इनका क्या करें ?

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
27 Jan 2008 - 12:21 pm
गाभा: 

खूप वर्षांपूर्वी ब्ल्याकँडव्हाईट् च्या जमान्यामधे - जेव्हा टीव्ही थोडे तास असायचा - तेव्हा पाहिलेले काहीही (अक्षरशः काहीही ) टीपकागदाप्रमाणे शोषले जायचे. मनात कायमचे वसतीला येऊन रहायचे. त्याकाळात पाहिलेली एक "फिल्म्स (उच्चारी "फ्लिम") डिव्हीजन की भेंट्"अजून आठवते. फिल्मचे शीर्षक होते : "इसका क्या करें ?" सहलीला गेले असतानाचा कचरा तिकडेच इतस्ततः टाकणार्‍या एका समूहापैकी एक छोटा मुलगा शेवटी तो कचरा हातात गोळा करतो आणि त्या सर्वाना विचारतो : " हां , चले तो जाते हैं हम यहांसे , लेकिन इसका क्या करें ?" हीच फ्रेम मग शेवटी फ्रिज होते आणि फिल्म संपते.

आधुनिक, वेगवान आयुष्य जगताना - मग तो वेग तुम्हाला मान्य असो की नसो , त्या वेगाबरोबर पळणे अपरिहार्यच - अनेकदा दुर्मिळ झालेल्या निवांत क्षणी मनात त्या फिल्मचे शीर्षक रुंजी घालते. आपल्या भूतकाळात, जडणघडणीच्या वर्षांत आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आवडी-निवडींचे, राग-लोभांचे थोड्याबहुत फरकाने एक गाठोडे जमविलेले असतेच. आपापल्या वकूबाप्रमाणे , अनुभवाप्रमाणे, संवेदनशीलतेप्रमाणे हे गाठोडे लहान-मोठे असायचे. शेवटी "जिसका जितना आंचल था, उतनी सौगात उसे मिली." आज प्रस्तराचे दोन-तीन लेप वयोमानानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार चढल्या-उतरल्यानंतर आपल्या गाठोड्यातल्या गोष्टी उलगडून पाहाव्यात तो मनात प्रश्न येतो "इनका क्या करें ?" त्यापैकी काही गोष्टींचा उहापोह करून मी सुरुवात करतो.

एक काळ असा होता की धाकट्या मंगेशकरांचे अस्मादिक फार मोठे पंखे होते. कॉलेजच्या पाच वर्षांत साधारण पन्नासवेळा त्यांचा कार्यक्रम मी (आणि माझ्या अजून एका मित्राने) पाहिला असेल. काय झपाटलेले दिवस होते ते ! निम्न्-मध्यमवर्गात रहाणार्‍या एका कॉलेजमधल्या मुलाकरता इतके वेड लागणे खरे तर न परवडणारे . वडीलधार्‍याना वाटायला लागले होते : याचा बुद्धिभ्रंश झाला ! पण या माणसाने , त्याच्या संगीताने , त्याच्या गायकीने आणि एकूण विदग्ध व्यक्तित्वाने मला एका नवीन जगाची ओळख करून दिली. जी गाणी बालपणी रेडियोच्या रतीबामुळे केवळ सवय म्हणून बर्‍याचदा कानांवरून गेली होती , पौगंडावस्थेच्या प्रवेशद्वारावर त्या गाण्यांच्या व्युत्पतीची , त्यामागील अर्थाची , आणि पर्यायाने काव्याच्या प्रदेशाची ओळख झाली या माणसामुळे , त्याच्या कार्यक्रमामुळे. आणि काय झाले कोण जाणे , पण या कार्यक्रमाला कुठेतरी दृष्ट लागली. आपल्या निकृष्ट दर्जाच्या मुला-मुलीला ते या कार्यकर्माद्वारे "प्रमोट्" करायला लागले. तालवाद्यातले मातबर साथीदार त्याना सोडून जायला लागले. गाण्यापेक्षा भाषणबाजी , "पुढच्या पिढीचे" भीषण गाणे यात सर्व वेळ जायला लागला. आणि जे कधी घडेल असे वाटले नव्हते ते घडले - मी एक-दोन कार्यक्रमात चक्क उठून आलो. आणि त्यानंतर मी कार्यक्रमाला जायचे कायमचे थांबवले.

आज त्यांचे गाणे , १६-१७ वर्षांचा मी - ज्याने ते गाणे त्या बहराच्या काळात पहिल्यांदा ऐकले , त्या सर्व आठवणी गाठोड्यात आहेत. आज इतक्या वर्षांनंतर आणि हजारो मैलांवर जेव्हा मी त्याचा विचार करतो तेव्हा त्याबद्द्ल एक प्रकारची निर्विकारता येते. "इसका क्या करें ?" या प्रश्नाच्या कक्षेत बसणार्‍या या सर्व गोष्टी.

तुमच्यापैकी कुणाला अशा प्रकारचा अनुभव कधी येतो काय ?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2008 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण मांडलेला विचार एक उत्तम चिंतन आहे, खरे तर दशके बदलले की माणसांची जीवनशैली बदलते आणि नंतर संवेदना.
म्हणुन आपल्याला ज्यांच्याबद्द्ल श्रद्धा वाटते ती माणसे काळाच्या ओघात कधी बदलतात, ती अशी का वागतात ते कळत नाही . शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडावे लागते. खरे तर आमचे वय फार अनुभवाने समृध्द झाले आहे, असे नाही. पण कमी वयात एका विद्वान माणसाच्या सहवास आम्हास लाभला. नैतिक मुल्य, सत्य, प्रामाणिकपणा हाच ज्यांच्या जीवनाचा भाग आहे, असे वाटणारी व्यक्ती. काही वर्षानंतर पैशासाठी कोणत्या थराला जाते. विद्वत्तेचा कसा उपयोग करते, हे पाहिले की, इनका क्या करे हा प्रश्न आमच्या समोर उरत नाही. तेव्हा आम्ही हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडून देतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

28 Jan 2008 - 9:05 am | सहज

थोड्याफार फरकाने हा अनुभव सगळ्यांनाच येत असावा.

बोध घेऊन, आपण तसे न करावे हेच आपल्या हाती, बाकी काय?

बाकी आई-वडील आपल्या मुलांसाठी नाही करणार तर कोण :-) तुम्हाला सुरवातीला जो आनंद मिळाला त्याची दक्षीणा म्हणायची. कोणास ठावूक काही कट्टर चाहते असतील देखील नवीन भीषण संगीताचे :-)

प्राजु's picture

28 Jan 2008 - 10:00 am | प्राजु

मी ७ वीत असताना तो "मैने प्यार किया" सॉलिड हिट्ट झाला होता. भाग्यश्री पटवर्धनने ( माझी कोणी नव्हे) अक्षरशः वेड लावले होते. तिच्यासारखे ड्रेस, केशभूषा... नाना त-हा आम्ही मुली करायचो. कितीवेळा तो सिनेमा मी पाहीला त्या भाग्यश्रीलाच ठावूक. तिची जवळजवळ ३५० लहानमोठी पोस्टर्स मी जमवली होती. ती दिसायचीही अगदी निरागस.. सुंदर. बाबांना दिसू नये म्हणून माझ्या कपाटाच्या दाराच्या आतल्या बाजूला लावून ठेवली .
हळू हळू भाग्यश्री पडद्याआड गेली आणि मी कॉलेजला. मध्यंतरी घर बदलायच्या वेळी आमच्या आईने ती सगळी पोस्टर्स एका बॅगेत भरून नविन घरी आणली. नव्या घरी नव्या कपाटात सामान लावताना आईने ती बॅग आणून दिली म्हणाली' " हे तुझं महत्वाचं सामान .." मी उघडून पाहिलं.. तर ती पोस्टर्स. आता मी ऐश्वर्याची फॅन झाले होते. आणि ऐश्वर्याची पोस्टर्सही आणली गेली होती, अर्थातच बाबांच्या नकळत. तेव्हा मला प्रश्न पडला..आता भाग्यश्री का क्या करे?

- प्राजु

प्रमोद देव's picture

28 Jan 2008 - 10:35 am | प्रमोद देव

भाबड्या वयात आणि पोक्तवयात समजशक्तिची जी पोहोच असते त्यात जो फरक असतो तोच खरा. बाकी एकाच प्रसंगाचे वर्णन निरनिराळे लोक ज्या पद्धतीने करतात तसलाच हा प्रकार असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
माझ्या बालपणी देवाआनंद,दिलीपकुमार,राजकपूर,राजकुमार,राजेंद्रकुमार,शम्मीकपूर वगैरे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले नट होते.
त्यांचे चित्रपट पाहताना ते सगळेच खूप महान वगैरे वाटत. पण आता तेच चित्रपट पुन्हा बघण्यात आल्यावर लक्षात आले की त्यांचा अभिनय किती नकली आहे ते.(हे माझे वैयक्तिक मत आहे) देव आनंदला तर उत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणता येईल असे आता वाटते आणि शम्मीकपूरला तर माकड उड्या मारताना पाहून आम्ही त्याला नट समजत होतो हे लक्षात आल्यावर आमचीच आम्हाला कीव येते.
हा एक विचार झाला. पण जर साकल्याने विचार केला तर लक्षात येते की आपल्या जाणीवा त्या त्या वयात जशा होत्या आणि पुढे प्रगल्भ होत गेल्या त्याप्रमाणे आपण त्या त्या गोष्टीची मीमांसा केली. म्हणून तेव्हा वाटले तेही बरोबर होते आणि आज वाटतेय तेही बरोबर

केशवराव's picture

28 Jan 2008 - 11:19 am | केशवराव

प्राजु ,
प्रमोद देवांची विचार करण्याची पद्धत बरोबर वाटते, नाही का ? काळाप्रमाणे जग बदलण्याचा वेग प्रचंड वाढतो आहे. सर्व मुल्य देखील बदलत आहेत, प्रचंड वेगाने बदलत आहेत.१० -१५ वर्षा पूर्वीची मुल्य , आदर्श आज अस्तंगत झाले आहेत.
तरीपण, काळातित म्हणून काही गोष्टी टिकतातच. पं. नेहरू, डॉन ब्रॅड्मन, चार्ली चॅपलीन, पं.रवी शंकर, सत्यजीत रे, कुसुमाग्रज,लता मंगेशकर ............... आणि कितीतरी. या सर्वांना तोडच नाही. ' यांचे काय करायचे ? ' हा प्रश्न ईथे पडत नाही.भाग्यश्री ते ऐश्व्रर्या हा बदल ठिक आहे , पण नर्गिसला पर्याय नाही.
काळातित गोष्टींचे सोड, पण आपण काळा बरोबर बदलायला पाहीजे.

केशवराव

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 11:33 am | विसोबा खेचर

धाकट्या मंगेशकरांबद्दल मांडलेला मुद्दा पटला. मीही एकेकाळी त्यांचे अनेक उतमोत्तम कार्यक्रम पाहिलेले आहेत. खूप मजा यायची. परंतु नंतर नंतर या कार्यक्रमाची अगदीच वाट लागली आणि मीही त्यांच्या कार्यक्रमाला जायचे थांबवले...

असो, मुक्तराव आपण चांगला मुद्दा मांडलात...!

आपला,
(दिदीभक्त) तात्या.

अमित's picture

28 Jan 2008 - 12:59 pm | अमित

धाकट्या मंगेशकरांच्या कार्यक्रमाबद्दल आणखी काही लोकांकडूनही अशीच प्रतिक्रीया ऐकली. त्यामुळे कार्यक्रम पाहण्याचे ' कष्ट' घेणे नाही. धन्यवाद मुक्तराव

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jan 2008 - 3:05 pm | प्रकाश घाटपांडे

लईच वझं झाल तर कंबारडं मॉडतय. मंग ते आठवनिंच असू दे न्हाई त साठवनींच. लगी खालीच बसतोया. वकारी आली कि वकून टाकायच. न्हाई त लई मळमळातयं. मान्सांनी लईच कप्पेबाजी केलि ना कि मंग त्ये 'देवराई' पिक्चर वानी स्किझोफ्रेनिक व्हतय. जे हाय ते आस हाय. कदि मोरपिसावानी गुदगुल्या बी व्हत्यात. कदि खरवाडतय बी. पघा भैनाबाई काय म्हंतात.

मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा

मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन? उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं? आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!

[there is hidden child in every adult]
प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत's picture

29 Jan 2008 - 2:27 am | मुक्तसुनीत

घाटपांडेकाका,
तुमचे तुमच्या गावरान शैलीतले लिखाण नेहमीप्रमाणे आवडलेच. त्यातील व्यंगार्थसुद्धा समजण्यासारखा आहे. पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही. जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2008 - 9:52 am | प्रकाश घाटपांडे

<<पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.>>
ते मी इतरांवर सोपवतो.
<<जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >>
बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला.
<<तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. >>
माहित नाहि, मला जे वाटल ते मी लिहिलं. बहिणाबाईंनी केलेले वर्णन मला अधिक भावत.
<<आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.>>
अगदी सहमत.

( अकाली काकत्व आलेला)
प्रकाश घाटपांडे

संजय अभ्यंकर's picture

29 Jan 2008 - 5:56 am | संजय अभ्यंकर

वा घाटपांडेजी,

बहिणाबाईंची सुंदर कविता ऐकवलीत.

सम्जय अभ्यंकर

दीपा॑जली's picture

29 Jan 2008 - 12:58 pm | दीपा॑जली

माणसाच्या जीवनात बदल अपरीहार्य आहे.या जगात प्रत्येक गोष्ट बदलत असते,तसेच माणसाचे मन पण बदलत असते.
बालपण,तारुण्य,वार्ध्यक्य या सगळ्यातून जात असता॑ना प्रत्येकजण बदलत असतोच्.त्यात नवल काहीच नाहि.
हे बदल हसत, मोकळेपणाने स्विकारण्यातच मजा आहे.
आपण बदललो नाही तर जीवनातली मजाच निघून जाईल.

मुक्तसुनीत's picture

29 Jan 2008 - 8:30 pm | मुक्तसुनीत

बदल नुसता अपरिहार्यच नव्हे ; तो आपल्या जीवनाचा स्थायिभाव आहे ! असा कुठला पैलू असेल आपल्या जगण्यातला जो बदलत नसेल ! त्यामुळे आपण खुद्द बदलणार, बर्‍यावाईट बदलाना - इच्छा असो , नसो - सामोरे जाणारच.

प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ?

चतुरंग's picture

30 Jan 2008 - 4:55 am | चतुरंग

प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ?

हा प्रश्न मला सातत्याने वेगवेगळ्या रुपात सामोरा येऊन छळतो.
एक उदाहरण घेऊयात -
आपण आपल्याला आणि आपल्या मुलाला (मुलगा/मुलगी) शिस्तीचे धडे देतो - मग ते हस्ताक्षर असेल, जेवण्याच्या पद्धती असतील, कपडयांच्या घड्या असतील, मोठ्या माणसांचा आदर करणे असेल किंवा सार्वजनिक जीवनातली शिस्त....
हे त्या बालकाला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार ह्याची आपल्याला खात्री असते. आपण आटापिटा करतो.
कारण ही मूल्यं आपण शाश्वत मानलेली असतात, त्यातलं हित माहीत असतं. आणि जेव्हा आपण आजूबाजूला निरीक्षण करतो तेव्हा बर्‍याच वेळा असं दिसतं की कितीतरी लोक बेशिस्त जगत असतात, काही विशिष्ठ धोरण नाही, काही उद्देश नाही, लांबचा विचार नाही, जसे होईल तसे आयुष्य चालू असते. त्यांच्या आयुष्यात वरकरणी आपल्याला काही कमी दिसत नाही. सगळं काही आलबेल दिसत असतं. मग आपल्या मनात विचार येतो की आपण जे कष्ट (खरं सांगायचं तर त्यावेळी मनात येणारा शब्द "मगजमारी"!) करतो आहोत त्याचा काही उपयोग आहे की नाही? का हे सगळं वाया जाणार? १० पैकी ८ लोक बेशिस्त असले तर उरलेल्या २ लोकांचा निभाव काय लागणार?

उत्तर : ह्याचं उत्तर मी माझ्या परीनं शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते मला मिळालं, तेही निसर्गातून!
वसंत ऋतूत झाडं फुलतात, फुलांचे सुंदर रंग काहींना आनंद देतात, काही जणांना त्यात काहीच वाटत नाही.
पण कुणाला काही वाटावं किंवा वाटू नये म्हणून फुलं फुलतात का हो? नाही, तो त्यांचा धर्म आहे. ती फुलणारच.
आंब्याला काही वर्षे निगा, खतपाणी करावंच लागतं, काही वर्ष काहीच फळ हाती नसतं, पण काही वर्षांनी हापूस चाखायला मिळणारच, तो त्याचा धर्म आहे!
आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी ह्या सुप्तावस्थेत बराच काळ असतात असे मला वाटते. कधीतरी अचानक वेळ येते आणि ती गोष्ट डोकं वर काढते आणि तुम्हाला हात देते. पण त्या साठी ती गोष्ट तुमच्याकडे हवी! आणि त्याचसाठी चांगल्या गोष्टी चालू ठेवण्याचा धर्म बाळगणे जरुरीचे आहे. आजूबाजूला पडझड होत असताना तर जास्तच प्रकर्षानं हे जाणवतं!

आपण शाश्वत मानलेल्या गोष्टीचा र्‍हास झाला तर एकतर ती शाश्वत मानणं तितकसं योग्य नव्हतं असं सिद्ध झालं.
किंवा त्या गोष्टीत बदल झालेला आहे आणि तो नव्या स्वरुपात पुन्हा पुढे येणार आहे!
सप्तसूर हे शाश्वत आहेत. गाणार्‍याचा र्‍हास होऊ शकतो, सुरांचा नाही. त्यामुळे विश्वास आधी सुरांवर हवा मग गाणार्‍यावर, म्हणजे मग विश्वास मुळापासून हादरत नाही!

अशी अनेक उदाहरणे पदोपदी आढळतात, अस्वस्थ करत राहतात, कारण तो त्यांचा धर्म आहे!

अवांतर :- "सकाळ" समूहाचे प्रतापराव पवार ह्यांचा एक सुंदर लेख वाचला त्याचा दुवा .
तो लेख ह्या विषयाला स्पर्श करून जाणारा वाटला.

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2008 - 9:48 pm | प्रकाश घाटपांडे

<<प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ? >>

स्विकारावे तर लागतातच. पण मन 'र्‍हासाला' आपण कारणीभूत आहोत हे स्वीकारायला कचरते. आपण निमित्तमात्र आहोत हे स्वीकारायला तयार होते. पण 'वृद्धी' हा घटक असेल तर आपण कारणीभूत आहोत हे पटकन स्विकारायला तयार होते.
दुसरा पर्याय म्हणजे चिरंतन असे काहीच नसते असे मानणे. शाश्वत मूल्य वा त्रिकालाबाधित सत्य हे नसतेच असे मानणे.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

30 Jan 2008 - 12:10 am | प्राजु

<<जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >>
बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला.

इथे माझं नाव आणायचं कारण समजू शकेल हो...घाटपांडे साऽऽऽऽऽऽऽऽहेब?

-(गोंधळ) प्राजु