रेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं
15 Oct 2009 - 1:04 pm

नमस्कार,

’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.

यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. तसंच हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) तिथे नोंदींवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याचीही सोय आहे. काही सुचवण्या, बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास जरूर कळवा.

तुम्हां सार्‍यांना दिवाळीच्या मन:पूर्वक आणि भरभरून शुभेच्छा!

वाचत राहू या, लिहीत राहू या.

- ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२००९

वाङ्मयसाहित्यिक

प्रतिक्रिया

दशानन's picture

15 Oct 2009 - 4:25 pm | दशानन

आताच डाऊनलोड करुन घेतला आहे.... आज निवांत वाचतो.. :)

धन्यु !

ह्या प्रकल्पाला माझ्या कडून तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा.. !

&

दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा !

धमाल मुलगा's picture

15 Oct 2009 - 6:16 pm | धमाल मुलगा

हे दुसरं वर्षं ना गं?

हापिसातुन उतरवून घेता नाही येत :(
घरी जाऊन पहिलं काम करेन म्हणतो :)

धन्यवाद...शुभेच्छा!!

मेघना भुस्कुटे's picture

15 Oct 2009 - 11:01 pm | मेघना भुस्कुटे

धमु आणि राजे, मनापासून धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

15 Oct 2009 - 6:28 pm | विसोबा खेचर

अरे वा! अभिनंदन बर्र का! :)

आपला,
(रेषेवरची तर सोडाच परंतु रेषेखालचीही अक्षरं धड लिहिता न येणारा) तात्या.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2009 - 6:35 pm | विसोबा खेचर

सदर अंकात मेघना भुस्कुटे यांचा एक लेख आहे. संपादक मंडळात ज्या मेघना आहेत त्यांचाच तर हा लेख नव्हे ना? ;)

आपला,
(शंकेखोर वशिलेबाज) तात्या बर्वा, देवगड! :)

मेघना भुस्कुटे's picture

15 Oct 2009 - 10:52 pm | मेघना भुस्कुटे

तात्या, तो माझाच लेख (जी मी संपादक मंडळात आहे) आहे. पण तुमच्या शंकेला हे उत्तर. गेल्या वेळेच्या ( पहिल्यावहिल्या अंकाच्या ) प्रस्तावनेतला हा काही भागः

ब्लॉग ही संज्ञा अस्तित्त्वात येऊन ती प्रसिद्ध होण्याला दशकाहून अधिक काळ लोटला. जसजशी आंतरजालाशी आपली ओळख वाढत गेली तसतशी ती मराठी भाषिकांतसुद्धा प्रसिद्ध होत गेली. आंतरजालावर ब्लॉग होस्ट करण्यासाठी, देवनागरीमधून लिहिण्यासाठी व ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या लेखांची तात्काळ सूचना देण्यासाठी दिवसागणिक उपलब्ध होणार‍्या विनामूल्य सुविधांमुळे ह्या माध्यमाचा प्रसार वेगाने होत आहे व होत राहील. मराठीत लेखन करणार्‍या ब्लॉगरपैकी अनेकांनी ब्लॉगवर वैयक्तिक अनुभवकथन करता करता साहित्यिक पातळीवर जाणारं वैविध्यपूर्ण लिखाण केलं आहे. या लेखनातील निवडक पंचवीस नोंदींचे संकलन करून येत्या दिवाळीच्या निमित्ताने ते जालावर प्रकाशित करण्याचं आम्ही ठरविलं. आम्ही वाचलेल्या ब्लॉगपैकी आम्हांला आवडलेली, आमच्या स्मरणात राहिलेली ही काही...रेषेवरची अक्षरे! आ॓नलाईन असणं नित्याचं असणार्‍या ब्लॉगशी परिचितांना हे संकलन पुनर्भेटीचा आनंद देईल. जे ब्लॉगशी अनभिज्ञ आहेत, त्यांच्यापर्यंत हे संचित पोहोचेल व त्यांनाही आनंद देईल अशी आशा आहे.

