगडीत पडत नाही. वेळ मिळाल, फोटो खरंच खास आले असतील तर मी टाकते सुद्धा चेपु वर पण मी टाकले नाही म्हणजे आमचं आयुष्य अगदी सॅड आहे, आम्हाला काही आयुष्यच नाही असा काही जणांचा उथळ समज असतो, तो त्यांचा त्यांना लखलाभ.

स्वप्नांची राणी's picture

17 Aug 2015 - 7:11 pm | स्वप्नांची राणी

लेख वाचून असं वाटलं की जणू कोणीतरी कनपटीला बंदूक लावून ठेवलीय....'कर लॉगिन, टाक स्टेटस, अपलोड कर नवं प्रोफाइइल पिक्चर, मार फोर्वर्ड, वाच १००० मेसेजेस...' खरं तर अगदी एका बोटाच्या टोकावर नाचवता येऊ शकणारी पण तितकीच सशक्त माध्यमं आहेत ही. हे असं वागणारी तापदायक लोकं फक्त फेबू किंवा काय्कस्काय मुळे अस्तित्त्वात आली असही काही नाहीये. ही सगळी जणं कायमच आपल्या अवती-भवती होतीच कि. आत्ता आता जास्तं व्यक्त व्हायला लागली आहेत ईतकच. पण त्याचबरोबर त्यांना कटवणही एका क्लिकवर आलय हेही तितकच खरं आहे.

मला आठवतय जेंव्हा कॉम्प्युटर अस्तित्त्वतही यायचा होता तेंव्हा संतोषीमातेची कागदी बीलं ढीगानी वाटली जायची. १५ पैश्यांच्या पोस्टकार्डवर वेगवेगळ्या देवतांच्या नावानी देणगीसाठी किंवा निव्वळ त्यांची महती गाण्यासाठी आवाहनं केली जायची.

कुठलाही काळ असो माणुस व्यक्त व्हायची साधनं शोधून काढतोच की. अगदी 'मला नाही हे आवडत, मी कसा / कशी साधा / साधी, फेबू बंद करून टाकणार आता, फ्रंड रीक्वेस्ट ब्लॉक मारीन हां...' असं म्हणणही म्हणजे व्यक्त होणच आहे ना..? पुन्हा ज्याला हे सगळ आत्मरंजन वाचायची किंवा करायची ईच्छा नाही तो अगदी केंव्हाही या सगळ्यापासून सहजरीत्या अलिप्त होऊ शकतोच.

परत सगळं येऊन अडकतं ते एकाच गोष्टीपाशी , आणि ते म्हणजे तारतम्य बाळगणे, कॉन्शन्स वापरणे. रोज येणार्‍या १००० निरोपांमधे २५० कविता, ४०० फॉरवर्ड्स, ५० आरोग्यविषयक सल्ले असतील तर ते मी सहजगत्या ओलांडून पुढे जाउ शकतेच. प्रत्येक निरोप वाचायची सक्ती नसते. काहीच नाही वाचलं तरी चालतं. फार आवाज येत असतील तर ग्रूप मुका करता येतो...अगदी १ वर्षासाठी सुद्धा! ह्या माध्यमांचा हा सहजसोप्पेपणा मला फार आवडतो. कित्येक जण असे माहितीत आहेत जे समोर फार बोलू शकत नाहीत. अश्यांना फेबू म्हणा किंवा काय्कस्काय म्हणा या रुपान अभिव्यक्त व्हायची सन्धीच मिळालीय. शेवटी न बोलणारे असले तरी काही तरी सांगायचय ही खाज असतेच असते. त्यावरही फेबु मानसोपचारासारखा परीणाम करू शकतं. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे , मुलगी दाखवणे / बघणे अश्या काही अपमानस्पद प्रथाही या अश्यामाध्यमामुळे क्रांतीकारक वळण घेतायेत.

याशिवाय समविचारी लोकांची, व्हर्चुअल का होइइना, भेट, अश्या बोलण्यातून तुमचही प्रबोधन आणि चमकोगीरी, आवडत्या विषयावरचे असंख्य ग्रूप्स, आधारगट आणि चर्चा, आणि या चर्चेच्या निमीत्ताने संकुचित होतं जाणारं जग...फार फार अमेझीम्ग वाटतं मला!! वाचनातून माझी स्वताचीही थिंकींग प्रोसेस ईव्होल्व्ह झाली आणि यात फेबू वरच्या वाचनाचाही प्रचण्ड मोठा हात आहे.

