मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवमंदिर (अंबरनाथ)

सूड · · भटकंती
बर्‍याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर. इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल. आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;) मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्‍याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे. अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला. खालच्या फोटोत दोन्ही नंदी. हा देवळाचा गाभारा. गाभार्‍यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्‍यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्‍यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो. नंदी परत एकदा आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात. देवळाच्या मागील भाग ही गणेशमूर्ती.... हा बहुधा नृत्य गणेश असावा. त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी... या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी. हे कोरीव खांब .. आदिमायेचं रौद्ररुप !! ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते. आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी. आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प संपूर्ण देऊळ.. फोटोसौजन्य: स्पा.

वाचन 18154 प्रतिक्रिया 24