नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.
तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं?
घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात. कारण अशा साड्यांना मागणी नाही. रोजच्या वापराचे कपडे त्यातल्या त्यात कुणाला हवे असतात. निदान आपण ते खूप वापरतो तरी!
स्त्रियांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांशी मी संपर्क साधला पण त्यांची उत्तरं अशी होती...
१. आम्ही फक्त पैशात देणगी स्विकारतो
२. आम्ही आदिवासींसाठी काम करतो. त्यांना सुती आणि नऊवारी साड्या लागतात. शक्यतो नवीन द्या किंवा रोख रक्कम द्या.
३. आता आमच्या कडील मुली साड्या नेसत नाहीत.
इत्यादी इत्यादी...
पुनर्वापर करणाऱ्यांना संपर्क केला. अशा साड्यांपासून ते सुंदर, सुंदर पिशव्या,पर्सेस, पडदे,कुशन कव्हर, रजया वगैरे बनवून देतात. म्हणजे त्यासाठी दक्षिणा देऊन वेगळ्या स्वरूपातील ढीग घरातच ठेवायचा.
जरीसाठी साड्या घेणारे असतात पण अलीकडे पैठणीत तरी कुठे खरी जर असते? ( अर्थात खऱ्या जरीची आपण कशाला टाकू?)
अशा अनेक कारणांमुळे मी भंडावून जाते. उघड्या डोळ्यांनी साड्या फेकून द्यायला मन धजावत नाही. पुन्हा एकदा एक अंगावर एक दांडीवर असं जगणं जमेल का हा विचार डोक्यात घोळू लागतो.
तर मंडळी, याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? आणि हो, यावर तुम्ही काय उपाय करता ते जाणून घेण्यासाठी हा धागा.
प्रतिक्रिया
21 Jan 2026 - 1:59 pm | कंजूस
१.पन्नाशीच्या पुढच्या बायकांची फुकटची हौस.
२. कोणत्यातरी समारंभात साडी नेसून गेल्यावर तिथे दोन तरी बायका आठवण काढतात " अगं हीच साडी तू दोन वर्षांपूर्वी तमक्या समारंभात नेसली होतीस ना?" झाले ती साडी कपाटात पार मागे टाकण्यात येते. बायकांची स्मरणशक्ती फार असते.
३.भारतात कुठेही भटकंतीला गेल्यावर खरेदी करायची नाहीत या तत्त्वावर जातो.( गुजरात, राजस्थान,मप्र,तमिळनाडू, कर्नाटक)
मी बराच स्पीड ब्रेकर लावला आहे.
21 Jan 2026 - 2:02 pm | कपिलमुनी
जुन्या बाजारात कोपरा पकडून विकायला बसा. ५०-१०० ला एक जाते .
मी अशा साड्या / कपडे विकणार्या माणसाला विकले आहेत . पोतभर कपड्यांचे १००० घेउन आलो .
21 Jan 2026 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
त्यातल्या त्यात साड्या फार महाग असतात म्हणुन समस्याही मोठी होते. शर्ट्/पँट विरले/फाटले/विटले की देउन टाकता येतात किवा टाकुन देता येतात. टॉवेल/चादरी वगैरे पायपुसणी म्हणुन किवा ओटा पुसायला कामी येतात.
पुनर्वापर करायचा तर अधिकचे पैसे मोजावे लागतात, पण निदान पिशव्या, गोधड्या वगैरे शिवुन घेता येतील. आजकाल काही बुटीक छान ३ पीस वगैरे शिवुन देतात साड्यांचे. (माझ्या माहीतीत एक कमला नेहरु पार्क समोर आहे). तेव्हा जास्तीच्या साड्या तिकडे घेउन जा, ते पोत बघुन ह्याचा ड्रेस टिकाउ होईल का हे बघुन वेगवेगळ्या फॅशनप्रमाणे २पीस्/३पीस शिवुन देतात.
नाहीतर जुन्या बाजाराचा किवा दान करायचा पर्याय आहेच.
21 Jan 2026 - 3:14 pm | अमरेंद्र बाहुबली
श्री. रितेश देशमूख व सौ. जनाबाई डिसुझा ह्यांनी आपल्या आईच्या जुन्या साडीपासून आपल्या मुलाना कुडते शिवले होते.
