मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
1 Jan 2009 - 10:09 pm

नमस्कार मित्रानो
नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख .
हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.

कोऽहमचा पुकारा

3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे. या काळात आपण, काय कमावले, काय गमावले याचा लेखाजोखा घेतो. चुकातून शिकतो, आनंदातून स्फूर्ती घेतो. मात्र, कधी कधी अनेक गुंते सोडवताना आपला आपल्यालाच प्रश्न पडतो, मी कोण ? (कोऽहम?) एखाद्याचा दीर, बाप, मुलगा, पती इ. नातेसंबंधात तर हा प्रश्न आपणांस हजारदा पडतो. आजही आपल्या सर्वांना तोच प्रश्न पडायची गरज आहे. मी कोण ? पण वेगळया अर्थाने.

हा प्रश्न आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनाबाबत पडला पाहिजे. कारण, याच प्रश्नावर आपली भविष्यातील धोरणे ठरलेली आहेत. ठरणार आहेत. म्हणूनच, जेंव्हा मानवाला मी कोण हा प्रश्न पडतो. तेंव्हा माणसाला खऱ्या अर्थाने मानवपण येते. कारण, हा प्रश्न विचारायची ताकद, कुवत फक्त माणसात आहे, इतर जगात नाही. म्हणूनच, मानवाला खऱ्या अर्थाने माणूस होण्यासाठी हा प्रश्न पडला पाहिजे. आणि त्याचं उत्तर देखील असं असलं पाहिजे, मी माणूस. पण, या दोन शब्दात फार मोठा अर्थ सामावला आहे. कारण, मानव ही भूतलावरची एक वेगळी गोष्ट आहे. निर्माणकर्त्याने मानवाला कांही देणग्या दिलेल्या आहेत. त्याने, त्याला बुध्दी, मन, नामक कांही अद्भुत शक्त्या दिलेल्या आहेत. म्हणूनच, जेंव्हा आपण स्वत:ला माणूस म्हणवतो. तेंव्हा या सर्वांचा योग्य वापर करणे आपली जबाबदारी होते. निर्माणकर्त्याने आपल्याला शक्त्या दिल्यात त्या फूकट नाहीत. जग नीट चालावे यांसाठी त्या आहेत. म्हणूनच, त्या शक्त्यांसोबत कांही कर्तव्येही आपल्यासोबत येतात. आणि, जेंव्हा आपण स्वत:ला माणूस म्हणवतो. तेंव्हा त्या कर्तव्याचे पालन आपण केलेच पाहिजे.

आज याचीच गरज आहे. 2009 साल येताना आपल्यासोबत अनेक प्रश्न घेऊन आलेले आहे. जागतिक मंदी ते दहशतवाद अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात आज जग अडकले आहे. आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी माणसातील माणूसपण जागे करणे हा एकमेव उपाय आहे. पहिली गोष्ट, म्हणजे माणूस हा भोगवादी नव्हे. पशू भोगवादी असतात. त्यांच्या जीवनात भोगही एकमेव गोष्ट असते. पण, माणसाबाबत तसे नाही. निर्माणकर्त्याने मानवाला करण्यासारख्या अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणूनच, आपण आपल्या भोगावर नियंत्रण आणावयास हवे. मानव मानवपण विसरून भोगवादी झाला आणि जीवनचक्राचा समतोल बिघडला. त्याचाच परिणाम म्हणजे मंदी. अति तेथे माती हे सत्य आहे. पण जेंव्हा मानव स्वत: वरचा ताबा सुटू देतो. तेंव्हा तो फक्त एक क्रूर पशु असतो बस ! आणि हो, मनावर ताबा ठेवण्यासाठी देवाने अनेक सोयी दिल्या आहेत. त्यापैकी महत्वाच्या सोयी म्हणजे संस्कार व शिक्षण. समाज आला म्हणजे हजार प्रकारांची माणसे आली. मग, त्यात दोषही आले. रामराज्यात रावण होताच ना ? पण, आज असे लोक एकत्र येऊन या दोषांचेच उदात्तीकरण करू लागले आहेत व आपणही आंधळेपणाने त्याचा स्वीकार करत आहोत. आजकाल आईवडीलच मुलाला अपेयपानास प्रोत्साहन देतात. हे कसले संस्कार ? आपणांस बुध्दीची देणगी आहे. पण, आपण तिचा वापर करत नाही. नाही तर विनाशाकडे जाण्याची शिकवण आपण आपल्या पाल्यांना दिली नसती. म्हणूनच, मी कोण ? असा प्रश्न विचारताना आपण आपल्या शक्ती पूर्णपणे व योग्यरितीने वापरतो का याचा आढावा घेणे महत्वाचे.

