काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव. नंतर गोडबोले यांची स्वतःची शैली विकसित झाली तरी त्यांच्या इतर सामाजिक लेखनात पुलंचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर नसला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असावा असे वाटत राहिले. पुल यांची सामाजिक बांधिलकी आणि विचार ह्यांनी आजही समाजातील एक मोठा वर्ग प्रभावित आहे हे आजही त्यांच्या मॄत्यूनंतर इतक्या वर्षांनीही जाणवत राहते. या अशा पिढ्या घडण्यामागे त्यांच्या लेखनाचा, व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या बुद्धिमान पत्नी सुनीताबाईंचाही मोठा सहभाग होता. मीही इतर अनेकांप्रमाणेच लहानपणी पुलंच्या लेखनाची असंख्य पारायणे केलेली आहेत. आणि मला कल्पना आहे त्याप्रमाणे मराठी संकेतस्थळांवरा असलेला मोठा वर्ग हा या लेखनामुळे प्रभावित आहे.
आजही पुलंच्या लेखनातील अनेक विचार इतर अनेक मराठी लेखकांच्या लेखनातून डोकावत राहताना दिसतात, त्यांच्या प्रतिमा अजूनही मनात घर करून असतात. "तुझे आहे .." मधील वरील संवाद हे याचेच उदाहरण. कथेतील आचार्यांसाठी हातसडीचे तांदूळ, गाईचे तूप, गोमूत्र या गोष्टी मिळवण्यासाठी चाललेली धांदल आणि श्यामचे (खर्या) गीतेवर असलेले मूक प्रेम आणि दुसरीकडे या मोहावर विजय मिळवण्यासाठी चाललेली त्याची केविलवाणी धडपड, आचार्यांच्या अधःपतनाची कबुली आणि काकाजींचे सगळ्या मोहांच्या मध्ये राहूनही समाधानी असणे हे सगळे बर्याच जणांना आठवेलच. (नाकेल्या दाजी भाटवडेकरांचे दिलदार देखणे काकाजी लोकांवर प्रभाव पाडून गेले नसते तरच नवल). या संवादांनी मला तेव्हा भारून टाकले होते, आणि याचा परिणाम म्हणून असेल पण लहानपणी मी गीता कधी वाचली नाही. वाचली ती खूप उशीरा. आणि गीता म्हणण्यापेक्षाविनोबांची गिताई वाचली. तीही सासर्यांनी एका भेटीत गिताई आणली म्हणून. पुल हे एकेकाळी विनोबांच्या भूदानयात्रेमुळे अत्यंत प्रभावित झाले होते, त्यानंतर आणिबाणीच्या काळात "अनुशासन पर्व" प्रकरणामुळे ते दूर गेले होते असे वाचल्याचे आठवत होते. त्यामुळे अशा (भोंदू) विनोबांची गिताई काय वाचायची असा काहीसा तुच्छतेचा भाव मनात होता. यालाच आता मी पुलंचे गारूड म्हणते. पण माझ्या बाबतीत असे कधीकधी झाले आहे की एखाद्या मावशीच्या घराची लहानपणची आठवण येते तेव्हा ते खूप मोठे होते, खिडक्या मोठ्या रूंद होत्या असे आठवते. पण नंतर जाऊन पहावे तो ते घर माझ्या आठवणीतल्या घरापेक्षा लहान दिसावे असे काहीसे होते. खरे घडलेले असे असते की घर तेवढेच असते, मी फक्त मोठी झालेली असते. माझ्या बाळपणीच्या पायांना जे अंतर लांब वाटत असे ते आता तसे वाटत नाही. ते अंतर चारपाच ढांगांमध्येच मी पार करते. या नव्या अनुभवामुळे लहानपणीची घराची प्रतिमा आता पुसली जाते किंवा धूसर होते. असेच काहीसे याबाबतीत झाले असे म्हणता येईल. कारण