काल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कपडे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले... मी डोळे पुसत बाहेरची वाट धरली व मार्केटच्या बाहेर आलो...समोर बसण्यासारखी जागा पाहून तेथे बसलो... काही वर्षापुर्वीची दृष्य एक चलचित्रपटाप्रमाणे माझ्या नजरे समोर फिरु लागली...
राजा, लेका उठ, सकाळ झाली रे, तुला बाबा बरोबर दुकानावर जायचे आहे ना.. उठ लवकर.
दिवाळीच्या १५ दिवस आधी पासून आमच्या घरातली सकाळ जवळजवळ रोज ह्याच वाक्याने होत असायची.
आई घरात आलेले कपड्यांचे गठ्ठे उसवायला बाबांची मदत करत असे व अक्का ते साईज वाईज लावत असे व बाबा ते आपल्याजवळ असलेल्या बिलावरुन माल बरोबर आहे की नाही हे नोंद करत असत, मी डोळे चोळत उभा राहूपर्यंत त्यांचे अर्धे काम झाले असायचे, व मला बाबा म्हणायचे राजा तयार हो लवकर साडे-सातच्या आत साफसफाई करुन दुकान उघडू आपण.. बोहनी चांगली होईल आवर पटापटा. मी जरा अनिच्छेनेच अंघोळ इत्यादी करुन तयार होतं असे व तो पर्यंत बाबा आपले नाष्टाकरुन पुढे गेलेपण असायचे मागे माझ्यासाठी दोन पिशव्या माल ठेऊन जायचे. मी नाष्टा करुन तयार होऊपर्यंत अक्का दुसरा गठ्ठा सोडवून त्यातला माल मोजायला बसायची.. तीला पाहून कधी हसू येत असे तर कधी राग. हसू ह्यासाठी की ती मोजता मोजता चुकायची.. माझ्या पेक्ष्यालहान वयाने व राग ह्यासाठी की हिच्यामुळे मला शिव्या बसायच्या कारण ही लहान असूनपण काम करायची.
मी पिशव्या घेऊन दुकानात पोहचूपर्यंत बाबा रोडवर पाणी मारुन झाडून मारुन साफसफाई आवरलेली असायची व कपडे लटकवण्याचे लोखंडी स्टॆन्ड लावून मोकळे झालेले असायचे व नवीन आलेला माल साईजप्रमाणे एका जागी जमा करत बसलेले दिसायचे, दुकान... दुकान कसले ज्याला ना शटर ना कुलुप.. महाद्वाररोडवर ड्रेसलॆन्ड दुकानासमोर ची ५ बाय ५ फुटाची जागा, कधी बाबा ह्याच ड्रेसलॆन्ड दुकानामध्ये २५० महिना पगारीवर नोकरी करत पण स्वत:च काम चालू करु म्हणून नोकरी सोडून मालकाच्या परवानगीने ड्रेसलॆन्डच्या बाहेरच दुकान थाटले.. १०-१० चे प्लॆस्टिकची चटाई व कधीमधी पाऊस पडला तर एक्स्ट्रा हिस्सा झाकायला कामी यावा म्हणून.. आधी गांधीनगर मधून माल आणत पण जरा स्वस्त मिळते म्हणून स्वत: मुंबईला जाऊन आता माल घेऊन येत असत.. बाबा एक वर्षाच्या लहान मुलीपासून १४-१५ वर्षाच्या मुलीचे ड्रेस विकत असतं व मला ह्याचा खुप राग.... कारण वर्गात मुले चिडवायची.. कधीमधी... आला लेडिज ड्रेसवाला म्हणून..
सकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान एकदम नटून थटून तयार होत असे.. व आता वाट बघायची ती फक्त बोहनीची... बोहनी होत नाही तो पर्यंत बाबाजवळच्या मित्राजवळ बसून नवाकाळ वाचायचे व चहा चालू असायचा कधीमधी ग्राहक आले की लगेच उठून येत असत व ग्राहकाने खरेदी केली तर ठीक नाही तर परत मित्राच्या दुकानात.. त्यांना वाटायचे ग्राहकाची वाट बघितली तर ते येणारच नाही. मग कधीकधी दहा साडे दहाच्या आसपास बोहणी होत असे व मग बाबा खुष, एकदा बोहणी झाली की मग काही हरकत नाही कधीकधी बोहणीसाठी बाबा आपल्याला पडलेल्या किमतीला पण कपडे विकत व स्वत: मागून एक रुपया त्या ग्राहकाकडून घेत व म्हणत " ताई, हीच गं आजची दिवसाची कमाईची सुरवात." व ती बै हसून तो एक रुपया आनंदाने देऊन जात असे व बाबा तो एक रुपये आपल्या जवळ्या ड्ब्बात आई आंबाबाईच्या फोटोवर ठेवत व म्हणत... आई तुच बघ गं... तुझ्यासाठीच ही सुरवात. तो पर्यंत आई व अक्का घरातले काम संपवून आमचे डब्बे घेऊन हजर होत असतं...
