बंदूक भाग १.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जनातलं, मनातलं
3 Mar 2023 - 10:17 pm

नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार. असा सगळीकडे आनंदी आनंद असताना आम्ही मुलं मात्र कंटाळून गेलो होतो. पऱ्याचं पाणी कमी झाल्यानं पोहायला जाणं बंद होतं,चोंढ्यातून गवत असल्यानं क्रिकेट खेळता येत नव्हतं. कमरेएवढ्या वाढलेल्या गवतानं रानवाटा अडवलेल्या, त्यामुळे भटकणं थांबलेलं, तसं आता रानातून भटकण्याचा सुद्धा काही फायदा नव्हता, कारण रानात ना करवंद, ना जाभलं. त्यामुळॆ शाळा नसली कि नुसता कंटाळा येऊ लागलेला. करमणूक म्हणून पाखरांना दाणे टिपताना बघणं, नाहीतर शेतकरी करत असलेल्या कामाचं निरीक्षण करत बसणं, ह्या पलीकडे करण्यासारखं आम्हां मुलांजवळ काहीच नव्हतं. पण असं निरीक्षण करत बसणं कधी कधी महागात पडायचं,म्हणजे कुणाला वाटलं पोरं अशीच रिकामी बसून आहेत तर म्हणणार,
“चला रे पोरांनो जरा आमचे भारे घेऊन या”
तसं आम्हाला कुणी काम सांगितलं तर आम्ही कधीच नाही म्हणायचो नाही, पण आमच्यातील काही कामचुकार मुलं “जरा पाणी पिऊन येतो," म्हणून सटकणार ती कुठल्यातरी झाडावर जाऊन लपून बसणार, सगळे भारे आणून होईपर्यंत दिसणार नाहीत.
असेच एकदा भाताची अडवी घालत असलेल्या माणसांचं निरीक्षण करत बसलो होतो. तेवढ्यात वरच्या वाडीतून सुरेश आला. सुरेश आमच्या गावात पाहुणा. त्याचे वडील आमच्या गावात ग्रामसेवक म्हणून आलेले. तो राहत असलेल्या वाडीत सुद्धा खूप मुलं होती, पण आमच्या बरोबर त्याची चांगली गट्टी जमलेली. त्यामुळे बघावं तेव्हा तो आमच्या सोबत असायचा. सुरवातीला वाटलेलं हा खूप हुशार असणार, एकतर तो ग्रामसेवकाचा मुलगा त्यामुळे सर सुद्धा त्याच्याजवळ प्रेमाने बोलायचे आणि सरांनी कोणताही प्रश्न विचारला कि, ह्याचा हात वर, ज्या मुलांना उत्तर येतंय त्यांना न विचारता, माना खाली घालून बसलेल्या मुलांनाच सर शक्यतो विचारायचे. पण एकदा सरांनी प्रश्न विचारला, सुरेशनं नेहमीप्रमाणे हात वर केला. त्यादिवशी सरांनी नेमकं सुरेशला उठवलं पण, त्याला काही उत्तर देता आलं नाही. असाच प्रकार दोन तीन वेळा घडला, आणि आम्हाला कळून आलं, कि हा सुद्धा काही हुशार नाही. त्यानंतर जेव्हा जेव्हा तो हात वर करायचा सर त्यालाच उठवायचे, शेवटी त्यानं आपली हि सवय सोडून दिली.
सुरेश आल्याआल्या आमच्या गप्पामध्ये सामील झाला. ओघाओघानं शिकारीचा विषय निघाला.
"बंदुक असती तर, शिकारीला तरी गेलो असतो," दया म्हणाला.
दयाच्या या वाक्यावर सुरेश म्हणाला," माझयाकडं हाय बंदुक."
आम्ही साऱ्यानी त्याच्याकडं संशयाच्या नजरेनं पाहिलं, तसा तो पुन्हा म्हणाला, "खरं, माझ्याकडं हाय बंदूक."
" तुझ्याकड कुठून आली रे बंदूक," रवी चेष्टेच्या सुरात म्हणाला.
" मी स्वतः बनवलीय, तुम्हाला खरं वाटत नसल तर , घेऊन येतां,"
" आणि गोळ्या?" दयानं विचारलं.
" गोळ्या नको काही! लक्ष्मी बॉम पाहिजेल, वात पेटवली कि बॉम्ब आपोआप उडून पुढं जातो," सुरेश म्हणाला.
बॉम्ब आपोआप पुढं जातो म्हणजे, नक्कीच चांगली बंदूक असणार. आता आम्हाला सुद्धा ती बंदूक बघावीशी वाटू लागलं.
" जा, घेऊन ये, माझयाकडे हायेत बॉम्ब," रवी म्हणाला.
गेल्या दिवाळीला रवीचे वडील गावी आले असताना, त्यांनी त्याच्यासाठी फटाके आणले होते, पण दिवाळीच्या वेळेस नुकतीच कापणी करून ठेवलेल्या भाताच्या, नाचणीच्या वरंडी आजूबाजूला असल्यानं फटाके फोडायचे राहून गेलेले.
रवी फटाके आणायला अन सुरेश बंदूक आणायला निघून गेले. आम्ही परत अडवी घालत असलेल्या माणसांचं निरीक्षण करू लागलो. साधारणतः अडवी सहा साडे सहा फूट उंच आणि तेवढीच रुंद. पण, भात झोडून पेंढा टाकला जातो, तेव्हा त्या अडवीच्या पेंढ्याचा आकार अडवीच्या आकाराच्या तीन चार पट मोठा होतो, म्हणजे एवढा सारा पेंढा अडवीत व्यवथित रचून ठेवल्यानं कमी जागेत मावतो.
अर्धी अडवी झाल्यावर, अडवीच्या मधील रिकाम्या जागेत कोली ठेवण्याचं काम सुरु झालं. कोली बांधणं सुद्धा एक कला आहे. हि एखाद्या ढोलासारखी गोलाकार पेंढ्यापासून बनवतात. आता जरी गोण्यांतून धान्य ठेवण्याची पद्धत सुरु झाली असली तरी, ज्या लोकांना धान्य टिकवून ठेवायचं असतं ते अशा पारंपारिक पद्धतीने पेंढ्याची कोली किंवा कणगीमध्ये धान्य ठेवून कणगीच्या तोंडावर टोपली उलटी करून शेणाचं लिंपण घेतात. त्यामुळे असं हवाबंद धान्य खूप वेळ पर्यंत टीकून राहत.
रवीचं घर वाडीत असल्यानं, तो थोड्याच वेळात बाराचं पाकीट घेऊन आला. थोड्या वेळानं सुरेश येताना दिसला, तसा दया त्याच्या दिशेने निघाला. आम्ही मात्र तिथेच बसून राहिलो. सुरेशच्या हातात काहीतरी होतं. नक्कीच ती बंदूक असणार. दयानं सुरेशला गाठलं, त्याच्या हातातून बंदूक घेतली, दोघं काहीतरी बोलत आमच्या दिशेने येऊ लागले. दोघंही आमच्या जवळ आल्यावर, आम्हाला बंदूक दाखवत,
"हि बघा बंदूक!" असं म्हणत दया जोरजोराने हसू लागला.
बंदूक बघून आम्ही सुद्धा हसू लागलो. ती बंदूक म्हणजे एक पत्र्याची नळी होती. बंदुकीचा दांडा म्हणून वाकडी काठी सुतळीच्या साह्यायाने बांधली होती. नळीचा दांडयाकडील भाग लाकडाच्या साह्यायाने बंद करून तिथेच थोडं पुढं एक भोक पाडलं होतं. नळीत बार टाकून तिथून बाराची वात बाहेर काढायची होती. आम्ही हसत असलेलं पाहून सुरेशचा चेहरा पडला.
बंदूक हातात घेत प्रकाश म्हणाला," अरे, ह्या बंदुकीनं साधं पाखरू तरी मरलं काय?"
" नक्कीच मरलं, नेम बरोबर लागला तर," सुरेश रागावून म्हणाला.
ह्याला खरंच राग आलाय, हे ओळखून दया म्हणाला," असू द्या रे, नाहीतर आपल्याला कुठं वाघाची शिकार करायची हाय."
नाहीतरी इथे बसून कंटाळाच आला होता.
"चला रे, कुठंतरी लांब जाऊ," संज्या म्हणाला.
"लांब नको, मला घरी ओरडा पडलं," सुरेश म्हणाला.
"वसाड्या, तू कधी पण रडतच असतोच," संज्या म्हणाला.
"खरं, लांब नको," सुरेश म्हणाला.
तसं इतर वेळेस सुरेशचं आम्हीं ऐकलं नसतं, पण आता त्याची बंदूक असल्यानं ऐकणं भाग होतं. नाहीतर बंदूक मिळाली नसती. वाडीच्या पाठीमागं असणाऱ्या तळीच्या रानाकडं आम्ही निघालो. रानात फिरायचं म्हणजे सोबत काठी हवी म्हणून दोघं-तिघं आपआपल्या घरात काठी आणायला गेले. दयानं संज्याला माचीस आणि अगरबत्ती आणायला पिटाळलं. तळीचा सगळा भाग निसरडा, वाटेच्या आजूबाजूला करवंदाच्या जाळ्या. एप्रिल-मे महिन्यात दिवसातून एकदातरी आमची स्वारी तळीवर असणार. पण आता करवंदाच्या जाळ्यांवर नुसतेच काटे आणि पानं होती. कधी कधी करवंदाची कोवळी पानं सुद्धा गुरासारखी आम्ही चघळत राहायचो. नुकत्याच फुटलेल्या कोवळ्या फांद्या आणि पानं हिरव्या करवंदासारखी आंबट लागतात.
रानाच्या वाटेवर चांगलं कमरेएवढे गवत वाढलं होतं. ज्यांच्याजवळ काठी होती, ते पुढं होऊन गवत झोडपू लागले. जेणेकरून जाण्यासाठी वाट तयार होईल,आणि गवतात जर का, जनावर असेल तर पळून जाईल. रानात शिरताच वानराचं एक टोळकं ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आमच्या समोरून पळालं. वानरांची छोटी पिलं आपल्या आईच्या पोटाला इतकी घट्ट पकडून ठेवतात, कि कितीही उंचावरून उडी मारली तरी पडणार नाहीत. नुकत्याच उड्या मारायला लागलेल्या पिलांचे खेळ बघायला तर खुप मजा येत. तीन चार पिलं एकत्र जमणार, एकाच्या उड्या मारून झाल्या कि ते थांबणार दुसरं सुरु होणार. जो पर्यंत कसला धोका नसेल तो पर्यंत हे सुरूच राहणार.
काही वानर समोरच्या झाडावर बसून टक लावून आमच्याकडेच पाहत होती. रवीनं सवयीनं दगड उचलून वानरांच्या दिशेनं भिरकावला. काही वानर उड्या मारत खालच्या दिशेने पळाली, काही तशीच बसून राहिली.
" अरे, दगड कशाला मारतो, बंदूक चालव ना!," सुरेश म्हणाला.
दयानं आपल्या हातातील अगरबत्ती माझ्याकडं दिली. खिशातून माचीस काढलं. माचीसची काडी पेटवून अगरबत्तीला लावणार, तोच काडी विझली.
" किती काड्या आहेत मोजून बघ," मी म्हणालो.
दयानं काड्या मोज़ल्या, बरोबर तेरा होत्या. एक सुद्धा काडी वाया जाऊ द्यायची नव्हती. सगळे गोलाकार करून उभे राहोलो. दयानं काडी पेटवली तोच पुन्हा विझून गेली. हाताचा आडोसा करून पाहिला, तिघांना खाली बसवून राहिलेले सगळे गोलाकार डोक्याला डोके लावून उभे राहिलो पण काडी पेटत होती- विझत होती. सगळे वैतागले, दया सुरेशकडं रागानं बघू लागला. पण सुरेशचा यात काय दोष! काडी पेटत नाही त्याला, तो तरी काय करणार? वानरं अजून तिथेच बसून होती, काडी पेटवण्यासाठी करत असलेला आटापिट्टा पाहून,
"हि माणसांची पोरं काय माकड चाळे करताहेत?”
म्हणून आमच्याकडे कुतूहलानं पाहत होती. जणू त्यांना गंमत वाटत असावी. शेवटच्या दोन काड्या शिल्लक राहिल्यावर, दयानं नेम धरून उभं राहायचं आणि दुसऱ्यानं बाराची वात पेटवायचं ठरलं. दया नेम धरून उभा राहिला. रवी काडीपेटी घेऊन, काडी पेटवून बाराच्या वातीजवळ नेणार तोच विझून गेली. ते दृश्य बघून आता मला हसायला येऊ लागलेलं. पण हसलो तर शिव्या पडतील म्हणून मी स्वतःला कसंतरी सावरल. मी वानरांच्या दिशेनं पाहिलं, ते सुद्धा गालातल्या गालात हसत असल्याचा भास झाला, आणि जास्तच हसू येऊ लागलं. इथं उभा राहिलो तर हसणार आणि सगळा राग आपल्यावर निघणार म्हणून मी सगळ्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो. रवीनं शेवटची काडी पेटवली पण काहीच उपयोग झाला नाही. सगळ्या काड्या संपल्या पण बार काही पेटला नाही. दया सुरेशकडं रागानं पाहू लागला, आपल्या हातातील बंदूक सुरेशच्या दिशेने भिरकावत म्हणाला,
"काय फालतू बंदूक बनवलीस रे?
सुरेशला खरोखर राग आला होता. तो बंदूक उचलत म्हणाला," तुम्हाला येते तर बनवून दाखवा.आणि घराच्या दिशेनं चालू लागला. सुरेश असं म्हणाल्यानं दयाला जास्तच राग आला, त्यानं एक भलामोठा दगड उचलला,
"काय बघतो रे? लाज नाय वाटत? चल निघ इथून," असं म्हणत हातातील दगड झाडावर बसून आमची गंमत बघणाऱ्या वानरांच्या दिशेनं भिरकावला.
आम्ही सुद्धा पटापट दगड उचलून वानरांच्या दिशेनं भिरकावले. सगळे वानर पळून गेले. सुरेश निघून गेला, पण आमच्या डोक्यात बंदुकीचं खूळ भरून.
क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

