शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले,
बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत...
खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी,
भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत...
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे,
राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत...
धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली,
सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत...
तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे,
पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत...
भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी,
सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...
ऋतूचक्राच्या या खुणा, फ़िरूनी येईन पुन्हा पुन्हा,
खेळ चाले हा अनंत, मी वसंत मी वसंत...
- प्राजु
दिगंत - क्षितिजरेखा..
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 8:28 pm | यशोधरा
>>ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...>>
हे खास!
>>भरून गेली किल्बिल सारी>>> आसमंती किलबिल खुलते असं केलं तर? चूकभूल क्षमस्व. :)
23 Apr 2009 - 8:47 pm | जयवी
अप्रतिम काव्य !!
अतिशय सहज उतरलीये गं....... :)
23 Apr 2009 - 8:54 pm | दशानन
अप्रतिम काव्य !!
अतिशय सहज उतरलीये
थोडेसं नवीन !
23 Apr 2009 - 9:25 pm | क्रान्ति
अप्रतिम वसंतोत्सव! सुरेख लिहिलीस प्राजु.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
23 Apr 2009 - 9:47 pm | चन्द्रशेखर गोखले
कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !
23 Apr 2009 - 9:47 pm | चन्द्रशेखर गोखले
कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !
23 Apr 2009 - 10:03 pm | बेसनलाडू
आवडली.
बैरागी पिंपळ आणि भ्रमराला ना आज उसंत ही ओळ सर्वाधिक आवडली.
(निवांत)बेसनलाडू
24 Apr 2009 - 1:15 am | केशवसुमार
कविता आवडली..
बैरागी पिंपळ आणि भ्रमराला ना आज उसंत ही ओळ सर्वाधिक आवडली.
केशवसुमार
26 Apr 2009 - 9:54 pm | लिखाळ
बैरागी पिंपळ आणि भ्रमराला ना आज उसंत ही ओळ सर्वाधिक आवडली.
बेलाशी सहमत.
फार सुंदर कविता. आवडली :)
-- लिखाळ.
23 Apr 2009 - 10:32 pm | अवलिया
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत
+१
बाकी मस्त आहेच
--अवलिया
23 Apr 2009 - 10:38 pm | शितल
मस्त काव्य रचना . :)
हदयी वसंत फुलला.:)
26 Apr 2009 - 2:46 pm | टारझन
होना ... आणि प्रेमास रंग आले =))
प्राजू ताई.. कविता झकास !!
23 Apr 2009 - 10:42 pm | संदीप चित्रे
आहे कवितेचा :)
>> ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे,
राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत...
>>
या ओळी विशेष आवडल्या.
सुवर्णाचे नाजूक तुरे ही कल्पना तर खासच आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
23 Apr 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर
वसंतोत्सवाची सुरेख कविता..!
प्राजू आजकाल लै फार्मात आहे, तिची लेखणी अशीच प्रसन्नपणे चालत राहो हीच शुभेच्छा! :)
आपला,
(वसंतप्रेमी) तात्या.
24 Apr 2009 - 12:41 am | मीनल
सहमत
मीनल.
24 Apr 2009 - 12:10 am | नंदन
बैरागी, ध्यानस्थ पण सळसळत्या मनाच्या पिंपळाची प्रतिमा खूप आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Apr 2009 - 1:33 am | अनामिक
प्राजु तै कडून आणखी एक सुंदर कविता!!
-अनामिक
24 Apr 2009 - 11:59 am | शक्तिमान
प्राजूताईन्ची गाडी सुपरफास्ट चालू आहे !
लेख काय, कविता काय, चौफेर फटकेबाजी सुरु आहे.
मस्तच!
24 Apr 2009 - 12:13 am | समिधा
खुप सुरेख सादर केला आहेस कवितेतुन वसंतोत्सव
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
24 Apr 2009 - 2:40 am | दिपाली पाटिल
खुप च छान आहे कविता.
दिपाली :)
24 Apr 2009 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
अ प्र ति म च !
मस्त लिहिले आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
25 Apr 2009 - 6:12 am | श्रीकृष्ण सामंत
सुंदर अति सुंदर काव्य.आवडलं.
कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !
इति...
ह्या कुतूहलाचं उत्तर मला असं वाटतं,ते कसं ते,
(सांगत्ये) सांगतो ऐका!
उघडून गोदाम शब्दांचे
ती मांडणी सुरेख करीते
शब्दां मागून शब्द येती बळे
ते तिला कसे ते नकळे
प्रतिभा उरी धरूनी
ती गीत लिहित जाते
हे भाव स्वप्न अपुले
साकार ती करीते
म्हणून म्हणतो,
नकां विचारू....
कारण तिच्या....प्रेरणेचे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
25 Apr 2009 - 9:28 am | बिपिन कार्यकर्ते
एक अतिशय सहज आणि अप्रतिम कविता.
अगदी जळात पाय टाकून बसलेला औदुंबर आठवला. ही उपमा अतिशयच छान आहे.
बिपिन कार्यकर्ते
25 Apr 2009 - 1:20 pm | स्वाती दिनेश
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
अगदी जळात पाय टाकून बसलेला औदुंबर आठवला.
अगदी अगदी..
स्वाती
26 Apr 2009 - 2:54 pm | अविनाशकुलकर्णी
कविता छान आहे..वसंत वसंत..क्या बात है...
27 Apr 2009 - 10:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
मलाही याच ओळी आवडल्या !
-दिलीप बिरुटे
27 Apr 2009 - 10:43 pm | चतुरंग
बैरागी पिंपळ मनात सळसळला आणि एक नवीन पद देऊन गेला :)
नवनवोन्मेष चाले, प्रतिभेचे द्वार खुले
कविगण प्रतिभावंत, मी वसंत वसंत!
चतुरंग