तारखेवरून वार

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in जनातलं, मनातलं
22 Apr 2009 - 11:33 pm

खुप वर्षांपुर्वी दुरदर्शन वर ज्ञानदीप का काहिश्या कार्यक्रमात एक वल्ली आली होती.
ह्या महाशयांना म्हणे सर्व वर्षांचे कॆलेंडर पाठ होते.
समोर बसलेला श्रोतृगण ह्यांना तारखा सांगत होते अन हे धडाधड त्यादिवशी वार कोणता हे सांगत होते.
दोनेक वेळा हे गुरुजी चुकले देखील परंतु सुत्रसंचालकाने कशीबशी वेळ मारून नेली होती.
परंतु त्या माणसाच्या ह्या सामर्थ्याचे आम्हाला त्यावेळी फ़ारच कौतुक वाटले होते.

परंतु पुढे मागे ह्या तारखे वरून वार ओळखण्याच्या फ़ॊंर्म्युला समजला अन आम्हाला परम आनंद जाहला.

तर मंडळी विषय असा होता कि

कुठल्याही तारखेवरून त्या दिवशी वार कोणता होता हे कसे ओळखायचे?

(अर्थात काहि जणांना हे माहित असेलहि परंतु ज्यांना माहित नाहि त्यांच्या करिता हा खटाटोप.)

तर त्याची रीत हि पुढील प्रमाणे.

प्रत्येक महिन्याकरीता काही स्थिरांक ह्यात पकडलेले आहेत.

ते असे पाठ करायचे

एचाचा शुदोपा शुतीस एचास.

म्हणजेच

जानेवारी -ए (१)
फ़ेब्रुवारी- चा (४)
मार्च- चा(४)

एप्रिल -शु (०)
मे- दो (२)
जुन -पा(५)

जुलै- शु (०)
ऒगस्ट- ती(३)
सप्टेंबर- स (६)

ऒक्टोबर- ए (१)
नोव्हेंबर- चा (४)
डिसेंबर- स (६)

आता तारखे कडे वळु यात.

समजा
आपल्याला १५ ऒगस्ट १९८५ साली कोणता वार होता हे कॆलेंडरशिवाय पहायचे असेल तर

त्याची रीत हि पुढील प्रंमाणे.

१.सर्व प्रथम हि तारीख ज्या वर्षात आहे त्याचे शेवटचे दोन अंक घ्या.
इथे ८५ हे शेवटचे दोन अंक आहेत.

२.ह्या आकड्याला १.२५ ने गुणा.
उत्तर येईल = १०६.२५

ह्यातील दशांश चिन्हा पलीकडील भाग सोडून द्या.
राह्तील =१०६

३. ह्या मध्ये जी तारीख आहे तो अंक मिळवा.
उत्तर आहे= १०६+१५=१२१

४. ह्या उत्तरात ही तारीख ज्या महिन्यात आहे त्याचा स्थिरांक मिळवा.
उत्तर= १२१ + ३
=१२४

५. ह्या उत्तराला ७ ने भागा व बाकि किती राहते ते पहा
=१२४/७ (रिमेंडर)=५

जेवढी बाकी राहील त्याप्रमाणे वार हे पुढील क्रमाने येतील

०- शनिवार
१-रविवार
२-सोमवार
३-मंगळवार
४-बुधवार
५-गुरुवार
६-शुक्रवार

इथे बाकी ५ राहते म्हणुन
१५ ऒगस्ट १९८५ साली वार हा गुरुवार होता.

समजा हि तारीख लीप वर्षात असेल तर?
हि तारीख २९ फ़ेब्रुवारी नंतर असेल तर वरच्या रिती मधे काहिहि फ़रक पडत नाही.
परंतु हि तारीख जर १ जानेवारी ते २९ फ़ेब्रुवारी च्या मधे असेल तर शेवटचा भाग देण्यापुर्वी उत्तरातुन
१ वजा करावा.
व उत्तराला ७ ने भाग देउन आलेल्या बाकी वरून वरिल प्रमाणे वार पहावा.

