गीता, पुल, आणि कोसंबी

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
29 May 2009 - 2:06 am

काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव. नंतर गोडबोले यांची स्वतःची शैली विकसित झाली तरी त्यांच्या इतर सामाजिक लेखनात पुलंचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर नसला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असावा असे वाटत राहिले. पुल यांची सामाजिक बांधिलकी आणि विचार ह्यांनी आजही समाजातील एक मोठा वर्ग प्रभावित आहे हे आजही त्यांच्या मॄत्यूनंतर इतक्या वर्षांनीही जाणवत राहते. या अशा पिढ्या घडण्यामागे त्यांच्या लेखनाचा, व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या बुद्धिमान पत्नी सुनीताबाईंचाही मोठा सहभाग होता. मीही इतर अनेकांप्रमाणेच लहानपणी पुलंच्या लेखनाची असंख्य पारायणे केलेली आहेत. आणि मला कल्पना आहे त्याप्रमाणे मराठी संकेतस्थळांवरा असलेला मोठा वर्ग हा या लेखनामुळे प्रभावित आहे.

आजही पुलंच्या लेखनातील अनेक विचार इतर अनेक मराठी लेखकांच्या लेखनातून डोकावत राहताना दिसतात, त्यांच्या प्रतिमा अजूनही मनात घर करून असतात. "तुझे आहे .." मधील वरील संवाद हे याचेच उदाहरण. कथेतील आचार्यांसाठी हातसडीचे तांदूळ, गाईचे तूप, गोमूत्र या गोष्टी मिळवण्यासाठी चाललेली धांदल आणि श्यामचे (खर्‍या) गीतेवर असलेले मूक प्रेम आणि दुसरीकडे या मोहावर विजय मिळवण्यासाठी चाललेली त्याची केविलवाणी धडपड, आचार्यांच्या अधःपतनाची कबुली आणि काकाजींचे सगळ्या मोहांच्या मध्ये राहूनही समाधानी असणे हे सगळे बर्‍याच जणांना आठवेलच. (नाकेल्या दाजी भाटवडेकरांचे दिलदार देखणे काकाजी लोकांवर प्रभाव पाडून गेले नसते तरच नवल). या संवादांनी मला तेव्हा भारून टाकले होते, आणि याचा परिणाम म्हणून असेल पण लहानपणी मी गीता कधी वाचली नाही. वाचली ती खूप उशीरा. आणि गीता म्हणण्यापेक्षाविनोबांची गिताई वाचली. तीही सासर्‍यांनी एका भेटीत गिताई आणली म्हणून. पुल हे एकेकाळी विनोबांच्या भूदानयात्रेमुळे अत्यंत प्रभावित झाले होते, त्यानंतर आणिबाणीच्या काळात "अनुशासन पर्व" प्रकरणामुळे ते दूर गेले होते असे वाचल्याचे आठवत होते. त्यामुळे अशा (भोंदू) विनोबांची गिताई काय वाचायची असा काहीसा तुच्छतेचा भाव मनात होता. यालाच आता मी पुलंचे गारूड म्हणते. पण माझ्या बाबतीत असे कधीकधी झाले आहे की एखाद्या मावशीच्या घराची लहानपणची आठवण येते तेव्हा ते खूप मोठे होते, खिडक्या मोठ्या रूंद होत्या असे आठवते. पण नंतर जाऊन पहावे तो ते घर माझ्या आठवणीतल्या घरापेक्षा लहान दिसावे असे काहीसे होते. खरे घडलेले असे असते की घर तेवढेच असते, मी फक्त मोठी झालेली असते. माझ्या बाळपणीच्या पायांना जे अंतर लांब वाटत असे ते आता तसे वाटत नाही. ते अंतर चारपाच ढांगांमध्येच मी पार करते. या नव्या अनुभवामुळे लहानपणीची घराची प्रतिमा आता पुसली जाते किंवा धूसर होते. असेच काहीसे याबाबतीत झाले असे म्हणता येईल. कारण काही असेल, पण मी गिताई वाचली. कदाचित याच नाटकात चतुर पुलंनी त्याला "अरे ती गीता फार मोठी आहे, आपण छोटी माणसे" अशा अर्थाचे काहीसे म्हटल्याचे आठवत होते (याचा अर्थ त्यांनी गीता वाचली असावी) म्हणूनही असेल. कदाचित माझ्या आयुष्यातल्या अत्यंत धांदलीच्या आणि अस्थिरतेच्या काळात मन:शांती मिळावी म्हणून मी ती वाचली असेल. पण माझा "हिंदू" धार्मिक ग्रंथ म्हणून वाचली नाही, एवढे निश्चित. तसेच माझ्या सासर्‍यांनी ज्या भक्तिभावाने गिताई वाचली असेल त्या भक्तिभावाने मी ती वाचली असे नाही. पण त्यामुळे माझ्या मनातल्या गितेबद्दलच्या, विनोबांबद्दलच्या कडवट प्रतिमा धुसर झाल्या इतके मात्र खरे. आजही गीताई मला पाठ नाही. अरे, आत्ता अमूक घडते आहे, आत्ता यावेळी हा श्लोक चपखल आहे, असे मला सुचत नाही. आजही मोह, माया, क्रोध इत्यादी विकार माझ्या मनावर मधूनमधून ताबा मिळवत असतात! पण हे पुस्तक वाचले नसते तर मी एका मोठ्या लेखनाच्या आस्वादाला मुकले असते असे मला वाटते. आणि एका भारतीय मनांवर प्रभाव पाडणार्‍या मुख्य विचारसरणीच्या ओळखीला मुकले असते असेही वाटते.

गीतेबद्दल नंतर मी बरेच काही वाचले. ते धार्मिक कारणांपेक्षा इतिहासाची आवड असल्याकारणाने. असेच वाचताना कुरूंदकरांनी कोसंबी यांच्यावर त्यांच्या गीतेवरील विचारांची ओळख करून देणारा एक लेख लिहीला आहे, तो नुकताच माझ्या वाचनात आला. ह्या लेखाप्रमाणे गीता हे परमेश्वराचे स्तवन आहे, आणि त्याची उपयुक्तता वरिष्ठांनाच केवळ आहे ही प्रो. दामोदर धर्मानंद कोसंबींची टीका. कोसंबी यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे हे व्यक्तिमत्व आहे. प्रो. कोसंबी यांचे बालपण गोव्यात गेले, अतिशय बुद्धिमान असा हा गणितज्ञ भारतात आणि अमेरिकेत शिकला, भारतातील त्यांच्या विविध क्षेत्रांमधील आणि संशोधन तसेच शिक्षण क्षेत्रातील अविरत कामामुळे, विविध विषयांमधील विशेषतः इतिहासकालीन रसपूर्ण लेखनामुळे आणि मार्क्सवादी विचारांमुळे ते त्यांच्या काळात अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली होते. पुलंवर त्यांचा प्रभाव होता की काय असे मला वाटते. गोव्याला कोकणी दर काही मैलांगणिक बदलते यावरून पिग्मॅलियन नाटक बसवता येईल अशी शक्यता असल्याचे त्यांनी लिहीलेले नुकतेच मला आढळले आणि पुलंना "ती फुलराणी" हे नाटक त्यावरून मराठीत करता येईल असे वाटले असावे असे वाटले. "In Goa it was possible in 1925 for a keen ear to emulate Bernard
Shaw’s Pygmalion-Higgins and to locate a person’s origin within five miles merely by his or her speech, which also gives away the speaker’s caste
or religion, status, profession and educational accomplishments to an observer who knows the locality." (संदर्भ इथे) यामुळे पुलंच्या इतर लेखनावर त्यांचा प्रभाव असावा का असे वाटले.