आजवरच्या मराठी ब्लॉग पोस्ट्सपैकी सर्वोत्तम काही पोस्ट्स एकत्र करून प्रकाशित केली जावीत, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. ह्या कल्पनेपासून ह्या संकलनापर्यंतचा प्रवास येथे सविस्तर सांगणं यथोचित ठरेल. हे संकलन म्हणजे ब्लॉगवर आजवर प्रसिद्ध झालेलं अक्षर अन अक्षर वाचून त्याचा घेतलेला मागोवा नाही. जे ब्लॉग आम्ही वाचतो, किंबहुना ब्लॉगजगतातील अनेक लोक वाचतात, अशा सुमारे साठ ब्लॉगची एक यादी करण्यात आली. ह्या यादीत वेगवेगळ्या विषयांवर व सकस लिखाण करणार्‍या ब्लॉगचा समावेश करण्यात आला. ह्यांतून काही चांगलं लेखन सुटलं असणं शक्य आहे. आम्ही आमच्या परीने उत्तमोत्तम ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केले परंतु अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात ही यादी परिपूर्ण असल्याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. आम्ही चौघे मिळून नियमित वाचत असणार्‍या ब्लॉगची संख्या ह्याच्या किमान दुप्पट वा अधिक असेल, हे मात्र येथे नमूद करावेसे वाटते. सवयीच्या गावातल्या ओळखीच्या वाटा पुन्हा एकदा धुंडाळल्या एवढंच. एखादी रम्य पायवाट ह्यांतून निसटली असण्याची शक्यता नाकारण्याचा कुठलाही हट्ट नाही. त्या ब्लॉगवर ३१ आँगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक अक्षराचा विचार करण्याचं मग आम्ही निश्चित केलं. संपादक मंडळातील आम्ही चौघांनी मिळून ह्या सर्व ब्लॉगवरील ३१ आँगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचल्या. ह्या ब्लॉगनोंदींपैकी कोणत्या नोंदी विचारात घ्यायच्या ह्याकरता भाषा, आशय, नाविन्य आणि घाट असे काही निकष ठरविण्यात आले. त्यानुसार व संपादकाच्या मतानुसार सुमारे पन्नास नोंदींची एक यादी करण्यात आली. ही यादी करणं हे अत्यंत अवघड काम होतं हे वेगळं सांगायला नकोच. तरीही काही गोष्टींवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ह्या यादीत लेख समाविष्ट करताना एकाच ब्लॉगरचे तीनापेक्षा अधिक लेख त्या यादीत नसतील असं बंधन आम्ही घालून घेतलं. वैयक्तिक आवडीनिवडींपायी कोणत्याही एका लेखकावर भर दिला जाऊन इतरांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका ह्यामागे होती. संपादक मंडळातील आम्ही मंडळीही ब्लॉगर असल्यामुळे आमचेही ब्लॉग पहिल्या साठांच्या यादीत होते. त्यामुळे संपादक मंडळातील लेखकाच्या ब्लॉगवरील नोंदींची निवड करताना त्या लेखकाला निवडीचा किंवा त्यावर कोणताही अभिप्राय देण्याचा अधिकार नाकारण्यात आला व इतर तिघांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली. ह्या स्वतःहून स्वतःवर घातलेल्या नियमाचं आम्ही नक्कीच काटेकोर पालन केलं. तसंच लेखन हे पूर्णतः मूळ लेखकाचं असावं हाही निकष ठरविण्यात आला. साहित्य, चित्रपट, संगीत, पौराणिक ग्रंथ, इतिहास इत्यादी विषयांशी संबंधित चिकित्सा, मीमांसा किंवा समीक्षा करणारं लेखन ह्या संकलनात समाविष्ट न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला. परिणामी ह्या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगर व त्यांच्या ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण नोंदी ह्या संकलनात आढळणार नाहीत. नैमित्तिक किंवा तात्कालिक विषय असणार्‍या तसेच विशिष्ट प्रश्नांवर प्रबोधन करणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण नोंदीही आम्हांला वगळाव्या लागल्या.