काही असेल, पण मी गिताई वाचली. कदाचित याच नाटकात चतुर पुलंनी त्याला "अरे ती गीता फार मोठी आहे, आपण छोटी माणसे" अशा अर्थाचे काहीसे म्हटल्याचे आठवत होते (याचा अर्थ त्यांनी गीता वाचली असावी) म्हणूनही असेल. कदाचित माझ्या आयुष्यातल्या अत्यंत धांदलीच्या आणि अस्थिरतेच्या काळात मन:शांती मिळावी म्हणून मी ती वाचली असेल. पण माझा "हिंदू" धार्मिक ग्रंथ म्हणून वाचली नाही, एवढे निश्चित. तसेच माझ्या सासर्यांनी ज्या भक्तिभावाने गिताई वाचली असेल त्या भक्तिभावाने मी ती वाचली असे नाही. पण त्यामुळे माझ्या मनातल्या गितेबद्दलच्या, विनोबांबद्दलच्या कडवट प्रतिमा धुसर झाल्या इतके मात्र खरे. आजही गीताई मला पाठ नाही. अरे, आत्ता अमूक घडते आहे, आत्ता यावेळी हा श्लोक चपखल आहे, असे मला सुचत नाही. आजही मोह, माया, क्रोध इत्यादी विकार माझ्या मनावर मधूनमधून ताबा मिळवत असतात! पण हे पुस्तक वाचले नसते तर मी एका मोठ्या लेखनाच्या आस्वादाला मुकले असते असे मला वाटते. आणि एका भारतीय मनांवर प्रभाव पाडणार्या मुख्य विचारसरणीच्या ओळखीला मुकले असते असेही वाटते.
गीतेबद्दल नंतर मी बरेच काही वाचले. ते धार्मिक कारणांपेक्षा इतिहासाची आवड असल्याकारणाने. असेच वाचताना कुरूंदकरांनी कोसंबी यांच्यावर त्यांच्या गीतेवरील विचारांची ओळख करून देणारा एक लेख लिहीला आहे, तो नुकताच माझ्या वाचनात आला. ह्या लेखाप्रमाणे गीता हे परमेश्वराचे स्तवन आहे, आणि त्याची उपयुक्तता वरिष्ठांनाच केवळ आहे ही प्रो. दामोदर धर्मानंद कोसंबींची टीका. कोसंबी यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे हे व्यक्तिमत्व आहे. प्रो. कोसंबी यांचे बालपण गोव्यात गेले, अतिशय बुद्धिमान असा हा गणितज्ञ भारतात आणि अमेरिकेत शिकला, भारतातील त्यांच्या विविध क्षेत्रांमधील आणि संशोधन तसेच शिक्षण क्षेत्रातील अविरत कामामुळे, विविध विषयांमधील विशेषतः इतिहासकालीन रसपूर्ण लेखनामुळे आणि मार्क्सवादी विचारांमुळे ते त्यांच्या काळात अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली होते. पुलंवर त्यांचा प्रभाव होता की काय असे मला वाटते. गोव्याला कोकणी दर काही मैलांगणिक बदलते यावरून पिग्मॅलियन नाटक बसवता येईल अशी शक्यता असल्याचे त्यांनी लिहीलेले नुकतेच मला आढळले आणि पुलंना "ती फुलराणी" हे नाटक त्यावरून मराठीत करता येईल असे वाटले असावे असे वाटले. "In Goa it was possible in 1925 for a keen ear to emulate Bernard
Shaw’s Pygmalion-Higgins and to locate a person’s origin within five miles merely by his or her speech, which also gives away the speaker’s caste
or religion, status, profession and educational accomplishments to an observer who knows the locality." (संदर्भ इथे) यामुळे पुलंच्या इतर लेखनावर त्यांचा प्रभाव असावा का असे वाटले.
स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना (गाढवाशी त्याची तुलना करताना) पुलंनी ते फार गंमतीशीर केले आहे, आणि आजही त्या वर्णनाचा प्रभाव समाजातील एका मोठ्या वर्गावर आहे (मराठी मध्यमवर्गीय आणि मुख्यत्वे तिशीचाळीशीमधील लोकांवर). याआधीची आपल्या आईवडिलांची पिढी असा विचार बहुतांशी करीत नाही, कारण पुलंचे हे विचार त्यांच्यापर्यंत तसे पोचले नाहीत. तत्कालिन बराचसा शिक्षित मराठी कुमार आणि बालवर्ग मात्र आज तीस वर्षांनंतर पुलंचे विचार स्विकारतो असे दिसते आहे. पण हे विचार पुलंचे किती आहेत आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे किती आहेत, त्या व्यक्ती कोण असतील (सुनीताबाई सोडून), कोसंबी असू शकतील का असा एक विचार आला. पुल आणि कोसंबी हे दोघेही एकेकाळी पुण्याला फर्ग्युसनमध्ये शिकवत/शिकत (कदाचित एकाच वेळी असतील/नसतील). पण असे होणे अवघड वाटत नाही. कोसंबी यांचे लिखाण हे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे असल्याने (इंग्रजीमध्ये केलेले असल्याने) पुलंप्रमाणे प्रभाव हा पसरलेला नसावा तर केवळ मराठी विचारवंतांपैकी जे इंग्रजी वाचनही करीत असावेत अशा काही मराठी लेखक आणि विचारवंतांपर्यंत हे विचार पोहोचले आणि त्यांच्याकडून संस्कारित होत ते आपल्यापर्यंत आले असेही झालेले असू शकते. तरी पुलंच्या तुझे आहे मधले गीतेवरचे विचार हे कितपत कोसंबींसारख्या विद्वानाच्या प्रभावातून आले आणि किती विनोबांमुळे झालेल्या भ्रमनिरासातून आले हे कळणे अवघड आहे, पण पुलंनी स्थितप्रज्ञावरून केलेली नाटकापुरती गंमत ही बाकीच्या मंडळींच्या प्रतिमाविश्वात नक्की काय बदल करून गेली हे मी केवळ माझ्यावरून ताडू शकते: माझ्या बाबतीत मी गीतेला गांभिर्याने घेतले नाही. माझ्या मते पुलंमुळे लोकांसाठी काही गोष्टी सोप्या झाल्या, त्यातली एक म्हणजे न वाचता मते बनवणे. कोणी मला जर तयार माल आणून घरपोच देत असेल तर मी स्वत: जाऊन विकत आणण्याचे कष्ट का घेईन?! पण आपण विसरतो की पुल स्वतः भरपूर इंग्रजी, मराठी, वाचत होते, सर्व भाषिक मित्र गोळा करीत होते. स्वतः निरनिराळे अनुभव घेत होते. नेमके हेच माझ्यासारख्या लोकांनी केले नसावे. यात दोष पुलंचा नाही, आमच्या आळसाचा आहे. यात माझ्याबाबतीत बदल झाला तो माझ्या सासर्यांनी मला गिताई देण्यामुळे. जर का त्यांनी ती दिली नसती, तर मी ती स्वतःहून नक्कीच वाचायला गेले नसते आणि एका वेगळ्या उच्च दर्जाच्या अनुभवाला मी मुकले असते, हे निश्चित. आता हे करीत असताना मी धार्मिक आहे, का अश्रद्ध हा मुद्दा येत नाही. मुद्दा केवळ एवढाच आहे की मी एखादा विचार टाकून देताना नक्की मला त्याबद्दल काय माहिती आहे हा आहे.
खरे तर ज्या स्थितप्रज्ञदर्शनावरून पुलंनी नाटकात एक प्रसंग बेतला आहे त्या दर्शनाबद्दल कोसंबी यांचे मत असे आहे की हे दर्शन बुद्धावरून आले आहे तसेच गितेतली ब्रह्मनिर्वाणाची व्याख्या ही बौद्ध धर्मावरून आली आहे. कोसंबींच्या मते "तत्त्वज्ञानाची गरज आणि मार्गदर्शनाची गरज संघर्षकाळात असते. समृद्धीच्या काळाला मार्गदर्शनाची गरजच नाही. गीता समृद्धीच्या काळाचे अपत्य आहे - याचा अर्थच हा की ज्यावेळी तिची अजिबात गरज नव्हती त्यावेळी या ग्रंथाची रचना झालेली आहे." (अवतरणचिन्हातील सर्व वाक्ये ही कुरूंदकरांनी मांडलेले कोसंबी यांचे विचार ' प्रो. कोसंबी आणि भगवद् गीता' या लेखातून). कोसंबींनी हे मुख्यत्वे कालनिश्चितीसाठी केले असावे असे माझे मत आहे, कोसंबी यांच्या मते गीता बुद्धानंतरची, गुप्त काळातील. माझ्या मते हेचुकीचे गृहितक आहे. समृद्धीचा काळ हा सर्वांसाठी एकाच वेळी नसतो, त्यामुळे समृद्धीच्या काळातही काहींना मार्गदर्शनाची गरज लागू शकत असावी असे गृहित धरायला हरकत नाही.
