बाजीरावांची टोलेबाजी: १०: विश्वकोशात कुळकर्णी...

बाजीराव's picture
बाजीराव in जनातलं, मनातलं
23 Dec 2008 - 9:31 pm

विश्वकोशात कुळकर्णी!

मराठीचा प्राध्यापक कुळकर्णी हा माझा सख्खा शेजारी. मी बेताचं वाचणारा. तो कुठल्याही विषयावर व्याख्यानं ठोकणारा. वृत्तपत्रातून त्याचे विद्वत्तापूर्ण की काय म्हणतात तसले लेख नेहमी प्रकाशित व्हायचे. त्याच्या कुठं कुठं झालेल्या व्याख्यानांच्या बातम्या सतत पेपरात फोटोसकट छापून यायच्या. शेजारी म्हणून दिसेल तेव्हा एकमेकाला नमस्कार करणं एवढ्यापुरते आमचे माफक संबंध. मी जमेल तेवढं कुळकर्ण्याला टाळायचोच. आपले नाव छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांचा त्याने अल्बम केला होता. तो ज्याला त्याला दाखवण्याचा त्याला छंद होता. वर पुन्हा "नॅक"साठी ही कात्रणं सांभाळावी लागतात असं म्हणायचा. ही काय नॅक होती कुणास ठाऊक. पण नॅकसाठी सध्या सर्व प्राध्यापक मंडळी एकमेकांना एकमेकांच्या कॉलेजात बोलावून हळदीकुंकू समारंभासारखे परिसंवाद, व्याख्याने असे कार्यक्रम घडवून आणतात असे सांगायचा. त्याच्या हॉलमधील शोकेस त्याच्या साहित्यसेवेला आणि व्याख्यानबाजीला मिळालेल्या असंख्य स्मृतिचिन्हांनी, पुरस्कारांनी खचाखच भरली होती. त्यातही सदाशिवपेठ पुरातन ग्रंथ पुनर्विकेता संघ, पुणे; साहित्यप्रेमी अडत व्यापारी मंडळ, न्यू मार्केट यार्ड, भुसावळ; शब्दभरारी युवक मंडळ, बेणेवाडी, ता. शिरवळ, जि. सातारा; यांचे पुरस्कार फार मानाचे व प्रतिष्ठेचे असल्याचे तो सांगायचा. हे पुरस्कार, तो कात्रणांचा अल्बम कुळकर्ण्याच्या रनिंग कॉमेंट्रीसह पाहण्यात अनेक सुंदर संध्याकाळी वाया गेलेल्या असल्यानेच त्या दुपारी कुळकर्ण्याने चहाला बोलावले तेव्हा पोटात गोळा आलाच.
पण आज माझ्या सोबतीला गावातील काही साहित्यिक, प्राध्यापक, पत्रकार अशी मंडळीही दिसत होती. अपेक्षित सारी मंडळी जमली आहेत याची खात्री पटल्यावर कुळकर्ण्याचा एक विद्यार्थी भाषणाला उभा राहिला. एका साहित्यिक विश्वकोशात कुळकर्ण्याच्या नावाचा समावेश झाला होता. (हूज हू.) एक संपूर्ण पान या कुळकर्ण्याच्या चरित्रासाठी दिले होते. जागतिक स्तरावर असा गौरव झाल्याच्या आनंदात कुळकर्ण्याने सगळ्यांना चहापानाला बोलावले होते. हे सारे सांगून त्या विद्यार्थ्याने सरांचे अभिनंदन केले. मग इतर सगळ्यांनीही अभिनंदन केल्यामुळे मलाही कुळकर्ण्याचे अभिनंदन करावे लागले. पत्रकारांनी त्याला काही प्रश्न वगैरे विचारले. कुळकर्ण्याने त्याची सविनय की काय म्हणतात तशी उत्तरेही दिली. चहा, पोहे, बिस्किटे वगैरे हादडून सगळे निघून गेले. कुळकर्ण्याही "आलोच हं बाजीराव, तोवर तुम्ही हा कोश बघा." असे सांगून आत गेला. इतका जागतिक दर्जाचा ग्रंथ आमच्या हाताला लागायची ती पहिलीच वेळ. मी तो विश्वकोश चाळू लागलो. "विश्व साहित्यिक कोश" असला तरी वाचकांच्या सोयीसाठी तो मराठीत छापला होता. कुळकर्ण्याने आपल्या परिचयाच्या पानात एक कागद खूण म्हणून घालून ठेवलाच होता. ते पान आधी वाचले. त्यात कुळकर्ण्याचा फोटो, त्याच्या बायकामुलांची नावे, त्याच्या पुस्तकांची यादी, पुरस्कारांची माहिती, आजवर दिलेल्या व्याख्यानांचा तपशील असा मजकूर होता. त्याच्यासारख्या अनेक कधी नावसुद्धा न ऐकलेल्या लेखक, कवींचे परिचय पानापानातून ओसंडून वहात होते. एका कवयित्रीने तर आपला स्वभाव "हळवा" असल्याचेही सांगितले होते. शेक्सपीयरची नोंद "शेक्सपीयर- थोर आंग्ल नाटककार" अशी, कालिदासाची नोंद "कालिदास- महान संस्कृत कवी" अशी, तर संत ज्ञानेश्वरांची नोंद "थोर संत साहित्यिक" अशी आणि एवढीच होती. वडगाव खूर्द गावातून प्रसिद्ध झालेल्या त्या विश्वकोशाची किंमत पंधराशे रुपये होती. कुळकर्ण्याने प्रकाशकाचे पत्रच चुकून "पुस्तकातली खूण" म्हणून ठेवले होते. त्या पत्रात त्यांनी विश्वकोशाच्या या जागतिक महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आपला फोटो, परिचय देऊन ग्रंथाचे मोल वाढवल्याबद्दल व या महान कार्याला पंधराशे रुपयाची देणगी दिल्याबद्दल आभार मानले होते. पत्रासोबत विश्वकोशाची विनामूल्य प्रत संदर्भासाठी आणि संग्रहासाठी पाठवत असल्याचा उल्लेखही होता. कुळकर्ण्याची चाहूल लागताच मी कोश मिटून ठेवला. तेवढ्यात कुळकर्ण्याने ते पत्र "इथं राहिलं वाटतं" असं पुटपुटत घाईघाईने खिशात कोंबलं.
घरी परतलो तेव्हा विश्वकोशात नाव छापलेल्या एका जागतिक किर्तीच्या साहित्यिकाचे आपण शेजारी आहोत याचा आनंद आणि
अभिमान माझ्या चेहर्‍यावरुन नुसता ओसंडून वहात होता.

