समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे.
समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली. संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या झोळीत टाकली आणि कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.
स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे.
प्रतिक्रिया
22 Jul 2023 - 10:55 am | प्रचेतस
मणिपूरच्या झोळीतही शेठने भिक्षा टाकावी अशी प्रार्थना आज समस्त भारत देश करताना दिसतोय.
22 Jul 2023 - 11:48 am | Bhakti
म्हणजे?
22 Jul 2023 - 11:51 am | प्रचेतस
खाली कंजूसकाकांना लिहिलंय तेच.
23 Jul 2023 - 11:05 am | विवेकपटाईत
मणिपूर आधी कर्नाटक बंगाल राजस्थान इथे भिक्षा देण्याची जास्त गरज.
22 Jul 2023 - 11:41 am | कंजूस
म्हणजे काय करायला पाहिजे?
22 Jul 2023 - 11:49 am | प्रचेतस
दोन अडीच महिने धुमसतंय, इतर विषयांवर भारंभार बोलणारे आपले माननीय पंप्र गेले अडीच तीन महिने मौन धारण करुन आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कान उपटल्यावर चार ओळी बोलले फक्त. आधी त्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, घृणास्पद कार्य करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, मुळात हे प्रकरण दिड दोन महिने दबून राहतं हेच खटकत कसं नाही कुणाला?
22 Jul 2023 - 11:55 am | गवि
अत्यंत खटकणारी घटना आणि एकूण घटनाक्रम. एव्हाना सर्वांनाच दहशत बसेल अशी शिक्षा व्हायला हवी होती गुन्हेगारांना आणि एकूण दंगलखोर जमावाला. त्या राज्यात लोक कशा अवस्थेत जगत आहेत कोण जाणे.
22 Jul 2023 - 11:57 am | Bhakti
दास डोंगरी राहतो यात सुद्धा मुघल स्त्रीचा अपमानास्पद स्पर्श करतात तेव्हा रामदासांच्या मनी उठते की आपल्या मर्दाना काय झालंय?इतके लाचार?ते कडाडतात.आणि नंतरही जो मुखिया,प्रमुख या अन्यायात प्रजेची रक्षा करते नाही तो चुकीचाच आहे हे खडसावतात.
22 Jul 2023 - 2:53 pm | आनन्दा
विनय जोशी म्हणून एक संघ प्रचारक आहेत. ते ईशान्य भारतात बरीच वर्षे होते.
त्यांनी या वेबसाईट वर एक लेखमाला चालवली आहे. त्यात त्यांनी या व्हिडिओ बद्दल ओझरता उल्लेख केला आहे.
https://www.icrr.in/toplinks.html
22 Jul 2023 - 11:53 am | Bhakti
सध्या दास डोंगरी राहतो वाचतेय त्यामुळे तुम्ही पहिल्या परिच्छेदात जे लिहिले ते समजले,भावलं.
आणि काका नेहमी प्रमाणे नंतरच्या परिच्छेदात नेहमीचं तेच तेच लिहिले आहे.
असो
उत्कट भव्य तेचि घ्यावे!
असंच म्हणेन.
22 Jul 2023 - 11:57 am | प्रचेतस
अगदी, शिवाय समर्थ रामदास आणि रामदेवबाबा यांची अप्रत्यक्ष तुलनाही चीड आणणारी आहे, कुठे समर्थ आणि कुठे रामदेवबाबा.
22 Jul 2023 - 11:58 am | Bhakti
बरोबर आहे.तुलनाच नाही.
22 Jul 2023 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या.
नै नै, आत्ताही त्या गोष्टी सामान्यच आहेत. मणिपूरचं धुसमुसणं. जातीय संघर्ष. आणि महिलांना नागडं करुन फिरवल्या जातं. बलात्कार केल्या जातात. सैनिकाच्या बायकोला नागडं केल्या जातं. आपण जनता म्हणून त्याही बाबीकंडे आता सामान्य बाब म्हणूनच बघत आहोत. काहीही वाटून घ्यायचं नाही. इतकी मूर्दाड येथील व्यवस्था आणि मानसिकता झाली आहे.
भिक्षा तयार आहे.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2023 - 11:03 am | विवेकपटाईत
प्रतिसाद भिक्षेवर असायला पाहिजे होता. बाकी त्याकाळच्या सत्य परिस्थितीचे वर्णन समर्थांनी केले आहे. आज पूर्वोत्तर पूर्वीच्या मानाने बराच शांत आहे. बाकी तुम्हाला राजस्थान कर्नाटक आणि बंगाल इथे झालेले बलात ्कार आणि हिंसा दिसली नाही.बाकी मैताई समुदायावर झालेला अत्याचार दिसत नाही हजारो घरांना लागलेल्या आगी आणि कतलेआम तुम्हाला दिसले नाही. असो.
23 Jul 2023 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचं सोडा हो.... मौनीबाबांना उर्फ विश्वगुरुंना यातलं काहीच दिसत नाही तेही एकदा बघा.
कुकी आणि मैताई समुदायात कोणाची संख्या जास्त आहे, त्याचा एकदा अभ्यास करुन या.
जय जय रघुवीर समर्थ.
-दिलीप बिरुटे
22 Jul 2023 - 3:25 pm | कंजूस
१)कायदे केले आहेत.
२)संशयितांना पकडून पुरावे गोळा करून ३)कोर्टासमोर हजर करणे पोलिसांचे काम.
आता ते आरोपी वकिलांची फौज कामाला लावतात आणि वीस पंचवीस वर्षे खटले चालू आहेत. मोठमोठे आरोपी कोण आहेत हे मी सांगायला नको.
सरकार काय (कोणतेही पक्षाचे असो) संशयितांना फाशी द्या/जन्मठेप करा/दगडांनी ठेचा असा परस्पर आदेश काढून शकते का?
22 Jul 2023 - 3:34 pm | कंजूस
कर्नाटकातले एक प्रकरण कुणाला आठवते का?
संशयितांना/वहिमींना पकडले. त्यांना धरून नंतर हत्यारे कुठे टाकली लपवली ते दाखवायला नेले. तिथे 'ते आरोपी पळून जात होते तेव्हा पोलिसांनी गोळ्या मारल्या' . मेले. आता या प्रकरणात लोक दोन्हीकडून बोलले. १)बरं झालं,२) हे असं करणं लोकशाहीला,न्यायाला , व्यक्तिस्वातंत्र्याला ,धरून नाही.
22 Jul 2023 - 5:43 pm | कर्नलतपस्वी
हे आंध्रप्रदेश मधील प्रकरण आहे.
बलात्कार करून मुलीला जाळून टाकले होते. चोविस तासात पकडले व घटनेचा माॅक सिन करताना हा प्रकार घडला.
22 Jul 2023 - 5:42 pm | चित्रगुप्त
लेख आवडला.
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।
वों भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥
१) ब्राह्मणाच्या जीवन आचारामध्यें " भिक्षा मागणें " हें प्रमुख लक्षण आहे. ॐ भवति भिक्षां देहि या ब्रीदाचे रक्षण केलें पाहिजे.
भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला ।
प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥
२) जो साधक भिक्षा मागून जेवतो, तो निराहारी म्हणून ओळखला जातो. त्यानें भिक्षा मागून पोट भरल्यानें कोणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्यास लागत नाही.
संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन ।
तेणें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥
३) सज्जन आणि दुर्जन दोन्ही तर्हेचे लोक जेथें राहतात अशा वस्तीमध्यें कोरडी भिक्षा मागून जो पोट भरतो, तो रोज अमृताचे सेवन करतो, असें म्हणावें.
श्र्लोक
भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः ।
असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥
श्र्लोकाचा अर्थ
भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो. भिक्षा घेणें म्हणजे दान स्वीकारणें नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी घातलेल्या भिक्षेनें पोट भरणें म्हणजे रोज सोमपान करण्याचे पुण्य होय.
ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा ।
ईश्र्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥
४) भिक्षा मागण्याचा महिमा असा आहे. भगवंताला भिक्षा पसंत आहे. श्रीशंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे, पण तो देखील भिक्षा मागतो.
दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं ।
निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥
५) दत्त, गोरखनाथ इत्यादि सिद्धसुद्धां लोकांमध्यें भिक्षा मागतात. भिक्षा मागण्यामध्यें निस्पृहता प्रगट होते.
वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला ।
तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥
६) जो माणूस वार लावून जेवतो किंवा पोट भरतो, तो पराधीन बनतो. त्याचप्रमाणें जो एखाद्या माणसाच्या घरी रोज जेवतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते.
आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें जालें ।
प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥
७) रोजची भिक्षा न करतां आठ दिवसांची भिक्षा मागण्याची पद्धत ठेवणे योग्य नाहीं. तें कंटाळवाणें होते. रोज भिक्षा मागल्यानें जी नित्यनूतनता, रोजचा नवीनपणा असतो तो चटदिशीं नाहींसा होतो.
नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें ।
तरीच भिक्षा मागतां बरवें । श्र्लाघ्यवाणें ॥ ८ ॥
८) रोज नव्या नव्या ठिकाणी भिक्षेसाठीं हिंडावें, सपाटून प्रवास पर्यटन करावें. असें केलें तर भिक्षा मागण्याचें खरें कौतुकआहे.
अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेश ।
जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥
९) सदैव भिक्षा मागून पोट भरण्याची ज्याला सवय आहे, त्याला कोणताही प्रांत परदेश असा वाटत नाहीं. जिकडेतिकडे भुवनत्रयामध्यें स्वदेशच आहे, असे त्यास वाटते.
भिक्षा मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजों नये ।
भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥
१०) भिक्षा मागण्यास कुरकुरु नये. भिक्षा मागतांना लाजूं नये. भिक्षा मागतांना थकून जाऊं नये. भिक्षेच्या निमित्यानें सारखें फिरत राहावें.
भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर ।
कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥
११) एखादा माणूस भिक्षा मागतो पण चमत्कार करतो. असें ऐकल्यावर लहान मोठी माणसें आश्र्चर्यचकित होतात. तसेंच तो भगवंताची कीर्ति निरंतर गातो, हें पाहून सर्वांना कौतुक वाटते.
भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु ।
भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥
१२) भिक्षा म्हणजे कामधेनूच होय. ती सदैव हवें तें फळ देणारी असल्यानें कांहीं सामान्य नव्हे. भिक्षा ज्याला मान्य नाही असा यति किंवा बैरागी भाग्यहीन समजावा.
भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥
१३) भिक्षेमुळें नव्या ओळखी होतात. भिक्षेनें चुकीच्या कल्पना नाहींश्या होतात. भिक्षा वाटते मामुली पण सर्वांना ती मान्य आहे यांत शंका नाहीं.
भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिती । भिक्षेनें प्रगटे महंती ।
स्वतंत्रता ईश्र्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥
१४) भिक्षा मागणारा माणूस निर्भय स्थितींत असतो. भिक्षा मागण्यानें महंतपणा प्रगट होतो. स्वातंत्र्य व भगवंताची प्राप्ति हे दोन गुण भिक्षा मागणारास प्राप्त होतात.
भिक्षेस नाहीं आडथाळा । भिक्षाहारी तो मोकळा ।
भिक्षेकरितां सार्थक वेळा । काळ जातो ॥ १५ ॥
१५) भिक्षेला कधीं कसला आडथळा येत नाहीं. भिक्षेवर पोट भरणारा सदैव मोकळा असतो. भिक्षेच्या योगानें सगळा काळ सार्थकीं लावतां येतो.
भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगडली ।
अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥
१६) भिक्षा म्हणजे अमृतवल्ली आहे. जिकडेतिकडे ती फळाफुलांनी बहरलेलीं असतें. एखाद्यावर जेव्हां अवदशा गुदरते, त्यावेळीं लाज सोडून भिक्षा मागणार्यास ती मोठी फलदायिनी होते.
पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना ।
कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥
१७) पृथ्वीवर अनेक देश आहेत. त्या देशांमधून पर्यटन करतांना उपाशी मरण्याची पाळी येत नाहीं. भिक्षा मागणारा माणूस कोठल्याहि ठिकाणीं लोकांना जड होत नाहीं.
गोरज्या वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी ।
विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥
१८) गुरें पाळणें, व्यापार करणें आणि शेती करणें या व्यवसायांहून भिक्षेची प्रतिष्ठा, सामजिक स्थान अधिक आहे. म्हणून महंतानें आपली झोळी कधीं बाजूला करुं नये.
भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य ।
वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥
१९) भिक्षेसारखें वैराग्य नाहीं आणि वैराग्यासारखें भाग्य नाहीं. ज्या माणसापासहीं वैराग्य नाहीं, तो माणूस आकुंचित व अभागी समजावा.
कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें ।
बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥
२०) कोणाच्या दारापुढें उभे राहून " कांहीं भिक्षा मिळेल कां? " असें मोठ्यानें म्हणावें. पुष्कळ भिक्षा घालायला आणली तर मूठभर घ्यावी. भिक्षा मागणारानें अल्पसंतोषीं असावें.
सुखरुप भिक्षा मागणें । ऐसीं निस्पृहतेचीं लक्षणें ।
मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥
२१) मोठ्या प्रसन्नतेनें भिक्षा मागावी. निस्पृहतेची लक्षणें अशी आहेत. दुसर्याशी बोलतांना गोड मृदु शब्द बोलावेत. ऐकणारास आनंद वाटेल असा वाग्विलास असावा.
ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती ।
भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥
२२) भिक्षेची स्थिती ही अशी असते. ती मी येथें यथामति सांगितली. पुढें येणार्या आपत्कालापासून भिक्षा माणसास वाचवते.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भिक्षानिरुपणनाम समास दुसरा ॥
जरा अवांतर गंमतः पाकिस्तानने समर्थांचा हा उपदेश शिरोधार्य मानलेला दिसतो. विशेषतः
भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगडली ।
अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥
23 Jul 2023 - 11:07 am | विवेकपटाईत
धन्यवाद
26 Jul 2023 - 1:35 am | प्रसाद गोडबोले
वाह, चित्रगुप्तकाका, अभ्यासपुर्ण प्रतिसाद आवडला.
फक्त २ मुद्दे इथे जोडू इच्छितो:
१. भिक्षा आणि भीक ह्यामध्ये निखळ स्पष्ट असा जो फरक आहे तो म्हणजे स्वाधीनता. भिक्षा मागणारा स्वाधीनतेने मागत आहे, भिकार्यासारखा लाचार होऊन नाही. भिक्षेचे अत्यंत कडक नियम होते , आहेत , भिक्षा मुखकरुन कोरान्न अर्थात कोरड्या अन्नाची मागितली पाहिजे, शिजवलेले अन्न घेऊ नये , पैसे, दागदागिने, जमीनजुमला वगैरे तर सोडूनच द्या. त्यातही भिक्षा मोजुन पाचच घरी मागायची, पाचही घरी मिळाली तर आनंदच पण समजा नाहीच मिळाली तर पुढे अजुन पाच घरे असे करायचे नाही. केवळ पाणी पिउन "आजचा उपवास ही परमेश्वराची इच्छा " ह्या धारणेने रहायचे. त्याच त्या परत फिरुन घरात भिक्षा मागायची नाही. शिवाय मिळालेली भिक्षाअन्न तीनवेळा पाण्यात धुवुन घ्यायचे (त्यातील सत्व रज तम दोषांचे निर्मुलन करण्याकरिता). मग ते शिजवल्यावर त्याचे तीन हिस्से करायचे , एक प्राणीमात्रांना मुक्या जीवांन्ना, एक अतिथीला आणि उरलेला स्वतःला . समजा अतिथी ला जास्त भूक असेल किंव्वा जास्त अतिथी असतील तर सर्वच त्य्यांन्ना देऊन आपण केवळ जलप्राशन करुन रहायचे ! हे असले भयंकर कडक नियम होते भिक्षेचे . इथे दुपारच्या बाराला जेवणाचे ताट तयार नसेल तर आमचा राग अनावर होता मग विचार करा ज्या शिष्याने पहाटे ब्राहममुहुर्तावर उठुन धाय्न धारणा केली आहे , पुढे १०८ सुर्यनमस्कार घातले आहेत , भर बाराच्या उन्हात पाच अनोळखी लोकांच्यापुढे झोळी पसरली आहे , त्यातील कित्येकांच्याकडुन अपमान सहन केला आहे , , त्या शिष्याला पोटात दोन घास मिळाले नाहीत तर त्याची काय अवस्था होत असेल ! एकदा पोटात भडकलेला अग्नी सहन करता आला की त्यापुढे पंचाग्नीसेवन साधनाही काहीच नाही ! ही भिक्षा, हीच खरी साधना आहे!!
२. कितीही मोठ्या संताने सांगितले तरी प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या तर्कबुध्दीने तपासुन पाहिल्याशिवाय स्विकारु नये. मी खुप विचार केला की भिक्षेला समर्थांन्नी इतके प्रचंड महत्व का दिले असावे ? मला सापडलेले उत्तर असे की - सगळ्या प्राणीमात्रांत बेसिक इन्स्टिंक्ट काय असेल तर तो म्हणजे सर्व्हायवल अणि रेप्रोडक्शन . अस्तित्व टिकवणे आणि प्रजोत्पादन करणे. स्त्रीयांच्या बाबतीत माहीत नाही पण किमान पुरुषांच्या बाबतीत हे दोन्ही नैसर्गिक आवेग , आणि त्यातही विषेश करुन प्रजोत्पादन करणे हे किती तीव्र असते हे मी स्वानुभवावरुन जाणतो !
पण तुम्ही अल्पकाळ जरी हे दोन विचार बाजुला सारुन शांतचित्ताने विचार करु शकलात की कशासाठी ही एवढी धडापड चालु आहे तर तत्क्षणी तुम्हाला सगळ्या जगाच्या व्यापारातील निरर्थकता , सव्यापसव्य , लक्षात येईल. आणि ह्याविचाराची तुम्ही प्रॅक्टिस केलीत , नित्यनेमाने साधना तर अध्यात्म कळणे काही जास्त अवघड नाही! म्हणुन भिक्षा ग्रेट आहे !!
(अर्थात , हा सर्वांसाठीचा मार्ग नव्हे, सर्वसामान्यांना धन्यो गृहस्थाश्रमः असे सांगुन ठेवलेले आहेच ! त्यांच्यासाठी भग्वदगीता अन कर्मयोग आहेच ! त्यावर सविस्तर चर्चा नंतर कधीतरी !)
26 Jul 2023 - 4:02 am | चित्रगुप्त
@मार्कसः अतिशय चपखल प्रतिसादाबद्दल अनेक आभार. भिक्षेबद्दल सविस्तर माहिती इथे दिलीत, त्यातून अनेकांचे भिक्षेबद्दलचे गैरसमज दूर होतील, अशी आशा आहे.
खुद्द समर्थांबद्दल बोलायचे तर त्यांनी आपल्या भ्रमंतीतून, लेखन आणि अन्य सर्व उद्योगातून प्रचंड कार्य तडीला नेले होते. जागोजागी मठ - मारुतीची मंदिरांची स्थापना आणि निरलसपणे राष्ट्रकार्य करणार्या 'कार्यकर्त्यांची' योजना, यात 'ब्राम्हणाची मुख्य दीक्षा' हा कळीचा मुद्दा होता. भिक्षेच्या निमित्ताने रोज नवनवीन गावात- वस्तीत भ्रमण, तिथली परिस्थिती जाणून घेणे, अनेक लोकांशी ओळखी वाढवणे, छत्रपतींच्या अनमोल कार्यासाठी पोषक स्थिती निर्माण करणे असे अनेक हेतु साध्य होत. हे कार्यकर्ते निस्पृह आणि विरक्त असत. अशा विरक्तांसाठी समर्थांनी दिलेल्या उपदेशातील काही अंशः
विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११॥
विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२॥
विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३॥
विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४॥
विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वग्त्रृत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५॥
बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९॥
स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भजन ।
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २०॥
दृढ निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१॥
विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरूपणविषईं ॥ २२॥
विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्ध मार्गें जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सद्कीर्तीसी ॥ २३॥
विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु वोळखावे ।
विरक्तें मित्र करावे । संत योगी सज्जन ॥ २४॥
विरक्तें करावीं पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नानास्थानें । परम रमणीय ॥ २५॥
विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असाअवा । सर्वप्रकारें ॥ २८॥
विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९॥
विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४॥
विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५॥
-- (श्री दासबोध, दशक दुसरा, समास नववा)
-- (तीन पिढ्या नासवणारा कॉपीपेस्टी श्लोकाळू फेस्बुक थेरडा)
26 Jul 2023 - 3:26 pm | धर्मराजमुटके
मार्कस ऑरेलियस : तुमचा प्रतिसाद आवडला. हाच तंतोतंत प्रतिसाद मी लिहिणार होतो पण आता लिहू, नंतर लिहू करता राहून गेला.
माझ्या अशा अनेक कल्पना आळशीपणामुळे प्रत्यक्षात यायच्या राहून जातात आणि दुसरे लोक त्या प्रत्यक्षात उतरवून यशस्वी होतात. ;)
22 Jul 2023 - 8:11 pm | कर्नलतपस्वी
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
हे गीतेचं आश्वासन आहे, हे कुठल्या नेत्याने दिलेलं खोटे आश्वासन नाही आहे... गीता म्हणते की, वेदनिष्ठा उभी कर, असा समाज उभा कर जो स्वयंशासित असेल, जिथे सरकारची सुद्धा गरज नसेल,... ह्यासाठी प्रयत्न होत असतील तर भगवंत गीतेत म्हणतो आहे की, तुझ्या भाकरीची व्यवस्था मी करेन....
समाज स्वयंशिस्त असेल तर भिक्षेची गरज पडणार नाही.
भिक्षा पात्र अवलंबणें ।
जळो जिणें लाजिरवाणें ।
ऐसियासी नारायणें ।
उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
-संत तुकाराम महाराज
देवाच्या नावा खाली जे भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागतात त्यांचे जिणे लाजिरवाणे असते त्यांच्या जगण्याला आग लागो अश्या माणसाची नारायण कायम उपेक्षा करतो.
मांगन मरण समान है, मत मांगो कोई भीख ।
मांगन ते मरना भला, यही सतगुरु की सीख ॥
मांगना मरने के बराबर है इसलिए किसी से भीख मत मांगो । सतगुरु की यही शिक्षा है की मांगने से मर जाना बेहतर है अतः प्रयास यह करना चाहिये की हमे जो भी वस्तु की आवश्यकता हो उसे अपने मेहनत से प्राप्त करें न की किसी से मांगकर ।
समर्थ रामदास यांचा काळ व वर्तमान काळात फरक आहे.
22 Jul 2023 - 9:19 pm | आनन्दा
एकच कृती, जेव्हा वेगवेगळ्या हेतूने केली जाते तेव्हा त्याचे फळ वेगळे असते.
जसे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ले आणि लष्कराने केलेले आक्रमण..
शेवटी,
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् |
परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ||
22 Jul 2023 - 9:39 pm | नीळा
भीकार्यांना भिक्षा घालणारे लोक काम करुन...कष्ट करून पैसा कमवतात....म्हणून चालतय.....
सगळे भीक मागुन महान काम करु पाहतील तर पैसा येणार कुठुन
23 Jul 2023 - 11:16 am | विवेकपटाईत
परिस्थिती आणि काळानुसार मार्ग ठरविला जातो. ज्या बाबा रामदेव बाबा भिक्षा घेऊन योगपीठ इत्यादी उभारले होते. ते आज दरवर्षी शेकडो कोटी शोध आयुर्वेद, कृषी अनुसंधान ,शिक्षा आणि दुसऱ्या संस्थांच्या मदतीसाठी खर्च करतात. आज हजारो योग प्रशिक्षक, आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि लाखो शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे रोजगार मिळत आहे. ही भिक्षेची महत्ता आहे.
23 Jul 2023 - 12:47 pm | सामान्य माणूस
याला काही कागदोपत्री पुरावा?
23 Jul 2023 - 11:07 am | विवेकपटाईत
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद. या धागेचा संबंध आजच्या राजनीतिशी नसतानाही अधिकांश राजनीतिक प्रतिसाद दिले आहे. त्यापेक्षा राजकारणावर धागा पुन्हा सुरू करणे अधिक उचित.
24 Jul 2023 - 11:53 am | Nitin Palkar
राजकारणावर चर्चा नको महणायची... (बहुमताचा कल आपल्या विरोधी जातोय हे जाणवल्यावर) आणि आपलं टुमण चालूच ठेवायचं.
23 Jul 2023 - 1:19 pm | सर टोबी
जर शेठजींच्या काळात सगळं काही पुर्वीसारखंच असणार आहे तर पूर्वीचे मौनीबाबा काय वाईट होते? निदान उलट विचारणा करण्याएवढा निर्ढावलेपणा तर कुणी दाखवला नसता. नुसतं राजकीय धागा नाही असं साळसूदपणे म्हणायचं. बाकी आरती ओवाळणं चालूच ठेवायचं.
23 Jul 2023 - 3:42 pm | सुरिया
कॉपीपेस्टी श्लोकाळू फेस्बुक थेरड्यांनी जितके नुकसान केलेय सोशल मिडीयावर त्याची बरोबरी कुठल्याच नुकसानाशी नाही होणार. मिनिमम तीन पिढ्या नासवणार हे. परत तरुणाई इन्स्टा न रीलच्या मागे लागतेय म्हणून बोंबलायला तयार.
साठीनंतर कंपलसरी सगळ्यांचे नेट काढून घ्यायला पाहिजे.
24 Jul 2023 - 9:44 am | सुबोध खरे
साठीनंतर कंपलसरी सगळ्यांचे नेट काढून घ्यायला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश साठीच्या पुढचेच आहेत.
त्यांचे नेट काढून घेतले तर मणिपूरच्या व्हिडीओ वर स्वकार्यवाही (SUO MOTO) कशी झाली असती.
द्वेष इतकाही असू नये कि डोळ्यावर पडदा पडावा
25 Jul 2023 - 12:00 pm | उग्रसेन
कॉपीपेस्टी श्लोकाळू फेस्बुक थेरड्यांनी जितके नुकसान केलेय सोशल मिडीयावर त्याची बरोबरी कुठल्याच नुकसानाशी नाही होणार
=))
23 Jul 2023 - 11:14 pm | चित्रगुप्त
नेमके काय नुकसान तीन पिढ्यांपर्यंत होणार म्हणे ?
24 Jul 2023 - 9:41 am | सुबोध खरे
उत्तम प्रतिवाद करता येत नसेल तर असभ्य आणि कर्कश्य भाषेचा वापर होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
24 Jul 2023 - 11:47 am | Nitin Palkar
राजकारण - चालू/ताज्या घडामोडी हा विषय काही काळ मिसळपाववर बंद करत आहोत.
राजकीय विषयावरील अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक लेख व्यवस्थापनाकडून राजकारण विभागात हलवले जातील. राजकारणावर चर्चा करताना सध्या इतर मिपा सदस्यांचा आणि राजकारणातील नेत्यांचा मान राखून निखळ चर्चा होत नाही असे दिसले आहे. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घेत आहोत.
हे असं लिहून कोणताही विषय राजकरणाकडे आणि त्यात ही मोदी विरोधाकडे वळवण्याचं येथील काहीजणांचं कसब वाखणण्यासारखं आहे हे मात्र खरं.
शिव कालात संताजी धनाजी ही जोडी जेव्हा स्व पराक्रमाने तळपत होती तेव्हा स्वराज्याच्या शत्रूना जळी स्थळी काष्ठ पाषाणी तीच जोडी दिसत असे तसंच काहीसं हे आहे.