साहित्य:
ताजी कोळंबी साफ करून, काळा धागा काढून घेतलेली
३-४ टेस्पून खोवलेला ओला नारळ
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ टेस्पून नारळाचे घट्ट दूध
३-४ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून धणे
१ टीस्पून जीरे
४ लसूण पाकळ्या
१ टीस्पून काळीमिरीपूड (तुम्ही अख्खे मिरे वापरू शकता)
१/४ टीस्पून मेथीदाणे
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१/३ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करुन त्यात लाल सुक्या मिरच्या, धणे, जीरे, मेथीदाणे, लसूण घालून परतून घ्या. (अख्खे मिरे वापरत असल्यास ते पण ह्यातच परतून घ्यावे)
त्यात खोवलेला ओला नारळ व काळिमिरीपूड घालून नारळ हलक्या तांबूस रंगावर परतून घ्या.
गार झाले की मिश्रण मिक्सरला थोडे पाणी घालून वाटून घ्या.
दुसर्या पॅनमध्ये तेल गरम करुन कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
त्यात हळद व वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढा.
आता त्यात कोळंब्या घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे.
कोळंब्या शिजल्या कि त्यात चिंचेचा कोळ व नारळाचे दुध घालून आणखीन २-३ मिनिटे शिजवावे.
बारीक चिरलेली कोथींबीर वरुन पेरावी व थोडेसे नारळाचे दुध घालून गरमा-गरम सर्व्ह करावे.
ही प्राँन्स घस्सी / गस्सी तुम्ही साध्या भाताबरोबर, चपाती किंवा नीर डोश्याबरोबर सर्व्ह करावी.
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 5:15 am | वीणा३
मस्त दिसत्ये. नक्की करून बघेन.
21 Jul 2012 - 8:52 am | पक पक पक
त्या बरोबर अप्पमची पण रेसिपी हवी होती.... :tongue: अजुन मजा आली असती.. :)
18 Jul 2012 - 6:52 am | ऐकसयुरी
मस्तच............
18 Jul 2012 - 10:10 am | प्रभाकर पेठकर
प्रॉन्स घस्सी एक अतिशय तृप्तीदायक पदार्थ.
चवीसाठी मी नारळाचे घट्ट दूध जरा जास्तच वापरतो.
शेवटचे छायाचित्र अप्रतिम. इथेच मांडी ठोकून जेवायला बसावे.
अवांतरः कोळंबीचे प्रमाण द्यायचे राहिले का?
19 Jul 2012 - 11:45 am | सानिकास्वप्निल
कोळंबीचे प्रमाण मुद्दामचं दिले नाही , ज्याला जसे आवडते तसे घ्यावे.
मी साधारण १२० ग्राम कोळंबी घेतली होती.
बाकी प्रतिसादाबद्दल आभारी आहे :)
18 Jul 2012 - 2:05 pm | स्मिता.
घस्सी छानच असेल यात शंका नाही. यात कोळंबी न घालता मासे घातले तर?
18 Jul 2012 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर
बांगड्यांची घश्शी अशीच करतात. त्यामुळे , सुरमई, रावस, पापलेट, तार्ली ह्यांची घश्शीही मस्त लागावी.
बाकी सानिकास्वप्निल सांगतीलच.
18 Jul 2012 - 9:55 pm | सुनील
मला वाटतं, बांगडा आणि तारल्यांच्या घश्शीत तिरफळेही घालतात जी कोळंबी, पापलेट वा सुरमईत सहसा घालीत नाहीत.
19 Jul 2012 - 11:43 am | सानिकास्वप्निल
पेठकर काकांनी सांगितलेच आहे कोणते मासे घालू शकतो ते :)
चिकन घालून चिकन घस्सी ही बनवता येते :)
18 Jul 2012 - 3:26 pm | इरसाल
हा पदार्थ मी पहिल्यांदा बेंगलुरुला खाल्ला होता.
कांडला सी फुड मधे. मंगलोरी मसाल्यात बनवलेला आणी त्यासोबत नीर डोसा काय सही लागत होता.
तुम्ही बनवलेला हा ही तसाच चविष्ट, सुंदर असणार याबद्दल शंका नाही.
18 Jul 2012 - 4:11 pm | कवितानागेश
मस्त दिसतय... :)
प्रोन्सऐवजी भेंडी चालेल का? :(
19 Jul 2012 - 8:29 pm | पैसा
कृती मस्तच आहे, आणि फोटो नेहमीप्रमाणेच!
मौ, घश्शी कार्ल्याची, मुगाची पण करतात. मी कधी कधी करते.
20 Jul 2012 - 3:28 am | प्रभाकर पेठकर
घश्शी कार्ल्याची, मुगाची पण करतात
पाककृती...पाककृती....पाककृती......
18 Jul 2012 - 9:01 pm | रेवती
फोटू छान आलाय पण शाकाहारी पब्लीकने काय करावे?
प्रॉन्सऐवजी कोणती भाजी वापरावी?
20 Jul 2012 - 2:24 pm | पिंगू
मला वाटतं फ्लॉवर वापरुन बघायला पाहिजे.
18 Jul 2012 - 9:57 pm | सुनील
गरमा-गरम भात आणि त्यावर ही कोळंबीची आमटी. अहाहा!!!!
18 Jul 2012 - 10:50 pm | जाई.
वाह!
20 Jul 2012 - 10:13 am | मोदक
पाकृ आवडली....
:-)
20 Jul 2012 - 5:54 pm | स्पंदना
घश्शी का म्हणतात? कोणत्या भागातल नाव आहे हे?
बाकि मसाला इतका छान दिसतो आहे ना की बस. तोंडाला पाणी सुटल.
20 Jul 2012 - 7:23 pm | पैसा
शाकाहारी लोकांसाठी घश्शीची पाकृ देत आहे. ही कारवार साईडची पाकृ आहे.
मसाला: धने २ चहाचे चमचे, पाव चमचा मेथी दाणे, सुक्या मिरच्या आवडीप्रमाणे, हळद
इतर साहित्यः ओले खोबरे १/२ वाटी, मीठ, चिंचेचा कोळ, १०/१२ लसूण पाकळ्या, फोडणीसाठी तूप १ टे स्पून, मोहरी, कढीपत्ता
थोड्या खोबरेल तेलात वर दिलेला मसाला भाजून घ्यावा. त्यात ओले खोबरे १/२ वाटी घालून वाटून घ्यावे. एकीकडे बटाटे/मोड आलेले मूग्/कारल्याच्या फोडी (जे आवडेल ते) शिजत ठेवावे. अर्धवट शिजलं की त्यात वाटलेला मसाला आणि २ टे. स्पून चिंचेचा कोळ घालावा. शिजून जरा जाड रस झाला की लोखंडाच्या पळीत तूप तापवून त्यात मोहरी, कढीपत्ता घालावा आणि लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. लसणींना तांबूस रंग आणि मस्त वास आला की ती पळी घश्शीच्या पातेल्यात घालावी. जरा वेळ फोडणी त्यात मुरू द्यावी आणि थोड्या वेळात खायला सुरू करावे भात्/पोळ्यांबरोबर!
टीपः १. कारल्याच्या फोडी शिजवताना त्यात थोडा गूळ घालावा.
२. मी आज घश्शी केलेली नाही तेव्हा फोटो मागू नये.
20 Jul 2012 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद. लवकरच करून पाहण्यात आणि खाण्यात येईल.
20 Jul 2012 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते
सुप्पर!