विषय, शैली, मांडणी ह्या सर्वांमधली विविधता हे तर ब्लॉगचं वैशिष्ट्य. त्यामुळे निवड करताना काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार आम्ही केला. वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे जाणारं असं काही नोंदीत असावं असं पाहण्यात आलं. आपले अनुभव पार्श्वभूमीला ठेवून व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल असं लेखन व अशा नोंदींचा विचार करण्यात आला. ह्यातही शैली, भाषा, आशय, नाविन्य हे निकष होतेच. अत्यंत निर्दय होऊन ही पन्नास नोंदींची यादी आपण केली आहे असं वेळोवेळी वाटत होतं. ही भावना अंतिमतः केवळ पंचवीस नोंदी निवडण्याच्या बंधनामुळे अधिकाधिक दृढ होत गेली. ह्या वेळेला पुन्हा एकदा संभाव्य असमतोलाचा विचार केला गेला. काही ठराविक लेखकांच्या लिखाणाने ही निवड व्यापली जाऊ नये, म्हणून एका लेखकाच्या कमाल दोन नोंदी निवडण्याचं नक्की करण्यात आलं. मुळात हेतू हा उत्तमोत्तम लेखांच्या संकलनाचा होता. त्यात दर्जा हा एकमेव निकष. त्यामुळे एका लेखकाचा एकच लेख घ्यावा, असे कोणतेही संख्यात्मक बंधन प्रथमपासूनच आम्ही घालून घेतले नव्हते. प्रत्येकी आधी तीन व नंतर दोन कमाल नोंदी निवडण्याचा निर्णय हा केवळ अंतिम पंचवीस नोंदींत होणारा असमतोल टाळण्यासाठी घेतलेला निर्णय होता. किंबहुना कोणा लेखकाच्या किती नोंदी ह्या संकलनात आहेत ह्यावरून त्या लेखकाबद्दल, त्या ब्लॉगच्या गुणवत्तेबद्दल कोणतेही अनुमान काढले जाऊ नये, असे आमचे प्रामाणिक मत आहे. शिवाय हे ब्लॉगवर पूर्वप्रकाशित लेखांचे संकलन असल्यामुळे एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख दर्जेदार असणं हे स्वाभाविक व अंतिम पंचवीसांमध्ये ते समाविष्ट करणं हे गरजेचं वाटलं. आम्ही अंतिम यादी पंचवीस ठरवूनही प्रत्यक्षात सव्वीस नोंदींची केली, एवढीच काय ती आम्ही संपादक म्हणून आमची स्वतः पाळावयाची ठरवलेली शिस्त मोडली.

आम्ही ज्या ब्लॉगनोंदी निवडल्या, त्या सर्व नोंदी ह्या संकलनात प्रसिद्ध करण्यास त्या त्या लेखकाची संमती आहे किंवा नाही अशा अर्थाची विचारणा करणारे इपत्र त्या त्या लेखकाला पाठवून त्यांची संमती मागण्यात आली. ज्या ज्या लेखकांनी तशी संमती दिली, त्यांच्याच नोंदी ह्या संकलनात आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ह्या इपत्राच्या उत्तरार्थ काही लेखकांनी त्यांच्या दोनऐवजी एकच नोंद ह्या संकलनात समाविष्ट करण्यास संमती दिली. आपल्या दोन लेखांना प्रसिद्धी मिळणे ही आपणांस मिळालेली विशेष सवलत आहे, अशा समजुतीने व ती नाकारण्यासाठी त्यांनी एकच लेख समाविष्ट करण्यास संमती दिली. एकाच लेखकाच्या लेखांची संख्या कोणत्याही प्रकारे त्या लेखकाच्या वा त्याच्या ब्लॉगच्या दर्जाशी निगडीत नाही, एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख प्रकाशित करून केवळ ब्लॉगवरील अधिकाधिक उत्तम लेख संकलित करता येतील, तसे केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच हे संकलन ब्लॉगजगतातील उत्तमोत्तम लेखांचे असून उत्तमोत्तम ब्लॉगरचे नाही, परिणामी ज्यांचे एकाहून अधिक लेख ह्या संकलानात समाविष्ट होऊ शकतात त्यांचे कमाल दोन लेख निवडण्याचे बंधन हे केवळ तांत्रिक आहे, अशी ठाम भूमिका असूनही अशा प्रकारचे गैरसमज व विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात व ते टाळले पाहिजेत, ह्या दृष्टिकोणातून एकाच लेखकाच्या एकाहून अधिक नोंदी प्रकाशित न करण्याचा निर्णय नाइलाजास्तव आम्हांला घ्यावा लागला. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून निवडलेल्या अंतिम सव्वीस नोंदींच्या यादीमधून काही नोंदी वगळून हे संकलन आम्ही प्रकाशित करत आहोत. ज्या लेखकांच्या एकाहून अधिक नोंदींना ह्या संकलनात स्थान मिळणे संपादकांच्या मते आवश्यक होते व तसे त्यांना कळविण्यात आले होते, त्या सर्वांचे आम्ही दिलगीर आहोत. ज्या लेखकांनी काही कारणास्तव आपल्या काही नोंदी समाविष्ट करण्यास संमती दिली नाही, त्यांच्याही निर्णयस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो. तसेच ज्या लेखकांनी विनातक्रार त्यांच्या नोंदी समाविष्ट करण्यासाठी अनुमती दिली, त्यांच्या सहकार्याबद्दल व आपले लेख प्रकाशित करण्याची संमती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. ब्लॉग हे माध्यम उपलब्ध करून देणार्‍या तसेच त्यासाठी पूरक तंत्रवैज्ञानिक सेवा पुरविणार्‍या सर्व व्यक्ती, सर्व विनानफा तत्त्वावर चालणारे उपक्रम, तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक उद्योग ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

