बर्याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.
खालच्या फोटोत दोन्ही नंदी.
हा देवळाचा गाभारा. गाभार्यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.
नंदी परत एकदा
आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.
देवळाच्या मागील भाग
ही गणेशमूर्ती....
हा बहुधा नृत्य गणेश असावा.
त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...
या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.
हे कोरीव खांब ..
आदिमायेचं रौद्ररुप !!
ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.
आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.
आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प
संपूर्ण देऊळ..
फोटोसौजन्य: स्पा.
प्रतिक्रिया
18 Feb 2012 - 10:19 pm | प्रचेतस
सुंदर फोटो आणि तितकेच सुरेख वर्णन.
खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.
मंदिराच्या शैलीविषयी अधिक माहिती मिपाकर शरद देतीलच.
(बाकी मंदिर कोणी बांधले हे तिथे कोणीच लिहुन ठेवले नाही पण त्याच मंदिराच्या फोटोंवर माननीय स्पा यांनी वॉटरमार्क मात्र टाकून ठेवलेत.) ;)
19 Feb 2012 - 12:53 am | मन१
हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.
लेख आवडला आहेच. बघायच्या यादीतील नावे वाढतच जाताहेत.
19 Feb 2012 - 3:48 am | प्रचेतस
शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
19 Feb 2012 - 7:41 am | सूड
अधिक माहितीसाठी धन्यवाद !! खरंतर तिथं एक तळटीप लिहायचं राहून गेलं, की यावर आणखी माहिती किंवा दिलेल्या माहितीत दुरुस्ती जरुर सुचवा. काय होतं की अशा ठिकाणी गेल्यानंतर मिळणारी माहिती त्याही लोकांनी कुठेतरी ऐकलेली असते. माहिती पुरवणार्याचा त्याबाबतीत विशेष अभ्यास नसतो. तीच माहिती आपल्याकडून पुढे जाण्यापेक्षा त्यात दुरुस्ती होणं किंवा भर पडणं उत्तम. पुन्हा एकदा धन्यवाद.
20 Feb 2012 - 12:41 pm | पियुशा
+१ टू वल्ली बाकी मंदिर कोणी बांधले हे तिथे कोणीच लिहुन ठेवले नाही पण त्याच मंदिराच्या फोटोंवर माननीय स्पा यांनी वॉटरमार्क मात्र टाकून ठेवलेत.)
हा हा हा झैरात झैरात ;)
18 Feb 2012 - 9:02 pm | तर्री
उत्तम फोटो व चांगली माहिती.
परवा महाशिवरात्र आहे आणि भगवान शंकरा च्या प्रसादाची सोय पहायला हवी.
ओम् नमः शीवाय !
18 Feb 2012 - 9:13 pm | कुंदन
धन्यवाद सुड आणि स्पा !
18 Feb 2012 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
हे मंदिर म्हणजे,खरच कोरीव-काम आहे... फोटो आणी माहिती दोन्ही छान... :-)
19 Feb 2012 - 12:07 am | अन्या दातार
असेच म्हणतो. लगे रहो सूड व स्पा!
18 Feb 2012 - 11:50 pm | पैसा
मुंबईच्या इतकं जवळ इतकं सुंदर मंदिर आहे हेच माहिती नव्हतं. मला वाटतं, हे खिद्रापूरपेक्षा जुनं असावं.
आणखी माहिती: हेमाडपंती बांधकाम म्हणजे फक्त दगडांचा वापर करून केलेलं असं ऐकल्याचं आठवतंय.
19 Feb 2012 - 9:49 am | चौकटराजा
हे देवालय मी तीन चार वेळा तरी पाहिले आहे. आपल्या परिसरात हे एक भूषणच आहे. पण येथे महाराष्ट शासनाचे दुर्लक्ष आहे. आता अलिकडे
सुधारणा केल्या असतील तर माहिती नाही.येथे गणपति देवता शृंगार रस आळ्वताना एके ठिकाणी आहे असे स्मरते.
@ वल्ली - आपल्याला असलेली माहिती पहात वल्ल्ली आजोबा म्हणायला हरकत नाही. आपन म्हणतो ना " त्तो अमुक त्यात बाप आहे.
तसा वल्ली आजोबा आहे असे मानतो मी.
19 Feb 2012 - 5:15 pm | ५० फक्त
मस्त ओळख रे, खरंच अश्या खुप गोष्टी माणसं आपल्या जवळ असतात पण त्यांच्यातलं हे सौंदर्य कुणीतरी दाखवल्यावर दिसतं,
हा धागा आता आईला दाखवला, लग्नाआधी ती बदलापुरला राहायची, त्यावेळी तिथुन टांगा करुन मैत्रिणिबरोबर इथं जायची, तेंव्हा मंदिराच्या बाजुला एक बाग होती अशा काही आठवणी सांगितल्या तिनं.
19 Feb 2012 - 5:26 pm | यकु
मस्त फोटो आणि वृत्तांत.
मन आणि वल्ली यांचा संवाद आवडला.
19 Feb 2012 - 6:05 pm | प्यारे१
मस्त वृत्तांत आणि सुंदर शिवमंदिराची ओळख करुन दिल्याबद्दल बम बम भोले...!
21 Feb 2012 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा
@बम बम भोले...!

19 Feb 2012 - 11:14 pm | सुनील
छान लेख आणि फोटो. आणि समयोचितदेखिल!
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं
वरील दोन वा़क्यांत विसंगती आहे. कारण हेमाडपंत हे तेराव्या शतकातील!
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे, हेमाडपंती म्हणून सांगितलेली अनेक मंदिरे हेमाडपंतांच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. कदाचित हेमाडपंतांनी त्या प्रकारच्या बांधणीचा प्रचार्/प्रसार केला म्हणून तो शब्द प्रचलीत झाला असावा.
अत्यंत अवांतर - चक्रधर स्वामींच्या खूनात हेमाडपंताचा सहभाग होता असे म्हटले जाते. ते खरे आहे काय?
20 Feb 2012 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा
@अत्यंत अवांतर - चक्रधर स्वामींच्या खूनात हेमाडपंताचा सहभाग होता असे म्हटले जाते. ते खरे आहे काय?>>> भरली शंभरी अता या धाग्याची.. ;-)
23 Feb 2012 - 7:09 pm | मी-सौरभ
तुमचं भविष्य फेल गेलं म्हणायचं का??
20 Feb 2012 - 11:04 am | गवि
सुंदर आहे हे मंदिर. तू कॅमेर्यातही बारकावे छानच पकडले आहेस..
फक्त तिथे गेलो असता इतक्या दुर्मिळ ठेव्याच्या ( मंदिराच्या) भोवती पडलेला नालेगटारांचा वेढा खूप दु:खद वाटला..
20 Feb 2012 - 12:19 pm | RUPALI POYEKAR
सुंदर फोटो आणि माहितीपण
20 Feb 2012 - 6:31 pm | वपाडाव
लिस्टमध्ये नाव डकौल्या गेले आहे...
21 Feb 2012 - 6:30 pm | मी-सौरभ
जाताना मला ही कळव :)
21 Feb 2012 - 2:15 pm | सर्वसाक्षी
देखण्या मंदिराची माहिती व चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद. मंदिराविषयी बरेच ऐकुन आहे, फोटो टिपण्यासाठी एकदा गेलेच पाहिजे.
25 Feb 2012 - 7:43 am | श्रीयुत संतोष जोशी
छान महिती आणि फोटो पण मस्त.