बाकी ह्या घरातल्या साडीच्या पसाऱ्याला कंटाळून मी बेड ला दोन मोठे कप्पे करवून घेतले जी त्यात साड्या कोंबून कपाट मोकळे करवून घेतले. माझ्या एका खात्यात माझे सगळे कपडे मावतात! पण साड्यांना ३ कप्पे असूनही जागा कमी पडते!
21 Jan 2026 - 7:14 pm | चित्रगुप्त
पुर्वी हिरिरीने प्रतिसाद देणार्या मिपाबायका गायबलेल्या आहेत आता. बायकी विषयावर पुरुषी प्रतिसाद. गम्मत आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.
पण बायकोच्या कपाटे भरभरुन असलेल्या साड्यांची विल्हेवाट लावण्याबद्दल विषय काढण्याची पण कोणत्याही नवर्याची प्राज्ञा नाही.
साड्यांचे एक गाठोडे बांधून कुठेतरी टाकून येणे हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. कुणाला हव्या असल्या तर तिथून घेऊन जातील, आपण एकदा त्याग केला की त्या वस्तूचे काही का होईना. एकदा मनातून मोह सोडता आला, की सोपे आहे.
21 Jan 2026 - 8:11 pm | कंजूस
साड्यांपासून टू पीस पंजाबी ड्रेस, टॉप वगैरे सहज होतात. पण पातळ ( झिरझिरीत ) साड्यांना आतून अस्त्र लावावे लागते. माझी पत्नी घरीच शिवते. पण इतक्या ढीगभर साड्यांचे काय करायचे?
एक निरीक्षण- ठाण्यात गोखले रोडवरती साड्यांची बरीच दुकाने आहेत. तिथे तुम्हाला आई -मुलगा -आणि सून साड्यांची दुकाने फिरताना दिसतील. तिथल्या साड्या सहजच पंधरा हजारांच्या वरच्या असतात. पण आई पंजाबी ड्रेसमध्ये असते, सून जीन पँटमध्ये, मग यांना साडी कशाला हवी असते? मुलगा दुकानाबाहेरच ताटकळत उभा राहतो आणि शेवटी कार्ड देतो एवढाच त्याचा खरेदीतील सहभाग.
22 Jan 2026 - 9:42 am | धर्मराजमुटके
एक ही मारा लेकीन सॉलीड मारा १
22 Jan 2026 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(चित्र सौजन्य नवं तंत्रज्ञान )
साड्यांचे सदरे कसे होतील माहिती नाही आणि अशा सद-यांना लोकप्रियता मिळाली की हा प्रश्न बहुतेक वेळी पडणार नाही असे वाटले.
-दिलीप बिरुटे
23 Jan 2026 - 7:57 am | कंजूस
भारीच.
22 Jan 2026 - 2:58 am | सौन्दर्य
पूर्वी म्हणजे निदान १९९० पर्यंत तरी मुंबईत बोहारिणी दारोदार फिरत असत. जमल्यास त्यांच्याशी घासाघीस करून एखादा चमचा, वाटी किंवा गेला बाजार एखादा डबा मिळवता आला तर पहा. प्रत्येक दिवशी फक्त एकच साडी बोहारिणीला दाखवायची, घासाघीस करण्यात संपूर्ण दुपार सहज निघून जाईल. वर शांतपणा, सौजन्य, घासाघीस करण्याची कला वगैरे गुण अंगात जोपासता येतील.
अगदीच काही जमत नसेल तर साड्या घराबाहेर काढून ठेवा, नंतर त्यांचे काय झाले हे पाहू देखील नका. हल्लीच्या ह्या महागाईच्या जमान्यात घरातील एखादे कपाट रिकामे झाले तर तेव्हढीच जागा वापरायला मिळाल्याचे समाधान लाभेल.
22 Jan 2026 - 5:04 am | कंजूस
बोहारिणी प्रकार संपलेल्यात जमा आहे. म्हणजे त्या अजूनही फिरतात पण कपड्यांच्या बदल्यात देत असलेल्या वस्तू टाकावू असतात. टिकावू नसतात. क्वालिटी खराब असते. ज्या चांगल्या साड्या आश्रमवालेही घेत नाहीत त्या बदल्यात चमचे, पाट, टब कोण घेणार?