सोप्पं,साध, मराठी लिहावे तर तुम्हीच!
गोष्ट आवडली.

भागो सर मनःपूर्वक धन्यवाद.

Nitin Palkar's picture

4 Mar 2023 - 8:31 pm | Nitin Palkar

वाचतोय......

मस्त! आमच्यासारख्या ललित लेखन प्रेमींच्या वाट्याला तुम्ही (कविराज) तसे कमीच येता, पण जेव्हा येता तेव्हा काहीतरी चांगलं वाचायला मिळते ह्यात समाधानी आहोत 😀

पहिला भाग आवडला आहे, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!

तुम्ही उत्कृष्ट लिहीत आहात. मिसळपाव वर असे लेखन येत राहणे हे अत्यंत आवश्यक आणि आनंददायी आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2023 - 9:11 am | कर्नलतपस्वी

दिपकभौ,कथेचा पूर्वरंग तर मस्त जमलाय. शब्द प्रवाह धबधब्या सारखा ओघवता. आता उत्तररंगाची प्रतिक्षा करतोय. लवकरच टाका.

Deepak Pawar's picture

5 Mar 2023 - 10:00 am | Deepak Pawar

Nitin Palkar सर, टर्मीनेटर सर, गवि सर, कर्नलतपस्वी सर आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

5 Mar 2023 - 4:52 pm | तुषार काळभोर

बालभारती पाचवी की सहावीला शितू कादंबरीतला एक उतारा धडा म्हणून होता. त्याची आठवण झाली.

तुषार काळभोर सर मनःपूर्वक धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

7 Mar 2023 - 2:30 pm | चांदणे संदीप

छान चाललीये कथा. पुभाप्र.

सं - दी - प

संदीप सर मनःपूर्वक धन्यवाद.