गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी.
एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक.
“हलो, अनंत, मी परब. आठवतंय?”
लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज.
मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला. एका स्त्रीचा करारी आवाज ऐकू येत होता,
“यू ब्लडी फूल...”
डाव्या हाताकडे पाहिले तर तो आपल्या जागी व्यवस्थित दिसत होता.
“सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? एक मिनिट, पाणी आणून देते. पाणी प्या म्हणजे बरं वाटेल.” माझी सेक्रेटरी शर्ली गोड आवाजात बोलत होती.
तिने आणून दिलेले थंड गार पाणी प्यालो. थोडं बरं वाटलं.
“शर्ली, काय झालं?”
“सर, मी हे लेटर फायनल करून तुमच्या सहीसाठी आणलं होतं तर तुम्ही उजव्या हातानं सगळीकडे चाचपत होता. माझ्याकडे, सर, तुमचे लक्ष नव्हतं. मी काहीतरी बोलले पण ते तुम्हाला ऐकू गेले की नाही काय माहित. मी थोडीशी घाबरले. आता ठीक आहे ना?”
“हो, इट्स ऑलराईट नाऊ. आणि थँक्स.”
हल्ली हे असं होतंय. विस्मरण म्हणजे माझ्या मोबाईलचा नंबर आठवत नाही. एकदा तर संध्याकाळी बायको बरोबर बागेत फिरत असताना मी माझे नाव विसरलो. घराचा पत्ता विसरलो.
“हलो, अनंत. मी परब. आठवतंय?”
तोच तो पॅनिक अटॅक. तीच लोकांची धावपळ. त्याच स्त्रीचा आवाज.
“व्हाट द फक, मूव्ह क्विक...ही इज सिंकींग.”
कुणीतरी माझ्या दंडाला धरून बोलत होतं, “अरे असं काय करतोयस? बरं वाटत नाहीये का? ह्या बाकावर बस तरी जरा.”
पॅनिक अटॅक. जसा आला तसा गेला.
कुणीतरी सुटकेचा निश्वास टाकला.
“जस्ट सेव्ड. चेक हिम आउट. त्याला विचार नाव काय, मोबाईल नंबर काय?”
“नाव, अनंत रामचंद्र कर्वे, मोबाईल नंबर ९८२३३.....”
“छान! लुक्स लाईक ही इज ओके, मॅडम.”
“अरे, तुला काय झालाय? तू कुणाशी बोलतोयस?”
“मॅडमशी.”
“कोण मॅडम?”
“माहित नाही.”
बायकोने माझा ताबा घेतला आणि गाडीत घालून डॉक्टर दिवटेंच्या इस्पितळात आणले.
डॉक्टर दिवटे आमचे फ्रेंड आणि फॅमिली डॉक्टर.
बायकोने सगळा किस्सा वर्णन केला.
“काय अंत्या, काय नाटक चाललाय? ऑ.”
दिवटेनी ब्लड प्रेशर तपासले. अजूनही काही तपासण्या केला.
“वहिनी, सगळे नॉर्मल आहे. प्रेशर थोsssडे हाय हाय आहे आणि लो अगदी लो आहे १५०/५५. लो ब्लड प्रेशरचा अटॅक असावा. वैनी पुन्हा अस झालं तर लगेच साखर खायला द्यायची. लिमलेट गोळ्या लिहून देतो. त्या नेहमी खिशात ठेवायच्या. अंत्या, “त्याच्यावर” थोडा कंट्रोल ठेव. नाहीतर गोळ्यांचा रतीब लावावा लागेल. आणि पळ.”
“त्याच्यावर म्हणजे कशावर?” बायकोने विचारले.
पण उत्तर द्यायला डॉक्टर थांबले नाहीत. बिझी माणूस.
हळू हळू सगळे सुरळीत झाले. परब पुन्हा माझ्या डोक्यात डोकावला नाही.
पण त्याची जागा आता शर्लीने घेतली. शर्ली म्हणजे तीच ती माझी सेक्रेटरी.
तिला पगारवाढ पाहिजे होती.
“सर महागई केव्हढी वाढली आहे! माझा नुसता मेकअपचाच खर्च आता महिना दहा हजारात गेला आहे. कसं जगायचं स्रियांनी.”
“लिपस्टिक आणि नेल पॉलिश. दररोज चेंज करायची गरज आहे का? दिवसातून दोंदाच्या ऐवजी दोन दिवसातून एकदा...”
“सर, तुमच्या सेक्रेटरीला ते शोभून दिसेल का? त्यापेक्षा तुम्ही माझा पगार का नाही वाढवत?”
“शर्ले, आताच तर तुला हजारचा रेज दिला होता ना.”
“आत्ताच? सर.त्या गोष्टीला सहा महिने झाले. जेव्हा आपले पंप्र रशियाला गेले होते तेव्हाची गोष्ट!”
शर्लीचे असे रडगाणे दर रोज चालू होते.
पूर्वी शर्लीचा प्रसन्न चेहरा दिसला कि बरं वाटायचं. पण हल्ली मात्र तिला पाहिले कि डोकं गरगरायला लागते. डोक्यात तिडीक उठते. असं का होत असेल?
हे असे रुटीन आयुष्य जगत असताना लता वैनिंचा फोन आला.
लता वैनी म्हणजे माझा परमप्रिय मित्र राघव जोशीची पत्नी. ( अवांतर, त्या कांदापोहे फर्मास बनवतात. असो.)
“हा बोला वैनी. काय कांदापोह्याचा बेत आहे...)
मला मधेच कटाप करून त्या म्हणाल्या, “तुम्ही ताबडतोब असाल तसे इकडे या.” फोन बंद झाला होता.
त्यांचा आवाजावरून त्या खूप घाबरलेल्या असाव्यात असे एकूण दिसत होते.
मी तत्काळ राघवच्या घरी पोचलो.
दरवाजा उघडावयाच्या आधी वैनिनी आतूनच विचारले, “कोण आहे? राघव घरी नाहीये.”
“मी अनंता आलोय.”
“जरा डाव्या बाजूला सरकून उभे रहा. हा ठीक आहे. मला दिसलात तुम्ही. मी दरवाजा उघडते,”
वैनिनी पुन्हा एकदा दरवाजा किलकिला करून खात्री करून घेतली आणि हळूच दरवाजा उघडला. तितक्याच त्वरेने बंदही केला.
“काय प्रकार आहे? तुम्ही एव्हढ्या का घाबरल्यात? राघव कुठाय?” मी एका दमात सगळे प्रश्न विचारले.
“राघवला ते लोक घेऊन गेले,”
“कोण लोक. मला काही समजेलसा सांगा.”
“एका तासापूर्वी पाच सहा धटिंगण घरात घुसले आणि राघवच्या छाताडावर बसून त्यांनी राघवला कसलेतरी इंजेक्शन दिले. मग दोघांनी बाहेर जाऊन एक स्ट्रेचर आणला. त्याच्यावर बेशुद्ध राघवला झोपवला आणि घेऊन गेले. माझी तर भीतीने बोबडी वळली. तरी धैर्य एकवटून मी खिडकीबाहेर बघितले. एका अब्युलंसमधून ते लोक निघून गेले. प्रसंगावधान राखून मी अब्युलंसचा नंबर लिहून घेतला. हा पहा.” एव्हढे बोलून त्या रडायला लागल्या.
“रडू नका. घाबरू नका. अजून आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. आपण पोलिसात तक्रार करू.”
मी हे बोलत असताना दरवाज्याला लाथ मारून दोन गुंडे आत घुसले.
“कोण पोलिसात कंप्लेट करायच्या बाता करतोय? तुम्हीच का मिसेस कर्वे? तुमचे मिस्टर सुखरूप परत यावेत अशी इच्छा असेल तर कुठेही कंप्लेट करायची नाही. शहाण्या मुलासारखं चूप बसायचं.”
प्रतिक्रिया
12 Aug 2024 - 2:29 am | कंजूस
होय, चूप बसतो पुढचा भाग येईपर्यंत.
"शहाण्या मुलासारखं चूप बसायचं." व्हय.
12 Aug 2024 - 8:54 am | भागो
संपादक महाशय,
ह्या कथेत थोडा टेक्निकल लोचा झाला आहे, ही कथा मी पुन्हा लिहित आहे. तेव्हा कृपा करून ही कथा डिलीट केलीत तर उपकार होतील.
आ. न.
भागो.
12 Aug 2024 - 9:13 pm | भागो
प्लीज हा लेख डिलीट व्हायची वाट बघतो आहे.
आ. न.
भागो.