अर्थात वल्याबरुबर सुक्कंही जळायचच याच नात्यानी प्रच्ण्ड पाचकळपणाही फेबू / काय्कस्काय वर असतोच पण आपल्याला अनुरुप प्रायव्हसी सेट्टींग्ज करुन हे सगळं टाळता येतं.

काय्कस्काय वर येणार्‍या फॉर्वर्ड्स ची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी www.snopes.com/ आणी www.hoax-slayer.com/ या साईट्सचा उपयोग होऊ शकतो....धम्माल आहे , नक्की पहा!!

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2015 - 8:28 pm | पिलीयन रायडर

+ १

आवडला प्रतिसाद.

अगदीच टाकाऊ नाहियेत कसंकाय आणि चेपु. फक्त तुमचं तुम्हाला कळालं पाहिजे की कधी कशाला किती महत्व द्यायचं.
मुर्ख लोकांना एका सेकंदात हाईड करता येतं. नको त्यांना ब्लॉकच करता येतं. हव्या त्या ग्रुप्समध्ये चर्चा करता येते. भरपुर काही वाचता येते. अत्यंत सुंदर चर्चा वाचल्या आहेत मी चेपु वर. खुप चांगल्या कामाची माहिती मिळाली आहे चेपुवरच.

कसंकायाप्पा वर आता जगभर विखुरलेले भावंड, मित्र-मैत्रिणी भेटत रहातात. ते ही आवश्यक आहेच. चेपु / कसकायप्पा / सो ने शिवाय त्यांच्याशी कसा संपर्क ठेवाय्चा. सतत तुम्हाला कुणी मेल करुन काय चाल्लय ते सांगु शकत नाही. चेपुने आपोआप महत्वाच्या बातम्या कळतात. आनंद होतो..

आणि सायकॉलॉजिस्ट देखील आहात हे फार दुर्मिळ रसायन आहे.
आता नेट अ‍ॅडिक्ट च डि अ‍ॅडिकशन च सेशन घेतांना तुमच्या शब्दांना वेगळीच धार चढेल नाहि का ?
एक गमतीदार स्टोरी आठवली ऑट ज्युलीया अँड स्र्फिप्टरायटर या कादंबरीतली त्यात एका माणसाकडुन एका लहान मुलीचा अपघात चुकुन होतो त्या घटनेने त्याच अवघ आयुष्य बदलुन जात त्याला निद्रानाशाचा विकार जडतो त्याचा जॉब जातो तो त्या गिल्ट च्या ओझ्याखाली पुरता दबुन जातो आणि मग एक सायकॉलॉजिस्ट त्याच्या आयुष्यात येते ती त्याला त्यातुन बाहेर काढण्यासाठी काय करते अशी एक फारच रोचक मनोरंजक कथा त्यात आहे तुम्ही जरुर वाचा मजेदार आहे.
ह.घ्या. हे.वे.सां.न.ले.

मितान's picture

17 Aug 2015 - 9:18 pm | मितान

सगळ्यांनी सांगितलेले उपाय १००% मान्य !!!! धन्यवाद !

यातले अनेक करूनही झाले आहेत. यशस्वी रितीने वापरले आहेत.
तरी पण आज काही कारणाने मळमळत होते ;) आता बरं वाटतंय =))

सुदैवाने अजून तरी अ‍ॅडिक्शन पर्यंत गेले नाही.पण या निकस (बहुतांशी) मनोरंजनाची सवय लागलिये हे मात्र खरं.

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 9:52 pm | संदीप डांगे

गेले तीन वर्षे चेपूवरील असंख्य फाल्तू मित्र अनफॉलो केलेत. फक्त आवडीचे पेजेस जिथून व्यवसायासंबंधी जागतिक उलाढाली/ट्रेंड्स कळतात तेवढंच ठेवलंय. गेम रिकवेस्ट सेटींगमधे जाऊन बंद केलेत. ज्या कुणी फाल्तू फॉरवर्ड केले त्याला तिथल्या तिथे तो कोण आहे याचा विचार न करता अनफ्रेंड व ब्लॉक केलंय. वॉट्सपमधे फक्त क्लायंटलोक आहेत आणि जवळचे नातेवाइक.

