उड जायेगा हंस अकेला

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
8 Aug 2009 - 1:03 am

कुमार गंधर्व यांनी गायलेली संत कबीर यांची रचना.

उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला

ह्या ओळी एकल्या आणि अनेक विचार मनात उमटले.. सगळ्यात आधी डोळ्यासमोर चित्रं आलं ते आकाशात झेपावलेल्या हंसाचं... पण उड जायेगा असं म्हटलयं.. म्हणजे अजून उडालेला नाही. ठाऊक आहे उडणार आहे ते. परत ऐकली ओळ. जायेगा शब्दात गंधर्वांनी जी आर्तता ओतलीय त्यावरून वाटतं आत कुठेतरी खोलवर असं वाटतयं त्याने जाऊ नये. मग घोटून घोटून सांगतो आहोत की बाबा रे तो उडून जाणारच आहे. पण मग हंस अकेला ... एकटा का? मग त्याने जावं तरी का? पण तो उडून जाणार आहे, त्याच्या जाण्यातही डौल आहे. हंस आहे तो. जाणारच आहे तो, त्याने जायलाही हवं. 'जग दर्शन का मेला' - हे जग पहायला हवं त्याने. त्याने एकट्याने जायला हवं. आणि तो जाईल - इतका विश्वास त्याच्यवर टाकायलाच हवा. त्याच्या निर्धाराला मोडता घालणं योग्य नाही.
डोळ्यासमोरचं चित्रं गेलं आणि वाटलं - कोण हंस? दूर जाणारं पोटचं पोर? की सासरी जाणारी लेक? की जग पहायला निघालेला अवलिया? की प्रीयकर/प्रेयसी? की स्वतःचा जीव? हंस अकेला... एकटं/एकटी जातो/जाती आहे त्याची काळजीही वाटतेय अनं कौतुकही... की आपण एकटं पडणार आहोत याचं दु:ख आहे हे? डोळे मिटून घेतले आणि नकळत काळ बदलल्यासारखं झालं..
गाण्यासोबत तबल्याचा नाद घुमू लागला. लहान असताना ठाण्याला घंटाळीला बाबांसोबत भजनांना जायचो. बालपण ते. एखाद-दुसरं भजन ऐकायचो. हातात टाळ धरायचो. काही वेळाने पेंग यायची. मग बाबांच्या मांडीवर डोकं ठेऊन डोळे मिटून ऐकत रहायचो.. तीच ही तबल्यावरची थाप. अगदी तोच अनुभव. कळत नकळत मनाला बालपणी सापडलेली लय आज परत गवसल्याचा आनंद झाला. आणि मग वाटलं - हंस म्हणजे वेळ तर नाही? प्रत्येक क्षण तसा एकटाच. वेळ निघून गेली, निघून जाणार हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. कोणासाठी न थांबणारा काळ! अगदी आताही मातकट झालेल्या नाडीत ओवलेल्या पितळी झांजा डोळ्यासमोर आल्या. काही क्षणांपुरते ते क्षण जगलो. पण मग एक रुखरुख लागून राहिली - तेव्हा का नाही जगलो ते क्षण. तेव्हा आपण त्या भजनांच्या शब्दांशी , लयीशी, स्वरांशी एकरूप होत होत चक्क झोपायचो. आज ठरवून लयही सापडत नाही आणि झोपही नाही. बालपणी हंस सोबत होता पण त्याला वेगळं शोधावं लागलं नाही. आता शोध घ्यावा तर कळतयं - उड जायेगा हंस अकेला.
प्रेयसी? - काय नक्की म्हणावं - तिचं करीअर, आपलं प्रेम, समाजव्यवस्थेने आणलेले अडसर.. तिला मनःशांती मिळावी हीच प्रार्थना अजूनही करतो तर मग तिने आणि मी असं एकेकटं जावं हे इतक्या कौतुकाने कसं सांगता येईल. Love or liberty ? महत्त्वांच काय? दोन्ही का मिळू नये. तिने सुखात नांदावं, जग पहावं तिल मनःशांती लाभावी. प्रेमात अजून दुसरं काय मागणं असणार..तिच्या नसण्याने डोळ्यात पाणी आणि तिच्या विरहाने - तिला होणार्‍या त्रासानेही डोळ्यात पाणी आणि काही काळाने मग ती सुखात असल्याचं पुढेमागे कळलं की मनाला येणार्‍या कोरेपणावर हसताना डोळ्यात येणारं पाणी.. दोघांची अवस्था तीच...हंस पुन्हा अकेलाच. उड जायेगा... जग दर्शन का मेला...