स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना (गाढवाशी त्याची तुलना करताना) पुलंनी ते फार गंमतीशीर केले आहे, आणि आजही त्या वर्णनाचा प्रभाव समाजातील एका मोठ्या वर्गावर आहे (मराठी मध्यमवर्गीय आणि मुख्यत्वे तिशीचाळीशीमधील लोकांवर). याआधीची आपल्या आईवडिलांची पिढी असा विचार बहुतांशी करीत नाही, कारण पुलंचे हे विचार त्यांच्यापर्यंत तसे पोचले नाहीत. तत्कालिन बराचसा शिक्षित मराठी कुमार आणि बालवर्ग मात्र आज तीस वर्षांनंतर पुलंचे विचार स्विकारतो असे दिसते आहे. पण हे विचार पुलंचे किती आहेत आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे किती आहेत, त्या व्यक्ती कोण असतील (सुनीताबाई सोडून), कोसंबी असू शकतील का असा एक विचार आला. पुल आणि कोसंबी हे दोघेही एकेकाळी पुण्याला फर्ग्युसनमध्ये शिकवत/शिकत (कदाचित एकाच वेळी असतील/नसतील). पण असे होणे अवघड वाटत नाही. कोसंबी यांचे लिखाण हे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे असल्याने (इंग्रजीमध्ये केलेले असल्याने) पुलंप्रमाणे प्रभाव हा पसरलेला नसावा तर केवळ मराठी विचारवंतांपैकी जे इंग्रजी वाचनही करीत असावेत अशा काही मराठी लेखक आणि विचारवंतांपर्यंत हे विचार पोहोचले आणि त्यांच्याकडून संस्कारित होत ते आपल्यापर्यंत आले असेही झालेले असू शकते. तरी पुलंच्या तुझे आहे मधले गीतेवरचे विचार हे कितपत कोसंबींसारख्या विद्वानाच्या प्रभावातून आले आणि किती विनोबांमुळे झालेल्या भ्रमनिरासातून आले हे कळणे अवघड आहे, पण पुलंनी स्थितप्रज्ञावरून केलेली नाटकापुरती गंमत ही बाकीच्या मंडळींच्या प्रतिमाविश्वात नक्की काय बदल करून गेली हे मी केवळ माझ्यावरून ताडू शकते: माझ्या बाबतीत मी गीतेला गांभिर्याने घेतले नाही. माझ्या मते पुलंमुळे लोकांसाठी काही गोष्टी सोप्या झाल्या, त्यातली एक म्हणजे न वाचता मते बनवणे. कोणी मला जर तयार माल आणून घरपोच देत असेल तर मी स्वत: जाऊन विकत आणण्याचे कष्ट का घेईन?! पण आपण विसरतो की पुल स्वतः भरपूर इंग्रजी, मराठी, वाचत होते, सर्व भाषिक मित्र गोळा करीत होते. स्वतः निरनिराळे अनुभव घेत होते. नेमके हेच माझ्यासारख्या लोकांनी केले नसावे. यात दोष पुलंचा नाही, आमच्या आळसाचा आहे. यात माझ्याबाबतीत बदल झाला तो माझ्या सासर्‍यांनी मला गिताई देण्यामुळे. जर का त्यांनी ती दिली नसती, तर मी ती स्वतःहून नक्कीच वाचायला गेले नसते आणि एका वेगळ्या उच्च दर्जाच्या अनुभवाला मी मुकले असते, हे निश्चित. आता हे करीत असताना मी धार्मिक आहे, का अश्रद्ध हा मुद्दा येत नाही. मुद्दा केवळ एवढाच आहे की मी एखादा विचार टाकून देताना नक्की मला त्याबद्दल काय माहिती आहे हा आहे.

खरे तर ज्या स्थितप्रज्ञदर्शनावरून पुलंनी नाटकात एक प्रसंग बेतला आहे त्या दर्शनाबद्दल कोसंबी यांचे मत असे आहे की हे दर्शन बुद्धावरून आले आहे तसेच गितेतली ब्रह्मनिर्वाणाची व्याख्या ही बौद्ध धर्मावरून आली आहे. कोसंबींच्या मते "तत्त्वज्ञानाची गरज आणि मार्गदर्शनाची गरज संघर्षकाळात असते. समृद्धीच्या काळाला मार्गदर्शनाची गरजच नाही. गीता समृद्धीच्या काळाचे अपत्य आहे - याचा अर्थच हा की ज्यावेळी तिची अजिबात गरज नव्हती त्यावेळी या ग्रंथाची रचना झालेली आहे." (अवतरणचिन्हातील सर्व वाक्ये ही कुरूंदकरांनी मांडलेले कोसंबी यांचे विचार ' प्रो. कोसंबी आणि भगवद् गीता' या लेखातून). कोसंबींनी हे मुख्यत्वे कालनिश्चितीसाठी केले असावे असे माझे मत आहे, कोसंबी यांच्या मते गीता बुद्धानंतरची, गुप्त काळातील. माझ्या मते हेचुकीचे गृहितक आहे. समृद्धीचा काळ हा सर्वांसाठी एकाच वेळी नसतो, त्यामुळे समृद्धीच्या काळातही काहींना मार्गदर्शनाची गरज लागू शकत असावी असे गृहित धरायला हरकत नाही.

कोसंबी यांचा एक मुख्य आरोप असा होता की "परस्पर मनोवृत्तीच्या सर्वच मंडळींना ज्या ग्रंथात आपला इच्छित अर्थ शोधणे सोयीस्कर होते ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे ही गोष्ट उघड आहे". ते पुढे म्हणतात "आणि तरीही या ग्रंथापासून सर्वांनी प्रेरणा घेतली त्याअर्थी या ग्रंथाची कोणती तरी उपयुक्तता असली पाहिजे हेही उघड आहे". "गीतेचा आधार या मंडळींना का घ्यावासा वाटला?" या प्रश्नाचे उत्तर देताना (आणि उपयुक्तता विशद करताना) कोसंबी म्हणतात: " याला माझे उत्तर असे आहे की जाती व्यवस्थेची चौकट अमान्य न करता प्रस्थापित ब्राह्मण तर्कशास्त्राच्या आधारे प्रस्थापित समाजव्यवस्थेतील एखाद्या घटनेविरूद्ध बंड करताना वापरता येईल, ज्यातून प्रेरणा घेता येईल, ज्यातून समर्थन घेता येईल असा गीता हा एकच श्रुतिग्रंथ होता. इतर सर्व उपनिषदे आणि श्रुतिग्रंथ आपल्याला हवा असलेला अर्थ काढून दाखवण्यासाठी उपयोगी पडणारे नव्हते. इतर ग्रंथांचे अर्थ निश्चित होते. जातिव्यवस्था मान्य केल्यानंतर उरलेल्या सर्व प्रश्नांवर गीता अनिश्चित होती हे तिच्या प्रामाण्याचे सर्वात मोठे कारण आहे". (त्यांचे मूळ वाक्य असे आहे: (Practically anything can be read into the Gita by a determined person without denying the validity of a class system . The Gita furnished one scriptural source which could be used without violence to accepted brahmin methodology, to draw inspiration and justification for social actions in some way disagreeable to a branch of a ruling class upon whose mercy the brahmins depended at the moment". (मिथ अँड रिएलिटीमधून).)

दुसर्‍या ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की "वरिष्ठ वर्गाच्या हितासाठी ब्राह्मणांनी केलेला हा उद्योग" आहे (वरिष्ठ वर्ग म्हणजे सुभेदार, सरंजामदार, राजे, सामंत असा वर्ग - त्यांच्या मते the lower classes were a necessary audience and the heroic lay of ancient war drew them to the recitation .. the Sanskrit language was convenient if kept simple because the Prakrits were breaking apart in far too many regional languages, Sankrit language was also the language the upper classes had begun to use more and more .. The buddhists had begun to ignore the Teachers injunction to use the common people's languages -they too adopted Sanskrit).