22 Jan 2026 - 4:42 pm | अभ्या..
सोलापूरला काशीकापडी म्हणून एक समाज आहे. जुने कपडे घेऊन ते नॉमिनल रिपेअर करुन किंवा तसेच विकायचा त्यांचा पारंपारिक धंदा आहे.
ते घेतात जुन्या साड्या पण त्याची फार कमी किंमत देतात. साड्या ह्या द्राक्ष, दाळींब बागा झाकण्यासाठी वापरल्या जातात.
.
जुन्या वस्तू विकण्यासाठी आणि त्यांची किंमत ठरवण्यासाठी जी सारासार बुध्दी लागते त्याचा प्रचंड अभाव शहरात दिसून आला आहे. ओएलएक्स, मायगेटसारख्या अॅपवर जुन्या वस्तूंच्या लावलेल्या किमती बघून हसावे की रडावे तेच कळत नाही. त्यात परत ती वस्तू विकली न गेल्याने पडून राहते आणि शेवटी स्क्रॅपवाल्यांच्या सांगेल त्या रेटमध्ये खालसा केली जाते.
वस्तूंचा आणि त्याच्या किमतीचा मोह फार बेक्कार.
.
ह्या कार्यक्रमासाठी, त्या लग्नासाठी म्हणून बायकोने हौसेने शेरवानी सदृश्य कुर्ते घ्यायला लावलेले, सगळे इकडे परदेशात येताना देउन टाकावे लागले. बरं वापरले म्हणावे तर एकेकदाच वापर झालेला.
त्यावेळी कळले कि कित्येक अनावश्यक वस्तू आपण गोळा करुन ठेवलेल्या होत्या. अगदी कारपासून छोट्या कॅन्व्हासपर्यंत सगळ्या वस्तू १५ दिवसात येतील तशा किमतीला देऊन पुन्हा नवीन संग्रह करायला सज्ज झालो आहोत.
22 Jan 2026 - 7:05 am | विजुभाऊ
पाट टब इत्यादी वस्तू घेतल्यानंतर त्या कुठे ठेवाव्यात हा प्रश्न निर्माण होऊ शकेल
22 Jan 2026 - 3:10 pm | अनामिक सदस्य
ज्या वागण्यावरून एका विशिश्ठ ठिकाणी राहण्यार्या आणि एका विशिश्ठ समुहातील लोकान्ना नावे ठेवली गेली, चेश्टा, टिन्गल टवाळी केली गेली, चिक्कू कन्जूस म्हणून हेटाळले गेले तेच आज Reuse, Reduce, Recycle करा म्हणून सर्वान्ना सान्गितले जात आहे.
मोठ्या, प्रसिद्ध लोकान्नी केले सान्गितले की ऐकले जाते (नपेक्शा 'follow' केले जाते).
काय हरकत आहे तीच साडी पुन्हा नेसायला? वेगळ्या जागी, वेगळ्या लोकानसमोर नेसावी.
मुळात हा विचार बदलत नाही तोवर हा प्रश्न सुटणार नाही. या नाहीतर वेगळ्या स्वरूपात समोर येत राहणार.
22 Jan 2026 - 5:44 pm | गामा पैलवान
जमलेल्या साड्यांचं काय करायचं ते माहीत नाही. पण साड्यांचा ढीग जमू नये म्हणून एक उपाय म्हणजे साड्या भाड्याने आणणे. याच न्यायाने जमलेल्या साड्या कदाचित भाड्याने देता याव्यात.
-गा.पै.
22 Jan 2026 - 5:49 pm | विजुभाऊ
साड्यांची लायब्ररी सुरू करा. अर्थात त्यासाठी जागा आणी सदस्य लागतील हे नक्की
22 Jan 2026 - 6:41 pm | अकिलिज
पण ब्लाऊजचं काय करणार. मॅचींग ब्लाऊज लायब्ररीत कसा मिळणार.
एकंदरीत प्रकरण किचकट आहे.
22 Jan 2026 - 7:46 pm | गामा पैलवान
ब्लाउजसाठी वेगळी लायबिरी खोला.
-गा.पै.