ब्लॉगविश्वातील वैविध्याची ही झलक आहे, हे विधान हास्यास्पद ठरेल, ह्याचं कारण असं की वर नमूद केल्याप्रमाणे आम्ही अनेक विषय जाणीवपूर्वक वगळले आहेत. जरी ह्या संकलनामागे ब्लॉगजगतातील वैविध्य प्रदर्शित करण्याचा हेतू नसला तरीही अंतिमतः ह्या संकलनातील प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे, असे आपणास दिसून येईल. त्यात विनोदापासून कवितांपर्यत, अनुभवकथनापासून ललित साहित्यापर्यंत बरंच काही सापडेल. प्रत्येकाची आपली अशी शैली आहे. आपले विचार सहजतेने मांडण्याची हातोटी आहे. हे तुम्हांलाही वाचताना जाणवेल. ह्या संकलनात समाविष्ट करण्यात आलेलं लेखन हे दर्जेदार लेखन आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण त्यात ब्लॉगवरील वैविध्य सामावून घेण्याचा जराही अट्टाहास नाही. ब्लॉगविश्वाशी ओळख करून देण्याचा तर मुळीच प्रयत्न नाही. प्रयत्न असलाच तर तो ब्लॉगवर लिहिलं गेलेलं दर्जेदार लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे.

ब्लॉगवरील दर्जेदार लेखनाचं संपादन व संकलन करण्याचा हा आमच्या माहितीत पहिलाच प्रयत्न आहे. ब्लॉगप्रमाणेच हे संकलनदेखील सर्वांसाठी खुलं असून विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या उपक्रमाचं यश वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. हा उपक्रम पुढील वर्षीही चालू ठेवावा अशी आमची इच्छा जरूर आहे. तरीही हा उपक्रम एक वार्षिक उपक्रम होईल का, कोणत्या स्वरूपात चालू राहील, ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळणार्‍या प्रतिसादावर अवलंबून आहेत. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. आपण इपत्र पाठवून त्या आम्हांला कळवू शकता. आम्ही आमच्या दृष्टिने चांगलं ते वेचून तुमच्यापुढे ठेवत आहोत. आम्ही ते प्रामाणिकपणे वेचलं आहे असा आमचा नक्कीच दावा आहे. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित होऊ नयेत अशी आशा आहे. तुमच्या दृष्टिनेदेखील हेच सर्वोत्तम किंवा हे सर्वोत्तमच असेल, अशी कोणतीही भाबडी आशा नाही. असं झालं तर आनंद आहे, नाही झालं तर खंत नाही. ह्या संकलनाच्या संदर्भात पडणार्‍या स्वाभाविक प्रश्नांची उत्तरं 'नेति नेति' अशीच आहेत. पण म्हणूनच हे संपादन ह्या सगळ्या प्रश्नांपलीकडच्या लेखांचं आहे. जी अक्षरं ब्लॉगच्या नसणार्‍या रेषांवर सरींसारखी झरली, रेषांवर पागोळ्यांसारखी साचली, आनंद देऊन गेली, बरंच काही सांगून गेली नि हळूच निसटताना अक्षर ओलावा मागे ठेवून गेली, त्यातलीच काही स्मृतींमध्ये कायमची साठलेली...तुमच्यासाठी नम्रपणे सादर.

विसोबा खेचर's picture

16 Oct 2009 - 1:07 pm | विसोबा खेचर

ह्यांतून काही चांगलं लेखन सुटलं असणं शक्य आहे. आम्ही आमच्या परीने उत्तमोत्तम ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केले परंतु अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात ही यादी परिपूर्ण असल्याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. आम्ही चौघे मिळून नियमित वाचत असणार्‍या ब्लॉगची संख्या ह्याच्या किमान दुप्पट वा अधिक असेल, हे मात्र येथे नमूद करावेसे वाटते.

संपादक मंडळातील आम्ही मंडळीही ब्लॉगर असल्यामुळे आमचेही ब्लॉग पहिल्या साठांच्या यादीत होते.

अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात पहिल्या साठात तुम्हा मंडळींच्या ब्लॉगांची अगदी नेमकी वर्णी लागली म्हणायची! असतात काही योगायोग! ;)

त्यामुळे संपादक मंडळातील लेखकाच्या ब्लॉगवरील नोंदींची निवड करताना त्या लेखकाला निवडीचा किंवा त्यावर कोणताही अभिप्राय देण्याचा अधिकार नाकारण्यात आला व इतर तिघांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली.

