मढे-घाटाची अनवट वाट, रॅपलिंगचा थरार आणि गुंजवणीकाठची अंतरोली

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
20 Sep 2023 - 3:55 pm

मढे-घाटाची अनवट वाट

A

पुर्वीचा अतिदुर्गम अशी बिरुदावली मिरवणारा व त्यामुळेच निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय समृद्ध असणारा, "प्रचंडगड" तोरणाच्या छत्रछायेखाली स्वतःचं अनवट वेगळेपण राखून असलेला तालुका म्हणजे "वेल्हा". गेल्या काही वर्षात डोंगराळ भागात झालेल्या रस्ते-विकास कामांमुळें तसेच गुंजवणी धरण प्रकल्प पुर्णत्वास गेल्याने गुंतवणुकदार तथा पर्यटनाच्या नकाशावर हा भाग ठळकपणे पुढे येतोय. यामध्ये, वेल्ह्यापासून साधारण १५-१६ किलोमीटर अंतरावर वसलेला इतिहास प्रसिद्ध मढे-घाट हा दुर्गम-डोंगराळ आदिवासी पट्ट्यात वसलेला भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.

B

कोंढाण्याचा "सिंहगड" करणाऱ्या संग्रामानंतर, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचं पार्थिव याचं घाटाच्या बिकट पण जवळच्या वाटेने अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या मुळ गावी उमरठयाला नेण्यात आलं व हिचं घटना या वाटेला तिचं हे प्रथमदर्शनी ऐकताना थोडं विचित्र वाटणारं पण तरीही "वैशिष्ट्यपुर्ण" असं नाव पडण्याला कारणीभुत ठरली असा इतिहास सांगितला जातो.

पुण्यातून, पुणे-सातारा महामार्गावरून खेड-शिवापूर- चेलाडी फाटा- नसरापूरमार्गे थेट वेल्हा आणि दुसरा खडकवासला - डोणजे फाटा - पानशेत रोडमार्गे वा त्याला समांतर असा कुडजेमार्गे जाणारा पाबे घाटातील रस्ता असे रस्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कुठल्याही मार्गाने वेल्ह्यात येऊन, गुंजवणी धरणाच्या कडेने, धरणाचा जलाशय उजव्या हाताला तर तोरणा किल्ल्याची डोंगररांग डाव्या हाताला ठेवत जाणारा वळण-वळणाचा रस्ता साधारण चार किलोमीटरनंतर जलाशय सोडून वाळणंजाई खिंडीतून मढे घाटाकडे मार्गस्थ होतो.

हा पुर्ण रस्ता पावसाळ्यात अतिशय फुललेला असतो. एका बाजूला तोरणा रांग आपली अखंड साथ करत असते.

C

तीव्र चढ-उतारांचा, हिरव्या वनराईतुन जाणारा, अर्थात, अध्ये-मध्ये खराब आणि अरुंदही असणारा हा रस्ता तुरळक रहदारीमुळे प्रवासाचा आनंद मात्र पुरेपूर देतो. शिवाय वाटेतले डोंगर, झाडं, धबधबे सतत आपल्याला अलर्ट ठेवतात, खुणावत राहतात. काही छोटे-छोटे प्रवाह थेट रस्त्याच्या कडेला आहेत, तर काही आडबाजूला, शेतातल्या निसवायला आलेल्या भाताचा सुवास रंध्रात आणि शुद्ध हवा गात्रात भरून घेत मजल-दरमजल करीत आपण केळद गावापर्यंत येऊन पोहोचतो.

D

मढे-घाटाच्या मुख्य व अलीकडील काळात "लक्ष्मी" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी केळद या गावापासून उजवीकडे आत जाण्यासाठी रस्ता आहे. ज्या पठारावरून धबधबा खोल दरीत कोसळतो त्याच्या ४०० मीटर अलीकडे पार्किंगसाठी जागा आहे. पार्किंगपासून अवघ्या दहा-पंधरा मिनिटांची सोपी वाट चालत आपण धबधब्यापाशी पोहोचतो. जवळच्या डोंगर आणि पठारावरूनच वाहणारे सगळे ओहोळ एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होतो आणि तोच धबधब्याच्या रूपाने खाली कोसळतो. आपण धबधब्याच्या अगदी वरच्या बाजूला पोहोचतो. डोंगराच्या कड्यावरून खाली दिसणारी खोल, हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेली दरी, समृद्ध जंगल, इतर अनेकानेक छोटेमोठे धबधबे, हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखं असतं.