22 Jan 2026 - 7:20 pm | सुबोध खरे
आमच्या सासूबाई १० वर्षा पूर्वी अचानक गेल्या. त्यावेळेस त्यांनी आयुष्यभर मोठ्या हौसेने जमवून ठेवलेल्या साड्या वस्तू भांडी इ त्यांच्या सुनेने अक्षरशः कुणालाही देऊन टाकल्या.
माझ्या पत्नीने त्यातील काही आईने स्वतःच्या हाताने कशिदा केलेल्या साड्या आईची आठवण म्हणून घरी आणल्या. परंतु निदान ७५ तरी साड्या होत्या. प्रत्येक साडीच्या आत त्याचा परकर ब्लाउज त्याला साजेसे काही दागिने (उदा छल्ला) असे सर्व व्यवस्थित इस्त्री करुन ठेवलेले होते.
परंतु इतक्या साड्या घेऊन येणे शक्य नव्हते. बहुतांश साड्या या "अशाच कुणाला" तरी देण्यात आल्या
चार वर्षांपूर्वी आमचे वडील गेले तेंव्हा त्यांचे उत्तम शर्ट जे मला येतात ते मी आजही त्यांची आठवण म्हणून वापरत आहे. पण माझी उंची जास्त असल्यामुळे त्यांच्या पँट्स काही उपयोगी आल्या नाहीत. त्या ते काम करत असलेल्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना देण्यात आल्या.
आमचे वडील नेहमी सांगत असत. एखादी वस्तू आपल्याला नको असेल तर सरळ रस्त्यावर ठेवा. कोण घेऊन जातं आणि काय करतं हे पाहू नका. उगाच नको असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन तेवढ्यात पुण्य मिळवण्याचा हव्यास नको.
त्याप्रमाणे त्यांची पादत्राणे किंवा इतर वस्तू आम्ही अक्षरशः रस्त्यावर ठेवली. काही तासात गरजू व्यक्ती त्या घेऊन गेले.
गेली कित्येक वर्षे मी हा उद्योग करत आलो आहे. आपल्या मागे अशा नको असलेल्या वस्तू कोण घेऊन जातं याच्याशी तुम्हाला काय करायचंय?
22 Jan 2026 - 8:12 pm | अमरेंद्र बाहुबली
छान विचार! तुमच्या वडिलांचे विचार आवडले.
मध्ये एक माणुसकीची भिंत म्हणून उपक्रम निघाला होता, रस्त्यावर कुठेतरी असलेल्या भिंतीवर कपडे वगैरे टांगून जायचे, गरजू ते नेतील. पण अनेक गॅरेजवाल्यांनी हात पुसायला फडके झाले म्हणून पोतेच्या पोते नेले. हा उपक्रम नंतर दिसला नाही.
22 Jan 2026 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा, लै जीवघेणा विषय काढला. आमच्या इकडे, एक एक साडी जेव्हा कपाटातून आठवणीच्या रुपाने बाहेर पडायला लागते, तेव्हा या साड्यांचं काही तरी झालं पाहिजे असे कायम वाटले आहे. वरच्या कप्प्यातल्या खालच्या कप्प्यात येतांना त्या प्रत्येक साडीची एक दीर्घ कथा असते. साड्या अशा वरतून खाली, खालून वर जाताना. किंवा घरात हा साड्यांचा पसारा मांडलेला दिसलो की आपण पुरुष मेलोच समजायचे. हळवा विषय असतो. फार संयमाने तेवढा काळ घालवावा लागतो. संयमाने प्रतिसाद द्यावा लागतो. आपण असतो काही तरी कामात आणि यांचा प्रत्येक मोग-याच्या पाकळीप्रमाणे एक पाकळीचा साडीच्या आठवणीचा गंध यायला लागतो. प्रत्येक साडीच्या वेगळी आठवण. च्यायला लक्षात तरी कशा राहतात म्हणतो या कथा. ही तेव्हा घेतली होती, ही तेव्हा नेसले होते. अमक्याने घेतली होती. तमक्याने घेतली होती. ही चांगली होती आणि ती चांगली होती. कधी कधी जड अंतकरणाने त्या साड्या देऊन डबे घेताना पाहिलं आहे. साड्या आणि डबे दोघांचीही संख्या वाढतच जाते. पण, हा साड्यांचा आकंठ झरा अजून्ही काही आटला नाही. अधून मधून विशेष कार्यक्रमाच्या वेळी ही कशी दिसते आणि ती कशी दिसते यातूनही अजून काही सुटका झालेली नाही. आपण पण ही भारी ती भारी, असे अधून मधून दाद देत असतो. खोटं कशाला बोला. सुखी संसारासाठी दाद द्यावी लागते.
काही तरी उपाय नक्की कळवा.
-दिलीप बिरुटे
(संसारी आणि नम्र)
22 Jan 2026 - 8:41 pm | अनन्त्_यात्री
पण साडी या विषयावर कोकणात एक ग्राम्य म्हण आहे ती आठवली.."साडेसात साडे तरी भागुबाईचे xx उघडे"
23 Jan 2026 - 11:42 am | हणमंतअण्णा शंकर...
अलीकडे सगळ्या मराठी चित्रपटांमध्ये एक ट्रेंड बोकाळला आहे. त तो नाटकांमध्येही दिसतो. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तर हा ट्रेंड सगळीकडेच दिसतोय. आजकाल साड्यांचे कपडे फेटे ड्रेपरी म्हणून ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये वापरली जाते. वरती डॉक्टर बिरुटे सरांनी जे ए आय चित्र काढले आहेत साधारणतः त्याच स्टाईलमध्ये पण पारंपारिक म्हणजे कुर्ता वगैरे अशा स्टाईलमध्ये मी अनेक ठिकाणी साड्यांचे केलेले कपडे पाहिले. अलीकडची उदाहरणे दि फोक आख्यान या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे किंवा द किरण माने शो या कार्यक्रमातल्या लोकांचे कपडे. त्यामुळे बिरूटे सर म्हणतात तसा ट्रेंड इतर लोकांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. जर असे टेलर्स कोणी या साड्यांचे पारंपारिक कपडे किंवा नवीन कपडे करत असतील तर या सर्व साड्या रिपर्पज करता येतील. एखादा स्टार्टअप बिजनेस सुद्धा मास्केल वरती हे करू शकतो म्हणजे चांगल्या साड्या घेऊन तुम्हाला त्याच स्टार्टअप मधून हवे ते बाकीचे कपडे घेण्यासाठी कुपन देणे, बहुतेक कपडे हे याच साड्यांना रिपर्पज करून केलेले असतील.
जपानी लोक आपले की मोनो सुद्धा देऊ शकतात आणि तिथे तर किमोनो न्यूट्रल रंगाचे असतात साड्यांसारखे खूप कलात्मक आणि भरगच्च नसतात
23 Jan 2026 - 12:15 pm | हणमंतअण्णा शंकर...
आजकाल ते मान्यवर शिलाई यासारखे अनेक ब्रँड्स निघालेले आहेत ज्यांच्यामध्ये लग्नाचे कपडे मिळतात. पुरुषांचे लग्नाचे कपडे हा एक वेगळा धाग्याचा विषय आहे. मान्यवर सारख्या ठिकाणी एखादा नवा नवरदेव गेला की त्याच्यासाठी एक छोटेसे स्टेज तयार केलेले असते. नवरदेवाबरोबर केलेले तीन-चार त्याचे "मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" छापाचे मित्र असतात. असा बकरा आला की स्टोअरमधून दहा-पंधरा लोक त्या नवरदेवावर हल्ला चढवतात. त्याला विचारायला काही कळायच्या आतच तिकडून इकडून तिकडून लगेच वेलवेट चे कपडे मोठ्या महागड्या शेरवाण्या आणल्या जातात. नवरदेवाला चढवल्या जातात आणि लगेच त्याला आरशासमोर उभे केले जाते.
मला माझा किस्सा आठवला. माझ्या लग्नाआधी माझ्या मित्राचे लग्न झाले होते आणि त्याला मला घेऊन लग्नाचे कपडे काढायचे होते. परंतु मला काही कारणाने ते शक्य झाले नाही. जेव्हा तो 85 हजार रुपयांचे कपडे घेऊन आला स्वतःसाठी फक्त तेव्हा मला हसावे की रडावे हे कळेना. उभ्या संपूर्ण आयुष्यात अशी वेलवेट ची शेरवानी तो फक्त एकदाच घालणार होता, ते अत्यंत डिस्प्रपोर्शनल गचाळ दिसणारे हेल्मेट वजा फेटा तोही आयुष्यात एकदाच घालणार होता आणि तेवढ्यासाठी त्यांनी जवळजवळ लाख रुपये उडवले होते.
माझ्या लग्नामध्ये मग मी साडेतीनशे रुपयांचा अत्यंत स्वस्त एक जॅकेट आणले त्यावेळेस नेहरू जॅकेटचे मोदी जॅकेट असे नामकरण झाले होते. माझ्या काकूची एक जुनी पण चांगले पॅटर्न असलेली साडी घेऊन मी ते जॅकेट काकूच्या ओळखीच्या एका टेलरला दिले. ही टेलर वेगवेगळे hacks करण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध होती. तरी साडीचे काठ काढून त्या जॅकेट ला ते असे फिट केले की ते साडेतीनशे रुपयांचे जॅकेट तात्काळ 30000 रुपयांचे वाटू लागले. उरलेल्या साडीचा तिने अत्यंत चांगला असा फेटा देखील तयार केला. त्यानंतर एक बाराशे रुपयाचा मऊ सुती असा साधा कुर्ता आणि पायजमा आणि त्यावर हे जॅकेट आणि फेटा असा माझा लग्नाचा पोशाख तयार झाला. हा कुर्ता मी पुढे अनेक दिवस वापरला कारण तो नेहमीच्या वापराचाच होता खास लग्नासाठी केलेला नव्हता. माझा हा फेटा आणि हे जॅकेट नंतर माझ्या दोन मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरले. आता मला ते लहान होते नाहीतर ते अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि माझे लहान भाऊ कधीतरी ते कुठल्या ना कुठल्या समारंभाला घालत असतात.
23 Jan 2026 - 12:35 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे वा! माझे लग्न झाले तेव्हा मी देखील हे मान्यवर वगैरेत गेलो होतो, मला घेरून प्रचंड मोठा हल्ला स्टाफ ने चढवला होता, पण किमती पाहून मी यशस्वी माघार घेतली, व थेट रेंटने कपडे देतात त्यांच्याकडे गेलो, अडीच की ३ हजारात त्यांनी तो मान्यवरचाच शेरवानी सारखा काहितरी प्रकार भाड्याने दिला! ३ दिवसाने भावाबरोबर परत पाठवून दिला, जी गोष्ट आयुष्यभर नंतर कधी घालायची नाही तिच्यासाठी कपाटात जागा अडकवून का ठेवावी? नंतर मी अनेक लग्नात असे रेंट ने मिळणारे ब्लेझर्स वापरले ६०० रुपयात ३ दिवसासाठी उत्तम गुणवत्तेचे ब्लेझर्स मिळाले. असो हा विषय साड्यांचा आहे, साड्यांच्या बाबतीतही हा प्रकार करायला हवा.
23 Jan 2026 - 1:08 pm | Bhakti
अरे वाह! क्या बात है!
23 Jan 2026 - 1:07 pm | Bhakti
वाह वाह , प्लीज या ड्रेसचा फोटो पाठवा माझ्या नवऱ्याचा आणि भावाचा महागडा लग्नातला शेरवानी कपाटात जागा अडवतो. किती वेळा सांगते ड्रेपरीला विकून टाका तर माझ्याकडे किती पाषाण हृदयी आहेस म्हणून पाहतात .
साड्यांचे मला काहीच वावडे नाही .येऊ द्या अजून,, दिल मांगे मोअर !!
साड्यांचे ड्रेस शिवले पण ते जास्त वापरले जात नाही खूप भरजरी तर कधी ऑफ बिट वाटतात .
23 Jan 2026 - 1:14 pm | हणमंतअण्णा शंकर...
१. जॅकेट : ३५० रुपये
२. कुर्ता पायजमा : ११५० रुपये (जो साधा सोपा होता म्हणून पुढे अनेक वेळा वापरला गेला
३. टेलर चार्ज : फुकट (१०० रुपये धरू)
४. ब्रोच : उधार
एकुण वापर : अनेकदा, अजूनही वापरात
23 Jan 2026 - 2:49 pm | Bhakti
वाह ,काठही सुबक निवडले आहेत .फेटा तर क्लासच!!!ही आयडियाची कल्पना वापरणार आहे .धन्यवाद !