तसेच त्यांनी म्हटले आहे की हा उद्योग "त्यानंतर तरी फारसा लोकप्रिय ठरलेला दिसत नाही" आणि गीतेतून कोणी प्रेरणा घेतली नाही (उदा. शीख चळवळ, गीतगोविंद, वैष्णव चळवळ यांना, तसेच कबीर-चैतन्य यांना गीतेचा आधार घेण्याची गरज लागली नाही. -कुरूंदकर/कोसंबी), गीतेच्या उपयुक्ततेबद्दल कोसंबी त्यांच्या मिथ अँड रिअ‍ॅलिटी या पुस्तकात म्हणतात, "It could not possibly bring about any fundamental change in the means of production, nor could its fundamental lack of contact with reality and disdain for logical consistency promote a rational approach to the basic problems of Indian Society. " हे म्हणणे मला पटत नाही. कोसंबींना जे काम (उत्पादन) महत्त्वाचे वाटते तशी गीताकर्त्याला वाटलेच पाहिजे असे नाही. जेव्हा मला मनाला शांतता हवी असते तेव्हा मी गीता वाचणे हा एक माझ्यापुढे असलेला पर्याय असू शकतो, जेव्हा मला एखादा नवीन तंत्रविषयक सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असते तेव्हा मी जाऊन त्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचेन. तसेच वर उल्लेखलेल्या चळवळी नसतील पण गांधीजीच्या आश्रमांमध्ये गीतापाठ होत असत, त्यांच्या दॄष्टीने समाज एकत्र करण्याचा, घडवण्याचा तो एक मार्ग होता असे मला वाटते. आणि त्याहीपुढे जाऊन माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की गीता बर्‍याचशा बाबतीत उपयुक्त आहे. त्या वाचनाने मी थोडी अधिक समृद्ध झाले.

असे असले तरी कोसंबींच्या या लेखनामागे त्यांची काही थेट भूमिका होती, त्यांनी ती कोणासाठीही बदलली नाही, आणि जे काम केले ते बुद्धीचा कस लावून, अत्यंत तळमळीने आणि ध्येयपूर्वक केले याबद्दल आणि त्यांच्या हेतूंबद्दल शंका न येईल असेच त्यांचे चारित्र्यपूर्ण वर्तन राहिले.

कोसंबींचे एक मत मला मान्य झाले ते असे : " विज्ञानाने आपल्या संशोधनाचा वापर करताना समाजहित नजरेआड करून चालणार नाही इतके म्हटले तरी चालण्याजोगे आहे. या नव्या युगाच्या उभारणीसाठी गीता आणि बायबलकडे जावे लागत नाही. हे ग्रंथ आता शुद्ध वा़ड्मयीन आस्वादाचे विषय मानले पाहिजेत." गंमत म्हणजे दुसरीकडे सावरकरही तेच म्हणतात. " ज्या मनुष्याला धर्माचे एक दूरद्वनी - यंत्र बनायचे नसेल, माणूस म्हणून स्वतःचे बुद्धिनिष्ठ मत हवे असेल, त्याने शब्दनिष्ठेला उच्छेदून वेद-अवेस्ता, बायबल-कुराण हे सारे आदरणीय नि अभ्यसनीय पण निव्वळ मनुष्यकृत ग्रंथ आहेत असे ठाम मत ठरवून त्यांस इतर कोणात्याही मनुष्यकृत ग्रंथाप्रमाणेच सादर अभ्यासावे ... जे मनुष्यहितकारक ते आचरावे; जे आज अनुभवांती अडाणी, टाकाऊ आणि बुद्धिशून्य ठरते ते साफ सोडावे". यादृष्टीने पहायला गेले तर गीतेतील चातुर्वर्णाची संकल्पना, स्त्री, शूद्र, यांना पाप योनी म्हणणे (यांना पापयोनी म्हटले आहे का पापयोनी ही एक अजून तळाची योनी आहे त्याबद्दलही मतांतरे आहेत असे वाचले) आणि गुण/कर्मपरिपाक म्हणून चातुर्वर्णाची कल्पना प्रस्तुत केली एवढे दोन मुख्य दोष सोडले तर गीतेतील इतर उपदेश म्हणा, किंवा अध्याय हे मानवी गुणविशेष, अंतिम ध्येय काय असावे (गीता-कर्त्यांच्या मते) आणि निर्णय आणि त्यांचे परिणाम यांवर बरेच उपयुक्त भाष्य करतात असे मला वाटते. माझ्या मते त्यात अर्जुनाने काय करावे याबद्दल थोडीफार संदिग्धता ठेवली आहे ते चांगलेच आहे, मोकळेपणाला पोषकच आहे. आणि याचा उपयोग करावा, का करू नये किंवा कसा करावा याबद्दलच्या निर्णयाचे स्वातंत्र्यही माझ्याकडे आहे तेही उत्तमच आहे असे वाटते.

धर्मवाङ्मयइतिहासविचारअनुभव

प्रतिक्रिया

धनंजय's picture

29 May 2009 - 3:15 am | धनंजय

प्रतिसादासाठी जागा आरक्षित करतो आहे. पण लेखनशैली परखड तरी सहानुभूती भरलेली आहे, हे वैशिष्ट्य लगेच जाणवले.

माझ्या मते पुलंमुळे लोकांसाठी काही गोष्टी सोप्या झाल्या, त्यातली एक म्हणजे न वाचता मते बनवणे. कोणी मला जर तयार माल आणून घरपोच देत असेल तर मी स्वत: जाऊन विकत आणण्याचे कष्ट का घेईन?!

हे निरीक्षण पटण्यासारखे आहे. पु.लंनी वैचारिक, डोक्याला त्रास होईल, काळजीपूर्वक वाचावे लागते, असे लेखनही केले आहे. पण त्यांच्या सहजसुंदर विनोदी लेखनातली वाक्येच फक्त आपणा वाचकांच्या लक्षात राहातात. पण तीसुद्धा अर्धीच लक्षात राहातात ही शोकांतिका आहे. भंग्याने झाडू फिरवणे आणि क्रिकेटरने बॅट फिरवणे समसमान, असे काकाजी समजावून सांगतात. समरस होऊन टकळीतून सूत काढणे, आणि गळ्यातून सरसर तान येणे असे काकाजी म्हणतात. हेसुद्धा समचित्ताने मझा घेण्याचे हृद्य वर्नन आहे. पण नाटकातला स्थितप्रज्ञ गधा जितका लक्षात राहातो, तितका स्थितप्रज्ञ मझा आपणा वाचकांना आठवत नाही.

दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे लेखन विश्लेषक असते. तसेच कुरुंदकरांचे. भारतीय ऐतिहासिक साहित्याकडे बघायची एक वेगळी दृष्टी या दोघांनी मला दिली आहे. अखेरचा निष्कर्ष पटला नाही तरी प्रश्नाचा, साहित्याचा वेगळा पैलू दाखवण्याबाबतीत त्यांचे विश्लेषण नेहमीच विचारार्ह वाटते.

विसोबा खेचर's picture

29 May 2009 - 7:04 am | विसोबा खेचर

चित्रावैनी,

प्रकटन मनापासून आवडले..!

धन्यशेठचा प्रतिसादही आवडला..

बाय द वे, तुझे आहे तुजपाशी या नाटकात 'बाई पुरियाच्या जंगलात घुसली होती. ऐकायला इनेगिने पाच-दहाच लोक. बेहोश झाला होता सारा मामला!' हा जो प्रसंग रंगवला आहे तो रंगवतानाही पुलंवर कुणाचा प्रभाव आहे का असे विचारावेसे वाटते!

आपला,
(भाईकाकांचा भक्त) तात्या.

--
"अरे श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला! फार मोठे पुस्तक आहे ते! पण आपण नाही ना तेवढे मोठे! आपली पट्टी काळी दोन. काळी चार, काळी पाच मध्ये गाणं जमायचं कसं? न पेलणार्‍या पट्टीत गाऊ नये!"

