हा तर असं आहे की आपलं बैठं काम आहे. एका जागेवर आठ आठ तास बसून कोड रन करणे , कंपनीचा जास्तीत जास्त फायदा करुन देणे, हे सर्व भारतात बसुन करत असल्याने एक्सपेन्सेस कमी करणे आणि त्या योगे मेक अमेरिका ग्रेट अगेन हाच आपला उद्देश ! हां तर हे असे सारे असल्यामुळे बसून बसून खुर्ची कितीही कम्फर्टेबल असली तरीही एवढा वेळ बसल्याने व्हायचं तेच होते आणि पाठ दुखायला लागते. हलकीशी पाठ दुखायला लागली आणि अचानक अमृतानुभव मधील श्लोक आठवला.
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥ओवी तशी कळायला अवघड आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या वै. ह.भ.प. विष्णुबुवा जोग यांच्या पुस्तकामध्ये अर्थ शोधावा असा विचार केला आणि एक मोठ्ठा कोड रन करायला लाऊन निवांत वाचन करत बसलो. ओवीचा अर्थ असा आहे की - ... त्याप्रमाणे अनुभव , अनुभाव्य (ज्याचा अनुभव करायचा ) व अनुभाविक (अनुभव करणारा) ह्या दोन्हीसह गेला, म्हणजे अनुभवाची त्रिपुटी गेली, मग एक एकला कोठले ? म्हणजे एकमेकांचा काय संबंध राहिला ? पुस्तकाची पीडीएफ सापडली पण व्यवस्थित अशी सर्चेबल पीडीएफ इंटरनेटवर सापडली नाही. हे इतके भारी पुस्तक इतके दुर्मिळ का असावे ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजही मिळालेले नाहीये. माझ्याकडे माझ्या आजोबांची १९७२ सालची अत्यंत जीर्ण अशी आवृत्ती आहे. मध्यंतरी आळंदीला गेलेलो तिथेही सोधाशोध करुन एका दुकानात केवळ दोन प्रती मिळाल्या, त्याही २००८ च्या! (२००८ अगदी काल परवा सारखे वाटत असले तरी तब्बल १५ वर्षे जुने आहे !) असो. असेच इकडचे तिकडचे वाचता वाचता ऐसी अक्षरे वरील विष्णुबुवा जोग यांच्यावरील देवदत्त परुळेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख सापडला - वै. विष्णुबुवा जोग महाराज त्यात ज्ञानेश्वरी मधील ही ओवी सापडली -
का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रिती तो पांडवा । देह ठेवी ॥ ज्ञा. ८-९८ ॥- ज्याप्रमाणे घटाखाली, मातीच्या भांड्याखाली दिवा ठेवला असेल, तर तो अजून तेवत असेल की विझला असेल काहीच सांगता येत नाही, असाच देहत्याग करावा की तुम्ही देहात आहात की देह सोडून गेलाय हे कळलंच नाही पाहिजे ! आणि एकदम डोक्यात एकदम ट्युब पेटली - This is describing nothing but a quantum superposition ! आता क्वांटम सुपरपोझिशन म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला आधी श्रोडिंगर्स कॅट पॅराडॉक्स म्हणजे काय हे बघायला लागेल. सुप्रसिद्ध फिजिक्स शास्त्रज्ञ श्रोडिंगर याने एक वैचारिक प्रयोग मांडला की - समजा एक बॉक्स आहे अन त्यामध्ये एक मांजर ठेवलेले आहे आणि त्या मांजरासोबतच एक विषारी मटेरियल ठ्वलेले आहे जे की तासाभरात त्या मांजराला मारून टाकण्याची शक्यता फिफ्टी-फिफ्टी आहे. आता एक तासाभरानी त्या मांजराची स्थिती काय असेल? तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत नाही तोपर्यंत मांजराची नक्कीच स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे आपल्याला कितीही वाटत असलं की मांजर मेलेले असावे तरीही म्हणजे मांजर जिवंतही असू शकत . फिफ्टी-फिफ्टी ! किंवा मांजर मेलेल असू शकतो. फिफ्टी-फिफ्टी ! जोवर बॉक्स ओपन केलेला नाहीये तोपर्यंत मांजर हे क्वांटम सुपरपोझिशनमध्ये आहे अर्थात ते जिवंतही आहे आणि ते मेलेले आहे! जोवर कोणीतरी ओब्झर्व करणारा नाही तोवर त्या मांजराची नक्कीच स्थिती काय हे ठरवता येणार