23 Jan 2026 - 1:04 pm | कंजूस
हा एक जुना लेख सापडला.
दुकानदाराकडून अपमान..
https://www.misalpav.com/node/29703
एवढं करून घेतलेल्या महागड्या साड्यांचं काय करायचं हा प्रश्न आहेच.
23 Jan 2026 - 9:53 pm | खटपट्या
पुर्वी साड्यांच्या गोधड्या शिवल्या जात असत. पण भरजरी साडया गोधड्यांसाठी वापरल्या जात नाहीत कारण त्यांची जर अंगाला खुपते. तरी ज्या सुती साड्या असतील त्यांच्या गोधड्या शिवाव्यात. आता तर गोधड्या शिवुन देणार्या संस्था आलेल्या आहेत. पुर्वी गोधड्या शिवुन देणार्या बायकांचा एक ग्रुप गल्लोगल्ली फिरत असे. आता तो ही दिसत नाही. बोहारीण हा प्रकार इतिहास जमा होत चालला आहे.
ठाण्यात कोपरी ला काही शतके जुना चिंधी बाजार भरतो. सर्व बोहारीणी तिथे जमा होतात. तिथे जाउन चौकशी करुन त्यांना पत्ता दिल्यास त्या घरी येउन योग्य भावात साडया घेउन जातात. या बोहारणींचे प्रभाग ठरलेले असतात. योग्य त्या बोहारीणीकडे तुम्हाला डायरेक्ट केले जाते.
25 Jan 2026 - 2:26 am | नूतन
नमस्कार मंडळी.प्रथम आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद .
प्रतिसाद वाचून ,माझ्याइतकाच हा प्रश्न तुम्हालाही गंभीर वाटला असं जाणवलं. (विशेषतः पुरुष मिपाकरांना). खरंतर हे लिहिताना मला महिला मिपाकरणींकडून या प्रश्नाचं काहीतरी उत्तर मिळेल अशी आशा होती. पण बहुदा बायकांच्या साडी खरेदी च्या सोसावर मी ताशेरे ओढले आहेत असा त्यांचा गैरसमज झाला की काय, असं वाटून त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नसावी असा आपला माझा तर्क! पण साड्यांइतकीच पुरुषांच्या समारंभीय कपड्यांची देखील हीच गोष्ट आहे, नाही का?
असो .या चर्चेतून सुचवलेले काही मार्ग असे आहेत..
१.कवडीमोलाने जुन्या बाजारात विकणे.. यासाठी मनावर दगड ठेवता यायला हवा
२. त्याचे ड्रेस शिवणे.. किती साड्यांचे शिवणार?
३ मोह सोडून गाठोडे बांधून टाकून देणे.. पुन्हा एकदा तेच
४ . विचार बदलणे ... कुणाच्या बोलण्याची पर्वा न करता त्याच साड्या पुन्हा पुन्हा वापरणे...हे बरोबर आहे. पण म्हणतात ना कळतं पण वळत नाही..
५ साड्यांची लायब्ररी करणे..यात ब्लाऊजचा मुद्दा महत्वाचा आहे. मॅचिंग मिळाला तरी मापात जमायला हवा. भाड्याच्या कपड्यांत पण हा प्रश्न येऊ शकतो असं वाटतं.
६ अभिनव कल्पना.. साड्यांपासून वस्तू बनवून विकणे. साड्या देणाऱ्यांना बदल्यात कूपन देणे...पण त्या नव्या वस्तू नको असतील तर कूपन घेणं निरर्थक होईल .
७ ठाम राहून फक्त दीर्घकाळ वापरले जातील असेच कपडे खरेदी करणे.
यातून सध्या तरी मी काढलेला निष्कर्ष असा..
मुळात अनावश्यक खरेदी न करणं.
कपडे खरेदी करताना ते पुन्हा पुन्हा वापरले जातील असेच घेणे.
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या सोयीनुसार वागणे.
आणि त्यातूनही मोह पडलाच तर चार घटकेची हौस झाली म्हणायची आणि फार विचार न करता कवडी मोलाने विकून टाकायचं अन्यथा गाठोडे बांधून टाकून द्यायचं.
