चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Aug 2024 - 1:55 pm

चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास

भारताच्या पहिल्या पॅरालिंपिक्समधील सुवर्णपदक विजेत्याची कहाणी

✪ ९ गोळ्या लागूनही आणि अर्ध शरीर लुळं पडूनही केलेला जिद्दीचा प्रवास
✪ १९५२ मध्ये खाशाबा जाधवांकडून मिळालेल्या प्रेरणेची १९७२ मध्ये सुवर्ण झळाळी
✪ सांगली जिल्ह्यातल्या मुरलीकांत पेटकरांची अविश्वसनीय झेप
✪ “मुझे उस हर एक के लिए लड़ना है जो चँपियन बनना चाहता है!”
✪ "पैर तो मछली को भी नही होते हैं!”
✪ अतिशय उत्तम पटकथा, मांडणी व चित्रण
✪ इतका मोठा पराक्रम परंतु लोक विसरून गेले

नमस्कार. सध्या सर्वत्र ऑलिंपिकचं वातावरण सुरू आहे. भारताच्या आणि इतर देशाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष आहे. भारताचं सुवर्ण पदक थोडक्यात हुकलं आहे. ऑलिंपिक्स झाल्यावर लवकरच आता दिव्यांग व्यक्तींचे पॅरालिंपिक्स सुरू होतील. अशाच एका पॅरालिंपिक्समध्ये भारताला स्विमिंगमधलं पहिलं (आणि आजवरचं एकमेव) सुवर्ण पदक मिळवून देणा-या मुरलीकांत पेटकरांची ही कहाणी. नुकताच रिलीज झालेला कार्तिक आर्यनची मुख्य भुमिका असलेला चंदू चँपियन हा ह्या सत्यकथेवर आधारित चित्रपट बघण्यात आला. कोणताही मसाला नसलेला, भडक दृश्यांचा भडीमार नसलेला अतिशय संतुलित आणि दृढनिश्चय, संकल्प, हार न मानणे, प्रयत्नांची शर्थ, मैत्रीची व गुरूंची साथ अशा अनेक गोष्टींची उत्तम मांडणी असलेला चित्रपट.

सांगली परिसरातल्या छोट्या गावात १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून देणा-या खाशाबा जाधवांना बघून ऑलिंपिक मेडलची प्रेरणा घेणारा ८ वर्षांचा मुलगा म्हणजे मुरली- मुरलीकांत पेटकर! पुढे ते कुस्ती शिकले. नंतर सिकंदराबाद EME (Electronics and Mechanical Engineering Corps) मध्ये सैनिक झाले आणि बॉक्सिंगही शिकले. तिथून १९६४ च्या टोकिओ मिलिटरी खेळांमध्ये बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत पोहचले. परंतु १९६५ च्या युद्धामध्ये मुरलीकांत पेटकरांना ९ गोळ्या लागतात आणि त्यांच कमरेच्या खालचं शरीर लुळं पडतं. दोन वर्षे ते कोमामध्ये असतात. पुढे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. ९ गोळ्या लागूनही जीवंत राहिलो हा चमत्कार मानून आलेलं अपंगत्व सहन करत राहतात. ऑलिंपिकच्या सुवर्णपदकाचं स्वप्न विसरून एक उपेक्षित जीणं जगत असतात. एका निराशेच्या क्षणी ३० झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करू बघतात. पण दैव बलवत्तर असतं, त्या गोळ्या उलटीतून बाहेर पडतात आणि ते वाचतात. आपल्याला नक्की काही तरी करायचं आहे, ही प्रेरणा परत जागी होते. त्यांचे कोच त्यांचे सारथी होतात. "पैर तो मछली को भी नही होते हैं," हे सांगून नवीन दिशा देतात. स्विमिंग! कमरेखालच्या शरीराचा वापर न करता ते पोहायला शिकतात! कालांतराने एशियन गेम्समध्ये पोहण्याच्या स्पर्धेसाठी पात्र होतात.

अडचणी तरी किती याव्यात. अर्धं शरीर काम करत नसूनही केलेले व्यायाम हे थक्क करणारे आहेत. जिन्दगी बस गुज़ार रहा हूँ ते सपना देख रहा हूँ, ही वाटचाल अविश्वसनीय अशी चित्रपटातून उलगडते. त्यांची तयारी, जिद्द आणि मेहनत बघून त्यांना १९७२ च्या म्युनिक पॅरालिंपिक्समध्ये पोहण्यासाठी जायची संधी मिळते. दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या त्रासावर मात करून ते ५० मीटर फ्रीस्टाईल गटामध्ये पात्रता फेरीत पोहचतात. तिथून पुढच्या फेरीत जातात आणि पुढे त्यांच्यासारख्याच इतर दिव्यांग स्पर्धकांसोबत स्पर्धेत भाग घेऊन सुवर्ण पदकही प्राप्त करतात! शरीराची कमतरता जिद्दीने आणि आजवर आलेल्या अडथळ्यांवर मात करण्याच्या तीव्र इच्छेने भरून काढतात.

ह्यावेळी त्यांच्यासारखेच हात- पाय नसलेले अनेक दिव्यांग खेळाडू कसे केवळ जिद्दीने आणि दृढनिश्चयाने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवतानाच्या दृश्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी खूप काही करता येणं शक्य आहे, हा विश्वास हा चित्रपट देऊन जातो! इतका मोठा भीम पराक्रम करूनही पुढच्या काळात भारताला ह्या वीराचा विसर पडला. पराक्रमाचं एवढं मोठं तेज- पण तेही अनेक दशकांसाठी नजरेआड झालं! पण काळाच्या ओघामध्ये ही चूक दुरुस्त होते आणि मुरलीकांत पेटकरांना २०१८ मध्ये अखेरीस पद्मश्री पुरस्कार दिला जातो व योग्य तो सन्मान केला जातो. खाशाबा जाधवांकडून मुरलीकांत पेटकरांनी घेतलेली प्रेरणा अखेरीस मुरलीकांत पेटकरांनाही त्याच उंचीवर नेऊन ठेवते व पुढची पिढी त्यांच्याकडून प्रेरणा घेते.

असा हा आवर्जून अनुभवावा असा चित्रपट! सत्यकथेवर आधारित. चरित्र नायक मराठी असल्यामुळे आपल्याला हा आणखी जास्त भावतो. अर्थाने सैनिक कसा घडतो, सैनिक कसा झुंजतो, कसे संघर्ष करतो हे चित्रण त्यात आलं असलं तरी 'लड़ाई बड़ी कमिनी होती है, लड़ानेवालों का कुछ नही जाता है पर लड़नेवालों का सब कुछ जाता है,' अशी हळवी बाजूही हा चित्रपट दाखवतो. शरीर अपंग झालं तरी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर खूप काही साध्य करता येतं हे ह्यातून कळतं. हळुवार विनोदाच्या शिडकाव्यामध्येसुद्धा हा चित्रपट रोमांच आणि वेग टिकवून ठेवतो. Last but not the least, अनेक मराठी कलाकारांचे नेटके अभिनय त्यात आहेत! आणि हो, माझा भाऊ आरोह वेलणकरचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे! तेव्हा चंदू चँपियन हा चित्रपट नक्की पाहा आणि मुलांना आवर्जून दाखवा (ओटीटीवर उपलब्ध). कुठेच कोणताही भडकपणा नाही. अगदी थेट सुवर्णपदकाचा वेध घ्यावा असा सोनेरी चित्रपट! हा चित्रपट आल्यानंतर तरी हा पराक्रम विस्मरणात जाऊ नये आणि नवीन पिढीला ही प्रेरणा मिळेल हीच इच्छा. धन्यवाद.

- निरंजन वेलणकर दि. ११ ऑगस्ट २०२४.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! हा लेख इंग्रजीमध्येही मी लिहीला आहे. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

व्यक्तिचित्रणचित्रपटसमीक्षाबातमी

प्रतिक्रिया

खडकीमधील क्वीन्स मेरी व पॅराप्लेजीक रिहॅबिलिटेशन सेंटर बरोबर जवळचा संबध व त्यांचे कठीण दररोजचे आयुष्य बघताना मी किती नशीबवान आहे याचा साक्षात्कार झाला.

लेख लिहिल्याबद्दल मनापासून आभार.

लेखात लिहिल्याप्रमाणे कुठलाही बटबटीतपणा नसलेला उत्तम biopic आहे. हल्लीच्या १०० Cr - १००० Cr club वाल्या व्यायसायिक चित्रपटांच्या तुलनेत अत्यंत सरस आहे आणि नक्की पाहण्यासारखा आहे.

असे चित्रपट येत राहोत व पुढील पिढीपर्यंत त्यांचे पराक्रम पोहचत राहोत...

आपला लेखदेखील 'चंदू चॅम्पियन' प्रमाणे उत्तम..!!

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2024 - 6:12 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलंय !

त्यांच्या कर्तृत्वाला, त्रीवार सलाम ! मनोमन वंदन !

असे सिनेमा येत राहतात हे किती भारून टाकणारे आहे !

सिनेमाच्या टीमचं खास कौतुक केलंच पाहिजे !

मार्गी's picture

16 Aug 2024 - 5:28 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद व नमस्कार!