मानवाला मिळालेली आणखी एक देणगी म्हणजे बुध्दी. या देणगीचा वापर योग्य व मर्यादित करणे ही तारेवरची कसरत आहे. कांही लोक विज्ञानयोगी मानवाचा दाखला देत आम्हांस पूर्वजांचे लिखाण, कृती मान्य नाही असे म्हणत बुध्दीप्रमाण्याचे गोडवे गातात. पण, ते हे विसरतात की ज्ञानयोग प्राण्यात असतो. प्राणी आपल्या पूर्वजांकडून जे ज्ञान येते, ते घेतात आणि तसेच्या तसे वागतात. त्यांच्याकडे विचार, भावना यांची ताकद नाही. पण, मानवाकडे मन, विचार आहेत त्याद्वारे माणसाने आपली क्रुती,विचार पडताळुन पाहायचे आहेत. म्हणून मानव मनवादी आहे. त्याने बुध्दी आणि विचार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. बुध्दीप्रामाण्याचा गाजावाजा केला म्हणजे तुम्ही प्रगत होत नाही. फक्त बुध्दी वापरल्याने नुकसानच होते. भ्रष्टाचार करणारे पण बुध्दीवानच असतात ना ? इथे परत आपण मी कोण ? वर येऊन थबकतो. हे झाले विचारांचे, कांही वेळेला बुध्दीवर मनाचे नियंत्रण लागते. महाजालावर वावरणाऱ्यांना याबद्दल जास्त सांगणे न लागे. पण उदाहरण द्यायचे झाले तर गेल्या 10 दिवसात भारतीयांनी पाकिस्तानच्या तर त्यांनी भारताच्या सर्व मोठया ऑर्कुट कम्युनिटी हॅक केल्या. युध्दाची नांदीदेखील नसताना तरूणांनी भावनेच्या भरात ही कृत्ये केली. पण, नकळत याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याचे काय ?

आता एक प्रश्न येतो तो दहशतवादाचा. निसर्गनिर्मितीनुसार मानव समाजप्रिय आहे. मानव समाजाशिवाय जगु शकत नाही. त्यामुळे आपण समाजाला त्याच्या गुण दोषांसह स्वीकारले पाहिजे. विविध वेळी, प्रसंगानुरूप समाजाचा पाय घसरू नये. म्हणून जात, धर्म यांची निर्मिती केली गेलेली आहे. पण, त्यांवर राजकारण करणे, भावना भडकवणे अयोग्य आहे. कारण सर्वांचे मार्ग वेगळे असले तरी संदेश एकच आहे. म्हणूनच आपण सहिष्णूता बाळगणे आवश्यक आहे. जेंव्हा आपण ही गोष्ट समजून घेऊ तेंव्हा आणि फक्त तेंव्हाच आपण दहशतवादासारख्या प्रश्नाला तोंड देऊ शकतो. हीच गोष्ट आर्थिक बाबतीत. जसा एखाद्या देशाला प्रगतीसाठी जसा उद्योजक पाहिजे ना तसा रस्त्यावरचा केर काढायला देखील माणूस पाहिजे. आपण कितीही म्हणलं तरी हेच सत्य आहे. मात्र, आज दहावी नापास देखील पदवीधर होतात. (तशे कोर्स आहेत.) मग, एखाद्याला जेंव्हा कुवतीपेक्षा जास्त मिळते तेंव्हा कोऽहम मधला अहम् जागा होतो आणि तो त्याला झाडू उचलण्यापासून परावृत्त करतो. इथे त्याची तात्कालिक प्रगती होते. मात्र नंतर, काम न झेपल्याने तो कोसळतो. अगदी कायमचा.