असं म्हणता? बरं बरं! :)

खुलाश्यबद्दल धन्यवाद...

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 6:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, विंग्रजी लिहा, आपोआप रेषेवर येईल! ;-) किंवा रोशनीचा पुढचा भाग ...

मेघना, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजेच. अंक सवडीने वाचून अभिप्राय देते. पण मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मेजवानी असेल याची खात्री आहे.

(इन-फॉर्मल) अदिती

विसोबा खेचर's picture

15 Oct 2009 - 6:38 pm | विसोबा खेचर

किंवा रोशनीचा पुढचा भाग ...

हा हा हा! रेषेवरची अक्षरे जिथे संपतात तिथे रौशनी सुरू होते!

असो..

तात्या.

धमाल मुलगा's picture

15 Oct 2009 - 7:47 pm | धमाल मुलगा

अहो पण कधी? माझ्या नातवाला तरी रौशनीकथेचा शेवट वाचायला द्याल का? :D
का त्यालाही ऐकवाल "क्रमशः" :D

दशानन's picture

15 Oct 2009 - 7:54 pm | दशानन

=))

=))

=))

रोशनी............. हे राम !

डोळ्यापुढे अंधारी आली!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 7:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जाऊ दे रे धमु, आपल्याच मैत्रिणीच्या मेहेनतीच्या धाग्यावर अवांतर नको!

अदिती

दशानन's picture

15 Oct 2009 - 8:03 pm | दशानन

+१

असे म्हणतो.... रौशनीची ख्यालीखुशाली/चौकशी ह्यासाठी दुसरा धागा वापरा.

निखिल देशपांडे's picture

15 Oct 2009 - 8:05 pm | निखिल देशपांडे

असेच म्हणतो रे....
बाकी रौशनी चा पुढचा भाग दिवाळीत येणार का कोणी भविष्य सांगु शकेल का???

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Oct 2009 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll

अरे रेषेवरची अक्षरे अजून कुठे संपले आहे? रेषेवरची अक्षरे संपली की मग रोशनी सुरु होईल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मेघना भुस्कुटे's picture

15 Oct 2009 - 10:58 pm | मेघना भुस्कुटे

थ्यांकू! जरूर अभिप्राय दे. सुचवण्या / तक्रारी.. किंवा कौतुक... ;) स्वागत आहे... आणि प्रतीक्षाही... ;)

विंजिनेर's picture

15 Oct 2009 - 7:12 pm | विंजिनेर

माझा फेव्हरिट जुंभ्रणश्वानाचा लेख.
बाकी, मांडणीबाबत - मला वैयक्तिक रित्या पीडीफ आवडते. त्यात मराठी फाँट उत्तम - "सान्तीपूर ९९" तर नाही ना? मात्र पार्श्वरंग बदला. डोळे फिरतात (खरंच! :) ) काळ्यावर पांढरे हा सर्वात चांगला.

मेघना भुस्कुटे's picture

15 Oct 2009 - 10:54 pm | मेघना भुस्कुटे

बदलायचा - निदान प्रिंट व्हर्जन देण्याचा - प्रयत्न करतो आहोत.

दुसर्‍या दिवाळी अंकाबद्दल अभिनंदन मेघना! :)
एक धावती नजर टाकली एकूण वाचनीय दिसतोय. आता सवड मिळणे हे लवकरात लवकर बघितले पाहिजे.
(बाकी दिवाळी अंक म्हटला की आमची नजर मुखतः कच्च्या मालाकडे, एकदोन ठिकाणी आशा पल्लवित झाल्या, पाहू लवकरच काही जमावे ;) )

(पक्का माल)चतुरंग

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2009 - 11:59 pm | मिसळभोक्ता

आमचे सामंत आजोबा पण हल्ली ब्लॉग लिहितात. त्यांच्या लेखांवर एक अख्खा तिसरा अंक काढावा, ही सूचना. (तीनशेवा लेख वगळून. तो फार व्यक्तिगत आहे.)

पण तुम्हाला त्या अंकाचे नाव बदलावे लागेल. कारण जिथे रेषा संपतात, तिथे त्यांची अक्षरे सुरू होतात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

कालिन्दि मुधोळ्कर's picture

16 Oct 2009 - 12:05 am | कालिन्दि मुधोळ्कर

अभिनंदन!
अंक ओझरताच पाहिला पण मस्त झाला आहे.

