लिंगाण्याच्या सुळक्यावरील चढाई

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
4 Sep 2020 - 12:54 pm

लिंगाण्याच्या माचीवर दुर्गबांधणीच अवशेष असले तरी हल्ली फार कोणी ते बघायला जात नाही. सध्या सर्वच दुर्गभटक्यांचे आकर्षण आहे तो ईथला भला थोरला सुळका. लिंगाणा सुळका सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते व कधीतरी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची तो मनी इच्छा बाळगुन असतो. गिर्यारोहण हा दुर्ग भटक्याचा मुळ पोत नसला तरी रायगडच्या माथ्यावरून काळ नदीच्या खोऱ्यांतील लिंगाणा किल्ल्याचा सुळका त्याला सतत साद घालत रहातो व लिंगाणा किल्ला पहाण्यासाठी गिर्यारोहणाची जोखीम त्याला पार पाडावीच लागते. लिंगाणा किल्ला पहाताना त्याबरोबर लिंगाणा सुळका देखील सर होऊन जातो. चढाईसाठी असणारे मुलभुत नियम वापरले तर शरीराने व मनाने तंदुरुस्त असणारी कोणतीही व्यक्ती लिंगाण्यावर चढाई करू शकतो.

        अर्थात कठीण चढाईच्या ह्या सुळक्यावर जायचे तर खुप तयारी लागते. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत: घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. सहाजिकच प्रस्तरारोहणाच्या साधनाशिवाय या सुळक्याला हात लावता येत नाही. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आगळाच आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.

     या सुळक्याच्या चढाईची एक हकीकत सांगितली जाते. या किल्ल्यावर सर्वात पहीली चढाई करणारा म्हणजे संतोष गुजर. ते दोन मित्र होते. दोघांचं असं ठरलं होतं की एकाने रायगडवर जायचं आणि एकाने लिंगाण्यावर... आणि रात्री मशाल पेटवुन एकमेकांना मोहीम फत्ते झाल्याची ईशारत दयायची आणि नविन वर्षाचं स्वागत करायचं (30/12/1979). संतोष गुजर लिंगाण्यावर एकाकी चढाई करणार होता. ठरल्याप्रमाणे दोघांनीही आपापली चढाई चालु केली. त्या रात्री रायगडवाल्याने मशालीची ईशारत दिली पण लिंगाण्यावरची मशाल काही दिसली नाही. पुर्ण रात्र वाट पाहुनही मशालीची ज्योत न दिसल्यामुळे दुस-या दिवशी त्याचा मित्र धावतच पाणे गावात आला. कुशल गावक-यांना बरोबर घेऊन त्याने संतोषचा शोध सुरु केला. लिंगाणा माचीवर चौकशी केली पण ते म्हणाले,"किल्ल्याकडे एक माणुस गेलेला आम्ही पाहीला पण ईथुन परत कुणी गेलं नाही". शेवटी एकाला त्याच्या गॉगलचे तुकडे सापडले आणि त्याच दिशेने दरीमधे शोधले असता संतोष गुजरला देवाज्ञा झाल्याचं सिद्ध झालं. संतोष गुजर हा एक धाडसी आणि निष्णात गिर्यारोहक होता, पण त्याचा दुर्दैवी शेवट लिंगाण्यावर झाला.३० डिसेंबर १९७९ रोजी या प्रस्तरारोहकाचा लिंगाणा एकट्याने चढाई करुन परततांना खाली पडून मृत्यू झाला. खिडक्या असलेल्या गुहेजवळ यांच्या नांवाची स्मृतीशिळा लावलेली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लिंगाणा चढाईच्या मोहिमा काही काळ थंडावल्या होत्या.

     सह्याद्रीतील लिंगाण्याचा सुळका हे अनेक वर्ष मानवी पावलं न पोहचलेले आव्हान होते. परंतू २५ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईच्या हॉलिडे हायकर्सच्या १४ जणांनी लिंगाण्याच्या माथ्यावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. श्री. तु वि जाधव, हिरा पंडीत, अनिल पटवर्धन, संतोष गुजर, अजित गोखले, विवेक गोर्हेय, एस के मूर्ती, विलास जोशी, नंदू भावे, शाम जांबोटकर, श्रीकांत फणसळकर, विनय दवे, संदीप तळपदे व किरण समर्थ हे ते साहसवीर!

१९८० च्या सुमारास खिंडीतून गुहेपर्यंतच्या मार्गाची प्रथम चढाई यशवंत साधलेंच्या चमूने (BOBP, पुणे) केली व नविन मार्ग गिर्यारोहकांना खुला झाला.

१९८१ मध्ये पुणे व्हेंचरर्स संस्थेने लिंगाणा सर केला व आरोहकांची पावले पुन्हा लिंगाण्याकडे वळू लागली.

१० एप्रिल १९८३ रोजी मुंबईच्या गिरीविराज हायकर्सच्या श्री. किरण अडफडकर, सुनील लोकरे व संजय लोकरे यांनी कृत्रिम साधनांशिवाय केवळ ७० मिनिटात लिंगाणा माथा गाठण्याचा पराक्रम केला.

२००६ मध्ये अरुण सावंत व अनेक मान्यवर गिर्यारोकांनी एकत्र येत लिंगाणा ते रायलिंग पठार अशी व्हॅली क्रॉसिंग मोहिम यशस्वी केली.