कोसंबी यांचा एक मुख्य आरोप असा होता की "परस्पर मनोवृत्तीच्या सर्वच मंडळींना ज्या ग्रंथात आपला इच्छित अर्थ शोधणे सोयीस्कर होते ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे ही गोष्ट उघड आहे". ते पुढे म्हणतात "आणि तरीही या ग्रंथापासून सर्वांनी प्रेरणा घेतली त्याअर्थी या ग्रंथाची कोणती तरी उपयुक्तता असली पाहिजे हेही उघड आहे". "गीतेचा आधार या मंडळींना का घ्यावासा वाटला?" या प्रश्नाचे उत्तर देताना (आणि उपयुक्तता विशद करताना) कोसंबी म्हणतात: " याला माझे उत्तर असे आहे की जाती व्यवस्थेची चौकट अमान्य न करता प्रस्थापित ब्राह्मण तर्कशास्त्राच्या आधारे प्रस्थापित समाजव्यवस्थेतील एखाद्या घटनेविरूद्ध बंड करताना वापरता येईल, ज्यातून प्रेरणा घेता येईल, ज्यातून समर्थन घेता येईल असा गीता हा एकच श्रुतिग्रंथ होता. इतर सर्व उपनिषदे आणि श्रुतिग्रंथ आपल्याला हवा असलेला अर्थ काढून दाखवण्यासाठी उपयोगी पडणारे नव्हते. इतर ग्रंथांचे अर्थ निश्चित होते. जातिव्यवस्था मान्य केल्यानंतर उरलेल्या सर्व प्रश्नांवर गीता अनिश्चित होती हे तिच्या प्रामाण्याचे सर्वात मोठे कारण आहे". (त्यांचे मूळ वाक्य असे आहे: (Practically anything can be read into the Gita by a determined person without denying the validity of a class system . The Gita furnished one scriptural source which could be used without violence to accepted brahmin methodology, to draw inspiration and justification for social actions in some way disagreeable to a branch of a ruling class upon whose mercy the brahmins depended at the moment". (मिथ अँड रिएलिटीमधून).)
दुसर्या ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की "वरिष्ठ वर्गाच्या हितासाठी ब्राह्मणांनी केलेला हा उद्योग" आहे (वरिष्ठ वर्ग म्हणजे सुभेदार, सरंजामदार, राजे, सामंत असा वर्ग - त्यांच्या मते the lower classes were a necessary audience and the heroic lay of ancient war drew them to the recitation .. the Sanskrit language was convenient if kept simple because the Prakrits were breaking apart in far too many regional languages, Sankrit language was also the language the upper classes had begun to use more and more .. The buddhists had begun to ignore the Teachers injunction to use the common people's languages -they too adopted Sanskrit).
तसेच त्यांनी म्हटले आहे की हा उद्योग "त्यानंतर तरी फारसा लोकप्रिय ठरलेला दिसत नाही" आणि गीतेतून कोणी प्रेरणा घेतली नाही (उदा. शीख चळवळ, गीतगोविंद, वैष्णव चळवळ यांना, तसेच कबीर-चैतन्य यांना गीतेचा आधार घेण्याची गरज लागली नाही. -कुरूंदकर/कोसंबी), गीतेच्या उपयुक्ततेबद्दल कोसंबी त्यांच्या मिथ अँड रिअॅलिटी या पुस्तकात म्हणतात, "It could not possibly bring about any fundamental change in the means of production, nor could its fundamental lack of contact with reality and disdain for logical consistency promote a rational approach to the basic problems of Indian Society. " हे म्हणणे मला पटत नाही. कोसंबींना जे काम (उत्पादन) महत्त्वाचे वाटते तशी गीताकर्त्याला वाटलेच पाहिजे असे नाही. जेव्हा मला मनाला शांतता हवी असते तेव्हा मी गीता वाचणे हा एक माझ्यापुढे असलेला पर्याय असू शकतो, जेव्हा मला एखादा नवीन तंत्रविषयक सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असते तेव्हा मी जाऊन त्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचेन. तसेच वर उल्लेखलेल्या चळवळी नसतील पण गांधीजीच्या आश्रमांमध्ये गीतापाठ होत असत, त्यांच्या दॄष्टीने समाज एकत्र करण्याचा, घडवण्याचा तो एक मार्ग होता असे मला वाटते. आणि त्याहीपुढे जाऊन माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की गीता बर्याचशा बाबतीत उपयुक्त आहे. त्या वाचनाने मी थोडी अधिक समृद्ध झाले.