प्रशांत उदय मनोहर's picture

16 Oct 2009 - 8:55 am | प्रशांत उदय मनोहर

"रेषेवरची अक्षरे"च्या दुसर्‍या आवृत्तीबद्दल तुमचे व संपादक मंडळातल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. पूर्ण अंक अजून वाचून झाला नाहीये. तो वाचून झाल्यावर सविस्तर अभिप्राय देईन. (अर्थात, काही लेख/कविता पूर्वी त्या त्या ब्लॉगांवर वाचले आहेतच.) मागच्या वर्षीप्रमाणे यंदाचा अंकही मेजवानी ठरेल यात शंका नाही.
एक सूचवावंसं वाटतं. २५ नोंदी शॉर्टलिस्ट करताना असमतोल टाळण्याकरता तुम्ही "प्रतिब्लॉग दोन नोंदी" हे बंधन घातलं त्यामुळे अधिकाधिक ब्लॉगांना समाविष्ट करता येतं हे पटलंच आहे. पण अशा ब्लॉगर्सच्या एका लेखाखालीच "या ब्लॉगवरील इतर वाचनीय" असा एक कॉलम देऊन तिथे तुम्हाला आवडलेल्या पण वरील बंधनामुळे वगळाव्या लागलेल्या पोस्टांची शीर्षके आणि दुवे दिल्यास इच्छुकांना ते वाचता येईल. अर्थात, ब्लॉगच्या दुव्यामुळे इतर सर्वच नोंदी वाचता येतील तो भाग वेगळा.
या उपक्रमाबद्दल अनेक शुभेच्छा.
आपला,
(ब्लॉगर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

अमोल केळकर's picture

16 Oct 2009 - 9:39 am | अमोल केळकर

अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा. अंक वाचनीय झाला आहे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुमीत भातखंडे's picture

16 Oct 2009 - 10:14 am | सुमीत भातखंडे

उतरवून घेतलाय. मस्त वाटतोय.
पी.डी.एफ. आव्रुत्ती उत्तमच जमल्ये.
आता वेळ मिळेल तसा वाचत जाईन.

मेघना भुस्कुटे's picture

16 Oct 2009 - 10:43 am | मेघना भुस्कुटे

चतुरंग, तुमचा 'पक्का माल' आमच्या ब्लॉगवर आणून टाका नक्की! प्रतिक्रियेबद्दल आभार!
प्रशांत, इतर नोंदींची सूचना भारी आहे. पुढच्या वेळी त्याचा नक्की विचार करू.
बर्‍यावाईट प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचेच आभार. जे जे उपयोगी ते ते आमच्या उद्योगाच्या कारणी लावण्याचा प्रयत्न नक्की करणार!

निखिल देशपांडे's picture

16 Oct 2009 - 11:08 am | निखिल देशपांडे

अंक वाचुन झाला...
छानच झाला आहे हं.... सगळेच लेख चांगले आहेत
लेखकांबरोबर संपादन मंडळाने चांगले कंटेट वाचायला दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

हर्षद आनंदी's picture

16 Oct 2009 - 11:40 am | हर्षद आनंदी

डाऊनलोड केला आहे, वाचुन काढतो.

पहिल्या अंकाचा दुवा मिळाला की अजुन बहार येईल.

तात्या, दिवाळीत तरी प्रकाश पाडा आणि 'रोशनी' लिहुन टाका राव.

मेघना भुस्कुटे's picture

16 Oct 2009 - 6:04 pm | मेघना भुस्कुटे

ब्लॉगवर पहिल्या अंकाचा दुवा उपलब्ध आहे की...

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Oct 2009 - 11:13 am | बिपिन कार्यकर्ते

आज अंक नीट बघितला. सर्वप्रथम मराठीमधे असा एक अभिनव उपक्रम सुरू करून तो नेटाने चालू ठेवणे हे खरोखर स्तुत्य आहे. याबद्दल मेघना आणि मित्रमंडळाचे खूप कौतुक वाटते. त्यांना या उपक्रमाबद्दल आणि तो असाच पुढे चालू ठेवावा याबद्दल शुभेच्छा!!! माझ्या आवडत्या कुत्र्याचा लेख आहेच त्यात, नी ची कविताही आहे, शिवाय नंदन वगैरे ओळखीच्या लोकांचे लेख / कविता बघून आनंद वाटला. अंकाची रंगसंगती किंचित त्रासदायक आहे डोळ्यांना, पण ते अगदीच किंचित. अंक एकंदरीत उत्कृष्ट आणि छानच झाला आहे.