जैसे पात गिरे तरुवर के
मिलना बहुत दुहेला

न जानु किधर गिरेगा
लगया पवन का रेला

हंसाच्या उडण्याची तुलना झाडाच्या गळणार्‍या पानाशी का तुलना करावी? एक स्वबळावर जातोय. एक बळ नाही म्हणून विलग होतोय. की ही तुलना नाहीच? दोन्ही जाणार आहेत. पण त्यांनी जावं असं मात्र वाटत नाहीए. पण फरक कीती स्पष्ट आहे. हंस उडून जाईल. तो परतही येण्याची आशा लाऊन जाईल. कारण पंखात बळ आहे. काळजी, आशा, आनंद अश्या भावनांच विचित्र मिश्रण आहे हे. मात्र झाडावरून पडणार्‍या पानाचं तसं नाही. एक तर ठाऊक आहे की ते परतणार नाही. बरं त्याने परतावं तर आता ते त्याला स्वतःहून शक्य नाही. त्यात त्याने कुठे जावं हेही त्याच्या हाती नाही. वारा नेईल तिथे जाईल. कसं परत मिळावं? इथे आशा कसली ठेवायची? दु:ख किती गोंजारायचं?

जब होवे उमर पूरी
जब छुटेगा हुकम हजूरी

यम के दूत बडे मजबूत
यम से पडा झमेला

आतापावेतो आवडीची व्यक्ती अथवा गोष्ट दूर जाताना होणारं दु:ख, प्रतीची आशा, प्रगतीचं कौतुक अश्या भावनांच्या कल्लोळात अडकलेलो असताना वय झाल्यानंतर मरण यावं म्हणून प्रार्थना करणार्‍या एखाद्या आजारी माईचं किंवा अतिशय समाधानी बापाचं चित्र डोळ्यासमोर आलं. काय विचित्र परिस्थीती आहे. स्वतःचा जीव जाणार हे ठाऊक आहे. तो जावा अशीही इच्छा आहे. ही पानगळ. पण इथे समाधान आहे. किंवा उमेद , बळ संपल्याने पत्करलेली शरणागती आहे. ह्या स्थित्यंतराला तर्काची कसोटी लावायलाच हवी का असंही वाटतं.

दास कबीर हर के गुण गावे
वा हर को परन पावे

गुरु की करनी गुरु जायेगा
चेले की करनी चेला

हे सरळसोट मान्य होतं. शाळेच्या अभ्यासक्रमात 'महापुरूषांचा पराभव' असा धडा होता. युगपुरूष, महामानव यांच्या तत्त्वांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात असा आशय असलेला. गुरू की करनी गुरू जायेगा... चेले की करनी चेला. मग प्रश्न पडतो की हे सगळं मान्य असताना ही आळवणी का? कोणासाठी? कशाचीच शाश्वती नाही हे सांगताना देवाचं नाव कशाला? आणि अचानक प्रश्न पडला - आपला कधी काळी सोडून गेलेला सूर, आवाज हा कुमार गंधर्वांचा हंसच होता. पण तो परत यायचा होता.

बर्‍याच गोष्टी, बरीच माणसे पूर्वीसारखी नसतील. ज्याची आशा सोडून द्यावी यी पानगळ. आणि आशा जीवंत ठेऊन जाणारी आणि परतल्यावर मन:शांती लाभणारी अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती म्हणजे हंस!

उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Aug 2009 - 1:08 am | प्राजु

ओंकार... सुरेख लिहिले आहेस!
माझं खूप आवडतं भजन आहे हे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

8 Aug 2009 - 1:09 am | यशोधरा

क्या बात है! मस्त!

मिसळभोक्ता's picture

8 Aug 2009 - 1:26 am | मिसळभोक्ता

हंस == आत्मा,

आत्मा शरीर सोडून निघून जाईल.

(किंवा, आत्म्याचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.)

-- मिसळभोक्ता

विकास's picture

8 Aug 2009 - 1:50 am | विकास

मस्तच आहे हे गाणे/भजन. त्यातील अर्थ मात्र वर मिभोंनी सांगितलेला वाटतो.

"मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळीले सुर्यासी" सारखेच ह्या हंसाचे उडणे आहे असे वाटते.

वास्तवीक कविता आपण कधी वाचतो (वय, वेळ, मूड इत्यादी) यावर त्याचे आपले मनातील अर्थ बदलू शकतात. त्यामुळे केवळ या भजनात अथवा कुठल्याही गाण्यात कवीला काय म्हणायचे आहे तोच अर्थ आपण घेण्याची गरज नाही असे वाटते. म्हणूनच तुम्हाला इतर लागलेले अर्थपण कुठेतरी पटतात.

तीच अवस्था "नववधू प्रिया मी बावरते" बद्दल आहे. बरीचशी स्पष्ट तरी देखील परस्परविरोधी अर्थाने भरलेली...

बाकी आज तुमच्यामुळे माझ्या आठवणीत पण घंटाळी मंदीर आणि तिथल्या आठवणी जाग्या झाल्या...

घाटावरचे भट's picture

8 Aug 2009 - 3:19 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.
जर हंस = आत्मा, असे मानले तर बाकीचे अंतरे अर्थानुसार जिगसॉ पझलप्रमाणे फिट्ट बसतात.

