शेवटचा तास (भाषांतर)

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
27 Mar 2023 - 10:55 pm

शेवटचा तास

मूळ फ्रेंच कथा : The Last Lesson By Alphonse Daudet (१८७३) , English Translation By Francis J. Reynolds

Alphonse Daudet (१८४०-१८९७) हे कवी, कथाकार, कादंबरीकार होते. फ्रँको प्रशियन युद्धात (१८७०-७१ ) त्यांना सक्तीने भाग घ्यावा लागला. त्यांच्या लिखाणात युद्धकाळातले दारुण अनुभव आढळतात. या युद्धात फ्रान्सचा पराभव होऊन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. आल्सेस आणि लॉरेन हे प्रांत जर्मनीच्या ताब्यात गेले.

----------------

झालाच उशीर! आता हॅमेल सर ओरडणार. त्यात आणखी आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत. कसली, तर म्हणे कृदन्त! हे काय असतं? मला तर एक शब्दही ठाऊक नाही त्यातला. आता काय, खा ओरडा.

मी घाईघाईने धावतपळत शाळेत निघालो होतो. पण माझं मन म्हणत होतं, "कशाला जायचं तिथे ओरडा खायला? चल, मार शाळेला बुट्टी. भटक मस्त कुठेतरी दिवसभर. बघ, कसं छान ऊन पडलं आहे." दूरवर जंगल दिसत होतं. झाडांवर पक्षी किलबिलत होते. लाकूड कारखान्यामागे काहीतरी गडबड दिसत होती. प्रशियन सैनिक तिथलं खुलं मैदान उकरताहेत वाटतं. खरंच, मारू बुट्टी? काय काय मज्जा आहे इथे. मरो ते कृदन्त. पण मोठं बळ आणून मी या विचारांवर मात केली, आणि भराभर शाळेकडे निघालो.

वाटेत टाऊन हॉल लागला. तिथे बाहेरच्या फलकावर आज पुन्हा काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यासमोर गर्दी जमली होती. गेली दोन वर्षं या फलकावर आम्ही नुसत्या आपल्या वाईट बातम्याच वाचत होतो. आमच्या सैन्याचा युद्धात झालेला पराभव, सैन्यभरतीची सूचना, अधिकाऱ्यांनी दिलेले हुकूम. माझ्या मनात आलं, "आज काय बातमी?" पण तिथे न थांबता मी घाईने पुढे निघालो. "एवढी काय घाई? जा सावकाश. आहे अजून वेळ. पोचशील." फलकाजवळून लोहाराने मला ओरडून सांगितलं. तो आणि त्याच्याकडे लोहारकाम शिकणारा मुलगा, दोघेजण गर्दीत फलक वाचत उभे होते. इकडे मला कोण उशीर झाला आहे, आणि याला मस्करी सुचते, असं म्हणत, धापा टाकत मी शाळेच्या आवारात पोहोचलो.

रोज शाळा भरताना इतका गोंधळ होतो, की बाहेर रस्त्यावरसुद्धा तो ऐकू जातो. डेस्क उघडल्याचे धाडधाड आवाज येतात. आम्ही एका सुरात इतक्या मोठ्याने धडे घोकत असतो, की आमचे आम्हांलाच कानांवर हात धरून लक्ष एकाग्र करावं लागतं. हॅमेल सर त्यांची ती कुप्रसिद्ध पट्टी टेबलावर जोरजोराने खाडखाड आपटत असतात. मला वाटलं होतं, त्या गोंधळात मी पट्कन जाऊन माझ्या जागेवर बसेन. दिसणारच नाही कोणाला. पण नेमकं आजच सगळं इतकं शांत? चुकून रविवारी सकाळी आलो की काय मी शाळेत?

खिडकीतून डोकावून पाहिलं, तर माझे सगळे वर्गमित्र आपापल्या जागेवर गपचूप बसले होते. आपली ती भयानक लोखंडी पट्टी काखेत धरून हॅमेल सर वर्गात येरझारे घालत होते. आली का पंचाईत! काय करणार? दार उघडून सर्वांच्या समोरून वर्गात जावं लागलं. मी किती घाबरलो होतो, आणि माझा चेहरा कसा लालभडक झाला होता, हे वेगळं सांगायला नको. तुम्हांला कल्पना आली असेलच. पण मला भीती होती तसलं काही घडलं नाही. हॅमेल सरांनी मला पाहिलं, आणि अगदी मायेने ते म्हणाले, "फ्रान्झ, बाळा, जा, लवकर आपल्या जागेवर बस पाहू. आम्ही आता अभ्यासाला सुरुवात करतच होतो." लगेच टेबलावरून उडी मारून मी बाकावर जाऊन बसलो, तेव्हा कुठे भीती जराशी कमी झाली. मग माझ्या लक्षात आलं, की हॅमेल सरांनी आज त्यांचा सुरेख हिरवा कोट घातला आहे. शिवाय झालर लावलेला शर्ट, आणि काळी रेशमी टोपी. सुंदर भरतकाम केलेले हे कपडे हॅमेल सर फक्त शाळेचं इन्स्पेक्शन आणि बक्षीस समारंभ, या दोन खास दिवशी घालत असत.

आज सगळी शाळाच मुळी काहीतरी विचित्र, गंभीर वाटत होती. आणि मागे वळून पाहिल्यावर तर मी आश्चर्याने थक्क झालो. नेहमी रिकाम्या असणाऱ्या मागच्या बाकांवर गावातली मोठी माणसं बसली होती. तीही आमच्यासारखीच शांतपणे बसली होती. त्रिकोणी टोपी घातलेले हाउसर आजोबा, माजी महापौर, माजी पोस्टमास्तर, आणखी असेच इतर काही लोक. सगळे दुःखी दिसत होते. हाउसर आजोबांनी एक अंकलिपी आणली होती. ती अगदी जीर्ण दिसत होती. पानांच्या कडा फाटलेली ती अंकलिपी उघडून त्यांनी आपल्या मांडीवर ठेवली होती, आणि तिच्यावर आपला चष्मा ठेवला होता.

या सर्वांकडे मी आश्चर्याने पाहत असतानाच हॅमेल सर आपल्या खुर्चीत जाऊन बसले, आणि मगाशी ज्या गंभीर आणि प्रेमळ स्वरात ते माझ्याशी बोलले होते, त्याच स्वरात म्हणाले, "माझ्या मुलांनो, आजचा हा माझा शेवटचा तास. बर्लिनहून हुकूम आला आहे, की यापुढे आल्सेस आणि लॉरेन प्रांतांमध्ये फक्त जर्मन भाषा शिकवण्यात यावी. तुमचे नवे शिक्षक उद्या येतील. आजचा हा आपला फ्रेंचचा शेवटचा तास. आजच्या तासाला नीट लक्ष द्या."

वीज कोसळावी तसे हे शब्द माझ्या कानांवर आदळले. अरे देवा! म्हणजे टाऊन हॉलबाहेर हे लिहिलं होतं तर.

आज फ्रेंच शिकायचा शेवटचा दिवस! पण काय हे, मला तर अजून धड लिहितासुद्धा येत नाही. आणि यापुढे ते शिकताही येणार नाही. म्हणजे इथेच संपलं म्हणायचं फ्रेंच. मला अतोनात दुःख झालं. का मी नीट लक्ष देऊन शिकलो नाही? का पक्ष्यांची अंडी शोधत फिरलो? का सार नदीत पोहायला गेलो? इतके दिवस पुस्तकं म्हणजे कटकट वाटत होती मला. सतत त्यांचं ओझं वाहायला कंटाळलो होतो. पण आज तेच व्याकरण आणि इतिहास मला माझ्या जुन्या मित्रांसारखे वाटू लागले. त्यांची संगत सुटू नयेसं वाटू लागलं. आणि हॅमेल सर? तेही आता शाळा सोडून दूर जाणार, पुन्हा ते आपल्याला दिसणारसुद्धा नाहीत म्हटल्यावर मला त्यांच्या पट्टीचा, त्यांच्या खडूस स्वभावाचा विसर पडला.

बिचारे हॅमेल सर. आजच्या त्यांच्या शेवटच्या फ्रेंचच्या तासासाठी म्हणून त्यांनी खास ठेवणीतले कपडे घातले होते. आणि मग माझ्या लक्षात आलं, की गावातले वृद्ध लोक त्याचसाठी वर्गात मागे येऊन बसले होते. आपण आणखी का नाही शिकलो, याचं त्यांनाही दुःख होत होतं. गेली चाळीस वर्षं मनापासून शिकवणाऱ्या या मास्तरांचे आभार मानायला ते लोक आले होते. स्वातंत्र्य गमावलेल्या आपल्या देशाला मानवंदना द्यायला आले होते. अशा विचारांत गुंगून गेलो असताना, माझ्या नावाची हाक ऐकू आली. पाठांतर म्हणून दाखवण्याची माझी पाळी होती. त्यावेळी तो कृदंताचा भयंकर नियम न अडखळता, न विसरता, खणखणीत आवाजात म्हणता यावा म्हणून मी काय वाट्टेल ते द्यायला तयार झालो असतो. पण सुरुवातीलाच अडखळलो, आणि मग डेस्क घट्ट धरून तसाच उभा राहिलो. हृदय जोराने धडधडू लागलं. मान वर करून पाहण्याचा धीर होत नव्हता. हॅमेल सरांचा आवाज ऐकू आला,