एक शंका : या अंकात केवळ ब्लॉग्जवरील लेखनच घेतले आहे का? तसे असले तर काही नावांची अनुपस्थिती जाणवत आहे त्याचे कारण तेच असावे. व्यक्तिश: मला काही लेख या संकलनात असायला हवे होते असे वाटते. असो.

परत एकदा मनःपुर्वक शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

18 Oct 2009 - 6:42 am | मेघना भुस्कुटे

कारण नसताना ओशाळवाणा सूर लावणं, म्हणजे ठेवलेला आरोप नकळत मान्य करणंच आहे. तसलं काही मी करणार नाही.
मुख्य आरोप हे असे:
१) अंक ’गुलजार खवा’ प्रकृतीचा झाला आहे. त्यात काही उत्तम ब्लॉगर्सचं लिखाण घेतलेलं नाही.
माहितीपर, समीक्षात्मक, प्रतिक्रियात्मक नसलेलं ललित प्रकृतीचं लिखाण अंकात असेल, असं पहिल्या अंकापासूनच निश्चित होतं. इतर अनेक उत्तमोत्तम ब्लॉग्स आहेत. उदाहरणार्थ कुणीतरी म्हटल्याप्रमाणे चंद्रशेखर यांचा कायम अपडेट होणारा आणि विलक्षण नेटकी माहिती / विश्लेषण असणारा ब्लॉग आहे. सिनेमा पॅरेडिसोचा वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाची दर्जेदार समीक्षा करणारा ब्लॉग आहे. पण या जातीचं लिखाण न घेण्याची अट पहिल्या अंकापासून होती आणि आहे. त्यामुळे काही गोष्टी सुटून बाहेर राहणारच. पण असं बंधन नसेल, तर या अमर्याद पसार्‍यात थांबणार तरी कुठे? उपक्रमावर माहितीपर असण्याचं बंधन आहे, मिसळपाववर ’मनाला वाटेल ते, आनंद देईल ते’ करण्याची मुभा आहे - या ठरवून घेतलेल्या भूमिका आहेत. तसं करताना काही तोटे होणार, याची जाणीव निर्णयकर्त्यांना असेलच. तरीही काही हेतू मनात ठेवून घेतलेल्या या भूमिका आहेत. तशीच अंकाची ही भूमिका. फायदे-तोटे, समज-गैरसमज, टीका-दाद या सगळ्यांच्या स्वीकारासकट.
२) संपादकांनी स्वत:चं / आपापसांतलं / एकमेकांचं लिखाण छापण्यासाठी काढलेला हा अंक आहे.
वर्षभरातल्या सर्वोत्तम ललित पोस्ट्स असा अंकाचा निकष. त्याकरता किमान ६० ते ७५ ब्लॉग्सवरच्या वर्षभरातल्या नोंदी वाचून काढणं, त्यावरून सर्वोत्तम पोस्ट्सची एक कच्ची यादी तयार करणं, मग अंतिम पोस्ट्सचा एक नक्की आकडा न ठरवता - कच्च्या यादीतल्या ’नाही आल्या तरी चालतील’ अशा - नोंदी कमी करत अंतिम यादी अधिकाधिक चिरेबंदी करत जाणं - ही प्रक्रिया केली. असं करताना काही ब्लॉगर्सच्या एकापेक्षा अधिक पोस्ट्स अंतिम यादीत आल्या - निव्वळ दर्जाच्या निकषावर. मात्र एका ब्लॉगरच्या दोन पोस्ट्स आणि इतरांची एक अश्या निवडीला पक्षपातीपणाचा वास येऊ नये, म्हणून - काहीश्या अनिच्छेनंच - ’एक ब्लॉगर - एक पोस्ट’ हे सूत्र ठरवलं. जी पोस्ट्स एकमेकांशी संबंधित / एकमेकांवाचून अपुरी आहेत त्यांचा अर्थातच अपवाद. (उदा. गेल्या अंकातली अनुची पोस्ट्स किंवा यंदाच्या अंकातल्या निवेदिताच्या टिंबकथा). या निकषानंतरही सीतेच्या चारित्र्यावर कुणी धोबी शिंतोडे उडवू नये, म्हणून तिला रामराज्यातून हाकलून लावली तशी संपादकांची पोस्ट्स अंतिम यादीतून बाहेर ठेवायची, तर (आत्मश्लाघा गेली खड्ड्यात - संवेद आणि ट्युलिप या खणखणीत लेखकांबद्दल तरी कुणाचं दुमत नसावं) त्यांच्या लिहिण्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे अंकाच्या मूळ उद्देशावरच अन्याय करण्यासारखं होतं. केवळ त्याकरता स्वत:च्या ब्लॉगवरच्या पोस्टबाबतचा निर्णय स्वत: न करता इतर तिघांवर सोपवायचा ठरला.
इतकं सगळं केल्यानंतरही पक्षपातीपणाचा / म्युच्युअल ऍडमायरेशनचा / एकमेकांच्या पाठी खाजवण्याचा / आपापसांतला अंक काढण्याचा आरोप करणारे लोक आहेतच. तसे ते कायम असतील. पण अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही एकमेकांना म्हटलं होतं तसंच - आपल्या लिखाणाच्या प्रसिद्धीकरता आपापले ब्लॉग्स आहेतच. अंक काढायचा, तो उत्तमोत्तम लिखाणाचं संकलन मिळावं म्हणून. त्याच्याशीच कुणाचे मतभेद असतील, तर आपण त्याचं किंवा सर्वांचंच एका वेळी समाधान करू शकत नाही, हे आधी लक्षात ठेवू या. ब्लॉग हे माध्यम, आपली ताकद, आपला वेळ, आपली निर्णयप्रक्रिया या गोष्टी इतर तथाकथित नि:पक्षपाती लोकांनाही तितक्याच खुल्या असणार आहेत, जितक्या आपल्याला आहेत.
मी माझ्या बाजूनं हा वाद / संवाद इथेच संपवते आहे.
मोकळेपणानं केलेल्या मतप्रदर्शनाबद्दल मन:पूर्वक आभार. त्याचं नेहमीच स्वागत आहे.
धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