२०१३ मध्ये दिलिप झुंजारराव व त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पल्लवी वर्तक हिने लिंगाणा सोलो कृत्रिम साधनांशिवाय सर केला.

    लिंगाण्याप्रमाणेच या सुळक्यावर प्रस्तरारोहण करायचे असेल तर सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

 १) देशावरुन म्हणजे पुणे जिल्ह्यातून जायचे तर नसरापुर-वेल्हा-हरपुड-मोहरी असा मार्ग आहे.

तोरणा ते रायगड ह्या भ्रमंतीत हा भाग अगदी जवळून बघता येतो. हा मार्ग हरपुड, वरोती , मोहरी ह्या छोट्या छोट्या गावातून जातो. मोहरी हे त्यातले ऐन घाट माथ्यावर वसलेले छोटेसे गाव आहे. गाव म्हणण्या पेक्षा वस्तीच. ह्या गावातून थोडसे पुढे गेल्यावर रायलिंगचे पठार लागते. ह्या पठारावरून अगदी समोरच उभा दिसतो तो लिंगाण्याचा दुर्लघ्य सुळका आणि त्याच्या मागे आहे दुर्गदुर्गेश्वर रायगड ! इथूनच बोराट्याच्या नाळेतून उतरून खाली कोकणात रायगडाकडे जाता येते. बोराट्याच्या नाळेच्या जराशी बाजूला आहे सिंगापूरची नाळ. ही वाट मोहरी जवळील सिंगापूर गावातून खाली कोकणात दापोली गावात उतरते. असे हे ठिकाण ट्रेकर्स मंडळीं मध्ये प्रसिद्ध नसते तरच नवल!

मोहरीच्या वाटेवरून लिंगाण्याचे प्रथम दर्शन 
ह्या पठाराला रायलिंग हे नाव देखील रायगड-लिंगाणा ह्यावरूनच पडले असावे. ह्या भेटीतच लिंगाणा सर करण्याच्या इच्छेने मनात परत उसळी घेतली.

मोहरी नावाच्या सह्याद्री माथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ जवळच आहे. नाळ म्हणजे दोन डोंगरांमधील अरुंद वाट. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. मोहरीपासून बोराटा नाळ गाठायला अर्धा तास व ती उतरून पुढे खिंडीत पोहोचायला साधारण पाऊण तास लागतो. बोराट्याची नाळ हि अरुंद आणि तीव्र उताराची आहे. खडक ठिसूळ असल्याने प्रत्येक पाऊल जपूनच टाकावे लागते. कुठला दगड निसटून सुटेल हे सांगता येत नाही. अर्धी नाळ म्हणजे साधारण २००-२५० मीटर उतरल्यावर उजवीकडे रायलिंग कड्याला लगटून जाणार्‍या वाटेने खिंडीत जाता येतं. त्या वळणाआधीच तो बोल्डर जपून उतरावा लागतो. सराईतांना दोराची गरज नाही.मात्र दृष्टीभय आहे. त्यामुळे शक्यतो सुरक्षा उपकरणांचा वापर करायला लाजायचे नाही. खिंडीत उतरलो की उजवीकडे उतरणारी वाट लिंगाणामाचीकडे व पुढे पाने गांवात जाते. आता समोर उभी असते तो अजस्त्र लिंगाणा चढाईसाठी असलेली एकमेव पूर्व दिशेकडील धार.
    २) दुसरा मार्ग अर्थात कोकणातून. महाड्मार्गे पाने गावाला पोहचल्यानंतर तिथून लिंगाणामाची आणि धार चढून रायलिंग व लिंगाणा यामधील खिंडीत असा हा मार्ग आहे.

        खिंडीतून लिंगाण्याच्या साधारण मध्यावर असलेल्या पूर्वेकडील मुक्कामाच्या गुहेपर्यंतची चढाई तीन टप्प्यांत होते. या सुरुवातीच्या टप्प्यांत खडक व ढासळलेली माती आहे. मात्र चढायला व्यवस्थित खोबण्या आहेत. हल्लीच SCI (Safe Climbing Initiative) संस्थेने योग्य जागी नव्या चांगल्या प्रतीच्या मेखा ठोकलेल्या आहेत, त्यामुळे दोर लावायला अडचण येत नाही.लिंगाण्याच्या सुळक्यावर चढाईसाठी आणि रॅपलिंगसाठी  हार्नेस,कॅरॅबिनर,डिसेंडर, हेल्मेट , पिटॉन, टेप स्लिंग इत्यादी साहित्य आवश्यक आहे.

