हल्ली मिपावर पारंपारिक रेशिप्या येतायेत. त्यातही कोकणातल्या फणसाच्या रेशिप्या जास्त!! उकडगरे, फणसाचा पुलाव ...म्हटलं आपणही फणसाच्या भाजीची रेशिपी टाकावी (जी अजून मिपावर आलेली नाही असं मला वाटतं). फणसाची भाजी म्हणजे जीव की प्राण. जवळजवळ दोनेक वर्ष ही भाजी केलीच नव्हती. फणस चिरायची उकडायची माहिती होती, पण मसाले? ते नक्की कोणकोणते ते आठवेना. मागे एकदा पिकनिक निघाली तेव्हा वेळासला जाणं झालं होतं. तिथं फणसाची भाजी खाल्ली होती, अतिशय सुंदर चव!! न राहावून भाजी कशी केली ते विचारलं. तर उत्तर मिळालं की, 'काही विशेष नाही जिरं मोहरीच्या फोडणीत उकडलेल्या फणसाचे तुकडे घातले, लाल तिखट घातलं आणि उतरता उतरता एक गुळाचा खडा टाकला'. तर हे येवढेच जिन्नस वापरुन भाजी चविष्ट करण्याइतकी चव काही माझ्या हातात नव्हती. मग फोनाफोनी झाली, दोन तीन ठिकाणी जालावर रेशिपी शोधणं झालं आणि सगळ्याचा सुवर्णमध्य काढून ही रेशिपी केली.
आता साहित्य:
एक कच्चा फणस
अर्धा नारळ
चार सुक्या लाल मिरच्या
एक छोटी कैरी (चिंच सुद्धा चालेल)
दोन छोटे चमचे एव्हरेस्ट किचनकिंग मसाला
हळद
जिरं
मोहरी
हिंग
कडीपत्त्याची सात-आठ पानं
साखर
मीठ
आधी फणस चिरायला घ्यावा. हा चिरताना घ्यायची काळजी म्हणजे दोन तीन मोठी जुनी वर्तमानपत्रं हाताशी घेऊन ठेवा. त्यातलं एक, फणस चिरायला घेतलेल्या विळीखाली अंथरा. म्हणजे फणसाच्या चिकाने फरशीची वाट लागणार नाही. आता विळीवर चिरता येत असेल तर ठीक नाहीतर सरळ विळीच्या पाटावर तो फणस ठेवा आणि सुरीने देठ कापा (त्याआधी सुरीला आणि हाताला तेल लावून घ्यायला विसरु नका). देठ कापल्या कापल्या चिकाचा ओघळ येईल तो हाताशी असलेल्या वर्तमानपत्रांचे तुकडे फाडून पुसून घ्या. बाजूचा काट्यांचा भाग तासून फणसाचे छोटे तुकडे करा. आणि निदान दोन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्या. ते या फोटोत दाखवल्याप्रमाणे दिसायला हवे.
आता या तुकड्यांमध्ये थोडं मीठ आणि अंदाजे दोनेक वाट्या पाणी घालून ते कुकरला लावून चार शिट्या होऊ द्या. तोवर सुक्या लाल मिरच्या साधारण कुरकुरीत होतील इतपत मध्यम आचेवर परतून घ्या. नारळाचे तुकडे करून तेही वरचेवर परतून घ्या आणि नंतर त्यात थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
फणसाचे तुकडे उकडल्यानंतर असे दिसतील. ते आणखी बारीक चिरुन घ्या.
आता एका कढईत तेल तापत ठेवा. चांगलं तापलं म्हणजे मग त्यात मोहरी घाला. ती तडतडली मग जिरं घाला. मग हिंग आणि कडीपत्त्याची पानं घाला. त्यानंतर मिरची खोबर्याचं वाटण घालून नीट परतून घ्या. हा मसाला रंग बदलू लागला की मग त्यात उकडलेल्या फणसाचे तुकडे घालून नीट परता, थोडं पाणी घाला. फणसाचे तुकडे ज्यात शिजवले त्यात पाणी उरलं असेल तर ते घातलं तरी चालेल. मग झाकण ठेवून एक वाफ निघू द्या.
वाफ निघतेय तोवर कैरी सोलून, किसून घ्या. पाच सहा मिनीटांनी भाजीवरचं झाकण उघडून त्यात किसलेली कैरी, दोन चमचे किचन किंग मसाला, दोन चमचे साखर आणि अंदाजे मीठ घाला. नीट परतून परत झाकण ठेवा. साधारण पाच मिनीटांनी गॅस बंद करा. भाजी तयार !!