E

कड्याच्या दुसऱ्या बाजूने गेल्यावर समोर खोल दरीत कोसळणारा पुर्ण धबधबा दिसतो. उंचावर असल्यामुळे पावसाळ्यात या भागात दाट धुकं असतं, त्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते. धुकं विरळ झाल्यावर तीन बाजूंचा डोंगर, त्यातून कोसळणारा धबधबा असं टिपिकल सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. धबधब्याच्या खालच्या बाजूला दरीत उतरून जाण्यासाठीही इथून एक छोटी पायवाट आहे. तिथून खाली धबधब्यातून कोसळून तयार होणाऱ्या प्रवाहापाशी पोहोचता येतं. वाट थोडी अवघड असली तरी जायलाच हवं अशी आहे. पठार तसं विस्तीर्ण असल्याने आसपासचा निसर्ग न्याहाळत इथे वेळ मजेत जातो.

रॅपलिंगचा थरार

ह्यावेळच्या मढे-घाट भेटीत एक वेगळं आकर्षण ही अंतर्भुत होतं ते म्हणजे मढे-घाट धबधब्याचा प्रवाह खाली कोसळणाऱ्या कड्यापासून साधारण दीडशे फुट सरळसोट दरीत दोरीच्या साहाय्याने खाली उतरणे ज्याला रॅपलिंग असे म्हणतात आणि पुन्हा समोरच्या कड्यावर पोहोचून तिथून पुन्हा मढे-घाटाच्या कड्यापर्यंत झिप-लाइनच्या साहाय्याने अदमासे अडीचशे फुटांची दरी ओलांडणे ज्याला व्हॅली क्रॉसिंग असा शब्द आहे.

F

ह्या साहसी खेळाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही साधारण अकरा वाजता तिथे पोहोचलो होतो. अनुभवी व व्यावसायिक मार्गदर्शनाखाली आम्ही हे साहस अगदी सुरक्षित पद्ध्तीने करणार होतो. पोहोचल्यावर अगदी पंधरा मिनिटात सुरक्षेची सर्व उपकरणे घालून व त्यांचा वापर-उपयोग समजावून घेऊन, गरजेच्या सर्व सुचना लक्ष देऊन ऐकुन आम्ही कड्याच्या टोकाला जाऊन बसलो.

एक-एक करून रॅपलर्स इथून खाली सोडण्याच काम चालू होत. आधीचा रॅपलर पुर्ण खाली पोहोचल्यावरचं दुसरा सुरवात करीत होता. दुसऱ्याला कड्याच्या तोंडावर प्रचंड घाबरलेल्या चेहऱ्याने उभा राहिलेला पाहून त्याला हसणाऱ्यांची, चिडवणाऱ्यांची स्वतःची वेळ आल्यावर तीच अवस्था होत होती. पाणी खाली पडते तिथून उतरण्याच्या जागेवर पोचल्यावर पोटात गोळाच येत होता. धबधब्याचा प्रचंड आवाज, पाण्याचे अंगावर उडणारे थेंब, खाली दिसणारी अक्राळ-विक्राळ दरी व सुरवातीचा प्रचंड अवघड टप्पा उतरताना अगदी बंदचं होणारी अक्कल आणि त्यामुळे उडणारी त्रेधा सगळंच अविस्मरणीय......

G

थोडंस खाली उतरल्यावर मात्र भीड चेपते व मग हळू हळू मेंदू रीबूट होऊन काम करू लागतो. धबधब्याच्या आवाजाने वरून वा खालून कुणी कितीही ओरडले, चिडवले तरी काहीही ऐकू येत नाही, पाय कमरेला जवळपास ऐंशीच्या कोनात ठेवत रोप सरकवत हळू हळू आपण पाण्याच्या जोरदार प्रवाहाजवळून उतरत जातो, मध्यावर गेल्यावर तर थांबून आजूबाजूच्या रौद्र निसर्गाचं अवलोकन करण्याएव्हढा धीरही गोळा होतो. शेवटचे पन्नास एक फूट दोन्ही हात सोडून फ्री फॉल करत धबधब्याच्या तळाशी पोहोचतो.

H

खाली पोहोचल्यावर एकदा वर पाहिल्यावर दिसणारा अजस्त्र कडा पाहून पहिले दोन मिनिटं आपण खरंच हे साहस केलंय की स्वप्नात आहोत हे ठरवायला लागतात. शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरतेची परीक्षा पाहणारा हा खेळ आहे...असो..."डर के आगे जीत है" असं तद्दन जाहिरातीतील वाक्य फेकून मारता येईल अशी मनाची अवस्था असते...अवघ्या दहा-पंधरा मिनिटांचा हा थरार तुम्हाला एक वेगळीचं व्यक्ती बनवून पुन्हा दरीतून वर कड्यावर पाठवतो.

पुढचा झिप लाईनद्वारे दरी ओलांडण्याच्या खेळ मग अगदीच सोपा होऊन जातो, विशेष काही न करता तो आरामात पुर्ण करता येतो व मग तुम्ही गिअर्स चे ओझे उतरवून थोडं आजूबाजूच्या निसर्ग आणि "हिरवळीकडे" लक्ष देण्यास मोकळे होता.. ☺️☺️☺️

I

रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवल्यावर मढे-घाट परिसरात मनसोक्त भटकंती झाली. पर्यटकांची फारशी गर्दी नसल्यामुळे निवांत वातावरण अनुभवता आले. ढगांचा वाऱ्याबरोबर पाठशिवणीचा खेळ अविरत सुरूच होता, त्यामधून, सृष्टीची नानाविध रूपे तितक्याच प्रकारच्या विभ्रमांसहीत समोर येत होती. मनात साठवली जात होती.

J

दुपारनंतर, मढे घाटाचा निरोप घेत दाट धुक्याच्या चादरीमधून चालत पार्कींगमधून गाडी काढून आजच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघालो. मुक्कामासाठी वेल्ह्यातुन कोंढावळे फाट्याने आत जाऊन, गुंजवणी धरणाच्या बॅकवॉटर ला वसलेलं अंतरोली गाव गाठायचं होतं. तिथं धरणाकाठच्या सुंदर अशा घरात आजचा मुक्काम होता.

गुंजवणीकाठची अंतरोली

गुंजवणी धरणाला पुर्ण वळसा घालीत, छोटया-छोट्या गावांमधून, वळणा-वळणांचा रस्ता पार करीत अंतरोलीत पोहोचायला ५ वाजुन गेले होते. झटपट कपडे बदलून यजमानांच्या जवळचं असलेल्या दुसऱ्या घरी जेवणासाठी गेलो. दुपारच्या जेवणाला संध्याकाळी पोहोचलो असलो तरी, गरमागरम तांदळाच्या भाकरी, हिरव्या मसाल्यातली भरली वांगी, दोडक्याचा ठेचा, पापड असं भरपेट जेवण झालं.

आता पुन्हा रात्री जेवणासाठी पोटात जागा करणे शक्य नसल्याने, तशी कल्पना यजमानांना देऊन पुन्हा रमत-गमत भाताच्या खाचरांमधील वाटेने चालत-चालत मुक्कामाच्या घरी आलो. गुंजवणीचा जलाशय हाकेच्या अंतरावर, घराच्या चारही बाजूने निसवायला आलेल्या सुवासिक भाताची हिरवीगार खाचरं, मोरांचा अविरत ऐकू येणाऱ्या सुंदर केकारवाशिवाय इतर कुठलाही आवाज नाही असं शांत -प्रसन्न वातावरण.....

K

बाहेरच्या ओट्यावर बसुन या नितांतसुंदर संध्याकाळचा आनंद घेत वेळ झरझर निघून गेला व अंधार पडला. अंधार पडला तशी थंडी जाणवु लागली, तेवढ्यात चहा आला व मग घरात जाऊन बसलो. मंद संगीताच्या पार्श्वभुमीवर चहा व नंतर रात्री उशिरापर्यंत गप्पांचा फड रंगला. या गप्पांना ना कुठल्या विषयाचं बंधन होत ना भाषेची साधनसुचिता पाळण्याचा संकेत.... तद्दन भंकसच म्हणा हवं तर....☺️☺️☺️

असो....रात्री उशिरा झोपायला गेलो असलो तरी सकाळी मात्र सहा-सव्वा सहाच्या सुमारास आपोआप जाग आली. घराच्या उजव्या हाताला उताराची एक पाऊलवाट, धरणाच्या जलशयाकडे जात होती. त्यावाटेने, भाताच्या खाचरांच्या कडे-कडेने, हिरव्या गालीच्यावरून चालत जलशयाच्या अगदी काठावर पोहोचता येत होतं.

L

नितळ पाण्याने भरलेला अतिशय शांत, निश्चल असा जलाशय, ऊन नसल्यामुळे ढगांच्या काळ्या-पांढऱ्या हलत्या सावल्या पाण्यात पडून तयार होणारी वेगळीच हिरवट-निळी रंगसंगती, वठलेल्या जुनाट वृक्षांची पाण्याबाहेर डोकावणारी खोडे व त्यापैकी एखाद्या खोडावर ध्यानाला बसल्यासारखा स्तब्ध बसलेला पाण कावळा, मध्येच पाण्यात सुर मारणारा खंड्या, जलाशयावरून उडत जाणारे इतरही अनेक निरनिराळे पक्षी, कडेने सगळीकडे खेकड्यांच्या बिळांची वसाहत व त्यांच्यादरम्यान इकडे-तिकडे पळणारा एखादा चुकार खेकडा, काठाच्या चढावर पसरलेली पिवळ्या-जांभळ्या रानफुलांची रांगोळी, समोरील धुक्यात बुडालेला "प्रचंडगड" तोरणा, चहूबाजूंच्या डोंगररांगांवरून तरंगत जाणारे ढगांचे लोट आणि पार्श्वभुमीवर अक्षरक्ष: चारही बाजूने अविरत सुरू असलेला मोरांचा केकाराव......

M

निव्वळ स्वर्गीय सकाळ..... ही दृश्य पाहायला, अनुभवायला मिळण्यासाठी व त्याही पुढे त्याचं आयुष्यातील मोल समजण्यासाठी हे सर्व नशीबात असावं लागतं हेचं खरं !!!

N

जलाशयाच्या काठाने केलेली मनसोक्त भटकंती आटोपून पुन्हा घरी आलो. आजूबाजूच्या शेतामधून एव्हाना कामांची लगबग सुरू झाली होती. बहुतांश शेतांमध्ये भातातील गवत खुरपणी सुरू होती. त्याकडे एक नजर टाकीत आत गेलो व आंघोळी उरकून गरमा-गरम चहा-पोह्यांवर ताव मारून बाहेर पडलो.

O

गाडी काढली व अंतरोलीपासून घिसर गावच्या रस्त्यावरील गाडीतुन केलेली भटकंती सुरू झाली. घिसर हे गुंजवणी-कानदखोऱ्यातील धरणाच्या टोकावरील शेवटचे दुर्गम असं गाव. एका बाजूला सतत दिसणारा गुंजवणीचा जलाशय आणि दुसऱ्या बाजूला असणारी उंच टेकडी यामधून जाणारा चढ-उतार, वळणे, पाण्याचे प्रवाह व छोट्या-छोट्या खिंडी ओलांडत जाणारा साधारण १५-२० किलोमीटरचा हा सुंदर ट्रेल.

P

दरम्यान, मध्ये बोपालघर ( की, गोपालघर (?)) गावाच्या काळकाई देवस्थानापाशी थांबलो, इथे रस्त्याकडेला एक नव्याने बांधलेले शिवमंदिर आहे व आतल्या बाजूला गर्द झाडीत लपलेलं काळकाई देवीचं पुरातन मंदीर आहे. मुळ बोपालघर गाव गुंजवणी धरणात गेलं असलं तरी काळकाई देवीचं स्थान व बाजूला राखलेली गर्द देवराई अजून टिकून आहे. अतिशय दाट अशा या पुरातन देवराईत बाहेरील तापमानापेक्षा तब्बल पाच डिग्रीने कमी असलेल्या वातावरणात काळकाई देवी वास करून आहे. येथील देवराईतील झाडे अतिशय जुनी व कटाक्षाने राखून ठेवल्यासारखी वाटत होती, अतिशय शांत आणि कमालीची सुंदर अशी ही जागा ग्रामस्थांनी कसोशीने जपून ठेवली आहे.

Q

इथे थोडा वेळ घालवून पुन्हा घिसरच्या वाटेला लागलो. थोडावेळ पुढे जाऊन धरणाचा फुगवटा संपल्यावर गाडी परतीच्या मार्गावर वळवली, अंतरोली येता-येता पावसाला सुरवात झाली होती.

R

घरात जाऊन बॅगा भरल्या व गाडीत नेऊन टाकल्या, यजमानांचा निरोप घेऊन पडत्या पावसातचं गाडी काढली व परतीचा मार्ग धरला. वेल्ह्यात पोहोचलो तेव्हा तिथे पावसाचा मागमुसही नव्हता पण तोरणा अजूनही ढगांच्या गर्दीत हरवून गेलेला होता. पुढील रस्ताही कोरडाच गेला. उजव्या हाताला धुक्यात हरवलेला राजगड पाहत, नसरापूर-चेलाडी फाट्यावरून कपूरहोळ मार्गे पुन्हा एकदा धुक्यात बुडालेला पुरंदर उजव्या हाताला ठेवत, सासवड-दिवेघाट मार्गे मध्ये जेवणासाठी एक थांबा घेत संध्याकाळी अंधार पडता घर गाठले.

S

मढे-घाट, कानद खोरे व अंतरोली-घिसरच्या अनवट वाटा तुडवताना, रॅपलिंगचा, व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवताना, आणि गुंजवणी काठची नितांतसुंदर स्वर्गीय सकाळ जगताना गुंतवलेले हे दोन दिवस पुढच्या कित्येक दिवसांच्या धकाधकीच्या जगण्यासाठी लागणारी ऊर्जा देऊन गेले.....

असो.... लवकरचं भेटू... पुन्हा एखाद्या अनवट वाटेच्या शोधातील मनस्वी प्रवासात... ☺️☺️☺️

T

प्रतिक्रिया

सदर धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2023 - 4:22 pm | कर्नलतपस्वी

अप्रतिम वर्णन. वाचण्यात एवढा आनंद तर बघण्यात किती.......

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2023 - 4:22 pm | कर्नलतपस्वी

अप्रतिम वर्णन. वाचण्यात एवढा आनंद तर बघण्यात किती.......

कंजूस's picture

20 Sep 2023 - 5:09 pm | कंजूस

आवडली जागा,फोटो, वर्णन.

MipaPremiYogesh's picture

21 Sep 2023 - 11:28 am | MipaPremiYogesh

वाह फारच अप्रतिम , खूप सुंदर फोटो आणि ओघवते वर्णन ..असे वाटत होते कि आम्ही तुमच्या बरोबरच आहोत कि काय..

चक्कर_बंडा's picture

25 Sep 2023 - 11:13 am | चक्कर_बंडा

सर्वांचे आभार !

पाषाणभेद's picture

25 Sep 2023 - 11:26 am | पाषाणभेद

छान वर्णन व फोटो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2023 - 5:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

छानच झाला की ट्रेक. वर्णन आणि फोटोही मस्त.

मढेघाट रॅपलिंग्च्या जाहीराती येत असतात एक्स्प्लोरर्स कडुन, एकदा जायला हवे अशी परत मनाशी उजळणी केली लेख वाचताना. स्वत:चे वाहन असेल तर एक दिवसात करता येईल का पुणे ते पुणे?

MipaPremiYogesh's picture

25 Sep 2023 - 7:32 pm | MipaPremiYogesh

करता येईल कि

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2023 - 6:52 am | राजेंद्र मेहेंदळे

अनंत चतुर्दशी नंतर प्लॅन करुया

चक्कर_बंडा's picture

27 Sep 2023 - 11:18 am | चक्कर_बंडा

नक्कीच, दोन्ही बाजूंचे प्रवास अंतर दीडशे किलोमीटरच्या आत आहे त्यामुळे एका दिवसात सहज शक्य आहे... अर्थात स्वतःच्या वाहनाने...

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 9:23 pm | मुक्त विहारि

मस्तच

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2023 - 5:25 pm | चौथा कोनाडा

थरारक वर्णन आणि अप्रतिम प्रचि !
सुंदर निसर्ग पाहून डोळे तृप्त झाले !

फुलांचे,वेलींचे, झाडांचे प्रचि तर क्लासिकच !

काळकाई देवीचं पुरातन मंदीर ... खूप छान !

चक्कर_बंडा's picture

10 Oct 2023 - 12:00 pm | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासुन आभार !

नचिकेत जवखेडकर's picture

12 Oct 2023 - 11:31 am | नचिकेत जवखेडकर

भटकंती, वर्णन आणि छायाचित्रे, तिन्ही मस्तंच!

विजुभाऊ's picture

13 Oct 2023 - 10:55 am | विजुभाऊ

अह्हाहाहा... वाचताना मी ही हा प्रवास करून आलो

तुषार काळभोर's picture

13 Oct 2023 - 2:36 pm | तुषार काळभोर

प्रचंड सुंदर जागा, आणि तितकेच सुंदर फोटो...

गोरगावलेकर's picture

23 Oct 2023 - 4:09 pm | गोरगावलेकर

प्रतिम फोटो आणि तितकेच सुंदर वर्णन

गोरगावलेकर's picture

23 Oct 2023 - 4:19 pm | गोरगावलेकर

प्रतिम नाही अप्रतिम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2023 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक भटकंती आणि फोटोग्राफी.

-दिलीप बिरुटे