नाही. कारण ज्याक्षणी ओब्झर्वर तो बॉक्स उघडेल तत्क्षणी क्वांटम सुपरपोझिशन कोलॅप्स होइल. हा विषय वरकरणी बाष्कळ वाटला तरीही खुप खोल आहे. अधिक माहीतीकरिता आपण हा व्हिडीओ पाहु शकता . हा अगदीच युरेका मोमेंट होता कारण तुम्ही या दृष्टीने तुम्ही पाहायला लागलं की संपूर्ण ज्ञानेश्वरीभर, अमृतानुभवात, तुकोबांच्या कित्येक अभंगात , समर्थांच्या आत्मारामात आणि श्रीमद आद्यशंकराचार्य यांच्या स्तोत्रांमध्ये अशा ह्याच अवस्थेचे वर्णन आढळुन येते, जिला तुर्या म्हणलेले आहे किंवा उन्मनी असे म्हटलेले आहे, राजयोगामध्ये ज्याला निर्विकल्प समाधी असे म्हटले आहे. हे दुसरे तिसरे काही नसून क्वांटम सुपर पोझिशन आहे!
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला । आपुलाहि निमाला । आठउ तया ॥जो घनदाट अरण्यात, जिथे कसलाच स्पर्ष नाही तिथे झोपला आहे, त्याला कोणीच पहात नाही , आणि तो इतका गाढ झोपला आहे की त्याला "मी झोपलो आहे" ही जाणीवही नाही.
कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे । तो नेलियां म्हणिजे । तेणेंवीण ॥ ४-४२ ॥ परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग । ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥जमीनीवर कुंभ अर्थात मातीचा घडा ठेवला म्हणुन आपण तिला सकुंभ म्हणु , तोच काढुन घेतला तर तिला निष्कुंभ म्हणु , पण मुळातच कुंभ असो की नसो , ती जमीन आधीपासुनच आहे तैशीच आहे. आपली स्थिती ह्या जमीनीसारखीच क्वांटम सुपर पोझिशन मध्ये आहे, तुम्ही ऑब्झर्व्ह करताय म्हणुन सकुंभ , निष्कुंभ वगैरे तुमच्या प्रत्ययास येत आहे , एरव्ही जमीन आहे तशीच आहे !
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु । अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा । तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥तसेच सत् चित आनंद ह्या शब्दांनी ज्याचा निर्देश केला जातोय ती आपली स्वरुपस्थिती , आत्मा आहे तैसाच आहे, सत् चित आनंद हे शब्द अनव्यावृत्ती अर्थात जे नाही त्याचा अभाव दर्शवणारे आहेत , आत्माच्याची स्थिती दर्शक नव्हेत , कारण ती जी क्वांतम सुपर पोझिशन आहे ती सत् चित आनंद की अजुन काही असे ऑब्झवही करणे शक्य नाही. म्हणजेच एकदा असत , अचित(जड) आणि दु:ख ह्यांचा अभाव दाखवला की ह्या सत् चित आनंद ह्या शब्दांचा उपयोग संपला. त्यानंतर केवळ क्वांटम सुपरपोझिशन आहे बस्स... हेच समर्थ दासबोधात म्हणताहेत -
तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥ दासबोध अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचि करितां । ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥हीच अवस्था तुकोबा वर्णन करत आहेत -
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥----- हरि आम्हांसवें सर्वभोगी , अहाहा... क्या बात है क्या बात है ! सगळेजण राहुन फिरुन एकच म्हणत आहेत की ज्याला आत्मा , वस्तु, हरि , ब्रह्म , शिव वगैरे वगैरे जे काही म्हणलेले आहे ती अॅब्सोल्युट क्वांटम सुपरपोझीशन आहे की तिच्याकडे द्रष्टाभावाने पाहिल्यावर तिचा भंग होतोय , पण तोही तुमच्यासाठी. ती अवस्था आहे तशीच आहे ! ती अवस्था पाहणारा मी कोणतरी आहे हा विचार बाजुलासारुन तुम्ही पाहिलेत तर तुमच्या अनुभवास येईल की तुम्ही स्वतःच त्या क्वांटम सुपर पोझिशन मध्ये आहात ! आणि आता हा अनुभवही पुर्ण निशेष विरुन जाऊ दे .... मग काय उरेल तुम्हीच सांगा ... सांगता येत असेल तर ....
