हा आहे कडकड्या, बाजारात जाऊन कोळणीने वाटा लावलेला तिथेच मोबाईलमधुन फोटो काढल्याने क्लियर नाही आला.
तळण्यासाठी साहित्य:
कडकड्या च्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
मिठ
तेल
लसुण पाकळ्या (ऑप्शनल) ठेचुन
पाककृती:
तेल सोडून तळण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र तुकड्यांना कालवुन घ्या.
तवा गॅसवर चांगला गरम करा. तवा जर निट तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. मग तव्यात तेल सोडून हव्या असल्यास लसुण पाकळ्या टाकुन त्या बाजुला सारुन तुकड्या सोडा. हात सांभाळा तेल कधी कधी पटकन तुकडीतल्या पाण्यामुळे सरसर करत उडत. पाच मिनीटांनी तुकड्या उलटून दुसर्या बाजुने तळा. गॅस बंद करुन त्यातली एक तुकडी जेवण्याच्या आधीच मटकवा (तळे राखी तो पाणी चाखे ह्या म्हणीप्रमाणे) ही चव जेवणातल्या तुकडीपेक्षा भारी असते.
कालवणासाठी
तुकड्या४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
मिठ
चिंचेचा कोळ
वाटण (ऑप्शनल) : पाव वाटी ओल खोबर, आल, लसुण, कोथिंबिर, १-२ मिरच्या सर्व बारीक वाटून.
चेंज म्हणून थोडा कढीपत्ता, पुदीनाही घालु शकता त्यामुळे रोजच्यापेक्षा थोडी वेगळी चव येते रश्याला
कालवण :
भांड गॅसवर ठेउन त्यात तेलावर लसूणाची खमंग फोडणी द्या. आता त्या तेलावर हिंग, हळद, मसाला घालुण वाटण, चिंचेचा कोळ, तुकड्या घाला. मग मिठ घाला. ५-७ मिनीटे उकळू द्या. मग गॅस बंद करा.
अधिक टिपा:
कडकड्या च्या नावाप्रमाडे तो काही कडक किंवा कडाकड आवाज करणारा नसतो. साधारण रावस, घोळीच्या जातितलाच हा मासा. ह्याला खवले असतात. नेहमीप्रमाणेच डोके आणि शेपटाकडचा भाग कालवणासाठी वापरावा व मधला भाग तळण्यासाठी.
जर जास्त लोक असतील जेवण्यासाठी तर वाटण वापरल्याने रस्सा जास्त होतो.
प्रतिक्रिया
27 May 2011 - 4:25 am | गोगोल
वाटू लागलय की बहूतेक मासे शिजवायच टेम्प्लेट एकच असत, फक्त त्यात विविध प्रकारचे मासे टाकता येतात.
तरी पण मला ईतक्या प्रकारचे मासे असतात आणि ते खातात हे केवळ जागू तैंच्या लेखामुळेच कळतय.
28 May 2011 - 6:13 am | गोगोल
कोळ कुठल्या माशात घालावा आणि कुठल्या माशात घालू नये या बद्दल काही नियम आहे का?
27 May 2011 - 6:26 am | प्रियाली
हा कडकड्या तिलापियासारखा दिसतो आहे पण तिलापिया नसावा कारण तिलापिया गोड्या पाण्यातला मासा आणि भारतात मिळतो का ते माहित नाही किंबहुना कडकड्या नावाचा मासा असतो हेच मला माहित नव्हते. ;)
असो. तिलापिया खाऊन कंटाळा आला आहे. :(
27 May 2011 - 9:49 am | गवि
भारतात काही ठिकाणी तिलापियाची शेती चालू आहे.
उदा. सगुणाबाग, नेरळ.
इथे हे मासे पिकवले जातात. काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन तो तिलापिया खाऊन पाहिला. कोरडा, पोकळ, बिन मांसाचा खुळखुळ्यासारखा मासा होता. बेचवही वाटला. तो मुळात तसाच असतो की त्यांनी तसा बनवला होता ते कळायला मार्ग नाही. कारण परत ट्राय करण्याची इच्छा नाही.
27 May 2011 - 9:12 am | विसोबा खेचर
काय बोलू..?!