जसाजसा दिवस चढत जाई तसे तसे खरेदीदार वाढत जात... मी साईजनूसार कपडे काढून देणे व ग्राहकांनी विसकटलेल्या कपड्यांची घडी घालणे हे काम करत असे व जेव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा गल्यातील पैसे क्रमवार लावत असे तेव्हा बाबा म्हणायचे राज्या लेका तु दहादा मोजलेस तरी पैसे तेवढेच राहणार ... मी त्यांना म्हणत असे बाबा असेच कपडे विकत राहिले तर आपण दिवाळीच्या दिवशी काय विकणार माल कमी पडेल ना.... मग ते म्हणायचे राजा लेका तुझ्या तोंडात साखर पडो... माझ्यामुळे पण आमच्या दुकानात जरा खरेदी जास्त होत असे असे मला वाटायचे तसे बाबांना पण वाटायचे कारण माझ्या शाळेतील सर्व मुली आमच्याकडेच ड्रेस घ्यायला येत असतं दिवाळीच्या... डिस्काउंटसाठी. अक्का व मी एकाच शाळेत असल्यामुळे माझ्या वर्गमैत्रीणी चांगल्या अक्काला माहीत होत्या.. एखादी आली खरेदीला की मी लगेच पुढे होत असे व ती म्हणायची मागून.. आली सटवाई.. हे येडं गेले बघ...तिच्यामागे.. मी डोळे वटारुन बघायच्या आधीच बाबा तीच्याकडे बघायचे व खुद करुन हसायचे...व स्वत: मागे जाऊन बसायचे व मला पुढे करायचे.... मी तिला आवडेल असे ड्रेस काढून दाखवत असे व तिच्याकडे बघत.. काही तरी भलाताच भाव सांगायचो.. जर जास्त सांगितला तर तिच्या बरोबर असलेली आई-मावशी-आजी बोलायच्या आत बाबा बोलायचे राजा लेका भाव तो नाही आहे... तो आहे. व कधी कमी सांगितला तर काहीच बोलायचे नाहीत व जेव्हा तीची खरेदारी संपत असे व ती निघून गेली असे तेव्हा ते मला म्हणायचे... राजा तुझ्या खात्यात ते २० रु. तीला तु खरेदी दरापेक्षा दहा रु कमी दर लावलास व दहा रु फायद्याचे... ते पण तुझ्याखात्यात.... आई व अक्का फिस्स करुन हसायच्या व मी बाबांच्या मागे बाबा मी घेईन त्यांच्याकडून ते पैसे... कारण दिवाळीच्या फटाकामध्ये व कपड्यामधून ते वजा होणार हे मला पण माहीत असत असे...
दिवसामागून दिवस जात होते.. दिवाळी सहा दिवसावर होती मला आठवतं... माल जवळजवळ संपत आला होता... बाबा खुष होते... पण अजून विक्री झाली असती व फायदा अजून झाला असता असे त्यांना राहून राहून वाटत होते...त्यांच्या मनात काय आले काय माहीत व चार वाजताच मला म्हणाले... राजा तु मुंबईला जा रातच्या गाडीने. झाले आई एकदम म्हणाली..... असे काय करत आहात हा एवढासा.. वर त्याला मुंबईला पाठवत आहात... कुठे हरवला तर... ? तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या.. बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे ? पण मी हो म्हणालो व बाबा जाम खुष... माझ्याकडे पैसे दिले... २४००० रु. सगळे पाचशेच्या नोटा.. कुठल्यातरी सेठ कडून लहान नोटा बदलून मोठ्या नोटा घेऊन आले होते बाबा.. त्या बरोबर माझ्या खर्चासाठी व गाडी भाड्यासाठी पाचशे रु सुट्टे.. जिवनात पहिल्यांदा मुंबई... !
बाबांनी मला रात्रीच्या कोल्हापुर मुंबई बस मध्ये चढवलं व कंडेक्टरला सांगितले की न विसरता ह्याला दादरला उतरवा. जवळ असलेल्या पैसे व त्याच्या काळजीमुळे मी एक मिनिट झोपलो नाही... ना काही खाण्यासाठी उतरलो... बरोबर दादरला मी उतरलो व बाबानी सांगितलेले काम पुर्ण करुन मी सरळ कोल्हापुरच्या गाडीत बसलो.... सकाळी साडे पाचलाच बस कोल्हापुर मध्ये आली जवळ जवळ दिड तास आधी.. कपड्यांची भले मोठी चार-चार गठ्ठडे व मी चिमुरडा पोरं... एक दोन प्रवासी व कंडेक्टर ने मदत करुन सगळे गठडे गाडीवरुन खाली उतरवून दिली, मी आता काय करावे ह्याचा विचार करत उभा होतो तोच समोर एक रिक्षा दिसली. मी त्याला बोलवले व म्हणालो मला बुधवार पेठेत जायचे आहे, हे सामान आहे बरोबर.. त्याने मला वरुन खाली पर्यंत बघीतले व म्हणाला चल.. कसेबसे मागील सिटवर सर्व गठडे त्यांने दाबून दाबून भरले वर मला आपल्या सिटजवळ बसून सरळ टाऊन हॉल मार्गे बुधवारपेठेत रिक्षा उभी केली व म्हणाला घर सांग रे बाळा.. तेथेच पोहचवतो. नाही तर तू हे सामान कसे घेऊन जाणार.. मी त्याला बोळा बोळातून घेऊन घरासमोर रिक्षा उभी केली.... व पळतच वर गेले.. तेव्हा आम्ही दुस-या माळ्यावर राहत असू.. आतातून आवाज येत होता..... बाबांचा आवाज होता... अगं पावणेसात झाले पोरं आलं असे स्टेन्डवर.. एवढं वझं त्याच्याजवळ असेल व त्यातून थकलं पण असेल ते... नाष्टा राहू दे मी जातो...... दरवाजा उघडला व मी बाबाच्या समोर... मी गच्च्च मिठी मारली बाबांना व म्हणालो.... मला नाही जायचे आहे परत कधी मुंबईला.. !
रिक्षावाल्याचे पैसे देऊन बाबांनी सर्व गठ्ठडी उतरवली व त्या रिक्ष्यावाल्या बरोबर वर आले व आईला म्हणाले अगं चहा टाक दोन कप. मी आपला आईच्या पदराबरोबर खेळत म्हणालो... आई भुक लागली आहे.. आई ने माझ्याकडे बघितले व म्हणाली.... बस. तोपर्यंत हे बेसनचे लाडू खा व मी करते तुझ्यासाठी काही.... जास्त वेळ नाही फक्त २८-३० एक तास घरातून बाहेर होतो मी.... गेलो व आलो... कुठेच सामान सोडून उतरलो नाही... अन्नाचा एक कण माझ्या पोटात नव्हता... रिक्ष्यावाला गेला तेव्हा मी बाबाच्याकडे गेलो व मी त्यांना त्या सेठ ने दिलेले बिल व मालाची रिसीट दिली व वाचलेले सर्व पैसे बाबांना परत दिले व म्हणालो... मी झोपू... ! बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे... आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे ? तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... !
