ज्ञानेश्वरी आणि श्रोडिंगर्स कॅट

Primary tabs

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं
3 Feb 2023 - 2:36 am

हा तर असं आहे की आपलं बैठं काम आहे. एका जागेवर आठ आठ तास बसून कोड रन करणे , कंपनीचा जास्तीत जास्त फायदा करुन देणे, हे सर्व भारतात बसुन करत असल्याने एक्सपेन्सेस कमी करणे आणि त्या योगे मेक अमेरिका ग्रेट अगेन हाच आपला उद्देश ! हां तर हे असे सारे असल्यामुळे बसून बसून खुर्ची कितीही कम्फर्टेबल असली तरीही एवढा वेळ बसल्याने व्हायचं तेच होते आणि पाठ दुखायला लागते. हलकीशी पाठ दुखायला लागली आणि अचानक अमृतानुभव मधील श्लोक आठवला.

तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥

ओवी तशी कळायला अवघड आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या वै. ह.भ.प. विष्णुबुवा जोग यांच्या पुस्तकामध्ये अर्थ शोधावा असा विचार केला आणि एक मोठ्ठा कोड रन करायला लाऊन निवांत वाचन करत बसलो.
ओवीचा अर्थ असा आहे की - ... त्याप्रमाणे अनुभव , अनुभाव्य (ज्याचा अनुभव करायचा ) व अनुभाविक (अनुभव करणारा) ह्या दोन्हीसह गेला, म्हणजे अनुभवाची त्रिपुटी गेली, मग एक एकला कोठले ? म्हणजे एकमेकांचा काय संबंध राहिला ?

पुस्तकाची पीडीएफ सापडली पण व्यवस्थित अशी सर्चेबल पीडीएफ इंटरनेटवर सापडली नाही. हे इतके भारी पुस्तक इतके दुर्मिळ का असावे ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजही मिळालेले नाहीये. माझ्याकडे माझ्या आजोबांची १९७२ सालची अत्यंत जीर्ण अशी आवृत्ती आहे. मध्यंतरी आळंदीला गेलेलो तिथेही सोधाशोध करुन एका दुकानात केवळ दोन प्रती मिळाल्या, त्याही २००८ च्या! (२००८ अगदी काल परवा सारखे वाटत असले तरी तब्बल १५ वर्षे जुने आहे !) असो.
असेच इकडचे तिकडचे वाचता वाचता ऐसी अक्षरे वरील विष्णुबुवा जोग यांच्यावरील देवदत्त परुळेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख सापडला -
वै. विष्णुबुवा जोग महाराज

त्यात ज्ञानेश्वरी मधील ही ओवी सापडली -

का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रिती तो पांडवा । देह ठेवी ॥ ज्ञा. ८-९८ ॥

- ज्याप्रमाणे घटाखाली, मातीच्या भांड्याखाली दिवा ठेवला असेल, तर तो अजून तेवत असेल की विझला असेल काहीच सांगता येत नाही, असाच देहत्याग करावा की तुम्ही देहात आहात की देह सोडून गेलाय हे कळलंच नाही पाहिजे !

आणि एकदम डोक्यात एकदम ट्युब पेटली - This is describing nothing but a quantum superposition !

आता क्वांटम सुपरपोझिशन म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला आधी श्रोडिंगर्स कॅट पॅराडॉक्स म्हणजे काय हे बघायला लागेल. सुप्रसिद्ध फिजिक्स शास्त्रज्ञ श्रोडिंगर याने एक वैचारिक प्रयोग मांडला की -

