साहित्यः
मेदूवडा:
२ कप साल काढलेली उडीद डाळ
१/२ कप तांदूळ
१ टीस्पून भरड वाटलेली मिरपूड
१ हिरवी मिरची बारीक कापून किंवा १ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून आले खिसून
चिमूटभर सोडा
चवीनुसार मीठ
तळणासाठी तेल
सांबारः
१ कप तूर डाळ
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१/४ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून जिरे आणि मोहरी
१/४ टीस्पून हळद
१ मोठा कांदा चिरून
३ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून
३ हिरव्या मिरच्या तुकडे करून
२ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
२ टीस्पून कोणाताही सांबार मसाला
कढिपत्ता, कोथिंबीर
आवडणार्या भाज्या
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी तेल
कृती:
मेदूवडा:
उडदाची डाळ ५-६ तास आणि तांदूळ २ तास भिजवून निथळून घ्या. भिजवलेली डाळ आणि तांदूळ शक्य तितके कमी पाणी वापरून मिक्सरमधे वाटून घ्या. पाणी जास्त झाल्यास वडे बनवायला अवघड जाते. वाटणात मिरपूड, खिसलेले आले, मिरची (किंवा लाल तिखट), मीठ आणि सोडा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हात पाण्यात बुडवून अंड्याच्या आकाराचा वाटणाचा गोळा हातात घ्या आणि अंगठ्याने त्या गोळ्याला मध्यभागी भोक पाडून सावकाशपणे गरम तेलात सोडा. तांबूस-सोनेरी रंग आला की वडा टिश्युपेपरवर काढून घ्या. अश्याप्रकारे सगळे वडे तळून घ्या.
सांबारः
तूरीची डाळ पूर्णपणे शिजवून घोटून घ्या. भांड्यात फोडणीसाठी तेल घेऊन ते गरम झाले की त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, लसूण, मिरची, कांदा आणि कढिपत्ता अनुक्रमे घाला. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात सांबार मसाला आणि हळद घाला. सर्व नीट एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात कापलेले टोमॅटो (आणि आवडत असलेल्या भाज्या) घाला. हे सर्व शिजले की त्यात घोटलेली डाळ, चिंचेचा कोळ, गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण ५-१० मिनीट उकळून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झाला सांबार तयार!
आता वड्यावर सांबार घेऊन चव घ्या आणि सांगा बरं कसा जमलाय बेत ते!
(वडे बनवताना फोटो काढणे जरा अवघड होते. त्यामुळे एकच फायनल फोटो चिटकवलाय.)
प्रतिक्रिया
30 Apr 2011 - 2:15 am | Mrunalini
मस्तच गं......
तोंडाला पाणी सुटले... :)
1 May 2011 - 3:39 pm | रश्मि दाते
आज सकाळी केले होते,म्स्त कुरकुरीत झाले होते वडे,ध्न्य्वाद.
2 May 2011 - 1:49 pm | स्मिता.
तुम्ही लगेच वडे करून पाहिलेत आणि मस्त झालेत. छान वाटलं :)
------------------------------------------------------------------------------------
@मिसळपावः स्वगृहात आणि 'नवे लेखन' मध्ये प्रतिक्रियांची संख्या कायमच १ अशी का दिसतेय? त्यामुळे नवीन आलेले प्रतिसाद कळत नाहियेत.
2 May 2011 - 3:51 pm | रश्मि दाते
:),होना नाहीतरी संडे स्पेशल साठी काही असेच प्रकार लागतात ना,आणी तांदुळामुळे कुरकुरीत झाले होते त्यामुळे नेहमी वेगळे.धन्य्वाद
2 May 2011 - 3:59 pm | रश्मि दाते
:),होना नाहीतरी संडे स्पेशल साठी काही असेच प्रकार लागतात ना,आणी तांदुळामुळे कुरकुरीत झाले होते त्यामुळे नेहमी वेगळे.धन्य्वाद
30 Apr 2011 - 2:50 am | पिंगू
सही जमून आलाय मेदुवडा... आता आज नाश्त्याला हाच शोधतो...
- पिंगू
30 Apr 2011 - 3:45 am | रेवती
छान फोटू!
वड्यात डाळीबरोबर तांदूळही घालतात हे माहित नव्हते. नवीन माहिती.
30 Apr 2011 - 9:09 am | रामदास
कदाचीत एक कुरकुरीत क्रस्ट वड्यावर त्यामुळेच येत असावा. मध्यंतरी प्रभू सरांनी गावाहून आणलेला पेश्शल सांबार मसाला दिला होता.त्याची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटले आहे.