कधीच विसरु शकणार नाही अशी ही माझी दिवाळी.... शेवटची दिवाळी....त्यानंतर कधीच वेळच नाही आली दिवाळी साजरी करण्याची.... बाबांचे काम कधी व कसे बिघडले व कधी मी दुरदुर होत एवढा दुर झालो की... शेवटं दर्शनपण दुर्लभ झाले... का हा प्रश्न मला तर नेहमी पडतो... अल्लडपणा.. नादानपणा ह्या नादात मी खुप काही गमवले... आज ही आठवतं.... घराबाहेर कंदिल उभा करणे... आई व अक्काची रांगोळीसाठी चाललेली तयारी.. व मी गोळा केलेले फटाके.... बाबांची दिवाळी तर तेव्हापण रोडवरच... आपल्या दुकानाबरोबर...! उन्हातान्हात...! संध्याकाळी... घरी.. थकलेले .... सावकाराचे घेतलेले पैसे कसे परत करावे ह्या चिंतेत... त्यांचा बॅगपायपर व चार मिनारचे पॅकेट... मी व अक्का बाहेर फटाके सोडत असू व बाबा... असेच एकटे... ग्लास हातात घेऊन...... ह्याला नशीब म्हणावे की नियती मला माहीत नाही पण ती दिवाळी व आजची दिवाळी मी घरात आपल्या माणसांच्याबरोबर कधीच साजरी करु शकलो नाही बुक केलेली टिकीटे मी स्वत: रद्द करावी अशी अवस्था येते.... कधी कधी.... ह्यावेळी पण... कुठेतरी जगातल्या कोप-यात बसून एकटे.. बाहेर चालू असलेली आतिशबाजी बघत.... व समोर चालत असलेली गर्दी बघत..... माझी दिवाळी नेहमी प्रमाणेच संपेल... !
प्रतिक्रिया
16 Oct 2009 - 8:46 am | सहज
राजा, खूप छान लिहले आहेस रे!!
अप्रतिम.
16 Oct 2009 - 8:51 am | llपुण्याचे पेशवेll
+१. सुंदर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
16 Oct 2009 - 9:03 am | लवंगी
खूप हळवं केलस
16 Oct 2009 - 10:22 am | निखिल देशपांडे
राजा सकाळी सकाळी हळवे केलेस
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
16 Oct 2009 - 11:20 am | श्रावण मोडक
+४
16 Oct 2009 - 11:41 am | मस्त कलंदर
खरंच खूप हळवं केलंस!!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
16 Oct 2009 - 3:14 pm | गणपा
मस्त लिहिलयस गड्या.
16 Oct 2009 - 6:41 pm | निमीत्त मात्र
राजे उत्तम लेख! दिवाळीच्या शुभेच्छा!!
16 Oct 2009 - 7:01 pm | अनिल हटेला
सकाळी सकाळी डोक्याला शॉट्ट!!!
:-(
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
16 Oct 2009 - 7:38 pm | टुकुल
डोक्याला शॉट्टच..
सकाळी सकाळी डोक्याला दिवाळीच रॉकेट लावुन भारतात पोहचवल.
--टुकुल
17 Oct 2009 - 3:29 pm | प्रभो
खुप छान रे ...
--प्रभो
19 Oct 2009 - 12:02 pm | हर्षद आनंदी
वाचता वाचता डोळे कधी भरुन आले आणि स्क्रीन धुसर झाली कळलेच नाही #:S
खुपच हळवे केलेस ...
25 Oct 2009 - 12:25 pm | शक्तिमान
राजे एकदम फॉर्मात...
31 Oct 2009 - 4:37 pm | ऋषिकेश
लेखन एकदम भारी!!!
-ऋषिकेश
16 Oct 2009 - 11:50 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
16 Oct 2009 - 8:51 am | llपुण्याचे पेशवेll
+१. सुंदर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
16 Oct 2009 - 8:53 am | नंदन
आहे. छान लिहिलंय, राजे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Oct 2009 - 8:55 am | पाषाणभेद
काय राजे प्रतिक्रीया देतांना धागा गायब का करता?
प्रत्येक दिवाळीत अशीच आठवण निघत असेल नाही.
16 Oct 2009 - 8:59 am | दशानन
अरे काही तरी अडचण होती, लेखन अर्धेच येत होते मला वाटलं धाग्यात अडचण असावी म्हणून उडवला तर तीच अडचण... मग एक छोटासा बग होता तो सापडला व लेख पुर्ण प्रकाशीत झाला.
समक्ष्व.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
16 Oct 2009 - 9:05 am | प्रमोद देव
मस्त लिहिलंय.
16 Oct 2009 - 9:08 am | अवलिया
राजे ! सु रे ख लिहिलं आहेस रे.. ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
16 Oct 2009 - 9:18 am | अडाणि
डोळ्यात पाणी आणले बघा तुम्ही.....
-
अफाट जगातील एक अडाणि.
16 Oct 2009 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजा लेका, मस्त लिहिलं रे...!!!
राजा लेका... जेवला का नाहीस रे ? तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... !
...........
-दिलीप बिरुटे
16 Oct 2009 - 9:29 am | दिपक
सुरेख लिहिलयं राजा.