समजा एक बॉक्स आहे अन त्यामध्ये एक मांजर ठेवलेले आहे आणि त्या मांजरासोबतच एक विषारी मटेरियल ठ्वलेले आहे जे की तासाभरात त्या मांजराला मारून टाकण्याची शक्यता फिफ्टी-फिफ्टी आहे. आता एक तासाभरानी त्या मांजराची स्थिती काय असेल? तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत नाही तोपर्यंत मांजराची नक्कीच स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे आपल्याला कितीही वाटत असलं की मांजर मेलेले असावे तरीही म्हणजे मांजर जिवंतही असू शकत . फिफ्टी-फिफ्टी ! किंवा मांजर मेलेल असू शकतो. फिफ्टी-फिफ्टी ! जोवर बॉक्स ओपन केलेला नाहीये तोपर्यंत मांजर हे क्वांटम सुपरपोझिशनमध्ये आहे अर्थात ते जिवंतही आहे आणि ते मेलेले आहे! जोवर कोणीतरी ओब्झर्व करणारा नाही तोवर त्या मांजराची नक्कीच स्थिती काय हे ठरवता येणार नाही. कारण ज्याक्षणी ओब्झर्वर तो बॉक्स उघडेल तत्क्षणी क्वांटम सुपरपोझिशन कोलॅप्स होइल.
हा विषय वरकरणी बाष्कळ वाटला तरीही खुप खोल आहे. अधिक माहीतीकरिता आपण हा व्हिडीओ पाहु शकता .

हा अगदीच युरेका मोमेंट होता कारण तुम्ही या दृष्टीने तुम्ही पाहायला लागलं की संपूर्ण ज्ञानेश्वरीभर, अमृतानुभवात, तुकोबांच्या कित्येक अभंगात , समर्थांच्या आत्मारामात आणि श्रीमद आद्यशंकराचार्य यांच्या स्तोत्रांमध्ये अशा ह्याच अवस्थेचे वर्णन आढळुन येते, जिला तुर्या म्हणलेले आहे किंवा उन्मनी असे म्हटलेले आहे, राजयोगामध्ये ज्याला निर्विकल्प समाधी असे म्हटले आहे. हे दुसरे तिसरे काही नसून क्वांटम सुपर पोझिशन आहे!

जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठउ तया ॥

जो घनदाट अरण्यात, जिथे कसलाच स्पर्ष नाही तिथे झोपला आहे, त्याला कोणीच पहात नाही , आणि तो इतका गाढ झोपला आहे की त्याला "मी झोपलो आहे" ही जाणीवही नाही.

कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।
तो नेलियां म्हणिजे । तेणेंवीण ॥ ४-४२ ॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥

जमीनीवर कुंभ अर्थात मातीचा घडा ठेवला म्हणुन आपण तिला सकुंभ म्हणु , तोच काढुन घेतला तर तिला निष्कुंभ म्हणु , पण मुळातच कुंभ असो की नसो , ती जमीन आधीपासुनच आहे तैशीच आहे. आपली स्थिती ह्या जमीनीसारखीच क्वांटम सुपर पोझिशन मध्ये आहे, तुम्ही ऑब्झर्व्ह करताय म्हणुन सकुंभ , निष्कुंभ वगैरे तुमच्या प्रत्ययास येत आहे , एरव्ही जमीन आहे तशीच आहे !

एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥

तसेच सत् चित आनंद ह्या शब्दांनी ज्याचा निर्देश केला जातोय ती आपली स्वरुपस्थिती , आत्मा आहे तैसाच आहे, सत् चित आनंद हे शब्द अनव्यावृत्ती अर्थात जे नाही त्याचा अभाव दर्शवणारे आहेत , आत्माच्याची स्थिती दर्शक नव्हेत , कारण ती जी क्वांतम सुपर पोझिशन आहे ती सत् चित आनंद की अजुन काही असे ऑब्झवही करणे शक्य नाही. म्हणजेच एकदा असत , अचित(जड) आणि दु:ख ह्यांचा अभाव दाखवला की ह्या सत् चित आनंद ह्या शब्दांचा उपयोग संपला. त्यानंतर केवळ क्वांटम सुपरपोझिशन आहे बस्स...