असे असले तरी कोसंबींच्या या लेखनामागे त्यांची काही थेट भूमिका होती, त्यांनी ती कोणासाठीही बदलली नाही, आणि जे काम केले ते बुद्धीचा कस लावून, अत्यंत तळमळीने आणि ध्येयपूर्वक केले याबद्दल आणि त्यांच्या हेतूंबद्दल शंका न येईल असेच त्यांचे चारित्र्यपूर्ण वर्तन राहिले.
कोसंबींचे एक मत मला मान्य झाले ते असे : " विज्ञानाने आपल्या संशोधनाचा वापर करताना समाजहित नजरेआड करून चालणार नाही इतके म्हटले तरी चालण्याजोगे आहे. या नव्या युगाच्या उभारणीसाठी गीता आणि बायबलकडे जावे लागत नाही. हे ग्रंथ आता शुद्ध वा़ड्मयीन आस्वादाचे विषय मानले पाहिजेत." गंमत म्हणजे दुसरीकडे सावरकरही तेच म्हणतात. " ज्या मनुष्याला धर्माचे एक दूरद्वनी - यंत्र बनायचे नसेल, माणूस म्हणून स्वतःचे बुद्धिनिष्ठ मत हवे असेल, त्याने शब्दनिष्ठेला उच्छेदून वेद-अवेस्ता, बायबल-कुराण हे सारे आदरणीय नि अभ्यसनीय पण निव्वळ मनुष्यकृत ग्रंथ आहेत असे ठाम मत ठरवून त्यांस इतर कोणात्याही मनुष्यकृत ग्रंथाप्रमाणेच सादर अभ्यासावे ... जे मनुष्यहितकारक ते आचरावे; जे आज अनुभवांती अडाणी, टाकाऊ आणि बुद्धिशून्य ठरते ते साफ सोडावे". यादृष्टीने पहायला गेले तर गीतेतील चातुर्वर्णाची संकल्पना, स्त्री, शूद्र, यांना पाप योनी म्हणणे (यांना पापयोनी म्हटले आहे का पापयोनी ही एक अजून तळाची योनी आहे त्याबद्दलही मतांतरे आहेत असे वाचले) आणि गुण/कर्मपरिपाक म्हणून चातुर्वर्णाची कल्पना प्रस्तुत केली एवढे दोन मुख्य दोष सोडले तर गीतेतील इतर उपदेश म्हणा, किंवा अध्याय हे मानवी गुणविशेष, अंतिम ध्येय काय असावे (गीता-कर्त्यांच्या मते) आणि निर्णय आणि त्यांचे परिणाम यांवर बरेच उपयुक्त भाष्य करतात असे मला वाटते. माझ्या मते त्यात अर्जुनाने काय करावे याबद्दल थोडीफार संदिग्धता ठेवली आहे ते चांगलेच आहे, मोकळेपणाला पोषकच आहे. आणि याचा उपयोग करावा, का करू नये किंवा कसा करावा याबद्दलच्या निर्णयाचे स्वातंत्र्यही माझ्याकडे आहे तेही उत्तमच आहे असे वाटते.
वाचने
4827
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा - परखड तरी आर्द्र
चित्रावैन
चित्रा,
लेख आवडला.
छान !
अप्रतिम!
लेख आवडला !
धन्यवाद,
उत्तम वैचारिक लेख चित्राताई!
माझ्या
लेख
लिखाण
गीतेबद्दल अनुभवक्रम काहीसा वेगळा, काहीसा समांतर
चित्रा और गीता!
In reply to गीतेबद्दल अनुभवक्रम काहीसा वेगळा, काहीसा समांतर by धनंजय
गीतेची ओळख
उत्तम
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी