पुस्तक परिचय: बनगरवाडी - लेखक: व्यंकटेश माडगुळकर

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
30 Mar 2023 - 10:49 pm

मला कल्पना आहे बहुतांश मिपाकरांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा व ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा परिचय लिहीत आहे.

काही दिवसांपूर्वी मी ही कादंबरी वाचली..लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी होती. आणि पहिलीच कादंबरी वाचून मी लेखकाच्या प्रेमात पडलो.. मी आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे असं मला जाणवलं.. या सगळ्यामुळे या कादंबरीबद्दल लिहायचा मोह मला आवरता आला नाही.

व्यंकटेश माडगुळकर यांनी १९५५ साली लिहलेली ही कादंबरी आहे. मानदेशातील माडगुळे हे लेखकाचे मूळ गाव.. या गावापासून तीन-साडेतीन मैलांवर असलेल्या 'लेंगरवडी' या गावाच्या अनुषंगाने त्यांनी ही कथा लिहली आहे. कादंबरीत लेंगरवाडीच्या ऐवजी बनगरवाडी असं नाव लेखकाने वापरलं आहे.. ही कादंबरी ज्या काळात लिहली गेली त्याकाळात मराठी साहित्यात प्रेमकथा, रहस्यकथा ई. साहित्य जास्त प्रमाणात लिहले जायचे. पण बनगरवाडी कादंबरीत गावातील माणसांचे दररोजचे जीवन, त्यांच्या समस्या अशी वास्तविकतेच्या पातळीवर तिची मांडणी केली असल्यामुळे त्याकाळात वाचकांना ती खूप आवडली होती व आजही ६५-७० वर्षांनंतर सुद्धा तिची लोकप्रियता टिकून आहे हे विशेष.

कादंबरीचे नायक राजाराम विठ्ठल सौदनीकर यांची बनगरवाडीला शाळा मास्तर म्हणून नेमणूक झालेली असते. ते अंधाऱ्या रात्री गाडीवाटेने पायपीट करीत बनगरवाडीला जात आहेत इथून या कथेला सुरुवात होते. चालत असताना गाव कसे असेल, तिथली माणसे कशी असतील, तिथे गेल्यावर रहायचे कुठे असे विचार त्यांच्या मनामध्ये येतात. थोडंसं उजाडल्यानंतर व दिसू लागल्यानंतर त्यांना वाटेत लागणारी शेते, माळरानं, झाडेझुडपे, प्राणी, पक्षी, छोटे छोटे कीटक, मुंग्या, टोळ ई. चे सुरेख वर्णन केलेले आहे.

या कथेत बनगरवाडीतील लोकांचे जीवन, त्यांची उदरनिर्वाहाची व्यवस्था, शेतकरी, मेंढ्या व त्यांना चरायला घेऊन जाणारे मेंढके, घरी राहून लोकरीचे सुत काढणाऱ्या स्त्रिया व त्यांची मुलेबाळे यांच्या दिनक्रमाबद्दल लेखक सांगतात. शेतात घेतली जाणारी वेगवेगळी पिके, त्यांची पेरणी, वाढ व सुगीचा काळ याबद्दल सुद्धा माहिती मिळते.

कथा:

बनगरवाडी ही तीस- पस्तीस घरांची छोटीशी वस्ती असते. गावातील जवळजवळ सगळे लोक मेंढपाळ.. मास्तरांची ही पहिलीच नोकरी असते, तीपण अश्या दुर्गम, दुष्काळी भागात. तिथल्या अशिक्षित व जुनाट लोकांबरोबर मास्तर कसतरी जुळवून घेतो. गावातील सगळ्या मेंढपाळांची मुलं मेंढ्या चरायला घेऊन जायची त्यामुळे काम सोडून त्यांना शाळेत पाठवायला कोणीच तयार होत नाही. मास्तर व गावातील प्रमुख व्यक्ती असलेले कारभारी कशीतरी लोकांची समजूत काढतात व एकदाची शाळा सुरू होते. काही काळानंतर मास्तर तिथल्या लोकांमध्ये मिसळून जातो. मास्तर सर्वांच्या उपयोगी पडतो, गावातील लोकांची पत्रे लिहून देणे, मनीऑर्डर करणे, गावातील तंटे सोडवणे अशी सगळी कामे मास्तर कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करत असतो. त्यानादात एका शेतकऱ्याचे रानीछाप रुपयांचे चिल्लर आणायचे काम घेऊन ते पैसे हरवल्यामुळे मनस्ताप पण सहन करतो.
एकदा गावात तालीम काढायचा विचार मास्तरांच्या मनात येतो. सुरुवातीला गावातील लोकांचा या गोष्टीला विरोध होतो. त्यावेळी मास्तर इमारतीच्या उद्घाटनासाठी पंत सरकार म्हणजे राजाला गावात आणू असं आमिष लोकांना दाखवतात. त्यामुळे लोकांना हुरूप येतो. लोकवर्गणी व संस्थांनाकडून मदत घेऊन ही तालीम पुरी करायचं ठरतं. ज्यांना पैसे देणे शक्य नाही आश्यांनी श्रम, गाडीबैले, शेतातील झाडे द्यावीत असं ठरवतात. तालीम बांधताना अनेक संकटे, अडचणींना सामोरे जावे लागते, बांधावरील झाडं देण्याच्या कारणांवरून शेतकऱ्यांसोबत भांडणे होतात. पण या सगळ्यातून मार्ग काढून ईमारत पुरी होते व तिचं उद्घाटन करायला राजा पहिल्यांदा या ३०-३५ घरांची वस्ती असणाऱ्या गावात येतो.. गावात उत्सव साजरा केला जातो, लोक आनंदित होतात. राजा मास्तरांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतो. पुढे अनेक दिवस लोक पारावर, चावडीत बसून याविषयी चर्चा करतात.Banagarwadi
कादंबरीच्या शेवटी माणदेशात दुष्काळ पडतो तेव्हा माणसांचे व जनावरांचे खाण्या पिण्याचे कसे हाल होतात, गावातील सगळीच माणसं गाव सोडून गेल्यानंतर वाडी, वस्ती ओस पडते या सगळ्याचे वर्णन लेखकाने केले आहे..
या कथेतील इतर पात्रे म्हणजे आयबू मुलानी, आनंदा रामोशी, रामा बनगर, कारभारी व त्यांची मुलगी अंजी, शेकु व त्याची बायको, दादा बालट्या ई.. या सगळ्यांसोबत वेगवेगळ्या घटना, प्रसंगांमुळे मास्तरांचा संबंध येतो.

या कादंबरीतील घटना, प्रसंग, व्यक्तिचित्रण, परिसराचे वर्णन हे खूप जिवंत आणि वास्तववादी वाटते. या कादंबरीत इतर छोट्या छोट्या उपकथा आहेत, ज्यात सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, मास्तरांची तालीम बांधण्याची धडपड, शेकू व अंजीचे प्रेमप्रकरण… ह्या सर्व कथा या कादंबरीला एक उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी म्हणून ओळख देतात. या कादंबरीत पूर्वी कधीही न वाचलेले किंवा सध्या वापरात नसलेले अनेक नवीन शब्द आपल्या डोळ्यांखालून जातात. सुटे-सुटे वाचताना त्यांचा अर्थ समजत नाही पण जसजसं वाक्य पूर्ण होत जातं तसतसा त्यांचा अर्थ आपल्याला समजतो.
कोणत्याही प्रकारच्या कथा/ कादंबरीची निश्चित अशी मांडणी असते, एक ग्राफ असतो. शांत सुरुवात, त्यांनतर रोमांचक घटना व प्रसंग, त्यानंतर काही चढ उतार. नाही म्हणायला या कादंबरीत पण काही चढ-उतार आहेत, पण ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे एका फ्लो मध्ये पुढे सरकत जाते. हेच या कथेचे वेगळेपण आहे.

या कादंबरीचे गुजराती, हिंदी, उर्दू, तमिळ, तेलगू, कन्नड इ. भाषांत भाषांतर झालेले आहे. राम देशमुख यांनी इंग्रजीत 'द व्हिलेज हॅड नो वॉल्स' या नावाने भाषांतर केले आहे. Village
महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने देखील ही कादंबरी सन्मानित झालेली आहे.
ग्रामीण जीवन जगलेल्या आणि ५०-६० वर्षापूर्वीची खेडेगावं व तेथील माणसं याबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने ही कादंबरी एकदातरी वाचायलाच हवी.