18 Oct 2009 - 8:35 am | विसोबा खेचर

या निकषानंतरही सीतेच्या चारित्र्यावर कुणी धोबी शिंतोडे उडवू नये, म्हणून तिला रामराज्यातून हाकलून लावली तशी संपादकांची पोस्ट्स अंतिम यादीतून बाहेर ठेवायची, तर (आत्मश्लाघा गेली खड्ड्यात - संवेद आणि ट्युलिप या खणखणीत लेखकांबद्दल तरी कुणाचं दुमत नसावं) त्यांच्या लिहिण्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे अंकाच्या मूळ उद्देशावरच अन्याय करण्यासारखं होतं.

गोष्ट खरी आहे.. परंतु तत्वत: कुणाही संपादकाचे लेख येऊ नयेत/येता कामा नयेत, असं वाटतं. आज दुसरंच वर्ष आहे. संपादकात आपसात पूर्णतः अंडरस्टँडिंग आहे/न्यायप्रियता आहे ते उत्तमच आहे आणि तसंच राहोदेखील! परंतु लाँगरन करता ही गोष्ट कुठेतरी धोक्याची/वादावादीची/इगोची इ इ , थोडक्यात एका चांगल्या कार्याला खीळ घालणारी ठरू शकते/ठरू शकेल म्हणूनच केवळ विरोध केला/उपहासात्मक प्रतिसाद दिला..मेघना, संवेद, ट्युलिप यांच्या लेखनकलेबाबत कुठलाही किंतू नव्हता आणि नाही!

असो..

बाकी अंक सुंदरच आणि हा उपक्रमदेखील कौतुक करण्याजोगा! दुसर्‍या वर्षात पदार्पण करण्यासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता लक्ष लक्ष शुभेच्छा! :)

मी माझ्या बाजूनं हा वाद / संवाद इथेच संपवते आहे.

मीही संपवत आहे. परंतु जो काही होता तो संवादच होता. असलाच काही वाद तर विसरून जाऊया! :)

आपला,
(धोबी असलो तरी पुरेसा अनुभवी आणि मराठी आंतरजालाचे हितच चिंतणारा) तात्या.

या जातीचं लिखाण न घेण्याची अट पहिल्या अंकापासून होती आणि आहे. त्यामुळे काही गोष्टी सुटून बाहेर राहणारच.

अंकाचे संपादक ज्या जातीचे लिहितात त्याच जातीचं लिखाण घ्यायचं अशी अट पहिल्या अंकापासून होती का असा मूळ प्रश्न आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2009 - 8:04 am | बिपिन कार्यकर्ते

विस्तृत आणि पटण्यासारखे स्पष्टीकरण. पहिल्या आरोपा(?)त अंशतः सहभाग होता. पण स्पष्टीकरण पटण्यासारखे.

दुसर्‍या आरोपाशी जराशीही सहमती नव्हती त्यामुळे त्याबद्दल काही बोलत नाही.

बिपिन कार्यकर्ते