तळटीपा:
१) मिरची खोबर्याच्या वाटणासोबत खडा गरम मसाला भाजून वाटतात, पण मी किचनकिंग वर भागवलंय.
२) फणस चिरुन झाल्यानंतर विळीच्या पाटाला आणि सुरीला लागलेला चिक नीट धुवून काढायची मानसिक तयारी ठेवा.
३) उकडल्यानंतर फणस चिरताना त्यातल्या आठळ्यांना सालं धरलीयेत का ते बघा, तसं असेल तर ती सालं काढून टाकावीत. नाहीतर खाताना दाताखाली येतील.
४) अतिमहत्त्वावी गोष्ट; मी अंडं घालत नसल्यामुळे ही भाजी अंडं घालून करता येते की नाही त्याचा अनुभव नाही. ज्यांना अंडी घालून पदार्थ करता येतात त्यांना कृपया असे प्रश्न विचारावे. ;)
प्रतिक्रिया
21 Apr 2013 - 10:27 am | पैसा
घरात फणसाचे गरे आहेत. कैरी नाही पण चिंच नक्कीच आहे. तेव्हा आजच करते. मात्र किचन किंगपेक्षा सगळा गरम मसाला घालून करते. फोटो काढून फेसबुकावर तुला टॅग नक्कीच करीन! :D
21 Apr 2013 - 2:00 pm | स्पंदना
सुड तू स्वतः फणस कापायच धाडस केलस? धन्य आहेस. मी तर हे धाडस नाही करणार, त्या ऐवजी बाजारात पाव फणस मिळतो तो आणुन भाजी करेन.
24 Apr 2013 - 11:38 am | मोदक
फणस कापणे फारसे अवघड नसते, त्याची एक टॅक्ट आहे. एक धारदार लांब पात्याची सुरी, पेपर आणि गोडतेल हाताशी घेवून..
१) फणसाचे पहिल्यांदा दोन भाग करायचे - ही गोष्ट जरा त्रासदायक असते - पण हीच स्टेप फक्त.
२) चिक पेपरने टिपून घ्यावा
३) फणसाच्या काटेरी पाठीवर दोन इंचावर एक पाव चकती इतका भाग कापून तितक्याच भागातले गरे काढायचे, तो भाग मोकळा झाला की सहज कापून टाकता येतो.. मग पुढचा भाग..
कापा फणस असेल तर आजीबात टेन्शन नाही.
24 Apr 2013 - 1:45 pm | सूड
>>कापा फणस असेल तर आजीबात टेन्शन नाही.
मला वाटतं त्या भाजीच्या फणसाबद्दल बोलतायेत, कच्चा फणस कापा असो की बरका तितकासा फरक पडत नाही असं मला वाटतं.
21 Apr 2013 - 2:05 pm | गणपा
यु टु ब्रुट्स?
अरे सध्या काय कमी छळ चाललाय का इथे?
23 Apr 2013 - 8:33 pm | त्रिवेणी
गणपा दादा आता पाककृती का टाकीत नाही.
खूप दिवसात गणपादांची पाककृती आली नाही. जेव्हा मिपा नवीन नवीन वाचायला सुरवात केली त्यांचा पाककृती वाचून मिपा जास्तच आवडायला लागले.
21 Apr 2013 - 2:59 pm | दिपक.कुवेत
मस्त दिसतेय भाजी. ईकडे कच्चा फणस मिळतो पण चिरायचं धाडस होनार नाहि त्यामुळे येत्या भारत्वारीत तुझ्याकडेच येतो खायला कसं?
21 Apr 2013 - 3:01 pm | अभ्या..
सूड तुझी ही पहिलीच पाकृ असली तर शुभेच्छा रे.
21 Apr 2013 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार
आवडेश एकदम.
21 Apr 2013 - 4:50 pm | प्यारे१
शेवटचा फोटो गंडल्यामुळे काही मजा वाटेना गड्या. :(
जरा चांगला फोटो टाक की.
हल्ली आतल्या मालापेक्षा मार्केटींग नि जाहिरात यांना जास्त महत्त्व आहे.
-पष्ट ;) प्यारे
21 Apr 2013 - 4:54 pm | बॅटमॅन
आयला भारीच बे सुडकेश!!!!! मान गये :)
अवांतरः फणसाच्या भाजीचा फील, आणि काही प्रमाणात चव चिकनसारखी असते. निदान मला तरी तसे जाणवते.