"फ्रान्झ बाळा, मी तुला ओरडणार नाही. तुझं तुलाच दुःख होत असेल, तितकंच पुरे. कसं असतं पहा. आपण रोज म्हणतो, हं ! काय घाई आहे? भरपूर वेळ आहे माझ्या हातात. उद्या अभ्यास करीन. पाहिलंस, आज कुठवर येऊन पोहोचलो आपण! शिकण्याचं काम उद्यावर ढकलणं हा एक मोठाच दुर्गुण आहे आपल्या आल्सेस प्रांतात. आता ते प्रशियन अधिकारी हक्काने विचारतील, फ्रेंच म्हणवता, आणि स्वतःची भाषा लिहिता वाचता येत नाही? हे कसं काय? पण फ्रान्झ बाळा, तूच एकटा सर्वांपेक्षा वाईट, असं म्हणत नाही मी. आपल्या सर्वांचाच मोठा दोष आहे हा. तुझ्या आईवडिलांनी तुझ्या शिक्षणाची फारशी आस्था बाळगली नाही. त्यांनी तुला शेतावर, किंवा गिरणीत कामाला पाठवलं. तेवढीच जास्तीची कमाई होईल, म्हणून. आणि मी? माझासुद्धा दोष आहेच. मीच नाही का तुला कितीतरी वेळा पुस्तकातले धडे शिकण्याऐवजी माझ्या फुलझाडांना पाणी घालायला पाठवलं? आणि मला मासेमारी करायची हुक्की आली, की मी सरळ शाळेला सुट्टी नव्हतो का देत?"

हॅमेल सर पुढे बोलत राहिले. एकातून दुसरा विषय निघत गेला, आणि ते फ्रेंच भाषेविषयी बोलू लागले. "आपली फ्रेंच म्हणजे जगातली सर्वात सुंदर भाषा आहे. सर्वात सुस्पष्ट आणि तर्कनिष्ठ. आपण सर्वांनी मिळून तिचं रक्षण केलं पाहिजे. ती विस्मरणात जाता कामा नये. एखादा देश पारतंत्र्यात गेला, तरी जोपर्यंत तो आपली भाषा घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत त्या तुरुंगाची किल्ली त्याच्या हातात असल्यासारखी असते." मग त्यांनी व्याकरणाचं पुस्तक उघडलं, आणि आम्हांला त्यातला धडा वाचून दाखवला. मला तो इतका नीट समजला, की माझं मलाच आश्चर्य वाटलं. त्यांचं बोलणं इतकं सोपं वाटत होतं! फार फार सोपं! मला वाटतं, मी यापूर्वी त्यांचं बोलणं कधीच इतकं काळजीपूर्वक ऐकलं नव्हतं. त्यांनीही इतकं जीव ओतून कधी शिकवलं नसावं! बिचारे हॅमेल सर. आपल्याजवळ जे ज्ञान आहे, ते इथून जाण्यापूर्वी या मुलांना द्यावं, इतकंच नव्हे, तर ते सगळं ज्ञान एकदम एकाच वेळी यांच्या डोक्यात शिरावं, असं त्यांना वाटत असावं.

व्याकरणानंतर सुलेखनाचा पाठ सुरु झाला. त्यांनी आमच्यासाठी नवीन कागद आणले होते. त्यांच्यावर सुरेख वळणदार अक्षरात शब्द लिहिले होते. फ्रान्स, आल्सेस, फ्रान्स, आल्सेस. ते कागद कसे दिसत होते सांगू? जसे काही वर्गात बाकाबाकावर दांड्यांना अडकवलेले, फडफडणारे छोटे छोटे झेंडे. आम्ही सगळे लगेच लिहायला लागलो. वर्गात किती शांतता होती, ते तुम्हांला पाहता आलं असतं तर! कागदावर लेखण्या कुरुकुरु चालताना जो काही आवाज होत होता, तितकाच. मध्येच काही भुंगे वर्गात शिरले. पण त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. अगदी छोट्या मुलांचंही. ती तल्लीन होऊन अक्षरं गिरवत होती. त्यांनी तर कागद अडकवायचे हूक सुद्धा गिरवले होते. तीही फ्रेंच अक्षरंच जशी काही! छपरावरच्या कबुतरांचा आवाजसुद्धा अगदी मंद येत होता. माझ्या मनात आलं, "आता या कबुतरांना सुद्धा जर्मन भाषेत घुटर्रघुम करायला लावणार आहेत का?"

लिहिता लिहिता मान वर केली, की मला हॅमेल सर दिसत होते. ते आपल्या खुर्चीत अगदी स्तब्ध बसून एक एक करून वर्गातल्या सर्व वस्तू न्याहाळत होते. आमच्या छोट्याशा वर्गाचं दृश्य मनात साठवून ठेवत असावेत. कल्पना करा. गेली चाळीस वर्षं ते तिथेच राहत होते. खिडकीबाहेर त्यांची बाग होती, आणि इथे त्यांच्यासमोर आमचा हा वर्ग. गेली चाळीस वर्षं त्यात काही बदल झाला नव्हता. फक्त वर्गातली बाकं घासून घासून गुळगुळीत झाली होती. बागेतल्या अक्रोडाच्या झाडांची उंची वाढत गेली होती. त्यांनी स्वतः लावलेला हॉप फुलांचा वेल खिडकीवरून वर चढत चढत छपरापर्यंत पोहोचला होता. बिचारे! हे सगळं सोडून जाताना त्यांना किती वाईट वाटत असेल! वरच्या मजल्यावर त्यांची बहीण सामान बांधत होती. तिच्या चालण्याचा आवाज येत होता. दोघांनाही उद्या देश सोडून जाण्याचा हुकूम होता.

पण तरीही त्यांनी धीराने आमचं सगळ्यांचं वाचन शेवटपर्यंत ऐकलं. सुलेखनानंतर इतिहासाचा पाठ झाला.
मग छोट्या मुलांनी बाराखडी म्हटली. बा, बि, बी, बु, बू. वर्गाच्या मागे पाहतो, तो हाउसर आजोबांचा चष्मा आता त्यांच्या डोळ्यांवर चढला होता. अंकलिपी दोन्ही हातांत धरून ते मुलांबरोबर बाराखडी म्हणत होते, आणि रडत होते. भावना अनावर होऊन त्यांचा आवाज कापत होता. त्या आवाजाची आम्हांला फार म्हणजे फारच मजा वाटली. अगदी हसू की रडू असं झालं सर्वांना. काय सांगू तुम्हांला.. त्या शेवटच्या तासातलं सगळं कसं नीट आठवतं आहे मला!

अचानक चर्चच्या घड्याळात बाराचे ठोके पडले, आणि प्रार्थना सुरु झाली. त्याचक्षणी आमच्या खिडकीखाली ट्रम्पेट वाजू लागलं. कवायतीहून परतणारे प्रशियन्स!
हॅमेल सर उठून उभे राहिले. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. ते किती उंच दिसत होते! यापूर्वी कधीच मला त्यांची उंची जाणवली नव्हती.

"मित्रांनो.. मी.. मी.." त्यांचा घसा भरून आला होता. त्यांना पुढे बोलता येईना.

मागे वळून त्यांनी खडूचा एक तुकडा उचलला, आणि सर्व शक्ती एकवटून, शक्य तितकी मोठी मोठी अक्षरं काढून फळ्यावर लिहिलं, "फ्रान्स चिरायू होवो!"

मग ते थांबले. त्यांचं डोकं झुकून भिंतीला टेकलं.

हात हलवून त्यांनी खुणेनेच सांगितलं, "शाळा सुटली. जा आता."

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

कोणत्या वर्गात आठवत नाही निट पण हा धडा इंग्रजी मधुन शाळेत शिकला आहे मी.

तुषार काळभोर's picture

28 Mar 2023 - 7:40 am | तुषार काळभोर

काही भावना, काही प्रसंग स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असतात.
हीच गोष्ट ब्रिटिशकालीन भारतात घडलेली असू शकते. दुसऱ्या महायुध्दात पोलंडमध्ये घडलेली असू शकते. किंवा वीसेक वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात घडलेली असू शकते.

Vive La Inde!
Vive La France!
Vive La MiPa!!

सौंदाळा's picture

28 Mar 2023 - 10:41 am | सौंदाळा

खूप दिवसांनी तुमचा लेख आला.
अत्यंत सुंदर भावस्पर्शी गोष्ट आहे आणि त्याच ताकदीचा अनुवाद. तुका यांच्या प्रतिसादाशी सहमत.
आजपर्यंत कधीच कोणाचा निरोप्समारंभ (पूर्ण निवृत्ती आधीचा) अ‍ॅटेंड करायला मिळाला नाही पण त्यावेळी काय भावना असतील हे समजू शकतो आणि त्यात पण कथेतील परकिय आक्रमण किंवा ईतर मुद्दे असतील तर हा निरोप घेणे खूपच कठीण होत असेल.
रच्याकने बरेच जण म्हणतात १९९७५/८० नंतर जन्मलेल्या पिढीने खूप स्थित्यंतरे पाहिली. पण भारताबाबत बोलायचे तर १९२५-३५ मधे जन्म होऊन जे लोक ७५/८० वर्षांच्या वर जगले त्यांनी तर दुसरे महायुध्द, स्वातंत्र्य चळवळ आणि मिळालेले स्वातंत्र्य, रेडीओ, दुरचित्रवाणी, टेलीफोन, इंटरनेट, मोबाईल, बैलगाडी, जहाज, बस, कार, ट्रेन, विमान प्रवास अशा बर्‍याच गोष्टी पाहिल्या.

कर्नलतपस्वी's picture

28 Mar 2023 - 11:17 am | कर्नलतपस्वी

काय घाई आहे? भरपूर वेळ आहे माझ्या हातात. उद्या अभ्यास करीन.

इयत्ता तिसरी मधे करीन मग हा धडा होता. मुलांना वेळेचे महत्त्व समजावुन देण्यासाठी होता.

निरोप समारंभ हा नेहमीच दुःखदायक असतो. पहिल्यांदा अनुभव आला तो प्राथमिक शाळेतील शेवटच्या वर्षात. आमच्या वेळेस प्राथमिक शाळा सातवी नंतर सोडून माध्यमिक शाळेत जावे लागे.

छान लेख,आवडला.

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2023 - 2:00 pm | सुधीर कांदळकर

भिडणारी कथा. अनुवादात सारे छान उतरले आहे असे वाटते. आवडली. अनेक अनेक धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Mar 2023 - 2:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर कथा आणि अनुवाद.

नपा's picture

28 Mar 2023 - 3:16 pm | नपा

वेळेचं महत्व विशद करणारी छान भावस्पर्शी कथा...

'एखादा देश पारतंत्र्यात गेला, तरी जोपर्यंत तो आपली भाषा घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत त्या तुरुंगाची किल्ली त्याच्या हातात असल्यासारखी असते.' अगदी बरोबर..

लेख आवडला..धन्यवाद

सुंदर आणि सशक्त कथेचा अतिसुंदर अनुवाद!
मूळ कथेतून व्यक्त होणारा भावपूर्ण अर्थ/आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात बहुतेकवेळा अनुवादित कथा सपशेल अपयशी ठरतात, पण तुम्ही भाषांतरासाठी निवडलेल्या कथा आणि त्यांचा केलेला अनुवाद मात्र त्याला अपवाद ठरतात 👍
खूप छान. पुढील कथेच्या प्रतीक्षेत!

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2023 - 4:27 pm | सुधीर कांदळकर

आवडली कथा. अनेक अनेक धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2023 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर कथा. अनूवाद तितकाच भारी.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

29 Mar 2023 - 9:27 am | रंगीला रतन

आवडली!!!

धर्मराजमुटके's picture

29 Mar 2023 - 10:09 am | धर्मराजमुटके

कथेची निवड आणि अनुवाद दोन्हीही उत्कृष्ट ! एकाची दुसर्‍याशी तुलना करु नये पण अशीच प्रगती राहिली तर तुम्ही एक दिवस मिपाचे लेडी जयंत कुलकर्णी नक्की बनाल.

अथांग आकाश's picture

29 Mar 2023 - 11:44 am | अथांग आकाश

अप्रतिम कथानूवाद!
0

सामान्यनागरिक's picture

29 Mar 2023 - 5:28 pm | सामान्यनागरिक

कथा उत्तम आहे, पण माझ्या छोट्याश्या बालबुद्धीला कृदन्त म्हणजे काय कळलं नाय हो

स्मिताके's picture

29 Mar 2023 - 6:34 pm | स्मिताके

सामान्यनागरिक, प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे. मूळ कथेतील शब्द participle असा होता. त्यासाठी धातुसाधित किंवा कृदन्त हा प्रतिशब्द.
अर्थ आणि उदाहरणे इथे पहा.

आणि बालबुद्धी वगैरे नव्हे.. व्याकरणाची परिभाषा शाळा, परीक्षांचा काळ संपल्यावर मीही विसरुन गेले आहे. उदाहरणं तर सोपी आहेत, पण मला नीट सांगता आलं नसतं.

स्मिताके's picture

29 Mar 2023 - 6:47 pm | स्मिताके

भीमराव : मी आताच प्रथम वाचली ही कथा. शाळकरी वयातली, पण खूप खोल आशय आहे त्यामुळे फार आवडली.

तुषार काळभोर, सौंदाळा, कर्नलतपस्वी, नपा : आपण निरनिराळे पैलू नेमके उलगडलेत.

सुधीर कांदळकर, राजेंद्र मेहेंदळे, टर्मीनेटर, प्रा.डॉ., रंगीला रतन : नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे प्रोत्साहन मिळत आहे. अनेक अनेक आभार.

अथांग आकाश : आणखी एक मस्त चित्रमय प्रतिसाद. धन्यवाद!

धर्मराजमुटके : तुलना नको हे खरंच. मी नुकतीच हळूहळू छोटी पावलं टाकायला शिकत आहे. एक मोठा आदर्श समोर ठेवल्याबद्दल आभार.

अतिशय सुरेख आणि ओघवता अनुवाद.

खुपचं सुंदर कथा, अनुवाद!अगदी कथा फ्रेंच भाषेविषयी आहे तरीही इतर भाषांच्याही स्थित्यंतराला लागू होईल.सुलेखन नंतरचे परिच्छेद आणखिन सुंदर आणि निर्मळ आहेत.

पर्णिका's picture

31 Mar 2023 - 4:53 am | पर्णिका

मूळ कथा ( इंग्लिशमध्ये भाषांतरीत ) मुलांना शाळेत अभ्यासक्रमात होती, त्यामुळे पूर्वीच वाचली होती. अनुवादही तितकाच परिणामकारक झाला आहे, स्मिता ! योगायोगाने नुकताच पहिल्या महायुद्धावरील चित्रपट पाहिल्याने कथेतील प्रसंग अगदीच डोळ्यासमोर उभा राहिला.

लोथार मथायस's picture

31 Mar 2023 - 5:28 am | लोथार मथायस

छान अनुवाद

स्मिताके's picture

3 Apr 2023 - 8:36 pm | स्मिताके

प्रचेतस, Bhakti, पर्णिका, लोथार मथायस : प्रतिसादांबद्द्ल अनेक धन्यवाद.
पर्णिका : कोणता चित्रपट पाहिलात?

पर्णिका's picture

14 Apr 2023 - 3:30 am | पर्णिका

स्मिता, All Quiet on the Western Front हा चित्रपट!

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 3:53 pm | केदार पाटणकर

अनुवादाचे अतिशय उच्च कौशल्य तुमच्यापाशी आहे. ह्दयस्पर्शी कथा.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2023 - 9:40 pm | अमरेंद्र बाहुबली

एखादा देश पारतंत्र्यात गेला, तरी जोपर्यंत तो आपली भाषा घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत त्या तुरुंगाची किल्ली त्याच्या हातात असल्यासारखी असते.
हे मराठी लोकांना शिकवायला हवे. हिंदीची दादागीरी नी मार मराठी माणूस मूकाट्याने सहण करतोय. काल नाशकात कूमार विश्वासांच्या कवी संमेलनात मराठी लोकांस घुसू दिले नाही, आज बृह्नमूंबई पालिकेने गुजराती भाषेत टेंडर ची जाहीरात काढलीय, वेरूळ लेण्यात फक्त हिंदी नी इंग्रजी भाषेत माहीती फलक लावलेत ह्या वरून माझा त्यांच्याशी बराच काळापासून वाद चाललाय तिथले मराठी अधिकारी मोडेन पण वाकनार नाही बाण्याने काहीही करून मराठी लावण्यास तयार नाहीयेत. अम्बेगांव नावाचे फलक मी तक्रार करून आंबेगाव असे करून घेतलेत. पुण्यात हिंदी भाषा संमेलन भरवण्यात आलेय. एकून मराठी संपवण्याचे षडयंत्र चारही बाजूने सुरूय.