स्वाती दिनेश's picture

29 May 2009 - 11:37 am | स्वाती दिनेश

लेख तर आवडलाच. (मंगला गोडबोलेंचे लेखन मलाही खूप आवडते.त्यांच्यावर असलेला पुलंचा प्रभाव सुरुवातीच्या लेखात जाणवतो हे निरिक्षणही पटले )
धनंजयने लिहिलेले पु.लंनी वैचारिक, डोक्याला त्रास होईल, काळजीपूर्वक वाचावे लागते, असे लेखनही केले आहे. पण त्यांच्या सहजसुंदर विनोदी लेखनातली वाक्येच फक्त आपणा वाचकांच्या लक्षात राहातात.अगदी पटले.
स्वाती

सहज's picture

29 May 2009 - 11:49 am | सहज

गीता--पुल-विनोबा भावे-- पुलंवर प्रभाव- पुलंचे वैचारिक लेखन्--लोकप्रिय साहित्य--विचारधारा--शेवटी निव्वळ मनुष्यकृत ग्रंथ

फार छान वैचारिक लेख, प्रकटन. कोसंबी वाचले पाहीजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2009 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !

पुन्हा-पुन्हा वाचण्यासारखा !

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

29 May 2009 - 5:40 pm | ऋषिकेश

विचारपूर्वक लिहिलेले प्रकटन आवडले.. म्हटले तर स्वैर मह्टले तर तर्कशुद्ध अश्या वेगळ्याच शैलीतील लेखन वाचताना मजा अली

आजही पुलंच्या लेखनातील अनेक विचार इतर अनेक मराठी लेखकांच्या लेखनातून डोकावत राहताना दिसतात, त्यांच्या प्रतिमा अजूनही मनात घर करून असतात.

त्याच बरोबर

माझ्या मते पुलंमुळे लोकांसाठी काही गोष्टी सोप्या झाल्या, त्यातली एक म्हणजे न वाचता मते बनवणे. कोणी मला जर तयार माल आणून घरपोच देत असेल तर मी स्वत: जाऊन विकत आणण्याचे कष्ट का घेईन?!

अशी मते एकदम पटण्यासारखी आहेत.
लेख पुन्हापुन्हा वाचण्याजोगा आहे. वाचनखुणेत साठवावा असा...
पु.ले.शु.

-(वाचक) ऋषिकेश

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

अवलिया's picture

29 May 2009 - 5:46 pm | अवलिया

लेख आवडला ! अगदी पुन्हा-पुन्हा वाचण्यासारखा !
येवु द्या अजुन असेच नितांतसुंदर लेखन !!!

--अवलिया

चित्रा's picture

29 May 2009 - 6:25 pm | चित्रा

सर्वांना धन्यवाद,
तात्या, पु.ल. हे सतत कोणामुळे प्रभावित होते असे सुचवायचे नव्हते. पण लेखन करताना आपल्यावर प्रभाव असतोच. आपले अनुभवच आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. त्यात गैर काहीच नाही. एखाद्याने नुसते वाचून सोडून दिले असते, पु. ल. यांच्यावर कोसंबींचा प्रभाव (मी म्हणते तसा - ही माझी शंका आहे, खात्री नाही) पडला असलाच, तरी, त्यांनी त्या प्रभावाचे एका उत्कृष्ट कलाकृतीत रूपांतर केले, ज्यावर त्यांची स्वतःची छाप आहे, ज्यातून त्यांची प्रतिभा दिसते हे वेगळेपण आहे. हे मोठेपण आहे. पुरियाचे जंगल असणे, ही प्रतिमाच त्याची साक्ष आहे.

कर्क, पुल यांची पुस्तके जरूर वाचा.विशेषत; संगीत, कला, शिक्षण यासंबंधींचे त्यांचे विचार अतिशय मौल्यवान असे आहेत. त्यांनी सहजसुंदर विनोदी लेखनातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळेल असे खूप काही लिहीले आहे. ते आपल्यापर्यंत पोचताना त्यातील विनोदच केवळ लक्षात राहतात हे आपले दुर्दैव.
सहजः जरा स्वैर लिखाण झाले आहे (लेखाची लांबीही मोठीच झाली आहे, पण मला काटछाट करता आली नाही). कोसंबी, कुरूंदकर यांना वाचले पाहिजे असे हे लेखक आहेत, पण कोणाचेही लेखन वाचताना प्रश्न विचारायला विसरू नये, आपल्या अनुभवांशी पडताळून पहायला विसरू नये.

धनंजय यांच्या अधिक प्रतिसादाची वाट बघते. समचित्ताने मझा घेण्याचे हृद्य वर्तन हा शब्दप्रयोग आवडला.

पुलंच्या लिखाणावर असलेल्या प्रभावाचा शक्यतांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न छान आहे. मोठ्यांच्या कलाकृती ह्या संपूर्ण स्वयंभूच असतात/असायला हव्यात असा सर्वसामान्यपणे अट्टाहास दिसतो त्यावर अमक्यातमक्याचा प्रभाव आहे असे म्हटले की ती कलाकृती हिणकस होत नाही. कशाचा ना कशाचा प्रभाव असणारच. त्या प्रभावातून स्वतंत्र कलाकृतीची निर्मिती हा प्रतिभेचा स्पर्श.

माझ्या मते पुलंमुळे लोकांसाठी काही गोष्टी सोप्या झाल्या, त्यातली एक म्हणजे न वाचता मते बनवणे. कोणी मला जर तयार माल आणून घरपोच देत असेल तर मी स्वत: जाऊन विकत आणण्याचे कष्ट का घेईन?!

हे पूर्ण पटले असे म्हणता येत नाही कारण हे थोडे व्यक्तिसापेक्ष असू शकते पण त्याचवेळी पुलंचा महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनावरचा प्रभाव लक्षात घेता त्यांचे प्रत्येक वाक्य प्रमाण मानून चालण्याची प्रवृत्ती झाली असली तर नाकारता येणार नाही!

कोणाचेही लेखन वाचताना स्वतःच्या अनुभवांशी सांगड घालण्याच्या प्रयत्नातून लेखन अधिक व्यापक प्रमाणावर उलगडत जाते. पूर्वी वाचलेले लिखाण आता वाचले तर निराळेच पैलू दिसतात/दिसायला हवेत ते ह्याच मुळे कारण अनुभवांचा पट विस्तारलेला असतो/असायला हवा.

चतुरंग

Nile's picture

30 May 2009 - 2:47 am | Nile

माझ्या ब्लॉग वर सर्व प्रथम पोस्ट - I would love to- मध्ये मी हे म्हणलं आहे: "ask Pu La if he intended any philosophy in his works?". मला बर्‍याचदा त्यांच्या विनोदामागे, उपहासामागे काहीतरी संदेश, शिकवण असल्याच जाणवत.

" विज्ञानाने आपल्या संशोधनाचा वापर करताना समाजहित नजरेआड करून चालणार नाही इतके म्हटले तरी चालण्याजोगे आहे. या नव्या युगाच्या उभारणीसाठी गीता आणि बायबलकडे जावे लागत नाही. हे ग्रंथ आता शुद्ध वा़ड्मयीन आस्वादाचे विषय मानले पाहिजेत.

हे जेव्हा सर्वसामान्याला "उमगेल" तोच दिन सोनियाचा!