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥हा सगळा विचार करत असताना एक दोन तास कधी संपले तेच कळलं नाही. नेहमीचा कोड रन कम्प्लीट झाला , स्क्रीनवर एकदम पॉप आल्यामुळे विचारांची तंद्री भंग पावली आणि अचानक लक्षात आले अरे मगाशी आपली पाठ दुखत होती. पाठ दुखीचा अनुभव करणारा मनाचा कोपरा काही काळ बंद झाल्यामुळे त्या पाठदुखीची जाणीवही लुप्त झाली होती आणि या क्षणी आपल्या लक्षात आलं की असं काहीतरी होतं त्या क्षणी परत वापर झाली. म्हणजे जर स्क्रीनवर येणारा पॉपअपच नसेल किंवा जर आपण कॉम्प्युटर समोर बसलोच नसु आणि ही ध्यानावस्था भंगच झाली नाही तर आपण सर्वच अनुभवाला येणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेलो असु. आणि तेव्हा आपण पलीकडे गेलेलो आहोत हा अनुभव नसेल ...
झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु । होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥
ॐ
वाचन संख्या
11322
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती बॉक्स पारदर्शक काचेची असली तर ?
तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे.
In reply to तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत by चौकस२१२
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे.
In reply to तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. by गवि
त्यांनी ते अधिक सुलभ करून
In reply to तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. by चौकस२१२
If a tree falls in a forest
In reply to तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. by गवि
If a tree falls in a forest
In reply to If a tree falls in a forest by कानडाऊ योगेशु
लेखक काही वेगळेच...
पिडीएफ
अमृतानुभव - विष्णुबुवा जोग
In reply to पिडीएफ by कर्नलतपस्वी
धन्यवाद
In reply to अमृतानुभव - विष्णुबुवा जोग by प्रसाद गोडबोले
हा प्रतिसाद एकदम आवडला. उत्तर
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
आत्मा असेल नसेल, शरीर आहे आणि
हायला!!
ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा
कमाल लिहिलंय! _/\_
आजकाल बिना मातीची फक्त
वाह प्रगो!
वा, अप्रतिम लिहिलंय.
यात एक समस्या आहे.
+१ छान
In reply to यात एक समस्या आहे. by अर्धवटराव
लेखाचे सोडाच!! हा प्रतिसाद मला ४ वेळा वाचावा लागलाय
In reply to यात एक समस्या आहे. by अर्धवटराव
आपण मराठी लोकं खुप भाग्यवान आहोत साहेब.
In reply to लेखाचे सोडाच!! हा प्रतिसाद मला ४ वेळा वाचावा लागलाय by राजेंद्र मेहेंदळे
अगोदर लेख आला असता तर . . .
डिजिटल नव्हे
निरूपणाची आधुनिक पद्धत आवडली!
लेख आवडला
___/\___
In reply to लेख आवडला by ज्ञानोबाचे पैजार
नुकतेच "राजेश भूतकर" यांचे
In reply to लेख आवडला by ज्ञानोबाचे पैजार
सुरेख _/\_
कमाल आहे बुआ... दंडवत घ्या ..
दंडवत!
फॉर सेल्फ रेफरन्स
व्वा! वेधक आणि उद्बोधक! खूप
संवेदना शक्ती प्रत्येकास वेगळ्या मिळाल्या आहेत.
Note to self :
अध्यात्म वगैरे डोक्यावरून जातं