हेच समर्थ दासबोधात म्हणताहेत -

तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं ।
अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥ दासबोध
अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचि करितां ।
ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥

हीच अवस्था तुकोबा वर्णन करत आहेत -

आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥

----- हरि आम्हांसवें सर्वभोगी , अहाहा... क्या बात है क्या बात है !

सगळेजण राहुन फिरुन एकच म्हणत आहेत की ज्याला आत्मा , वस्तु, हरि , ब्रह्म , शिव वगैरे वगैरे जे काही म्हणलेले आहे ती अ‍ॅब्सोल्युट क्वांटम सुपरपोझीशन आहे की तिच्याकडे द्रष्टाभावाने पाहिल्यावर तिचा भंग होतोय , पण तोही तुमच्यासाठी. ती अवस्था आहे तशीच आहे ! ती अवस्था पाहणारा मी कोणतरी आहे हा विचार बाजुलासारुन तुम्ही पाहिलेत तर तुमच्या अनुभवास येईल की तुम्ही स्वतःच त्या क्वांटम सुपर पोझिशन मध्ये आहात ! आणि आता हा अनुभवही पुर्ण निशेष विरुन जाऊ दे .... मग काय उरेल तुम्हीच सांगा ... सांगता येत असेल तर ....

किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥

हा सगळा विचार करत असताना एक दोन तास कधी संपले तेच कळलं नाही. नेहमीचा कोड रन कम्प्लीट झाला , स्क्रीनवर एकदम पॉप आल्यामुळे विचारांची तंद्री भंग पावली आणि अचानक लक्षात आले अरे मगाशी आपली पाठ दुखत होती. पाठ दुखीचा अनुभव करणारा मनाचा कोपरा काही काळ बंद झाल्यामुळे त्या पाठदुखीची जाणीवही लुप्त झाली होती आणि या क्षणी आपल्या लक्षात आलं की असं काहीतरी होतं त्या क्षणी परत वापर झाली.
म्हणजे जर स्क्रीनवर येणारा पॉपअपच नसेल किंवा जर आपण कॉम्प्युटर समोर बसलोच नसु आणि ही ध्यानावस्था भंगच झाली नाही तर आपण सर्वच अनुभवाला येणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेलो असु. आणि तेव्हा आपण पलीकडे गेलेलो आहोत हा अनुभव नसेल ...

झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥

तंत्रअनुभव

प्रतिक्रिया

ती बॉक्स पारदर्शक काचेची असली तर ? श्रोडिंगर साहेब काय म्हणतील यावर ?
.

कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥
--- अशी आमची स्थिती जाहली आहे.
होवेवेर, तुमचा अभ्यास आणि विद्वत्तेला कोटि कोटि प्रणिपात.

तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत नाही तोपर्यंत मांजराची नक्कीच स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही.
बाष्कळच वाटतंय भौतिक दृष्ट्या विचार केला तर ..खोक कशाला उघडायला पाहिजे
१) एवढया छोट्या खोक्यात प्राणवायू किती असणार ते मांजर त्या अभावी एक तासाच्या आत मारू शकते ...
२) सर्वात महत्वाचे कोणाही इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर किंवा डॉक्टर ला विचारा ... तो सांगेल मांजराला ४ सेन्सर लावा कि ज्यातून लगेच कळेल कि मांजर जिवंत आहे कि नाही ते ...

तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे. एक तात्विक सिद्धता समजायला सोपी व्हावी म्हणून ते उदाहरण तयार केले आहे. त्या जागी अन्य उदाहरणे देखील घेता येतील.

बाकी लेखातील दोन गोष्टींचे साम्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न भयंकर रोचक आहे. खरे तर "श्रोडिंजरचे मांजर" आणि "If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?" या अगदी एकच संकल्पना नाहीत.

लेखातील संकल्पना फार खोल आहे. ती जंगलात तुटणाऱ्या झाडाच्या कल्पनेशी अधिक जुळते. अर्थात तोही एक थॉट एक्सपिरिमेंटच आहे आणि तोही रोचक आहेच.