10 कोटी बेकार एका देशात होतात. ते त्यामुळेच. तेंव्हा आता जरी विरोध झाला ना तरीही भपकेबाजी नष्ट करणे गरजेचे आहे. कारण तेंव्हाच एखादी व्यक्ती तटस्थपणे मी कोण ? चा शोध घेऊ शकतो. स्वत:चे प्लस, मायनसेस् शोधू शकतो.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, माणूसपणासोबतची कर्तव्ये पार पाडणे. निसर्गरक्षण हे एक महत्वाचे कर्तव्य आहे. मागे म्हटल्याप्रमाणे आपण भोगवादी नाही. त्यामुळे, अख्ख्या जीवनात निसर्ग आपणांला जे भोगायला देतो. मग, ते चांगलं असो की वाईट त्याबद्दल आपण त्याचे आपल्या कृतीतून आभार मानले पाहिजेत. निदान कृतघ्नपणे वागू नये. हे माणूसपणाचे कर्तव्य आहे. ज्यायोगे मानव एक सुसंघटीत, नीट जीवन जगू शकतो. म्हणजेच, शक्ती आणि कर्तव्ये ही परस्परपूरक आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे माणसाला माणूसपणे येते. तेंव्हा कोऽहम ? ला माणूस असे उत्तर देताना आपण या सर्व गोष्टी करतो का याचा विचार केला पाहिजे आणि जर या गोष्टी आपल्या हातून घडत नसतील. तर, आता आपण स्वत:ला बदलले पाहिजे. कारण, ते आपल्याच फायद्याचे आहे.

आणि एवढा बुध्दिवादी डोस मिळाल्यावर एक प्रश्न उरतोच कीं, हे जे बोलले वा लिहिले तेच खरे कशांवरून तर मित्रांनो, तुम्ही कल्पनेवर विश्वास ठेवा अगर ठेवू नका. पण, जे अस्तित्वात आहे. ते तुम्हांला मानावेच लागेल आणि गेली 10-15000 वर्षे मानव या तत्वांनी अगदी गुण्यागोविंदाने नांदला आहे. आणि काळानुसार त्यात योग्य बदलही झाले आहेत. आणि, म्हणूनच आपण सर्वांनी स्वत:ला मानव म्हणताना या गोष्टी जरूर विचारात घेतल्या पाहिजेत. कारण, आता विचार करायची वेळ आलेली आहे.

तर, मित्रांनो आलेले नवे वर्ष अगदीच सोन्याच्या पावलांनी आलेले नाही. ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. आणि त्याला आपणच कारणीभूत आहोत. आणि, म्हणूनच तो प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला कोऽहम ? म्हणजे कोण मी ? हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. आणि, आपण त्यांवर माणूस असे आत्मविश्वासने उत्तर देणेही गरजेचे आहे व त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण, जो ते करेल. काळ त्याचा गुलाम आहे. तेंव्हा प्रत्येकाला कोऽहम ! हा प्रश्न पडो आणि त्याचे त्याला यथायोग्य उत्तर मिळो ह्याच नववर्षाच्या शुभेच्छा !

विनायक वा. पाचलग,
कोल्हापूर.

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

पक्या's picture

2 Jan 2009 - 5:22 am | पक्या

छान लिहिले आहेस , को.दा. मनाच्या कुपीतले विचार समर्पक शब्दात मांडले आहेस.
मराठी च्या प्रश्न पत्रिके मध्ये निबंधाला हा विषय असता तर तुला १० पैकि १० मार्क फॉर शुअर.

प्राजु's picture

2 Jan 2009 - 8:47 am | प्राजु

छान लिहिले आहेस.माणसा माणसा कधी होशील माणूस... याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक पाचलग's picture

2 Jan 2009 - 11:09 am | विनायक पाचलग

धन्यवाद काल असेच बसलो होतो म्हटले जरा वेगळ्या प्रकारे लोकाना शुभेच्छा कशा द्यायच्या
आणि लगेच सुचले आणि टायपुन काढले धन्यवाद

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले