साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस, डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.
इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी गोलाकृती आकृतीत उमटते.
दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली. जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.
इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )
खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल.
अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.
आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. ( म्हणूनच हा एवढा लेखनप्रपंच).
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?
प्रतिक्रिया
26 Oct 2013 - 11:59 pm | प्रचेतस
खूप सुरेख.
27 Oct 2013 - 12:20 am | कवितानागेश
आहा. फार सुंदर. :)
27 Oct 2013 - 12:47 am | शैलेन्द्र
मस्त , भाग्यवान आहात...
:)
27 Oct 2013 - 1:53 am | जॅक डनियल्स
फारच सुंदर !
27 Oct 2013 - 6:55 am | वेल्लाभट
क्या बात है सागर! लै लकी यार. बेस्ट ! आणि माहिती पण मस्त. आत बघायची उत्सुकता अजून वाढली....
27 Oct 2013 - 7:09 am | बहुगुणी
हा circular rainbow चा प्रकार मी विमानातून जातांना बरेचदा पाहिल्याचं आठवलं. NASA याला Glory अशा नावाने ओळखतं:

28 Oct 2013 - 9:46 am | सुज्ञ माणुस
बहुगुणी, कमाल फोटो आहे हा. पण धुके, पाऊस नसताना आणि क्षितिजाच्या वर हे इंद्रवज्र कसे काय बनले असावे हे समजत नाहीये.
29 Oct 2013 - 4:29 am | बहुगुणी
जालावर मिळालेली माहिती:
पाण्याचे थेंब सर्व दिशांनी उपस्थित असणं आणि निरीक्षण करणार्याच्या मागून सूर्यप्रकाश असणं या दोन घटनांची इंद्रधनुष्य 'दिसण्या'साठी आवश्यकता असते.
आपण पाहिलेलं प्रत्येक इंद्रधुष्य हे आपल्यापुरतं विशिष्ट असतं (व्यक्तिसापेक्ष) कारण ते आपल्या डोळ्यांना (खरंतर डोक्याला) केंद्रस्थानी धरून दिसतं. मागून येणार्या उन्हामुळे आपल्या डोक्याची सावली इंद्रधनुष्याच्या मध्यात जिथे पडेल त्या बिंदूला antisolar point म्हणतात (पहिल्या चित्रात पहा). इंद्रधनुष्याच्या वरचं टोक दिसण्यासाठी आपण ४२ अंश वर पहातो, त्याच्या कडा दिसण्यासाठी आपण ४२ अंश डावीकडे वा उजवीकडे पहातो.
तसंच इंद्रधनुष्याच्या तळाकडे पहायचं असेल तर आपण ४२ अंशातून खाली पहायला हवं. पण जवळजवळ नेहेमीच जमीन मध्ये येते, त्यामुळे डाव्या-उजव्या दिशेला क्षितिजरेषेपर्यंतच आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं, पूर्ण गोलाकार दिसणं फार कमी वेळा शक्य असतं. तसं ते कधी दिसू शकतं? एक म्हणजे आपण बागेत पाण्याची नळी हातात धरून गोलाकार फवारा मारत असतांना आणि उन्हं आपल्या मागे असतील तर असं जवळजवळ पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य दिसू शकतं, तुमच्या शरीराची सावली ज्या खालच्या भागावर पडेल तिथला भाग मात्र दिसत नाही. याचप्रमाणे तुम्ही उंच पर्वताच्या टोकावर गेलात तर पर्वतशिखराची सावली जिथे पडते तिथपर्यंतचं वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू शकतं (वरील धाग्यातील 'इंद्रवज्र' पहा, तळाशी पर्वत शिखराची सावली आहे तिथे ते खंडित झालेलं दिसतं आहे.
तसंच तुम्ही विमानातून खूप उंचावरून प्रवास करीत असाल, जलबिंदूंनी भरलेले ढग एकीकडे असतील आणि सूर्यप्रकाश विमानाच्या दुसर्या बाजूकडून येत असेल, तर असं पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू शकतं; इतकंच नव्हे तर कधी कधी चक्क विमानाची सावलीही अशा वर्तुळाकृती इंद्रधनुष्याच्या antisolar point वर पडलेली दिसते.
या माहितीचं उत्खनन करून काढायला उद्युक्त केल्याबद्दल 'सूज्ञ माणूस' यांचे खास आभार!
29 Oct 2013 - 10:52 am | सुज्ञ माणुस
कमाल आहे हे सगळे. सामान्य (सुज्ञ) माणसाची बुद्धी खुंटून जावी असे अलौकिक निसर्ग अविष्कार. योग्य माहिती आपण दिलीत याची लेखात भर टाकेन. असे काही वाचले कि वाटते कि जग कुठे चाललेय आणि मी काय करतोय? :(
27 Oct 2013 - 9:16 am | किसन शिंदे
वाह! फार सुरेख आहे.
27 Oct 2013 - 10:35 am | अमेय६३७७
सुरेख. बहुगुणींनी दिलेला फोटो पण मस्तच.
27 Oct 2013 - 11:22 am | आदूबाळ
काय भारी फोटो आहे!
27 Oct 2013 - 12:07 pm | प्यारे१
आहाहा!
अवचित समोर दिसल्यावर माणूस वेडाच होईल!
27 Oct 2013 - 1:22 pm | अग्निकोल्हा
.
27 Oct 2013 - 1:28 pm | भ ट क्या खे ड वा ला
भाग्यवान आहात
लेख हि छान
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?
१००% सहमत
27 Oct 2013 - 4:14 pm | सुहास झेले
मस्त :) :)
27 Oct 2013 - 4:18 pm | मुक्त विहारि
भाग्यवान आहात...
आणि धन्यवाद.
27 Oct 2013 - 5:16 pm | पैसा
छान माहिती आणि सुरेख फोटो!
28 Oct 2013 - 9:39 am | सुज्ञ माणुस
धन्यवाद वाचकहो, बरेच दिवस लिखाण बंद होते ते या निमित्ताने चालू झाले.
असाच लोभ असू द्यात ;)
28 Oct 2013 - 11:27 am | अनन्न्या
अलिकडेच माबोवर याचा फोटो पाहिला होता. तोही विमानातून काढलेला होता. निसर्गाचा हा आविश्कार पाहिलात, खरच भाग्यवान आहात.
28 Oct 2013 - 2:41 pm | कुसुमावती
छान आलाय फोटो.
(इंद्रधनू आवडणारी) कुसुमावती
28 Oct 2013 - 4:17 pm | अमोल केळकर
अरे वा मस्तच ! असे काही असते ( इंद्रवज) हे आपला लेख वाचूनच कळले .
छान माहिती :)
अमोल केळकर
28 Oct 2013 - 4:54 pm | अनिरुद्ध प
तसेच छान माहिती.
29 Oct 2013 - 2:50 pm | मीराताई
हा अनुभव फारच सुंदर आहे.
पूर्वी एकदा एका ठि़काणी हा अनुभव शब्दबद्ध केला होता, त्यातला भाग इथेच देतेय;
...... आसनस्थ होताच समाधानाचा सुस्कारा टाकत मी बाहेर नजर टाकली. सूर्योदयाला अजून अवकाश होता. आत लख्ख दिवे प्रकाशत होते, तरी बाहेर मात्र अजून झुंजुमुंजुच होतं. भोवतालचा परिसर मंद प्रकाशात अंधूक अंधूक दिसत होता. काही विमानांची धुडं मंद गतीने जमिनीवरून सरपटत होती. कर्मचाऱ्यांची धावपळ चालली होती. ते अपरिचीत वातावरण मी अलिप्तपणे पाहात राहिले.
विमान हवेत झेपावताच ते सारं लवकरच मागे पडलं. शहरी वस्तीही मागे पडली. डोंगर, जंगल, समुद्र हेही सगळं विरून गेल्यासारखं झालं. आता दाही दिशांना फक्त मेघांचंच साम्राज्य होतं. पावसाळयातला दिवस होता ना तो? कुठे शुभ्र, कुठे भुरके, कुठे किंचित पिवळट तर कुठे काळे सावळे ढग मंद गतीने, गर्दी करून एकमेकांना लोटत निघाले होते. कुठे ते विरळ वाटत होते तर कुठे सघन-घनदाट असे भासत होते. झेपावणाऱ्या लाटांसारख्या त्या ढगांनी खालचा भूभाग पूर्णत: झाकून टाकला होता. अंधार विरळ होत जात होता, तसतसे मेघांचे लावण्य खुलत होते. त्या मेघांच्या आवरणामधून जसा काही प्रकाश झिरपत होता.