तर सध्या पुरता माझ्या कडून या चर्चेला विराम देते. अर्थात काही वेगळा मार्ग असेल तर त्याचं स्वागत आहे.
25 Jan 2026 - 11:04 am | धर्मराजमुटके
मिपावर आता महिला राहिल्यातच कुठे ? एकेकाळी मिपावर अनेक उत्तमोत्तम लिहिणार्या लेडीज बायका होत्या त्या आता सगळ्या गायबल्यात.
त्यांच्यासाठी मिपावर लेडीज स्पेशल डबा बनविण्यात येणार होता तो देखील बनला की नाही कल्पना नाही.
असो.
स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :)
25 Jan 2026 - 1:58 pm | सर्वसाक्षी
स्त्रियांच्या साडी सारख्या गंभीर प्रश्नाची दखल मिपावरील पुरुष घेत आहेत म्हणजे पुरुष जात महिलांच्या प्रश्नांच्या संवेदनांप्रती जागरुक होत आहेत याचीच निशाणी नव्हे काय :)
साहेब,
चटका बसल्यावर वेदना होणारच! साठी घेणं, ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं.
साहजिकच या मुद्द्यावर पुरुष वर्ग भरभरून व्यक्त झाला तर नवल ते काय
25 Jan 2026 - 2:37 pm | धर्मराजमुटके
वेदना जाणावयास जागवू संवेदना हे गीत तुम्ही ऐकलं असेलच असं गृहित धरुन चालतो :)
25 Jan 2026 - 2:48 pm | सर्वसाक्षी
दुसऱ्याची वेदना जाणवायला संवेदना असावी लागते. स्वतः ची वेदना जाणवायला नाही. ती आपोआप जाणवते.
25 Jan 2026 - 2:42 pm | अभ्या..
ती घेण्याआधी साडी घेणं नुसतंच अगत्याचं नव्हे तर आवश्यक आहे हे कबूल करणं, आपण घेतली ती साडी काही जगावेगळी लाखमोलाची नसून चारजणी घेतात तशीच आहे हे ऐकून घेणं, साडी घेऊन झाली की पोलकं शिवायला शिंप्याकडे जाणं; तिथे वाळत घातलेल्या कपड्यासारखं दुकानाबाहेर तिष्ठत राहणं वर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं " काय माणूस आहे! चक्क लेडिज टेलरच्या दुकानाबाहेर उभा राहून वर आंत डोकावतोय" अशा नजरेनं पाहणं सहन करायचं, मग पोलकं आणण्यासाठी खेटे घालायचे, आणल्यावर ते नीट जमलं नसल्यास शिंप्याकडे पुन्हा सपत्नीक जाणं, मग साडी एकदा नेसून झाल्यावर ' सध्या तुझ्या कपाटात ठेव' या आज्ञेचं पालन करणं, मधेच कधीतरी ती ड्रायक्लिन करून आणणं आणि काही काळातच ' हल्ली या प्रकारच्या साड्या प्रचलित नाहीत' असा शेरा ऐकून साडी क्वारंटाईन करणं म्हणजेच आपल्या कपाटात कायमची ठेवून घेणं..... हे सगळं हसतमुखाने कधीही कसलीही नाराजी चेहऱ्यावर न आणता सहन करायला लागतं. शिवाय साडी जुनी झाली तरी टाकून दे असं न म्हणता निमूट बसणं.स्टोरी इथेच थांबत नाही. हे सगळे तर तमाम नवरोबांनी "अगदी अगदी" म्हणायलाच पाहिजे अशी घोषणा अहे पण पुढे ....
"बघ की क्रीती सॅनॉन कसली भारी नेसती"
"एकदा येवला/इंदूर/वाराणसी/म्हैसूर्/कोची/चेन्नै ला गेले की................"
"बघा तुमच्या मित्राने सेपेरेट वॉकिन वॉर्डरोब करुन घेतलाय बायकोसाठी...."
"कपाटातल्या काही आईला/बहिणीला देते मग जागा रिकामी झाली की....."
"एखादी तरी पैठणी किंवा सिल्क पाहिजेच सुनेला द्यायला वारसा म्हणून......."
"शेवटी साडीचा ग्रेस साडीलाच....."
.
हे अगली बार..... असतेच.......