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये दि. ०४.०७.२००६ रोजी "टोलेबाजी" या सदरातून पूर्वप्रकाशित.)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

धनंजय's picture

23 Dec 2008 - 10:26 pm | धनंजय

माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच्या कविता अशाच एका कवितासंग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत. हे असे प्रकाशक खरेखरचे असतात, केवळ टोलेबाजीत नव्हे, हे मला कळले!

पांथस्थ's picture

23 Dec 2008 - 10:35 pm | पांथस्थ

मस्तच.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

झकासराव's picture

24 Dec 2008 - 12:01 am | झकासराव

बाजीरावानी बरेच दिवसानी टोलेबाजी केली. :)
मस्त जमली आहे ही टोलेबाजी देखील.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सहज's picture

24 Dec 2008 - 7:02 am | सहज

नेहमीसारखा मस्त कुरकुरीत लेख.

बाजीराव बरेच दिवसांनी टंकलेत.

जमल्यास एखादा "फ्रेश" लेखही येउ द्या.

:-)

अवलिया's picture

24 Dec 2008 - 1:57 pm | अवलिया

सहमत

- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मदनबाण's picture

24 Dec 2008 - 1:31 pm | मदनबाण

बाजीराव...टोलेबाजी आवडली.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

आनंदयात्री's picture

24 Dec 2008 - 1:53 pm | आनंदयात्री

मस्त लिहलय बाजीराव.

तडकडताई सांगलीवाली's picture

27 Dec 2008 - 8:04 pm | तडकडताई सांगलीवाली

त्यातही सदाशिवपेठ पुरातन ग्रंथ पुनर्विकेता संघ, पुणे; साहित्यप्रेमी अडत व्यापारी मंडळ, न्यू मार्केट यार्ड, भुसावळ; शब्दभरारी युवक मंडळ, बेणेवाडी, ता. शिरवळ, जि. सातारा; यांचे पुरस्कार फार मानाचे व प्रतिष्ठेचे असल्याचे तो सांगायचा.
हे फार मस्त... तुमचे बाकीचे लेख कसे हुडकायचे? आमच्या सांगलीतले काशिनाथ हरी वाडेकर नावाचे लेखकही तरुण भारतात एक सदर चालवायचे.. पान, चुना, तंबाखू नावाचे... त्याची आठवण झाली..