द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)

अभिजीत's picture
अभिजीत in जनातलं, मनातलं
26 Jan 2009 - 3:57 am

द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)

न्यु ऑर्लिंस मधे एका बाळाचा जन्म होतो तो जराजर्जर व्याधीग्रस्त शरिर घेउनच... त्यात जन्म देणारी बाळाची आई जगाचा निरोप घेते आणि त्याच तिरमिरीत बाप त्या बाळाला एका वृद्धाश्रमाच्या आश्रयाला सोडुन देतो. तिथली कनवाळु केयरटेकर क्वीनी त्याला सांभाळायचा निश्चय करते आणि त्याचं नाव ठेवते "बेंजामिन" ...

चित्रपट सुरु होउन १५ मिनिटातच चमत्कृतीपूर्ण घटना आणि विविध धक्कादायक प्रसंग पाहुन प्रेक्षक सरसावून बसले नाहीत तरच विशेष!

तर पुढे - शरीर ऐंशीच्या घरातल्या वृद्धासारखे आणि भरीला शारिरीक व्याधी त्यामुळे डॉक्टरांच्या मते ते बाळ जगणं जवळजवळ अशक्यच ... पण जसजसा काळ पुढे सरकतो तसं बेंजामिनचं शरीर तारुण्याकडे झुकु लागतं. १९१८ साली जवळपास ऐंशीच्या आसपास वाटत असलेला बेंजामिन १९३० साली अगदी साठी-सत्तरीतला दिसू लागतो. इथेच त्याची ओळख डेझीशी होते. आठ-दहा वर्षाची डेझी तिच्या आजीला भेटायला त्या वृद्धाश्रमात येत असते...

पुढे कथेत काय काय वळणं येत राहतात, बेंजामिन आणि डेझी यांचा जीवनप्रवास आणि कथेचा शेवट काय होतो हे पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.

चित्रपटात काही उपकथानकं आहेत. पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या मुलाची आठवण म्हणून उलटं चालणारं घड्याळ बनवणार्‍या आणि जन्मजात आंधळा असलेल्या एका बापाची कथा किंवा वृद्धाश्रमात येणार्‍या एकेक वृद्धांच्या उपकथा मूळ कथेला अतिशय समर्पक आहेत.

चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय दर्जेदार आहे. १९१८ चा पहिल्या महायुद्धाचा काळ, दुसरं महायुद्ध, १९६०-७० चा युरोप आणि शेवटी २००३ साली होणारा चित्रपटाचा शेवट असा जवळपास ऐंशी वर्षाचा कालखंड किंवा त्याच काळात कथेची पात्रं वयस्कर होत जाणं आणि बेंजामिनचं तरुण होत जाणं हे सगळं सशक्तपणे दाखवणं यात तंत्रद्यांचा अगदी कस लागला आहे. तर मानवी मनाच्या वयानुरूप बदलणार्‍या विविध छटा दाखवणे, चित्रित करणे हेही महाकठीण काम. फ्लॅशबॅक व फर्स्ट-पर्सन-नॅरेटीव या तंत्रांचा वापर चित्रपटाला एक वेगळी गती मिळवून देतो.

शेवटी जाणवलेलं - चित्रपटात मानवी मृत्यूचे इतके प्रवेश आहेत की तोच एक या कथेचा नायक आहे वाटतं. तसंच पूर्ण फ्लॅशबॅक पद्धतीत सांगितलेली कथा आणि कथेतला बेंजामिनचा उलटा प्रवास हेही एक अजब रसायनच आहे.

इतर - चित्रपटातले मुख्य कलाकार आहेत ब्रॅड पीट (बेंजामिन) आणि केट ब्लांचेट (मोठेपणीची डेझी). तसेच, २००९ च्या ऑस्कर साठी या चित्रपटाला १० नामांकने मिळाली आहेत.

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:29 am | दशानन

छान विष्लेशन !
बघायलाच हवा !
टोरंट मिळेलच कुठे तरी.... धन्यवाद... !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

स्वाती राजेश's picture

26 Jan 2009 - 7:27 pm | स्वाती राजेश

हा मुव्ही पाहताना Forest Gump ची आठवण झाली...:) तसेच मेकअप, आणि कास्टींग सुद्धा परफेक्ट....
परिक्षण मस्त लिहीले आहे...

चित्रगुप्त's picture

17 Jan 2023 - 12:47 am | चित्रगुप्त

२००९ सालचा हा लेख आज वाचनात आला, आणि यूट्यूबवर हुडकता सध्या फक्त ट्रेलर आणि या सिनेमाची कथा हिंदीत सांगणारा विडियो बघायला मिळाला. हे एक प्रकारे बरेच झाले कारण आता मूळ सिनेमा बघायला मिळाला की समजणे सोपे जाईल.
ट्रेलर आणि हिंदी विडियो बघून सिनेमा बघायची खूपच उत्सुकता निर्माण झालेली आहे. कुठे उपलब्ध आहे हे कुणी सांगिल्यास उत्तमच.

.

स्मिताके's picture

18 Jan 2023 - 9:46 pm | स्मिताके

छान वाटतो चित्रपट. उत्सुकता वाढली आहे.

श्वेता व्यास's picture

20 Jan 2023 - 12:07 pm | श्वेता व्यास

वेगळा विषय दिसतोय, ओळख वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शलभ's picture

20 Jan 2023 - 11:14 pm | शलभ

मस्त आहे हा चित्रपट.