नंदन's picture

8 Aug 2009 - 3:43 am | नंदन

सहमत आहे, सुरेख स्फुट.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2009 - 12:45 pm | स्वाती दिनेश

सुरेख स्फुट.
अगदी नंदनसारखेच म्हणते,
येथे हंस= आत्मा असेच अभिप्रेत आहे.
स्वाती

ॐकार's picture

8 Aug 2009 - 9:42 pm | ॐकार

असं असं... :)

विसोबा खेचर's picture

8 Aug 2009 - 1:21 am | विसोबा खेचर

सुंदर लेख...

देवासला कुमारांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी हे गाणं मला ऐकवलं होतं त्याची आठवण झाली..

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

9 Aug 2009 - 4:07 pm | भडकमकर मास्तर

साक्षात कुमारांच्या घरी त्यांच्याकडून हे गाणे ऐकण्याचे भाग्य लाभले...??? 8|
(तुमच्या भाग्याचा अंमळ हेवा वाटून घेणारा) मास्तर
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विसोबा खेचर's picture

9 Aug 2009 - 4:23 pm | विसोबा खेचर

जवळच राहणारा एक कुणीसा मुलगा ठेका धरायला आला होता. तंबोर्‍यावर मी.

श्रोते फक्त दोनच. मी आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली.

अण्णांच्या घरीही त्यांचं गाणं ऐकण्याचा योग काही वेळेला आला आहे.

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

बेसनलाडू's picture

8 Aug 2009 - 3:28 am | बेसनलाडू

स्फुटलेखन आवडले.
(वाचक)बेसनलाडू

मीनल's picture

8 Aug 2009 - 4:18 am | मीनल

मी सुध्दा काव्यात अर्थ शोधत राहते. आणि अचूक मिळाला म्हणजे तोच अर्थ असावा अशी खात्री झाली की समाधान होत.
आपले लेखन आवडले.एकतर भजन ऐकवलत. त्याच्याशी निगडित काही आठवणी सांगितल्यात शिवाय विविध अर्थ ही समाजावून दिलेत.
आता मी ही शोधते आहे की यापैकी अचूक अर्थ कोणता असावा? की सारेच?

मीनल.

दशानन's picture

8 Aug 2009 - 11:11 am | दशानन

सुंदर लेख !

आवडले !

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

समंजस's picture

8 Aug 2009 - 2:57 pm | समंजस

वा !! मस्त!!

----------

स्वाती२'s picture

8 Aug 2009 - 5:50 pm | स्वाती२

छान लेख. माझ्या आईच आवडत भजन. या लेखामुळे खूप आठवणी जाग्या झाल्या. हंस म्हणजे आत्मा हे १५-१६ वर्षाची असताना खूप आवडलं होतं. गळणार्‍या पानासारख नाशिवंत शरीर आणि मुक्त होऊन देवाकडे झेपावणारा आत्मा.

क्रान्ति's picture

9 Aug 2009 - 4:08 pm | क्रान्ति

खूप छान लिहिलाय लेख. हे माझं अतिशय आवडतं भजन आहे. त्यातून जितके अर्थ शोधावे, तितके कमीच! लेखातले आणि प्रतिसादातलेही संदर्भ समर्पक आहेत.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

घोडीवाले वैद्य's picture

9 Aug 2009 - 11:03 pm | घोडीवाले वैद्य

खरेच सुंदर प्रकटन

अन्वय's picture

9 Aug 2009 - 11:11 pm | अन्वय

झकास लिहलय.
मला वाटतं, ही मांडमधील रचना आहे.
हादेखील सुरेख राग आहे.

चतुरंग's picture

15 Aug 2009 - 11:35 pm | चतुरंग

हंस = आत्मा, हे तर आहेच पण हा अकेला उडून जाणारा हंस त्याला गळणार्‍या पानाची उपमा देताना त्या पानाचा नव्या कोंबातून होणारा पुनःप्रवेश मोठ्या खुबीनं सूचित केलाय कबिराने. ते गळणारं पान कुठे जाणार, कसं जाणार हे त्याच्या हातात नाही पण ते पुन्हा हिरव्या कोंबातून येईल. हे चक्रनेमिक्रम चालूच आहे, चालू रहाणार आहे. ह्यात कुठेही खेद/खंत नाही, दु:ख नाही, परतीची आर्त आस आहे, उत्पत्ति-स्थिती-लय ह्या चक्राचा आदर आहे.
आत्म्याला हंसाची उपमा देखील किती चपखल आहे! नीर-क्षीर विवेक जागा असलेल्या ह्या पक्ष्याची उपमा तुमचा विवेक जागा करुन जाते.
तुमच्या मनाचे डोळे उघडणारे हे पद कुमारांनी असं गायलं आहे की साक्षात आत्मदर्शन झाले आहे!

(हंस)चतुरंग

स्वाती२'s picture

15 Aug 2009 - 11:48 pm | स्वाती२

>>नीर-क्षीर विवेक जागा असलेल्या ह्या पक्ष्याची उपमा तुमचा विवेक जागा करुन जाते.
क्या बात है!

मदनबाण's picture

16 Aug 2009 - 10:14 am | मदनबाण

सुरेख लेख. :)

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतिहो. :)