बाकी पुलंची लोकप्रियता ही सर्वसामान्यांच्या मनातले भाव अचुक ओळखण्याच्या कलेमुळे आहे असं वाटतं. (अर्थात फार कमी लोक विद्वता आणि लोकप्रियता जवळ बाळगुन असतात. :) )

छान वाटलं वाचुन, बर्‍याचदा काय मिळवतोय आपण या (इतिहास, साहित्य वगैरे) वाचनातुन असा प्रश्न पडतो, पण जे आवडत ते करायचा मोह सुटत नाही. :)

रेवती's picture

30 May 2009 - 3:19 am | रेवती

लेख आवडला.
लेखनाने दुसर्‍या परिच्छेदापासून मनावर पकड घेतली ते शेवटीच थांबले.
गिताई वाचलेली नाही पण आता वाचावी का? असं वाटायला लागलय.
काही मते (तुझी किंवा श्री. कोसंबी यांची ) अगदी पटली, तर काही
अजून विचार करायला हवा अशी वाटली (तितकं डोकं आत्ता चाललं नाही).
अर्जूनाने ठेवलेल्या संदिग्धतेचा उपयोग तू निर्णयस्वातंत्र्य म्हणून घेणार आहेस
याचे समाधान वाटले.
अभ्यासपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन!

रेवती

मुक्तसुनीत's picture

30 May 2009 - 8:01 am | मुक्तसुनीत

लिखाण आवडले. हे वाचताना आणि वाचून झाल्यावर असे जाणवले की , लेखनप्रक्रियेचा एक उत्तम , श्रेयस असा हेतू असतो तो हेतू मनात धरून केलेले हे लिखाण आहे. हा हेतू म्हणजे , आपल्या "मनाचिये गुंती , गुंफियेला शेला". Writing is an expression alright. But Sometimes we write as a means of a search , a quest ; not merely to express what we think or feel.

लेखिकेच्या मनात पुलं , गीता , विनोबा , त्यांची गीताई , कुरुंदकर , कोसांबी यांचे विचार वसतीला येऊन राहिलेले आहेत. या लोकांच्या लिखाणाने , कृतींनी , महाराष्ट्रातल्या अनेकांच्या विचारांवर परिणाम केलेला आहे. यापैकी एकमेकांचे विचार कसे ओव्हरलॅप होतात , कुठे एकमेकाना छेद देतात या सार्‍याला एका सूत्रात बांधून , अंतिमत: काही सत्याचे नवनीत हाती लागते का , असा हा प्रयत्न मला वाटला.

लिखाणाचा उद्देश हा असल्याने , लिखाण स्पष्ट, सोपे झालेले आहे - जरी त्यातल्या विषयांचे स्वरूप एकमेकात गुंतलेले, जटिल झालेले असले तरी.

वरील कारणामुळे हे लिखाण मला विशेष आवडले. ते थोडे नीट वाचून, मगच जमेल तसा प्रतिसाद लिहावासा वाटला.

कोसांबींच्या लिखाणाची व्याप्ती पाहून छाती दडपायला होते. मात्र त्याच वेळी , एकाच माणसाने इतका खोल आणि तरीही मोठ्या रेंजचा विचार केलेला असल्याने , ते निदान एकदा वाचता येईल अशी कुठेतरी वेडी आशाही वाटते. तर , कोसांबींची या लेखात आलेली मते मला प्रसंगी bang on target वाटली . उदा. जातिव्यवस्थेला गीतेमधे कुठेही धक्का न लावलेला असणे. तर , उत्पादकत्त्व आणि गीता यांचा संबंध बादरायण वाटतो. (लेखिकेनेही हेच म्हण्टले आहे. ) हा "उत्पादकतेचा" मुद्दा अर्थातच त्यांच्या मार्क्सिस्ट विचारधारेतून आला असणार.

कोसांबींचे लिखाण वाचल्यावर , त्यांच्या विचाराची अमुक एक दिशा निश्चित झाल्यासारखी वाटते काय ? की त्यांच्या लिखाणाची व्याप्ती असले निष्कर्ष काढणे अशक्य बनविते ? कोसांबींचे लिखाण सर्व इंग्रजीतच आहे काय ? त्यांच्याबद्दलची विकी एंट्री त्यांच्या मार्क्सिस्ट विचारांवर प्राधान्य देते. हे सर्वसाधारणपणे खरे मानायचे काय ?

लेखनशैलीबद्दल एकूण वर मुक्तसुनीत यांनी दिलेल्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. गुंतागुंतीचे विचार असले तरी लेखिकेच्या चिंतनामुळे लेख बांधील आणि एकजिनसी झालेला आहे. अशा वैचारिक लेखनाचे उत्तम उदाहरण ठरावे.

- - -
उत्पादकतेच्या संदर्भाने कोसंबींनी विश्लेषण केले आहे, ते त्यांनीच लेखाच्या शीर्षकात सांगून मर्यादित केले आहे. लेखाचे शीर्षक आहे "Social and Economic Aspects of the Bhagavadgita". विषय मर्यादित असल्यामुळे गीतेचे सामाजिक, विशेषतः आर्थिक परिणाम त्या लेखाचा चर्चाविषय होता. (गीताकर्त्याला काय महत्त्वाचे वाटले, हा त्यांचा चर्चाविषय नाही. पण दुसर्‍या कोणाचा तो चर्चाविषय नसावा, असाही त्यांचा आग्रह नाही. "कॅन्सरचे यकृतावर दुष्परिणाम" शीर्षकाचा लेख कोण्या डॉक्टराने लिहिला, तर त्याने "कॅन्सरच्या मेंदूवरील परिणामांबाबत का लिहिले नाही?" असा दोष देणे अप्रस्तुत आहे.) भगवद्गीतेचा साहित्यिक दर्जा अव्वल आहे, आणि भगवद्गीतेने अनेक बुद्धिमान लोकांना स्फूर्ती दिली हे त्यांनी पुन्हापुन्हा सांगितले आहे. त्यांचा मुद्दा आहे, की प्रत्येकाच्या आधीच ठरलेल्या कार्यपद्धतीला मानवेल अशी विसंवादी स्फूर्ती गीतेने दिली.

म्हणूनच चित्रा यांचा गांधी-आश्रमातील स्फूर्तीबद्दलचा मुद्दा कोसंबींना मान्यच असावा. चित्रा यांचा असहमतीचा हा मुद्दा फरकाचे स्थान नाहीच, असे मला वाटते. गांधींच्या आश्रमातील अहिंसेचे आणि टिळकांच्या जहाल कर्मयोगाचे रहस्य गीता बनली - अशा या गीतेचा आशय संदिग्ध असावा, वाचणार्‍याला हवे ते रूप धारण करणारा मायावी बहुरूपी आशय असावा हे कोसंबींचे मत आहे.

(चित्रा म्हणतात : ) आणि याचा उपयोग करावा, का करू नये किंवा कसा करावा याबद्दलच्या निर्णयाचे स्वातंत्र्यही माझ्याकडे आहे तेही उत्तमच आहे असे वाटते.

गीतेचा उपयोग दैवी आणि प्रश्नातीत नीतिवाङ्मय म्हणून करण्यास कोसंबींचा विरोध या उद्धरणात दिसून येतो - "not... ethical system sandwiched with pure superstition." मला वाटते, चित्रा जरी थोडी असहमती दाखवत असतील, तरी त्यांचे वागणे मात्र कोसंबींनी सांगितल्याप्रमाणेच तंतोतंत आहे.

स्त्रीशूद्रादिकांना समान मनुष्यत्व देणे, ही चित्रा यांची आधुनिक आणि सुयोग्य नैतिक चौकट आहे. या चौकटीला धक्का न देणारे गीतेतील भागच त्यांनी "स्वतंत्रपणे" उपयुक्त मानले आहेत. गीतेतील तपशिलांना प्रमाण मानून स्त्री-शुद्रादिकांच्या समानतेच्या नैतिक पायाला धक्का लावायचे स्वातंत्र्य चित्रा स्वतःही घेत नाहीत, आणि दुसर्‍या कोणालाही देणार नाहीत. (असे मला वाटते. माझे तरी वागणे तसे आहे. माझ्या आजीने "चातुर्वर्ण्यं मया सृष्टं"चा तिला स्वतःला पटणारा अर्थ लावून काही म्हटले, तर तसे करण्यास आजच्या समाजात तिला स्वातंत्र्य नाही, नसावे.) त्यामुळे गीतेचा उपयोग करायचे हे जे "स्वातंत्र्य" आहे, ते मर्यादित आहे. गीता "दैवी" म्हणून त्यातून समानतेला शह देणारी नैतिक चौकट मिळवण्याचे स्वातंत्र्य नाही.

