मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
21 Jan 2008 - 9:46 pm

मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय.
म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी
मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद
झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची.
`येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच
चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम
मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो..
परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही
मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे
विडंबन जन्माला आले... तिखट मानून घ्या...

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो
येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

उसळ, मिसळ अन् फरसाणा.. पिळून लिंबू घेताना
घास तिखट तो खाताना.. घामल धारा झरताना
हा झणझणणारा स्वाद सदाचा, जीभेस बिलगून राही
हा उनाड कांदा गूज चवीचे कानी सांगून जाई
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

आज इथे या मिसळस्थळी.. क्षण भाग्याचे दुणावती
नाक सारखे पुसताना, आनंदे डोळे भरती
हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई
मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र)

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

21 Jan 2008 - 10:05 pm | धोंडोपंत

वा वा वा वा पंत,

अगदी झकास तिखट मिसळ दिलीत हो. वा वा. मजा आली.

मिसळपावावर हार्दिक स्वागत. तुमच्या कविता गझला आणि विडंबने मिसळपावावर येऊ द्यात. रसिकजन आतुरले आहेत.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

लोकहो,

आमचे परममित्र श्री. अविनाशपंत ओगले हे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक आहेत. कविता, गझल विडंबने असे विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या गझलांची "पाऊस पहिला" ही सीडी प्रकाशित झाली आहे.

त्याचप्रमाणे त्यांचे "चषक माझा"हे विडंबनात्मक खंडकाव्य प्रसिध्द आहे.

वाचनसंस्कृती रुजावी म्हणून जिवापाड कार्य करणारा हा माणूस आहे. पुस्तक हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांची "वाच पुस्तके"ही गझल त्यांनी येथे प्रकाशित करावी.

मराठी साहित्यशारदेची पालखी स्वत:च्या खांद्यावरून नेणार्‍या या प्रतिभावंताचे मिसळपाववर जोरदार स्वागत करूया.

आपला,
(स्वागतोत्सुक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

21 Jan 2008 - 11:39 pm | विसोबा खेचर

ओगलेसाहेब,

हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई
मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

वा! सुंदर विडंबन!

धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपले मिसळपाववर जोरदार स्वागत करतो. आपल्या हातून येथे उत्तमोत्तम लेखन घडावे हीच सदिच्छा!

... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र)

चला! म्हणजे मिसळपावपुरता सीमाप्रश्न सुटला म्हणायचा! :)

आपला,
(बेळगाव आणि भीमण्णांच्या धारवाड डिष्ट्रीकचा प्रेमी!) तात्या.

अविनाश ओगले's picture

22 Jan 2008 - 8:39 pm | अविनाश ओगले

विसोबा धन्यवाद...
धारवाड परिसराबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. आमची आई हुबळीची. बायकोचा जन्म धारवाडचा. शिवाय भिमण्णा आणि जी.ए. त्याशिवाय ते प्रसिद्ध धारवाडी पेढे... अहाहा

केशवसुमार's picture

22 Jan 2008 - 10:03 pm | केशवसुमार

मिपा वर स्वागत,
चला नवा विडंबनकार आला म्हणजे आता आम्ही हरी हरी करायला मोकळे..कसे..
ते धारवाडच पेढ्याच आठवण कशाला हो काढल..
ते मिश्रा ने पुन्यात दुकान काधून एकदम बेस करून सोडल..निदान परत आल्यावर ते अता धारवाडला जाव लागणार नाही बघा
धारवाड आणि बेळगाव च आमच पण जूनं संबंध असत बघा..
केशवसुमार

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2008 - 11:55 pm | बिपिन कार्यकर्ते

पहिल्याच मॅच मधे डबल सेंचुरी..... पुढे काय काय होणार आहे?

जय महाराष्ट्र....

बिपिन.

अहो साक्षात पुलंच्या लाडक्या बेळगावास्नं डायरेक्ट एंट्री! झकास!!
मि.पा.चा जन्म बाकी चांगल्या योगावर झाला असे दिसते, दिवसेंदिवस बाळसे धरत आहे!

चतुरंग

धमाल मुलगा's picture

22 Jan 2008 - 10:46 am | धमाल मुलगा

वा अविनाशराव, आधीच "राधा ही बावरी" आमच लाडक॑, त्यातून मिसळ हा प्रकार जिवलग अन् मि.पा. वर आता जीव जडलेला...

सगळ॑च कस॑ छान जुळून आल॑य. एकदम फक्कड आहे तुमची "मिस्सळ मी चापतो"

बाकी तुमच्या बेळगावात आमच्या पुल॑चे रावसाहेब अजूनही सापडतात का?

-(मिसळवेडा) धमाल.

झकासराव's picture

22 Jan 2008 - 11:02 am | झकासराव

आहे विडंबन :)
आवडल आमच्या कोल्हापुरी मिसळीएवढं :)
आपलाच
झकासराव पाटिल कोल्हापुरकर :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2008 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अविनाशराव,
एका पेक्षा एक सरस गझला आम्हाला वाचायला मिळतील असे वाटतंय,
आपल्या पुढील लेखनाला आमच्या भरघोस शुभेच्छा !!!

अवांतर :- बेळगाव च्या माणसाला इथे भेटल्यावर खूप आनंद झाला, बेळगावच्या मराठी माणसाच्या वेदनाही कधीतरी इथे येऊ दे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

22 Jan 2008 - 7:51 pm | बेसनलाडू

आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 9:47 pm | ऋषिकेश

मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो
येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो....

वा वा अत्यंत नादमय विडंबन.. फार फार आवडले.. अति रुचकर!!
अविनाशराव, हार्दिक स्वागत आता आम्हाला मिपा वर आपले उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळो हीच इच्छा!!

बाकी बेळगाव (महाराष्ट्र) ही तर्री खासच!!

-ऋषिकेश

नंदन's picture

22 Jan 2008 - 9:51 pm | नंदन

मस्त जमलंय विडंबन. घामल धारा, उनाड कांदा...मस्तच :). 'वाच पुस्तके' ही गझल वाचायला आवडेल.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

स्वाती राजेश's picture

23 Jan 2008 - 5:00 pm | स्वाती राजेश

मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो
येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो
मस्तच आहे.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

25 Jan 2008 - 4:20 pm | भडकमकर मास्तर

पुन्हा पुन्हा गाऊन पाहिले....मजाच आली...धन्यवाद...

आजानुकर्ण's picture

25 Jan 2008 - 5:47 pm | आजानुकर्ण

विडंबन फार आवडले.

(वाचनोत्सुक) आजानुकर्ण

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 5:03 pm | सुधीर कांदळकर

पदार्थ येऊद्यात. काही झाले तरी 'जिव्हा'ळ्याचा विषय आहे राव. अगदी तंतोतंत.