16 Oct 2009 - 9:49 am | मदनबाण
राजे सुंदर लिहले आहे...
असते दिवाळी प्रकाशाची
तरी अंधारात मी का राहतो?
असते ओढ अशी प्रेमाची
तरी वेगळाच मी का राहतो ?
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
16 Oct 2009 - 9:55 am | धमाल मुलगा
सकाळसकाळ डोक्याला शॉट लावलास! :(
फिकीर नॉट भिडु, तुझी पुढची दिवाळी..आणि त्यापासुनची प्रत्येक दिवाळी घरच्यांसोबतच साजरी होईल..आम्हीही असुच की सोबत :)
जा बच्चा..खुश रहो!
16 Oct 2009 - 11:28 am | मनिष
सकाळी-सकाळी रडवलंस यार!
आणी पुढच्या सर्व दिवाळ्या घरच्यांबरोबर साजर्या होऊ दे हीच प्रार्थना.
16 Oct 2009 - 10:39 am | शाहरुख
राजे, खरंच भारी लिहिलंय !!
(राजेंचा गाववाला) शाहरुख
16 Oct 2009 - 10:53 am | दिनेश५७
पुढंपुढं सगळं धूसर होत गेलं रे... वाचताच यीना...
16 Oct 2009 - 11:19 am | अर्चिस
लक्ष-लक्ष आनंदाचे दिवे प्रज्वलित करणार्या दिवाळीच्या शुभेच्छा
तुम्ही भुतकाळात खुप रमता.
16 Oct 2009 - 11:23 am | विनायक प्रभू
दिपावली शुभचिंतन.
सुरेख लेखन.
16 Oct 2009 - 11:45 am | प्रमोद्_पुणे
सुरेख लिहिले आहे..अप्रतिम! तुम्हाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा..
16 Oct 2009 - 11:46 am | टारझन
अंमळ हळवा झालो !!
16 Oct 2009 - 11:56 am | निशांत५
कल हो ना हो ,..............
डोळ्यात अशा वेळि आणु ऩकोस पाणी, त्या दुरच्या दिव्यांना सांगु नको कहाणी..............
16 Oct 2009 - 11:58 am | राधा१
मन ...अमंळ हळव झाल...अस वाटत होत की आत्ता डोळ्यातुन पाणी येत की काय...!!
16 Oct 2009 - 4:26 pm | प्रसन्न केसकर
राजे काय लिहिलंत! सकाळीच गोटीला फटाके घ्यायला चाललो होतो तर रस्त्यावर आमच्याच गल्लीतला एक मुलगा कॉटवर फटाके मांडुन विकत होता. सहा महिन्यांपुर्वी रेसेशन मधे त्याच्या वडिलांची नोकरी गेलीये. मग त्याच्याच कडुन घेतले फटाके अन त्यातले निम्मे परत त्याच्याच घरी देऊन आलोय, गोटीची त्याला भेट म्हणुन.
16 Oct 2009 - 10:27 pm | मिसळभोक्ता
राजे, यावेळी चक्क वाचवला तुमचा लेख ! चांगला लिहिला आहे.
पुनेरी, लय भारी !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
25 Oct 2009 - 11:51 am | विसोबा खेचर
हेच म्हणतो..!
तात्या.
16 Oct 2009 - 4:50 pm | अनामिका
राजे !
निव्वळ अप्रतिम ..... नि:शब्द केलत्.....डोळ्यातुन पाणी कधी ओघळायला लागले समजलेच नाही!!!!!!
दिपावलीच्या शुभेच्छा! व यापुढिल आपली प्रत्येक दिवाळी आपल्या प्रियजनांबरोबर साजरी होवो हिच जगदंबेचरणी प्रार्थना.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
16 Oct 2009 - 6:28 pm | स्वाती२
राजे, रडवलत बघा आज. तुमची पुढील दिवाळी घरच्यांसोबत आनंदात जावो.
16 Oct 2009 - 8:05 pm | चतुरंग
फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंय!
परवाच 'दुनियादारी' वाचून संपवलं त्यातलं एक वाक्य लक्षात राहिलंय ते इथे अगदी चपखल लागू पडतं "आयुष्यात माणसाला सगळ्या गोष्टी मिळतात फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते!"