सो ने माझ्यासाठी आता खरोखरचे सोने आहे. लेखात व्यक्त झालेल्या भावनांशी दूरदूरपर्यंत संबंध नाही याचा आनंद आहे. आयुष्य खरंच सुंदर आहे.

आपल्याला फकस्त येकच याडीक्सन है ते म्हन्जे मिपा... और कुच नै.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Aug 2015 - 10:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला व्हॉट्स अ‍ॅपचा म्हणा किंवा इन जनरल सोशल नेटवर्किंगचा वैताग आला. परवा रात्रीपासुन अधुन मधुन मिपा सोडलं तर आभासी जगाशी सगळा संपर्क तुटलेला आहे. इट्स गुड. छान वाटतय. नकळत सवयीनी बरेचं वेळा व्हॉट्स अ‍ॅप चेक करायला हात फोनकडे गेला.

सो ने वापरताना वाहवत गेल नाही व त्याचबरोबर तारतम्य ठेवलेले चांगले.

माझ्या स्वभावात चेपु, व्हॉटस अप बसत नाही म्हणून ते वापरत नाहीत. उत्सुकता मात्र आहे की कसे काय चालते बुवा? लोकांन खरेच कनेक्टेड असल्यासारखे वाटते का? वगैरे. आणि ही उत्सुकता मी लपवली नाहीये. अधून मधून विचारत असते सगळ्यांना! ;) इथे मिपावर मी अनेकांना पिडलेले आहे हे त्या त्या सदस्यांना आठवत असेलच! नवर्‍याच्या चेपुवर जाऊन नातेवाईकांच्या मंगळागौर, हळदीकुंकू, साठी समारंभ असले फोटू मी जरूर बघते. ;)
पण मिपा सोडता अजून काही बघाय्ला वेळ होत नाही. मिपावरही सध्या यायला फारसा वेळ होत नाही. सततच्या व्हॉटस अपचा कंटाळा येतो. माझ्या मुलाचा फोन सतत वाजत असतो. त्याने आपण होऊन दोन दिवस म्यूट ठेवला होता. आशा आहे की त्यालाही यातील फोलपणा लवकरच कळेल.
पण तरी ही जी गंमत आहे की तुम्ही कोणाला काहीही, कधीही, विनाविलंब कळवू शकता ती वादातीत आहे. इतक्या लवकर मनातील गोष्ट कळवल्याने त्यावर सखोल विचार करणे कमी झाले आहे की काय असे वाटते.
आता खरे दु:ख हे आहे की शेजारीण विचारते की तू व्हॉटस अपवर आहेस का? तिने माझा फोन नंबर पहिले वर्षभर विचारलाच नाही. मी व्हॉ. अ. वर नाही म्हटल्यावर पुढे काही नाही. मग मीच तिचा क्रमांक जाणून घेतला. फोन करून माझा क्र. साठवून ठेवाय्ला सांगितला. गेल्या वर्ष दोन वर्षात प्रत्यक्ष भेटणार्‍यांची संख्या कमालीची घटलीये. मध्यंतरी इतका एकटेपणा आला होता की वेड लागेल काय असे झाले होते. चांगल्या मैत्रिणी ज्या चेपु किंवा कसंकायवर नाहीयेत त्यांच्याशी संपर्काचे माध्यम नाही राहिले. आत्ताच एकीला स म स करून विचारले की कधी भेटायचे? गेले वर्षभर आम्ही भेटायचे असे ठरवतोय. मागल्या महिन्यात मी पार रडकुंडीला आले होते की कोणी भेटायलाच तयार नाही. आणि तासन तास नव्हे तर पाच दहा मिनिटंही कोणी भेटत नाहीत. मग चेपु, व्हॉटस अप बरे की अजिबात न भेटणे? कंट्रोल्ड वापर म्हणता म्हणता ते जरा जास्त होते हा नेहमीचा अनुभव आहे म्हणून मग ते नकोच! आणि भेटीही होत नाहीतच!