     तळकोकणातुन लिंगाणाच्या चढाईत साधारणत: ९ टप्पे असुन आपण मोहरी गावातुन आल्यास पाने गाव ते लिंगणमाची व लिंगणमाची ते रायलिंग खिंड हे दोन टप्पे चढावे लागत नाही. रायलिंग खिंडीतून सुळक्यावर जाण्यासाठी एकुण ७ टप्पे असुन यातील चार टप्पे कठीण श्रेणीचे तर उर्वरित तीन टप्पे साधारण श्रेणीचे आहेत. यातील पहिले दोन टप्पे चढाईच्या दृष्टीने सोपे असुन पहिला टप्पा म्हणजे घसरणाऱ्या मुरमाड वाटेवरील ५० फुट उंचीचा उभा चढ व १५ फुटाचा कातळटप्पा आहे पण डावीकडे दिसणारी २००० फुट खोल दरीने काही काळाकरता का होईना पण नजरभय येते पण समोर दिसणारा रायलिंगचा कडा तितकेच आपले साहस वाढवतो.
     पहिले दोन टप्पे
पार करून वर आल्यावर उजवीकडे कड्याला लागुन जाणारी वाट दिसते. हि वाट आपण असलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य भागात जाणारी वाट असुन संपुर्ण सुळक्याला वळसा मारत हि वाट जाते. सुळका फिरून आल्यावर आपल्याला किल्ल्यावर जायचे असल्यास वा किल्ल्यावरील गुहेत रहायचे आपल्याकडील ओझे येथेच ठेवावे व जरुरीपुरते खाण्यापिण्याचे सामान घेऊन पुढील वाटचाल सुरु करावी.
पुढचा भाग रॉक क्लायंबिगचा आहे. रॉक क्लायंबिगमध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे. क्लायंबिगमध्ये आरोहण करणाऱ्या सदस्याच्या सुरक्षिततेसाठी मुख्यत्वे दोन दोर असतात. एक असतो तो हार्नेसला लावलेला सुरक्षा दोर त्या दोराला आरोहाकाने स्वतःला कायम अडकवून घ्यायचे असते. म्हणजे चुकून तोल गेलाच तर आरोहक सरळ खाली न पडता दोराला लटकून राहू शकतो . तसेच ह्या दोराचा वापर जिथे नैसर्गिक खाचा मिळत नाहीत तेथे आधार म्हणून पण करतात. टेप स्लिंग (Tape Sling ) आणि कॅरॅबिनर ( Carabiner) च्या सहायाने आरोहक स्वतःला ह्या दोराशी जोडून घेतो. दुसरा दोर असतो तो बिलेसाठी. बिलेचा रोप आरोहाकाच्या कमरेला असलेल्या हार्नेसमध्ये  कॅरॅबिनरच्या सहायाने अडकवितात.
 Lingana21
 बिले देणे
हा दोर वरच्या टप्प्यावर असलेला बीले देणारा ( belyaer ) नियंत्रित करतो. आरोहक जस जसा वर येत जाईल तास तसा हा रोप belyaer वर खेचून घेतो त्यामुळे आरोहक चढताना सटकला तरी बिले रोपला लटकून राहतो. हा दोर नियंत्रित करायला तो खडकाला मारलेल्या पिटॉन ( piton एक प्रकारचा हुक) मधून ओवून घेतात. ह्यासाठी कधी कधी विशेष बिले डिव्हाईस देखील वापरतात जे friction controlled असते.

           हा तिसरा टप्पा पार करून आल्यावर आपल्याला समोरच अर्धवट बुजलेली व पडझड झालेली एक गुहा पहायला मिळते.तिथेच पुढे कडा उजवीकडे ठेवत गेलं की कड्यात खोदलेली पाण्याची तीन खांबटाकी लागतात. चारजण बसू शकतील एवढी गुहाही कड्यात आहे. हीच वाट पुढे अधिक साहसी होत लिंगाण्याच्या पश्चिम टोकाकडे जाते. गुहेत मुक्काम करायचा झाल्यास या टाक्यातील पाणी चांगले आहे. पण डाव्या बाजूला सरळ खाली झेपावणारा हजारेक फुटाचा कडा असल्याने जपून जायला हवे.या गुहेत प्रसंगी १०-१२ जण सहजपणे राहू शकतात. येथे कोरलेल्या गुहा या पहारेकऱ्यासाठी कोरलेल्या असुन त्याचा उपयोग बोराड्याची नाळ व सिंगापुर नाळ येथुन खाली उतरणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. गुहेच्या डावीकडुन कड्यालगत १५-२० फुटावर सुळक्यावर जाणारा मार्ग असुन या वाटेने वर न जाता सरळ पुढे चालत गेल्यावर ३०-४० फुटांवर कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. यातील एक लहान टाके अर्धवट कोरलेले तर दुसरे टाके कातळात खोलवर कोरलेले असुन तिसरे टाके खांबटाके आहे. या टाक्यांच्या पुढे ८०-९० फुटांवर कातळात चार फुट आत अर्धवट कोरलेली एक गुहा आहे.
 Lingana3
 गुहेतून समोर दिसणारे रायलिंग पठार
मुळ किल्ल्याचा भाग हा इथपर्यंतच असुन येथुन वरील भाग म्हणजे केवळ सुळका आहे व येथुनच अवघड चढाईला सुरवात होते.