लेख आवडला.

(एक फिजिक्स ग्राज्वेट)

तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे
ते समजले होते हो पण " त्यासाठी अतर्क्य उद्धरण का द्व्यावे " विचित्र " वाटले म्या पामराला .. पटणारे तरी उदाहरण द्व्यावे

त्यांनी ते अधिक सुलभ करून मांडल्याने अतिसुलभ ओव्हर सिम्प्लीफाय आणि म्हणून अधिक विचित्र वाटले असावे. किंबहुना ते विचित्रच असणे अपेक्षित आहे. या प्रयोगाची एक खासियत म्हणजे श्रोडिंजरला देखील प्रत्यक्ष मांजर प्रत्यक्ष मरणे, जिवंत असणे असे अभिप्रेत नसून तो क्वांटम तत्वांतील absurdity या उदाहरणाने अधोरेखित करू इच्छित होता, जी आपल्या नेहमीच्या क्लासिक थॉट प्रोसेसमध्ये तर्कदृष्ट्या बसत नव्हती.

कानडाऊ योगेशु's picture

4 Feb 2023 - 10:27 am | कानडाऊ योगेशु

If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?"

ह्यावरुन आठवले. लहान मूल जर पडले तर आसपास कोणी नसेल तर गुमान उठुन चालु लागते तेच जर आसपास पाहणारे कुणी असेल तर भोकाड पसरते.
बाकी लेख पुनःपुन्हा वाचावा लागेल.
पण एरवी असंबंध्द वाटणार्या कल्पनेतुन अध्यात्मातील रहस्ये व विज्ञानातील शोध लागले आहेत.
बूल ह्या शास्त्रज्ञाने आपण आपले विचार गणितीय भाषेत मांडु शकतो अशी थियरी मांडली होती व त्याचे त्याकाळात फार हसे झाले होते पण पुढे येणार्या संगणक युगाची ही पहिली आणि आवश्यक पायरी होती.

चौकस२१२'s picture

13 Mar 2023 - 6:12 am | चौकस२१२

If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?"
हो आवाज होणारच .. कशावर आपतंटे यावर आवाज किती ते अवलंबून आहे ... साधे भौतिक शास्त्र आहे ! त्यात कसलं आलाय गूढ ?

ऐकायला माणूस नसेल . प्राणी नसेल जवळपास त्याने काय फरक पडतो .. आधुनिक तंत्राप्रमाणे त्याचे निरिक्षान / आवाज टिपता येतो कि
जेवहा हि यंत्रे नवहती तेवहा हे एकवेळ म्हणून शकता कि आवाज झाला कि नाही!

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2023 - 6:45 am | कर्नलतपस्वी

सांगायचा प्रयत्न करत असावा. मांजर हे रूपक असावे.
मारकस भौ जरा उलगडून सांगा.

बाकी ज्यांचा संतसाहित्याचा गाढा अभ्यास त्यांच्याबद्दल नेहमीच गुढ वाटते.

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2023 - 6:59 am | कर्नलतपस्वी

पुस्तकाची लिंक द्याल तर बरे.वाचायला आवडेल.

मार्कस ऑरेलियस's picture

3 Feb 2023 - 10:25 am | मार्कस ऑरेलियस

अमृतानुभव - विष्णुबुवा जोग
https://archive.org/details/Amrutanubhav/mode/2up

हे पुस्तक अतिषय खोलवर जाऊन लिहिले असल्याने कळायला अवघड आहे, आपली आध्यात्मिक पुर्वपीठीका, शुध्द मराठीत बॅकग्राऊंड नसल्यास ह्या लेखनातील व्यामिश्रता पाहुन आपला निरास होऊ शकतो.

त्या तुलनेने हे खालील पुस्तक वाचायला अन समजायला सोप्पे आहे.
अमृतानुभव - दत्तराज देशपांडे .
https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti/mode/2up

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2023 - 4:40 pm | कर्नलतपस्वी

प्रयत्न करतो. एक जरी ओवी अनुभवास आली तरी माऊलींची कृपा झाली असे समजेन.