दहा एक दिवसांपूर्वी एका गावात काही कागदपत्रांच्या कामाला गेले होते तेंव्हा तेथील मैत्रिणीला कळवले की मी येतीये तर तुला भेटून जाणार आहे. तिनेही ये वगैरे म्हटले. फोनवरच अगं, पण तू व्हॉटस अपवर का नाहियेस? असेही म्हणाली. प्रत्यक्ष भेटीत काय गप्पा माराव्यात हे तिला समजत नव्हते. पण निघताना तिनेही मान्य केले की प्रतय्क्ष भेटण्याची मजा वेगळीच आहे. अर्ध्यातासात आम्हाला प्रतय्क्ष भेटून जी मजा आली ती व्हॉटस अपने कधीही आली नसती.

गुगल प्लस बंद होणार असे मधे वाचले होते ! तसे होणार असेल मला लयं म्हणजी लयं वाईट वाटलं बघा ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح

श्रीरंग_जोशी's picture

22 Aug 2015 - 9:48 am | श्रीरंग_जोशी

गुगलवरच्या बर्‍याच सुविधा वापरण्यासाठी गुगलप्लस खाते असावे लागते. ही अट शिथिल करण्यात येत आहे अशी बातमी मी वाचली होती.

आशा वाटते की तुम्ही म्हणताय तसे घडणार नाही.

प्रदीप@१२३'s picture

22 Aug 2015 - 10:28 am | प्रदीप@१२३

सग्ळ्यचे प्रतिसाद वाचले नी विचारात पाड्ले....?

पैसा's picture

28 Aug 2015 - 11:20 pm | पैसा

फेसबुक आणिव्हॉट्स अ‍ॅपमुळे माझ्या अगदी बालवाडीतल्या मैत्रिणीबरोबर वाटेल तेव्हा बोलता येतं हा मोठा फायदा. फेसबुकवर लोकांच्या चांगल्या वाईट बातम्या पटकन कळतात हा फायदा. बाकी तोटे प्रत्येक माध्यमात असतातच. नको ती माणसं तुम्हाला काँटॅक्ट करून पिडू शकतात. त्याला तोंड कसं द्यायचं हे माहीत पाहिजे.

फेसबुकवर मागे एका २०/२२ वर्षाच्या गणपतीच्या मूर्ती बनवणार्‍या पोराने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही कॉमन मित्र दिसले म्हणून अ‍ॅक्सेप्ट केली. मग सुरुवातीला त्याचे अग तुग करून अगदी फ्रेंडली मेसेजेस यायला लागले. तेव्हा त्याला समजावले बाबा माझी मुलगी तुझ्या वयाची असेल. मग तो सॉरी म्हणाला. आता ताई म्हणून कधीतरी बोलतो. एकट्याने कंटाळा येतो, कोणाशीतरी बोलावंसं वाटतं म्हणून मेसेज पाठवतो म्हणाला. त्याने काही छान मूर्ती केल्या असतील तर मला टॅग करून त्यांचे फोटो टाकतो. काही त्रास नाही. पण एवढा पेशन्स दरवेळी ठेवणे शक्य नाही. तसेच अलम दुनियेला सुधारायचे काम माझे नाही. "मय्यत्री कर्नार कं" वाले मेसेज आले की त्वरित ब्लॉक करणे शहाणपणाचे.

व्हॉट्स अ‍ॅपवरून फक्त तेच तेच मेसेजेस येतात असे नव्हे तर बाई आहे का, तर "अव्हेलेबल" आहे का चाचपणी करूया असे वाटून अश्लील मेसेजेस, अगदी दिसण्यावर टिप्पणी करणारे मेसेजेस येतात हा बर्‍याच मैत्रिणींचा अनुभव आहे. अर्थात त्या लोकांना ब्लॉक करता येतेच. पण हे पूर्णपणे थांबवणे शक्य दिसत नाही. फेसबुकप्रमाणे अश्लील मेसेज पाठवणारे अकाउंट रिपोर्ट करता येतील अशी काहीतरी सोय व्हॉत्स अ‍ॅपवर हवी होती.

सोशल नेटवर्कचा मला आवश्यक वाटतं तेवढा उपयोग मी करून घेते. नसलं तरी काही बिघडत नाही. गावाला गेले की ८/८ दिवस अंतर्धान पावते. मला काही फरक पडत नाही! असलं तरी वा वा, नसलं तर फारच छान!!