एकदा का ह्या सुत्रावर हात बसला कि काहि सेकंदातच तुम्ही एखाद्या तारखेवरून त्या दिवशी असलेला वार ओळखु शकता.

मित्रहो हे सुत्र वापरून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना,मित्र परिवाराला तुमच्या प्रगाढ बुध्दीमत्तेची चुणुक दाखवु शकता.;)

महत्वाचे.
हे सुत्र मी बनवलेले नाहि.
ह्या पध्दतीची मर्यादा एवढीच आहे कि हे सुत्र फ़क्त मागच्या शतकाला लागु पडते.
हे सुत्र वापरून ह्या शतकातल्या तारखांचा वार ओळखता येत नाही.
ह्या शतकातल्या तारखांचा वार ओळखण्यासाठी कोणाकडे काहि सुत्र असेल तर ते इथे नक्की द्यावे.
तसेच माझ्या कडे ह्या सुत्राचे शास्त्रीय स्पष्टीकरण नाहि आहे.
मध्यंतरी मी ह्या सुत्राचे पृथ्थकरण करावयाचा प्रयत्न केला होता.
जसे महिन्यानुसार दिलेले आकडे (स्थिरांक) ह्या मागचे काय कारण असावे.
तसेच स्थिरांक ह्या शतका करिता बनवता येतील का?

परंतु इतर काहि व्यापांमुळे तो अभ्यास हि मागे पडला.
इथे कोणाला काहि सुचले तर जरूर सुचवा.

अभिज्ञ.

विज्ञानप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Apr 2009 - 11:38 pm | प्राजु

मजेशीर आहे रे हे!
मस्तच.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

22 Apr 2009 - 11:53 pm | विकास

मजेदार प्रकार आहे. फक्त ते तोंडी करून उत्तर देताना चूक झाल्यास उगाच तोंड पोळले जाईल ;)

अशा अजुनही युक्त्या माहीती करून घेयला आवडतील.

अवांतरः
मधे मला काही हजार तारखा असेलेला विदा हा वारांवरून विश्लेषणासाठी वापरायचा होता. तेंव्हा लक्षात आले की एक्सेलमध्ये (अथव गुगल डॉक्स मधे) त्यातील एक "सेल" घेऊन त्याचा "फॉर्मॅट" "कस्टम" ठरवून "dddd" करायाचा! झाले तो दिवस येतो. मग ती सेल कॉपी करून खालच्या तारखांमधे "पेस्ट स्पेशल फॉर्मॅट ओन्ली" केले की झाले!

विसोबा खेचर's picture

22 Apr 2009 - 11:59 pm | विसोबा खेचर

येस्स! मलाही हे सूत्र माहीत होतं. अनेक वर्षापूर्वी एकदा मटामध्ये आलं होतं!

तात्या.

चटोरी वैशू's picture

23 Apr 2009 - 6:46 am | चटोरी वैशू

अशाच प्रकारे... अजुन एक सुत्र आहे .... मनातील संख्या ओळ्खण्या साठी पण मला आता ते आठवत नाही ... कुणाला माहित असेल तर सांगावे....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Apr 2009 - 7:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कॅलक्युलेटरपेक्षा तो शोधणारा/बनवणारा श्रेष्ठ, तस्मात, तारखा-वार पाठ करणार्‍यापेक्षा अभिज्ञचं जास्त कौतुक.
(मला वाटत नाही मी हा फॉर्म्युला मुखोद्गत करेन; मला आजची तारीख नाही आठवत नीट!)

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

विनायक प्रभू's picture

23 Apr 2009 - 7:51 am | विनायक प्रभू

खी खि खी

यशोधरा's picture

23 Apr 2009 - 9:45 am | यशोधरा

मस्तच आहे की रे हे!

