पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
12 Jul 2022 - 4:14 pm

एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा...

आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे..

अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा. त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. जी त्याने ७०० डॉलर्स देऊन विकत घेतली होती. त्याकाळी गुलामांना पळवून नेऊन त्यांच्या विक्रीचा धंदा जोरात चालू होता. अश्याच एका टोळीची नजर मेरीवर पडते. ती टोळी मेरी व तिच्या बाळाला पळवून नेते.. मोझेस कार्व्हर त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते शेतजमीनीचा तुकडा आणि उमदा घोडा त्या टोळीला देऊ करतात.. पण त्याबदल्यात त्यांना फक्त मेरीच दोन वर्षाच मरकुट बाळ परत मिळत ...मेरी नाही.. पुढे ते त्याचं नामांतर जॉर्ज कार्व्हर असं करतात आणि त्याच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करतात.

खूपच अशक्त आणि हाडकुळा असणाऱ्या जॉर्जला लहानपणी खूपच कमी शब्द बोलता यायचे, जवळपास तो मुकाच होता. या लहानग्या जॉर्जचा मित्रपरिवार मुलखावेगळा होता. रानावनातील झाडझुडुपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. त्याला लहानपणी अनेक प्रश्न पडत असत जसे की झाडांना हिरवा रंग कसा येतो? इंद्रधनुष्याला रंग कोण देत? सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात? …एकदा त्याने पालापाचोला, गवत, दोरा आणि सूत याचा वापर करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं कि सुझनबाईंना लोकांना शपथ घेऊन सांगावं लागायचं की हे आमच्या मुक्या पोरानेच बनवल आहे. जॉर्जची निर्सगाशी इतकी घट्ट मैत्री जमली होती की बागेतील फुले मुरझली किंवा झाडांची वाढ खुंटली की ते जॉर्ज ला लगेच समजायचं. मग जॉर्ज त्या झाडांची जागा बदलणे, त्यांना सूर्यप्रकाश देणे, खतपाणी घालणे असं करून तो कोणाचीही बाग फुलवून द्यायचा. डायमंड ग्रोव्ह मधला तो छोटा पण अतिशय कुशल माळी होता.

थोडा मोठा झाल्यांनतर त्याला निओशी इथं निग्रो मुलांच्या शाळेत घातलं गेलं. त्याची ईच्छा नसतानाही त्याला कार्व्हर कुटुंबापासून दूर जावं लागतं. घर सोडताना मोझेसबाबा त्याला सांगतात "आता तू गुलाम नाहीस, स्वत्रंत आहेस. काम करून पोटापाण्याची व्यवस्था लाव, शिक्षण घे आणि खूप मोठ्ठा हो". निओशीत गेल्यानंतर सुझनबाईंच्या आदेशानुसार जॉर्ज घरोघर काम मागत हिंडला. तो मिळतील ती कामे करून शिक्षण घ्यायचा.. दिवसभर शाळा शिकून तो रात्री जुन्या पडक्या गोठ्यात झोपायचा. काही दिवसांनी जॉन मार्टिन या सद्गुस्थाने जॉर्जला गोठयात पाहिलं... त्याची सर्व कहाणी ऐकली आणि त्यांनतर ते त्याला आपल्या घरी राहायला घेऊन गेले. जॉर्ज इथेसुद्धा स्वयंपाकापासून ते बागेपर्यंत सगळी कामे करायचा आणि शिक्षण पण घ्यायचा.
मजल दरमजल करत तो त्याच शालान्त शिक्षण पूर्ण करतो. पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना त्याला निग्रो असल्यामुळे एका युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश नाकारला जातो. त्यानंतर तो सिंप्सन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतो. या सगळ्या प्रवासात त्याला पावलोपावली संकटं येत असतात पण तो जिद्द सोडत नाही. तो चिकाटीने मेहनत करून सगळ्या परस्तिथीसोबत लढत असतो.

tt

पुढे शिक्षण संपवून जॉर्ज कार्व्हर त्याच कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपल्या समाजबांधवांसाठी कार्व्हर यांनी पुढे अनेक संस्था चालू केल्या त्यापैकीच एक म्हणजे अलाबामा येथील टस्कीगी संस्था. तिथे ते शेतीविषयक विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. जेव्हा ते तिथे पोहचले तेव्हा त्या परिसराची अवस्था प्रचंड बिकट होती आणि तेच त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले. ते तेथील विध्यार्थ्यांना हाताशी घेऊन नव-नवे प्रयोग करायचे. दिवसरात्र मेहनत घेऊन त्यांनी तिथे विविध प्रयोग केले. अनेक वर्षे जिथे कापसाचं पीक घेतलं जात होत तिथे त्यांनी भुईमूग लावून दाखवून जमिनीची पोत कशी सुधारेल याच ज्ञान दिल. त्याच भुईमुगापासून त्यांनी जवळपास ३०० पदार्थ बनवून दाखवले. जिथे फक्त कापसाचे पीक घेतले जायचे तिथे त्यांनी रताळे लावून त्यापासून सव्वाशेपेक्षा जास्त पदार्थ बनवून दाखवले. असे असंख्य प्रयोग त्यांनी केले. सामान्यांना सामान्य आयुष्यात वापरता येतील असे प्रयोग त्यांनी करून दाखवले. लोकांसाठी नेहमी धावून जाणारे, प्रसंगी स्वतःची पदरमोड करणारे, लोकांना कायम विनामूल्य सल्ला देणारे अशी त्यांची सर्वदूर ओळख बनली. मोठमोठ्या विद्यापीठातून त्यांचे सल्ले घ्यायाला मंडळी येऊ लागली. त्यांनी अर्थार्जनापेक्षा ज्ञानार्जनाला जास्त महत्व दिले. १८९६ ते १९४३ या काळात त्यांनी फक्त सव्वाशे डॉलर एवढाच पगार घेतला. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते याचा त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.

हे पुस्तक इंटरेस्टिंग आहेच त्याचबरोबर ते प्रचंड प्रेरणादायी आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमकं कसं जगावं याच ते उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यानांतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलू शकतो. या पुस्तकाची मराठी पुस्तकविश्वात एक विशेष अशी वेगळी ओळख बनलेली आहे....

पुस्तकाची भाषा एकदम साधीसोपी आहे. वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. पट्टीचा वाचक अगदी १-२ दिवसात हे पुस्तक वाचून काढू शकतो. पुस्तकात ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी चित्र आहेत. वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसच तस उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि हलाखीचे जीवन याबद्दल वाचत असताना आपण भावनिक होतो आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी तरळतं…
चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. एकदा वाचून मन न भरणारी ही कादंबरी नक्की वाचा.

प्रतिशब्दलेखमाहिती

प्रतिक्रिया

खेडूत's picture

12 Jul 2022 - 5:23 pm | खेडूत

वाचले आहे.. अनेक वेळा, संग्रही आहेच.
खूप छान आहे.

श्वेता व्यास's picture

12 Jul 2022 - 5:59 pm | श्वेता व्यास

पुस्तक छानच आहे, आपण चांगला आढावा घेतला आहे. खरोखर ३-४ दिवसातच वाचून झालं होतं.

मिपा वर या कादंबरी वर मागे एक धागा आला होता असे अंधुक आठवते...

गामा पैलवान's picture

12 Jul 2022 - 7:16 pm | गामा पैलवान

सुजित जाधव,

पुस्तक काही दशकांपूर्वी वाचलं होतं. अप्रतिम आहे. त्याची पुनर्भेट घडवून दिल्याबद्दल आभार. :-)

आ.न.,
-गा.पै.

Nitin Palkar's picture

12 Jul 2022 - 8:04 pm | Nitin Palkar

अप्रतिम पुस्तक... सुरेख परीचय. जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर महान होते यात शंकाच नाही. त्यांच्याच तोडीचे भारतीय कृषी तज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. यांचेही चरित्र वीणा गवाणकर यांनी लिहिले आहे. 'नाही चिरा.....' असे त्याचे नाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रदेशात जाऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते एक होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपल्या ज्ञानाचा आपल्या देशाला उपयोग व्हावा या हेतूने ते भारतात परत आले. पण तत्कालीन सरकारने त्यांची दाखलही घेतली नाही. अखेरीस विपन्नावस्थेत त्यांचा मृत्यू झाला. हे पुस्तकही वाचनीय आहे.

गामा पैलवान's picture

13 Jul 2022 - 1:33 am | गामा पैलवान

Nitin Palkar,

माझ्याही मनात हेच नाव आलं होतं. मेक्सिकोची कृषी व्यवस्था एके काळी खानखोज्यांनी पेलली होती. तिथल्याच प्रा. नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात येऊन १९६७ साली हरित क्रांती रुजवली. मग खुद्द खानखोज्यांना का पाचारण केलं गेलं नाही? कारण की त्यांचा तेव्हा मृत्यू झाला होता.

नेहरू-गांधी घराणं कर्मदरिद्री आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुजित जाधव's picture

13 Jul 2022 - 9:33 am | सुजित जाधव

धन्यवाद नितीनजी..
पहिल्यांदा ऐकतोय नाही चिरा पुस्तकाबद्दल...वाचेन नक्की..

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2022 - 10:42 pm | श्रीगुरुजी

वाचले आहे हे पुस्तक. खूप आवडले. कार्व्हरच्या जीवनाची कहाणी डोळ्यात पाणी आणते.

आग्या१९९०'s picture

13 Jul 2022 - 12:39 am | आग्या१९९०

सुरेख पुस्तक परिचय.
धूम्रपानाबद्दल बोलताना कार्व्हर - " आपले नाक धूर सोडण्यासाठी बनवले असते तर नाकपुड्या धुरांड्यासारख्या वरच्या दिशेला असत्या"
कधीही कोणतीही गोष्ट दुसऱ्याकडून न मागणाऱ्या कार्व्हरनी हीरा मागितला होता एक खनिज म्हणून विद्यार्थ्यांना दाखवायला.

सुजित जाधव's picture

13 Jul 2022 - 9:34 am | सुजित जाधव

धन्यवाद...!

सुजित जाधव's picture

13 Jul 2022 - 9:37 am | सुजित जाधव

श्वेता व्यास, गामा पैलवान, खेडूत, श्रीगुरुजी, सुक्या ...सर्वांचे मनापासून आभार .. :-)