अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||
प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||
इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||
चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||
योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||
प्रतिक्रिया
19 Aug 2009 - 10:37 pm | अनामिक
आवडली कविता.
-अनामिक
20 Aug 2009 - 3:46 pm | हृषीकेश पतकी
धन्यवाद!!
:)
19 Aug 2009 - 10:38 pm | टारझन
लै भारी !! पुण्हा 'तरूण' झालो आणि शाळेत गेलो !!!
मस्त आहे हो कविता :)
-(बालपणी शाळेत गेलेला) टार्या विद्यार्थी
19 Aug 2009 - 10:44 pm | चतुरंग
नॉष्ट्याल्जिक करुन गेली.
(देशपांडे बाईंचा मार खाणारा पण रसाळ बाईंचा लाडका)चतुरंग
19 Aug 2009 - 11:04 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता आवडलीच. मलाही नॉष्ट्याल्जिक केले हो अंमळ.
http://www.misalpav.com/node/5800 या दिवशी आमची सगळ्यांचीच अशी अवस्था झाली होती. :(
बिपिन कार्यकर्ते
19 Aug 2009 - 11:25 pm | श्रावण मोडक
वा. आवडली. दहापैकी दहा मार्कांची आकांक्षा कायम ठेवा... आपल्यातलं तेवढंच लहानपण निरागसपणे जपता आलं ना तर खूप सुखी होऊ. :)
20 Aug 2009 - 1:49 am | शाहरुख
खरंच छान !
(दरवर्षी चित्रकलेत १०० पैकी ३८ मार्क देऊन पास करणार्या जोशी मास्तरांचा कृतज्ञ विद्यार्थी) शाहरुख
20 Aug 2009 - 8:30 am | दशानन
खरंच छान !
(दरवर्षी सर्व विषयात १०० पैकी ३५/३६ मार्क देऊन पास करणार्या सर्व मॅडम व मास्तरांचा कृतज्ञ विद्यार्थी) राज जैन
20 Aug 2009 - 5:22 am | मदनबाण
सुंदर कविता... :)
(नेहमीच विद्यार्थी)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
20 Aug 2009 - 10:43 am | विशाल कुलकर्णी
कविता छानच!
प्रत्येकाच्याच मनातल्या भावना व्यक्त केल्यात ! मलाही आमच्या येरगुंडे गुरूजींची आठवण आली.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 Aug 2009 - 10:45 am | फ्रॅक्चर बंड्या
सुंदर कविता
शाळा आठवली
चिंचा, बोरे , शिंद्या आठवल्या
त्या छड्या आठवल्या
शाळेतल्या पोरी पण :\
20 Aug 2009 - 3:54 pm | यशोधरा
सुरेख कविता!
20 Aug 2009 - 7:42 pm | विमुक्त
आवड्या एकदम....
20 Aug 2009 - 8:40 pm | क्रान्ति
दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||
वा! अतिशय सुरेख कविता.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
20 Aug 2009 - 8:48 pm | हृषीकेश पतकी
खूप खूप धन्यवाद !!
आपला हृषी !!
:)