चिरोटा's picture

23 Apr 2009 - 2:06 pm | चिरोटा

एक प्रयत्न.
१ जानेवारी १९०० ला रविवार होता.नियमानुसार १ जानेवारी १९०२ ला सोमवार असणार्.मधे जर लीप वर्ष आले तर एक वार आणि पुढे.म्हणजे आता १ जानेवारी १९८५ म्हणजे रविवार +८५ दिवस झाले.बरोबर? त्यात लीप वर्ष चार वर्षातून एकदा.म्हणजे
१ जानेवारी १९८५ ला असणारा वार = रविवार +८५ दिवस्+१९८५ पर्यंत आलेल्या लीप वर्षान्ची सन्ख्या.बरोबर?

आता संगणकावरची दिनदर्शिका उघडा.तारीख घेवूया १ जानेवारी २००३.ह्या दिवशी बुधवार आहे.१ फेब्रुवारी २००३ ला शनिवार आहे.१ मार्च २००३ ला शनिवारच आहे.१ एप्रिल २००३ ला मंगळवार आहे,१ मे २००३ ला गुरुवार आहे....
म्हणजे १ फेब्रुवारीचा वार = १जानेवारीचा वार +३ दिवस(फेब्रुवारी =४)
१ मार्च चा वार = १ जानेवारीचा वार +३ दिवस(म्हणजे मार्च = ४)
१ एप्रिल चा वार = १ जानेवारीचा वार +६(म्हणजे एप्रिल = ७,सात दिवसांचा एक आठवडा म्हणून एप्रिल = ०)
१ मे चा वार = १ जानेवारीचा वार +१(म्हणजे मे = २)
.....
बहुदा वर हेच रीत वापरली असावी.
म्हणजे १५ ऑगस्ट १९८५ चा वार = रविवार +८५ दिवस्+१९८५ पर्यंत आलेल्या लीप वर्षान्ची सन्ख्या+१ ऑगस्ट पर्यंतचे दिवस+१५ दिवस. बरोबर?
(१.२५ ला गुणायचे म्हणजेच किती लीप वर्षे आली ते काढायचे.)

ह्या शतकासाठी वरिल पद्धत वापरायची असेल तर वारांचे स्थिरांक बदलावे लागतील.
समजा १५ ऑगस्ट २०११ ला कुठला वार येतो हे पाहयचे आहे.
तर- पद्धतीप्रमाणे- ११*१.२५ = १३.७५ ह्यातले केवळ १३ घेतले. १३+१५ = २८ + ३(महिन्याचा स्थिरांक) = ३१.
३१ला ७ ने भागले की बाकी ऊरली-३ . आता वारांचे स्थिरांक पाहिलेत तर रविवार =१ आहे.१जानेवारी १९०० ला रविवार होता म्हणून रविवार =१ असावा. ह्या शतकासाठी बदल करावा लागेल कारण १ जाने २००० ला शनिवार होता.
म्हणजे-
शुक्रवार =०
शनिवार = १
रविवार = २..
गुरुवार = ६
बाकी ३ उरली म्हणजे सोमवार्.संगणकाच्या दिनदर्शिकेत पाहिलेत तर १५ ऑगस्ट २०११ ला सोमवारच आहे.

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अभिज्ञ's picture

23 Apr 2009 - 2:21 pm | अभिज्ञ

भेन्डि बाजार,
मस्त च रे.
आय थिंक यु हॅव सॉल्वड द पझल.

अभिनंदन

:)

अभिज्ञ.

या वर्षी ४ एप्रिलला शनिवार आहे.
तर
४/४, ६/६, ८/८, १०/१०, १२/१२,
५/९, ९/५, ११/७, ७/११,
आणि फेब्रुवारीचा शेवटचा दिवस
या सर्व तारखांना तोच वार म्हणजे शनिवार असणार आहे. (आणि असे हे दर वर्षी असते.)
एवढ्या ज्ञानावरून थोडे पुढेमागे करून चालू वर्षातील कुठल्याही महिन्यातील (१२ पैकी १० महिने तर इथेच मिळाले) कोणत्याही तारखेचा वार शोधून काढणे सोपे आहे.
वाईट एकच की यात कसलीही आकडेमोड नाही त्यामुळे या पद्धतीला अजिबात ग्लॅमर नाहीये.
- दिगम्भा

वेदश्री's picture

25 Apr 2009 - 9:26 pm | वेदश्री

खूपच सोपी आणि सहजी वापरात आणता येईलशी माहिती आहे, दिगम्भा. धन्यवाद.

>वाईट एकच की यात कसलीही आकडेमोड नाही त्यामुळे या पद्धतीला अजिबात ग्लॅमर नाहीये.
हहपुवा. भापो.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2009 - 6:32 pm | नितिन थत्ते

उगाच असल्या गोष्टींना उत्तेजन देऊ नये.
ज्ञानदीप कार्यक्रमात १५-२० वर्षांपूर्वी ठीक आहे. आज ते निरुपयोगी आहे. त्याचा पुनर्शोध (रेइन्वेन्टिंग द व्हील) कशाला?
गारगोटीने विस्तव पेटवून दाखवणार्‍याचे आपण कौतुक करू काय?
खराटा
(रंग माझा वेगळा)

अभिज्ञ's picture

23 Apr 2009 - 7:46 pm | अभिज्ञ

मित्रा खराट्या,

तुझा आय क्यु १६५ आहे का?

अभिज्ञ.

प्राची's picture

23 Apr 2009 - 7:53 pm | प्राची

मित्रा खराट्या,

तुझा आय क्यु १६५ आहे का?
=)) =)) =))

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 7:38 pm | नितिन थत्ते

माझा आय क्यू ६५ आहे. सामान्य आणि मतिमंद यांच्या सीमेवर.
एखाद्या काळाच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कुणी सोपे तंत्र विकसित केले तर ते त्याकाळापुरते उपयुक्त आणि कौतुकास पात्र असते. परंतु निव्वळ स्मरणशक्ती वापरून काही करामती करून दाखवत असेल आणि आपण भारावून जाऊन त्याकाळाच्या कितीतरी नंतर त्याच तंत्राचा सराव करणे आणि त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न / दावा करणे हे मला निरुपयोगी वाटते.
उदा. लॉग टेबलचा शोध लावणारा थोरच. पण आज जर लॉग टेबल पाठ करून किंवा इतर प्रकारे वेगाने मोठमोठी आकडेमोड करून दाखवील तर ते आजच्या जमान्यात निरुपयोगी समजायला हवे.
अवांतरः आपली आजची परीक्षा पद्धत अशी आहे की हुशार मुलांनाही परीक्षेत पूर्ण पेपर 'सोडवून' लिहिणे शक्य नाही. म्हणजे तुम्ही बहुतांश उदाहरणे 'पूर्वीच' सोडवली असतील तरच तुम्हाला पूर्ण पेपर लिहिणे शक्य आहे. अशा परीक्षापद्धत असलेल्या समाजात तोंडी आकडेमोड फटाफट करणार्‍याचे कौतुक होणे स्वाभाविक आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)

अभिज्ञ's picture

25 Apr 2009 - 7:59 pm | अभिज्ञ

मला वाटते कि आपण तंत्रज्ञान व गणित ह्यात मोठी गल्लत करत आहात.
वर दिलेले सुत्र हि फ़क्त एक गणिती करामत आहे.
अन माझा प्रयत्न फ़क्त त्या मागचे लॊजिक समजावून घेण्याचा होता.

एखाद्या काळाच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कुणी सोपे तंत्र विकसित केले तर ते त्याकाळापुरते उपयुक्त आणि कौतुकास पात्र असते.

असहमत. न्युटन ने शोधलेले कॆलक्युलस आजहि उपयुक्त आहेच व यापुढेहि राहणारच.
वैदिक गणितात कित्येक सुत्र अशी आहेत की जी वापरून मोठमोठालि गणिते सोप्या पध्दतीने व लवकर सुटु शकतात.
त्याला तुम्ही काय म्हणणार? केवळ जुने आहे म्हणून अन आजकाल काय कॆलक्युलेटर वा संगणकाच्या जमान्यात
कशाला त्यांचा वापर करायचा? ते निरुपयोगी आहे?

परंतु निव्वळ स्मरणशक्ती वापरून काही करामती करून दाखवत असेल आणि आपण भारावून जाऊन त्याकाळाच्या कितीतरी नंतर त्याच तंत्राचा सराव करणे आणि त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न / दावा करणे हे मला निरुपयोगी वाटते.

याचा अर्थ असा घ्यावयाचा का? कि आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात कोणीहि कुठलाच दुरध्वनी क्रमांक पाठ करू नये?
पाठ कशाला करायचा? मोबाइल आहेच ना स्टोअर करायला. हे कितपत ग्राह्य आहे?
अन समजा एखाद्याने वापरलीच हि पध्दत अन सांगितला एखाद्या तारखेचा वार तर कुठे बिघडले?
उलट तेवढीच त्याच्या मेंदुला चालना नाहि का मिळणार?

अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

नितिन थत्ते's picture

25 Apr 2009 - 8:16 pm | नितिन थत्ते

याचा अर्थ असा घ्यावयाचा का? कि आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात कोणीहि कुठलाच दुरध्वनी क्रमांक पाठ करू नये?
होय. अर्थातच. मी स्वतः लोकांचे फोन नंबर लक्षात ठेवीत असे. ते लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिकही शोधल्या होत्या. पण आता मी ते लक्षात ठेवत नाही.
तसेही माझे म्हणणे मूळ लेखाविषयी नव्हतेच. तुमच्या लेखांवरील प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी ते लॉगिक शोधण्याचा ते लक्षात ठेवण्यासाठी सूत्रे तयार करण्याचा खटाटोप चालविला होता. त्याला उद्देशून हे होते.

न्यूटनचे कॅलक्युलस ही लवकर आकडे मोड करण्याची पद्धत नव्हती तर ते मूलभूत गणिती संशोधन होते.
वैदिक (अंक)गणितात जी सूत्रे आहेत त्यांचा एका विशिष्ट काळातला उपयोग निर्विवाद आहे. पण आजच्या (सहज उपलब्ध) तंत्रज्ञानात त्या सूत्रांचा उपयोग किती हे उघड आहे. (अवांतरः दुर्बिटणे बाई खगोलशास्त्रातील गणिते करण्यासाठी वैदिक 'गणित' वापरतात काय?)

माझ्या आधिच्या प्रतिसादातील खालचे अवांतर वाचावे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2009 - 5:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(अवांतरः दुर्बिटणे बाई खगोलशास्त्रातील गणिते करण्यासाठी वैदिक 'गणित' वापरतात काय?)

मी गणितं करत नाही, त्यासाठी मी संगणक आणि संगणकीय प्रणाली 'ठेवल्या' आहेत.

अर्थात त्या नोकरांना कामं कशी करायची ते सगळं समजावला लागतं. आणि हे करताना जी पद्धत कमी वेळखाऊ अधिक बरोबर उत्तराच्या जास्त जवळचं उत्तर देईल ती आपली! अर्थात यातही कधी वेळेसाठी ऍक्यूरसी सोडावी लागते कधी ऍक्यूरसीसाठी वेळ जास्त द्यावा लागतो.

वैदिक गणित मला माहित नाही. पण त्यातून आकडेमोड पटापट होणार असेल तर 'नोकरां'नाही ती शिकवायला काय हरकत आहे?

अवांतरः एकदा ऑब्झर्व्हेशन्सला जाताना मी फोन घरी विसरले. दोन-चार फोन नंबर लक्षात असल्यामुळे मला नारायणगावाहून ग्रम्टला जाता आलं, परत पुण्याला जाण्याला वेळ आली नाही.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चिरोटा's picture

25 Apr 2009 - 9:51 pm | चिरोटा

निव्वळ स्मरणशक्ती वापरून काही करामती करून दाखवत असेल आणि आपण भारावून जाऊन त्याकाळाच्या कितीतरी नंतर त्याच तंत्राचा सराव करणे आणि त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न / दावा करणे हे मला निरुपयोगी वाटते.

सहमत्.नुसत्या स्मरणशक्तीला घोकमपट्टीच म्हणता येइल्.मात्र केवळ सोय आहे म्हणून लक्षात ठेवायचे नाही हे योग्य नाही.

पण आज जर लॉग टेबल पाठ करून किंवा इतर प्रकारे वेगाने मोठमोठी आकडेमोड करून दाखवील तर ते आजच्या जमान्यात निरुपयोगी समजायला हवे

लॉग काढण्याची एखाद्याने नविन पद्धत काढली तर निस्चितच चांगले आहे.वेगाने आकडेमोडपण करणे अथवा नविन पद्धत शोधणे केव्हाही स्वागतार्ह.नुसते लॉग टेबल पाठ करणे अर्थातच निरुपयोगी आहे.बर्‍याच वेळा पटकन लॉग किंवा तत्सम आकडेमोड करणार्‍या व्यक्ती कुठलीतरी पद्धतच वापरत असतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्राची's picture

23 Apr 2009 - 7:53 pm | प्राची

अभिज्ञजी,आपण दिलेली माहिती छान आहे.

chikusi's picture

23 Apr 2009 - 11:14 pm | chikusi

खुप छान............ !!!

किति हुशार आहात !!!

आम्हि फएन

देवदत्त's picture

26 Apr 2009 - 12:00 am | देवदत्त

चांगली माहिती.

भेण्डीबाजार, तुम्ही सांगितले तसेच सूत्र मी भरपूर वेळा वापरतो.
तुमच्या पहिल्या वाक्यात १ जानेवारी १९०० ला रविवार होता.नियमानुसार १ जानेवारी १९०२ ला सोमवार असणार. असे म्हटले आहेत. ते १ जानेवारी १९०१ ला सोमवार पाहिजे असे मला वाटते.

खराटा, तुमचे म्हणणे पटले नाही.
याचा अर्थ असा घ्यावयाचा का? कि आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात कोणीहि कुठलाच दुरध्वनी क्रमांक पाठ करू नये?
होय. अर्थातच. मी स्वतः लोकांचे फोन नंबर लक्षात ठेवीत असे. ते लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिकही शोधल्या होत्या. पण आता मी ते लक्षात ठेवत नाही.

ह्यात जर मोबाईल/संगणक बिघडला तर ते दूरध्वनी क्रमांक कोठून मिळणार? जर ते लक्षात असतील तर चांगले आहेच ना? तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीची सुरूवात ही जुन्या काळातील असल्या सूत्रांचा वापर करूनच झाली आहे. अजूनही भरपूर ठिकाणी असल्या प्रकारची सूत्रे संगणकात भरूनच तो वापरला जातो. अर्थात त्यात नवीन पद्धती आल्या असतीलच पण जुने विसरून जाणे खटकते.

चिरोटा's picture

26 Apr 2009 - 10:03 am | चिरोटा

ते १ जानेवारी १९०१ ला सोमवार पाहिजे असे मला वाटते

बरोबर्.ते चुकून लिहिले.आणि नन्तर संपादित होत नव्हते.

अजूनही भरपूर ठिकाणी असल्या प्रकारची सूत्रे संगणकात भरूनच तो वापरला जातो

सहमत्.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

26 Apr 2009 - 11:03 am | नितिन थत्ते

अजूनही भरपूर ठिकाणी असल्या प्रकारची सूत्रे संगणकात भरूनच तो वापरला जातो.
याला माझी काहीच हरकत नाही. सूत्रे मेंदूत साठवण्याला आक्षेप आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2009 - 10:54 am | भडकमकर मास्तर

इथे कोणाला वारावरून तारीख सांगायचं सूत्र माहिती आहे का? :?
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

आंबोळी's picture

26 Apr 2009 - 11:17 am | आंबोळी

इथे कोणाला वारावरून तारीख सांगायचं सूत्र माहिती आहे का?
सोप्पे आहे मास्तर... वरचा फोर्मुला उलटा वापरा.

:> प्रो.आंबोळी

दशानन's picture

26 Apr 2009 - 4:46 pm | दशानन

ग्रेट ! :D

तुम्ही एक काम पण करु शकता, कॅलेंन्डरची पाणे उलटी फिरवून पण दिनांक पाहू शकता की =))

थोडेसं नवीन !