Linagana5

गुहेनंतरचा पहिला टप्पा

 वर आल्यावर उजव्या बाजुला कड्यातच खोदलेली छोटी जागा आहे.तिथून पुढे पन्नासेक फुटांवर असलेल्या गुहेत जाण्यासाठीही सरळपणे वाट नाही.डावीकडे पुढे आलेली शिळा व उजवीकडे सगळंच खोल खोल अशी वाटेची सुरुवात. मग इथे सुरक्षेसाठी थेट गुहेपर्यंत आडवा दोर लावला जातो.खिंडीपासुन गुहेपर्यंतची उंची साधारण ५०० फुट असुन येथुन सुळक्याचा माथा साधारण ४०० फुट उंचावर आहे. केवळ किल्ला पहायचा असल्यास या तीन टप्प्यातच आपली चढाई संपते व उर्वरित चार टप्पे हे सुळक्याच्या चढाईतील आहे. खिंडीतून इथवर येण्यास एक तास लागतो तर येथुन सुळक्यावर जाण्यासाठी एक तास लागतो. त्यानंतर चौथा टप्पा मात्र पूर्ण खडकांत व संपूर्ण चढाईत उंच असलेला ७० फुटांचा आहे. त्यानंतर लगेच येणारा ५ वा उभा टप्पा चढायला थोडा ट्रिकी आहे. मध्येच थोडी चिमणी पद्धत वापरुन चढावे लागते.
Lingana17
   हा टप्पा थोडा अवघड असल्याने इथे झुलती शिडी लावली जाते. या झुलत्या शिडीवरून होल्ड्स पकडून शरीराचा भार वर खेचणे हे जाम जिकीरीचे असते. 

Lingana6

Linagana7
373">

Lingana8

Lingana9

वरच्या टप्प्यातील आव्हानात्मक चढाई (फोटो सौजन्य: प्रशांत पाटील )

या पुढील टप्पे तुलनेने सोपे आहेत पण आता वर चढतांना माथा अरुंद होतोय व दोन्ही बाजूंचं खोल खोल आणखी भयावह होत जाते.
Lingana10
पुढील टप्पा थोडा चढल्यावर एकदम खोदीव पायर्‍या लागतात. पुढचा आणखी एक छोटा टप्पा चढला की माथ्याकडे जाणारी अरुंद वाट दिसते.
Lingana11
या वाटेवरुन माथ्याकडे चालत जाणं हा एक अपूर्व अनुभव आहे. या चढाईत एकुण चार कातळटप्पे असुन पहिला ५० फुटाचा कातळटप्पा दोन भागात विभागला आहे तर तिसऱ्या व चवथ्या टप्प्यात माथ्याकडे जाताना काही ठिकाणी वाट इतकी निमुळती आहे कि एकावेळी एकच माणूस कसाबसा चालु शकेल. खिंडीतून माथ्यावर येण्यास ३ तास तर मोहरी गावातुन ५ तास लागतात.
सुळक्याच्या माथ्याची उंची समुद्रसपाटीपासुन २९६९ फुट असुन माथ्यावर भगवा ध्वज रोवलेला आहे. माथ्यावर १५-२० माणसे जेमतेम उभी राहू शकतील इतपत जागा आहे.
   
    लगेच झपाझप पावले माथ्यच्या दिशेने पडतात. काही क्षणातच माथ्यावर पाऊल टाकले जाते आणि पहिले लक्ष जाते ते समोर असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाकडे. नकळत हात जोडले जातात आणि मान लवते. शतकानुशतके गुलामीत खितपत पडलेल्या मराठी मनात हिंदवी स्वराज्याची आस जागविणाऱ्या शिवछत्रपतींच्या राजधानी समोर नतमस्तक होण्याची हि आदर्श जागा!
Lingana13
        माथ्यावरून रायलिंग पठार, पुर्वेला राजगड, तोरणा उर्फ प्रचंडगड तर पश्चिमेला दुर्गेश्वर रायगडाचे अप्रतिम दर्शन होते. उजवीकडे कोकणदिवा, घाटमाथ्यावरुन सरसरत कोकणात उतरणार्‍या बोचेघळ- निसणी- गायनाळ या घाटवाटा. मागे रायलिंग पठार व बोराटा नाळ, उजवीकडे सिंगापूर- फडताड नाळ या घाटवाटा असा राजेशाही आसमंत न्याहाळता येतो. खाली वाहणारे काळ नदीचे पात्र, पाने, वाळणकोंडी, वाघेरी हि गावे अगदी चित्रातील असल्यागत दिसतात.
Lingana20

  इथून उतरण्याची ईच्छा होणे अशक्य असते, पण उतरणे भाग असते. अर्थात तुलनेने उतरताना कमी खडतर असा प्रवास आहे, कारण केवळ तोल सांभाळत रॅपलिंग करायचे असते. सरसर उतरुन आल्यानंतर शिखराकडे पाहिल्यास काही क्षणापुर्वी आपण तिथे होतो यावर विश्वास बसत नाही. एका आगळ्या अभिमानाने छाती फुलून येते. सह्याद्रीतील एक अवघड आव्हान आपल्या नावावर झाले या आनंदात पुढ्ची वाट कधी सरते ते समजत नाही.    
    लिंगाणा मोहीम करताना काही महत्वाच्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.
१)प्रस्तरारोहणाचे तंत्र व अनुभव तसेच गिर्यारोहणाची तांत्रीक माहिती व अनुभव असलेला माणुस सोबत असल्याशिवाय लिंगाण्यावर जाऊ नये.
२)चढताना व उतरताना छोटे मोठे दगड दोर घासल्याने निसटुन खाली अंगावर येतात त्यामुळे हेल्मेट आवश्यक. ३)प्रस्तरारोहण व दोरीने उतरताना लागणारे सर्व सामान जवळ बाळगणे अत्यावश्यक आहे.
३) लिंगाणा चढाईसाठी मोहरी गावातुन शक्यतो अंधारात निघून पहाटे सुरुवात करावी त्यामुळे भर उन्हात चढाई करावी लागत नाही.
४)पाने गावातुन गडावर जात असल्यास शक्य झाल्यास पाने गावातील बबन काशीराम कडु यांना सोबत वाटाड्या म्हणुन घेऊन जावे.
 
लिंगाण्याच्या सुळक्यावर प्रस्तरारोहणाबरोबरच लिंगाणा सुळका आणि रायलिंग पठार याच्यामध्ये व्हॅली क्रॉसिंग केले जाते. महाराष्ट्रात सह्याद्रीत तीन्,चार ठिकाणी असे व्हॅली क्रॉसिंग केले जाते, मदन-अलंगगडाच्या दरीत, प्रबळगड- कलावंतीण सुळका याच्यामध्ये आणि लिंगाणा-रायलिंग पठार यांच्यामधील दरीत व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवता येतो. लिंगाणा-रायलिंग पठार याच्यामध्ये सहाशे मीटरची दरी आहे. आशियातील हे सर्वात जास्त अंतराचे व्हॅली क्रॉसिंग मानले जाते.  

दुर्ग लिंगाण्यावरील प्राचीन गुहेचा शोध - २०१४

२०१४ साली गिरीप्रेमी या संस्थेने लिंगाण्याच्या कड्यावर एका गुहेचा शोध कसा घेतला त्याचा हा वृत्तांत !   
दक्षिण बाजूस शिखरपासून खाली ५० फूट अंतरावर दोन पाण्याचे हौद व एक गुहा निदर्शनास आली.  अंधार पडल्यामुळे  दिवसाची शोध मोहीम थांबवावी लागली. चौथ्या दिवशी दक्षिणेकडील उरलेल्या भागात शोधमोहीम करायची होती, परंतु प्रचंड सुटलेल्या वाऱ्यामुळे तिथे काम करणे अश्यक्य झाले होते.  तो बेत रद्द करावा लागला. रायलिंग पठारावरील छायाचित्रण करणाऱ्या टीमने लिंगाणा मोहिमेच्या पूर्वतयारी दरम्यान उत्तर दिशेच्या कातळात गुहा सदृश्य ठिकाण पहिले होते. दक्षिण दिशेच्या तुलनेने उत्तर दिशेस वारा कमी असल्याने टेक्निकल टीमने उत्तर भागात शोध मोहीम सुरु केली.

       लिंगाण्याच्या पूर्वेकडील हत्ती खडकापासून  एक पदर खाली उतरून पूर्वेकडून पश्चिमेस शोधमोहीम सुरु केली, मेखा, कारवी यांच्या साहाय्याने दोर अडकवत, माती, गवत  व कातळाचा आधार घेत हळूहळू  पुढे सरकू लागली. अंदाजे ९७ मीटर अंतर पश्चिमेकडे सरकल्या नंतर ७ फूट उंचीवर कातळ खडकात खोदलेली गुहा नजरेस पडली. सदर गुहेची लांबी ७ फूट ९ इंच, रुंदी ७ फूट ५ इंच तर उंची ३ फूट ७ इंच आहे. हि गुहा पूर्णपणे खडकात कोरलेली असून तिचा दरवाजा उत्तरमुखी असून त्याची रुंदी ५ फूट तर उंची ३ फूट ७ इंच आहे.
 

सदर गुहेतून उत्तरेकडे पाहिले असता समोर गायनाळ व निसणीची नाळ स्पष्ट दिसते. सदर गुहेचा वापर पूर्वी पहाऱ्याची चौकी म्हणून होत असावा असे भैगोलिक रचणे वरून दिसते. त्यानंतर टेक्निकल टीमने सायंकाळी माथ्यावरून पश्चिम बाजूच्या कड्यावरून दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करून खाली पश्चिमेकडील कड्यावरील असणाऱ्या दोन धान्य कोठार व पाण्याच्या टाक्याचे मोजमाप घेतले व तिथून खाली उतरून पश्चिम धारेवरून लिगांणा माचीकडे कूच केली.
 

     मोहिमेच्या ठरलेल्या अंदाजापेक्षा कैक पटीने हे काम अवघड होते परंतु सर्व अडचणीवर मात करत हि मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण आली. अशी आगळीवेगळी मोहीम पूर्ण करण्यासाठी दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचे ३३ सभासद ५ दिवस सतत राबत होते.

 लिंगाण्याच्या सुळक्यावर चढाई करणारे बालमावळे:-

      सह्याद्रीतील एकेकाळच्या या अशक्य आव्हानावर आता अनेक सह्यपुत्रांची पावले वळू लागली आहेत. पाउस ओसरला कि दिवाळीनंतर थेट फेब्रुवारी- मार्चपर्यंत या मोहिमा होत असतात. अगदी बालचमुही यात मागे नाही. ओळख करुन घेउया अश्याच दोन बालमावळ्यांची.

       भोसरी येथे राहणार्या धनाजी लांडगे यांना ट्रेकिंगची आवड आहे. वडीलांची हिच आवड पाहून गिरीजाने आजवर जवळपास २० किल्ले सर केलेत. गेल्या वर्षी तिच्या वडीलांनी ट्रेकर्स मंडळींना आव्हानात्मक असणारा लिंगाणा कडा सर केला होता. त्यांचा तो व्हिडीओ पाहून गिरीजाने आपणही लिंगाणा कडा सर करू असा हट्ट धरला होता. त्यानुसार घरच्या मंडळींनी देखील तिचा तो हट्ट पूर्ण करण्यास संमती दिली. आणि या अवघ्या ८ वर्षाच्या चिमुरडीने हा कडा सर देखील केला. रायगड, राजगड आणि तोरणा किल्याच्या मध्यभागी असलेला हा लिंगाणा कडा तब्बल तीन हजार फूट उंच आहे. हा कडा सर केल्यानंतर गिरीजाने तेथे ‘लेक वाचवा’ हा संदेश दिला आणि शपथ ही घेतली. हे करताना तिला दडपण होत पण धाडसाने कडा सर केल्यानंतर तिला प्रचंड आनंद झालाय. आता तिने सातारा जवळ असलेला वासोटा किल्ला ट्रेक करण्याचा निश्चय केलाय.

गिरीजाच्या या धाडसाचे कौतुक करताना तिचे वडील धनाजी लांडगे म्हणाले की, गिरीजाला लहानपणापासूनच साहसी खेळ आवडतात. स्केटींग, कराटे, तसेच मैदानी खेळ तिला आवडतात. माझ्यासोबत किल्ल्यांची सैर करणे तिला आवडते. तिने एवढ्या कमी वयात प्रचंड अवघड असलेला लिंगाणा कडा सर केल्यामुळे नक्कीच अभिमान वाटतो.

       लहानपणापासून दुर्गभ्रमंतीची आवड असणाऱ्या आणि आत्तापर्यंत जवळ पास 15 किल्लांवर भटंकती केलेला श्लोक आंद्रे यांने या वर्षीच्या शिवजयंती निम्मिताने आगळी वेगळी कामगिरी केली आहे. रायगडासमोरील 2969 फुटांचा कठीण श्रेणीतील सुळखा अवघ्या साडेचार वर्षांच्या श्लोकने सर केला आहे. दोरखंडाच्या मदतीने दगडांचा आधार घेत त्याने किल्ल्याचे टोक गाठले. किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जय घोष करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर त्याने दुध व जल अभिषेक केला.

माझे सर्व लिखाण या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

तळटिपः- माझा कॅमेरा गडबडीत सॅकच्या तळाशी राहिल्याने बाहेर काढता आला नाही. त्यामुळे मला फोटो काढता आले नाहीत.
सर्व प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार.ज्यांनी कोणी हे अप्रतिम फोटो काढले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद

माहिती स्त्रोतः-
१) गिरीदुर्ग आम्हां सगे सोयरे- श्री. तु. वि. जाधव
२) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची- श्री. प्र. के. घाणेकर
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) ईंटरनेटवरचे असंख्य संदर्भ

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2020 - 2:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी हा धागा उघडला नाही, लेख वाचला नाही आणि फोटो तर त्याहूनही पाहिले नाहीत.

ज्या वाटेला जायचे नाही त्याचे वर्णन वाचून उगाच का आपली जळजळ वाढवायची?

पैजारबुवा,

अफलातून..साहसी.. धाडसी..विलक्षण ..

गामा पैलवान's picture

4 Sep 2020 - 7:10 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

अगदी प्रत्ययी वर्णन आहे. आपण स्वत:च चढाई करतोय असा भास झाला क्षणभर.

आ.न.,
-गा.पै.

गणेशा's picture

4 Sep 2020 - 7:54 pm | गणेशा

अप्रतिम लेखन... मार्ग 2 लिहिताना जो फोटो दिलाय तो तर अप्रतिम आहे.. खुप आवडला..

लिंगाणा खुपच अवघड आहे, अश्या अवघड चढाया मी कधीच केल्या नाहीत, कारण वजन आणि ताकद.. असो..

तरी तुमचे लेख वाचताना असे वाटते आपण तेथे आहे... :-))

असो या मुळे गेलाबाजार मढे घाट धबधबा रॅपलिंग केलेलं आठवले..

दिलीप झुंजारराव यांचा हा व्हिडिओ जरूर पहा.

दिलीप झुंजारराव

चौकटराजा's picture

7 Sep 2020 - 10:33 pm | चौकटराजा

यात मुख्यत: गिरी आरोहण हा अंगाने माहिती दिल्याने इतर दुर्ग भ्रमण लेखापेक्षा अगदी वेगळा व उजवा लेख झालेला आहे . त्यात फोटोही फार माहितीपूर्ण तेच दिलेत ! धन्यवाद ! आपला लेख जर गोनीदां हयात असते तर त्यांना दाखवला असता व त्यांना तो नक्की आवडला असता !

रीडर's picture

7 Sep 2020 - 11:52 pm | रीडर

खूप छान आणि माहितीपूर्ण लेख. खूपच कठीण चढाई आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2020 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेठ, तुमचं लेखन आवर्जून वाचत असतो. लिहित राहा. अवघड कामं आहेत राव ही सगळी. गिरिजाचं लै म्हणजे लै कौतुक.

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

बेकार तरुण's picture

8 Sep 2020 - 1:37 pm | बेकार तरुण

अतिशय कमाल !!!!

कपिलमुनी's picture

8 Sep 2020 - 2:32 pm | कपिलमुनी

अप्रतिम , थरारक !

प्रस्तरारोहणाची साधने नसताना इथे जाउन टाकी, गुहा कशा काय खोद्ल्या असतील ?? याचे फार आश्चर्य वाटते

मुनीवर, त्या काळात दोर, लाकडी शिड्या होत्या, त्यामुळं सुरक्षेची साधनं (बेसिक का होईना) वापरणं शक्य होतं.

टर्मीनेटर's picture

8 Sep 2020 - 7:53 pm | टर्मीनेटर

खूप छान माहितीपूर्ण लेख!
माझ्या हयातीत जर लिंगाण्याला जाण्यासाठी हेलीकॉप्टर/ड्रोन टॅक्सी सेवा सुरु झाली तरच ह्या अद्भुत ठिकाणी जाणे शक्य होईल :)

चौकटराजा's picture

8 Sep 2020 - 9:06 pm | चौकटराजा

नक्की सेवा चालू होणार !

सतिश गावडे's picture

8 Sep 2020 - 10:51 pm | सतिश गावडे

छान लिहीत आहात सर.
मला एक प्रश्न आहे, जेव्हा सुळक्यावर दोर लावून चढतात तेव्हा वर जाऊन दोर कोण आणि कसं बांधतो?

सगा सर, दुर्गविहारी उत्तर देतीलच, पण माझी माहिती सांगतो. दोर लावलेला असतो तो सुरक्षेसाठी वापरायचा असतो, त्याला लटकून वर जाण्यासाठी नाही (आपल्याकडे तो कसाही वापरतात पण मूळ वापर सुरक्षेसाठी हवा).

सर्वात प्रथम कमरेला कॅराबिनर आणि बोल्ट्स लावून आपण दोराशिवाय चढतो तसं दोन हात आणि दोन पाय वापरून (एका वेळी यातील ३/४ गोष्टी वापरून) वर जायचे. मग १०-१५ फूट वर गेले की तिथे बोल्ट पक्का अडकवायचा. त्या बोल्टमध्ये आपली सुरक्षा दोरी लावायची. आता वरून जर कुणी पडलं तर या बोल्टच्या लेव्हलच्या खाली पडणार नाही कारण दोर तिथे अडकवलेला आहे. मग अजून वर आणखी १०-१५ फूट गेले की दुसरा बोल्ट असं करत करत वरपर्यंत जायचे. म्हणजे जास्तीत जास्त पडण्याची खोली १०-१५ फूट यापेक्षा जास्त असत नाही, आणि त्यामुळे जोखीम कमी होते. दोराच्या खालच्या टोकाला एक माणूस ब्रेक लागेल असे साधन धरून त्यातून जाणारा दोर धरून उभा असतो. त्याला 'बिले' देणारा असे म्हणतात. कुणी पडताना दिसलं कि तो पटकन ब्रेक लावून आपला 'फॉल अरेस्ट' करतो. ही बिले वापरून चढण्याची पद्धत झाली, अश्या इतरही पद्धती आहेत.

लिंगाण्यासारख्या प्रसिद्ध आणि वर्दळीच्या जागी अगोदरच सगळे बोल्ट मारलेले आहेत (आता त्यातले अनेक वाऱ्यापावसाने खराब झाले आहेत तो विषय वेगळा) त्यामुळे सुरुवातीला दोर घेऊन फक्त वर जात जात तो योग्य जागी अडकवणे एवढेच सोपे काम करावे लागते. हे काम झाले की आरोहणाला सुरुवात होते.

biey

दुर्गविहारी's picture

9 Sep 2020 - 1:42 pm | दुर्गविहारी

मनो सरांनी लिहीलेल्या प्रतिसादात सर्व काही आहे.अर्थात झुमारींग वैगरे अजून काही गोष्टी असतात.उत्तम मि.पा.वर सतिश कुडतरकर या आय.डी.ने लिहीलेले धागे वाचावेत.त्यात प्रस्तरारोहणाची सविस्तर ओळख आहे. तुर्तास हा व्हिडीओ बघा.यात हा थरारक प्रकार आहे.

यामध्ये ५:३८ ते ६:०७ या दरम्यान मदनाच्या सुळक्यावर रॉक क्लायबिंग कसे केले जाते त्याचे चित्रण आहे. :-)

निनाद's picture

9 Sep 2020 - 5:32 am | निनाद

अतिशय माहितीपूर्ण आणि चित्रदर्शी वर्णन आहे. लेख आवडलाच. एक प्रकारे हे दस्तैवजीकरण करणे महत्त्वाचे आहे आणि ते तुम्ही यशस्वीरित्या करून ठेवल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहात.

फारच अवघड आहे प्रस्तरारोहण. जोखमीचं आहेच. अगदी पुढे जो वीर हातापायाने खाचेत आधार घेऊन चढत पिटॉन ठोकतो त्याचेच काम कठीण असते. वारा,ऊन,पाऊस आणि सुटणारे धोंडे सापशिडीच्या खेळातल्या सापांसारखे आपलं काम करत चढाई करणाऱ्याला खाली खेचायला आ वासून तयार असतात.
पाठीमागून दोराच्या आधाराने वर चढणाऱ्यांचेही कष्ट कमी होत नाहीत पण कोसळण्याचा धोका गेलेला असतो. छोट्या गिरिजाने कमाल केली आहे. वरून खाली पाहताना भोवळ येण्याचे भयही असतेच. आडवी जाणारी वाटही तितकीच किंवा अधिक धोक्याची असते. तिथे आणखी दोन साप टपलेले असतात - बारीक खडी आणि बारीक, सुळसुळीत शेवेसारखे पिवळे गवत. कोणत्याही उत्तम बुटाच्या सोल'ला फसवणारे. पावसाळ्यातला पाणी वाहून शेवाळ्याचा सुंदर बुळबुळीत साप अस्ताव्यस्त पसरलेला असतो. त्याचं तोंड नव्हे तर अंग घात करतं. या सर्वांना टाळत आपल्या धाडस आणि नातेवाईकांच्या नशिबावर भीस्त ठेवत वर चढायचं असतं. [ पावसाळ्यात हातांंनीच चढलेली आणि उतरलेली जीवधनची घाटघरकडची पायऱ्यांची(?) वाट आठवली.] ती शेवटची हे आता सांगू शकतो कारण परत आलो आहे.

लेख आणि फोटो भयानकच (हो) घाबरवणारे आहेत.

जीवधनच्या दोन्ही वाटा सुंदर आहेत. नाणेघाटाकडची तुलनेने अधिक सोपी पण लांबची आहे. एकच 6 फुटाचा रॉकपॅच आहे पण एक्स्पोजर नाही. पदरात घुसल्यावर मात्र रानात चुकायला होतं.

याउलट घाटघर बाजूची वाट जागोजागी एक्सपोज्ड आहे, अर्थात कठीण अशी कुठेच नाही मात्र खोल दरी सतत भीती दाखवत असते. घाटघर बाजूच्या फुटक्या पायऱ्या मात्र सुंदर आहेत, एकदा त्या खोबणीत हातापायाची बोटे अडकवली म्हणणे माणूस पडूच शकत नाही, हल्ली तिथं लोखंडी शिडीच लावून पूर्ण मजा घालवून टाकली आहे. पावसाळ्यात मात्र ही वाट चढणे उतरणे कठीण जाईल.

जीवधन करायचाच असेल तर घाटघर बाजूने चढणे आणि नाणेघाट बाजूने उतरणे अधिक प्रशस्त.

प्रचेतस's picture

9 Sep 2020 - 7:52 am | प्रचेतस

लिंगाणा करणे तर आता अशक्यच मला. रायलिंगवर जाऊन मात्र पाहून येणार फक्त.
सुरेख आणि तपशीलवार वर्णन. खूप छान.

ज्ञानोबाचे पैजार, Bhakti,गामा पैलवान,गणेशा, मनो,चौकटराजा,सतिश गावडे,निनाद, कंजूस, प्रचेतस या सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार ! माझा हा धागा शिफारसमध्ये समावेश केल्याबध्दल साहित्य संपादकांचे आणि मि.पा.प्रशासनाचे आभार ! अशी कौतुकाची थाप पुढच्या लिखाणाला प्रेरीत करते.
उद्या रायगडाच्या घेर्‍यातील पुढचा गडाची माहिती घेउया 'चांभारगड किंवा महेंद्रगड'. धन्यवाद.

Nitin Palkar's picture

10 Sep 2020 - 8:30 pm | Nitin Palkar

तुमच्या सर्वच लेखांमध्ये तुमच्याबरोबर आपण स्वतःच गिर्यारोहण करतोय असे वाटते. आपल्या अनुभवाला, अभ्यासाला आणि लेखनाला दंडवत.
_/\_

अन्या बुद्धे's picture

18 Sep 2020 - 5:52 pm | अन्या बुद्धे

फार भारी!

रायगड टकमक climb केलं तेंव्हा 8 दिवसांच्या मुक्कामात लिंगाणा कायम नजरेच्या टप्प्यात असायचा. तिथे जायचं राहूनच गेलं मात्र. आणि आता तो योग येणं कठीणच दिसतंय..

फोटो सुंदर आहेत..

अन्या बुद्धे's picture

18 Sep 2020 - 5:53 pm | अन्या बुद्धे

फार भारी!

रायगड टकमक climb केलं तेंव्हा 8 दिवसांच्या मुक्कामात लिंगाणा कायम नजरेच्या टप्प्यात असायचा. तिथे जायचं राहूनच गेलं मात्र. आणि आता तो योग येणं कठीणच दिसतंय..

फोटो सुंदर आहेत..

गामा पैलवान's picture

19 Sep 2020 - 12:28 pm | गामा पैलवान

अन्या बुद्धे,

टकमक टोक चढून जाणं अवघड काम आहे. अभिनंदन!

मला आठवतंय त्यानुसार हिरा पंडित पहिल्यांदा टकमक टोक चढून गेले होते.

आ.न.,
-गा.पै.

एस's picture

19 Sep 2020 - 1:58 pm | एस

लेख आवडला.

कंजूस's picture

19 Sep 2020 - 3:08 pm | कंजूस

आमचं बोजड शरीर पाहून दोरही पिळवटतो.

मदनबाण's picture

19 Sep 2020 - 3:17 pm | मदनबाण

थरारक !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2020 - 8:26 pm | चौथा कोनाडा

👌

दुर्गविहारी सलाम !

मालविका's picture

23 Sep 2020 - 1:10 pm | मालविका

सुपर! कमाल धाडसी आहात!