शाम भागवत's picture

17 Mar 2023 - 11:08 am | शाम भागवत

हा प्रतिसाद एकदम आवडला. उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही.
काही कळण्यासाठी वाचाल तर भरपूर माहिती मिळवाल. त्यामुळे आणखी आणखी वाचत राहाल. त्या माहीतीच्या आधारे शास्री व्हाल. पंडीत व्हाल. दुसऱ्यांच्या चुका दाखवून देऊ शकाल. लोकांत ज्ञानी म्हणून प्रसिध्दही होऊ शकाल. ज्या वाचनामुळे हे सगळे मिळाले ते आणखी आणखी वाचत राहायचा प्रयत्न करत राहाल.

पण अनुभव यावा असं वाटून वाचाल, तर मात्र अंतर्मुख व्हाल. आत्तापर्यंत खूप वाचले. आता वाचन थांबवून प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असे वाटायला लागेल. मग मात्र लक्षात येईल की हा अमृतानुभव बाहेर नाहीये. आत आहे. बाहेरून काही मिळवायचे नाही आहे.
आणि...
तुमचा खरा प्रवास सुरू झालेला असेल.
_/\_

आत्मा असेल नसेल, शरीर आहे आणि ते सुख दुःख अनुभवते .. हे अनादी अनंत काळ दिसत आहे ...मग कसले आले डोम्बलचे गूढ ! उगाच अतर्क्य कशाला करायचे .. उगचःचा रवंथ

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Feb 2023 - 7:30 am | राजेंद्र मेहेंदळे

ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_

बाकी ते तुर्या वगैरे आम्ही रोज दुपारी हापिसात अनुभवतो म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे समुद्रकिनारी लाट आली की पाणी आणि लाट गेली की तिथे वाळू त्यातली सीमारेषा जशी सांगता येईना तसेच काहीसे. आता श्रॉडिंगर या उदाहरणावर काय म्हणेल हा ही एक मुद्दा आहेच.

(आणखी एक फिजिक्स ग्राज्वेट आणि श्रॉडिंगर वेव्ह थिअरीचा पण आता फक्त कोड रन करणारा पंखा)

ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_>>>>

माझे पण दंडवत घ्या.
लेख अत्यंत वाचनीय आहे.
फक्त १२० वर्ष उशिरा आला.

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2023 - 9:30 am | प्राची अश्विनी

कमाल लिहिलंय! _/\_

विवेकपटाईत's picture

3 Feb 2023 - 10:44 am | विवेकपटाईत

आजकाल बिना मातीची फक्त पाण्यात शेती होते. या पृथ्वीवर असे ही प्राणी असू शकतात त्यांना मातीने बनलेल्या शरीराची आवश्यकताच नाही. फक्त वायू वर जगत असतील. वायू स्वरुपी असतील. बाकी आपले जेवढे ज्ञान तेवढेच आपले तर्क.

Bhakti's picture

3 Feb 2023 - 11:05 am | Bhakti

वाह प्रगो!
फिजिक्स आणि संतवाणीचा मेळ!खुपचं आवडलं.
पुस्तकाची प्रत दिल्याबद्दल धन्यवाद!
बाकी मोगरा फुलला या पुस्तकाची शेवटची काही पान‌ वाचतेय त्यामुळे हे वाचताना अधिकच भारावले.
माऊली माऊली _/\_

श्वेता व्यास's picture

3 Feb 2023 - 5:15 pm | श्वेता व्यास

वा, अप्रतिम लिहिलंय.

अर्धवटराव's picture

3 Feb 2023 - 9:01 pm | अर्धवटराव

नव्हे एकच समस्या आहे..

relativity चा त्याग म्हणजे absolute चा बोध हा तो सिद्धांत. आणि "absolute चा बोध" असला काहि प्रकारच नाहि कारण बोध करणाराच उरत नाहि आणि 'बोध' हि संभावना नष्ट होते म्हणुन नेती नेती आणि शेवटी मौन.

पण आता हे मौन नवीन absolute म्हणुन पुढे येतं. ते नि:शब्द आहे एव्हढाच काय तो फरक.

Bhakti's picture

3 Feb 2023 - 9:34 pm | Bhakti

+१
छान

यालाच माऊली "ये ह्रुदयीचे ते ह्रुदयी घातले" म्हणत असावेत काय? किवा "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" ???

आपल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदीयाळी ने आपल्याकरता इतकं काहि देऊन ठेवलं आहे कि एकेका ओळीवर डोळे विस्फारावे असलं काहि सापडतं.
आणि मार्कोस रावांनी तर एकदम झकास सुर पकडला आहे.

कारण ज्ञानेश्वरी निरूपण ग्रंथ बऱ्याच लेखकांचे आहेत त्यापैकी कोणता घ्यावा या विचारात पडलो होतो.
आमच्या इथे पुस्तक अदलाबदल प्रकल्पांत खूप ज्ञानेश्वरी येत होत्या आणि जात होत्या. पण कोणती घेऊ हे कळत नव्हते. (ज्ञानेश्वरी दुरूनच पाहिली आहे.) तर मग शेवटी एक पांढरा जाड ठोकळा दिसला. इंग्रजी भाषांतर - भवन्स प्रकाशन. ते घेतले.
सांगायचा मुद्दा की सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही, रिलेटिविटी थिअरी आणखी सोपी करता येत नाही ,गीता आणखी लहान करता येत नाही.

अर्जुनाला एका वाक्यात उत्तर देऊ न शकणारा कृष्ण भाराभर तत्त्वज्ञान ऐकवतो कारण ते शक्य नाही.

प्रकाश कसा आहे? लहरी किंवा कण स्वरूपात? तर आपण बघू तसा आहे.
(अजून एक डिजिटल ग्रॅजुएट - वय वाढलेला.)
__________________
बाकी तुमचे निरूपण भारी आणि पाठदुखी घालवायचा उपायही स्वस्त.

कंजूस's picture

3 Feb 2023 - 9:53 pm | कंजूस

फिजिकल.

टर्मीनेटर's picture

3 Feb 2023 - 10:24 pm | टर्मीनेटर

निरूपणाची आधुनिक पद्धत आवडली!
(पुलंच्या असा मी असामी मधल्या) गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द ट्यून' मधले युनिव्हर्सल केऑस मधून कॉसमॉस निर्माण होताना सुप्राकॉन्शसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपीरिअन्सेस घेताना... वगैरे वगैरे आठवले एकदम 😂

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Feb 2023 - 2:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले आणि हा लेख आला

गोडिये आपुली गोडी। घेता काय न माये तोडी ।
आम्हा परस्परे आवडी । तो पाडू असे ।।

लेख वाचताना असे काहीसे वाटत होते

पैजारबुवा,

मार्कस ऑरेलियस's picture

4 Feb 2023 - 3:28 pm | मार्कस ऑरेलियस

___/\___
पैजारबुवा, नाव सार्थ केलेंत आपण ! दंडवत स्विकारा ___/\___

आता तुम्हाला फक्त इतकेच म्हणतो की ---

सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन । तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥
कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेती उमसू ॥ ४४ ॥
चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें । हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥

___/\___

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव | म्हणती ज्ञान देव तुम्हां ऐसे ||
मज पामरासी काय थोरपण | पायीची वहाण पायीं बरी || पांडुरंग पांडुरंग ||

___/\___

नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले

झक्कास!

वाचून झाल्यावर रसग्रहण करणारा लेख लिहा!

- (क्वांटम) सोकाजी

सोत्रि's picture

5 Feb 2023 - 8:23 am | सोत्रि

मार्कस, सुंदर युरेका मोमेंट आणि अप्रतिम विवेचन!

लेख वाचता वाचता 'वेव्ह फंक्शन कोलॅप्स' झाल्याचं फिलींग आलं.

निर्विकल्प समाधी हे दुसरे तिसरे काही नसून क्वांटम सुपर पोझिशन आहे!

_/\_

क्वांटम सुपर पोझिशन = तत्वमसि!

- (क्वांटम) सोकाजी

कमाल आहे बुआ... दंडवत घ्या ...
असा विचार करता येणं हेच खूप भाग्याचे... __/\__

सुमेरिअन's picture

25 Feb 2023 - 4:02 am | सुमेरिअन

कमाल केली! फारच कमी ज्ञानवंत असतील जे क्वांटम सुपरपोझिशन आणि ज्ञानेश्वरीचा असा योग्य घडवून आणू शकतील..

मार्कस ऑरेलियस's picture

11 Mar 2023 - 2:36 pm | मार्कस ऑरेलियस

हा व्हिडीओ पहा >>> ६.२५

थॅन्क्यु गॉड , रीअली , थॅन्क्यु !!

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।10.10।।(
___________/\_____________

व्वा! वेधक आणि उद्बोधक! खूप आवडले!

निर्विकल्प समाधी अवस्थेचं वर्णन अनेक जण करतात. पण ती अवस्था येते कशी/का, ते समजेल असं सांगता येत नाही.
- स्वामी विवेकानंद म्हणतात (भावार्थ) -- जितके तर्क लावावयाचे असतील तेवढे सर्व लावून झाल्यावरही जेव्हा वर्णन करता येत नाही, तेव्हा "प्रत्ययास" येते की तर्क जिथे संपतात त्यापुढे त्याची सुरुवात आहे. ती अनुभवाचीच गोष्ट आहे, तर्काची नाही.
- ठाकूर म्हणतात (भावार्थ) -- ब्रह्म अजून "उष्टे" झालेले नाही. कारण त्याचे वर्णन करायला कोणत्याही भाषेत शब्दच नाहीत.

ही संकल्पनाही अशीच गूढ आहे.. समजावून सांगितले तरीही समजणार नाही.. उमजेल तेव्हाच खरं!

कुणाला गंध,कुणाला ध्वनी,कुणाला दृष्टी विशेष दिल्या आहेत. ते नसलं तर आपलं काळं मांजर होतं.

मार्कस ऑरेलियस's picture

17 Mar 2023 - 1:02 pm | मार्कस ऑरेलियस

Note to self :

Its impossible for me to prove that I came up with the exactly same idea totally independently.

चांदणे संदीप's picture

17 Mar 2023 - 1:35 pm | चांदणे संदीप

हा लेख आला तेव्हाच वरवर चाळलेला. विशेष काही कळालं नाही म्हणून सोडून दिला.
आताच काही दिवसांपूर्वी मार्व्हल सिरीज मधला "अ‍ॅन्ट मॅन अ‍ॅन्ड वास्प - क्वांटमेनिया" हा चित्रपट पाहण्यात आला. त्यात ह्या श्रोडिंगर कॅटचा उल्लेख आला तेव्हा लगेचच हा लेख आठवला. परत एकदा नीट वाचून समजून घेऊ असं घोकलं कारण चित्रपटात ते दृश्य पाहताना अतिशय इंटरेस्टींग वाटलं. झालं, पुढे विसरून गेलो. आज हा लेख वर आल्यावर पुन्हा नीट वाचला. अजूनही पूर्णपणे कळालं नाही पण विषय रोचक आहे. चित्रपटही तसाच आहे, नक्की बघावा. त्यात मागेच आलेल्या त्या "लोकी" सिरीजशी कनेक्ट असल्यामुळे अजूनच भारी आहे.

थोडक्यात, हे हॉलिवूडवाले जे आत्ता इमॅजिन करत आहेत आपण भारतीय खूप आधीच करून बसलेलो आहोत.

सं - दी - प