या चित्रपटावर १९९५ साली एक मराठी चित्रपट सुद्धा बनवला गेला होता.. अमोल पालेकर यांनी तो दिग्दर्शित केला होता.

तुम्ही ही कादंबरी वाचली असेल तर त्याविषयीचे तुमचे विचार, अनुभव जाणून घ्यायला आवडेल..

शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.!!
-----------------------------------------------------

मी लिहलेले आणखी काही पुस्तक परिचय:
हि वाट एकटीची
एक होता कार्व्हर

कलालेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Mar 2023 - 7:24 am | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर परीचय!! मी वाचलेय ही कादंबरी. वाचता वाचता रमून जावे अशी.

सुजित जाधव's picture

31 Mar 2023 - 2:55 pm | सुजित जाधव

धन्यवाद..!!

छान लिहिले आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणाबद्दल काय बोलावे? कोवळे दिवस, सत्तांतर आणि बरेच काही.

याखेरीज त्यांचे कथाकथन (कथावाचन म्हणता येत नाही इतके अस्सल नैसर्गिक) हाही एक पैलू अनेकांना माहीत नसू शकतो

याही खेरीज त्यांचा अन्य एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते निसर्गप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक होते. पक्षी मित्र होते.

नशिबाने कॉलेज काळात, एका निसर्ग विषयक सेमिनार मध्ये पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी मी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव घेतला आहे. व्यक्ती म्हणून देखील ते प्रेमळ आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते.

सुजित जाधव's picture

31 Mar 2023 - 2:54 pm | सुजित जाधव

धन्यवाद..!!
आंतरजालावर त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती वाचत असताना मलापण बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांची बाकीची पुस्तके पण वाचणार आहे. सध्या त्यांचेच माणदेशी माणसं वाचतोय..

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 12:53 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलंय !
न विसरता येण्याजोगी कलाकृती !

याचे ऑडियोबुक ऐकले, ते पण भन्नाट होते !

तुषार काळभोर's picture

31 Mar 2023 - 2:35 pm | तुषार काळभोर

तुमचा लेख संग्राह्य झाला आहे.
पुस्तक वाचले होते. अमोल पालेकरांच्या चित्रपटाचे खूप कौतूक ऐकलं आहे. एकदा बघायला हवा.

या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 6:17 pm | चौथा कोनाडा

राम देशमुख यांनी इंग्रजीत 'द व्हिलेज हॅड नो वॉल्स' या नावाने भाषांतर केले आहे.

या बद्दल इंग्रजी वाचकांचा अभिप्राय या बद्दल काही कळु शकते का ? मराठी साहित्यातील अश्या इंग्रजी भाषांतरीत पुस्त़कांचे कसे स्वागत होते ?
याचा प्रचार कसा केला जातो ? खप किती होतो ?
याच्यावर इंग्रजीमध्ये / इतर भारतीय भाषांमध्ये परिक्षण / समिक्षण लिहिले जाते का ?

मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व
सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे आमच्या शाळेतून काॅलेजात आलेल्या शाळेतील शिक्षकआपली आईवडिलांसारखी काळजी घेतात.अशा मला तरी आपले आपण बघा व करा परीक्षेची तयारी करा प्रत्येक विषयाला वेगवेगळी पुस्तके वाचा व notes काढा मग परीक्षेत उत्तरे लिहा असे होते भाषेला फक्त क्रमिक पुस्तक असे .बाकी economics , indian economy, economic history याला अशीच तयारी करावी लागे .

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2023 - 5:32 pm | चौथा कोनाडा

मला ही कादंबरी first yr.arts होती व पुष्पा भावे मॅडम शिकवायच्या. तेव्हा मला तिचे इतके महत्व कळले नव्हते व
सुुप्रसिद्ध समीक्षक पुष्पा भावेबाई यांचे शिकवणे ही कळले नाही पण त्या खूप विस्तृत विवेचन करत असत. त्या वयाला १६/१७ च्या ते अतिशय कंटाळवाणे वाटे. कारण रोज एकतर पोटात भूक लागली असे व त्यांची ऊच्च दर्जाची भाषा कळत नसे


!!

चौकस२१२'s picture

1 Apr 2023 - 5:50 am | चौकस२१२

व्यंकटेश माडगूळकर वाह....
त्यांच्या लिखाणातून जे ग्रामीण भागातील चित्र उभं राहतं / व्यक्ती गावगाडा / निसर्ग ते फार लोभसवाणे आहे ...
विनोदी ढंगाने ग्रामीण भागातील इरसाल पणा दाखवणारे म्हणजे शंकर पाटील ,,, ज्यांना माहित नाही त्यांना मी जरूर सुचवेन कि पाटलांचे कथाकथन नक्की ऐकावे

Bhakti's picture

1 Apr 2023 - 4:05 pm | Bhakti

छान परिचय!
सध्या आमचे हे हेच पुस्तक वाचत आहेत.नंतर मी वाचेन.
ग्रामीण लोकजीवन कथा कायम बीज एक सशक्त विषय असते.
हा कथा परिचय वाचून 'ख्वाडा' सिनेमा आठवला.धनगर समाजाची कथा, त्यातला नायक छान सिनेमा आहे.'गाणं वाजू द्या 'आदर्श शिंदेंनी गायलेले गाणं माझं आवडतं गाणं आहे.
तुम्ही व्यंकटेश माडगूळकर यांचेच दुसरं पुस्तक वाचताय,त्या पुस्तक परिचयाची उत्सुकता आहे.

सुजित जाधव's picture

1 Apr 2023 - 9:51 pm | सुजित जाधव

धन्यवाद..!
नक्की वाचा.. दुसऱ्या पुस्तकाचा परिचय वाचायची तुम्हाला उत्सुकता आहे हे ऐकून छान वाटलं..मस्त आहे ते पण.. लवकरच लिहिणार आहे त्या पुस्तकाचा परिचय..

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Apr 2023 - 7:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

व्यं मां नी एकदा कुठेतरी "व्यं. दि. माडगुळकर" अशी सही केली. त्यावेळी त्यांचे भाऊ ग.दि.मा. लोकप्रिय होते. तर कोणीतरी ती सही चूक असेल असे वाटुन ग.दि. माडगुळकर असे सुधारले. :)

यावरुन धडा घेउन व्यं.दि. नी आपली सही नेहमीसाठी बदलली आणि पूर्ण नाव लिहायला सुरुवात केली.

सुजित जाधव's picture

1 Apr 2023 - 10:14 pm | सुजित जाधव

मला व्यंकटेश माडगुळकर ग. दी. मांचे भाऊ आहेत हे मला बरेच वर्षे माहित नव्हतं..

परिचय चांगला जमला आहे. हल्लीच एक नवीन गोष्ट समजली ती म्हणजे हे पुस्तक प्रकाशन कायम मौजकडेच राहणार होते.

सुजित जाधव's picture

2 Apr 2023 - 7:35 am | सुजित जाधव

@चौथा कानोडा @तुषार काळभोर @चोकास २१२ @कंजूस.. प्रतिसादासाठी धन्यवाद..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2023 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंय. व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी मला बीएच्या ऐच्छिक मराठी घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला होती. पण, पहिल्यांदाच जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा कादंबरी वाचून झाल्यावर ती पात्रे आणि कथानकाने जो काय आनंद दिला तो आनंद कायमच राहीला. मास्तर, कारभारी, अंजी, आयुब, दुष्काळ, मेंढ्या, त्या सर्व घटना-पात्रांबरोबर आपण त्या गावातच वावरतो असे वाटायला लागते. कारभा-याचं निधन, मास्तराची बदली सोबत करणारा आयुब आणि दुष्काळामुळे गाव सोडुन जाणारी गावातली माणसं-मेंढरं, या घटनांनी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही.

सिनेमाही सुंदर आहे, कादंबरीबद्दल छान लिहिलंय. लिहिते राहा. आभार.

-दिलीप बिरुटे

कादंबरीच्या वेषात सामाजिक चालीरीती, वातावरण यांचा इतिहास असतो. नोंद असते.

संग्रही आहे ,बरेच वेळा वाचन करतो प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव येतो.

बनगरवाडी वडिलांसाठी वाचनालयातून आणले होते पण तेंव्हा चांदोबा,कुमार ,अरेबियन नाईट्स, गुलबकावली, सिहांसन बत्तिशी सारखी पुस्तके वाचायचे वय असल्याने व पुढे महाराष्ट्र सोडावा लागला म्हणून मागे पडले.

पुस्तक परिचय छान.