असो. दिवाळीच्या शुभेच्छा!! :)
(पाणावलेला)चतुरंग
16 Oct 2009 - 9:32 pm | दिपाली पाटिल
राजे काय सही लिहीलंय...खरंच शेवटचे शब्द धुसर होत गेले....
दिपाली :)
17 Oct 2009 - 1:14 am | सखी
असेच म्हणते - सुरेख लेखन.
16 Oct 2009 - 10:48 pm | प्रभाकर पेठकर
राजे, खळखळ करून सगळं हृदयच सांडलत. पार मनाला जाऊन भिडलं. ह्या हृद्य आठवणीच भावी आयुष्यात कितीही सुबत्ता आली तरी आपले पाय जमीनीवर घट्ट धरून ठेवतात.
16 Oct 2009 - 10:58 pm | संजय अभ्यंकर
माझ्या बालपणीच्या सुखातल्या आणी नंतरच्या दु:खातल्या दिवाळ्या आठवतात! डोके गच्च होते.
समवयीन मुले फटाके उडवत असताना घरात फराळाचे करायलाही पैसे नाहीत. मी व माझा भाऊ इतर मुलांचे फटाके उडवणे सुन्नपणे पहात आहोत, हे चित्र पुन्हा आठवले.
नियती माणसाची कशी परिक्षा घेईल सांगता येत नाही.
"आयुष्यात माणसाला सगळ्या गोष्टी मिळतात फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते!" - चतुरंगभाऊशी सहमत!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
16 Oct 2009 - 11:47 pm | मी-सौरभ
आमचा मुजरा तुमच्या लेखणी ला
दिवाळीच्या शुभेच्छा..........
सौरभ
17 Oct 2009 - 12:01 am | चित्रा
छान लिहीला आहे अनुभव.
आवडले.
17 Oct 2009 - 3:45 pm | विजुभाऊ
राजा मिपाकर हे तुझे कुटुंबीयच आहेत.
कधी हळवा झालास तर बिंधास्त फोन कर मित्राना.
फार काही नाही जमले तर निदान तुला हक्काने ऐकुन घेणारे तरी मिळतील इथे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
17 Oct 2009 - 3:55 pm | नंदू
नि:शब्द.....
नंदू
18 Oct 2009 - 9:57 pm | पिवळा डांबिस
सुरेख लिहिलयंत राजे!!!
मनाला भिडलं!!!
जियो!
19 Oct 2009 - 11:36 am | ब्रिटिश
ज्याआयला आदी तुला खव मदी ईचारल मग ह्ये वाचल. खरच यकटा हाईस कं रं ? आर फिकिर नाट बाला. टायमाची येळ चूकली तरी व्ह्याल्यूला महत्व आसतच. आजुन भरपूर दीवाळी यायच्यात र
मिथुन काशिनाथ भोईर
20 Oct 2009 - 4:08 pm | झकासराव
राजा हळव केलस रे भो.
चांगल लिहिल आहेस.
अवांतर : ह्यावर्षी महाद्वार रोड वर गेलोच ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधी.
लहानपणीच्या आठवणी मनात जाग्या करत. ड्रेसलॅन्ड बरच फेमस होत/ आहे.
20 Oct 2009 - 5:49 pm | दशानन
मी कोल्हापुरला गेलो तर महालक्ष्मी मंदिरातून भवानी मंडपा मार्गेच मागे वळतो.... ड्रेसलॅन्ड कडे चुकून ही जात नाही.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
20 Oct 2009 - 6:59 pm | वेदश्री
राजे,
छान व्यक्त केल्या आहेस भावना! तुझे हे प्रामाणिक लेखन खूप भावले. यापुढच्या सर्व दिवाळ्या तुला तुझ्या आपल्या माणसांत साजर्या करता येवोत, याच मनःपूर्वक शुभेच्छा!
25 Oct 2009 - 10:34 am | दशानन
सर्व प्रतिसाद देणा-या मित्रांचे - मैत्रीणींचे, आजोबांचे - आजींचे, काकांचे - काकुंचे, अनेकानेक आभार.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
31 Oct 2009 - 3:49 pm | Meghana
केवळ सुन्दर.
31 Oct 2009 - 4:08 pm | sneharani
सुंदर.... लेखन!
1 Nov 2009 - 8:38 am | नीधप
प्रामाणिक लिहिलंयस.
आवडलं..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home