21 Apr 2013 - 4:58 pm | सस्नेह
भारीच खटपट केलेली दिसतेय भाजीसाठी !
जमतेय का बघते.
21 Apr 2013 - 5:00 pm | यशोधरा
ही आणि केळफुलाची! नुसती खायलाही आवडते!
22 Apr 2013 - 4:48 pm | सानिकास्वप्निल
केळफुलाची काळे वाटाणे किंवा चणाडाळ घालून बनवलेली भाजी खूपचं आवडते :)
@ सूड फणसाची भाजी छान झालेली दिसतेय , कृती आवडली :)
21 Apr 2013 - 8:15 pm | प्राध्यापक
अप्रतीम,प्रथमच पाहतोय ही भाजी,बर्याच दिवसांनी काहीतरी नाविन्यपुर्ण पाकक्रुती पाहायला मिळाली,पण करायला जमणे अवघड वाटतेय.
21 Apr 2013 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
भाजी-केली,,,सूड घेतला...!!! =))
22 Apr 2013 - 6:13 am | शुचि
खी: खी: =))
22 Apr 2013 - 6:13 am | शुचि
क्या बात है!!
22 Apr 2013 - 2:30 pm | गौरीबाई गोवेकर
झकास
22 Apr 2013 - 4:55 pm | तर्री
सरस
22 Apr 2013 - 5:45 pm | प्रचेतस
जबरदस्त रे सूड
22 Apr 2013 - 6:56 pm | मी_देव
मस्तच.. खुप आवडीची भाजी.. :)
23 Apr 2013 - 3:31 pm | सूड
@aparna aksha@: कोकणातल्या माणसाने फणसाला घाबरुन कसं चालेल. ही भाजी एकदा पानात पडली की केलेले सर्व उपद्व्याप काहीच वाटत नाहीत.
@अभ्या: इदु थर्ड/ फोर्थ रेशिपी अदं अन्ना !! सर्च माडी.
@ प्यारेकाका: समर्थ रामदासांचे अनुयायी असूनही वरल्या रंगाला आपण कसे भुललात याचं नवल वाटलं. ;)
23 Apr 2013 - 3:55 pm | गवि
फार झकास.
मुळात फणसाच्या भाजीला विशेष मसाले घालतच नाहीत असं आजीने आणि आईने सांगितल्याचं आठवतं. मसाल्यांमुळे फणसाचा मुळात माईल्ड असलेला मूळ स्वाद पूर्ण मारला जातो.
तस्मात अगदी साधा तिखटहिंगादि फोडणीचा मसाला वापरुन साधीच भाजी चांगली लागते. गरम मसालाही जास्त ओव्हरपॉवरिंग होईल असं मत आहे.
फणस चिरणे हा बोकड सोलण्याच्या बरोबरीचा प्रकार हाच एक या भाजीतला अडथळा. पण बनलेली भाजी ही जगातल्या सर्वाधिक फक्कड भाज्यांतली एक असते यात शंकाच नाही.
पाकृबद्दल धन्यवाद.
23 Apr 2013 - 4:51 pm | प्रीत-मोहर
ह्याला आम्ही चारकुटा / चाका म्हणतो
23 Apr 2013 - 4:56 pm | सामान्य वाचक
फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..
23 Apr 2013 - 5:18 pm | सूड
>>फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..
असं मी म्हणालो होतो? नक्की?
24 Apr 2013 - 10:34 am | सामान्य वाचक
मस्तच.. खुप आवडीची भाजी..
( मी_देव - Mon, 22/04/2013 - 18:56 )
यांच्यासाठी होते.
चुकीच्या ठिकाणी पोस्ट केला गेला अभिप्राय
24 Apr 2013 - 11:07 am | गवि
हॅ हॅ.. मला वाटतं खाणार्याला भाजी आवडत असण्याने फरक पडत नसून बनवणार्याला आवडत असणं मुख्य आहे.. विशेषतः फणसासारख्या चिरण्यासोलण्यास किचकट भाजीत. ;) म्हणून "घरात विशेष आवडत नाही" अशा स्वरुपाची मी_देव यांची ती रचना असावी..
24 Apr 2013 - 11:22 am | सामान्य वाचक
फारच किचकट काम असते फणसाचे.
पण चवीसाठी सगळे माफ!!
आणि वाटण घाटण न करता , साध्या फोडणी ची चव जास्त छान येते.
24 Apr 2013 - 11:39 am | मोदक
भारी रे!!!