ती, तो आणि चुनु.
रविवारची संध्याकाळ. आज तिच्या माहेरच्या कुणाच्यातरी लग्नाचे रिसेप्शन होते. ती आत तयार होत होती. हा बाहेर दिवाणखाण्यात बसला होता. तेव्हढ्यात तो लहान मुलगा आला. बेल न वाजवताच आत आला.
“काका. आईला पेपर पाहिजे आहे.”
“देतो, पण आधी नाव सांग.”
“चुनु. आता पेपर द्या.”
“चुनु काय? सगळं नाव सांग. मग पेपर देईन.”
“चिंतामणी वसंत राव. पेपर.”
“आडनाव?”
“सांगितलेकी. राव.”
“राहतोस कुठे?”
“तुमच्या शेजारीच.”
“लाडू खाणार?” त्याला त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटत होते.
“नको.”
“का? गोड आवडत नाही? मग चकली चिवडा खाशील?”
“नको. आई रागावते.”
“अरे आईला सांगायचे कि काकांनी दिला. म्हणून खाल्ला.”
चुनु थोडा घुटमळला. मनाची चलबिचल झाली असावी.
“नको. चकली नको. पेपर द्या.”
आतून तिचा आवाज आला, तू तयार होतो आहेस ना.”
“चुनु, एव्हढी घाई काय आहे? तुम्ही इकडे केव्हा राहायला आलात?” चुनुने उत्तराऐवजी प्रश्न केला.
“काका, आत कोण आहे?”
“अरे दुसरे कोण असणार? तुझी काकू.”
“काकू तुम्हाला रागावताहेत.”
“नाही रे चुनु. ती कधीच रागवत नाही.”
“तू कोणाशी गप्पा मारत बसला आहेस? आवर लवकर. तुझे कपडे मी काढून ठेवले आहेत.”
“काका पेपर द्या. मला जाउद्या.”
“हं, हा घे. उद्या परत येशील?”
पेपर घेऊन चुनु पळत गेला. “उद्या परत करेन.”
तो गालातल्या गालात हसला.
ती बाहेर आली. आज बऱ्याच दिवसांनी तिने मन लावून मेकअप केला होता. नवीन जरीची साडी नेसली होती.
“वॉव! लेडी, यू लूक ब्युटीफुल! तू लग्नात अशीच दिसत होतीस.”
पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणींनी तिच्या मनात दाटी केली.
“तू कोणाशी गप्पा मारत होतास?”
“अग तो चुनु आला होता पेपर मागायला. त्याच्या आईला सिनेमाच्या जाहिराती बघायच्या होत्या.”
“चुनु? चुनु कोण?”
“अग चुनु म्हणजे चिंतामणी वसंत राव. हल्लीच इकडे राहायला आले आहेत ते लोक. त्या शेजारच्या बंगल्यात. त्याला लाडू आवडत नाही. आई रागावते असं म्हणाला. हा हा हा...”
त्याला स्वतःच्या बालपणीची आठवण आली. त्यालाही आई असच सांगायची. कोणाच्या घरी खायचं नाही.
तिला थोडसं समजलं. पण खरतर काहीही समजलं नाही.
“चल, आता अजून उशीर करू नकोस. तुझा ड्रेस मी काढून ठेवला आहे.”
“मॅडम साहेबा, बंदा आपकी खिदमतमे हाजीर है.”
दहा एक मिनिटांनी तो तयार होऊन बाहेर आला.
पुरुष किती लकी असतात नाही का. मेकअप न करताही तो हॅन्सम दिसत होता. त्याच्या मूळच्या सौदर्यात आता जाणतेपणाची झाक आली होती. ह्याला जपून ठेवायला पाहिजे. त्याने गाडी बाहेर काढली.
तेव्हढ्या वेळात तिने बाजूला बघितले. शेजारच्या ओसाड बंगल्यात नेहमी सारखा अंधार होता. बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये नुसतं रान माजलं होतं. मात्र एकुलत्या एक बोगनवेलावर एक लालचुटुक फूल फुललेलं तिला अंधारातही दिसलं.
गाडीतही त्याचं चुनु चुनु चालू होतं. दहा मिनिटही तो चुनुशी बोलला असेल नसेल. पण बोलत असा होता कि जणू त्याची युगायुगाची दोस्ती होती. चुनु असा आहे नि तसा आहे. त्याचे नाक कसं नेहमी भरलेलं असतं. तो कुठल्या शाळेत जातो. त्याला हाच्चा घेऊन बेरीज वजाबाकी कशी येते. पण बरका त्याला पतंगाची कन कशी बांधायची ते मात्र माहित नाही. काची मांजा कसा करायचा ते नाही माहित. अस बरच काही.
ती मुग्ध होऊन ऐकत होती.
“काची मांजा? ते काय असतं बऱं.”
“अग तुला सांगतो, प्रथम सोडावॉटरची रिकामी बाटली घ्यायची, ती फोडून बाsssरिक कुटायची, मग सरस घेऊन उकळायचं, त्यात ती पूड मिक्स करायची. त्यात आपल्याला पाहिजे तो कलर टाकायचा. ते मिश्रण थंड झालं कि बस लुग्धी तयार! ती मग प्लास्टिकमध्ये घेऊन धाग्याला अप्लाय करायची. प्लास्टिकमध्ये बरका. हातात घेऊन लावली तर हाताची बोटे कापणार. मी एक्सपर्ट होतो. पैसे कमवायचो. एका आठ्ठीला दहा रुपये! आसारी पूर्ण भरायची तर घे आयला शंभर रुपये. बाबांना जेव्हा पत्त्या लागला तेव्हा हग्या मार बसला. तेव्हापासून धंदा बंद.”
ती ऐकत होती. तो आज मुक्तपणे आयला मायला करत होता.
“चुनुला सांगता सांगता हे आठवलं असं सगळं.”
आज खूप दिवसांनी तो असा दिलखुलास बोलत होता. खळखळून हसत होता. डोंगरावरून उड्या मारत खाली येणाऱ्या निर्झरा सारखा. तीही त्याच्या बरोबर वहात गेली.
चुनु इफेक्ट!
गंतव्य स्थान आले तशी ती भानावर आली.
आत गर्दी होती. कॉम्प्लीमेंटस घेत देत ते दोघे गर्दीत मिसळले, हरवून गेले.
घरी परत आले तेव्हा रात्र बरीच झाली होती.
“कॉफी घेशील?”
“तू घेणार असशील तर मी पण घेइन.”
“कोल्ड कॉफी करते.”
“दॅट इज बेटर.”
कॉफीचे घुटके घेत तो म्हणाला, “चुनु उद्या येईल तेव्हा त्याला किल्ली बार करून द्यायचा आहे. तुला माहिताय?...”
“आता नको. साडे अकरा झाले आहेत.”
रात्री एकमेकांच्या कुशीत ते झोपी गेले. ते म्हणजे तो फक्त. ती जागीच होती. तिला कशी झोप येणार?
तिने त्याच्या अंगावरचे पांघरूण सारखे केले. किती शांत झोपला होता तो.
“बिच्चारा.”
तिच्या नकळत तिने एक सुस्कारा टाकला आणि कुशीवर वळून ती निद्रादेवीची आराधना करू लागली.
झोप कशी येणार? रात्र वैरीण झाली होती.
आ री आऽऽऽ
निंदिया तू लेकर कही
उडनखटोलेसे...
कही दूर दूर दूर.
यहासे दूर.
कुणीतरी तिला बोलावले, "आई चल, ते बघ बाबा उडनखटोला घेऊन आले आहेत."
(समाप्त)
प्रतिक्रिया
19 Aug 2023 - 3:31 pm | तुषार काळभोर
अडीच मिनिटे.
पेपर. लाडू. चकली. चिवडा. चिंतामणी वसंत राव.
आणि झोपेपर्यंत तो चुनुविषयीच बोलत होता....
आणि ती त्याला बिच्चारा का म्हणाली?
आणि तिला आई कोण म्हणालं? चुनु?
कूछ तो गडबड हय भागो!!
20 Aug 2023 - 10:12 am | भागो
कूछ तो गडबड हय भागो!!
नाही कुछ भी नाही. पुन्हा एकदा वाचून पहा, सर!
20 Aug 2023 - 4:33 pm | तुषार काळभोर
पंधरा वर्षे.
बिच्चारा!
20 Aug 2023 - 4:52 pm | गवि
खूप वेळा वाचली. तरी उलगडली नाही. म्हणजे मर्म उलगडले नाही.
थोडी फोड करून आम्हालाही सांगा.
20 Aug 2023 - 5:13 pm | भागो
कसले आले आहे मर्म!
एका बिच्चाऱ्या बापाचे दिवास्वप्न. बाप तरी कसंं म्हणायचे.
क्रेविंग फॉर समथिंग डीअर टू हार्ट वुईच कॅॅन नॉट बी अचीवड इन रिअल लाईफ.
20 Aug 2023 - 5:42 pm | गवि
धन्यवाद. तसेच जाणवले खरे पण या भेटीत त्या पोराचे नाव विचारले म्हणजे प्रथम भेट असावी (आभासी का असेना) असे वाटले. पण पुढे त्या चुनु बद्दल खूप जुनी ओळख वाटली. शेवटी तिला लहान मुलाचा आवाज आला, म्हणून जरा गोंधळ झाला. आता कळले.
20 Aug 2023 - 6:21 pm | भागो
आज चुनु, उद्या मुनु . परवा अजून कोणीतरी...
हे पहा माझे चुनु- मुनु. क्रोनोलोजीकली
अगदी लहानपणी शाळा मास्तर मग इंजिन ड्रायव्हर, श्री म माटेंंचे जगाचे प्रवासी पुस्तक वाचल्यावर डॉक्टर लिविंगस्टन बरोबर आफ्रिका सफारी, मग NDA मध्ये कॅॅडेट, फायटर प्लेन पायलट, सबमरीन, मग आले शेक्सपिअर. चार्ल्स डिकन्स, अर्नेस्ट हेमिग्वे,.. लांबच लांब यादी आहे.
दररोज कोणीतरी येतो नि उडण खटोल्यात बसवून घेऊन जातो.
अस आहे आयुष्य...
21 Aug 2023 - 4:05 pm | विजुभाऊ
आकलन झाले नाही.
गोष्ट क्रमशः आहे का?
कोणाचे बाबा?
गोष्ट नीट समजत नाहोय्य्ये. पण पुन्हा पुन्हा वाचाविशी मात्र वाटतेय
22 Aug 2023 - 1:15 pm | भागो
विजुभाऊ आभार!
माझ्या तरुणपणी
लेकुरे उदंड झाली. मराठी नाटक
लेखक वसंत कानेटकर.
श्रीकांत मोघे, दया डोंगरे
आता ह्याची एकच वर्शन तुम्ही इथे पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=R7OaAUkZ_-Y&ab_channel=DilipWarkad
आणि त्यातले हे गाणे.
ह्या इवल्याश्या घरात माणसांना लागलंय खूळ
त्याची गोम अश्शी आहे कि आम्हाला नाही मूल!
हे आणि वरील प्रतिसाद इतक पुरेसे नाही काय?