30 Apr 2011 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी !
सांबार आणि रस्सम मसाला :) एक नंबर आहेत दोन्ही. गुर्जी आणि काकुंचे विशेष धन्यवादस.
भारीच दिसत आहेत हो वडे. सांबाराचा वास पण मस्त येत आहे. वाढायला घ्या बरे लगेच.
30 Apr 2011 - 3:01 pm | स्मिता.
काकांनी बरोबरच सांगितलं. थोड्याश्या तांदूळामुळे वड्याचा क्रस्ट छान कुरकुरीत होतो.
30 Apr 2011 - 9:51 am | ५० फक्त
ओ का उगा उपासाच्या दिवशी असले धागे काढुन उपास मोडायला लावताय, मारुती रागावला ना तर तुमचं नाव सांगणार त्याला.
बाकी, स्टेप बाय स्टेप फोटो आले असते तर जास्त मजा आली असती, असो किमान फोटो तरी तुम्ही केलेल्या वड्यांचा टाकलाय.
30 Apr 2011 - 10:03 am | शिल्पा ब
छान पाकृ अन फोटो पण छान.
उद्या मी इडल्या करणार आहे तेंव्हा तुमची सांबारची रेसीपी करुन बघेन. मेदुवडे नंतर कधीतरी. मेदुवड्याच्या मिश्रणात तांदुळ घालतात हे नवीनच.
30 Apr 2011 - 10:08 am | मृत्युन्जय
त्यामुळे एकच फायनल फोटो चिटकवलाय
शब्दाचा पार मेंदु वडा करुन टाकला तुम्ही ;)
30 Apr 2011 - 2:28 pm | प्यारे१
ओ पुनेकर,
आमच्यात चिटकवत्यातच. फुडं ब्वोला.......!
आनि काकू, मेंदूवडा एक लंबर.
'भ्येजा' दिसला नाय सामा... साहित्यात कुटं?
का हेच्यात नाय घालत भ्येजा 'शंकरपाळी' मद्ये शंकर नसतोय तसा?
1 May 2011 - 3:23 am | स्मिता.
अहो प्यारे भाऊजी, तुम्ही तर मला डायरेक्ट काकू बनवलं!! कमीतकमी तुमच्या कन्येची काकू म्हणायचं होतं ;)
आणि तो मेंदूवडा नाहीये, मेदूवडा आहे. मेदू या शब्दाचा नेमका अर्थ मला माहिती नाही.
शंकरपाळ्याबद्दल म्हणाल तर तो 'शक्कर(साखर)पाला' या शब्दाचा अपभ्रंश असावा असं वाटतं.
30 Apr 2011 - 10:56 am | चिट्टी१०
खुपच मस्त
30 Apr 2011 - 1:09 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच !
30 Apr 2011 - 4:02 pm | सानिकास्वप्निल
छान पाकृ आणी छान फोटो :)
30 Apr 2011 - 4:16 pm | अमोल केळकर
सुरेख !!!
अमोल केळकर
30 Apr 2011 - 5:21 pm | धनुअमिता
सुरेख
30 Apr 2011 - 7:27 pm | रश्मि दाते
मस्त्च! उद्या सकाळी नाश्त्या ला हेच करणार बरंका :))
30 Apr 2011 - 10:18 pm | निवेदिता-ताई
मस्त..मस्त...:)..........तोंडाला पाणी सुटले सांबार पाहून
30 Apr 2011 - 11:45 pm | प्राजु
मस्तच !
मेदू वड्यात तांदूळ.. नविन आहे माझ्यासाठी. पण प्रयोग करेन नक्की.
1 May 2011 - 2:57 am | स्मिता.
प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आणि वाचकांचे आभार!
बर्याच जणांना मेदूवड्यात तांदूळ नवीन वाटलेय. तसे तांदूळ ऑप्शनल आहेत. आधी एका प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे वड्यांना वरून कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात थोडे तांदूळ घातले आहेत.
4 May 2011 - 10:24 am | स्पंदना
tareech mee karate teMvhaa bighaDataat te. aataa taamduLa ghaalun paahate.
zakka ho smitaa!! agadee foTo baghun tar pleTa oDhun ghyaayachaa moh zaalaa!
4 May 2011 - 10:25 am | स्पंदना
aggo baay!! mee iMgleesh zaale????????
4 May 2011 - 1:41 pm | स्मिता.
अपर्णा प्रतिक्रियेबद्दल आभार!
तुम्ही इंग्रजी झालात तरी आम्ही भावना समजून घेतल्यात हो! शेवटी शब्दांपेक्षा भावनांना जास्त महत्त्व... नाही का?
असंही सध्या मिपा सेमीइंग्रजी झालेलं आहे ;)