साहित्य :- दोन डझन लादीपाव, चार कप बारीक चिरलेला कांदा, दिड कप बारीक चिरलेला टोमॅटो
चार पाच बटाटे उकडून किसलेले, दहा-पंधरा वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुरे, एक कप वाफवलेले मटार,
पाव कप सिमला मिरचीचे छोटे तुकडे ,आठ-दहा लसूण पाकळ्या, एक टिस्पून लाल तिखट
चार टे.स्पून तेल, एक टिस्पून जिरे, चार टेस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ
सर्व्ह करताना बटर, लिंबाच्या फ़ोडी, चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेला कांदा
कृती :- चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात. लसूण सोलून त्यात लाल तिखट घालुन
मिक्सरवर बारीक करावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट
घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम आचेवर तो शिजू द्यावा. नंतर
त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी. चार पाच मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे.
टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा.
थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. स्मॅशरने चांगले
स्मॅश करावे. नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे.
वाढताना बटर घालावे. कांदा आणि कोथिंबीर पेरावी. लिंबु द्यावे....
तसेच पावाचे सुरीने दोन भाग करुन बटर लावुन खरपुस भाजुन घेउन भाजी बरोबर खावे....
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 6:36 pm | गणपा
मानेला फार त्रास होतो.
बहुतेक सर्व फोटो आडवेच का असतात तुमचे.
पराशी सहमत
1 Oct 2010 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार
भारी आयडीयाची युक्ती आहे.
बाकी तुझी पावभाजी अंमळ जास्तच पातळ वाटत नाहीये का? म्हणजे ते सारासारखे दिसतय :(
1 Oct 2010 - 6:29 pm | नावातकायआहे
ह्यामुळे असेल कदाचित
>>स्मॅशरने चांगले स्मॅश करावे.
1 Oct 2010 - 9:32 pm | अनामिक
स्मॅश की मॅश?
1 Oct 2010 - 10:45 pm | पक्या
मॅश हा शब्द योग्य आहे आणि त्यानुसार मॅशर. स्मॅशर आणि मॅशर च्या अर्थामध्ये खूप फरक आहे.
1 Oct 2010 - 6:51 pm | सूड
ह्म्म्म पातळ वाटतंय खरं !! पण जबरदस्त झणझणीत असेलसं रंगावरुन दिसतंय. रंग बघून मला कटाची आमटी आठवली.
1 Oct 2010 - 6:30 pm | कौशी
मी यात बटाटा आणि गाजर पण वापरते..
1 Oct 2010 - 8:38 pm | वसुधा विनायक जोशी
छान !
1 Oct 2010 - 9:53 pm | वसुधा विनायक जोशी
पावभाजित जी लसून तिखट पेस्ट वापरली आहे त्या पेस्ट मध्ये आम्ही ओल्या नारळाचा कीस देखील घालतो .
1 Oct 2010 - 10:17 pm | प्राजु
ओला नारळ.. पावभाजीत???
लसूण, आलं.. आवडतं. पण नारळ ??
असेल.. कदाचित!
2 Oct 2010 - 1:17 am | अनामिक
अर्रर्रर्र!
असेच म्हणतो.
1 Oct 2010 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पावभाजी कधीही आवडते. पण पावभाजीतही मोजून मापून भाज्या घालायच्या? नाही पटलं!
मी पावभाजीत लसणीबरोबर आलंही घालते. आणि भाज्यांमधे कौशीजींप्रमाणे बटाटे, गाजर घालतेच, एकदा फ्लॉवर न मिळाल्यामुळे ब्रोकली घालून मस्त हिरव्या रंगाची पावभाजी खाल्ली होती.
अवांतर: तीन वर्ष मित्रांना पावभाजी खायला घालून त्या बदल्यात स्टेशनपर्यंत लिफ्ट, जड सामान उचलून घेणे वगैरे वस्तूविनीमय पद्धती वापरली होती.
2 Oct 2010 - 3:14 am | रेवती
पूर्वी आईकडे पावभाजी हा प्रकार मुलांना आवडतो म्हणून तर केला जायचाच पण मुख्य कारण म्हणजे, एवढस्साच फ्लॉवर राहिलाय, अर्धी ढब्बू मिरची, बोटभर गाजराचा तुकडा.........अश्या गोष्टी संपवण्यासाठी योग्य प्रकार असायचा. माझ्या महितीप्रमाणे आईने एकदा अर्धे वांगे आणि हा एवढासा दोडका खपवला होता. मॅशरशी चुकारपणा करून राहिलेला तो मलाच सापडला आणि अजूनही मला दरवेळी त्यातल्या भाज्यांच्या व्हराटीबद्दल संशय येत असतो.
माझ्या वहिनीने एकदा पालक खपवला होता.;)
1 Oct 2010 - 9:59 pm | निवेदिता-ताई
आदिती.............अवांतर आवडले....
1 Oct 2010 - 10:14 pm | पैसा
फोडणीत जिरे हा नवीन प्रकार आहे. पुढच्या वेळेला करून बघते.
1 Oct 2010 - 10:30 pm | दीपा माने
यजमानही खुश आणि पाहुणे तर आणखीनच खुश.
1 Oct 2010 - 10:43 pm | पक्या
पावभाजीत जिरे कधीच टाकत नाहीत.
तुम्ही म्हणाल टाकून तर बघा काय टेस्ट येते . पण मग त्या भाजीला पावभाजी म्हणता येणार नाही.
जिरे वापरायचेच असतील तर थोडी जिरे पावडर घाला पण आख्खे जिरे दाताखाली येतील आणि तसेही पावभाजीत आख्खे जिरे नसतात.
आणि फोटोतील भाजी चविला छान झालेली असली तरी ती पावभाजीच्या भाजी सारखी अजिबात दिसत नाहिये.
वर एकाने म्हटल्याप्रमाणे सारासारखे दिसत आहे.
2 Oct 2010 - 3:19 am | रेवती
निवेदिता ताई, चावताना भाज्या थोड्या दाताखाली आल्या तरी मला आवडतात. पण कोणी आयती करून घालणार असेल तर पावभाजी कशीही आवडते. माझी एक मैत्रिण पावभाजीत मोडावलेली कडधान्ये वगैरेही घालते आणि मला पावभाजी आवडते म्हणून हौसेने डबाभर आणून देते. अन्नाला नावं ठेवायची नाहीत म्हणून आम्ही ती संपवतो.;)
2 Oct 2010 - 7:19 am | निवेदिता-ताई
सुप्रभात......धन्यवाद......
मा़झ्या मुलीला कांदा आवडत नाही...त्यामुळे त्याची पेस्ट वापरली आहे.....
आणी तुम्ही सगळे म्हणताय ते खरे आहे............भाज्या माझ्याकडून जास्त शिजल्या व स्मॅश
झाल्या...........आता पुढ्च्यावेळी लक्षात ठेवीन.
2 Oct 2010 - 11:09 am | बरखा
पाव भाजी करताना बिट घातल्यास छान र॑ग येतो. बाहेरच्या पाव भाजी सारखा.
2 Oct 2010 - 3:08 pm | गुंडोपंत
पावभाजीची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद!
ही रस्सा भाजी मला कटाच्या आमटी सारखी भासते आहे.
2 Oct 2010 - 3:28 pm | विसोबा खेचर
व्वा..!
--
'चार दिवस सासूचे' ही बेक्कार मालिका कधी संपेल?