गीतेतील जे तपशील कुरूप नाहीत, सुंदर आहेत, ते चित्रा यांनी घट्ट आधुनिक नैतिक पायावर चढवलेले अलंकार आहेत. असे असल्यामुळे त्यांनी नैतिक चौकट गीतेकडून घेतली नाही. नव्हे,तर गीतेतील सुंदर तेवढ्या तपशिलांना आपल्या आधीच मजबूत नैतिकतेवर सुशोभित व्हायची परवानगी दिलेली आहे. त्यांनी गीतेच्या सौंदर्याचा सुयोग्य आस्वाद घेतला आहे. "Such books can be enjoyed for their aesthetic value" - या कोसंबींच्या वचनाचा तसेच "ethical system sandwiched with pure superstition" त्यागण्याच्या जरुरीचा चित्राही पुरस्कार करत आहेत, असेच दिसते.

त्यामुळे त्यांची असहमती केवळ भासमान आहे, काही शब्दप्रयोगाबद्दल आहे, अर्थाबद्दल नसावी असे मला वाटते. चित्रा, तुमच्या मताबद्दलचे माझे हे वाचन योग्य आहे काय? तुम्ही समानतेला धक्का देण्यासाठी गीतेचा उपयोग करायचे स्वातंत्र्य असण्याबद्दल "उत्तम" म्हणत नाही आहात ना - तुमचा लेख मी ठीक वाचला ना?

- - -

गीतेच्या ओळखीबद्दल माझा अनुभव चित्रा यांच्या अनुभवाशी अगदी उलट्या क्रमाने असला तरी थोडासा समांतरही आहे.

गीतेचे अनेक अध्याय लहानपणी आईने मला शिकवले, ते पूर्वी मुखोद्गत होते. हे सोपे संस्कृत ग्रंथ समजून वाचावेत, घोकू नयेत, असे आईचे धोरण होते, ते किती छान होते! गीतेतील शब्दार्थ समजण्यापुरते, वाक्यांचा अन्वय लावण्यापुरते संस्कृत तरी आम्हा मुलांना कळले पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. तिच्या संस्कारांमुळे लहानपणी एक तात्त्विक ग्रंथ म्हणून मला गीतेबद्दल फार आदर होता.

गीताईबद्दल मात्र फारसे प्रेम वाटले नाही, हे एका प्रकारे बरे झाले. हे भाषांतर खूपच प्रतिभेचे काम आहे, खरे. तरी विनोबांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर अनुष्टुभांत केले हा काव्यचमत्कृतीचा नको इतका हव्यास होता. छंद/वृत्त पाळण्यासाठी विनोबांनी अर्थाबद्दल हेळसांड केली आहे. कथाकथनाच्या भागात सर्व ठीकच आहे. "विशाळ रचिले त्याने, पहा पांडवसैन्य हे..." (१.३) वगैरे फेरफार केल्यामुळे अर्थ फारसा बदलत नाही.
पण तात्त्विक विवेचनात निष्काळजी भाषांतरामुळे खूप घोटाळा होऊ शकतो. इथे एकच उदाहरण :
पण २.५५ : ...आत्मनि एव आत्मना तुष्टः...
याचे भाषांतर
...आत्म्यात चि असे तुष्ट...
करणे म्हणजे फारच निरर्थक.
"आत्मन्"चा संस्कृतात सामान्य अर्थ "स्वतः" असा होतो, आणि विशेष अर्थ "soul-आत्मा" असा होतो. संदर्भ आणि वाक्यप्रयोग बघितला, तर कुठला अर्थ घ्यायचा यात बहुधा कुठलाच विकल्प नसतो. मराठीत मात्र "आत्मा" शब्दाचा अर्थ जवळजवळ नेहमीच "soul-आत्मा" असा होतो.
या श्लोकाचा "स्वतः-करून स्वतःमध्येच तुष्ट" असा अर्थ संस्कृतात बर्‍यापैकी स्पष्ट आहे. पण विनोबांचे भाषांतर वाचून "soul-आत्मा"बद्दल काही बोलले जात आहे, असा कोणाचा गैरसमज होऊ शकतो. म्हणजे सोपी-मराठी म्हणून समजायला गीताई कोणी घ्यावी, तर ती भाषांतराच्या वैचित्र्यामुळे मूळ संस्कृतापेक्षाही क्लिष्ट झालेली! ज्ञानेश्वरांनी समश्लोकी भाषांतराच्या विचित्र साखळदंडाने ज्ञानेश्वरीला जोखडले नाही हे उत्तम. आणि स्वच्छ "भावार्थदीपिका" म्हटले. ज्ञानेश्वरांनी स्व-तपश्चर्येने मिळवलेला अर्थ ज्ञानेश्वरीत आहे, हे सर्वांना दिसते. आपण जसे-च्या-तसे भाषांतर वाचत आहोत असा गैरसमज कोणाचाही होत नाही.

लहानपणी (उच्च-माध्यमिक/कॉलेज वयात) मी "गीतेमधला ज्ञानयोग" "गीतेमधला कर्मयोग" वगैरे कोण्याकोण्या स्वामींची पुस्तके वाचायचा प्रयत्न केला. गीतेमध्ये वेगवेगळ्या दर्शनांचे वर्णन केले आहे - पण त्यांच्यात नेमका काय फरक आहे हे कळता कळेना. दा. ध. कोसंबींच्या लेखातील हे पुढील वाक्य मला स्वानुभवाने पटते -

"Thus, we have a brilliant (if plagiarist) review-synthesis of many schools of thought which were in many respects mutually incompatible. The incompatibility is never brought out; all facets are simply facets of the one divine mind."
"अशा प्रकारे काही बाबतीत परस्पर विसंगत असलेल्या अनेक दर्शनांचे सारांश-संश्लेषण प्रखर बुद्धिमत्तेने (थोडे उसनवारीने का होईना) केलेले आपल्याला दिसते. पण ही विसंगती कधी उघड केली जात नाही; सर्वच एका दैवी मानसाचे केवळ पैलू आहेत."

पुलांच्या वाचनानंतर "अपल्याला समजले" म्हणून आपण वाचक मूळ स्त्रोत समजण्याचा त्रास घेत नाहीत, हे चित्रा यांचे मत चाणाक्ष आहे. गीता-रचणार्‍याने "सगळी दर्शने एकच" प्रासादिक श्लोकात म्हटले आहे. तेव्हा अगदी तशाच प्रकारे आपण वाचक मूळ स्त्रोताकडे जायचा आळस करतो. सांख्यांचे, वेदान्त्यांचे काही काही वेगवेगळे मत असेल, ते समजायचा आपण प्रयत्न करत नाही. गीतेच्या रचनाकाराने "सगळे एकच" म्हटले, म्हणून आपणही "सगळे एकच" असे वृथा आत्मविश्वासाने ठोकून देतो.

हे पुढे कधीतरी मला असह्य झाले. आता खूप वर्षे लागलीत तरी ती दर्शने समजून घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. गीतेतील दहावीस श्लोकांच्या सोप्या सारांशाच्या आधारावर "ती दर्शने सगळी एकम् सत् आहेत हे आपल्याला पटले" हे म्हणण्याचे धाडस मला करवत नाही. भारतीय दर्शने कमालीची विचारवंत आहेत, तशी बरीच वेगवेगळी आहेत, असा विचार माझ्यात हळूहळू दृढ होत जातो आहे.

"गीता एकटी पुरे (दर्शने आणि उपनिषदे वेगळी समजायची गरज राहिली नाही)" या लहानपणाच्या आदराला तडा गेलेला आहे.

चित्रा's picture

1 Jun 2009 - 10:43 pm | चित्रा

प्रथम इथे काही प्रतिसादांमध्ये जे विचार मांडले गेले आहेत ते माझ्या सद्य लेखाच्या संदर्भात वेगळे वाटल्याने माझ्या मनातील विषय साधारण स्पष्ट करते: "एकम सत" हा माझ्या लेखनाचा विषय नाही. या लेखाचा विषय हा माझ्या अनुभवातील प्रभावशाली व्यक्तीमत्वांनी दाखवलेली दिशा (माझ्यासारखे अजाणते) लोक कशी नकळत स्विकारतात, आणि माझे (मी जशी वाढत गेले तसे ह्यात नक्की काय बदल होत गेले यासंबंधींचे) व्यक्तिगत अनुभव यासंबंधी काय आहेत ह्यासंबंधीचे मुख्यत्वे प्रकटन असा आहे. हेच दर्शन काय ते योग्य असे माझे मत नाही. त्यामुळे एकम सत सारख्या प्रश्नाचे उत्तर मी इथे देणे अवांतर होईल आणि गरजेचे नाही.

मूळ मुद्दे असे आहेत -

(1)उत्पादकतेच्या संदर्भाने कोसंबींनी विश्लेषण केले आहे, ते त्यांनीच लेखाच्या शीर्षकात सांगून मर्यादित केले आहे.

बरोबर आहे, पण कोसंबी यांनी हा लेख "मिथ अँड रिअ‍ॅलिटी" या पुस्तकात लिहीला आहे आणि त्याचा शेवट गीता हा त्यातील सौंदर्यस्थळे पाहण्यासाठी करता येऊ शकतो अशा सामंजस्यपूर्ण उपदेशाने केला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाची निरूपयोगिता या दृष्टीने त्यांना हा विषय मांडायचा आहे हा आहे. कोसंबी यांचे (कुठच्याही काळात) समाजाच्या दॄष्टीने गीता निरूपयोगी असणे (किंवा निरूपयोगी असण्याची शक्यता) पुढील पद्धतीने सांगितलेले आहे. लेखात कोसंबी यांनी म्हटल्याप्रमाणे "To treat all views tolerantly, and to merge them into one implies that the crisis in the means of production is not too acute" कोसंबी यांना गीता लिहीली गेली तेव्हाचा क्रायसिस खूप तीव्र वाटत नाही. म्हणून जेव्हा ती सांगितली गेली त्या काळात बहुदा गीतेची गरज नसल्याचे ते सांगतात. त्यानंतरच्या काळातही गीतेचा सामाजिक उपयोग शून्य, कारण कबीर, चैतन्य आदींना गीतेची गरज नाही; तसेच आर्थिक उपयोग शून्य, त्याने उत्पादन वाढले नाही ; जर काही उपयोग असला तर तो एवढाच की भक्तीमार्ग वाढला, मालकावरची एकेरी श्रद्धा वाढली असे म्हणणे. त्याकाळात कोसंबी यांच्या मते गीता निरूपयोगी ठरली (पूर्वीचा उपयोग शून्य आहे). तसेच "individual human perfection on a spiritual plane becomes much easier when every individual's material needs are first satisfied on a scale agreed upon as reasonable by the society of his day. ..... Science is at the basis of modern production and no other tools are in sight for satisfaction of man's needs" म्हणून सध्याच्या काळातील लोकांनीही गीता नाकारावी असे सुचवले आहे. दुसरीकडे अशा 'निरूपयोगी' तत्त्वज्ञानाने (अनेकांना) स्फूर्ती मिळाली हे ते नाकारीत नाहीत..

(२)त्यांचा मुद्दा आहे, की प्रत्येकाच्या आधीच ठरलेल्या कार्यपद्धतीला मानवेल अशी विसंवादी स्फूर्ती गीतेने दिली.

ही गोष्ट मान्य. पण येथे मला उपयुक्त अशा एका सॉफ्टवेअरचे घ्या जे गणिती प्रश्न सोडवण्यास मदत करते. मला या सॉफ्टवेअरच्या उपयोगी प्रणालींमधील जो भाग उपयुक्त वाटतो तो तुम्हाला वाटेल असे नाही. पण काही कामासाठी (मग तुमचे काम वेगळे आहे, माझे वेगळे आहे) ज्यात साधारणतः काही विवक्षित स्वरूपाच्या गणिती मॅनिप्युलेशनची गरज आहे त्यासाठी आपण ते विकत घेतले असेल, पण वापरताना त्यातील वरकरणी वेगळे भाग आपण वापरत असू. माझी हे सॉफ्टवेअर वापरण्यामागची स्फूर्ती वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, इतकेच नाही तर आपण दोघे त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढतो, कारण आपले डेटासेटस वेगळे आहेत, आणि प्रश्नच वेगळे आहेत. पण असे असले तरी आपल्या गरजेला हे सॉफ्टवेअर येते आणि आपण दोघे त्याचा पूर्ण वेगळा वापर करू शकतो. हे वरील प्रश्नाचे अगदी सुलभीकरण झाले तरी मला काय म्हणायचे आहे हे यावरून थोडे स्पष्ट होईल असे वाटते. ही स्फूर्ती( किंवा गरज म्हणा) विसंवादी आहे हे कोसंबी यांना खटकते असे माझे मत झाले. मला ते खटकत नाही याचे कारण त्याचा उपयोग मी कायद्याच्या जागी करीत नाही. त्यातून भारतीय कायदे बनावेत अशी अपेक्षा मी करीत नाही.

(३) गीतेचा उपयोग दैवी आणि प्रश्नातीत नीतिवाङ्मय म्हणून करण्यास कोसंबींचा विरोध या उद्धरणात दिसून येतो.. गीतेतील तपशिलांना प्रमाण मानून स्त्री-शुद्रादिकांच्या समानतेच्या नैतिक पायाला धक्का लावायचे स्वातंत्र्य चित्रा स्वतःही घेत नाहीत, आणि दुसर्‍या कोणालाही देणार नाहीत. ...
असे असल्यामुळे त्यांनी नैतिक चौकट गीतेकडून घेतली नाही. .. तर गीतेतील सुंदर तेवढ्या तपशिलांना आपल्या आधीच मजबूत नैतिकतेवर सुशोभित व्हायची परवानगी दिलेली आहे.

याबद्दल तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहे. असे स्वातंत्र्य मी कोणालाही (माझ्यात असे स्वातंत्र्य कोणास देण्याची शक्ती असल्यास) देणार नाही, कारण गीतेच्या पुढे जाऊन मी सध्या अस्तित्त्वात असलेला भारतीय आणि अमेरिकन नागरी कायदा मानते. गीता ही माझ्या दृष्टीने प्रश्नातीत नाही, तसाच अमेरिकन किंवा भारतीय कायदाही प्रश्नातीत नाही. गीतेने भारतीय संविधानाची जागा घ्यावी असे मला चुकूनही वाटत नाही; किंबहुना मी कुठचाच प्राचीन धर्मग्रंथ/नीतिग्रंथ याने आधुनिक कायद्याची जागा घ्यावी असे होण्याच्या विरूद्ध आहे. सध्या असलेल्या भारतीय (वा अमेरिकेत राहते आहे म्हणून अमेरिकन) कायद्याच्या चौकटीत बसेल तेच वर्तन मी सहसा योग्य समजते. जेथे ती चौकट ढिली करण्याची गरज समाजातील अनेकांना वाटते आहे तेथे तेथे शक्यतो अहिंसक आणि लोकशाही मार्गाने हे बदल घडवून आणण्याची प्रक्रिया व्हावी असे मी समजते. गीतेतला शूद्र आणि स्त्रिया, वर्णसंकर यावरून एखादी व्यक्ती आपले शूद्र, स्त्रिया आणि वर्णसंकर यासंबंधी मत बनवीत असली तर अशा व्यक्तीबद्दल मला ती घोर चूक करते आहे असे वाटेल. स्त्री-शूद्र आदींबद्दल मते बनवण्याची नैतिक चौकट मी गीतेकडून घेतली नाही, हे बरोबर. पण त्याचबरोबर गीतेच्या वाचनाचा काही ठिकाणी/कधीतरी मला माझ्या भावना संतुलित करण्यासाठी उपयोग झाला हे म्हणणे माझ्या दॄष्टीने ती काही प्रमाणात उपयुक्त असण्याचा पुरावा होण्यास पुरेसे ठरावे.

आता या लेखासंदर्भाने प्रश्न पडले- या लेखात कोसंबी देतात ते पुरावे तितकेसे ठोस नाहीत, असे माझे मत झाले (याचा अर्थ त्यांची मते टाकाऊ आहेत असा नाही, तर केवळ पुरावे पुरेसे नाहीत एवढेच मला वाटले). विशेषतः "The Gita furnished one scriptural source which could be used without violence to accepted brahmin methodology, to draw inspiration and justification for social actions in some way disagreeable to a branch of a ruling class upon whose mercy the brahmins depended at the moment" या वाक्याला त्यांनी पुरेसे पुरावे दिले नाहीत असे माझे मत झाले, तुम्हाला कोसंबी यांनी पुरावे दिले असे वाटते का? तसेच It could not possibly bring about any fundamental change in the means of production, nor could its fundamental lack of contact with reality and disdain for logical consistency promote a rational approach to the basic problems of Indian Society. " यातील हे fundamental lack of contact with reality मला विशेष कळले नाही. आदर्शांच्या कल्पना ही लॅक ऑफ रियालिटी आहे का? "the material needs could certainly be satisfied for all, if relations of production did not hinder it. " हे त्यांचे वाक्य कुठचाच आदर्श समोर ठेवत नाही का? मला नीट समजले नाही.

नितिन थत्ते's picture

31 May 2009 - 1:01 pm | नितिन थत्ते

गीतेची ओळख प्रथम शाळेतील गीताई वाचनाने झाली. त्यावेळी गीताईही समजण्याचं वय नव्हतं. तसंच गीताई हे गीतेचं भाषांतर आहे हेही माहीत नव्हतं. थोडे मोठे झाल्यावर आजोबांनी १५ वा अध्याय (संस्कृत) शिकवला (नंतर १२ वा). हेच अध्याय का शिकवले त्याची कल्पना नाही. (त्यांना १८ ही अध्याय पाठ होते). तेव्हाही अध्याय म्हणताना त्याचा ओ की ठो अर्थ कळला नव्हता.

नंतर कॉलेजमधून पास झाल्यावर गीतारहस्य म. ग्रं. सं मधून आणून वाचले. नंतर स्टेशनवर इस्कॉनवाले गीतेची पुस्तके विकत असत तेथून एक गीता आणून वाचली (इंग्रजीतून). मग गीताच प्रत्यक्ष वाचण्याचा प्रयत्न केला. त्यातून कोसंबी म्हणतात तशी गीता सबगोलंकार असल्याची अंधुक जाणीव झाली.

>>पुलंच्या वाचनानंतर "अपल्याला समजले" म्हणून आपण वाचक मूळ स्त्रोत समजण्याचा त्रास घेत नाहीत
सहमत. आणि ह्या गोष्टीचा फायदा प्राचीन काळापासून लोक घेत आहेत. भारतीय तत्ववेत्त्यांनी अनेकदा आपले म्हणणे जस्टिफाय करण्यासाठी 'वेदांत असे म्हटले आहे' किंवा 'मनूचेही असेच मत आहे' अशी विधाने केली आहेत. (गीतेनेही हे वेदांचे सार आहे असा क्लेम केला आहे असे वाटते).

>>गीतेच्या रचनाकाराने "सगळे एकच" म्हटले, म्हणून आपणही "सगळे एकच" असे वृथा आत्मविश्वासाने ठोकून देतो.

सहमत. सर्वांना (वेदांना, उपनिषदांना, दर्शनांना, गीतेला) एकच सांगायचे होते असे म्हणणे म्हणजे खरेतर कुणालाच (विशेष) काही सांगायचे नव्हते असेही होते.
(या वाक्याने काहींचा गैरसमज झाला म्हणून स्पष्टीकरण देत आहे. खरे म्हणजे वेदांनंतर उपनिषदांना आणि उपनिषदांनंतर दर्शने निर्माण करणार्‍या ऋषींना आधीच्या पेक्षा वेगळे सांगायचे होतेच. म्हणूनतर त्यांनी वेगळी निर्मिती केली होती. गीतेने सगळे एकच असे म्हणून सांख्यांना आणि इतर दार्शनिकांना वेगवेगळे असे काही म्हणायचेच नव्हते असे दर्शवले. असा माझ्या वाक्याचा अर्थ आहे. आपल्या रोजच्या जीवनात देखील आपण 'सर्व धर्म शेवटी एकच' अशा टाइपची विधाने करून -वाद टाळण्यासाठी- वेगळेपण मारून टाकण्याचा प्रयत्न करतोच.)

खराटा
(रंग माझा वेगळा)

लिखाळ's picture

31 May 2009 - 10:06 pm | लिखाळ

उत्तम लेख.
आवडला.
सर्वांचेच प्रतिसाद वाचनीय.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

नंदन's picture

2 Jun 2009 - 11:00 am | नंदन

लेख अतिशय आवडला. प्रवाही असला तरी 'फ्लो-ऑफ-कॉन्शसनेस' सारखे त्यातले मूळ सूत्र सतत जाणवत राहते.

पुलंचा मध्यमवर्गीय मराठी माणसावर पडलेला प्रभाव, त्यांचे कळत-नकळत स्वीकारले गेलेले तत्त्वज्ञान हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. 'आहे मनोहर तरी'मध्ये सुनीताबाईंनी या विषयावर थोडी टिप्पणी केली आहेच. एरवी आपल्यातल्याच एक आहे असे वाटणार्‍या, परंतु अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या कलावंताला सामान्य माणूस कसा दिलखुलासपणे स्वीकारतो अशा आशयाचा तो परिच्छेद आहे. तुम्ही दिलेलं लहानपणीच्या घराच्या प्रतिमेचं उदाहरणही अगदी समर्पक.

प्रा. कोसंबींचे लिखाण वाचलेले नाही, परंतु तुम्ही म्हणता तसं गीतेबद्दलचे पुलंचे विचार अथवा पिग्मॅलियनच्या अनुवादामागची स्फूर्ती याचा मूळ स्रोत सांगणे अवघड आहे. एक अंदाज बांधायचा झाला तर कोसंबींचं लेखन/विचार यांचा प्रभाव पुलंच्या लेखनावर पडला नसण्याची शक्यता मला अधिक वाटते. याचं कारण म्हणजे, तसं झालं असतं तर पुलंच्या इतर लेखनात - खासकरून व्यक्तिचित्रणात त्याचं थोडंफार प्रतिबिंब, उल्लेख पहायला मिळाले असते. अर्थात हा फक्त अंदाजच.

बाकी गीतेबद्दल प्रा. कोसंबींची मतं आणि त्यावर तुम्ही केलेले भाष्य हा लेखाचा उत्तरार्धही आवडला. 'परस्पर[विरोधी] मनोवृत्तीच्या सर्वच मंडळींना ज्या ग्रंथात आपला इच्छित अर्थ शोधणे सोयीस्कर होते ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे ही गोष्ट उघड आहे', हे निरीक्षण महत्त्वाचे वाटते. गीतेबरोबरच कदाचित सर्वसमावेशक बनलेल्या हिंदू धर्मावर आणि एकंदरीतच मानवी स्वभावात एकाचवेळी अस्तित्वात असणार्‍या अंतर्विरोधावर भाष्य करणारे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी