(ह्यापुढे) आंतरजालावर वावरताना...

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
27 Feb 2009 - 12:56 am

आपणां सर्वांचा आंतरजालावर वावर खूप वाढला आहे. माहितीचा खजिना, विपत्रे, बँकेची कामे, खरेदी व इतरही फार कामांकरीता आपण आंतरजालाचा पूरेपूर फायदा घेत असतो. भरपूर वेळा आपल्याला सूचना मिळत असतात की आंतरजालावर वावरताना बँकेचे, खरेदी करण्याचे संकेतस्थळ वगैरे ठिकाणी सुरक्षितता का व कशी ठेवावी, इतर सुरक्षितता म्हणजे कोणत्याही संकेतस्थळावर स्वतःची खाजगी माहिती देताना नीट चौकशी करून घ्यावी इत्यादी इत्यादी. ह्यावर भाष्य करण्याचा किंवा सल्ला देण्याचा माझा बिलकुल विचार नाही.

माझा रोख आहे तो इतर गोष्टींवर, नुकत्याच वाचनात आलेल्या...

१. http://infotech.indiatimes.com/News/Facebook_users_protest_new_terms/art...
http://www.entrepreneur.com/localnews/1779412.html

ह्या बातमीप्रमाणे, काही दिवसांपूर्वी 'फेसबुक' ह्या संकेतस्थळाच्या चालकांनी आपल्या नियमात असा बदल केला होता की जेणेकरून कोणाही व्यक्तीने त्यात टाकलेले छायाचित्र, चलचित्र, लिखाण, संदेश ह्यावर फेसबुकचा अधिकार राहील. जरी सदस्याने त्याचे सदस्यत्व रद्द केले तरी त्या सर्व माहितीवर 'फेसबुक'चा अधिकार राहील.
सध्या तरी सदस्यांच्या जोरामुळे, तक्रारींमुळे फेसबुकने आपला तो नियम मागे घेतला आहे.
मी तरी 'फेसबुक' पाहिले नाही, वापरले नाही त्यामुळे त्यांच्या नियमांबद्दल जास्त माहिती नाही. पण ह्या बातमीमुळे एक जाणवले की सर्व संकेतस्थळांवर आपली खाजगी माहिती/छायाचित्रे ठेवताना पूर्ण सजग राहणे गरजेचे आहेच पण त्याबरोबर त्यांचे बदलते नियम जाणून घेणे ही तेवढेच आवश्यक आहे. भारतात फेसबुकसारखेच संकेतस्थळ 'ऑर्कूट' खूप लोकप्रिय आहे. आधीच गूगल विपत्रातील मजकूराप्रमाणे जाहिरात दाखविण्यात अग्रेसर आहे. त्यावरही आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

२. http://timesofindia.indiatimes.com/India/Bloggers-can-be-nailed-for-view...
दुसरी बातमी आहे ब्लॉग, अर्थात मराठीत आपण ज्याला आंतरजालीय अनुदिनी म्हणतो त्यासंबंधी. ह्या बातमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने एका १९ वर्षाच्या मुलाने ऑर्कूटवरील एका समुदायात शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याबद्दलच्या खटल्यात असे म्हटले आहे की. ब्लॉग वरील लिहिलेल्या मजकूराबद्दल तक्रार आल्यास शिक्षाही होऊ शकते. आता त्या मुलावरील खटला हा जरी ऑर्कूट मध्ये लिहिल्याबद्दल होता तरी एखाद्याने स्वतःच्या ब्लॉगवरही एखाद्याबद्दल अपमानकारक, असभ्य भाषेत मजकूर लिहिला असल्यास, त्याची तक्रार आल्यास त्याच्यावरही कारर्वाई होऊ शकते.
हे एक बरे आहे... बडी मंडळी, नेते लोक कोणाबद्दलही काहीही जाहिरपणे म्हणू शकतात, एखादा मुख्यमंत्री शहीदाचा अपमान करू शकतो. पण तेच सर्वसामान्य नागरीकाने आपल्या मनातील विचार ब्लॉगवर लिहिले तर त्याला लगेच शिक्षा होणार.
ह्याचा अर्थ माझी त्या १९ वर्षाच्या मुलाला सहमती आहे असे नाही. लो़कशाही आहे म्हणून कोणीही कोणाबद्दल काहीही लिहिणे बोलणे बरोबर नाही. पण हाच नियम सर्वांकरीता सारखा लागू होईल असे मला नाही वाटत.

मी ही कोणाबद्दल आक्षेपार्ह लिहित नाही, फक्त एखाद्याचा निर्णय आवडला नाही तर त्याविरूद्ध लिहिणे होत असते . पण ह्या निकालाचा पुढे कसा वापर गेला जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी एखाद्याबद्दल लिहिताना नीट विचार करून लिहावे लागेल. कोणीही उठून तक्रार केल्यास काय घ्या? :)

असले विविध प्रकार समोर येत असताना, आता पुढे आंतरजालावर वावरताना आधीच्यापेक्षाही जास्त सजग राहावे लागेल हे नक्की.

(जाता जाता: ह्या लेखात तर काही आक्षेपार्ह नाही आहे ना?)
___________________________________________
हेच लेखन माझ्या अनुदिनीवरही आहे.

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2009 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

पण ह्या निकालाचा पुढे कसा वापर गेला जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी एखाद्याबद्दल लिहिताना नीट विचार करून लिहावे लागेल. कोणीही उठून तक्रार केल्यास काय घ्या? Smile

देवदत्त जी सुंदर लेख.
बरेचसे निकाल हे न्यायमुर्तींच्या अन्वयार्थावर अवलंबुन असतात. निकाल म्हणजे न्याय नव्हे. ती केवळ लोकशाही पद्धतीच्या न्यायव्यवस्थेची तांत्रिक बाब आहे. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक वाचनीय आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार/ अधिकार हा लोकशाहीला मारक कि तारक? असा स्वतंत्र विषय होउ शकतो. एकाच स्वातंत्र्य दुसर्‍याची कोंडी करु शकते हे मान्य आहे. अशावेळी "तारतम्य" हा व्यक्तीसापेक्ष घटकावरच अवलंबुन राहवे लागते.
अर्थात या निकालाचा वापर इष्टापत्ती म्हणुन देखील करता येईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.