आणि एका क्षणी त्या मेघांचं आवरण आणखी थोडं विरळ झालं. त्या आवरणाला थोडं बाजूला सारत तो सूर्याचा झगझगीत प्रकाशगोल अवतरला. अन् त्यासरशी त्या आकाशाचा नूरच पालटला. तिथला कणन् कण आता हर्षोत्फुल्ल भासू लागला. एरवी पृथ्वीवरून मान वर केल्यावरच दिसणारा तो सूर्य चक्क खालच्या दिशेने ढगांमधून डोकावत होता. इथे कुठली पृथ्वी आणि कुठलं क्षितीज? त्याच्या खाली, वर, मागे, पुढे सगळीकडे ढगच ढग होते. त्या ढगांच्या गर्दीतच तो ओठंगून काही क्षण उभा होता आणि बघता बघता त्या पावसाळी ढगांनी अतीव आनंदाने त्याच्याभोवती इंद्रधनुष्याची कमान उभारली. त्या वैभवशाली कमानीखालून सूर्यदेव डौलात प्रवेश करत होते आणि काय आश्चर्य! पुढच्याच काही क्षणात खाली हेलावणाऱ्या त्या ढगांमधेसुध्दा एक इंद्रधनुष्य दिसू लागलं. मात्र या इंद्रधनुष्याची कमान खालच्या दिशेला होती; जणू त्या सूर्यनारायणानेच गळयात सप्तरंगी कंठा धारण केला असावा अशी! डोके फाडफाडून मी ते दैवी लावण्य पाहतेय् तो आणखी एक नवल घडलं. एखाद्या जलाशयात जसं चंद्र-सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, तसंच सूर्याचं प्रतिबिंब त्या संप्रक्त अशा ढगातल्या जलकणांमधे दिसत होतं आणि तेही अगदी कंठयाच्या मधोमध! इंद्रधनुष्याच्या कमानीत झगमगणारा तो उगवतीचा सूर्य, त्याच्या गळयातला तो इंद्रधनुषी, सप्तरंगी कंठा आणि त्यात लखलखणारा तो कौस्तुभमणी! ते दिव्य सौंदर्य मी अनिमिष नेत्रांनी पीत होते. इतकी नि:शब्द, इतकी अवाक् झाले होते की ते दिव्य दर्शन देणाऱ्या सूर्यनारायणाला वंदन करण्याचंही भान राहिलं नाही. त्या दैवी दर्शनाने सारं अस्तित्व हरवून गेलं होतं. अन् अपार आनंदाने नेत्रातून अनावरपणे अश्रू वाहात होते. खरंच, परमेश्वराने मला बहाल केलेल्या अनेक सुंदर क्षणांपैकी हा एक होता. अकल्पितपणे, अनाहूतपणे, अचानकच ते ऐश्वर्याचं दर्शनदान घेऊन सामोरा आलेला भाग्यक्षण होता तो!
अर्थात क्षणच तो! क्षणोक्षणी काळाच्या उदरात गडप होणारा! विमानाने बहुधा दिशा बदलली असावी. किंवा ढगांच्या सघनतेत बदल झाला असावा. हळूहळू आपल्या दगडांच्या महाराष्ट्र देशातले डोंगरकडे अन् सुळके दिसू लागले आणि मी भानावर आले. तो क्षण मात्र त्या स्वप्नील हृदयाची स्वप्नमुद्रा माझ्या हृदयावर कायमची कोरून ठेवून मगच भूतकाळाच्या उदरात गडप झाला.
29 Oct 2013 - 3:57 pm | बहुगुणी
मी असं हे इंद्रधनुष्य बरेचदा पाहिलंय विमानातून, पण तुम्ही ज्या उत्कटतेने वर्णन केलंय त्याला तोड नाही!
29 Oct 2013 - 2:51 pm | यशोधरा
सुरेख!
29 Oct 2013 - 3:02 pm | मदनबाण
वाह्ह... :)
31 Oct 2013 - 6:37 pm | विजयराजे
आयुष्य हे अशा अनुभवाच्या प्रतिक्चेत आहे
1 Nov 2013 - 2:32 am | दीपा माने
अतिसुंदरच! वैज्ञानिक बाजुने 'इंद्रवज्र' पाहिले म्हणजे मग ते केवळ भ्रामक प्रतिमेखेरीज काहिच उरत नाही. त्याला त्याच चष्म्यातुन पाहताना इंद्र आणि वज्र हयांना केवळ नाममात्रच महत्व उरतं. पण तो चष्मा क्षणभर काढुन ठेवुन त्याकडे पाहिलं तर जी अनुभुती मिळते ती कालातीतच!
1 Nov 2013 - 5:10 pm | सुज्ञ माणुस
मीराताई, आपल्या या लेखाची लिंक मिळेल का ? मस्त लिहिलेय.
इतर वाचकांना थांकू :)